मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय करावे लागते?

Submitted by सचिन काळे on 25 December, 2016 - 03:30

नमस्कार, मी सचिन काळे. एक नवलेखक! वास्तविक एवढी वर्षे माझा साहित्यलेखनाशी कधी संबंध आला नव्हता. हो! शाळेत बालपणी तेवढे 'मी मोठेपणी शिक्षक/पंतप्रधान/वैज्ञानिक झालो तर!!!' छाप निबंध लिहिल्याचे तेवढे आठवते. आणि त्या निबंधात मी तोडलेले तारे, शिक्षकांच्या डोळ्यांपुढे चमकल्याचे अजूनही आठवते. तसेच, अजून एकदा एका छोकरीला पत्रलेखन करण्याचा माझा प्रयत्न त्या मुलीच्या बापाने हाणून पाडून माझ्यातल्या लेखकाचा/कवीचा अंत केला होता. ज्याचा दुर्दैवी परिणाम एवढे दिवस आपल्यासारख्या साहित्यरसिकांना माझ्याकडून भविष्यात होऊ शकणाऱ्या साहित्यरचनेपासून दूर ठेवण्यात झाला. असो!

तर सांगायचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वर्षांच्या कालखंडानंतर माझ्या साहित्यरचनेच्या प्रसववेदना पुन्हा सुरु झाल्या आहेत. नुकतेच माझ्याकडून प्रसूत झालेले दोन-चार लेख मी माबोकरांसमोर ठेवले. आणि ते आवडल्याचेही आपण प्रतिक्रिया देऊन कळविलेत.

आणि इथेच घात झाला कि हो!!! मला तर आता वाटायला लागलेय कि मी छान छान लेख पाडतोय. मी नवलेखक नाही तर आता लेखकच झालोय. विशेषतः 'श्री. प्रकाश घाटपांडे' यांनी माझ्या 'HORN - (NOT) OK - PLEASE' ह्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हटलेय कि "हा लेख कोणत्या तरी वर्तमानपत्रात छापून यायला हवा" अहो!, आता हीच 'हवा' माझ्या डोक्यात शिरलीय ना!!!

मलाही आता वाटायला लागलेय, कि माझेही लेख वर्तमानपत्रात, मासिकांत छापून यायला हवेत. हजारो नाही, लाखों लोकांनी ते वाचावेत. वेगवेगळ्या साहित्यस्पर्धांत त्या लेखांना प्रथम पारितोषिक मिळावे. एखादा 'बुकर', 'नोबल' नको पण गेलाबाजार राज्यशासनाच्या पुरस्काराकरिता तरी माझ्या लेखांचा विचार व्हावा. माझ्या लेखांनी लोकांचे मतपरिवर्तन व्हावे. जगाला बदलून टाकावे.

पण इथेच तर माझं घोडं पेंढ खातंय ना! आमचा उभा जन्म गेला खालमानेने खर्डेघाशी करण्यात. हे साहित्यविश्व मला नवे आहे. आपले लेखनसाहित्य चार लोकांसमोर कसे आणावे? मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय आणि कसे प्रयत्न करावेत? याची मला काहीच कल्पना नाही. म्हणून मी मायबाप मायबोलीकरांसमोर माझी झोळी पसरून आलोय. कृपया माझ्या झोळीत पुढील माहिती टाकावी.

वर्तमानपत्रांत/मासिकांत/स्पर्धेत आपले लेख कसे छापून आणावेत? त्यांच्याशी संपर्क कसा करावा? त्यांच्या कार्यालयात आपणांस खेटा घालाव्या लागतात का? त्यांच्याशी ओळखी काढाव्या लागतात का? त्यांना आपले लेखनसाहित्य कशा स्वरूपात पाठवावे लागते? लिखित, छापील कि इमेलद्वारे? साहित्य पाठवताना आपण कोणकोणती काळजी घ्यावी? साहित्य छापून आणायच्या व्यवहारात कोणती आणि कशी फसवेगिरी होण्याची शक्यता असते? काही मानधन वगैरे मिळते का? कोणत्या प्रकारे मिळते? कि नुसत्याच लष्करी भाकऱ्या भाजाव्या लागतात?

तूर्त एवढेच प्रश्न मी लिहिलेत. पण मला जसे अजून प्रश्न पडतील तसे मी इथे लिहीन. आणि मला खात्री आहे कि समस्त मायबोलीकर हे प्रश्न सोडवायला मला नक्कीच मदत करतील. हो, ना!!?

ता. क. - सद्या तरी माझ्या साहित्यलेखनाच्या प्रसिद्धीकरीता मी माझा www.sachinkale763.blogspot.com नावाचा एक 'ब्लॉग' चालू केलाय. कृपया, मला जमलाय का ते कळवावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन,
तुमची क्वेरी जेन्युइन असेल असे मानून आणी अनेक मिडियात वाचन करुन निरिक्षणातले उत्तरः

# यु एस पी
मासिकं, मिडीया, पेपर यांना लिखाणात एक यु एस पी लागतो. म्हणजे, तुम्ही असं काय देता जे मिडियाशी त्यांनी बांधलेले रुटिन स्तंभलेखक लिहीत नाहीत्/लिहू शकत नाहीत?
उदा. जकार्ताची सध्या स्थिती
शेतकरी संपः परिस्थित्ती आणि कारणे
मुक्तपीठः तुमच्या लहान पणच्या एखाद्या आगळ्या वेगळ्या साग्र संगीत सणाच्या/त्यातील नैवेद्य आणि कुळाचाराच्या मेमरीज
धक्का क्वोशंटः तुम्ही(नॉट तुम्ही अ‍ॅज पर्सन) काय लिहीताय जे सेन्सिबल, सनसनाटी तरीही अभ्यासपूर्ण आहे?ज्याकडे पब्लिक ची एका क्षणात नजर जाणार आहे?

# पब्लिक/मिडीया रिचः
तुम्ही फेसबुक वर एखादी पोस्ट लिहीली.ती (तुम्ही मुद्दाम म्हणून न पोहचवता) अनेक लोकांपर्यंत पोहचली.त्यावर भरपूर प्रतिक्रिया आल्या.
किंवा तुम्ही ट्विटर वर काही लिहीले जे व्हायरल झाले.
सध्या वृत्तपत्रात लिहीणारे लेखक हे फेसबुक वर सातत्याने लिहीतात.त्यांच्या पोस्ट अनेक अनोळखि लोक वाचतात.शेअर करतात.अश्यांना पेपर्स अप्रोच करतात आणि त्यांच्या परवानगीने लेख प्रसिद्ध करतात.

# सातत्यः
१२ वर्षात एक सुंदर लेख लिहून गायब होण्यापेक्षा सातत्याने थोडे चांगले लेख लिहीणारे मिडिया ला हवे असतात.
उदा. मुक्तपीठावरच्या घैसास बाई.

व्हॉटसप वर लिखाण पसरवण्यात धोका हा की नदीचे मूळ आणि ऋषिचे कूळ या प्रमाणे व्हॉटसप पोस्ट चा उगम कोणाला पक्का माहित नसतो.
तुमचं नाव उडवून स्वतःचं टाकून पोस्ट पुढे जाऊ शकते.उद्या तुम्हाला कोणी 'हे तर व्हॉटसप वर फिरतं, तुम्ही कश्यावरुन कॉपी केलं नाही' विचारु शकतं.

आणि सातत्याने लिहीत रहा! फेसबुक, ब्लॉग वर प्रसिद्ध करत रहा. लिखाण नक्की छापून येईल पेपर मध्ये.
पेपर्स ना पाठवत रहा.

धन्यवाद, mi_anu!! छान मार्गदर्शन केलेत. आपली पोस्ट जपून ठेवतोय. Happy

नुकताच खालील धागा वाचनात आला.

मायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य

https://www.maayboli.com/node/67924

वरील धाग्यावर प्रतिसाद देणाऱ्या आणि दिवाळी अंकात लिहिणाऱ्या लेखकांनी, माझ्या ह्या धाग्याशी संबंधित आपले अनुभव आणि विचार कृपया इथे शेअर करावेत. ज्यायोगे आमच्यासारख्यां नवलेखकांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.

Pages