सचिननामा-२: शिखराकडे

Submitted by फारएण्ड on 31 December, 2016 - 00:30

२. नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात
नोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. सचिन बद्दल आधी ऐकलेले व हाईप झालेली त्याची इमेज ही प्रत्यक्षात तितकीच, किंबहुना जास्तच भारी आहे असे सर्वांच्या लक्षात आले.

मात्र त्याच्या कसोटी पदार्पणात तो वकार समोर उभा राहिला याचे जरा काकणभर जास्तच कौतुक होते असे मला वाटते. ती वकारचीही पदार्पणाची सिरीज होती. सचिन जरी तेव्हा १६ वर्षांचाच असला, तरी वकारही १८ चाच होता. तोपर्यंत भारतात भरपूर खेळलेल्या सचिन ला वकार समोर उभे राहणे हे जरी तुलनेने मोठे चॅलेंज असले, तरी केवळ तसे करण्याबद्दल जे जरा भावुक होउन लिहीले जाते तेवढे ते सचिनलाही वाटले नसावे. कारण अशा चॅलेंजेसची कल्पना असते अशा लेव्हल वर खेळणार्‍यांना. खरे आव्हान होते ते पाक मधे खेळणे, आंतरराष्ट्रीय लेव्हलला खेळणे आणि ते ही अक्रम, इम्रान व अब्दुल कादिर या दिग्गजांविरूद्ध. वकार ही जबरदस्त होता हे नक्की पण त्या सिरीज मधे तो ही नवीनच होता.

मात्र दखल घेण्याजोगे झाले ते प्रत्यक्ष मॅच मधे. बाउन्सर नाकावर लागून बरेच रक्त वाहिल्यावर सहसा कोणीही रिटायर होउन विश्रांती घेउन मग ठरवेल. पण ऑलरेडी ४ जण लौकर आउट झालेले असताना व इतकी जबरदस्त बोलिंग त्यांच्याच मैदानावर खेळताना माघार न घेता सचिन पुढे खेळला. इतकेच नव्हे तर बोलिंग वर प्रतिहल्लाही केला. सिद्धूने हे फार मजेदार पद्धतीने एका कार्यक्रमात सांगितले आहे. त्यातला थोडा सिद्धू स्टाइल ड्रामा वगळला तरी ते जबरी आहे. खुद्द सचिन ने ही याच क्लिप मधे त्याची त्यावेळची मन:स्थिती सांगितली आहे. भारतात स्थानिक स्पर्धा गाजवून मुख्य टीम मधे सिलेक्ट तो झाला. पण असे अनेक होतात. कसोटी सामन्यात यशस्वी व्हायला जे लागते ते आपल्याकडे आहे का याबद्दल शंका असणे, तसे यशस्वी होण्याकरता अनावश्यकरीत्या फटके मारण्याचा प्रयत्न करणे व एक दोन दा लौकर आउट झाल्यावर मग आत्मविश्वास निर्माण करणारा तो एक यशस्वी डाव - बहुतेक दिग्गज खेळाडू यातूनच जातात. ही सिरीज सचिन साठी तशीच होती.

याव्यतिरिक्त एका प्रदर्शनीय सामन्यात त्याने अब्दुल कादिरची भरपूर धुलाई केली. असे म्हणतात की कादिर ने त्याला चॅलेंज दिले होते की मारून दाखव. ही मॅचही अनेकांच्या लक्षात असेल. पण ती अधिकृत नव्हती. मात्र यानंतर कादिर ने इम्रान ला जे सांगितले "ये बहोत बडा बॅट्समन होगा, झहीर अब्बास जैसा.." त्यावरून पुलंचे "पुणेरी चैनीची परमावधी शिकरण, मटार उसळ मधेच संपते" आठवते.

असे एक दोन डाव सोडता पाक च्या त्या सिरीज मधे विशेष काही केले नाही त्याने पण नंतर न्यू झीलंड मधे शतक थोडक्यात हुकल्यावर १९९० च्या इंग्लंड सिरीज मधे पहिले शतक, ते ही मॅचसेव्हिंग. मग १९९२ मधे ऑस्ट्रेलियात दोन व नंतर त्याच वर्षे द. आफ्रिकेत अजून एक. फास्ट पिचेस, बोलिंग, स्विंग, बाउन्स, कॅरी सगळे असलेल्या ठिकाणी, आणि विशेषतः बाकी भारतीय फलंदाजी अपयशी ठरत असतान सचिन उठून दिसल्याने त्याच्या ऑथेण्टिकपणाबद्दल खात्री पटली.
त्याकाळात गावसकर वगळता फास्ट पिचेस वर व विविध देशांतील कंडिशन्स मधे यशस्वी होणारे अगदी कमी होते भारताकडे. वेंगसरकर इंग्लंड मधला स्विंग चांगला खेळे पण ऑस्ट्रेलियात, विंडीज मधे चालला नाही. मोहिंदर विंडीज व पाक मधे चालला, पण इतरत्र तुलनेने कमी. त्यातल्या त्यात गुंडाप्पा विश्वनाथ बहुतांश सगळीकडे चांगला खेळला असेल. १९८० च्या दशकातही कमीच होते. अझर स्विंग चांगला खेळे पण त्याला बाउन्स खेळता येत नसे. मांजरेकर कडे तंत्र होते पण त्याला मर्यादित यश मिळाले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जबरदस्त बॅकफुट प्ले, "व्ही" मधे (मिड ऑफ ते मिड ऑन च्या आर्क मधे - बॅट्स्मन हा व्ही अक्षराच्या बेस वर धरून बोलरच्या आजूबाजूचा भाग) मारलेले फटके व अंगभूत आक्रमकता यामुळे सचिन एकदम उठून दिसला. सर्वसाधारण भारतीय खेळाडू हे भारतात बाउन्स नसल्याने कोणत्याही बॉल ला फ्रंट फूट वरून मारत, तसेच स्विंग ही फारसा नसल्याने आहे त्या जागेवरून मारले तरी चालत असे. ते तंत्र परदेशात चालत नसे. या दोन्ही बाबतीत सॉलिड तंत्र असल्याने सचिन सगळीकडच्या समालोचकांच्या व विशेषतः जुन्या तज्ञ खेळाडूंच्या नजरेत भरला. याचे एक उदाहरण म्हणजे इंग्लंड मधे यॉर्कशायर करता खेळताना मारलेले आक्रमक शतक. या क्लिप मधली कॉमेण्टरी नंतरच्या अनेक कॉमेण्टरीज पेक्षा ऑथेण्टिक वाटेल - कारण तोपर्यंत सचिन खेळताना त्याच्या रेप्युटेशन मुळे भारावून जाउन केलेली कॉमेण्टरी फारशी नव्हती. या इंग्लिश समालोचकांनी समोर जे दिसले ते सांगितले आहे. त्यातून त्याची क्लासिकल पण आक्रमक स्टाइल सुरूवातीला लोकांच्या नजरेत भरली ते जाणवते.

याकाळात त्याचे स्ट्रेट ड्राइव्ह्ज, ऑन ड्राइव्ह्ज, ऑफ ड्राइव्ह्ज आणि इनिंग मधे स्थिरावल्यावर मारलेले जबरदस्त कट्स हे कसोटीत जास्त दिसत. तर वन डेज मधे उचलून मारलेले फटके. पण हा काळ त्याचा कसोटीत स्थिरावण्याचा होता. वन डेज मधे तो मधल्या फळीत येत असे व थोडीफार फटकेबाजी करून ३०-४० रन्स काढून आउट होत असे. वन डे मधे खूप गाजला नव्हता या काळात तो. एक दोन अपवाद म्हणजे १९९२ चा वर्ल्ड कप व त्यातही कपिल बरोबर जोरदार भागीदारी केलेली पाक विरूद्धची मॅच.

मात्र यानंतर एक दोन वर्षांतच त्याने पाक विरूद्ध खेळलेल्या एका जबरी डावाची क्लिप नुकतीच मिळाली. ती येथे टाकत आहे. त्याकाळात सचिन ने शारजाला पाक विरूद्ध काही अत्यंत आक्रमक डाव खेळले आहेत, व तो गेल्यावर नेहमीप्रमाणे पडझड झालेली आहे असे अनेकदा आठवते. ही बहुधा तशी पहिली क्लिप.

याकाळातील इतर प्रमुख फलंदाज - श्रीकांत, सिद्धू, मांजरेकर, वेंगसरकर, शास्त्री, अझर
कप्तानः पहिल्या सिरीज मधे श्रीकांत, नंतर पुढे अझर
ओपनरः श्रीकांत-सिद्धू, रमण-प्रभाकर, शास्त्री-सिद्धू, शास्त्री-श्रीकांत, शास्त्री-जडेजा, शास्त्री-प्रभाकर

३. १९९३ ची इंग्लंड विरूद्धची होम सिरीज ते १९९६ चा वर्ल्ड कप
या काळाचे विश्लेषण कोणत्याही एका पद्धतीने करणे अवघड वाटते मला. कसोटी मधे १९९३ व ९४ मधे भारत बहुतांश घरी खेळला व सर्वच फलंदाज तुडुंब रन्स करत होते. याच वेळेस अनिल कुंबळे, व्यंकटपथी राजू व राजेश चौहान चे त्रिकुट एकत्र आले. कपिल व प्रभाकर ४-४ ओव्हर्स टाकून स्पिनर्स कडे बॉल जाई. इंग्लंड्,झिंबाब्वे, लंका वगैरेंना गुंडाळून टाकून भारत सहज जिंके. यात सचिनच्याही धावा असत पण त्या उठून दिसत नसत. मग १९९५ मधे फारश्या मॅचेसच झाल्या नाहीत. एक न्यूझीलंड सिरीज होती पण तीही पावसाने वॉश आउट झाली. शेवटी १९९६ च्या इंग्लंड टूर मधे सचिन ने दोन सुंदर शतके मारली. एक एजबस्टन व दुसरे ट्रेन्ट ब्रिज ला. दोन्हीमधली त्याची बॅटिंग सुरेख आहे, विशेषत: ट्रेण्ट ब्रिज ची. यातले पहिले शतक म्हणजे त्याकाळातील भारताची नेहमीची रडकथा होती. तिसर्‍या इनिंग मधे एकूण २१९ मधे सचिन च्या १२२ व त्यानंतरचा सर्वोच्च स्कोअर १८.

वन डे मधे मात्र याकाळातच मोठा बदल झाला. १९९४ च्या न्यू झीलंड मधल्या सिरीज मधे सिद्धू जखमी झाल्याने सचिन ओपन करायला आला, आणि त्याने ४९ बॉल्स मधे ८४ मारल्यावर त्यापुढे तोच ओपन करणार हे नक्की झाले. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने आपले वन डे मधले पहिले शतक मारले - खेळू लागल्यावर जवळजवळ पाच वर्षांनी (मात्र त्यानंतर साधारण चार वर्षांत आणखी वीस मारली). १९९६ च्या वर्ल्ड कप मधेही त्याचा परफॉर्मन्स जबरी व अत्यंत आक्रमक होता. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, लंकेविरूद्ध लीग मधे आणि नंतर सेमी फायनल मधे तो जबरदस्त खेळला. लंकेविरूद्धच्या सेमी फायनल मधे तो जर आउट झाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते.

याच काळात टीव्हीवर कॉमेण्टरी मधे सचिन बद्दल "arguably world's best batsman" असे म्हंटले जाउ लागले. वास्तविक याच काळात सचिनबरोबरच लारा, सईद अन्वर, स्टीव वॉ, मार्क वॉ व अरविंद डी सिल्वा हे वन डे व कसोटी दोन्हीकडे गाजवत होते. तरीही सचिन बद्दलचा 'बझ्झ' इतरंपेक्षा जास्त होता. मग इंग्लंड मधल्या त्या जुलै-ऑगस्ट १९९६ च्या सिरीज मधे अझर व सिद्धू यांच्यातील भांडण, भारताचा पुन्हा पराभव वगैरेंमुळे अझर चे कप्तानपद गेले व सचिन कडे आले. त्यावेळचे जनमतही तसेच होते. मला स्वतःलाही त्याच्याचकडे कप्तानपद यावे असे वाटत होते व त्याच्या बॅटिंग वर परिणाम न होता उलट संघ आक्रमक होईल असे वाटले होते. ते चुकीचे होते हे खूप लगेच कळले.

याकाळातील इतर प्रमुख फलंदाज - सिद्धू, मांजरेकर, विनोद कांबळी, अझर. या काळात शेवटच्या सिरीज मधे द्रविड व गांगुली यांचे यशस्वी पदार्पण
कप्तानः अझर
ओपनरः सिद्धू-प्रभाकर, मोंगिया-सिद्धू, प्रभाकर-जडेजा, विक्रम राठौड-जडेजा, राठौड-मोंगिया

४. ऑक्टोबर १९९६ ते डिसेंबर १९९७
कप्तानपद म्हणून पहिला डाव. कप्तान म्हणून सुरूवात दणदणीत - घरच्या मैदानांवर ऑस्ट्रेलिया (१ टेस्ट) व द. आफ्रिका (२-१) हरवून. पण नंतर फलंदाजीतील मर्यादित कामगिरी, बाकी खेळाडूंचेही अपयश व अनेकदा विजयाच्या जवळ जाउन अनिर्णित राहिलेले सामने. काही उदाहरणे - द आफ्रिकेत पहिले दोन सामने हरल्यावर तिसर्‍या सामन्यात संधी होती, ३५६ चेस करताना द आफ्रिका ९५/७ अवस्थेत होती. पण पुढे शेपुट गुंडाळणे जमले नाही व मॅच ड्रॉ. लंकेविरूद्ध होम सिरीज मधेही असेच. आधी सलग ५ मॅचेस (३ लंकेत व २ भारतात) ड्रॉ झाल्यावर मुंबईला त्यांना ३२३ करायचे होते व आपल्याला त्यांना ८२ ओव्हर्स मधे गुंडाळायचे होते. त्या आधी व त्यानंतर नेहमी भारताने हे केले आहे. पण या मॅच मधे ८२ ओव्हर्स मधे शेवटी लंका १६६/७ वर राहिली.

फलंदाज म्हणून तो मला या काळात बघायला अजिबात आवडायचा नाही. नेहमीसारखा दम त्याच्या बॅटिंग मधे क्वचितच दिसायचा. काही डाव चांगले खेळलाय तो पण पहिली मजा नव्हती. याला सणसणीत अपवाद म्हणजे दोन उदाहरणे - १९९६ पासून पुढे २-३ वर्षे टोरंटो मधे भारत-पाक वन डे सामने होत. त्यातील पहिल्याच गेम मधे अक्रम, वकार व अझर मेहमूद ची भरपूर धुलाई करून मॅचविनिंग नाबाद ८९ मारले, तो डाव. वकारच्या स्विंगिंग यॉर्कर टाकायच्या प्रयत्नांना इतके जबरी उत्तर क्वचित मिळाले असेल. पुढे शोएब विरूद्ध तेच केले त्याने. स्विंगिंग यॉर्कर्स हे दोघांचेही सर्वात खतरनाक अस्त्र. पण ते जरा चुकले तर धुलाई होते या भीतीने ते पूर्वीइतके पाहिजे तेव्हा वापरणे त्यांचे बंद झाले व त्यांची धार बोथट झाली. तसेच ही दुसरी, वेस्ट इंडिज मधे १९९७ मधे मारलेले ९२. यातील फटके अत्यंत सुरेख आहेत. शॉर्ट पिच बोलिंग ला कट्स आणि हुक्स मारून जबरी उत्तर दिले त्याने. याच डावात एकदा फ्रंट फुट वरून मारलेला ऑफ ड्राइव्ह व लगेच बॅक फुट वरून मारलेला कव्हर ड्राइव्ह हे तर हजारो वेळा पाहण्यासारखे आहेत, आणि दोन्ही चांगल्या बॉल्स ना मारलेले. गावस्कर व टोनी कोझिअर शेवटी 'सुपरलेटिव्ह्ज' वापरून थकले. त्या बॅकफुट शॉट नंतर टोनी कोझिअर ची कॉमेण्ट - "That's the best of the lot! Of all those three boundaries, that one off the back-foot is brilliant, and beyond what most other batsmen in world cricket can do!"

याकाळातील इतर प्रमुख फलंदाज - सिद्धू, जडेजा, द्रविड, अझर, गांगुली
कप्तानः स्वतःच
ओपनरः मोंगिया-रमण, लक्ष्मण-सिद्धू, रमण-द्रविड, जडेजा-सिद्धू,

५. जाने १९९८ ते जाने १९९९
"It can only get better from here!" रवी शास्त्री, शारजा डिसेंबर १९९७. शारजा स्पर्धेतील शेवटची मॅच भारत हरल्यावर.
१९९७ च्या डिसेंबर मधे शारजा ला झालेल्या वन डे स्पर्धेत भारत सगळे सामने हरला. सचिन च्या कप्तानपदाबद्दल चर्चा सुरू होतीच, या स्पर्धेनंतर जनमतही तसे होउ लागले. सुमारे वर्षभर बहुतांश बेकार परफॉर्मन्स झाल्याने सचिन चे कप्तानपद गेले व पुन्हा अझर कडे आले.

पण आमच्या डोक्यात गेल्या वर्षभरातला सचिन होता. प्रचंड ओझे अंगावर घेउन खेळत असल्यासारखा दिसणारा, तुलनेने स्लो खेळणारा. जानेवारी १९९८ मधे बांगलादेश च्या इण्डिपेण्डन्स कप ची स्पर्धा सुरू झाली. भारत - पाक - बांगलादेश. पहिल्या मॅच मधे बांगलादेश विरूद्ध आधीच्या वर्षात खेळायचा तसेच खेळल्यावर पुढच्या पाक विरूद्ध मॅच मधे 'मोकळ्या' झालेल्या सचिन ची चुणूक दिसली. ४४ बॉल्स मधे ६७, ११ फोर. नंतर पुढच्याही मॅचेस मधे तशीच धुलाई. दुपारी ऑफिस मधे पहिल्यांदा जेव्हा सचिन चा स्कोअर कळला तेव्हा पब्लिक च्या लक्षात आले, Our man was back!

सचिन च्या कारकीर्दीतील तो सर्वात प्रभावी असलेला काळ शोधला तर १९९८ हे वर्ष बहुधा सर्वात वर असेल. तसेच तो कारकीर्दीत तीन वेळा मोठे ओझे उतरल्यासारखा मोकळा होउन खेळला त्यातील ही पहिली वेळ. फॉर्म, कौशल्य व फिटनेस तिन्ही बाबतीत सचिन या वर्षी जबरदस्त जोरात होता. त्याने खेळलेल्या बहुतेक मॅचेस मधला गेम त्याने कंट्रोल केला. या वर्षातील त्याचा खेळ अत्यंत आक्रमक होता.

नंतरची लक्षात आहे ती १९९८ सालची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ची सिरीज. वॉर्न मोठा गाजावाजा करत भारतात आला होता, कारण तोपर्यंत सगळ्या टीम्स ना त्याने नेस्तनाबूत केलेले होते. सचिनही १९९६ व ९७ मधे कॅप्टन म्हणून फेल गेल्यावर नुकताच बॅटिंग मधे 'परत येत' होता. दौर्‍यतल्या पहिल्याच मॅच मधे (मुंबई वि. ऑस्ट्रेलिया) सचिन ने वॉर्न ला धू धू धुतला. पण चेन्नईला पहिल्या इनिंग मधे वॉर्न ने त्याला ४ वर काढले. लगेच हाकाटी सुरू झाली की वॉर्न ने आपली खरे शस्त्रे अजून काढली नव्हती म्हणून, नाहीतर त्याला एवढा मारला नसता. पण ऑस्ट्रेलिया ने घेतलेली ९० रन्स ची आघाडी दुसर्‍या डावात सिद्धू ने आधीच मोडीत काढली (वॉर्न अजूनही सिद्धूला 'मानतो'), पण मॅच अजूनही ओपन होती. त्यानंतर वॉर्न च्या लेगस्पिन ला पुढे येऊन मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकवणारा सचिन आणि जेथे बॉल जाईल तेथे दिसणारा प्रेक्षकांचा दंगा, आणि मग शतक झाल्यावर एका हातात हेल्मेट आणि दुसर्‍या हातात बॅट उंचावणारा सचिन अजूनही डोळ्यासमोर आहेत. सचिन १५५ वर असताना अझर ने डाव घोषित केला त्याचे एक विशेष कारण होते. त्या मॅचच्या साधारण १० वर्षांपूर्वी बोर्डर ने भारतापुढे मद्रासलाच ३४८ रन्स चे चॅलेंज दिले होते आणि भारताने डेअरिंग चेस केल्यावर शेवटी गडबड होउन ती मॅच 'टाय' झाली होती. तेव्हा "आता तुम्ही ३४८ करून दाखवा" चे चॅलेन्ज जबरी होते. अपेक्षेप्रमाणे आपण जिंकलो व नंतर इडन गार्डन्स ला ही त्यांना हरवून सिरीज ही जिंकलो. याच सिरीज मधे कलकत्त्याला मारलेले ७९ व नंतर बंगलोर ला मारलेले १७७ हे ही तितकेच जबरदस्त आहेत ( या आधीही दोन तीन दा १७७ च्या आसपास बाद झालेला होता तो, त्याबद्दल विचारल्यावर त्याचे वक्तव्य "I have this unfortunate habit of getting out in late 170s"). मग वन डे सिरीज मधेही चांगली कामगिरी, आणि त्यानंतर लगेच झालेल्या शारजा सिरीज व 'डेझर्ट स्टॉर्म' बद्दल तर सर्वांनाच माहीत आहे.

१९९८ मधे सचिन इतका फॉर्म मधे होता की त्या २-३ महिन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सगळ्या मॅचेस मिळून हजार एक रन्स केले होते. शारजामधे तर तो इतका वरच्या लेव्हल ला खेळत होता, की एकदा त्याचा समोर मारलेला शॉट खाली उभ्या असलेल्या गांगुलीने कसाबसा चकवला व तो खाली पडला, तेव्हा कॉमेण्टेटर्स म्हंटले होते "Sachin, you need somebody at the other end. Now I know why Ganguly wears a helmet. It is not to protect from the bowling, but to protect from this guy at the other end"

मात्र या काळात वन डे च्या रॅण्डम तिरंगी/चौरंगी स्पर्धा अनेक होत असत. मे मधे भारतात, जुलै मधे श्री लंकेत, सप्टेंबर मधे टोरांटो व नोव्हेंबर मधे पुन्हा शारजा मधे भारत खेळला. सचिन ने कोणत्याही स्पर्धेत बाहेर बसणे हे सचिन, क्रिकेट बोर्ड, पब्लिक व स्पॉन्सरर्स कोणालाच नको असल्याने सचिन वर्षभर सतत खेळत राहिला. डिसेंबर मधे न्यूझीलंड मधे कसोटी व वन डे झाले, तर लगेच परतल्यावर भारतात आधी पाक विरूद्ध कसोटी मालिका आणि लगेच एक "एशियन टेस्ट चॅम्पियनशिप" झाली. या दरम्यान सचिनची पाठदुखी सुरू झाली, आणि चेन्नईच्या त्या फेमस सेन्च्युरी व तो बाद झाल्यावरच्या हाराकिरी नंतर सचिनचा हा प्रचंड फॉर्मचा काळ संपला.

पुढचे सहा महिने तो खेळला तो पाठदुखी घेउन. या काळात तो ब्रेक घेउन बाहेर का बसला नाही हे समजत नाही (बहुधा पुस्तकातही ते दिलेले नाही. लक्षात नाही). पण पाठदुखीमुळे फटके मारण्यावर निर्बंध आले, चेन्नई च्या अनुभवानंतर आपण आक्रमकपणे खेळून विकेट गमावली तर डाव कोसळतो या भीतीने तो बचावात्मक खेळू लागला. नंतर इंग्लंड मधे वर्ल्ड कप होता म्हणून निदान काही दिवस विश्रांती घेण्यासाठी तो त्या आधीच्या एक दोन क्रेझी स्पर्धांमधून बाहेर बसला.

नंतर १९९९ च्या कप मधली एक गेम झाल्यावर लगेच वडील गेल्याने त्याला मुंबईला परत जावे लागले. सचिन इफेक्ट एवढा जबरदस्त होता की पब्लिक लाही आता आपले काय होणार ही चिंता वाटू लागली. संघातही 'केऑटिक' वातावरण असावे - जे झिम्बाब्वे विरूद्ध खिशात असलेला सामना हरून भारताने दाखवले. मग बातमी आली की सचिन परतणार. तो परतला व पुढच्या केनियाविरूद्धच्या सामन्यात शतक मारले. मी या मॅच मधल्या भारताच्या बॅटिंग च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला रेल्वेने गेलो होतो. पब्लिक चे सचिन प्रेम काय प्रकार आहे, पब्लिक ची किती त्याला सहानुभूती आहे हे सगळीकडे दिसत होते. अक्षरशः घरी असलेले सगळे टीव्हीला व बाहेर असलेले सगळे रेडिओ ला कान लावून बसले होते. त्याचे ते शतक व नंतर आकाशाकडे उंचावलेली बॅट हे क्रिकेट मधल्या कधीही न विसरले जाणार्‍या दृष्यांपैकी आहे.

हा १९९९ च्या पहिल्या सहा महिन्यातील काळ नक्की काय कॅटेगरीत टाकावा ते ठरवू शकलो नाही. म्हणून त्याबद्दल इथेच माहिती दिली. पण १९९८ मधला प्रचंड आक्रमक व फिट सचिन १९९९ च्या पहिल्या सहा महिन्यात एकदम त्याच्या फलंदाजीतील लाईफ काढून घेतल्यासारखा खेळत होता.

१९९८ च्या सप्टेंबर मधे एक बरीच चर्चा झालेले प्रकरण झाले. मलेशिया मधल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत क्रिकेट खेळले जाणार होते. भारताने तेथे आपला मुख्य संघ पाठवावा अशी इण्डियन ऑलिम्पिक असोसिएशन ची मागणी होती. तर ही नेहमीची क्रिकेट स्पर्धा नसल्याने (आयसीसी ची), बीसीसीआय ला आपले मूळचे श्येड्यूल जे होते तेच हवे होते - त्यानुसार याच दिवसांत टोरांटो मधे भारत पाक सामने ठरलेले होते. मग बरेच दिवस भारतीय संघ कोठे जाणार आणि त्यातही सचिन कोठे खेळणार यावर बरेच राजकारण, चर्चा व रस्सीखेच झाली. शेवटी असा तोडगा निघाला की सचिन मलेशियाला जाणार व बाकी थोडेफार खेळाडू टोरांटोला. भारताचा परफॉर्मन्स दोन्हीकडे वाईट झाला.

एकूण सचिन च्या पदार्पणानंतर त्याची आक्रमक पण प्रतिस्पर्धी टीम ला चान्सेस देणारी रिस्की बॅटिंग, फिटनेस प्रॉब्लेम नसल्याने जड बॅट सुद्धा अत्यंत मोकळेपणाने फिरवून मारलेले कट्स व पंचेस हे सगळे १९९८ च्या शेवटापर्यंत दिसत होते. इथून पुढे त्याचा स्टान्सही थोडा बदलला. सुरूवातीच्या मॅचेस मधे तो जास्त झुकलेला दिसेल. या काळात त्याचे फटके (विशेषतः कट्स, पुल्स व मिडविकेट ला मारलेले शॉट्स) पाहिलेत तर एक "चपराक" असे त्या शॉट्स मधे. जाने. १९९९ च्या पाठदुखीनंतर तो मोकळेपणा क्वचित दिसला व त्याची जागा पुन्हा कमावलेल्या कौशल्याने मारलेल्या व दुखापत टाळण्याच्या गरजेतून आणि कधीकधी तर दुखापत सहन करून मारलेल्या कलात्मक व 'क्लेव्हर' फटक्यांनी घेतली.

भारतीय फलंदाजी सचिन वर पूर्णपणे अवलंबून असण्याचा, पब्लिक च्या डोक्यात सचिन आउट झाला की भारताची बॅटिंग संपली असा समज पक्का असण्याचा हा काही वर्षांचा काळ साधारण इथपर्यंत होता. चेन्नई मधल्या पाक विरूद्धच्या पराभवाने, व आधीच्या अनेक चांगल्या कामगिरींमुळे ते अधोरेखित झाले. यापुढे हे चित्र द्रविड व लक्ष्मण मुळे बदलले, पण ही ८-१० वर्षे भारतीय क्रिकेट पाहिलेल्यांना सचिन वर बॅटिंग अवलंबून असणे, आख्ख्या बॅटिंग चे ओझे वाहणे म्हणजे काय ते चांगले लक्षात आहे. २०११ च्या विजयानंतर विराट कोहलीला सचिन ला त्याने उचलण्याबद्दल विचारले होते तेव्हा तो म्हंटला "He carried the Indian batting on his shoulders for many years, so it's time we carried him". त्या विजयानंतर नाचून पुन्हा शांतपणे समारंभ पाहायला बसलेल्या सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी तेव्हा मान डोलावली असेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालाय हा भाग सुद्धा.

मध्यंतरीच माझ्या डोक्यात आले होते की त्यावेळेस कशा ३ - ४ टीम्स च्या सिरीज व्हायच्या तशा आता ऐकू आल्या नाहीत फार काही. आयपीएल ने त्या सिरीज कमी झाल्यात का ?

मस्त!

या मालिकेच्या निमीत्ताने जुने दिवस जेव्हा क्रिकेट (तुमच्या एव्हढ्या एक्स्पर्ट लेव्हल ला नाही पण तरी आमच्यापरीने) फॉलो केलं जायचं त्याची उजळणी होत आहे. खूप आवडत आहे वाचायला.

सचिन कॅप्टन असताना की त्यानंतर तू वर हायलाईट केलं आहेस त्या दरम्यान (तो आऊट झाला की बाकीचे गारद) मला अ‍ॅक्च्युअली सचिन आवडेनासा झाला होता. त्याचा राग यायचा. कारण तो खेळला तर काहितरी आतिषबाजी क्रिकेट मधली दिसणार नाहीतर पानिपत होणार आणि तु अनुभव नकोसा वाटायचा म्हणून सचिनचाच राग यायचा Happy आता नक्क्की आठवत नाही आणि तुला (आणि तुझ्यासारख्यांनां) नक्कीच नीट आठवत असेल पण इडन गार्डन वरचा फियास्को (कांबळी ब्रेक डाऊन) झाला तेव्हा सुद्धा आधी सचिनचा राग आला होता :| Happy

डायना मेमोरिअलच्या ह्या एमसीसी वि. रेस्ट ऑफ वर्ल्ड प्रदर्शनीय मॅचमधले लॉर्ड्सवरचे एक्स्क्विसिट क्रिकेट शॉट्स बघा. म्हणजे सचिन १९९८मध्ये काय चीज होता ते अजून लक्षात येईल.

भाग १

भाग २

सुपरमॅक्स फॉर्मॅट आठवतोय का कुणाला? भारत वि न्युझीलँड सामन्यातील सचिनची खेळी.
https://www.youtube.com/watch?v=lwnIuosYGZo

मला आठवतेय त्यानुसार हा फॉर्मॅटला सचिनने पाठिंबा दिला होता.