मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय करावे लागते?

Submitted by सचिन काळे on 25 December, 2016 - 03:30

नमस्कार, मी सचिन काळे. एक नवलेखक! वास्तविक एवढी वर्षे माझा साहित्यलेखनाशी कधी संबंध आला नव्हता. हो! शाळेत बालपणी तेवढे 'मी मोठेपणी शिक्षक/पंतप्रधान/वैज्ञानिक झालो तर!!!' छाप निबंध लिहिल्याचे तेवढे आठवते. आणि त्या निबंधात मी तोडलेले तारे, शिक्षकांच्या डोळ्यांपुढे चमकल्याचे अजूनही आठवते. तसेच, अजून एकदा एका छोकरीला पत्रलेखन करण्याचा माझा प्रयत्न त्या मुलीच्या बापाने हाणून पाडून माझ्यातल्या लेखकाचा/कवीचा अंत केला होता. ज्याचा दुर्दैवी परिणाम एवढे दिवस आपल्यासारख्या साहित्यरसिकांना माझ्याकडून भविष्यात होऊ शकणाऱ्या साहित्यरचनेपासून दूर ठेवण्यात झाला. असो!

तर सांगायचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वर्षांच्या कालखंडानंतर माझ्या साहित्यरचनेच्या प्रसववेदना पुन्हा सुरु झाल्या आहेत. नुकतेच माझ्याकडून प्रसूत झालेले दोन-चार लेख मी माबोकरांसमोर ठेवले. आणि ते आवडल्याचेही आपण प्रतिक्रिया देऊन कळविलेत.

आणि इथेच घात झाला कि हो!!! मला तर आता वाटायला लागलेय कि मी छान छान लेख पाडतोय. मी नवलेखक नाही तर आता लेखकच झालोय. विशेषतः 'श्री. प्रकाश घाटपांडे' यांनी माझ्या 'HORN - (NOT) OK - PLEASE' ह्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हटलेय कि "हा लेख कोणत्या तरी वर्तमानपत्रात छापून यायला हवा" अहो!, आता हीच 'हवा' माझ्या डोक्यात शिरलीय ना!!!

मलाही आता वाटायला लागलेय, कि माझेही लेख वर्तमानपत्रात, मासिकांत छापून यायला हवेत. हजारो नाही, लाखों लोकांनी ते वाचावेत. वेगवेगळ्या साहित्यस्पर्धांत त्या लेखांना प्रथम पारितोषिक मिळावे. एखादा 'बुकर', 'नोबल' नको पण गेलाबाजार राज्यशासनाच्या पुरस्काराकरिता तरी माझ्या लेखांचा विचार व्हावा. माझ्या लेखांनी लोकांचे मतपरिवर्तन व्हावे. जगाला बदलून टाकावे.

पण इथेच तर माझं घोडं पेंढ खातंय ना! आमचा उभा जन्म गेला खालमानेने खर्डेघाशी करण्यात. हे साहित्यविश्व मला नवे आहे. आपले लेखनसाहित्य चार लोकांसमोर कसे आणावे? मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय आणि कसे प्रयत्न करावेत? याची मला काहीच कल्पना नाही. म्हणून मी मायबाप मायबोलीकरांसमोर माझी झोळी पसरून आलोय. कृपया माझ्या झोळीत पुढील माहिती टाकावी.

वर्तमानपत्रांत/मासिकांत/स्पर्धेत आपले लेख कसे छापून आणावेत? त्यांच्याशी संपर्क कसा करावा? त्यांच्या कार्यालयात आपणांस खेटा घालाव्या लागतात का? त्यांच्याशी ओळखी काढाव्या लागतात का? त्यांना आपले लेखनसाहित्य कशा स्वरूपात पाठवावे लागते? लिखित, छापील कि इमेलद्वारे? साहित्य पाठवताना आपण कोणकोणती काळजी घ्यावी? साहित्य छापून आणायच्या व्यवहारात कोणती आणि कशी फसवेगिरी होण्याची शक्यता असते? काही मानधन वगैरे मिळते का? कोणत्या प्रकारे मिळते? कि नुसत्याच लष्करी भाकऱ्या भाजाव्या लागतात?

तूर्त एवढेच प्रश्न मी लिहिलेत. पण मला जसे अजून प्रश्न पडतील तसे मी इथे लिहीन. आणि मला खात्री आहे कि समस्त मायबोलीकर हे प्रश्न सोडवायला मला नक्कीच मदत करतील. हो, ना!!?

ता. क. - सद्या तरी माझ्या साहित्यलेखनाच्या प्रसिद्धीकरीता मी माझा www.sachinkale763.blogspot.com नावाचा एक 'ब्लॉग' चालू केलाय. कृपया, मला जमलाय का ते कळवावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर मागणीप्रमाणे विषयावर हुकमी लिहून दिले, तर मानधन नक्की दिले जाते.
सकाळ बाबत माझा अनुभव असाच आहे.
बाकी विषय तुम्ही त्या त्या क्षेत्रातील लोकांशी किति व कशाप्रकारे संपर्कात रहाता यावर माऊथ पब्लिसिटी होऊन तुमचे लेख आवर्जुन विचारात घेतले जातिल वा नाही हे ठरते.
इथे एक पथ्य पाळावे लागते, ते म्हणजे प्रत्येक वर्तमानपत्र विशिष्ट राजकीय/सामाजिक विचारसरणीला धरुन चालविले जाते, अन नेमके त्या विचारसरणीच्या विरुद्ध बाजुचे तुम्ही आहात् वा नाहीत या पैकी काहिही प्रदर्शित करु नये. तटस्थ कामापुरते रहावे. अन्यथा विरुद्ध असाल, तर खड्यासारखे बाजुला फेकले जाल.
असो.
लेखनास शुभेच्छा.

@ limbutimbu, खरेच! फार मोलाचा सल्ला दिलात आपण. धन्यवाद.

सचिन काळे, माझ्या आवडत्या लोकसत्तेत सर्व प्रकारच्या मतांना स्थान असते हो. बाकीच्या वृत्तपत्रांचं माहीत नाही.

लोकसत्तेसाठी मी नियमित लिहिते. लोकसत्तेत सदरही प्रसिद्ध झालं आहे. पूर्वप्रकाशित ते काहीही प्रकाशित करत नाहीत.

मासिकांना पाठवलंत तर ब्लॉगचा दुवा द्या. ते वाचून त्यांना आवडलं तर पूर्वप्रकाशित असेल तरी घेतात. मानधन हल्ली सर्वजण देतात. तो लेखकाचा हक्क आहे. न दिल्यास तुम्ही विचारायला हवं.

साहित्य पाठवताना rtf आणि pdf प्रत अनेकवेळा वाचून, शुद्धलेखनाच्या चुका सुधारुन पाठवावी.

@ मोहना, माहितीकरिता धन्यवाद!

कृपया, एका शंकेचे निरसन करावे. मासिके तर महिन्याने प्रसिद्ध होतात. मग आपल्याला कसे कळते कि आपला लेख प्रसिद्ध झालाय. ते तसे आपणांस कळवितात कि दर महिन्याला आपल्याला मासिकावर लक्ष ठेवत बसावे लागते.

कोणत्या मासिकाकडे पाठवताय त्यावर अवलंबून आहे. काही कळवतात, काहीवेळेला तुम्हाला चौकशी करावी लागते. काही मासिकात किती दिवसात ’होकारार्थी’ निर्णय असेल तर कळवलं जाईल याचा उल्लेख असतो. जर तेवढ्या दिवसात स्वीकारल्याचं कळलं नाही तर नकार आहे हे समजून जावं.
तुम्ही माझ्या ब्लॉगवर - http://mohanaprabhudesai.blogspot.com/ पहा. मी कोणत्या मासिकात लिहिते ते कळेल आणि त्यापैकी काही ठिकाणी मी जमलं तर मदत करु शकेन तुम्हाला.

ऋन्मेष,
सपनाजी मयेकरांच्या जवळच्या टेबलावर पडलेले वृत्तपत्र का उचलतील? त्या स्वतःही वृत्तपत्र विकत घेऊ शकतीलच की?

कृपया गैरसमज नसावा, पण
‘छापून आणण्याकरिता' मुद्दाम काही खटपट करण्यापेक्षा लेखनाचा अधिकाधिक सराव करा. विविध विषयांवर लिहा. विविध प्रकारांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. लिखाण अधिकाधिक चांगलं, सखोल करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या वर्तमानपत्रांचं, मासिकांचं आपोआप तुमच्या लेखनाकडे लक्ष जाईलच.

अरे वा? मजा मजा आहे की?

दोन अनुभवः

१. सकाळने माझी गझल मागवली. ती दिली. ती छापूनही आली. महाराष्ट्रभरातून फोनावर फोनही आले. गझलस्टार झाल्यासारखे वाटले. मानधनासाठी कॅन्सल्ड चेक मागवला होता त्यांनी! तो पाठवायचा कंटाळा केल्यामुळे गझल धर्मादाय दिली गेली. Proud

२. मायबोलीवरील एका सदस्याने मला एका स्त्रीची मुलाखत घ्यायची विनंती केली. त्या मुलाखतीसोबत माझे नांव छापून येईल असेही सांगितले. मानधन मिळेल असे सांगितले होते की नाही ते आठवत नाही. बहुधा सकाळच्याच पुरवणीत येणार होती मुलाखत छापून! काही दिवसांनी ती मुलाखत छापून आलीही! माझे नांव तर कुठे नव्हतेच. मग काही दिवसांनी त्या मायबोली सदस्याने मला मायबोलीवरचीच माझी एक कविता कुठल्यातरी मासिकात छापली तर चालेल का असे विचारले. (व्हॉट्स अ‍ॅपवर). मी त्याचे उत्तर द्यायच्या आधीच दुसरा मेसेज आला की माझ्या नावासकट छापली जाईल. त्यावर मी एक जोरदार 'फिदी' असा स्मायली उत्तर म्हणून पाठवला व संवाद संपवला.

बाकी माझ्या गझला आणि शेर निनावी फिरवणारे किंवा स्वतःच्या नावाने खपवणारे माझे शत्रू नसून मित्र आहेत असे मानायला शिकलोच आहे. 'गझल परिचय' हा अख्खा लेखच माझ्या नावासकट पण तुकड्यातुकड्यात प्रकाशित करण्याचा एक माहीत झालेला प्रयत्न मी नम्रपणे हाणून पाडला.

तर मासिके, स्पर्धा वगैरेंमधून आपले लेखन छापून कसे आणायचे ह्याचे उत्तर म्हणजे वशिले, संपर्क, जगन्मित्र स्वभाव, उत्तम लेखन वगैरे वगैरे निकषांवर खरे उतरणे! ह्यातील काहीही नीट न जमल्यामुळे माझे लेखन कोठेही छापून येत नाही, त्यामुळे मी हे उपाय खात्रीशीररीत्या सांगू शकतो. Happy

@ ललिता-प्रीति, आपण अगदी योग्य सल्ला दिला आहे. आवडला. Happy

@ बेफिकीर, आपले लेखन छापून कसे आणायचे ह्याचे उत्तर म्हणजे वशिले, संपर्क, जगन्मित्र स्वभाव, उत्तम लेखन वगैरे वगैरे निकषांवर खरे उतरणे! >>> +१

सचिनजी , सिरीयसली

आपले लेख, साहीत्य छापून यावं असं बहुतांश लोकांना वाटतं. अनेकदा आपल्या लिखाणात काही दिवसांनी त्रुटी दिसू लागते. सोशल मीडीयावर येणा-या प्रतिक्रिया हा दर्जाचा निकष असू शकत नाही. वर बेफिकीर म्हणतात तसं वालमित्रांची समृद्धी, तुमचे संबंध हे महत्वाचं ठरतं. काही प्रकाशनं तर निघतातच एखाद्या चमूकडून आणि त्याच चमूचे साहीत्य जास्तीत जास्त जास्त प्रकाशित केले जाते. त्यांचे काही हिशेबही असतात. म्हणजे एक दोन लोक आपल्या कंपूबाहेरचे घ्यायचे. त्यांच्या नावाला एक दोन कविता किंवा ललितं छापायची. पण त्यामुळे त्यांच्याकडे शंभरेक प्रती खपवायला देता येतात. आपलेही साहीत्य छापून यावे म्हणून मग इतर लोक अशांच्या मागे लागतात. काही दिवसांनी ठराविक लोकांना (ते लिहीतात चांगलेच) झुकतं माप दिलं जातं हे लक्षात आलं की मग अशांच्या मागे असणारी संख्या रोडावते. काही काळाने असे प्रकाशन बंद पडते.

वृत्तपत्रात लिखाण छापून येणे म्हणजे पूर्वीसारखे राहीलेले नाही. थोड्याशा ओळखीवर किंवा वालमित्रांचे प्रतिसाद पाहूनही काही उपसंपादक एखादे सदर हल्ली बहाल करतात. एका मित्राने मला तू फक्त कथा, कविता लिही मी छापून आणतो अशी ऑफर दिली होती. जर आपण वृत्तपत्रातल्या लिखाणाबद्दल चिडचिड करत असू तर आपणही त्याचा भाग का व्हावे ? मी नकार दिला. त्यानंतर तेच सदर माझ्या दुस-या मैत्रिणीला मिळाले. तिने मात्र शिळोप्याच्या गप्पा असे स्वरूप देऊन छान मार्ग काढला. या लेखकांकडून पाच हजार जणांपर्यंत लेख पोहोचतो, शिवाय व्हायरल देखील होतो. हा संपादकांचा फायदा असतो.

व्यावसायिक प्रकाशकांना जो दर्जा लागतो, तो समजून घेण्यासाठी आधी आपले वाचन असले पाहीजे. हल्ली वाचन कमी आणि लिखाण जास्त असा प्रकार खूप आढळतो. एक लेख लिहीण्यासाठी शंभर पट वाचन असायला हवे असं माझं मत. त्यानंतर आपल्या लिखाणाचा त्रयस्थ आढावा घेता आला पाहीजे. खटपटी करून छापून आणले गेले आणि ते दर्जेदार नसले तर आपल्यावर तोच शिक्का बसण्याची दाट शक्यता असते. तो पुसून काढणे अवघड होईल.

लोक जेव्हां आपल्या लिखाणाची वाट पाहणे सुरू करतील तेव्हां छापून येण्याबद्दल विचार करायला हरकत नाही.

ललिता-प्रीतीने म्हटल्याप्रमाणे लेखन अधिक चांगलं करा हे अगदी खरं. आणि ते जर झालं तर वशिला, ओळखी ह्याची काही आवश्यकता नसते. तुमचं लेखन चांगलं असेल आणि ते तुम्ही प्रसिद्धीसाठी पाठवलंत, तसंच तुम्ही जे लिहिलं आहे ते संपादकाना आवडलं तर प्रसिद्ध होतं.

<<‘छापून आणण्याकरिता' मुद्दाम काही खटपट करण्यापेक्षा लेखनाचा अधिकाधिक सराव करा. चांगल्या वर्तमानपत्रांचं, मासिकांचं आपोआप तुमच्या लेखनाकडे लक्ष जाईलच >> या संबंधी .

लेखनाचा सराव करा ठीक आहे पण सराव केल्यानंतर चांगल्या वर्तमानपत्रांचं, मासिकांचं आपोआप तुमच्या लेखनाकडे लक्ष जाईलच हे कसं काय ? तुम्ही त्यांना लेखन पाठवलच नाहीत ( ‘छापून आणण्याकरिता ) तर त्यांना आपोआप कसं समजणार तुम्ही चांगले लिहिताय का वाईट लिहिताय ? आणि त्यांचं लक्ष तरी जाणार कसं ?

माझ्या मते त्यांच्या कडे आपण लेखन साहित्य पाठवणे . सतत पाठवणे याला पण स्वतःहून केलेली खटपटच किव्वा मुद्दाम केलेल्या खटपटच म्हणतात ना . ओळखी काढणे- वशिले लावणे या जास्तीच्या खटपटी किव्वा सरळ वाट सोडून वेगळ्या वाटेने केलेल्या खटपटी म्हणूया हवं तर . पण दोन्ही प्रकार ह्या आपलं साहित्य छापून यावं या करता मुद्दामून केलेल्या खटपटीच

त्यांचं लक्ष तरी जाणार कसं ? >>>

सुजा,
आजकाल लेखनाचा सराव करणारा कुणीही ते लेखन केवळ स्वत:जवळच ठेवेल याची शक्यता अगदी कमीच. मराठी वेबसाईट्स, फेसबूक-वॉल इत्यादींचा सरावासाठी वापर केला जातोच. रादर, करावाच. कारण तिथे मिळणार्‍या प्रतिक्रिया, प्रतिसादांनी मिळणारा सुरूवातीचा हुरूप गरजेचाच असतो.
आजकाल अनेक आघाडीची प्रकाशनं, वृत्तपत्रं यांचं अशा ऑनलाईन लेखनाकडे लक्ष असतं. चांगले विषय हाताळणारं चांगलं, सकस लेखन हेरलं जातंच.
आणि आपण कुणालातरी माझं लेखन छापा, छापा म्हणून मागे लागण्यापेक्षा त्यांच्याकडूनच 'तुमचं लेखन छापू का?' किंवा 'तुमचं हे-हे लेखन वाचलं, त्यावरून तुम्ही आमच्यासाठी अमुक-अमुक विषयावर लेखन करू शकाल असं वाटतंय, लिहाल का?' अशी क्वेरी येणं केव्हाही अधिक सुखावह नाही का? Wink

<<मराठी वेबसाईट्स, फेसबूक-वॉल इत्यादींचा सरावासाठी वापर केला जातोच. रादर, करावाच. कारण तिथे मिळणार्‍या प्रतिक्रिया, प्रतिसादांनी मिळणारा सुरूवातीचा हुरूप गरजेचाच असतो.>> एकदम मान्य पण सोशल साईट्स वरच आपलं हे लेखन वाचून "तुम्ही आमच्यासाठी अमुक-अमुक विषयावर लेखन करू शकाल असं वाटतंय, लिहाल का? " हि आणि अशी समोरच्यांकडून विचारणा कितीही सुखावह असली तरी विचारणा होईपर्यंत थांबलात तर कदाचित आयुष्यभर तुम्हाला तुमच लेखन छापून येईपर्यंत थांबावं लागेल . त्याच्या मध्ये नशिबाचा हि भाग येऊ शकतो . त्या ऐवजी जागु यांनी म्हटल्याप्रमाणे "वर्तमान पत्राच्या सदराखाली इमेल अ‍ॅडरेस दिलेले असतात. त्यावर मेल करायचे." हे जास्त सोयीस्कर नाही का ? कदाचित जागु यांचा लेख असाच प्रसिद्ध झाला असेल . माझ्या मते मी प्रतिक्रिया देणं थांबवतेय कारण मतभिन्नता आहे

शेवटचच मला मात्र आधीच्या प्रतिक्रियेमध्ये सांगितल्याप्रमाणे सुमेध वडावाला यांच्या कडून लेखनाबद्दल विचारणा झाली होती ते माझं लेखन वाचूनच पण तो एक नशिबाचा भाग झाला असं मला वाटत कारण माझ्या प्रमाणे लेखन करणारे कित्येक जण असतील पण सगळ्यांनाच समोरून विचारणा होत नसते ना Happy

<े! ह्यातील काहीही नीट न जमल्यामुळे माझे लेखन कोठेही छापून येत नाही, त्यामुळे मी हे उपाय खात्रीशीररीत्या सांगू शकतो. >

बेफिकीर, छंद, श्री आणि सौ, माहेर या मासिकांत तुमचं लेखन छापून आलेलं पाहिलं आहे. आता तुम्हाला हव्या त्या प्रमाणात ते छापून येत नसेल कदाचित. पण "कुठेही छापून येत नाही", असं कसं म्हणता येईल.

मोबाईल नं.लेखाखाली देणे गरजेचेच असते का म्हणजे इमेल दिला तरी .काही वर्तमानपत्राच असं आहे .मी सकाळ वर्तमानपत्राला पोस्टाने लेख पाठवले पण आले नाहीत .पुण्यनगरी तरूणभारत लोकशाही वार्ताला येतात .
मो.नं टाकणे आवश्यक असते का ह्या बद्दल कोणी मला इथे मार्गदर्शन करू शकता का?

होय

@ पवनपरी, सचिन सर लेख प्रकाशित करायला पाठवलात का मग? >>> मला माहित होतं, हा प्रश्न कधीना कधी विचारला जाणार.

मी जरा पूर्वीतिहास सांगतो. मी वर्षभरापूर्वी माबोचा सभासद झाल्यावर माझ्या वयाच्या ५३ व्या वर्षी मी माझे लिखाण चालू केले. दोन शब्द लिहिण्याची माबोकरांनी मला संधी दिली. माबोकरांना माझे लिखाण आवडले. त्यांनी मला पुढे लिहिण्याकरिता प्रोत्साहित केले. त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर वावरण्याची माझी भीती घालवली. माझ्यातील लेखकाला त्यांनी लिहिते केले. याकरिता मी त्यांचा शतशः आभारी आहे.

पण झालं काय की चार महिन्यात मी दोन चार लेख लिहिले. बऱ्याच जणाना ते आवडले. त्यांनी माझी प्रशंसा केली आणि मग मलाही वाटू लागले, की मी कोणी मोठा लेखक झालोय. आपलंही लिखाण छापून यायला हवं. आणि त्यातून जन्माला आला तो वरचा लेख.

पण ललिता प्रीति यांचा वर आलेला एक प्रतिसाद मी खाली पुन्हा देत आहे.

<<<< कृपया गैरसमज नसावा, पण ‘छापून आणण्याकरिता' मुद्दाम काही खटपट करण्यापेक्षा लेखनाचा अधिकाधिक सराव करा. विविध विषयांवर लिहा. विविध प्रकारांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. लिखाण अधिकाधिक चांगलं, सखोल करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या वर्तमानपत्रांचं, मासिकांचं आपोआप तुमच्या लेखनाकडे लक्ष जाईलच. >>>>>

वरील प्रतिसादाने माझे डोळे उघडले. मी उगाच दोन चार लेख लिहून उड्या मारायला लागलो होतो. मी त्यांनी सांगितल्या प्रमाणे वागायचं ठरवलं. वर्तमानपत्र, मासिके वगैरे मध्ये माझं लिखाण छापून आणायचा माझा विचार मी रद्द केला.

गेल्या आठ दहा महिन्यात मी विविध विषयांच्या लेखनाचा सराव करतोय. माबो, मिपा, ऐसी, प्रतिलिपी, व्हाट्सएप, फेसबुक आणि त्यामधील विविध ग्रुप या सर्व ठिकाणी माझे लिखाण प्रसिध्द करतोय. सर्व मिळून अंदाजे ६०-७० हजार लोकांपर्यंत माझे लिखाण पोहोचतंय. त्यांच्याकडून आलेल्या प्रतिसादावरून मी माझ्या पुढील लिखाणाची रूपरेखा ठरवतोय.

तात्पर्य, सध्या अजून माझी विद्यार्थीदशाच चालू आहे. एवढ्यात छापील लिखाण होणे नाही. दिल्ली अभी बहोत दूर है और हमारे पास वक्त भी वैसे बहोत कम बचा है.

@ नानाकळा, तुमचे इतके वय आहे हे तुमचे लेखन बघून वाटत नाही पण.... >>> प्रतिसाद नक्की काय तो समजला नाही. वयाच्या मानाने लेखन बालिश आहे, तरुण की प्रगल्भ!!? Lol

हा हा ... पण नानाकळांना प्लस वन.. लिखाणच काय तर तुमचा फोटो बघूनही ईतके वय वाटत नाही. तरुण वाटता..
सहज बी यांची आठवण झाली.

Pages