उतारा (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 21 October, 2016 - 02:40

"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले"

प्रकाश परत तेच म्हणत होता.

"अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले.

"सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला.

सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता.

आम्ही दोन दिवस फार्महाउस वर नव्हतो, तेव्हाच दागिने गायब झाले होते. कपाटात दागिन्यांचा डबा नाही ही गोष्ट ज्योतीच्या लक्षात आली. आमच्या लग्नात ज्योतीच्या आजीनेच तो डबा ज्योतीला दिला होता. ज्योती कधीतरीच तो डबा उघडायची. तो डबा कुठे ठेवला आहे हे मला माहीत नव्हते आणि मी ही कधी विचारले नाही.

पण त्या दिवशी आम्ही दोघ घरी आलो, ज्योती ने कपाट उघडले, खूप शोधा, शोध केली, पण तिला डबा सापडला नाही पण बाकीचे काही चोरीला गेले नव्हते.

मी लगेच प्रकाशला फोन केला, प्रकाश माझ्या फार्म हाऊसचा केअर टेकर होता. फार्म हाऊसच्या जवळ राहायचा.मी प्रकाशला सरळ विचारले, पण तो सूर्यावरच आरोप करत होता, शेवटी मी पोलिसांकडे जायचा निर्णय घेतला.

"सर, पोलिसात जाऊ नका" प्रकाश कळवळून म्हटला.
"अरे मग दागिने कसे मिळणार?" मी विचारले.

ज्योती रडत होती, मला तिच्या रडण्याचा कंटाळा आला होता, पण तसे तिला सांगता ही येत नव्हते. माझा व्यवसाय ही चांगला चालू होता. कष्टांना यश मिळाले होते. मी कामातून सुट्टी घेतली होती. या सुट्टीत मला फार्महाउस वर येऊन आराम करायचा होता, पण आता अराम होईल असे काही वाटत नव्हते.

"सूर्यकांतनेच दागिने चोरले आहेत" प्रकाश एकदम म्हटला.

मी शांत पणे उठलो, बाहेर जायला लागलो, तेवढ्यात प्रकाश खालच्या आवाजात म्हणाला "मला त्यानेच सांगितले"
"अरे पण तो तुला का सांगेन?" मला आश्चर्य वाटले.
"कारण त्यानेच मला कपाटाची डुप्लिकेट चावी बनवायला सांगितली होती"
मला यातले काही खरे वाटत नव्हते.

"मी त्याला समजावले पण तो मला बळजबरीने उताऱ्याला घेऊन गेला" प्रकाश एका दमात बोलून गेला.

ज्योती ने चमकून त्याचाकडे बघितले.
"उतारा? काय?" मी विचारले.

"सर, गावात एक उतारा आहे तिथे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते."

मी हसलो. "ए बाबा, काय पण नको सांगू, जा सूर्यकांतला शोधून आण"
"माझा ही त्यावर विश्वास नव्हता, सूर्यकांतच घेऊन गेला होता" प्रकाश म्हटला.
"तिकडे काय आहे" मला आता याचा कंटाळा आला होता.
"सर, एक जागा आहे त्याला वरदान मिळाले आहे"
"जागेला वरदान? बेस्ट!" मी कुत्सित पणे विचारले.
"तिथे जायचे, तिथे एक खुर्ची आहे, त्या खुर्चीत बसून आपल्या मनातला प्रश्न विचारायचा आणि वाट बघायची"
"आणि मग उत्तर मिळते? चांगली आयडिया आहे"
प्रकाशने होकार अर्थी मान डोलावली.

"पण मग दागिने कुठे आहेत हे कळेल का?" मी विचारले.
"नाही सर, असे नाही विचारता येत, असा प्रश्न विचारायचा ज्याचे उत्तर हो किंवा नाही असेल"
"पण मग तुम्ही काय विचारले?" मी कुतूहलाने विचारले.

"आम्ही दोघे ही गेलो होतो, माझे पैसे ही सूर्यकांत ने भरले होते"
"किती पैसे? कोणाला द्यायचे?" मला आता बरेच प्रश्न पडत होते.
"पाचशे रुपये एका प्रश्नाचे"
"मी आत जाऊन तीन ते चार प्रश्न विचारेन, मग?" मी लगेच प्रकाशला प्रश्न केला.
"नाही सर, एवढा वेळ नाही मिळत. पाच मिनिटच्या आत बाहेर यावे लागते"
"ही आयडिया कोणाची?"
"उतारकरच्या मालकीची जागा आहे, तो तिथेच असतो, त्यालाच पैसे द्यायचे"

"अरे यार, तुम्ही वेडे आहेत, कोणीही भोंदू येतो आणि तुम्हाला वेड्यात काढतो" मला या सगळ्याचा वैताग आला होता. ज्योतीचे रडणे ही अजून थांबले नव्हते. आपण काहीतरी करायला पाहिजे नाहीतर ही बाई नंतर आपले डोके खाईल याची मला पूर्ण कल्पना आली होती.

"मी फक्त काय असते ते बघायला गेलो होतो" सूर्यकांत चेहरा ही रडवलेला झाला होता.
"तिकडे जाऊन काय केले" मी विचारले.
"आम्ही दोघांनी एकच प्रश्न विचारला" प्रकाश थोडा घाबरत म्हणाला.
"कुठला प्रश्न?" मला त्याच्या घाबरण्याचे हसू आले.
"प्रश्न विचारला की, मी दागिन्यांची चोरी करू का?"
मला आता काही कळत नव्हते, "तुम्ही एकत्र प्रश्न विचारला? "

"एकत्र नाही, पहिल्यांदा सूर्या आतमध्ये गेला, तो बाहेर आला आणि मग मी आत मध्ये गेलो आणि तोच प्रश्न विचारला" प्रकाश म्हटला.

मला उभ राहण्याचा कंटाळा आला होता, मी सोफ्या जाऊन बसलो, प्रकाश जे काही बोलत होता त्यावर विचार केला आणि माझ्या मनात एक शंका आली.

"मग तुला काय उत्तर मिळाले" मी अजूनही विचारांच्या तंद्रीत होतो.

"मला नाही असेच उत्तर आले आणि..."
"आणि सूर्याला हो असे उत्तर मिळाले असणार?" मी प्रकाशचे वाक्य पूर्ण केले.
प्रकाश फक्त मान डोलावली.

मला हे सगळे विनोदी वाटत होते, " अरे, तुला काय माहीत त्याला 'हो' असे उत्तर मिळाले? त्याला 'नाही' असे उत्तर मिळाले असेल, तुझ्याशी तो खोटे बोलला असेल." मी ज्योती कडे बघत बोललो, तिचे रडणे थांबले होते, तिला ही या सगळ्याचे हसू येत होते.
यावर प्रकाशकडे काही उत्तर नव्हते, त्याला माझा मुद्दा पटला होता.

"ते असेल का आता उघडे?" मी प्रकाश ला विचारले.
आता? माहीत नाही, आता नसेल उघड" प्रकाशला तिकडे परत जायचे नव्हते.
"चल, जाऊन बघू, सूर्याला पण शोधू" मी ज्योतीला फार्महाउस वर थांबायला सांगितले. मी प्रकाशला घेऊन उताऱ्याकडे निघालो.

माझा अंदाज होता की उताऱ्याला कोणीही नसेल, पण तिथे दहा ते बारा लोंकाची रांग होती. एक वडाचे झाड होते, त्या खालीच एक जीर्ण, पडके घर होते, त्या पडक्या घरातच नव्याने बांधलेली एक खोली होती. खोलीच्या भिंतीवर उतारकर महाराजांचे एक मोठे चित्र होते, ते डोळे मिटून एका हाताने आशीर्वाद देत होते. प्रत्येक जण त्यांना नमस्कार करून आत जात होता. आत जाताना मोबाईल, चपला बाहेर काढत होता. मला काही ओळखीचे चेहरे ही दिसले. आम्ही रांगेच्या शेवटी जाऊन उभे राहीलो.

दोन मिनिटानंतर एक बाई रडत बाहेर आली, तिला बघून मला ज्योतीची आठवण झाली, ती सुद्धा इथे येऊन रडली असती.

रांगेतल्या पहिल्या माणसाने पाचशेची नोट तिथेच बसलेल्या माणसाकडे दिली, त्याची परत पावतीही घेतली. मला या सगळ्याचे आश्चर्य वाटत होते.

"आत काय आहे" मी प्रकाश ला विचारले.

"आत एक खुर्ची आहे, त्यावर बसून प्रश्न विचारायचा" प्रकाश ने खालच्या आवाजात सांगितले.

"उभा राहून प्रश्न नाही विचारता येत का" माझ्या या विनोदावर मी एकटाच हसलो. बाकीचे लोक माझ्या कडे बघायला लागले.

"मी काय विचारू" मी प्रकाश ला विचारले.
"सूर्याने दागिने चोरले आहेत का? असे विचारा" प्रकाश आत्मविश्वासाने म्हणाला.
प्रकाशचा प्रश्न मला पटला. तो पर्यंत आमचा नंबर आला होता.

"सर, तुमची हरकत नसेल तर मी पण एक प्रश्न विचारू" प्रकाश दीनवाण्या चेहऱ्याने म्हटला.
मी हसलो, "थांब आधी मी जाऊन येतो" मी ते लोखंडाचे दार उघडून आत गेलो.

खोली खूपच छोटी होती, अंधुक होती, नीट उभे ही राहता येत नव्हते, उंची जेमतेम सहा- सात फुटाची असेल खोलीच्या मधोमध एक अस्पष्ट अशी खुर्ची दिसली, मी खुर्चीत बसलो आणि प्रश्न विचारला.

"ज्योतीकडे दागिन्यांचा डबा खरच होता का?"

मी तो दागिन्यांचा डबा कधीच बघितला नव्हता, त्यात किती दागिने आहेत हे ही मला माहीत नव्हते. माझ्या आईने दिलेले दागिने मला माहीत होते, पण मग हिच्या आजीने दिलेले दागिने मी कधीच बघितले नव्हते.
मी प्रश्न विचारून दोन-तीन मिनटे तसाच बसून राहीलो, उत्तर कसे मिळते हे मला माहीत नव्हते. मी परत प्रश्न विचारला.

"दागिन्यांचा डबा होता का?"

काही उत्तर आले नाही. या अंधुक, दमट खोलीत अजून बसवत नव्हते. मी उठलो, जायला लागलो.

"दागिन्यांचा डबा कधीच नव्हता"

अचानक माझ्या मनात हे वाक्य आले, मी दचकलो, हा भास आहे का? असे परत वाटले. मी तसाच उभा राहिलो, त्या वाक्याची वाट बघत.

"दागिन्यांचा डबा कधीच नव्हता"

परत तेच वाक्य, तेच शब्द, त्याच गतीने मनात आले, मला ते जाणवले, हा भास नव्हता.हे खरे होते, उताऱ्याने उत्तर दिले होते. मी पुन्हा एकदा हसलो.

ती ने असे का केले, ती का खोटे बोलली? कदाचित तिचे कारण शुल्लक असेल अथवा मोठे ही असेल. पण मला ते परत कधी कळणार नव्हते.

मला पुढे काय घडणार याचा अंदाज आला होता, हा सगळा डाव ज्योतीचा असणार आणि सूर्यकांत, प्रकाश ने तिला यात साथ दिली असणार, मी पूर्णपणे फसलो होतो. मी परत स्वतःशीच हसलो. माझ्या सारख्या हुशार माणसाला फसवण्यासाठी एवढी मोठी योजना कोणी करेल असे कधी वाटले नव्हते पण ज्योतीला हे सहज जमले होते. उतारकार नावाचे कोणी महाराज आहे की ही नाही हे ही मला कधी कळणार नव्हते.

एकांदरीत या कटात किती लोक सामील असावीत असा मी विचार केला, पण आता त्याचा काय उपयोग? मी पद्धशीरपणे आत इथे अडकून मरणार होतो.

किती दिवस झाले असतील माहित नाही, वेळेचा काय थांगपत्ता नाही, पण ते दार कधी परत उघडले गेले नाही, दार वाजवले, हाका मारल्या आणि अजूनही हाका मारतोय पण ते दार परत कधीच उघडले गेले नाही.

आज बऱ्याच दिवसांनी मनात विचार आला, मी परत कसाबसा खुर्चीत बसलो आणि प्रश्न विचारला.

"मी इथून कधी बाहेर पडणार आहे का"

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण नाही समजली.

तो प्रश्न विचारायला जायच्या आधी एक बाई प्रश्न विचारुन बाहेर येते. मग तो का आत अड्कला आहे.?

मला वाटतय की आत जाणारा माणुस कुठेतरी अडकतो आणि बाहेर येणारा त्या माणसाचं रुप घेतलेला कोनी वेगळाच असेल.
पण तरी काही कळलं नाही.

मालकाला कोंडायचा प्लॅन केला असतो.>>>>>>>>>>>का? आणि ते कळत नाहीये कुठेच.
आणि कोंडल होतं तर एवढी माणसं जी रांग लावुन होती त्यांचं काय?

मला वाटतय की आत जाणारा माणुस कुठेतरी अडकतो आणि बाहेर येणारा त्या माणसाचं रुप घेतलेला कोनी वेगळाच असेल.>>>>> ही एक शक्यता छान होती.

@अनिल रामचंद्र

मालकाला कोंडण्याचा डाव ज्योतीचा असतो, सूर्यकांत, प्रकाश, आणि उतारकार महाराज ( असे कोणी असेल तर ) आणि रांगेत उभे असलेल्या सर्वानी तिला मदत केली आहे.

ज्योतीने असे का केले, याची कारणे बरीच असू शकतात, कारण शुल्लक अथवा खूप मोठे ही असू शकते आणि मला ते महत्वाचे वाटत नाही. तिने हे सगळे कसे केले हे मला महत्त्वाचे वाटते.

@सस्मित @स्मिता श्रीपाद @चैत्राली उदेग

मालकाला कोंडण्याचा डाव ज्योतीचा असतो, सूर्यकांत, प्रकाश, आणि उतारकार महाराज ( असे कोणी असेल तर ) आणि रांगेत उभे असलेल्या सर्वानी तिला मदत केली आहे. यात बरीच लोक सहभागी आहेत. एका श्रीमंत, हुशार माणसाला फसवायचं तर एवढे नियोजन करणे भाग आहे. त्या खोलीत मालक बरेच दिवस अडकलेला आहे आणि आता तो लवकरच मरणार आहे.

हा शेवट कथा लिहताना माझ्या डोक्यात होता Happy

मालक, मरतो?, का कोणी त्याला वाचवत? ज्योती बाकीच्या लोंकाना काय सांगते? तिचा हा डाव फसतो का? ही सगळी घटना पोलिसांना कळते का? या सर्वांवर अजून एक कथा होऊ शकते.>>> मग लिहा

मला खरतर काही टीका वगैरे करायची नाहीये पण अगदी रहावले नाही म्ह्णुन....
तुमच्या बर्याच कथा अशा तर्कांवर आधारीत असतात असे मला वाटते म्हणुन तुमच्या कथांचा शेवट म्हणावा तसा enjoy नाही करु शकत

आवडली कथा आणि सांगण्याची शैली.
शेवट नक्की काय किंवा तुम्हाला अपेक्षित काय हे सांगण्याची मात्र घाई केलीत. लोकांना लाऊ द्यायचे होते त्यांच्या मनाचे अर्थ Happy
आणि पटकन सांगायचेच होते तर ते पुरेसे कथेतच क्लीअर होईल हे बघायचे होते..

पुढच्या कथेची वाट बघतोय .. लिहित राहा Happy

@मी मानिनी

हो, तुमचे बरोबर आहे, या कथेचा शेवट तर्कावर अवलंबून आहे.

माझ्या बाकीच्या दोन कथा, संभ्रमध्वनी आणि आगंतुक यांचा शेवट, तर्कावर अवलंबून नाही, कदाचित त्या कथांचा शेवट या कथेपेक्षा चांगला असू शकतो Happy

@ऋन्मेऽऽष

धन्यवाद, मला ही शेवट आधी सांगायचा नव्हता, पण नंतर राहवले नाही Happy
पुढच्या कथेवेळी हे लक्षात ठेवीन.

कथेची सुरुवात उत्तम...पण जर हे सगळं घडवून आणलेलं होत...तर मग त्या मनातल्या आवाजच काय तो कसा आला...पु.ले.शु

रोचक!

> "मी फक्त काय असते ते बघायला गेलो होतो" सूर्यकांत चेहरा ही रडवलेला झाला होता.> इथे प्रकाश हवं ना?

मस्त!