आजकाल चित्रपटसंगीताचा दर्जा घसरत चालला आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 December, 2016 - 03:57

मायबोली सभासद गमभन यांना बसमध्ये भेटलेल्या आजोबांनी चालत्या बसमध्येच एक स्फोटक विधान केले, "आजकालच्या लोकांना चांगल्या संगीताची चाड नाही नी यव नी त्यव ..."
आणि ते मलाही पटले.
तसेच मायबोली सभासद रश्मी यांनीही हे उचलून धरल्याने हा विषय वेगळा धाग्यात आणतोय.

माझ्या आईवडिलांच्या पिढीपासून ऐकतोय, काय तुमची ती आजची गाणी. नुसते कानठळ्या बसवणारे संगीत, ना त्या शब्दांना काही अर्थ? काय तर म्हणे तेरी शर्ट भी सेक्सी मेरी पॅण्ट भी सेक्सी..
पण हल्ली मलाही बरेचदा असेच काहीसे म्हणावेसे वाटतंय. अकाली प्रौढत्व तर नाही ना आले मला Wink
पण खरेच, माझ्या लहानपणी जेव्हा आईबाबा आजच्या संगीतावर हल्लाबोल करायचे तेव्हा त्यांना प्रत्युत्तर म्हणून माझ्याकडेही चार चांगली गाणी असायची. पण हल्ली मात्र संगीताचा दर्जा ईतका गंडलाय की चालू वर्षातील सुमधुर श्रवणीय गाणी कोणती हे आठवावी लागतात. तेच गेल्या वर्षातील आठवूनही आठवत नाहीत कारण ती ईतकी अल्पायुषी असतात.

माझ्यामते एखाद्या चांगल्या गाण्यातही मेलोडी जितकी कमी त्याच प्रमाणात त्याचे आयुष्यही कमी होते. आणि मेलोडी तर हल्ली चवीलाही सापडत नाही. यावरून आठवले, काही दिवसांपूर्वी कधी नव्हे ते एक म्युजिक चॅनेल लावून बसलो होतो. माझ्याच्याने ती ट्रेलरमधील तुकड्यातुकड्यात दाखवली जाणारी गाणी बघवत नाही. म्हणून मी जिथे पुर्ण गाणी लागतात असा एखादा कार्यक्रम / चॅनेल लावतो. तर एका चॅनेलवर मेलोडियस सॉंग्ज नावाचा कार्यक्रम चालू होता. टायटल वाचून काहीतरी चांगले दर्जेदार ईथे बघायला मिळेल असे वाटले. पण तिथे चक्क हिमेश रेशमियाने गायलेली, इम्रान हाशमीवर चित्रित झालेली गाणी मेलोडियस गाण्यांच्या सदराखाली खपवत होते. असे वाटले टीव्हीत हात घालून त्या हिमेशची कॉलर धरून त्याला गदागदा हलवत विचारावे, ये मेलोडी ईतनी कर्णकर्कश्य क्यू होती है?

जे संगीताबाबत झालेय तेच गायकांबाबतही झालेय. कोणाचा आवाज हल्ली फारसा आनंद देत नाही. नुसते गायकीसाठी ऐकावे असे काही वाटत नाही. एक त्या सोनू निगम नंतर गायकीतला सूर हरवल्यासारखे वाटते, की हा माझाच भास आणि यालाही जबाबदार दर्जा घसरलेले संगीत आहे? तसे अरिजित सिंग नावाची हल्ली फार चलती आहे. त्यावरून घडलेला एक मागचा किस्सा आठवला,
गर्लफ्रेंडसोबत पिक्चरला गेलो होतो. पिक्चरचे नाव एअरलिफ्ट. गाणे सुरू झाले. चांगले वाटले. मोजून बाराव्या सेकंदाला माझी गर्लफ्रेंड म्हणाली, "हा अरिजित सिंग आहे"
मी म्हणालो, "नाही ग्ग अक्षय कुमार आहे"
"मी सिंगर बद्दल बोलतेय ...."
"बरं मग?"
"मी ओळखते त्याचा आवाज"
"ओके, मग तो प्लेबॅक सिंगर म्हणून फेल आहे. पडद्यावर कोणीही असला तरी हा सेम सेम आवाज देणार. याला काय अर्थ आहे?"
"मग तुझा आतिफ अस्लम दर गाण्याला वेगळा आवाज देतो का?"
"शूऽऽ... पिक्चर बघा रे" .. कोणीतरी मागून ओरडले आणि आमची चर्चा थांबली.

आतिफ मला आवडत असला तरी सूरांबाबत तो नेहमीच कच्चा होता हे मी मान्य करतो. पण एकंदरीतच आजकाल सूरात गाण्याचे महत्वही पहिल्यापेक्षा कमी झालेय असे वाटते.

शब्दांबद्दल विचारायलाच नको. काही सन्माननीय अपवाद वगळता कसेबसे जुळवलेले यमक हेच यशाचे गमक समजून गाणी लिहिली असतात. चालीत भरायचे म्हणून काहीही शब्द घुसडले असतात. एक काव्य म्हणून वाचायला गेल्यास त्यातून काही अर्थ निघत नाही. गुणगुणावीशी वाटावी अश्या गाण्यांची संख्याही यामुळे कमालीची रोडावली आहे. खास गूगाळून शेवटचे लेटेस्ट गाणे मी कधी डाऊनलोड केलेय हे देखील मला आठवत नाहीये.

मुळात हा दर्जा घसरला आहे असे तुम्हालाही खरेच वाटते का? की माझ्याच अपेक्षा जरा जास्त आहेत?
आणि घसरला असल्यास त्यामागची कारणे काय आहेत?
चांगले संगीत हे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर देखील मदत करते असे म्हणतात, पण त्याची गरज आजकालच्या दिग्दर्शकांना वाटत नाही का? चित्रपटात कमीत कमी गाणी ठेवायची, त्यातही एखादे आयटम सॉंगच बनवायचे असा ट्रेंड आजकाल प्रचलित होत आहे. तर संगीतासाठी पुरेसे बजेट ठेवले जात नाहीये का? मोठ्या बॅनरचे चित्रपट देखील हल्ली याबाबत निराशा करू लागले आहेत. एखादा संपुर्ण अल्बम श्रवणीय गाण्यांनी भरलेला असणे हे तर फार दुर्मिळ होऊ लागलेय. गाणी श्रवणीय आहेत की नाही यापेक्षा प्रेक्षणीय आहेत की नाही याचा जास्त विचार होताना दिसतोय. संगीताचे घटलेले बजेट कोरीओग्राफीवर वाढवलेले दिसते. जशी मागणी तसा पुरवठा, तर लोकांचीही मागणी हीच आहे का? माझी तरी नाही ... आपले मत काय आहे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या तरूण पिढीला जर ते अपील होत असेल तर चित्रपट निर्माते त्याच प्रकारच्या संगीताला प्राधान्य देणार.
>>>
अपील होतेय तो संगीताचा प्रकार. पण त्यातही दर्जेदारच हवे आहे जे मिळत नाहीये. मला बदललेल्या संगीताबद्दल किंवा लोकांच्या बदललेल्या आवडीबद्दल नाही तर घसरलेल्या दर्ज्याबद्दल बोलायचे आहे.

माझी भाचेकंपनी आजकालचं संगीत, म्युझिक एन्जॉय करतात. >>> सस्मित, मी नेहमीच लेटेस्ट गाणी ऐकणेच प्रीफर करतो. मलाही आजचेच संगीत आवडते. बालपणीच्या संगीतात रमायची इच्छा नसते कधी. पण आजचेच संगीत दिवसेंदिवस ढिसाळ होत जातेय, सिरीअसली बनवले जात नाहीये असे वाटतेय.

रश्मी, आपण सुचवलेली कव्वाली ऐकतो नंतर, सध्या काही तांत्रिक कारणांनी शक्य नाही Happy

ऋन्म्या, संगीताचा दर्जा घसरलेला आहे हे मान्यच आहे. पण चांगले संगीतकार, गीतकार नसतील तर अजून काय होणार. पुर्वीच्या काळासारखं वादकांचा मेळा जमवून एखादी छान चाल बांधण्यापेक्षा पॉप किंवा रॉकच्या धर्तीवर सिंफोनायजर वर चाल बांधायची आणि मारायची प्रेक्षकांच्या माथी. बरे तीला बाजारात मागणी सुध्दा आहे. मग ऐका लुंगी डांस आणि चार बोटल व्होडका.

ऋ, सहमत थोडेफार.

हल्लीच्या गाण्यात मेलडी अजिबात नसते हे आहेच पण तरीही थोडाकाळ सुश्राव्य वाटतील अशी गाणी आजही बनतात. प्रॉब्लेम हा होतो की तो थोडाकाळ संपला की ती गाणी ऐकावीशी वाटत नाही. आधीची क्रेझ नाहीशी होते.

हे का होते माहिती नाही पण माझे असे निरीक्षण आहे की जुन्या चित्रपटांमध्ये गाणी आणि गाण्यांतले प्रसंग यांचे कनेक्शन असायचे. बहुतेक गाण्यात चित्रपटातली पात्रे ती गाणी गात असायची. अमुक प्रसंग, अमुक गाणे हे रिलेट करता यायचे, त्यामुळं ती गाणी डोक्यात फिट्ट बसायची. म्हणजे दोस्त दोस्त न रहा हे गाणे आठवले कि तो सगळा प्रसंग नजरेसमोर येतो आणि आपण नकळत गाणे गुणगुणायला लागतो. हल्ली बहुतेक गाणी बॅकग्राउंडला असतात आणि पडद्यावर काहीतरी भलतेच सुरु असते. क्वीनमधली सगळी गाणी सुरेख आहेत, मला आवडलेली, आताही आवडतात. पण जेव्हा ती गाणी आता ऐकते तेव्हा काहीच रिलेट करता येत नाही. मुळात कुठले गाणे कधी होते हेही आठवत नाही, अपवाद हंगामा हो गया सोडून, आणि हंगामा त्या प्रसंगाशी रिलेट करता येते म्हणून आठवत राहते. मी गेल्या 6 7 वर्षात पाहिलेल्या चित्रपटातली गाणी, गाणी म्हणून आठवतात पण अमुक तमुक चित्रपटात हे गाणे आहे आणि ते अमुक तमुक ह्या वेळेत आहे हे मला अजिबात सांगता येत नाही. तसे कुठलेही समीकरण डोक्यात फिट्ट झालेले नसतेच मुळात.

आताही बरी गाणी बनतात पण चायनिस माल जसा यूज आणि थ्रो तसेच गाण्यांचे झालेय.

मला त्या लुंगी डान्स आणि चार बाटली वोडकावर पण काही आक्षेप नाही. एक स्वतंत्र गाणे म्हणून त्या ठराविक मूडला या प्रकारचे एखादे जमलेले गाणे आवडतेच.
पण ते मूळातच चित्रपटसंगीत नाहीये. चित्रपट संगीत म्हणजे कथेच्या अनुषंगाने येणारे, चित्रपटातील कॅरेक्टरना घेऊन गुंफलेले, त्या प्रसंगातील भावना दर्शवणारे.. आणि म्हणून त्यातले संगीत भिडते. ते तसे होत नाहीये.

आताही बरी गाणी बनतात पण चायनिस माल जसा यूज आणि थ्रो तसेच गाण्यांचे झालेय.>>>>+१ साधना सही बात!

हल्लीच्या गाण्यात मेलडी अजिबात नसते हे आहेच पण तरीही थोडाकाळ सुश्राव्य वाटतील अशी गाणी आजही बनतात. प्रॉब्लेम हा होतो की तो थोडाकाळ संपला की ती गाणी ऐकावीशी वाटत नाही. आधीची क्रेझ नाहीशी होते.

हे का होते माहिती नाही पण माझे असे निरीक्षण आहे की जुन्या चित्रपटांमध्ये गाणी आणि गाण्यांतले प्रसंग यांचे कनेक्शन असायचे.

>>>>

साधनाजी + ७८६, मी माझी पोस्ट टाकली आणि आता ही आपली वाचली. हे एक कारण मी सुद्धा आताच्या माझ्या वरच्या पोस्टमध्ये तोडक्यामोडक्या भाषेत लिहिलेय.

मला हा लेख आणि प्रतिक्रिया वाचून असे वाटले कि तरुण पिढी, तिशीच्या पार गेली कि प्रत्येक पिढीचे हेच मत होते.

वरती जी गाणी चांगली म्हणून लिहिली आहेत, ती पण माझ्या पिढीला नावडलीच होती आणि माझ्या पिढीला जी गाणी प्रिय होती.. त्याला लोक इवळ म्हणताहेत..

काळ बदलतो आहे, एवढेच.

मला बदललेल्या संगीताबद्दल किंवा लोकांच्या बदललेल्या आवडीबद्दल नाही तर घसरलेल्या दर्ज्याबद्दल बोलायचे आहे.>>>>>> दर्जेदार कलाकार रहिलेच नाहीत तर दर्जेदार निर्मीती कशी होईल???

चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्या पडल्या गाणी विसरली जातात. एक दिवससुद्धा गुणगुणता येत नाहीत Sad

पण ते मूळातच चित्रपटसंगीत नाहीये. चित्रपट संगीत म्हणजे कथेच्या अनुषंगाने येणारे, चित्रपटातील कॅरेक्टरना घेऊन गुंफलेले, त्या प्रसंगातील भावना दर्शवणारे.. आणि म्हणून त्यातले संगीत भिडते. ते तसे होत नाहीये.>>>>> गेल्या अनेक वर्षात मला आवडलेले आणि लक्षात राहिलेले गाणे म्हणजे तलाश चित्रपटातील मुस्काने झुटी हैं (https://www.youtube.com/watch?v=pcwKeyPNgbk) ह्यात तुम्ही म्हणत आहात ते सगळे आले आहे. पण तलाश चित्रपटातील इतर गाणी मात्र माझ्या लक्षात नाहीत

आणि अजून एक मोठा फरक म्हणजे पूर्वीच्या गाण्यात गायक गात असताना वाद्यमेळ कमी असायचा, दोन अंतऱ्यांच्या मध्ये, गाण्याच्या सुरवातीला वगैरे जागी वादक आपली करामत दाखवायचे. तेव्हाचे गाणारे लता, आशा, रफी वगैरे लोक, यांच्या आवाजातच इतका गोडवा होता की अतिशय कमी वाद्यमेळातले गाणेही गोड वाटायचे. आवाजामुळे किती फरक पडतो हे माहित करून घ्यायचे तर मूळ गाण्याचे नंतर केलेले कव्हर वर्शन ऐकायचे. कधीकधी तर अजिबात ऐकवत नाही.

आता गायक गात असताना वाद्यांचा इतका गोंधळ सुरु असतो की गायक काय गातोय हे मोबाईल वर लिरिक्स वाचून कळते. आणि गळ्यात गोडवा असलेले गायक आता फार कमी उरलेत, त्यामुळे वाद्यमेळ नसेल तर सगळेच पितळ उघडे पडेल अशी परिस्थिती. तीच कथा गीताची. ए आर रहमानसारख्याच्या गाण्यातली वाक्ये सगळी एकमेकांत घुसलेली असतात. त्यांना थंड डोक्याने सोडवून अर्थ शोधावा लागतो.

एखादे गाणे कॅसेटवर कितीवेळा ऐकायचो ते आठवा आणि आता online किंवा FM वर कितीवेळा ऐकतो ते आठवा..... कॅसेटवर ऐकलेली टुक्कार गाणी पण अजुन मधल्या म्युझिकपीससकट पाठ आहेत आणि आजजरी ती लागली तरी केवळ ती पाठ असल्यामुळे गुणगुणता येतात आणि उगाच आपली आपली वाटतात
आजकाल ज्या प्रमाणात स्टोरेज कपॅसिटी वाढलीय त्याप्रमाणात गाण्यांची लाइफ नाही वाढली.... बहुतेक गरजेपेक्षा जास्त मिळाले की किंमत रहात नाही तसेच काहीसे!

पण ते मूळातच चित्रपटसंगीत नाहीये. चित्रपट संगीत म्हणजे कथेच्या अनुषंगाने येणारे, चित्रपटातील कॅरेक्टरना घेऊन गुंफलेले, त्या प्रसंगातील भावना दर्शवणारे.. आणि म्हणून त्यातले संगीत भिडते. ते तसे होत नाहीये. >>>>>>>>>

हेच मुळात राहिलेले नाही आता. आशा, लता यांच्या जुन्या मुलाखतीत ऐकलंय कि कोणावर गाणे चित्रित होणार हे माहित करून घेऊन त्या गायच्या. हल्लीच शिल्पा रावची मुलाखत वाचली त्यात ती म्हणत होती की गाणे रेकॉर्ड केले तरी आपलेच गाणे चित्रपटात घेतले जाईल याची काहीही खात्री नसते. अशा वेळी गाणे हे केवळ गाणे राहते. त्याचे चित्रपतसंगीत बनत नाही.

संंगीताचा दर्जा घसरलेला आहे म्हणण्या पेक्षा गाण्याचे शब्द (lyrics ) यांचा दर्जा घसरलेला आहे असे बोलल्यास योग्य वाटेल.

स्वरूप, आपल्या मुद्द्याशी सहमत नाही. लहानपणी ते ज्युनिअर कॉलेजपर्यंत माझ्याजवळ सीडीप्लेअर, मोबाईल, एमपीथ्री, एफ एम वगैरे गाणी ऐकायचे काहीही साधन नव्हते. टीव्हीवर सुद्धा आमच्याकडे चित्रपट, न्यूज, क्रिकेट हेच लागायचे. माझा गाणी ऐकायचा सोर्स फक्त कोण्या तिर्हाईताने त्याच्या आवडीनुसार लावलेली गाणी होती. पण तरीही काही गाणी पहिल्याच ऐकण्यात आवडून लगेच कशी पाठ व्हायची हे एक कोडे वाटायचे. बहुधा ईथेच गाण्यातील मेलोडी आणि त्याचे सुटसुटीत अर्थपुर्ण शब्द काम करत असावेत.

तेच तर ना मित्रा..... तेंव्हा सप्लाय कमी होता..... एक गाणे मनात रेंगाळायला, मुरायला वेळ मिळायचा!
आत्तासारखा भडीमार नव्हता!

नाही ना, उलट मी म्हणतोय सप्लाय कमी असला तरी ती गाणी माझ्यापर्यंत पोहोचायची साधने त्यापेक्षा कमी होती. (हे मी माझ्यापुरते म्हणतोय) ..
कधीतरीच ऐकणे व्हायचे, ते देखील नशिबावर अवलंबून कारण स्वत:च्या मालकीचा सोर्स नाही. पण कधीतरी एखाद दुसरे वेळ ऐकूनही ती मला आवडायची आणि अजून एखाद दुसरे वेळ ऐकताच पाठही व्हायची.

काळ बदलतो आहे त्याच बरोबर रुची आणि दर्जा बदलतो आहे.
पूर्वी कमी चित्रपट बनत, कमी स्पर्धा, कमी गायक. गाणी जी बनवली जायची ती पुन्हा पुन्हा ऐकली जात. त्यामुळे ती दिर्घकाळ स्मरणात रहायची.
आताच्या काळातही चांगली गाणी बनत आहेत्, उलट आता तर स्पर्धा पार जीवघेणी झाली आहे आणि त्यात अनेक नवे नवे गीतकार, संगितकार, गायक असल्याने तु सरस की मी सरस अशी चुरस सुरु आहे, यात श्रवणभक्तांवरही विविध गाण्यांचा भडीमार होत असल्याने हे ऐकू का ते ऐकू होतय. अनेकविध गाणी उपलब्ध असल्याने एखाद गाणं दिर्घकाळ स्मरणात राहिल इतका त्याचा आस्वाद घेतला जात नाही आजकाल, कारण रांगेत पुढे लगेच दुसरं गाणं हजर असतं. त्याहूनही करियर ची एक नवी संधी म्हणून काही अवलिया लोक रिमिक्स नावाचा प्रकार करून मुळ गाण्यात अधिक ठेके आणि ताल भरून ते गाणं अधिकच (अ)श्रवणीय करून टाकतात, त्यामुळे ऐकणार्‍यांची अधिक दमछाक होते.

आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला आमचे वडिल जे ऐकतील तेच कानावर पडायचं.. उदा. शम्मी, रफी, वसंतराव देशपांडे इ. पण आता टिव्ही असतो, बाहेर डिजे किंवा डॉल्बी कोकलत असतो, हातात मोबाईल, त्यातली म्युझिक अ‍ॅप्स, शिवाय म्युझिक चॅनल्स, दर आठवड्याला रिलिज होणारे नवे सिनेमे. त्यांची त्या अगोदरच रिलिज होऊन साईट वर अपलोड केली जाणारी गाणी. इ. उपलब्ध साहित्याची संख्या अमाप असल्याने नक्की कोणतं गाणं श्रवणीय आहे किंवा नाही हे ठरवणं अतिशय अवघड आहे.

वर साती आणि साधना या दोघिंच्याही पोस्टी १००% पटतात.
दर्जा ही एक स्टेट ऑफ माईंड आहे.

आताच्या युगात चांगलं संगित बनत नाही, किंवा दर्जा घसरत चालला आहे असं विधान हे फार मोठं विधान ठरेल, कारण संगित ही कला आहे आणि कला कधीही वाईट, चांगली, हलक्या किंवा जड दर्जाची नसते असं माझं वैयक्तिक मत आहे.
मला हनी सिंग आवडत नाही, पण आज ब्लू है पानी पानी हे गाणं आवडतं, कुणाला आवडत नसेल तर लगेच ते गाणं दर्जाहिन होत नाही. आवड् ही व्यक्ती सापेक्ष आहे.
त्यामुळे प्रत्येक काळात प्रत्येक कलाकार दर्जेदार कलाकृती सादर करण्यासाठी धडपडतो. अगदी नावडती चाल, गीत, चित्रपट बनला असला तरिही त्यात मेहनत ही असतेच. त्यामुळे हे संगित वाईट ते चांगलं असं निदान मी तरी म्हणू शकत नाही.

"आजकाल चित्रपटसंगीताचा दर्जा घसरत चालला आहे" असे मी १९८५ पासून ऐकत आहे.

१९४० ते १९७० हा काळ भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ असे चित्रपट संगीताचे अभ्यासक मानतात. एकाहून एक सरस गीतकार संगीतकार व गायक या काळात उदयास आले. किंबहुना बरेचसे चित्रपट तर केवळ गाण्यांमुळे चालत. संगीत हा चित्रपटांचा आत्मा होता (शंकर जयकिशन हे त्याकाळात सर्वाधिक मानधन घेणारे व लोकप्रियतेचे अत्युच्च शिखर गाठलेले संगीतकार होते. १९६५ च्या दरम्यान एका चित्रपटासाठी त्यांनी तब्बल दहा लाख रुपये मानधन घेतल्याची नोंद आहे. आजच्या काळात ती रक्कम किती होईल ते पहा.)

शंकर-जयकिशन, नौशाद, मदन मोहन, सलील चौधरी, रवी, खय्याम, एस डी बर्मन हे संगीतकार. शैलेन्द्र, हसरत जयपुरी, मजरूह सुलतानपुरी, साहीर लुधियानवी, शकील बदायुनी, इंदीवर, राजेंद्र कृष्ण हे गीतकार. आणि अर्थात लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, मुकेश, मोहम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर हे गायक. हे सगळे दिग्गज त्या काळात होऊन गेले. (अर्थात हि सगळी मला आता जेवढी आठवली ती नावे. यात काही मान्यवर राहूनही गेले असतील). संगीतासाठी हे लोक महिनोन्महिने मेहनत करत. (राज कपूरच्या "आवारा" मधल्या "घर आया मेरा परदेसी" या गाण्याचे केवळ रेकॉर्डिंगच अखंड चोवीस तास सुरु होते. त्याची खूप रंजक गोष्ट मध्यंतरी वाचायला मिळाली होती). पण शैलेंद्र, जयकिशन आणि पुढे रफी व मुकेश यांच्या अकाली झालेल्या मृत्यूमुळे हा कालखंड संपला. (या सगळ्या मान्यवरांचे एकेरी उल्लेख करणे कदाचित अनेकांना खटकेल. पण केवळ संदर्भासाठी म्हणून फक्त नावांचा उल्लेख केला आहे). पण आज पन्नास-साठ वर्षानंतरही त्याकाळात निर्माण झालेली अनेक गाणी ऐकली जात आहेत यातच खूप काही आले.

नंतरच्या काळात या मुशीतून तयार झालेल्या संगीतकारांनी हि परंपरा पुढे सुरु ठेवली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, आरडी बर्मन, गुलजार, आनंद बक्षी, सुरेश वाडकर, येसुदास, अनुराधा पौडवाल इत्यादी नावे उदयास आली.

पण नंतरच्या काळात संगीत बदलले. कारण काळच बदलला. लोकांची अभिरुची बदलली. माना डोलायला लावणारे संगीत मागे पडले. अंग आणि कंबर हलवायला लावणाऱ्या संगीताने कुरघोडी केली. १९९० नंतर आलेल्या रोजा ने पुन्हा चित्रपट संगीताने बाळसे धरले. ए.आर. रहमान छा गये. सर्वात लोकप्रिय संगीतकार झाले. पण तरीही सुवर्णकाळाइतकी सर नंतर कधीच आली नाही. डिजिटलच्या प्रमाणापेक्षा जास्त झालेल्या शिरकावामुळे संगीताचा आत्मा लुप्त होत चाललाय (अर्थात हे माझे वैयक्तिक मत).

याचा अर्थ आजकालचे गायक संगीतकार मेहनत घेत नाहीत असे मुळीच नाही. अनेक गाणी आजकाल सुद्धा खूप चांगली येत आहेत. पण प्रमाण कमी आहे. पाच वर्षे, दहा वर्षे टिकणारी गाणी निर्माण होतात का हा प्रश्न आहे. पन्नास वर्षे टिकणारी गाणी निर्माण करण्याविषयी तर कोणी विचारही करत नसेल. चुभूदेघे.

अतुल पाटिल छान पोस्ट. क्विक चा जमाना आहे, त्यामुळे क्विक गीत, क्विक संगित, क्विक्ली ऐका आणि क्विकली विसरून जा... Proud

शेवट च्या ३ ओळी वाचून तर अगदी अगदी झालं.
अर्थात आज आपण जी लता रफी ची ४० - ५० च्या दशकातली गाणी ऐकतो तेव्हा त्या संगितकारांना किंवा गायकांना तरी कुठं माहित होतं की ही गाणी अगदी ६० वर्षा नंतर सुद्धा तितक्याच आवडीने ऐकली जातील? त्यांनी आपलं तन मन धन ओतून लोकांना अवीट गोडीची गाणी देऊन त्यांचं आयुष्य समृद्ध केलं आणि स्वतःच्या आयुष्या चं सार्थक. आता लोक नाव, पैसा आणि प्रसिद्धीलोलुप असल्याने जितका पैसा तसा दर्जा असं गणित झाल्याचं ही दिसून येतं. त्यामुळे ही कमी काळ स्मरणात राहणारी गाणी येत आहेत.

रफि साहेबांनी बहुधा राकेश रोशन च्या पहिल्या (त्याने दिग्दर्शन केलेल्या) चित्रपटासाठी १ रुपया इतकंच मानधन घेतलं होतं. तपशील चुकले असतील, पण पुर्वी कलेला एक आदर होता आज लोक पैसे मिळवण्याचं एक साधन म्हणून त्याकडे पाहतात याचं शल्य आहे. तरिही काही उत्तम गायक, आणि संगित कार ही कला जिवंत ठेवतील याची आशा पण वाटते आहे एकिकडे.

रात सर्द सर्द है, चांद जर्द जर्द है
मेरे दिल में प्यार का हल्का हलका दर्द है.... (जाली नोट)

आणि

साथी ना कोई मंझिल दिया है न कोई साहिल
चला मुझे लेकर ऐ दिल अकेला कहा (बम्बई का बाबू)

ही दोन गाणी मी माझ्या उभ्या हयातील पहिल्यांदा जेव्हा ऐकली तेव्हाच मी मन्त्रमुग्ध होऊन गेले. लगेच आपल्या साठ्यात ही गाणी वाढ वून घेतली.

तुम्ही ऐकली नसतील तर नक्की ऐका... कदाचित आव्ड्तील

माझ्या लहानपणी काय एकेक चित्रपट असायचे.
हवस का पुजारी, रेश्मा की जवानी, लुट गयी जवानी , रात की रानी. आताच्या सिनेमात दम नसतो.

कारण संगित ही कला आहे आणि कला कधीही वाईट, चांगली, हलक्या किंवा जड दर्जाची नसते असं माझं वैयक्तिक मत आहे.
>>>
कला नाही दक्षिणाजी, कलाकृतीच्या दर्जाबद्दल बोलतोय आपण. तो चांगला वाईट असणारच ना.
कला शब्द वापरल्याने ते सेंटी वाक्य झालेय Happy

डिजिटलच्या प्रमाणापेक्षा जास्त झालेल्या शिरकावामुळे संगीताचा आत्मा लुप्त होत चाललाय (अर्थात हे माझे वैयक्तिक मत).
>>>
हो, हे असे मलाही बरेचदा वाटते.
तसेच रेहमानसाहेबांनीच बहुधा भरमसाठ वाद्ये आणि तंत्रज्ञान संगीतात यशस्वीपणे आणायला सुरुवात केली असावी. पण त्यांचा दर्जाही तसाच वरचा होता. शेवटी ते वापरण्याचीही अक्कल / जाण असावी लागतेच. दिल है छोटासा छोटीशी आशा या गाण्यातील मधुरता हजारो वाद्यांनी आलेली नसते. म्हणून आजही ते टवटवीत वाटते.

अतुलजी, छान पोस्ट.
ती मेहनत त्या प्रमाणात आज होत नसावी, किंवा संगीताला चित्रपटात दिले जाणारे महत्व कमी झाले असावे.. गाणी काय फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच हवी आहेत, मग ती वर्षानुवर्षे ऐकली जावीत हे कश्याला हवेय, लोकांच्या डोक्यावर आदळून कामचलाऊ हिट होणार्‍या कॅटेगरीतील असली तरी पुरेसे आहे..
अर्थात हा आपला अंदाजच, कारण मी फिल्म ईंडस्ट्रीमध्ये कामाला नाहीये.

माझी टीनेज वर्षं हिंदी चित्रपटसंगीताची आणि संगीताची सगळ्यात वाईट्ट वर्षं होती.

ही गाणी ऐका.
तोफा तोफा तोफा लाया लाया लाया
झ झ झ झोपडी में च च च चारपाई मानुस बिना रोती पडी

अ‍ॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा
दे दे प्यार दे
ओ मीना आ गया तेरा दीवाना

यातली बहुतेक गाणी आशा आणि किशोरनी गायलीत. म्हणजे बाकीचे गायक काय दर्जाची गाणी म्हणत असतील कल्पना करा..

तर हा काळ हिंदी चित्रपटसंगीत रसातळाला गेल्याचा काळ असं खात्रीने म्हणू शकतो. त्यानंतर अगदी नदीम श्रवण, जतिन ललितचे, रामलक्ष्मण यांची बोटं धरून का होईना हिंदी चित्रपटसंगीत हळू हळू वर आलं.

सध्याच्या हिंदी चित्रपटसंगीत , त्या काळच्या संगीतापेक्षा नक्कीच खूपच चांगलं आहे. त्याबद्दल माझी तक्रार एवढीच आहे की अनेकदा शब्दच कळत नाही आणि शब्दाशिवायचं संगीत काही माझ्या मेंदूपर्यंत पोचत नाही.

मराठी चित्रपटसंगीताचा ग्राफ या काळात उताराचाच पण जरा कमी तीव्रतेच्या उताराचा होता. तो नव्वदीत रसातळाला गेला असणार. अजिबात काही आठवत नाहीए, त्या काळातलं.

दक्षिणा धन्यवाद Happy

>> ही दोन गाणी मी माझ्या उभ्या हयातील पहिल्यांदा जेव्हा ऐकली तेव्हाच मी मन्त्रमुग्ध होऊन गेले.

तुम्ही रफी साहेबांचा आवाज कधी थीएटरमध्ये ऐकला आहात का? दोनचार वर्षांपूर्वी "हम दोनो" कलर मध्ये रिलीज झाला होता तेंव्हा मला ती संधी मिळाली. रफी साहेबांचा आवाज थीएटरमध्ये ऐकणे म्हणजे "भारावून जाणे" म्हणजे काय याचा अनुभव आहे. तो अनुभव केवळ अप्रतिम.

>> क्विक चा जमाना आहे, त्यामुळे क्विक गीत, क्विक संगित, क्विक्ली ऐका आणि क्विकली विसरून जा...

हो, फास्टफूड चा काळ आहे. Lol

>> आता लोक नाव, पैसा आणि प्रसिद्धीलोलुप असल्याने जितका पैसा तसा दर्जा असं गणित झाल्याचं ही दिसून येतं.

अगदी बरोबर. व्यावसायिकरण झाल्याचा परिणाम. बाकी काही नाही. लक्ष्मीकांत-प्यारलेला यांच्या काळातच हि सुरवात झाली होती. एका मुलाखतीत लक्ष्मीकांत म्हणाले होते "आजकाल निर्माते येतात आणि म्हणतात, लक्ष्मीजी कुछ भी करो लेकीन गाना पापुलर होना चाहीये बस्स"

म्हणजे काय, तर शेवटी रसिकच चित्रपट संगीताचा दर्जा ठरवतात Happy

हो आणी असले तद्दन गल्लाभरु संगीत असलेले चित्रपट आम्ही गर्दीत तिकीट काढुन पाहीलेत.:अरेरे: या बरोबर पाताल भैरवी जादूचा म्हणून पहायला गेलो आणी पचका झाला. माझा मामेभाऊ मला आणी मामेबहिणीला पडोसन पहा म्हणत होता , तर त्याला आम्ही जबरदस्तीने मकसद सिनेमा पहायला नेला, त्याने आम्हा दोघीना बदडायचे बाकी ठेवले होते. कारण आम्ही दोघी एका वयाच्या तर भाऊ आमच्यापेक्षा १० वर्षाने मोठा होता.

हे असं अमुक काळात वाईट अमुक काळात चांगलं असं नाही वाटत मला तरी. हा 60 चा काळ गोल्डन आहे हे मान्य पण त्या तोडीची गीतं आजही येतात.
आपण एका साच्यात अडकून राहिल्याने बऱ्याचदा नव्याशी जुळवून घ्यायला जे श्रम हवेत ते घेत नाही इतकंच.
एक दुसरी टेक्निकल गोष्ट मला जाणवते ती संगीत पद्धतीत बदललेल्या गोष्टींची. प्रत्यक्ष कॉन्सर्ट किंवा लाईव्ह गाणी ऐकताना काहीवेळा चक्क डोळ्यांत पाणी येतं मात्र तीच गाणी चकचकीत करून समोर ठाकतात तेव्हा त्यात काहीतरी हरवलेलं जाणवतं. उदाहरण हवंच असेल तर कोक स्टुडिओची गाणी ज्यात प्रत्यक्ष संगीत, गायकी सगळ्याचा एकत्र मिलाफ असतो याउलट नव्या पद्धतीत संगीत वेगळे रेकॉर्ड केले जाते गाणे वेगळे. अर्थात हा चवीचा प्रश्न असावा. टेस्ट आपापली!

Pages