गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा!

Submitted by इनामदार on 3 January, 2017 - 23:07

राम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.

पण जे लोक पुतळा पाडल्याचा निषेध करत आहेत ते लोक प्रख्यात साहित्यिक "झोंबी" कार आनंद यादव यांचा उतारवयात जो छळ केला गेला तेंव्हा कुठे होते? काय असे लिहिले होते यादव यांनी तुकारामांविषयी? कि तरुण वयात तुकाराम आसपासच्या इतर चार तरुणांप्रमाणेच ऐहिक आनंदाच्या पाठी लागले होते. पण लवकरच त्यांना कळून चुकले कि हा मार्ग योग्य नव्हे. काय वादग्रस्त होते यात? या लिखाणाच्या प्रति आजही मटा च्या साईटवर इथे आणि इथे उपलब्ध आहेत.

4079921.cms_.jpg4079930.cms_.jpg

बस्स इतक्या लिखाणासाठी यादवांविरुद्ध वारकर्यांना उठून बसवले गेले. लिखाण आधारहीन आहे अशी ओरड केली गेली. आंदोलने झाली. यादवांच्या वैयक्तिक निंदानालस्तीवर लोक उतरले होते. त्यांना शिविगाळ करण्यापर्यंत मजल गेली. इतकेच काय त्यांना पोलीस कोठडी पण देण्यात आली. कोर्टाने हि पुस्तके फाडून टाकण्याचे आदेश दिले. या सगळ्याचे निमित्त करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून त्यांना बाजूला ठेवले गेले. या सगळ्यामुळे विलक्षण व्यथित झालेल्या यादवांनी यानंतर लिहिणेच सोडून दिले. एका सिद्धहस्त लेखकाची उतारवयात वाताहत झाली. शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याच पूर्वी केलेल्या लिखाणाची ते पारायणे करत जुन्या आठवणीत हरवून जात. सर्वांनीच त्यांना एका न केलेल्या गुन्ह्याबद्दल वाळीत टाकले.

आणि दुसरीकडे जिजाऊ महाराज, संभाजी महाराज यांच्यावर मुक्तहस्तपणे चारित्र्यहनन करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र भूषण देतात. पुतळे उभारतात. आणि त्याविरुद्ध कुणी कृती केली कि लगेच माध्यमांतून निषेधांची कोल्हेकुई सुरु होते. जरा राजसन्यास उघडून बघा गडकर्यांनी काय मुक्ताफळे उधळून ठेवली आहेत:
RaGaGadkari_RajSanyas.jpg

या लिखाणाची यादवांच्या लिखाणाशी तुलना करा आणि मग गडकरी यांचा उदो उदो करायचा असेल तर मग यादव यांचा अजून उदो उदो व्हायला हवा. आणि पुतळा पाडणाऱ्या वृत्तीचा निषेधच करायचा तर यादवांची पुस्तके फाडायला सांगणाऱ्या न्यायालयाचा आणि आंदोलने करणाऱ्या वारकऱ्यांचा सुद्धा निषेध व्हायला हवा. आहे हिम्मत?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, प्रतिक्रिया संयत व पटण्यासारखी आहे. धन्यवाद.

जरा माबोवरच सर्च मारुन बघितलं- या घटनेबद्दल अनेक धागे आहेत. अनेकांनी वारकर्‍यांचा जोरदार निषेध केला आहे. त्यातले अनेक आजही इथे सक्रिय आहेत.

(संपादित)

>>आनंद यादवांना पाठिंबा अजिबातच मिळाला नाही...<<

माझ्यामते धाग्याचा हा मूळ मुद्दा आहे - अजिबातच्या ऐवजी पुरेसा हा शब्द लागु असेल फारतर. पुरेसा पाठिंबा, पाठबळ वगैरे त्या वेळेस यादवांना मिळालं असतं तर ते वादग्रस्त पुस्तक पब्लिशही झालं असतं. यादवांनी धैर्य, बाणेदारपणा स्वत:च्या बळावर दाखवायला हवा होता, हे मुद्दे योग्य असले तरी ते मूळ मुद्द्याशी फारकत घेणारे असल्याने इथे ते गैरलागु आहेत - हे माझं मत...

पब्लिश हा चूकिचा शब्दप्रयोग - सर्क्युलेशन मध्ये असतं...
पुस्तक मराठीत होते ना? मग ज्या चार पाच लोकांनी विकत घेतले असेल त्यालाच पुरेसं सर्क्युलेशन म्हणायचे!
नि त्या चार पाच लोकांकडून मागून घेऊन फुकटात वाचणारेहि असतीलच की आणखी ५०-१००!
तुकाराम या विषयाबद्दलच्या पुस्तकाला आणखी किती सर्क्युलेशन असणार आहे?
ना भाषा लोकप्रिय, ना विषय!

>>केसचा निकाल मेहता पब्लिशिंग, यादव वगैरे यांच्या विरोधात कोर्टाने दिला.<<

इंटरेस्टिंग, मग तर सगळे सेकुलर/लिबरल चवताळुन उठले असतील या निकालाच्या विरोधात! संदर्भासाठी खोदकाम करावं लागेल...

पण मग लेखाचा मुद्दा जर आनंद यादवांना त्यावेळेस आवश्यक तेवढा सपोर्ट मिळाला नाही हा असेल तर हे कशाला


आणि दुसरीकडे जिजाऊ महाराज, संभाजी महाराज यांच्यावर मुक्तहस्तपणे चारित्र्यहनन करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र भूषण देतात. पुतळे उभारतात. आणि त्याविरुद्ध कुणी कृती केली कि लगेच माध्यमांतून निषेधांची कोल्हेकुई सुरु होते. जरा राजसन्यास उघडून बघा गडकर्यांनी काय मुक्ताफळे उधळून ठेवली आहेत:


जेम्स लेन प्रकरणात ज्या शाहिरावर मुख्य आरोप होते त्याने त्या काळात इतकी मागणी होऊनही माध्यमांसमोर थोबाड उचकटले होते का?

यादवांवर अन्याय झाला, त्यांच्यामागे लोक आवश्यक तेवढे उभे राहिले नाहीत याचा खेद वाटून तो मुद्दा मांडायचा आहे, तर त्यात पुरंदरे, गडकरी यांच्यावर अशी भाषा कशाला?

राज,

तुमचे कष्ट वाचवतो.

ही लिंक बघा - http://sanjaysonawani.blogspot.in/2014/06/blog-post_10.html

कादंबरी ऐतिहासिक आहे, असं सांगून एकही पुरावा लेखक कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत.

राज, मुळात पुरेसा पाठिंबा मिळाला नाही हे कशाच्या आधारावर म्हणायचं?
माबोवर तीन धाग्यांच्या लिंक्स वर आहेत. याउलट परवाच्या घटनेबद्दल माबोवर समीरबापूंचा एकच धागा आहे. २००९ सालचे ते माबो धागे पाहिले तर त्यावर वर्तमानपत्रातही याबद्दल येणार्‍या बातम्यांचे उल्लेख आहेत.
हां आता २००९ साली व्हॉट्सअ‍ॅप फेबु ट्विटर वापर आजइतका नव्हता त्यामुळे सोशल मिडिया चॅटर कमी असेल पण त्याचा दोष कोणाला देणार? तो काळ वेगळा होता. त्यासाठी जर इनामदार 'जे लोक' 'हे लोक' म्हणून इथे माबोकरांना दोष देणार असतील तर ते हास्यास्पद होतंय.

मला लक्षात आहे त्यावरून तरी यादवांच्या बाजूने बरेच तेव्हा जनमत होते. आता हा पाठिंबा 'मोजता' कसा येइल कल्पना नाही. बाकी चिनूक्स ने लिहीलेलेच आहे.

बाकी यादव, गडकरी, पुरंदरे यातील कोणीच तो कोणताही मजकूर त्या ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करण्याकरता लिहीलेला नाही. उगाच उकरून काढलेल्या गोष्टी आहेत या काहीतरी राजकीय वाद पेटवायला. पुरंदर्‍यांचा तर बादरायण संबंध लावला गेला होता. पुस्तक लेन चे होते, पुरंदर्‍यांचे नाही.

>>कादंबरी ऐतिहासिक आहे, असं सांगून एकही पुरावा लेखक कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत.<<

चिनुक्स, लेट्स नाॅट स्टरप दि होर्नेट्स. आत्तापर्यंतच्या सगळ्या ऐतिहासीक कादंबर्या ठोस पुराव्यावर आधारीत आहेत, असं तुमचं मत आहे काय?..

तसा उल्लेख लेखकानं पुस्तकात केला होता. मी दिलेली लिंक तुम्ही वाचली का? ती कृपया वाचा.
'गांधी मला भेटला'सारखी ही केस नव्हती.

आणि इथे माझ्या मताचा संबंध नाही. निकाल न्या. जैन यांनी दिला. मी नाही. लेखकानं माफी मागायला नको होती, अध्यक्षपदासाठी तडजोड करायला नको होती, हे माझं मत आहे. त्याचा न्यायालयाशी संबंध नाही. दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

यावरच्या लाल रंगात ठळक केलेल्या भागावरून चारित्र्यहनन होते आहे हेच मला वाटत नाही. आणि कोर्टाला ते वाटून त्याला मान्यता देऊन ते पुस्तक ... जी कादंबरी आहे, ऐतिहासिक असली तरीही कादंबारी आहे.. ती बंद करायला लावते. हे अजब नाही का?
भारतातले कायदे नीट स्पष्ट केले पाहिजेत म्हणजे त्याचा अन्वय लावताना अशा चुका होणार नाहीत. भारतात न्यायाधीश लिबरल का कोन्झर्व्हेटिव्ह यावर वाद होत नाही पण हे कोन्झर्व्हेटिव्ह न्यायाधीशामुळे झाले असेल का?

अमित,
संजय सोनवणींच्या ब्लॉगाची लिंक दिली आहे, ती वाच. 'पूर्वज-बदनामी'चा खटला होता. तुकारामांच्या वंशजांनीच तो दाखल केला होता. इथे लिबरल किंवा कॉन्झर्वेटिव असण्याचा संबंध नाही.

यादवांना पुरेसा पाठिंबा मिळाला होता पण त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा संमेलनाचे अध्यक्षपद महत्वाचे मानले.
त्यांची भूमिका "परिच्छेद मागे घेतो, हवे तर पुस्तक मागे घेतो, माफी मागतो, पण प्लीज मला त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसू द्या प्लीज !" अशी होती.

वाचलं.
"संशोधनपुर्वक सिद्ध केलेली कादंबरी" >> च्या ऐवजी "काही भाग संशोधनपूर्व सिद्ध आहे" असं लिहिलं असतं तर पळवाट होती असं वाटलं,
>> हा खटला भा.द.वि. ४९९ व ५०० अंतर्गत असून तो पुर्वज-बदनामी, मानहानी या स्वरुपात दाखल केला गेला होता. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ आरोपींना झालेला नाही.>> हे नवीन समजलं. पण प्रत्येक माणूस कोण ना कोणाचा पूर्वज असणारच ना? मग ह्या स्वातंत्र्याचा लाभ नक्की कोणाला मिळणार विचार करतोय.

संतांचे असे अभंग असतात ना की आधी पापी होतो आणि भगवंत कृपेने मार्ग बदलला त्या स्वरूपाचा मजकूर वाटला मला. पूर्वज बदमानी इज टू मच.

>>मी दिलेली लिंक तुम्ही वाचली का?<<

वाचली, त्यातहि निकालाचा निषेध, यादवांना उघड पाठिंबा वगैरे दिसलं नाहि; तिथेहि बहुतांशी यादवांना आरोपीच्या कठड्यात उभं केलेलं आहे. तरीहि त्याच लेखातला शेवटचा पॅरा इंटरेस्टिंगली इनामदारांच्या या धाग्यात मांडलेल्या मूळ मुद्द्याच्या जवळ जाणारा आहे हे जाणवलं. धन्यवाद, लिंक शेर केल्याबद्दल...

बाय्दवे, मी यादवांच्या समर्थकांचा शोध घेतोय, झोडपणार्यांचा नाहि... Happy

मी यादवांच्या समर्थकांचा शोध घेतोय, झोडपणार्यांचा नाहि.. >> एक कुतूहल म्हणून विचारतो (not to stir the nest वगैरे) राज तुम्ही होता का त्यात ?

>> इतिहास विकृत लिहिणारे लेखक

माझ्याकडून anilchembur यांची हि कॉमेंट आधी वाचली गेली नाही. याबाबत नन्द्या४३ यांच्याशी सहमत. यापैकी कोणाही लेखकाला केवळ त्यांच्या काही ओळी चुकीच्या गेल्या म्हणून "इतिहास विकृत करणारे" असे संबोधने संपूर्ण चुकीचे व निषेधार्हच.

>> गडकरी आणि यादव ह्यांच्यात 'जो' फरक आहे तो सोडला तर झालेल्या घटनांमध्ये काय साम्य आहे?

मला कळले नाही तुम्हाला नक्की कोणते साम्य हवे आहे. कारण "ऐतिहासिक व्यक्तींविषयी साहित्यात केलेले अपमानास्पद उल्लेख" या एकाच कारणासाठी दोघांनाही समाजातील काही घटकांच्या रोषाला सामोरे जावे लागले हे साम्य तर उघडच आहे.

>> इथे यादवांचा उल्लेख केला नाही... ... त्यांना विरोध झाला त्यात मुख्यत्वे वारकरी महामंडळ होते ना? कोर्टात केस वगैरे झाली होती ना? की ब्रिगेडी होते?

वारकरी काय, ब्रिगेडी काय किंवा अन्य कोणी. विरोध करणारे वेगवेगळे तरी कारण एकाच प्रकारचे आहे ना? त्या निकषानुसार पुरंदरे, गडकरी, यादव हे एकाच पंगतीत बसत नाहीत का?

>> आज लेखकाने स्वतःच २-३ भडक प्रतिसाद देवून धाग्याला ऊब आणली

मी मायबोलीवर धाग्याला उब आणायला येत नाही. असला टाईमपास करायला मी रिकामटेकडा नाही. एखाद्या सामाजिक विषयावर डोक्यात काहूर माजले तर तोच विषय मी धाग्याच्या रुपात मांडतो. तुम्ही वाचता हेच महत्वाचे. धन्यवाद. (बाकी माझा प्रतिसाद भडक आहे कि कसा किंवा तुमच्या अन्य मुद्द्यांना इतरांनी उत्तरे दिली आहेतच. मी त्यांच्याशी सहमत)

"या सगळ्या प्रकरणात यादवांनी बाणेदारपणा दाखवला नाही. त्यांनी माफी मागून चूक केली" आणि म्हणून शेवटी "तेच चुकले" हा निष्कर्ष मांडण्याकडे चीनुक्स आणि त्यांच्या साथीदारांचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. कहर म्हणजे "मी माफी मागतो पण प्लीज मला अध्यक्षपद द्या" अशी यादवांची भूमिका होती असा धादांत खोटा प्रचार आज त्यांच्या मृत्युनंतरही सुरु आहे. आणि हे खूपच बोलके आहे. यादवांना पुरंदरेंइतके पाठबळ मिळाले नाही या माझ्या मुद्द्याला यामुळे पुष्टीच मिळत आहे. खरी परिस्थिती काय होती हे संजय सोनवणी यांनी त्यांच्या ब्लोग वर लिहिले आहे ते जसेच्या तसे इथे पेस्ट करत आहे...

"ऑगस्ट २००८ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर विविध वृत्तपत्रांत सविस्तर समीक्षणंही प्रसिद्ध झाली होती. एकाही समीक्षकाला ही कादंबरी (ती रद्दड वाटली तरी) आक्षेपार्ह आहे अशी वाटली नव्हती. तोवर असंख्य वाचकांनीही ही कादंबरी वाचली होती. त्यांनाही ती आक्षेपार्ह वाटली नव्हती. पण साहित्यसंमेलनाचे पडघम वाजू लागले आणि आनंद यादव निवडूनही आले आणि एकाएकी देहुकरांना जाग आली. अक्षरशः दहशतवाद माजवत यादवांना त्यांची कादंबरी मागे घ्यायला लावली गेली."

या ओळी खूप काही सांगून जातात. केमिकल कारखाना असो किंवा यादवांची कादंबरी. वारकऱ्यांना हवे तेंव्हा पेटवणारे आणि काम झाले कि विझवणारे त्यांचे नेते कोण आहेत आणि ते कोणासाठी काम करतात हे ज्यांना माहित आहे त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात.

राहता राहिला प्रश्न "यादव झुकले त्यांनी बाणेदारपणा दाखवला नाही" या आरोपांचा. एकीकडे झुंडी पेटवून अंगावर सोडायच्या आणि दुसरीकडे आपण मदत करायला गेलो होतो पण त्यांनीच सहकार्य केले नाही तेच झुकले असे भासवायचे.

असो. यादव चुकले झुकले हे कितपत खरे कि खोटे? हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू. पण एका संवेदनशील लेखकाला वयाच्या उत्तरार्धात काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आणि योग्य तितके पाठबळ न मिळाल्याने लेखनसन्यास घ्यावा लागला तेंव्हा त्याला किती यातना झाल्या असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. लेखन सन्यास म्हणजे लेखकाचा मृत्यूच.

खरा मृत्यू येण्याच्या काही वर्षे आधीच डॉ. आनंद यादव यांचा मृत्यू झाला होता. आपण सर्वांनीच त्यांना मारले होते.

इनामदार, तुमच्या वरील दीर्घ प्रतिसादाबद्दल कौतुक आणि धन्यवाद !

यादवांना कदाचित जिवाची भिती वाटत असेल, आणि त्यामुळे पण त्यांनी उघड भुमिका घेतली नसेल.
ते ज्या परिस्थितीतून वर आले, आणि साहित्यकार झाले होते, त्यादृष्टीने पहाता अध्यक्षपद हा त्यांच्यासाठी परमोच्च मानबिंदू असणार, त्यामुळे जर ते मिळण्याची शक्यता असेल तर ते हवे असणे यात काही चूक वाटत नाही.

असो, तर थोडक्यात काय लेखनामुळे अन्याय झाला या यादीत यादव देखील आहेत.

लेखकाला केवळ त्यांच्या काही ओळी चुकीच्या गेल्या म्हणून "इतिहास विकृत करणारे" असे संबोधने संपूर्ण चुकीचे व निषेधार्हच

नेमक्या किती ओळी लिहिल्या तर विकृत हे संबोधन वापरायचे असते ?

कादंबरी म्हणजे काही इतिहास संशोधनपर ग्रंथ नव्हे.

यादवांना लावलेले निकष "स्वामी" "श्रीमान योगी" "राजा रविवर्मा" ह्या कादंबर्‍यांना लागलेले आम्ही कधी पाहिले नाहीत ते.

एकंदर वातावरणच हल्ली होपलेस होत चाललेले आहे असे वाटत आहे.

वादात पडत नाहीये कारण पूर्ण माहिती नाही. पण त्या काळात आनंद यादवांना जो मनस्ताप झालाय तो खरच भयानक होता. अगदी कळपाने घेरावे तसे झाल्याचे मला तरी वाटले. आणी संशोधनाबद्दल काय बोलणार, आता तुकाराम महाराज पण नाहीत आणी आनंद यादव पण नाहीत.

आताच्या तू माझा सांगाती या मालिकेत जे काही चालले आहे, किंवा जय मल्हार मध्ये जे काही दाखवले जात आहे त्या वरुन या लोकांनी खरच काही संशोधन केले आहे का याची शंकाच येत आहे.

चिनुक्स ने केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत पण आनंद यादव यांना बहुतेक समाजाच्या रोषाचेच दडपण वाटले असावे. पण यादवांवर अन्याय झाला हे खरे.

हिंदुनी हिंदुंचाच इतिहास इतका पर्स्परविरोधी ल्हिलेला आहे की त्यामुळे हिंदुनी ल्हिलेल्या मुसलमान इतिहासावरचा विश्वास उडालेला आहे.

>> नेमक्या किती ओळी लिहिल्या तर विकृत हे संबोधन वापरायचे असते ?

नेमके किती लिहिले म्हणून आपण त्यांना लेखक म्हणून ओळखतो? मी येऊन चार ओळी मायबोलीवर लिहितो म्हणून मला कोणी लेखक म्हणणार नाही. तोच नियम इथे लागू. सातत्याने विकृत लिखाण करत असते तर गोष्ट वेगळी.

दुर्दैवी योगायोगाने आजच अभिनेते ओम पुरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीवर "जवानांचा अपमान करणारा म्हातारा" अशा काही कॉमेंट आहेत. निसटत्या क्षणी तोंडून गेलेल्या केवळ एका संवादाने त्यांच्या संपूर्ण करियरवर असा शिक्का मारणे यातून त्यांची नव्हे तर कॉमेंट करणाऱ्यांची वैचारिक अपरिपक्वता व विकृती दिसून येते.

इनामदार,

त्या निमित्ताने गडकरींचा पुतळा पाडला गेला ही बातमी कळली.. (भारता बाहेर असण्याचा परिणाम).

तुकोबा गेले, काळाच्या ओघात यादवही गेले. पण ऐतिहासीक व्यक्तींच्या अनुशंगाने होणारी यादवी काही संपत नाही यातच आपल्या समाजाचे सत्य अधोरेखित होते. यातून भीम अ‍ॅप देखिल सुटलेले नाही.

'जनमानस' म्हणजे थोडक्यात मास सायकोलॉजी असे आहे. दुर्दैवाने यादवांच्या बाबतीत ती ऊलटी झाली (केली गेली, वगैरे वगैरे....). बाजीराव चित्रपटाने रग्गड धंदा केला... 'पिंगा' चा वाद घालणारी मडळी स्वतः च चित्रपट पाहून आली होती, अनेकांनी तर स्तुती देखिल केली होती... 'दंगल' वरून देखिल अनेक बाफ दंगल घालत आहेत. 'रईस' च्या आधी वाद नको म्हणून माड्वली झालीच आहे.. तेव्हा थोडक्यात जनमानस 'मॅनेज' करायची ज्याच्यात कुवत असते त्याला काहिही फरक पडत नाही.

ज्याच्यात ती कुवत नसेल त्याने ऊगाच 'स्फोटक' वा 'संवेदनशील' विषयाला हात घालून कल्पना विलास करायला जाऊ नये हीच काय ती शिकवण यातून मिळते.

तरिही सध्या मराठी चीअवस्था "हृदयात वाजे 'समथिंग'.." अशी असल्याने Happy भविष्यात असे साहित्यीक वाद निर्माण होण्याची शक्यता कमी आहे असे म्हणूयात आणि पुढे चलू.

>>या ओळी खूप काही सांगून जातात. केमिकल कारखाना असो किंवा यादवांची कादंबरी. वारकऱ्यांना हवे तेंव्हा पेटवणारे आणि काम झाले कि विझवणारे त्यांचे नेते कोण आहेत आणि ते कोणासाठी काम करतात हे ज्यांना माहित आहे त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात.

असे मोघम लिहिण्यापेक्षा स्पष्ट लिहिलेत तर बरे झाले असते.

>>राहता राहिला प्रश्न "यादव झुकले त्यांनी बाणेदारपणा दाखवला नाही" या आरोपांचा. एकीकडे झुंडी पेटवून अंगावर सोडायच्या आणि दुसरीकडे आपण मदत करायला गेलो होतो पण त्यांनीच सहकार्य केले नाही तेच झुकले असे भासवायचे.

हे अत्यंत आक्षेपार्ह जनरलायझेशन आहे. यादव यांना ज्यांनी मदत केली /करण्याचा प्रयत्न केला (चिनूक्स सह) ते सारे आधी त्यांच्या अंगावर झुंडी सोडणारे होते असे यातून सूचीत होते, जे चूक आहे. माझ्या आठवणीप्रमाणे यादव यांना बर्‍याच लोकांचा पाठिंबा होता. त्यांनी माफी मागितली तेव्हा हळहळही व्यक्त केली गेली.

>>असो. यादव चुकले झुकले हे कितपत खरे कि खोटे? हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू. पण एका संवेदनशील लेखकाला वयाच्या उत्तरार्धात काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आणि योग्य तितके पाठबळ न मिळाल्याने लेखनसन्यास घ्यावा लागला तेंव्हा त्याला किती यातना झाल्या असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. लेखन सन्यास म्हणजे लेखकाचा मृत्यूच.

यातील "विघ्नसंतोषी लोकांमुळे" हे पटते पण "योग्य तितके पाठबळ न मिळाल्याने" हे अजिबात पटले नाही. अभिव्यत्की स्वातंत्र्यासाठी याहीपेक्षा मोठी किंमत अनेक जणांनी दिलेली आहे.

Pages