गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा!

Submitted by इनामदार on 3 January, 2017 - 23:07

राम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.

पण जे लोक पुतळा पाडल्याचा निषेध करत आहेत ते लोक प्रख्यात साहित्यिक "झोंबी" कार आनंद यादव यांचा उतारवयात जो छळ केला गेला तेंव्हा कुठे होते? काय असे लिहिले होते यादव यांनी तुकारामांविषयी? कि तरुण वयात तुकाराम आसपासच्या इतर चार तरुणांप्रमाणेच ऐहिक आनंदाच्या पाठी लागले होते. पण लवकरच त्यांना कळून चुकले कि हा मार्ग योग्य नव्हे. काय वादग्रस्त होते यात? या लिखाणाच्या प्रति आजही मटा च्या साईटवर इथे आणि इथे उपलब्ध आहेत.

4079921.cms_.jpg4079930.cms_.jpg

बस्स इतक्या लिखाणासाठी यादवांविरुद्ध वारकर्यांना उठून बसवले गेले. लिखाण आधारहीन आहे अशी ओरड केली गेली. आंदोलने झाली. यादवांच्या वैयक्तिक निंदानालस्तीवर लोक उतरले होते. त्यांना शिविगाळ करण्यापर्यंत मजल गेली. इतकेच काय त्यांना पोलीस कोठडी पण देण्यात आली. कोर्टाने हि पुस्तके फाडून टाकण्याचे आदेश दिले. या सगळ्याचे निमित्त करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून त्यांना बाजूला ठेवले गेले. या सगळ्यामुळे विलक्षण व्यथित झालेल्या यादवांनी यानंतर लिहिणेच सोडून दिले. एका सिद्धहस्त लेखकाची उतारवयात वाताहत झाली. शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याच पूर्वी केलेल्या लिखाणाची ते पारायणे करत जुन्या आठवणीत हरवून जात. सर्वांनीच त्यांना एका न केलेल्या गुन्ह्याबद्दल वाळीत टाकले.

आणि दुसरीकडे जिजाऊ महाराज, संभाजी महाराज यांच्यावर मुक्तहस्तपणे चारित्र्यहनन करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र भूषण देतात. पुतळे उभारतात. आणि त्याविरुद्ध कुणी कृती केली कि लगेच माध्यमांतून निषेधांची कोल्हेकुई सुरु होते. जरा राजसन्यास उघडून बघा गडकर्यांनी काय मुक्ताफळे उधळून ठेवली आहेत:
RaGaGadkari_RajSanyas.jpg

या लिखाणाची यादवांच्या लिखाणाशी तुलना करा आणि मग गडकरी यांचा उदो उदो करायचा असेल तर मग यादव यांचा अजून उदो उदो व्हायला हवा. आणि पुतळा पाडणाऱ्या वृत्तीचा निषेधच करायचा तर यादवांची पुस्तके फाडायला सांगणाऱ्या न्यायालयाचा आणि आंदोलने करणाऱ्या वारकऱ्यांचा सुद्धा निषेध व्हायला हवा. आहे हिम्मत?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इनामदार,
माझ्या समजुतीनुसार तुमच्या तपशिलांमध्ये थोडी गफलत आहे.

आनंद यादव यांनी आपलं लिखाण ऐतिहासिक पुराव्यांवर आधरालेलं आहे, असं 'कादंबरी'त लिहिलं होतं. न्यायालयात त्यांनी पुरावे दिले नाहीत. किंबहुना ते न्यायालयात उपस्थितही राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध निकाल दिला.

आनंद यादवांच्या बाजूने अनेक उभे होते, बाणेदारपणा यादवांनीच दाखवला नाही.

मी आणि माझा एक मित्र यादवांना या प्रकरणानंतर भेटलो. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लेखन हा विषय मध्यवर्ती ठेवून मुलाखत प्रकाशित करू, असं आमचं ठरलं. बर्‍याच फोनाफोनीनंतर आम्ही त्यांना भेटलो.

यादवांनी मुलाखत सुरू होण्यापूर्वी त्यांना झालेला त्रास, कादंबरी लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत इत्यादी सांगितलं. मी रेकॉर्डर सुरू केल्यावर ते गप्प झाले. काहीच बोलेनात. मग त्यांनी रेकॉर्डर बंद करायला सांगितला. म्हणाले, आतापर्यंत मी जे तुमच्याशी बोललो, ते तुम्ही तुमचं मत म्हणून लिहून छापा, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने तुम्ही लिहा.

आम्ही त्या बाजूचेच होतो आणि म्हणूनच यादवांची मुलाखत हवी होती. पण यादवांच्या मते आम्ही मुलाखत न घेता त्यांच्या बाजूने लेख लिहावा हे अधिक योग्य होतं. आम्हांला तसं करायचं नव्हतं. यादवांना कोट न करता आम्ही त्यांची बाजू घेऊन घडलेल्या घटनेविषयी आणि कादंबरीच्या ऐतिहासिकतेविषयी लिहिणं योग्य नाही, असं आम्हांला वाटत होतं.

त्या भेटीत यादवांनी लेखनासाठी घेतलेली मेहनत आम्हांला सांगितली, तरी पुरावे, लेखनासाठीचा कच्चा माल इत्यादीबद्दल विचारूनही सांगितलं नाही.

यादवांची बंदूक आम्हांला आमच्या खांद्यावर घ्यायची नव्हती. आमची मतं आम्ही आमची म्हणूनच मांडायला समर्थ होतो.

यादवांच्या प्रकरणात अनेकांनी घटनेचा निषेध केला. अनेकजण त्यांच्या बाजूने उभे राहिले, हे सत्य आहे. त्यांनी मात्र ठामपणा दाखवला नाही, हेही तितकंच खरं आहे.

त्या भेटीनंतर यादवांनी दोनदा फोन करून मला त्यांच्या बाजूने त्यांनी पुरवलेल्या माहितीवर, पण त्यांनी ती माहिती पुरवली आहे, हे न सांगता, लेख लिहिण्याची विनंती केली. मी त्यांना नकार दिला.

या प्रकरणामुळे मला अतिशय वाईट वाटलं, मनस्ताप झाला. तुम्हीच जर तुम्ही लिहिलेल्या शब्दांविषयी बेफिकीर असाल, तर इतरांनी तुमची बाजू का घ्यावी? 'मी तो मजकूर वगळायला तयार होतो / आहे' हे त्यांनी आम्हांला सांगितल्याचं स्मरतं.

बरोबर .... ज्याने त्याने फक्त आपल्याच जातीतील लोकांची चरित्रे लिहावीत असा कायदा हवा.

दुसर्‍या जातीचे लोक , धर्माचे लोक यांच्यावद्दल विनाकारण वाइट लिहिले जाते. ते बंद झाले पाहिजे

>>>जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा!<<<

संदर्भः व्हॉट्सअ‍ॅप वरुन आलेला मेसेज:
या आठवणी देखिल उगाळणार की नाही ब्रिगेडी?
१) शिवरायांना "अक्षरशत्रू" असे कोणी हिणवले? त्यांचे काय करणार?
२) शिवरायांवर दग्याने वार करणार्‍याची कबर व उरुस कसे काय होतात?

अर्थात याबाबत ते काही करणारच नाहीत, कारण "मूळ उद्देश" "ब्राह्मणद्वेष व ब्राह्मणनिप्पात /वंशउच्छेद " व त्याद्वारे हिंदू धर्माची छकले उडविणे हाच असल्याचे सूज्ञांपासुन कधीच लपलेले नाहीये.
भांडारकर, मग दादोजी, मधेच बाबासाहेब पुरंदरे, नि कालपरवा राम गणेश गडकरी... या सिक्वेन्सचे मला तरी नवल वाटत नाही.

शिवरायांवर दग्याने वार करणार्‍याची कबर व उरुस कसे काय होतात?

हा वेगळा मुद्दा आहे लिंबुजी.

इतिहास विकृत लिहिणारे लेखक हा इथला मुद्दा आहे ... त्यात ब्रा व क्ष हे दोन्ही वर्ण तितकेच आघाडीवर आहेत ना ?

भांडण ' तुमच्या' दोन वर्णांचं ! आणि गाडी औरंगजेब अन अफझुल्याच्या थडग्याकडे का न्हेताय ?

दलित द्वेषामुळे किती वेळा हिंदु धर्माची छकले झाली? कित्येक शेकडो वर्षापासून द्वेष जो चालू होता त्यावरून तर हजारो छकले झाली पाहिजे होती.

>>त्यात ब्रा व क्ष हे दोन्ही वर्ण तितकेच आघाडीवर आहेत ना ?
का लिहा की उघड, घाबरताय कशाला ?
ब्राह्मण आणि मराठे यांच्यात गेल्या काही वर्षापासुन कोणीतरी मुद्दाम दुही माजवलेली आहे. Angry
तो कबर आणि उरूसचा मुद्दा डावलू नकाच. का नाही त्या abcxyz लोकांना या गोष्टी दिसत आणि तिकडे जाऊन वाढते प्रस्थ थांबवावेसे वाटत, कारण उघड आहे, पावर नाय.
असो, दुनियेत नेहमी जिथे सॉफ्ट टारगेट असते तिकडेच हल्ले होतात.
हे सगळे जाऊद्या, काही विधायक कामे करायची बुद्धी आहे का यांना ? का फक्त जुन्या पुरलेल्या गोष्टी उकरून काढायची बुद्धी आहे.
बाकी फोडा आणि राज्य करा हे तत्व अजुनही कोणीतरी पडद्यामागे राहून फार चांगल्या पद्धतीने राबवत आहे.

आमी नाय घाबरत ब्राह्मण , क्षत्रिय लिहायला.. पण शॉर्ट फॉर्म अगदी क्लीअरच होते, म्हणून शॉर्ट लिहिले होते... आता यांनी त्यांचा अन त्यानी ह्यांचा इतिहास घाण लिहिला तर त्यात हे मुसुल्मान कुठून आणले? हे समजले नाही, म्हणून मी विचारले.

बाकी, उर्साबद्दल, तो ज्याचा त्याचा प्रश्न .. तुम्ही गड चढून वर रामजन्मोत्सव साजरा करा.. कुणी अडवले आहे ?

बायदिवे, तो उर्स कधीच बंद झालाय म्हणे .. पण तरीही एकदा जायचे आहे. साठ बायका, एकसश्ट वर्षांचे धडधाकट आयुष्य आणि इतकी मोठी सरदारकी... नतमस्तक व्हायला एकदा जायचे आहे. येणार काय ?

अभिनंदन इनामदार,

तुमचा उद्देश सफल होताना दिसत आहे. तुम्हाला हवे तसे प्रतिसाद तीनजणांनी दिले ही खूप मोठी अ‍ॅचिव्हमेन्ट आहे Happy

अगदी अगदी. लिंबूभाऊ नेहमी विकृत प्रतिसाद सगळीकडे देतात धागा कशावरही का असेना त्यात ते कम्युनिस्ट काँग्रेसी/मुस्लिम काश्मिर/ब्राह्मण हे नेहमीचे त्यांचे खेळणे घेऊन येतातच आणि चांगल्या धाग्याची अगदी वाट लावून स्वतः नामनिराळे होतात.

@चिनूक्स...

>> बाणेदारपणा यादवांनीच दाखवला नाही.

या विधानाशी संपूर्ण असहमत. याउलट त्यांनी "हि कादंबरी आहे आणि कादंबरी कशी वाचावे याचे काही निकष आहेत. आरोप करणाऱ्यांना कादंबरी म्हणजे काय ते कळलेले नाही" असे विधान त्यांनी केले होते. माध्यमांनी मात्र ते विपर्यस्त करून "कादंबरी कशी वाचावी हे कळते का? यादव यांचा सवाल" अशा प्रकारचे मथळे देऊन यादव हे उर्मट आहेत असे भासवले होते. अजूनही काही वृत्तपत्रांच्या नेट एडिशनमध्ये हेच वाचायला मिळते. बहुतांश माध्यमे यादवांच्या विरोधात बातम्या देत होती. आणि कुणाचेतरी पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. आजकाल माध्यमांना हाताशी धरून कोणातरी विरोधात झुंडी बनवायच्या आणि जनमत तयार करायचे असे तंत्रच काही सत्तापिपासुंना गवसले आहे. यादव या षडयंत्राचा दुर्दैवी बळी ठरले.

अहो ज्या लेखकाने आयुष्यात लहानपणापासूनच इतके टक्के टोणपे खाल्ले होते, केवळ स्वत:च्या मेरीटवर साहित्य क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते तो कोणी ऐरा गैरा लेखक होता का? नवखा होता का? सगळ्या गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ होत्या. त्यांच्या करियर मध्ये त्यांनी लपून छपून कधीच काही केलेले अथवा मिळवलेले नाही. मग बाणेदारपणा न दाखवायला त्यांना कारण तरी काय पडले होते?

>> मी रेकॉर्डर सुरू केल्यावर ते गप्प झाले. काहीच बोलेनात. मग त्यांनी रेकॉर्डर बंद करायला सांगितला.

जेम्स लेन प्रकरणात ज्या शाहिरावर मुख्य आरोप होते त्याने त्या काळात इतकी मागणी होऊनही माध्यमांसमोर थोबाड उचकटले होते का? उचकटले असेल तर त्याचा विपर्यास कुठे छापून आला होता का? ज्याच्या विरोधात वातावरण तयार झालेले असते त्याला त्या काळात माध्यमांसमोर अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. बोलण्याचा कोणताही अर्थ निघू शकतो म्हणून हे लोक बोलणे टाळत असतात. कारण त्या काळात तेच योग्य असते. या पार्श्वभूमीवर डॉ. यादवांचा हा निर्णय धोरणात्मक नव्हता काय?

>> यादवांची बंदूक आम्हांला आमच्या खांद्यावर घ्यायची नव्हती

हेच तर दुखणे आहे ना. आणि धाग्यात हाच मुद्दा मांडला आहे. यादवांना पुढे करून "हे बघा हे असे म्हणतात" असे छापायला तुम्ही रिकामे. पण म्हणजे तुम्ही काय त्यांची बाजू उचलून धरत नाही. उलट त्यातून त्यांना त्रासच होत असतो. आज गडकरींची बंदूक घेऊन लगेच बरे उभे आहेत सगळे? शाहीर पुरंदरे यांची बंदूक घेऊन का बरे उभे राहिले होते सगळे? त्यांना बरं तुम्ही नाही म्हणालात, "काय असेल ते तुम्हीच बोला. आम्ही फक्त (त्यातले आम्हाला हवे तसे आणि तेवढे) प्रसिद्ध करू". म्हणाला होतात का? हीच तर खरी समस्या आहे.

>> मी तो मजकूर वगळायला तयार होतो / आहे' हे त्यांनी आम्हांला सांगितल्याचं स्मरतं.

मजकूरच काय ती ते पूर्ण पुस्तक मागे घ्यायची तयारी त्यांनी दाखवली होती. तरीही वारकरी हटले नाहीत. यावरूनच हवा भरणाऱ्यांनी ती किती भरली असेल याची कल्पना येते. परिणामी यादवांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावर पाणी सोडावे लागले. जेम्स लेन प्रकरणात मात्र मजकूर आणि पुस्तक मागे घेण्याची तयारी तत्परतेने दाखवली गेली होती का? पुढे पुरस्कार भूषण वगैरे सगळे मिळायचे तसे मिळालेच ना? कशाचा काही परिणाम झाला का?

@anilchembur
>> दुसर्‍या जातीचे लोक , धर्माचे लोक यांच्यावद्दल विनाकारण वाइट लिहिले जाते. ते बंद झाले पाहिजे

कृपया गैरार्थ काढू नका. डॉ. यादवांनी जात धर्म बघून जाणीपूर्वक लिखाण केले होते असे आपणास सुचवायचे आहे का? या धाग्याचा हेतू सुद्धा तो नाही. जो न्याय गडकरींना मिळाला, पुरांदरेंना मिळाला तोच यादवांना मिळायला हवा होता इतकीच माफक अपेक्षा आहे.

@limbutimbu
मूळ धाग्याला उद्देशून प्रतिक्रिया आहे कि एकच लिहिलेली सगळीकडे चिकटवत सुटला आहात? कारण धाग्याशी संबंधित प्रतिक्रिया वाटत नाही.

>> भांडारकर, मग दादोजी, मधेच बाबासाहेब पुरंदरे, नि कालपरवा राम गणेश गडकरी... या सिक्वेन्सचे मला तरी नवल वाटत नाही.

आणि या यादीत डॉ. आनंद यादव यांचे नाव घातले नाहीत याचे मलाही नवल वाटत नाही. आधी स्वत:च्या डोळ्याचा भगवा चष्मा काढा मग इतरांवर कावीळ झाल्याचे आरोप करा.

@बेफ़िकीर
>> तुमचा उद्देश सफल होताना दिसत आहे. तुम्हाला हवे तसे प्रतिसाद तीनजणांनी दिले ही खूप मोठी अ‍ॅचिव्हमेन्ट आहे

तसे तुम्हाला वाटत असेल. मुद्दा सोडून भलतेच लिहायचे हा बहुदा तुमचाच उद्देश असावा. स्वत:चीच प्रतिक्रिया पहा.

>>>तसे तुम्हाला वाटत असेल. मुद्दा सोडून भलतेच लिहायचे हा बहुदा तुमचाच उद्देश असावा. स्वत:चीच प्रतिक्रिया पहा.<<<<

नाही, तुमचा लेख वाचून काहीजणांनी मनातील भावना बोलून दाखवल्या ज्या छुपा विखार दर्शवतात.

पण तुम्ही चिनूक्स ह्यांना लिहिलेला प्रतिसाद मी नीट वाचला व त्यानंतर 'वर त्या भावना बोलून दाखवणार्‍यांकडे लक्ष द्यायची गरज नाही' हे जाणवले. चिनूक्स ह्यांनी तुम्हाला व तुम्ही त्यांना जे प्रतिसाद दिले आहेत ते वाचनीय आहेत.

मला एक शंका (हा धागा आल्याआल्याच) व्यक्त करायची होती पण अज्ञान असल्याने तसे करण्यापेक्षा वाचअ राहण्याचे ठरवले. तर आता ती शंका विचारतो.

गडकरी आणि यादव ह्यांच्यात 'जो' फरक आहे तो सोडला तर झालेल्या घटनांमध्ये काय साम्य आहे?

म्हणजे त्या त्या लेखकांविरुद्ध पेटून उठलेले लोक हे परस्पर विरोधात नेहमी उभे ठाकणारे लोक नाहीत ना?

पुन्हा लिहितो, अज्ञान असल्याने ही शंका योग्य आहे की नाही हेही मी सांगू शकत नाही.

इतिहास विकृत लिहिणारे लेखक
तुम्ही श्री. रा. ग. गडकरी वा श्री. आनंद यादव यांच्या लिखाणाबद्दल लिहिता आहात का?

माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांनीहि इतिहास लिहिल्याचा दावा केला नाही.

दोन्ही लेखकांच्या नायकांबद्दल मला फार आदर आहे.

कादंबर्‍या, नाटके वाचून त्यालाच इतिहास समजून त्या आदरणीय व्यक्तींच्या, नाटक कादंबरीत लिहीलेल्या, उणीवांकडेच लोकांचे लक्ष वेधणे यात त्या आदरणीय व्यक्तींबद्दल आदर व्यक्त होतो की त्याचे निमित्त करून काही भलताच उद्देश सफल होतो?

>>>> भांडारकर, मग दादोजी, मधेच बाबासाहेब पुरंदरे, नि कालपरवा राम गणेश गडकरी... या सिक्वेन्सचे मला तरी नवल वाटत नाही.

आणि या यादीत डॉ. आनंद यादव यांचे नाव घातले नाहीत याचे मलाही नवल वाटत नाही. आधी स्वत:च्या डोळ्याचा भगवा चष्मा काढा मग इतरांवर कावीळ झाल्याचे आरोप करा.>>

इनामदार,
माझ्या अल्पमतीनुसार वरच्या सिक्वेंन्स मधे एक सामायिक मुद्दा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच संभाजीराज्यांच्या प्रतिष्ठेची काळजी काय ती आम्हालाच असा आव आणून दहशतीचे राजकारण खेळणे.

यादवांच्या बाबतीत झाले ते संत तुकारामांच्या जीवनावरील कादंबरीच्या निमित्ताने. जरी संत तुकाराम आणि शिवाजी महाराज समकालीन असे म्हटले तरी वरच्या सिक्वेन्समधे ते लॉजिकली ते येत नाहीत. चष्मा काढा म्हणताय पण असे म्हणताना आपण उगाच पूर्वग्रहाने यादवांचा उल्लेख का नाही म्हणून जाब विचारलात असे वाटते. इथे यादवांचा उल्लेख केला नाही म्हणजे त्यांच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल लोकांना काही वाटत नाही असे नाही. पण त्यांना विरोध झाला त्यात मुख्यत्वे वारकरी महामंडळ होते ना? कोर्टात केस वगैरे झाली होती ना? की ब्रिगेडी होते?

>>>> पण त्यांना विरोध झाला त्यात मुख्यत्वे वारकरी महामंडळ होते ना?<<<<

स्वाती२,

बाकीच्या प्रतिसादाला अनुमोदन! ह्या वरील 'कोट केलेल्या' वाक्याबाबतः

इनामदारांचा लेख वाचून मला तरी असे वाटत आहे की वारकर्‍यांना पेटवण्याचे काम एका विशिष्ट जातीने केले. मला समजलेला अर्थ अयोग्य असल्यास क्षमस्व! एक्झॅक्टली त्याचमुळे मी (सुद्धा) हा प्रश्न विचारला की दोन्हीत नेमके साम्य काय आहे!

ते पुरंदरे बद्दल बोलत आहेत.
.

तसेही आता कुणा मराठा सरदार / राजा बद्दल काहीही विरोधी लिहिता येणार नाही असे दिसते. लिहिले की अश्या घटना घडणारच अशी परिस्थिती निर्माण केली आहे. जी जास्त भयावह आहे.

म्हणून बोवाजी उगाच, काही मराठा सरदार फितूर होते, काहींनी खुद्द संभाजीला पकडून देण्यास मदत केली, असे चुकूनही लिहू नका. मग ते खरे असले तरी. उगाच आपल्याला धरुन ठोकायचे लोकं. Happy

इतर वेळी हे भयावह आहे, ते भयावह आहे असे म्हणणारे मात्र, ह्या खर्‍या भयावह प्रकरणात (दोन्ही) मूग गिळून गप्प बसतात, ह्याचा त्रास जास्त होतो

बेफि,
ज्ञानोबामाऊलीतुकाराम असे म्हणत ज्यांच्या दिवसाची सुरुवात होते त्यांना दुसर्‍यांनी कुणी भडकावयाला कशाला पाहीजे? आमच्या श्रद्धास्थानाबद्दल हे असे लिहिलेच कसे म्हणून त्यांचे ते भडकू शकतातच ना ?तुकारामांचे वंशजही हयात आहेत ना? केस त्यांनीच केली होती ना? की त्या मोरे आडनावाच्या व्यक्तीचे फक्त आडनाव सारखे आहे?

>>>>काही मराठा सरदार फितूर होते, काहींनी खुद्द संभाजीला पकडून देण्यास मदत केली, असे चुकूनही लिहू नका.<<<<

पुस्तके वाचून, नाटके पाहून वगैरे तुमचे हे मत झाले आहे ना?

ते सगळे कोणी लिहिले?

===================

आज भांडणे हवी आहेत. आज आगी लावायच्या आहेत. समजले?

===================

तुकारामांच्या एकंदर काव्यावर घणाघाती टीका करणारा एक ग्रंथ येत आहे. कवीवर्य मराठा आहेत. एक वही त्यांनी मला समक्ष ऐकवली. दुसरी वही तयार झालेली आहे. हा ग्रंथ तीन महिन्यांत प्रकाशित होत आहे व तोही स्वयंप्रेरणेने आणि स्वेच्छेने!
===============

नेमके कोणाला कोणाशी कश्यासाठी भांडायचे आहे??

(कोणालातरी कोणाशीतरी भांडावेसे वाटते ह्याचे मूळ कारण 'त्या ह्यांनी' सांगून ठेवलेले आहे हा भाग मजेशीर)

इनामदारांनी चिनूक्सच्या कमेंटवर केलेला प्रतिवाद पटण्यासारखा आहे. आशा करुया चिनूक्स तो खोडून काढतील...

दोन दिवस झाले तरी धाग्याला उठाव नव्हता. चिनूक्स ने सुरुवातीलाच मुद्देसूद प्रतिक्रिया दिल्यावर बोलण्यासारखं / लिहीण्यासारखं काही उरलं नव्हतं. मग आज लेखकाने स्वतःच २-३ भडक प्रतिसाद देवून धाग्याला ऊब आणली आणी माझ्यासकट सगळ्यांनी हात साफ करून घेतले.

मला ह्या भुमिकेची गंमत वाटते. जणू काही गडकरी पुतळा प्रकरणाचा निषेध करणारा एक ग्रूप आहे आणी त्याच ग्रूप ने आनंद यादव वादात बघ्याची भुमिका घेतली अशी भुमिका घेतली आहे. समजा असं आहे असं वादासाठी मान्य केलं तरी, नसेल त्यांना त्या वेळी वाटलं निषेध करावसं वाटलं असं म्हणता येईल. असं काही गरजेचं नाहीये की एका गोष्टीचा निषेध करताना, त्याच्या आधी दुसर्या तशाच (perceived) गोष्टीचा निषेध करायला हवा. गांधीजी म्हणायचे तसं जर माझ्या दोन परस्पर विरोधी भुमिका तुम्हाला दिसल्या तर त्यातली सगळ्यात लेटेस्ट भुमिका ग्राह्य धरावी. माणसाच्या विचारात, भुमिकेत वेळो-वेळी बदल होत असतात.

बाकी बाबासाहेब पुरंदर्यांना शिव्या वगैरे घालायची गिमिक्स सोडून द्या. कुणालाही काहीही फरक पडत नाही. जे त्यांच्या साहित्यावर विश्वास ठेवतात, त्याचे चाहते आहेत, ते अशा गोष्टींनी बधणार नाहीयेत आणी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सुद्धा तुमच्या भुमिकेने कमी/अधिक होणार नाहीये.

फेरफटका | 5 January, 2017 - 20:41 नवीन
असं काही गरजेचं नाहीये की एका गोष्टीचा निषेध करताना, त्याच्या आधी दुसर्या तशाच (perceived) गोष्टीचा निषेध करायला हवा. गांधीजी म्हणायचे तसं जर माझ्या दोन परस्पर विरोधी भुमिका तुम्हाला दिसल्या तर त्यातली सगळ्यात लेटेस्ट भुमिका ग्राह्य धरावी. माणसाच्या विचारात, भुमिकेत वेळो-वेळी बदल होत असतात.
>>>>

मुद्दा पटण्यासारखा आहे.. पण निषेध जर सिलेक्टिव असेल तर ते दुट्टप्पीपणाच नाही होणार का ?
आणि तो सिलेक्टिव निषेध जर वर्ण, प्रांत या घटकांनी पुर्वा ग्रहित असेल तर ते निषेधार्य नसेल का?

गांधीजीचे दोन परस्पर विरोधी भुमिके बाबतीतचे मत हे पुर्वाग्रह विरहीत भुमिके बद्दल असाव हे नक्की..

>>मग आज लेखकाने स्वतःच २-३ भडक प्रतिसाद देवून...<<

आय्ला, त्यात भडक असं काय बरं दिसलं तुम्हाला? खरंच सांगा...

"मुद्दा पटण्यासारखा आहे.. पण निषेध जर सिलेक्टिव असेल तर ते दुट्टप्पीपणाच नाही होणार का ?" - विसंगती ही निसर्गात (माणसात च असं नाही) असतेच. बहुतेक वेळा ती दुसर्याच्या perception मधे असते. प्रत्येक माणूस स्वतःपुरता justified च असतो.

"आणि तो सिलेक्टिव निषेध जर वर्ण, प्रांत या घटकांनी पुर्वा ग्रहित असेल तर ते निषेधार्य नसेल का?'" - कुठल्या तरी घटकांचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होतोच. काही जोडणारे आणी काही तोडणारे धागे असतातच. जगाच्या पाठीवर कुठेतरी अपघात होऊन ५-१० लोकं मारली गेली तर वाटणारी हळहळ आणी जवळची व्यक्ती अगदी जरी नैसर्गिकरित्या मरण पावली तरी वाटणारे दु:ख ह्यात फरक असणारच. उगाच ईंटरनेट च्या आभासी जगात लिहायचं म्हणून संभावितपणाचा आव आणण्यात काय अर्थ आहे?

फेरफटका | 5 January, 2017 - 21:14 नवीन
"मुद्दा पटण्यासारखा आहे.. पण निषेध जर सिलेक्टिव असेल तर ते दुट्टप्पीपणाच नाही होणार का ?" - विसंगती ही निसर्गात (माणसात च असं नाही) असतेच. बहुतेक वेळा ती दुसर्याच्या perception मधे असते. प्रत्येक माणूस स्वतःपुरता justified च असतो.
"आणि तो सिलेक्टिव निषेध जर वर्ण, प्रांत या घटकांनी पुर्वा ग्रहित असेल तर ते निषेधार्य नसेल का?'" - कुठल्या तरी घटकांचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होतोच. काही जोडणारे आणी काही तोडणारे धागे असतातच. जगाच्या पाठीवर कुठेतरी अपघात होऊन ५-१० लोकं मारली गेली तर वाटणारी हळहळ आणी जवळची व्यक्ती अगदी जरी नैसर्गिकरित्या मरण पावली तरी वाटणारे दु:ख ह्यात फरक असणारच. >>>>>>>>>

अगदी योग्य.. मग हेच तत्व इनामदार आणि त्यानी केलेल्या विश्लेषनाला ही लागु होतच.. बरोबर..!!

>>>>दोन दिवस झाले तरी धाग्याला उठाव नव्हता. चिनूक्स ने सुरुवातीलाच मुद्देसूद प्रतिक्रिया दिल्यावर बोलण्यासारखं / लिहीण्यासारखं काही उरलं नव्हतं. मग आज लेखकाने स्वतःच २-३ भडक प्रतिसाद देवून धाग्याला ऊब आणली आणी माझ्यासकट सगळ्यांनी हात साफ करून घेतले. <<<<

ईनामदारांनी चिनूक्स ह्यांना दिलेले उत्तर दुर्लक्षणीय नाही. वैयक्तीक भूमिका म्हणून चिनूक्स ह्यांचे म्हणणे सकृतदर्शनी पटत असले तरी ईनामदारांचे उत्तर अद्वातद्वा अजिबात नाही.

ईनामदारांनी भडक प्रतिसाद दिलेलेही दिसत नाहीत.

कोणी हात साफ केलेत असेही वाटत नाही.

===============

>>>>मला ह्या भुमिकेची गंमत वाटते. जणू काही गडकरी पुतळा प्रकरणाचा निषेध करणारा एक ग्रूप आहे आणी त्याच ग्रूप ने आनंद यादव वादात बघ्याची भुमिका घेतली अशी भुमिका घेतली आहे<<<<

हेच मला विचारायचे होते, जे मी विचारलेले आहे.
================

>>>>गांधीजी म्हणायचे तसं जर माझ्या दोन परस्पर विरोधी भुमिका तुम्हाला दिसल्या तर त्यातली सगळ्यात लेटेस्ट भुमिका ग्राह्य धरावी. माणसाच्या विचारात, भुमिकेत वेळो-वेळी बदल होत असतात. <<<<

ह्या लेव्हलला पोचायला संभाजी ब्रिगेडला जितकी वर्षे लागतील तितकी वर्षे त्यांच्यात एकी राहील की नाही हा प्रश्न आहे.

==================

>>>>बाकी बाबासाहेब पुरंदर्यांना शिव्या वगैरे घालायची गिमिक्स सोडून द्या. कुणालाही काहीही फरक पडत नाही. जे त्यांच्या साहित्यावर विश्वास ठेवतात, त्याचे चाहते आहेत, ते अशा गोष्टींनी बधणार नाहीयेत आणी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सुद्धा तुमच्या भुमिकेने कमी/अधिक होणार नाहीये.<<<<

फरक पडतो हे दिसत आहेच की?

इनामदार,

१. आनंद यादवांना पाठिंबा अजिबातच मिळाला नाही, हे मला अमान्य आहे. वर्तमानपत्रांनी त्यांच्या समर्थनार्थ अग्रलेख लिहिले होते. वारकर्‍यांच्या भूमिकेला विरोधही केला होता.

२. आम्हांला मुलाखत न देण्याचा निर्णय घेण्याचं अर्थातच पूर्ण स्वातंत्र्य यादवांना होतं. पण मग आम्हांला घरी बोलवून ती न देण्याचं कारण नव्हतं. कादंबरी लिहायला किती काळ लागला आणि अध्यक्ष म्हणून त्यांच्या कसा अपमान झाला हेच ते सांगत बसले. मुलाखत नाही तर नाही, मी लेख लिहितो, असं मी मान्य जरी केलं, तरी नक्की कशाबद्दल मी लेख लिहायचा? यादवांचे विचार मी माझे विचार म्हणून लेखात मांडणं हे गैर नाही का? माझे विचार मी मांडेन, त्यांचे विचार त्यांनी मांडावेत. त्यांचे विचार मी माझे म्हणून का मांडावे?

त्यांच्यावतीनं लेख लिहावा, असं त्यांच्या बोलण्यातून मला वाटलं नाही. त्यात कुठलाही नवा विचार नव्हता. त्यांना संमेलनात मिळालेली वागणूक पेपरात छापून आलीच होती. राहता राहिला मुद्दा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा. तर त्याबद्दल यादव काही बोलतच नव्हते. सगळा फोकस कादंबरी लिहायला किती वर्षं लागली आणि संमेलनाचं अध्यक्षपद यावर. त्यांना मिळालेली वागणूक अयोग्य होतेच आणि त्याबद्दलही लिहून येतच होतं. मग 'यादवांनी इतकी वर्षं मेहनत घेऊन कादंबरी लिहिली, तिच्यावर बंदी घालणं अयोग्य आहे' एवढा एक मुद्दा उरला. अनेक वर्षांची मेहनत हा उत्तम कादंबरीचा निकष नाही.

शिवाय माझ्याकडे कुठलंही ध्वनिमुद्रण नसणार होतं. ध्वनिमुद्रणाला विरोध का? यादवांच्या कादंबरीलेखनाची प्रक्रिया तुला कुठल्या कर्णपिशच्चाने सांगितली, हा प्रश्न मला अनेकांनी विचारलाच असता. एकीकडे अविश्वास दाखवून दुसरीकडे लेख लिहिण्यासाठी मागे लागायचं, हे एवढ्या मोठ्या लेखकाला खचितच शोभत नाही. प्रसारमाध्यमं आपल्या बोलण्याचा विपर्यास करतील, असं त्यांना वाटत असेल, तर मग दोनदा फोन करून लेख लिहिण्याविषयी गळ का घालावी? यादवांचं हे वागणं कुठल्याही संकेतांना धरून नव्हतं. ते जे खाजगीत बोलले ते मी माझ्या नावानं माझे विचार म्हणून छापणं, हे माझ्या कामाच्या पद्धतीत बसत नव्हतं.

३. दुर्गाबाई, पुरंदरे, यादव, ढेरे, प्रज्ञा दया पवार आणि गडकरी या सार्‍यांचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य समान आहे. त्याला कृपया जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका. दुर्गाबाई, ढेरे, प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या लेखनाबद्दल माफी मागितली नाही आणि लेखन मागेही घेतलं नाही. यादवांनी हे दोन्ही केलं.

४. ढेर्‍यांनी आणि दुर्गाबाईंनी आपल्या लेखनातून उत्तर दिलं. यादव तसं करू शकले असते. किंवा कादंबरीच्या सुरुवातीला आणि मलपृष्ठावर ज्या ऐतिहासिकतेचा उल्लेख आहे, ते पुरावे सादर करू शकले असते. त्यांनी यांतलं काहीच केलं नाही. आपल्या लढ्यात आपण मागे राहून इतरांनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा चूक आहे.

अध्यक्षपद आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांत त्यांनी अध्यक्षपद महत्त्वाचं मानलं.

५. हे त्यावेळचे काही धागे -

http://www.maayboli.com/node/6514

http://www.maayboli.com/node/5954

http://www.maayboli.com/node/5851

वर्तमानपत्रांतही छापून आलं होतंच.

६. तुमच्या मला उद्देशून लिहिलेल्या प्रतिक्रियेतली भाषा मला रुचलेली नाही. वैयक्तिक हेत्वारोप करणार असल्यास, यापुढे चर्चेत मला रस नाही.

Pages