आजकाल चित्रपटसंगीताचा दर्जा घसरत चालला आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 December, 2016 - 03:57

मायबोली सभासद गमभन यांना बसमध्ये भेटलेल्या आजोबांनी चालत्या बसमध्येच एक स्फोटक विधान केले, "आजकालच्या लोकांना चांगल्या संगीताची चाड नाही नी यव नी त्यव ..."
आणि ते मलाही पटले.
तसेच मायबोली सभासद रश्मी यांनीही हे उचलून धरल्याने हा विषय वेगळा धाग्यात आणतोय.

माझ्या आईवडिलांच्या पिढीपासून ऐकतोय, काय तुमची ती आजची गाणी. नुसते कानठळ्या बसवणारे संगीत, ना त्या शब्दांना काही अर्थ? काय तर म्हणे तेरी शर्ट भी सेक्सी मेरी पॅण्ट भी सेक्सी..
पण हल्ली मलाही बरेचदा असेच काहीसे म्हणावेसे वाटतंय. अकाली प्रौढत्व तर नाही ना आले मला Wink
पण खरेच, माझ्या लहानपणी जेव्हा आईबाबा आजच्या संगीतावर हल्लाबोल करायचे तेव्हा त्यांना प्रत्युत्तर म्हणून माझ्याकडेही चार चांगली गाणी असायची. पण हल्ली मात्र संगीताचा दर्जा ईतका गंडलाय की चालू वर्षातील सुमधुर श्रवणीय गाणी कोणती हे आठवावी लागतात. तेच गेल्या वर्षातील आठवूनही आठवत नाहीत कारण ती ईतकी अल्पायुषी असतात.

माझ्यामते एखाद्या चांगल्या गाण्यातही मेलोडी जितकी कमी त्याच प्रमाणात त्याचे आयुष्यही कमी होते. आणि मेलोडी तर हल्ली चवीलाही सापडत नाही. यावरून आठवले, काही दिवसांपूर्वी कधी नव्हे ते एक म्युजिक चॅनेल लावून बसलो होतो. माझ्याच्याने ती ट्रेलरमधील तुकड्यातुकड्यात दाखवली जाणारी गाणी बघवत नाही. म्हणून मी जिथे पुर्ण गाणी लागतात असा एखादा कार्यक्रम / चॅनेल लावतो. तर एका चॅनेलवर मेलोडियस सॉंग्ज नावाचा कार्यक्रम चालू होता. टायटल वाचून काहीतरी चांगले दर्जेदार ईथे बघायला मिळेल असे वाटले. पण तिथे चक्क हिमेश रेशमियाने गायलेली, इम्रान हाशमीवर चित्रित झालेली गाणी मेलोडियस गाण्यांच्या सदराखाली खपवत होते. असे वाटले टीव्हीत हात घालून त्या हिमेशची कॉलर धरून त्याला गदागदा हलवत विचारावे, ये मेलोडी ईतनी कर्णकर्कश्य क्यू होती है?

जे संगीताबाबत झालेय तेच गायकांबाबतही झालेय. कोणाचा आवाज हल्ली फारसा आनंद देत नाही. नुसते गायकीसाठी ऐकावे असे काही वाटत नाही. एक त्या सोनू निगम नंतर गायकीतला सूर हरवल्यासारखे वाटते, की हा माझाच भास आणि यालाही जबाबदार दर्जा घसरलेले संगीत आहे? तसे अरिजित सिंग नावाची हल्ली फार चलती आहे. त्यावरून घडलेला एक मागचा किस्सा आठवला,
गर्लफ्रेंडसोबत पिक्चरला गेलो होतो. पिक्चरचे नाव एअरलिफ्ट. गाणे सुरू झाले. चांगले वाटले. मोजून बाराव्या सेकंदाला माझी गर्लफ्रेंड म्हणाली, "हा अरिजित सिंग आहे"
मी म्हणालो, "नाही ग्ग अक्षय कुमार आहे"
"मी सिंगर बद्दल बोलतेय ...."
"बरं मग?"
"मी ओळखते त्याचा आवाज"
"ओके, मग तो प्लेबॅक सिंगर म्हणून फेल आहे. पडद्यावर कोणीही असला तरी हा सेम सेम आवाज देणार. याला काय अर्थ आहे?"
"मग तुझा आतिफ अस्लम दर गाण्याला वेगळा आवाज देतो का?"
"शूऽऽ... पिक्चर बघा रे" .. कोणीतरी मागून ओरडले आणि आमची चर्चा थांबली.

आतिफ मला आवडत असला तरी सूरांबाबत तो नेहमीच कच्चा होता हे मी मान्य करतो. पण एकंदरीतच आजकाल सूरात गाण्याचे महत्वही पहिल्यापेक्षा कमी झालेय असे वाटते.

शब्दांबद्दल विचारायलाच नको. काही सन्माननीय अपवाद वगळता कसेबसे जुळवलेले यमक हेच यशाचे गमक समजून गाणी लिहिली असतात. चालीत भरायचे म्हणून काहीही शब्द घुसडले असतात. एक काव्य म्हणून वाचायला गेल्यास त्यातून काही अर्थ निघत नाही. गुणगुणावीशी वाटावी अश्या गाण्यांची संख्याही यामुळे कमालीची रोडावली आहे. खास गूगाळून शेवटचे लेटेस्ट गाणे मी कधी डाऊनलोड केलेय हे देखील मला आठवत नाहीये.

मुळात हा दर्जा घसरला आहे असे तुम्हालाही खरेच वाटते का? की माझ्याच अपेक्षा जरा जास्त आहेत?
आणि घसरला असल्यास त्यामागची कारणे काय आहेत?
चांगले संगीत हे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर देखील मदत करते असे म्हणतात, पण त्याची गरज आजकालच्या दिग्दर्शकांना वाटत नाही का? चित्रपटात कमीत कमी गाणी ठेवायची, त्यातही एखादे आयटम सॉंगच बनवायचे असा ट्रेंड आजकाल प्रचलित होत आहे. तर संगीतासाठी पुरेसे बजेट ठेवले जात नाहीये का? मोठ्या बॅनरचे चित्रपट देखील हल्ली याबाबत निराशा करू लागले आहेत. एखादा संपुर्ण अल्बम श्रवणीय गाण्यांनी भरलेला असणे हे तर फार दुर्मिळ होऊ लागलेय. गाणी श्रवणीय आहेत की नाही यापेक्षा प्रेक्षणीय आहेत की नाही याचा जास्त विचार होताना दिसतोय. संगीताचे घटलेले बजेट कोरीओग्राफीवर वाढवलेले दिसते. जशी मागणी तसा पुरवठा, तर लोकांचीही मागणी हीच आहे का? माझी तरी नाही ... आपले मत काय आहे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष,

>> संगीताला चित्रपटात दिले जाणारे महत्व कमी झाले असावे.. गाणी काय फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच हवी आहेत, मग ती वर्षानुवर्षे ऐकली जावीत हे कश्याला हवेय

हो. मी तर आजकाल कोण गायक कोण संगीतकार यावर विचारच करत नाही. अनेक बाबतीत मला आजकालचे चित्रपट पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा सरस वाटतात. नवीन विषय आहेत. नवनवीन कल्पना येत आहेत. पूर्वीसारखे फक्त प्यार आणि दिल भोवती फिरत नाहीत. पण गाणी आणि संगीत हा घटक त्यात येत नाही. किंबहुना संगीत हे साईड बाय साईड झाले आहे. आणि गीतकार नावाचे कोणी आजकाल अस्तित्वात असते काय याची सुद्धा मला खात्री नाही.

शाहरूख काजोल जोडीसोबतच मोठी झाले . सुदैवाने कर्णमधुर संगीतच ऐकायला मिळालं.त्यामुळे हल्लीचे संगीत नाही आवडत. कुछ कुछ होता है ची गाणी ही त्या जादूई दिवसांची सोबती असल्याने अजूनही नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. तालची गाणीही खूप आवडतात.

हम दिल दे चुके सनम हा सिनेमा एकवीस वेळा पाहिलाय. गेले ते दिवस !!!

( इस पोस्ट से मेरी उम्र का पता नही चलता है ना ?)

माझ्या आईवडिलांच्या पिढीपासून ऐकतोय, काय तुमची ती आजची गाणी. नुसते कानठळ्या बसवणारे संगीत, ना त्या शब्दांना काही अर्थ? काय तर म्हणे तेरी शर्ट भी सेक्सी मेरी पॅण्ट भी सेक्सी.. >> हे गाणं "आज" चं ? ऋन्मेष चं वय (शारिरीक असो किंवा वैचारिक किंवा मानसिक) आपल्याला वाटते त्यापेक्षा बर्रेच जास्त आहे की! Happy

वाह अमा, धन्यवाद, विसरूनच गेलेलो आज ट्रेलर रिलीज होणार होते. आपली पोस्ट पाहताच पहिला बघून आलो. डायलॉग कचकचीत आहेत. आता काऊंटडाऊन सुरू Happy
लोकहो, अवांतराबद्दल क्षमस्व

भरत, हो, तो फार आचरट संगीताचा काळ होता.
त्या काळात विनोदाच्या नावावर कादर खान, शक्ती कपूर, आचरटपणा करायचे त्याच पठडीतील.. बरीचशी सौथेंडियन छाप जाणवायची..
नदीम श्रवण, जतीन ललित यांनी मात्र चांगले दिवस दाखवलेले.. किंबहुना माझी तुलना आजच्या गाण्यांची आणि यांचीच होती. अगदी ६०-७० च्या काळ माझ्या नजरेसमोर नव्हता..
जो जीता वही सिकंदरमधील रूठ के हम से कही हे जतीननी स्वत: गायलेले गाणे माझ्या ऑलटाईम टॉप फाईव्ह पैकी एक आहे.. जतीन ललित हे नाव घेताच मला पहिला तेच आठवते म्हणून आठवले..

मैत्रेयी, अहो ते माझ्यासाठी आजचे नाही तर आईवडीलांसाठी आजचे. म्हणजे त्या गाण्याच्यावेळी ते माझे जे आजचे वय आहे ते त्यावेळी माझ्या आइवडिलांचे तेव्हाचे वय होते. आता काढा माझे आजचे वय Happy

अतुल हो,
अनेक बाबतीत मला आजकालचे चित्रपट पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा सरस वाटतात. >>> याच्याशी बरेपैकी सहमत. समांतर चित्रपट आणि कमर्शिअल यांच्यातील दरी कमी करायचा प्रयत्न दिसतो. प्रेक्षकांच्या सुजाणपणामुळे बरेपैकी यशस्वीही होतोय.

दक्षिणा आणि अतुल यांचे प्रतिसाद महत्वाचे वाटले..

मला वाटतं- दर्जा हा शब्द एकदा का उच्चारला, की पुढे फार जपून बोलायला हवं. एकतर त्या भल्यामोठ्या स्केलवर 'आपण स्वतः' कुठे आहोत हे आपल्यालाच नीट माहित नसतं. असलंच तरी ते सापेक्ष वगैरे. म्हणजे काय, गंमतच गंमत.

आपल्याकडचं (लोकप्रिय) संगीत प्रामुख्याने चित्रपटांतून आलं. आपल्या सिनेम्यांचा आत्मा हा संगीत आहे इथपासून ते तो आत्मा कथा, पटकथा, दिग्दर्शन, आशय, प्रेझेंटेशन, नॅरेशनची स्टाईल हा आहे- इथपर्यंत गेल्या काही दशकांत आपण प्रवास केला.

मध्यंतरी सारंच 'जागतिक' झालं, आणि मग सारंच हळुहळू का होईना उलटंपालटं झालं. सहा-सहा महिने सिनेमे थेटरात मुक्काम ठोकून असायचे ते पुढल्या शुकीरवारपर्यंत टिकले तरी धन्य- असं गणित तयार झालं. या नव्या गणितात नुकसान काहीच नव्हतं, उलट फायदाच. मल्टिप्लेक्सचा, बदलत्या मानसिकतेचा, दुप्पट चौपट रकमेची तिकिटं काढाय्ला तयार झाल्याचा, कुटुंबाला घेऊन सिनेम्याला जाता येत असल्याचं वातावरण तयार झाल्याचा परिणाम, आणि इतर अनेक फॅक्टर्स..

मग 'म्युझिक रिलीज' चे आयाम बदलले. सीडीज आल्यानंतर लोक गर्दी करून घ्यायचे तिथं सीडीज फुकट वाटायची वेळ आली. इंटर्नेट आणि युट्युबने सार्‍यांची समीकरणं बदलली. सीडीज आणि म्युझिकचे हक्क विकऊन पैसे मिळायचे ते युट्यूब चॅनेलवर गाणे प्रसारित केल्यानंतर मिळणार्या जाहिरातींतून मिळू लागले.

'पहिले पायदान पर है..' वाला सिबाका आणि विविध भारतीचा जमाना केव्हाच जमा झाला. खाजगी रेडिओ चॅनेल्स आले आणि मग त्यासोबत हितसंबंधही. पुढे जे गाणं 'जास्त' वेळा वाजेल ते सुपरहिट असंही समीकरण झालं. अनुरागचा 'देव-डी' रिलेज झाला तेव्हा 'तोबा तेरा जलवा..' हे गाणं जास्त वेळा ऐकू नकोस, नाहीतर त्याच्या प्रेमात पडशील असं इथंच मायबोलीवर एका मित्रानं सांगितलेलं मला. ही बहुतेक सुरूवात होती. तो मित्र द्रष्टा होता. मला हे गाणं खरंच आवडलं. हे गाणं खूप वाजवलं गेलं, हिट झालं. आता हे गाणं क्वचितच कुणाला आठवत असेल. (आता या शेवटच्या लिहिलेल्या पाच वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, म्हणजे बघाच तुम्ही!)

आणखी एक म्हणजे: हे सारं कितीही काहीही झालं, तरी यू ओन्ली गेट व्हाट यू डिझर्व्ह- हे तत्त्व तसंच राहणार ना.

गाण्याशी सिनेम्याचा, कथेचा संबंध असण्याचे दिवस कधीच संपले. लोक आता तर किती जबरी प्रयोग करू लागले आहेत. नुकत्याच बघितलेल्या एका सिनेम्यामध्ये तरी 'दृश्य' आणि 'श्राव्य' या दोघांची संपूर्ण फारकत करून टाकलेली. मला घडीभर अक्षरशः अपंग असल्यागत झाले आणि बावरून गेलो. सवयच नव्हती ना. कान आणि डोळे या दोघांना एकमेकांचे किती गुलाम करून टाकतो आपण..

जुन्या काळीही हजारो बकवास गाणी होती. कथेशी संबंध, प्रेझेंटेशन, लिरिक्स, म्युझिक, आवाज यातल्या बर्याच गोष्टी फार वाईट असायच्या. आताही तसे आहेच. ते जुने विस्मरणात गेले तसे हेही जातीलच. गुणवत्तेचे 'प्रमाण' कमी झाले का, आणि किती, हे फार फार शांतपणे बसून तपासले पाहिजे. त्यानंतरही बहुतेक- सोडा, आपण कोण तपासणारे- असं म्हणावं लागेलच कदाचित.

गाण्याचं काय झालं ते असो, पण गाण्यातला आणि त्या निमित्ताने एकंदरितच आपला सामाजिक आणि कलेक्टिव्ह मेलोड्रामा कमी झाला तर फार बरं होईल. राष्ट्रीय अर्थसंकल्पासारख्या ठिकाणी शेरोशायरी ऐकायची वेळ तरी येणार नाही..

हदिदेचुस मधे शाहरूख - काजोल ? असं का बरं वाटावं ?
मला तर प्रत्येक वेळी सलमान आणि ऐश्वर्याच दिसले पडद्यावर.

सध्या येणार्‍या गाण्यांमधे मेलडीचं (टॉफी नव्हे Proud ) प्रमाण कमी आहे हे मान्य. पण सगळीच गाणी बंडल आहेत असं नाही वाटत. अरिजित कोणे एके काळी बरं गात असेल तरी हल्ली तुफान फ्लॅट गातो असं माझं मत आहे. एकसुरी गाणी वाटतात त्याची ऐकायला. पण तरीही त्याचं 'ऐ दिल है मुश्किल' लक्षात राहिलंय. बहुधा ते त्या गाण्याच्या चालीमुळे/म्युझिकमुळे असावं. येऊ घातलेल्या बेफिक्रे मधलं 'लबों का कारोबार' ऐकायला छान वाटतं. तस्मात दर्जा घसरलाय वगैरे सरसकटीकरण नको.

माझ्या सुदैवाने हम दिल दे चुके आणि देवदास हे पाठोपाठ आले. त्याच सुमारास ताल आलेला. या तिन्हींच्या गाण्यांची जादू अजून मनावर आहे. तसं काही ऐकू येत नाही आता. वेस्टर्न सुरावटींची नक्कल ऐकण्यापेक्षा सरळ ओरिजिनल ऐकलेलं बरं ...

उलट चित्रपटसंगीत गेली काही वर्षे फुल ऑन रिकव्हरी मोड मधे आहे. पंजाबी, उत्तर भारतीय्/हिन्दी बेल्ट मधले, सूफी, उर्दू , काही काही गाण्यांत अगदी मराठी, बंगाली इन्फ्लुएन्स असलेले संगीत आले आहे. गीतलेखनातही सुंदर उदाहरणे आहेत.

फारेण्ड चित्रपटात प्रयोगशीलता वाढतेय, तशी संगीतातही नवनवे प्रयोग होत असतीलच. पण विविधता म्हणजे दर्जा असे तर नाही म्हणू शकत ना..

साजिरा मस्त मस्त प्रतिसाद.
खरंतर तुझा पोस्ट प्रपंच झेपण्याइतकी या धाग्याची झेप (गेला बाजार पोहोच) आहे का? उगिच वाया गेले शब्द मित्रा Proud
मी काय रे संगित प्रेमी त्यामुळे मनातलं लिहून गेले.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना असा अवघड घरचा अभ्यास घालू नै बै.. Proud

बाकी काहीही म्हणा पण नाइंटीजमधल्या इंडीपॉपची सर कशालाच नाही!
काय एकसेएक अल्बम होते!

मला हा लेख आणि प्रतिक्रिया वाचून असे वाटले कि तरुण पिढी, तिशीच्या पार गेली कि प्रत्येक पिढीचे हेच मत होते. >> +१ आजोबा म्हणत सैगलचा देवदास खरा देवदास होता. वडील म्हणतात दिलिपकुमारचा देवदास खरा देवदास होता. ऋ णम्या म्हणतो शाहरुखचाच खरा, त्याची ग.फ्रे. म्हणते अभय देओलचाच बॅड अ‍ॅस होता ह्यातलाच प्रकार हा.

जुन्या गाण्यांमधे टाकाऊ गाणी नव्हती नि पाट्या टाकल्या नव्हत्या हा गैरसमज आहे. लता नि रफिचा डाय हार्ड फॅन असून इथे त्यांची प्रसिद्ध गाणी म्हणून रेडीयोवर जे काही नग्मे शोधून शोधून काढतात ते ऐकल्यावर .....

साजिर्या मस्त लिहिलयस.

असामी >> +१ हेच म्हणतो !

मुकेश , रफी च्या वेळेस सैगल ची गाणी चांगली होती, किशोर च्या वेळेस मुकेश , रफी ची गाणी , सानु, सोनु च्या वेळेस किशोर ची गाणी आणि आता सानु - सोनु ची गाणी चांगली होती अशी रडगाणी सुरूच असतात Lol

म्हणजे या एकाही रडगाण्यात अर्थ नसतो / नव्हता का.. ? आणि तसे असल्यास याचा अर्थ नक्की काय घ्यायचा.

१) प्रत्येक काळातील गाणी ईक्वली गूड म्हणजेच समान दर्ज्याची होती?
२) प्रत्येक काळातील गाणी आधीच्या काळापेक्षा सरस होती?

< , > , = या तीनपैकी काहीतरी चिन्ह वापरावेच लागेल ना Happy

लिरीक्स काय मस्त असतात पुन्हा आजकाल! त्या इर्शाद कामिल ची काही गाणी व इतर काही जाम आवडली. निसर्गातील अनेक गोष्टींच्या उपमा वापरण्यातील नावीन्य खूप छान आहे. नवीन चन्ना मेरिया ची शब्दरचनाही मला खूप आवडली. गाण्यांतून आधी न कानावर पडलेली नवीन कल्पना मिळाली की तो अनुभव जबरी असतो - यात "मेरी यादों का होठोंपे सुवाद रखना' हे मला खूप आवडले. तसेच ते तकिये के नीचे काहीतरी माया रखके चला वगैरे.

तू मेरी आशिकी है, किंवा मेरी दुआओं मे तू, तेरे लिये सजदे करू छाप उसाच्या कांड्या अनेक गीतकार सतत पिळत असतात. त्यातून नवीन काही सापडले की मस्त वाटते. आजकाल नवीन गाण्यांत असे अनेकदा सापडते.

१) प्रत्येक काळातील गाणी ईक्वली गूड म्हणजेच समान दर्ज्याची होती?
२) प्रत्येक काळातील गाणी आधीच्या काळापेक्षा सरस होती?

< , > , = या तीनपैकी काहीतरी चिन्ह वापरावेच लागेल ना

>> तू इंजिनीअर आहेस असे कुठेसे म्हणालास ना मग मग सांग
१. प्रत्येक काळ असे जे लिहिलेयस त्याच्या बाऊंडरीज
२. संगीताचा दर्जा ह्या शब्दाचे quantitative measurement करण्याची पद्धत

ह्याचे कॉमन मापदंड ठरले कि मग तुलना करून कुठले चिन्ह वापरायचे ते ठरवता येईल. Happy

र्म्ड आणि फा ++++१०२४ Happy

>>>शब्दांबद्दल विचारायलाच नको
आजकाल च्या गाण्यांचे शब्द खूपच छान असतात. आताच्या गाण्यांचे शब्द आणि समीर, आनंद बक्षी वगैरे ची गाणी आठवा. सरसकटीकरण नको

थोडेसे वेगळे मत. पूर्वीची गाणी विशेतः ८० पर्यंतची गाणी त्याची मेलेडी वगैरे इंग्लिश आणि बाकीच्यांकडून उचलेली होती. चालती का नाम गाडीताली देखील अनेक गाणी चक्क सचिन देव बर्मन ह्यांनी इंग्लिश गाण्यांवरून ढापलेली आहेत. फक्त आपल्याला माहिती नव्हते. जसा तिकडे धांगडधिंगा चालू झाला तसा आपल्या संगीताचा बाज बदलला. शिवाय एका मर्यादेनंतर कितीही महान संगीतकार असो नाहीतरी गीतकार असो. रोज उठून तो काही नावे चांगले गाणे देवूच शकत नाही. इकडेच सगळी गोम आहे.असो बाकी हल्ली जितका आवाज जास्त तितका चांगला असा काहीसा प्रकार आहे. कधीतरी हेही कमी होईल.

हे घोर जनरलायझेशन आहे. 'मेरे घर आयी एक नन्ही परी', 'सावन का महिना पवन करे सोर', 'जोगी जबसे तू आया मेरे द्वारे' वगैरे अस्सल भारतीय मातीतील गाणी आहेत. ती उचलायची म्हंटली तरी इतरत्र कोठे सापडणार. नौशाद वगैरेंची तर सोडूनच द्या.

इतना ना मुझसे तू प्यार बढा असेल त्या मोझार्टच्या सिंफनी वर. पण त्याच सलील चौधरी चे आजा रे परदेसी, ओ सजना बरखा बहार आयी ही रागदारीवरची गाणी कोठून उचललेली आहेत?

ती एक कोणतीतरी वेबसाइट आहे त्यावर हे आहे, त्यावरून अनेकांनी उत्साहाने सर्व जुने भारतीय चित्रपटसंगीत' डिसमिस' केलेले आहे वगैरे माहीत आहे. पण काही सोडली तर इव्हन त्या उदाहरणांमधे बरीचशी मला "थोडासा त्या चालीचा भास होतो" इतपतच वाटली होती.

फारएण्ड yanchyashi sahmat. purwichya sangitkaranni pardeshatil ganyanwarun chali "uchalalya" ani kewal te aplya lokana kalale nahi asa ghor adanipnacha arop alikdchya kahi warshat kela jaat ahe. yawishyi nantar sawistar lihito.

म्हणजे या एकाही रडगाण्यात अर्थ नसतो / नव्हता का.. ? आणि तसे असल्यास याचा अर्थ नक्की काय घ्यायचा. >>>
याच अर्थ मी तुम्हाला सांगीतला ना ऋन्मेषसर तोच, तुमचे वय झालं आता. चाळीशी नक्की!

भरत. दक्षिणा साजीरा चांगले प्रतिसाद

साजीर्‍या कौल पाहिलास? असशील तर त्या अनुभवावर लिही ना !

१. प्रत्येक काळ असे जे लिहिलेयस त्याच्या बाऊंडरीज
२. संगीताचा दर्जा ह्या शब्दाचे quantitative measurement करण्याची पद्धत

>>>

१. प्रत्येक दशक घ्या.
२. पद्धत आपण स्वत: परीक्षक आहात असे समजून आपल्याला सोयीची ठरवा. पण जर मोजमाप करायला कुठले युनिट हवे असेल तर ते नाही मिळणार. तसेही quantitative measurement करायला युनिट नसते त्यात नंबर लागत नाहीत का? किंवा मार्क्स दिले जात नाहीत का? ईंजिनीअरींगपर्यंत जायची गरज नाही, त्या आधी शाळेतचे एलिमेंटरी ईंटर्मिजिएट या ड्राईंगच्या परीक्षा दिलेल्या. त्यात मला दोन्ही वेळा सी ग्रेड मिळाला होता. तो कोणत्या तरी quantitative measurement ने दिला असेलच ना.. आणि त्यात काही अवघडही नसते. मी स्वतःही ओळखून होतो की माझे ड्रॉईंग सी ग्रेड लायकीचेच आहे Happy

अच्छा म्हणजे तू एलिमेंटरी ईंटरमिजिएट सी ग्रेड ने पास झालास ह्या quantitative measurement वर गाणी ग्रेड करणार तर. चालू दे मग Happy "पद्धत आपण स्वत: परीक्षक आहात " हे चालणार नाही कारण <.< कि = हा प्रश्न तुला आहे.

Pages