इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन

Submitted by सई केसकर on 26 September, 2016 - 06:55

एप्रिल २०१६ पासून मी १० किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात. कित्येक लठ्ठ व्यक्ती आपण लठ्ठ आहोत म्हणून आधीपासूनच आहाराविषयी जागरूक असतात. जिम मध्ये जाणाऱ्या आणि शारीरिक हालचाल करण्याऱ्या कित्येक व्यक्ती लठ्ठच असतात. त्यामुळे लठ्ठ असूनसुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि आहार घेणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. एखाद्या लठ्ठ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असं कळलं की आपोआप वजन कमी करायचा सल्ला मिळतो. पण जी व्यक्ती बारीक आहे, आणि हृदयरोगी आहे किंवा जिला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत, त्यांना तोच सल्ला दिला जात नाही. त्यांना आहार बदलायचा सल्ला मिळतो. अर्थात, या सगळ्या व्याधी फक्त लठ्ठ व्यक्तींना होतात हे सतत केले जाणारे विधान फारसे बरोबर नाही. लठ्ठपणा या व्याधींना आमंत्रण देतो हे जरी खरं असलं तरी सगळ्या लठ्ठ व्यक्ती याला बळी पडत नाहीत आणि अचानक हृदयविकार होणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येत नाही.

प्रेग्नन्सीमध्ये मला गर्भधारणेत होणारा (आणि नंतर ताब्यात येणारा) डायबेटीस झाला. माझ्या डॉक्टरनी मला व्यायाम आणि आहार या दोन्हीच्या मदतीने तो ताब्यात ठेवायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे साडे आठ महिन्यापर्यंत मी रोज ३० मिनटं पोहायचे. आणि साखर, फळं आणि कर्बोदके कमी करून मी साखर ताब्यात ठेवली. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की जर ही व्याधी कायमची पदरात पडली तर आहार किती नियमित ठेवावा लागेल. आणि माझ्या वडिलांना टाईप १ डायबेटीस असल्यामुळे ती शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. म्हणून वजन कमी करण्याचा आत्ताचा प्रवास हा फारच अभ्यासपूर्ण होता.

नवव्या महिन्यापासूनच मी ऋजुता दिवेकर इत्यादी लोकांची पुस्तकं वाचू लागले आणि माझा मुलगा झाल्यावर सहा महिन्यांनी ते सगळे सल्ले अमलात आणू लागले. पण बाळ असल्यामुळे मला पूर्वीसारखा दोन दोन तास व्यायाम करता यायचा नाही आणि घरातून बाहेरदेखील पडता यायचं नाही. ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली. पण सतत डाएट करूनही आणि चालणे वगैरे व्यायाम करूनही काही केल्या माझं वजन कमी होत नव्हतं. म्हणून मी शरीरातील मेद साठवणाऱ्या आणि वितळवणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करायचं ठरवलं. तसं करायला लागल्यावर मला कित्येक साक्षात्कार झाले. आणि कुठल्याही जिम ची मेंबर न होता किंवा डाएटिशियनचा सल्ला न घेता मी हा प्रवास करू शकले. या मागे दोन कारणं आहेत:

१. डाएटबद्दल डाएटिशियन्स मध्येच असलेले काही समज जे आता शास्त्रीय दृष्ट्या चुकीचे ठरलेले आहेत
२. वजन कमी करण्यासाठी व्यायामाला दिलेलं अतिमहत्व

वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.

इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.

फक्त खाण्याचा विचार केला तर शरीराच्या दोन अवस्था होतात. एक म्हणजे पोट भरलेली अवस्था आणि उपाशी अवस्था. इन्सुलिन हे मेजवानीचे संप्रेरक आहे तर ग्लुकागॉन हे दुष्काळाचे संप्रेरक आहे. या दोघांचे एकमेकांशी असलेले नाते सीसॉ सारखे असते. याचा अर्थ जेव्हा शरीरात कर्बोदकांचा प्रवेश होऊन इन्सुलिन वर जाते, तेव्हा ग्लुकागॉन सिक्रीट होऊ शकत नाही आणि परिणामी साठवलेलं ग्लायकोजेन, फॅट वापरलं जाऊ शकत नाही. जेव्हा खाल्लेलं अन्न पचवून इन्सुलिन चे प्रमाण कमी होते आणि शरीरात काही काळ दुष्काळ तयार होतो, तेव्हाच ग्लुकागॉन त्याचे काम करून चरबी वापरू शकते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर इन्सुलिन वाढवणारे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत किंवा दिवसातील काही भाग उपाशी राहिलं पाहिजे.

कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही.

दर दोन तासांनी खाणं ही डाएट स्ट्रॅटेजी नापास होते यावर हल्ली बरंच संशोधन झालेलं आहे. आणि यातूनच इंटरमिटंट फास्टिंग हे हाय फाय नाव असलेलं पण भारतीयांना परिचित डाएट उदयास येत आहे. यात शरीराला रोज (किंवा आठवड्यातून काही दिवस) १६ ते २० तासांचे संपूर्ण लंघन देतात. म्हणजे दिवसभरासाठी ठरवलेली कर्बोदके आणि इतर घटक ४-८ तासात खाऊन उरलेले सगळे तास फक्त पाणी, कोरा चहा किंवा कोरी कॉफी पिणे. यामुळे शरीरात ग्लुकागॉन तयार होण्याची स्थिती तयार होते आणि फॅटचे विघटन होते. ही पद्धती आधी अवघड वाटली तरी एकदा सवय झाल्यावर कुठल्याही वातावरणात न मोडता वापरता येते. लंघन केल्यामुळे झोपेत सुधारणा होते (सुधारणा याचा अर्थ अतिझोपचे प्रमाण कमी होते). आणि मुख्य म्हणजे दोन वेळा पोटभर खाता येते. इंटरमिटंट फास्टिंग लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोक आठवड्यातील दोन दिवस ५०० कॅलरीज खातात आणि इतर दिवशी तीन वेळा जेवतात (फाईव्ह टू डाएट), माझ्या सारखे काही १६ तासाचा उपास करतात (ब्रेकफास्ट किंवा डिनर न घेता).

या जोडीला जर (फास्टिंग स्टेट मध्ये) ४० मिनिटापर्यंत व्यायाम केला तर थोडे जास्त वजन कमी होते. पण ४० मिनटं व्यायाम करून जर डाएट केले नाही तर मात्र वजन कमी होत नाही (आणि कधी कधी वाढते). आठवडाभर असे डाएट केले आणि रविवारी डाएट वरून सुट्टी घेतली की पुढच्या आठवड्यासाठी आपण पुन्हा सज्ज होतो. ही सुट्टीदेखील गरजेची आहे. कारण आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांसाठी भूक कधी कधी बरीचशी मनातच असते. त्यामुळे मनाला उगीच सारखं रागवून गप्प ठेवण्यात काही अर्थ नाही. Happy

वजन कमी होणे हा लंघनाचा सगळ्यात कमी महत्वाचा फायदा आहे. मध्यम वयात होणाऱ्या डायबेटीसची (टाईप २) सुरुवात इन्सुलिन रेसिस्टन्सनी होते. जेव्हा अन्नातल्या ग्लुकोजयुक्त पदार्थांचे प्रमाण सतत जास्त असते, तेव्हा शरीरात सतत इन्सुलिन स्त्रवत राहते. आणि शरीरातील पेशींना अति इन्सुलिन असण्याची सवय होते. आणि त्यांची इन्सुलिन वापरण्याची, परिणामी ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्सुलिन असूनही रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण वाढायला लागते. लंघन केल्यानी किंवा कर्बोदके कमी केल्यानी पेशींची ही क्षमता पुनः पहिल्यासारखी होऊ शकते. थोडक्यात टाईप २ डायबेटीस योग्य आहारानी घालवता येतो (यासाठी दुसरी लिंक बघा).

लंघन केल्यानी मज्जासंस्था बळकट आणि दीर्घायुषी होते. अल्झायमर्स सारखा आजार लंघनाने दूर ठेवायला मदत होऊ शकते (यासाठी तिसरी लिंक बघा). गरजेपेक्षा सरासरी ३० टक्के कमी खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत राहते याचे पुरावे आता संशोधनातून दिसू लागले आहेत. पण आप्ल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिवसातून एकदाच जेवणारे, नव्वदी ओलांडलेले खुटखुटीत आजोबा नाहीतर आजी असतात. आणि तल्लख बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि उत्साही असण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. अशा लोकांच्या आहारात डोकावून पाहिलं तर आपल्याला अजून कितीतरी गुरुकिल्ल्या मिळतील!

या विषयावरचे संशोधकांचे काही टॉक्स आणि लिंक्स मी इथे देत आहे.
१. पीटर आटिया (https://www.youtube.com/watch?v=UMhLBPPtlrY)
२.सारा हॉलबर्ग (https://www.youtube.com/watch?v=da1vvigy5tQ)
३. सान्ड्रीन थुरेट (https://www.youtube.com/watch?v=B_tjKYvEziI)

आलेल्या कॉमेंट्स मधून इथे काही मुद्दे अजून मांडावेसे वाटले

१. डायबेटिक लोकांनी फास्टिंग करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. पण कार्ब्स कमी करायला काही हरकत नाही.
२. बाळाला पाजवत असताना असली कुठलीही डाएट करू नयेत. जेव्हा बाळ इतर अन्नपदार्थ खाऊ लागेल तेव्हाच आईने आपल्या वजनाची चिंता करावी.
३. ज्यांना १६ तास न खाण्याची भीती वाटते त्यांनी प्रत्येक जेवणातले कार्ब्स कमी करून त्याची जागा सॅलेड्स आणि प्रोटीननी भरावी. जसं की २ फुलके आणि भात खाण्याऐवजी २ फुलके आणि एक पूर्ण वाटी डाळ आणि १ पूर्ण वाटी सॅलेड.
४. जेवणाच्या ताटाचा अर्धा भाग फायबरनी भरायचा (कोशिंबीर, सॅलेड) उरलेला २५% भाग प्रोटीन ने (नॉनव्हेज/डाळ/बीन्स/पनीर) आणि उरलेल्या २५% भागात कार्ब्स असावेत.
५. हे डाएट करताना पाण्याचे प्रमाण वाढवले तर डाएट ची सवय लवकर होते. आणि कधी कधी तहानेच सिग्नल भूक लागलीये असा घेतला जातो. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यायले की भूक भूक होत नाही.
६. मी प्रोफेशनल डाएटिशिअन नाही आणि डॉक्टरदेखील नाही. हा लेख फक्त शरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियांची माहिती देण्यासाठी आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो खाली दिलेल्या प्रोफेशनल डॉक्टर्सच्या संशोधनावर आधारित आहे. नुकतीच टाइम मॅगेझीनमध्ये देखील यावर चर्चा झालेली आहे ती मी इथे देते आहे.

http://time.com/4025410/meals-weight-loss/?xid=time_socialflow_facebook

माझे लेखन वाचण्यापेक्षा वाचकांनी या सर्व लिंक्स बघाव्यात. फास्टिंग बद्दल इंटरनेट आणि युट्युबवर खूप उलट सुलट माहिती दिली जाते. त्या प्रत्येक माहितीवर मी मत व्यक्त करू शकत नाही. पण मी दिलेले हे टॉक्स अधिकृत माहिती म्हणून वापरता येण्याच्या दर्जाचे आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पोटातून व्यायाम करता येणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम करताना धाप लागल्यावर आपण हॉलो ब्रिद करतो, ते न करता फोकस फक्त पोट मागे नेऊन उच्छवासावर लक्ष केंद्रीत करायचे. श्वास आपोआप येतो. कारण युज्ड ब्रिद मुळे ऑक्सिजन कमी मिळत राहतो. आणि आपण पर्यायाने जास्त लॅक्टेट बिल्ड करत राहतो. पण लक्ष जर बाहेर फेकण्याकडे दिले तर नविन ऑक्सिजन मिळतो.>>
धन्यवाद केदार. याकडे लक्ष देईन.

फक्त तिथे पोटातून व्यायाम असे वाचण्यापेक्षा, पोटातून श्वास घेणे आवश्यक आहे, असे वाच. ओघात व्यायाम लिहिले.

मे बी पुण्यात येत्या आठवड्यात एक व्यायमा कम श्वास कम प्राणायाम प्लस फास्टिंग गटग करावे. Happy

मी हेच म्हणणार होते. पण जानेवारीत. डिसेम्बर खूप बिझी आहे. नवीन वर्ष नवीन उत्साह वगैरे.

माझ्या प्यूनचे वजन मस्त कमी झाले.तिच्या मुलीसाठी रात्री रोज डाळ करायला लागते.त्या नॉशियातून तिची जेवणावरची इच्छा गेली. त्याऐवजी ती २-३ टोमेटो कधी काकडी,बीट हे वाडगाभर खायला लागली.कधी त्यात दही इ.जेवल्यावर फळे.थोड्या वेळाने १ वाटी दूध.अगदीच भूक लागली तर २ ग्लास पाणी.फक्त मासे,इ.असेल त्यावेळी मात्र व्यवस्थित जेवते.आता तर ती म्हणते की तिला रात्री डाळभात नकोच वाटतो.अपवाद माशांचा.गोड तिला आवडतच नाही.१-१.५ महिना हा सिल्सिला चालू आहे.मात्र ऑफिसमधे असताना तिचे खाणे व्यवस्थित आहे.

गेले काही दिवस जी भेटेल ती व्यक्ती मला "अगं तू बारीक झाली आहेस" असं म्हणत होती. पण मला वजन करायची हिंमत होत नव्हती! शेवटी आज काट्यावर उभी राहीले! साडे तीन किलो वजन कमी झालंय! फक्त १२ तास उपासाचं पथ्य पाळून! सई, मनापासून धन्यवाद! आता माझा उत्साह दुप्पट झाला आहे! This can be done and this will be done Happy

अरे वा. अभिनंदन जिज्ञासा.
मी पण फेब्रुवारी पासून सुरवात करतोय.
खरं ते मागेच केलेली, पण एका आजारचं निमित्त झालं जो अजून चाललाच आहे आणि व्यायाम पूर्ण गंडला.

मी ऋजुता दिवेकर इत्यादी लोकांची पुस्तकं वाचू लागले आणि माझा मुलगा झाल्यावर सहा महिन्यांनी ते सगळे सल्ले अमलात आणू लागले. पण बाळ असल्यामुळे मला पूर्वीसारखा दोन दोन तास व्यायाम करता यायचा नाही आणि घरातून बाहेरदेखील पडता यायचं नाही. ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली.

>> असे उपहासात्मक लिहिणे आवश्यक आहे का? पुण्याच्या आहात का? वजन नियण्त्रणाच्या अनेक थिअरीज आहेत. त्यात ही इन्सुलिन सायकलचीही आहे. ही मी श्रीकान्त जिचकाराण्कडून ऐकली होती. दिवेकरांची थिअरी बोगस आहे आणि तिचा कोणालाही फायदा झालेला नाही अथवा तोटाच झाला आहे असे आहे का? तुमचेही ' ज्ञान ' वाचून तुमच्याही इण्टरनेट वरून कट पेस्ट केलेल्या ' अभ्यासाबद्दल ' शंका का घेऊ नये? दिवेकरांच्या मांडणीत सस्टेनेबल डाएट अथवा व्यायाम यावर भर असतो. म्हणजे जे तुम्ही आयुष्यभर कंटिन्यू करू शकता असा व्यायाम अथवा आहार घेण्यानेकायमस्वरूपी फायदा होतो. अन्यथा कृत्रिम अथवा क्रॅश डायट अथवा अवास्तव व्यायाम घेतल्यास त्याचा कंटाळा येऊन ते सोडून दिली जाण्याची शक्यता जास्त होऊन गाडी पुन्हा मूळ पदावर येते असेच आहे.. माझ्या फिजिशियननने ही मला १८०० कॅलरीज सकाळे ६ पासून रात्री ११ पर्यन्त विभागून दिल्यात . त्याना हे इन्सुलिन सायकल माहीत नसेल काय? ( व्यायाम अलाहिदा आहे तो ही फार इंटेन्स नाही.) त्याचा परिणाम दिसला आहे. तुमचा बोधीवृक्ष तुम्हाला सापडला असेल आणि तो तुमच्यापुरता खराही असेल म्हणू बाकीच्यांच्या सगळ्या बाभळीच आहेत हा अट्टहास कशासाठी...?

साई तुझे लेख खूप उपयुक्त आहेत .
पण << ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली.>>
हे वाक्य आधीही खटकले होतेच . मी पण ऋजुता ची २,३ पुस्तके वाचली आहेत .आणि यु ट्यूब वर व्हिडीओ पण पहिले आहेत . ती जे सांगते त्यात तथ्य आहे. दार दोन तासाने खायला सोपे पर्याय पण सुचवले आहेत ,जसे मूठ भर दाणे , फळ . आणि ती ज्येष्ठ नागरिकांसोबत एक प्रोजेक्ट पण करते आहे. मला वाटते लॉन्ग टर्म साठी मला ऋजुता चे म्हणणे पटते . ती सांगते तूप , भात, रेगुलर नाश्ता खा जसे पराठा , इडली ते पटते .
IF हि पण वेगळी थिअरी आहे वजन कमी करण्यासाठी .पण त्यामुळे ऋजुता चुकीची ठरत नाही .

अर्थात उपहासात्मक आहे आणि माझा अभ्यास श्रेष्ठ म्हणून नाही
ऋजुता दिवेकर तिच्या ओपन टॉक्समध्ये लोकांना आंबे खा, इंपोर्टेड संत्री खाऊ नका. कारण इंपोर्टेड फळांमुळे तुमचे वजन वाढते असे सांगते.
https://www.youtube.com/watch?v=xWQt-f3jnhs

तिचा हा ग्रेटभेट पहा. यात तिने असे म्हणलेले आहे.
याला शास्त्रीय पुरावा आहे का? भारतीय लोकांनी आंबा खाणे चांगले आहे आणि ते आयुर्वेदात वगैरे बसत असेल. पण आंबा आणि किवी अशी तुलना करून त्याचा संबंध वजन कमी करण्याशी जोडायचा हे कितपत योग्य आहे?
आणि समजा एखाद्या डायबेटिक माणसानी तिचा हा सल्ला सत्य म्हणून घेतला तर ते चांगले आहे का?

तसेच लोकल खा हा सल्ला पण अतिशय योग्य आहे. पण त्याचा संबंध कुठलाही शास्त्रीय पुरावा नसताना वजन कमी करण्याशी जोडणे ही फसवणूक नाही का?

तुमची फिजिशियन दर दोन तासांनी खा सांगते ते बरोबर आहे आणि तो मार्ग पूर्णपणे बरोबर आहे. कारण ती कधीच त्या १८०० कॅलरीज मध्ये तुम्ही डायबेटिक असताना आंबा खा असा सल्ला तुम्हाला देणार नाही. आणि कधीही "बाहेरील किवी" विरुद्ध "भारतीय आंबे" अशी तुलना करणार नाही.

ऋजुता बद्दल खोचक व्हायचं कारण हे आहे की डॉकटर आणि इतर डाएटिशियन देत आलेलेच सल्ले ती उगीच काहीतरी नवीन आहे अशा नावाखाली देते. आणि त्या "नवीन" साठी तिच्याकडे कुठलेही पुरावे नसतात.

माझे हे "इंटरनेट" चे ज्ञान प्लेगरीझ्म नाही, कारण खाली ते कुणी म्हंटलेले आहे त्याचे पुरावे दिलेले आहेत. आणि ते सगळे डॉक्टर आहेत. त्यातले काही मेडिसिन मध्ये पी एच डी आहेत. त्यामुळे ते ज्ञान माझे नसून त्यांचे आहे आणि ते नक्कीच ऋजुतापेक्षा जास्त खोल आणि अभ्यासलेले आहे. यापेक्षा महत्वाचे, यातले कित्येक लोक हे ज्ञान दुसऱ्यांना फुकट देतात कारण त्यांना पैशाची नाही तर लोकांच्या आरोग्याची जास्त काळजी आहे. पण ऋजुताचे फुकट ओपन टॉक्स हे निव्वळ लोकांनी लाखी रुपये बाहेरून तिची कन्सल्टन्सी घ्यावी म्हणून केलेले असतात. त्यातून कुठलिही पब्लिश्ड माहिती मिळत नाही. त्यामुळे २ तासांनी खायचे असेल तर जरूर खा, पण डॉक्टरचे ऐकून खा.

या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सल्ला देईन, ऋजुता च्या पुस्तकातील सॅम्पल डाएट चार्ट माय फिटनेस पाल मध्ये घालून बघा. तिचा एका दिवसाचा आहार ८०० कॅलरीज पेक्षा जास्त नसतो. तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला १८०० खायला सांगितल्या आहेत. हे कितपत योग्य आहे? बायकांनी १२०० कॅलरीजच्या खाली जाऊ नये हे सगळे डॉक्टर सांगतात. म्हणून ऋजुता नेहमी तिच्या डाएट बरोबर व्हिटॅमिन सम्प्लिमेंट्स घ्यायची सक्ती करते.

>>>मी पण ऋजुता ची २,३ पुस्तके वाचली आहेत .आणि यु ट्यूब वर व्हिडीओ पण पहिले आहेत . ती जे सांगते त्यात तथ्य आहे. दार दोन तासाने खायला सोपे पर्याय पण सुचवले आहेत ,जसे मूठ भर दाणे , फळ .

अर्थात! तिचे डाएट चार्ट मला पाठ आहे. त्यात ७-८ वेळा खायचं हा पहिला रूल. मान्य. आणि स्तुत्य.
पण पुस्तकात दिलेल्या डाएट चार्ट मध्ये १ ग्लास ताक (१००) हे एक जेवण मानले आहे. मूठभर दाणे (१६०) हेही एक जेवण आहे. एक स्लाइस चीज (६२).
ती पोहे खायला सांगते अर्धी वाटी (१५०), दुपारी १ ब्राउन ब्रेड सॅण्डविच ( १००), एक फळ (८०) रात्री एक फुलका आणि भाजी (१२०).
याची एगझॅक्ट बेरीज ७७२ कॅलरीज इतकी होते.

आता हेच आपण नॉर्मल डाएटिशियन किंवा डॉक्टर जे हाच सल्ला देतात ते काय खायला सांगतात ते बघू
ब्रे. फा. २ अंडी आणि चहा (शुगर नसलेला) --- २००
स्नॅक: १ बोल फळ आणि ताक -- २००
लन्च: २ फुलके, भाजी, कोशिंबीर, डाळ, --३३०-४००
स्नॅक: १ कप चहा आणि शेंगदाणे/खाकरा -- १६०
डिनर (७:३० च्या आत) : १ फुलका, भाजी, कोशिंबीर -- २००

या जेवणाची बेरीज ११६० इतकी आहे. यामध्ये प्रत्येक खाण्यात आपल्याला जे हवे ते सगळे घटक अन्नातूनच मिळतात. आणि इट लोकल या प्रणालीत हे साधे सुधे पर्याय कुठलाही गाजावाजा न करता बसतात. मग डॉक्टरचे ऐकणे जास्त श्रेयस्कर नाही का? तसही, आपल्यालते फार कमी मायबोलीकर असतील ज्यांच्याकडे ऋजुता दिवेकरचा खास स्वत: साठी डाएट प्लॅन बनवून घेण्याइतकी सुबत्ता असेल (१ महिन्याचे १ लाख). मग तुम्ही पण इंटरनेट वरूनच ही माहिती मिळवता आहात!!

सई, चांगली माहिती.
ऋजुताच्या पुस्तकां पेक्षा तिचा टिव्ही शो जास्त गाजला असे मला वाटते. मध्यंतरी तिचा शो पाहुन कुणीतरी केलेले एक व्हॉट्सॅप फॉर्वर्ड पण फिरत होते: ऋजुता काय सांगते यावर. त्यात इट लोकल सोबत, भारतीय मिठाया चांगल्या, खायला घाबरु नका वगैरे. हे फॉर्वर्ड लिहीणार्‍याने कदाचित तिची पुस्तके वाचली नसावीत. तिच्या पुस्तकात जेव्हा ती हे पदार्थ केव्हा अन किती खायचे सांगते हे वाचले तर कदाचित त्याने आपले फॉर्वर्ड मागे घेतले असते.
ऋजुताच्या पुस्तकात बरीच चांगली माहिती आहे. तिची थिअरी चुकीची की नाही याबद्दल बोलण्याएवढे माझे ज्ञान्/अभ्यास नाही, पण मला ती सुरवातीला आकर्षक पण फॉलो करायला बरीच कठीण अशी वाटली. मी तिचे पुस्तक वाचून प्रयत्न केला होता, कन्सल्टेशन घेउन नाही.

१ ग्लास ताक (१००) हे एक जेवण मानले आहे. मूठभर दाणे (१६०) हेही एक जेवण आहे. >>>>>>>>>> हे कळलं नाही. म्हणजे जेवण स्किप करुन हे एवढंच खायचं का?

@ सस्मित

हो. आपल्याला सांगताना ती नेहमी ७-८ वेळा थोडं थोडं खा असं सांगते. पण तिच्या डाएट चार्ट मध्ये वेळापत्रक असते. त्यात ७ ते ८ वेळा काय काय खायचे यात एका वेळी १ ग्लास ताक. मग दुसऱ्या वेळी १ स्लाइस चीज असे पदार्थ दिलेले असतात. तिचे जेवणाच्या वेळेचे जेवण देखील खूप कमी असते. उदाहरणार्थ १ छोटे ब्राऊन ब्रेड सँडविच किंवा एक तूप लावलेला फुलका आणि भाजी.

तुम्ही करिष्मा आणि करीनाचे व्हिडियोदेखील पहिले असतील. त्यात नेहमी त्या मी पोहे खाते, फिश करी खाते असं सांगतात. पण किती हे उत्तर कुठेच नसते.
आंबा खा हे सांगणे खूप रोमँटिक वाटते. पण तिच्या डाएट चार्ट मध्ये १ आंबा हे फक्त एक वेळचे जेवण म्हणून घेतले जाते. म्हणजे सकाळी १ आंबा एवढा ब्रेकफास्ट. पण हे ती तिच्या ओपन टॉक्समध्ये तितकं ओपनली सांगत नाही. आपण आंबा कसा खातो? पुरीबरोबर. त्यामुळे जिथे समाजात आधीच खाण्यावरून बरेच उलटे सुलटे मतप्रवाह आहेत तिथे तरी आपल्या सोयीप्रमाणे प्रमाण वगळू नये. काही लोकांचे अशा अर्धवट माहितीमुळे नुकसान होऊ शकते.

आणि शेवटी तुम्ही ज्वारी खा किंवा ओट्स खा, त्याचे जगभरातील सगळी शरीरे शेवटी ग्लुकोजच बनवणार आहेत. भारतीय लोकांच्या दोन गटांनी सम प्रमाणात ज्वारी आणि ओट्स खाल्लेत. आणि ज्वारीवाल्या गटाचे वजन वाढले नाही पण ओट्स वाल्या गटाचे वाढले असे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा तिच्या या लोकल आणि इंपोर्टेड क्लेमला मान्य करता येईल.

मला वाटतं ऋजुता बाहेरचे म्हणजे देशाबाहेरचे विकत घेऊन, तेच कसे चांगले ह्या फॅडच्या विरोधात बोलत होती. त्यामुळे तिने सिरल्स खाण्यापेक्षा पोहे खा, ते जास्त चांगले आहेत असे सांगण्यास सुरू केली. जे की बर्‍याच अंशी बरोबर आहे. म्हणजे उगाच ऑलिव्ह ऑईल आणून त्यात भजी तळण्यापेक्षा शेंगदाना, करडई, सनफ्लॉवर तेल घ्या. ( तसेही ऑलिव्ह ऑईल तळण्यासाठी योग्य नाहीच.) आणि प्रोसेस्ड केलॉग्स खाण्यापेक्षा पोहे, उपमा बरा.

८०० कॅलरी दिवसाला खाणे काय किंवा ५ दिवसाच्या रोज २००० अन दोन दिवस काहीच नाही ( २४, २४ तास उपास), ह्यात रोजच्या ८०० मध्ये एकुण कॅलरीज कमी जातील. आणि जास्त फास्टिंग होते. ह्या मेथड मुळे मनाला फसवणे होते, म्हणजे अरेच्चा मी आत्ताच तर थोडे खाल्ले, भूक कशी लागेल? असे वाटते, जे की सलग २० तास उपास करताना वाटणार नाही.

इंटरमिटटं फास्टिंग मध्येही अनेक उपग्रूप आहेत. ११ टू ७, लिनमसल, १६ डे रोज, ५ डेज रेग्युलर, २ दिवस उपास वगैरे वगैरे.
तसेही आपण आपल्या आयांना काय मंगळवार / शनिवार करते म्हणून नाव ठेवायचो. इनफॅक्ट असे उपास करणे हे आपले वाडवडिल नेहमीच करायचे. आपणच ते देवाचे कर्मकांड म्हणून सोडून दिले. Happy

आता मला वाटते की कडकडीत उपास करणे त्यांना जर जमले ( भले देवाच्या नावाखाली) तर आपल्याला का जमू नये. ( सायन्सच्या नावाखाली Proud )

मी इट, स्टॉप, इट हे पुस्तक वाचले. मला आवडले. सध्या जानेवारी ऑफर म्हणून १० डॉलर मध्ये मिळतेय. बरीच सायन्टिफिक माहिती आहे.

थोडक्यात, ज्याला जे सहन होते ते त्याने करावे. कुणी ऋजुताला फॉलो करावे, कुणी इंटरनेटला, साध्य तर दोघांचेही एकच.

सई, I commend your patience in responding to criticisms without getting offended or taking it personally. Happy

अजय अ अ, सई नी वर दिलय तसं ऋजुता दिवेकरचे बरेच सल्ले बरोबर असतात सुद्धा पण शि हॅज गॉटन कॅरिड अवे क्वाईट अ फ्यु टाईम्स. माणसानी आपल्या ज्ञानाचा परिघ किती आहे हे ओळखून असावं आणि तो ओलांडू नये.

वैद्यबुवा, थॅन्क्यु!! Happy

लोकल विरुद्ध इंपोर्टेड मध्ये मी देखील लोकलला महत्व देते. पण त्याचे कारण माझ्या वजनाशी संबंधित नाहीये.
लोकल गोष्टी कमी प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे त्या ताजेपणा आणि पर्यावरण संवर्धन दोन्हीसाठी सरस आहेत. विमानातून (बोटीतून) आलेले अन्न खायला मला नक्कीच आवडणार नाही.

@केदार
बरोबर आहे. मुळात 'स्टार्व्हेशन' मोड हे मिथ आहे हे लोक मान्य करत नाहीत. अजूनही सर्रास, खाल्लं नाही तर तुम्ही अजून जाड व्हाल असा सल्ला दिला जातो, जो आता खूप वेळा चुकीचा ठरवला गेलेला आहे. आणि लोकांना फास्टिंग कुठलीही प्रोफेशनल मदत न घेता जमतं, कारण यात एक वेळ तरी पोट भर खाल्ल्याची भावना आपण अनुभवू शकतो. त्यातही आपण काय खातोय याचा नीट विचार केला तर अतिशय हेल्दी डाएट आपण घेऊ शकतो.

आणि ऑफकोर्स वजन करायचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातील आपल्याला जो जमेल तोच करावा. पण आपल्याला जी व्यक्ती पैसे घेऊन सल्ला देते आहे, तिनी कुठल्याही प्रश्नांची उत्तरे द्यावीत, तसेच रसायनशास्त्र किंवा थर्मोडायनामिकस चे नियम मोडून आपले डाएट काम करते आहे असा क्लेम करू नये.

अजूनही सर्रास, खाल्लं नाही तर तुम्ही अजून जाड व्हाल असा सल्ला दिला जातो, जो आता खूप वेळा चुकीचा ठरवला गेलेला आहे>>>>>> ह्या मागे शरिर स्टार्व (उपाशी) व्हायला लागले की अजून धिम्या गतीनी कॅलरी सोडतं हा मुद्दा आहे. जे बरोबर आहे पण शरिर स्टार्वेशन मोड मध्ये नक्की किती अवधी नंतर जातं हे लक्षत घेणं गरजेचं आहे. फास्टिंगच्या १६ तासाच्या विंडो मध्ये लगेच शरिर स्टार्वेशन मोड मध्ये जात नाही.
आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, जो अ अ अ ं नी लिहिलय, तो म्हणजे कॅलरी विभागून खाण्याचा. इंटरमिटंट फास्टिंग मध्ये ८ तासाच्या खाण्याच्या विंडो मध्ये सुद्धा कॅलरी व्यवस्थित विभागूनच खालल्या तर जास्त मदत होईल. एका बैठकीत खुप जास्त खाणं योग्य नाहीच. १८०० कॅलरीची रिक्वायरमेंट असेल तर अगदी सहज ६०० कॅलरी २-२.५ तासांनी खाता येतात.

इँटरेस्टिंग प्रतिसाद वैद्यबुवा!

सई, ऋजुताची पुस्तके वाचताना मला जाणवलं की ती मुख्यत: जे लोक वजन घटवण्यास "सो कॉल्ड डायटिंग" वगैरे करुन थकलेत, खाण्यासही घाबरतात वगैरे, थोडक्यात सुखवस्तु लोक आहेत. तेव्हा तिने जे खाल्लं नाही तर जाड व्हाल हे त्यांना उद्देशून असावे.

खाललं नाही तर जाड व्हाल हा सल्ला मला वाटतं थोडं फॅड टाईप डायट करणार्‍या व्यक्तींचं कॉमन बिहेवियर बघून तयार झाला आहे. नीट विचार करुन डायट नाही केलं की माणूस बर्‍याच वेळा स्वतःची उपासमार करतो. ती झाली, १) की एकदा कधीतरी संयम संपतो आणि मग जास्त खाललं जातं आणि २) वर दिलय तसं, जास्त स्टार्व केल्या मुळे थोडं मेटॅबोलिजम पण स्लो होत असावं ज्यामुळे म्हणावं तसं वजन कमी होत नाही. इथे एक लक्षात घ्या, नीट विचार करुन डायट न केल्यामुळे २-३ दिवस अगदी खुप कमी खाललं गेलं तर अर्थातच बॉडी स्टार्वेशन मोड मध्ये जाऊन मेटॅबोलिजम स्लो होत असावं. फास्टिंग मध्ये १६ तासानंतर पुढच्या ८ तासात तुमच्या कॅलरी रिक्वायरमेंट च्या हिशोबानी खायची मुभा असतेच.
डायट पेक्षाही मला वाटतं ह्या सगळ्या नवीन पद्धती जर लाईफस्टाईल चेंज म्हणून केल्या तर काही परमननंट बेसिस वर हा प्रश्न मिटेल. डायट म्हणलं की आपोआप "थोडा काळ करायची गोष्ट" असं गृहितक मनात तयार होतं.
डायट करायला खरं फार प्लॅनिंग लागते असंही काही नाही. फक्त आपण काय खातो आहोत आणि किती खात आहोत ह्याबद्दल "अवेअर" असणं महत्वाचं आहे. वरकरणी बघता हे डायट ट्रॅकर वगैरे कटकटीचं काम वाटेल पण ते आपल्या करता खुप महत्वाचं काम करतं, ते म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून नेमकं किती (किती कॅलरीज) खालल्या आहेत ह्याचं प्रामाणिक उत्तर ते देतं. माणूस मग "अरे काही फार नाही खाललय, चालतय" असं म्हणून स्वतःची दिशाभूल करायला धजत नाही. वर सई नी लिंक दिली आहे त्यातला प्रयोग बघा. आपण भरपूर खाललं आहे असं एकदा आपल्या मनानी नोंद केली की लगेच बॉडी घ्रेलिन कमी प्रमणात सोडते. थोडक्यात बराच वेळ भूक "लागतच" नाही.
एकदा हे सगळे बदल तुमच्या अंगवळणी पडले की मग काही ट्रॅक करायची सुद्धा गरज नाही.

अगदी बरोबर.
आणि हे बदल अंगवळणी पडायला बराच वेळ लागतो. तेवढा पेशन्स असला पाहिजे. मला हे सुरु करून एप्रिल मध्ये १ वर्ष होईल. सुरुवातीला मी प्रत्येक गोष्ट माय फिटनेस मध्ये टाकून बघायचे. आता मला ५०० कॅलरीज चे जेवण कसे दिसते हे बरोबर पाठ झाले आहे. त्यामुळे आता मी मोजत नाही.
दुसरी गोष्ट अशी की वजन हा एक आकडा आहे. त्याचा आपल्या सौंदर्याशी किंवा प्रतिष्ठेशी काही संबंध नाही हे स्वतःला पक्क समजावलं पाहिजे. वजन खाली जातं तसं कधी कधी वर पण जाणार. तसं गेलं तर योग्य तो बदल करून पुढे जायचं. हे करण्यासाठी रोज वजन केले पाहिजे.

ग्रीन टी (यक!!)_______सवय जालि की ग्रीन टी मस्त लागतो.,१ चमचा दूध घा लून चहा पिण्यापेक्ष kora chaha par vadLA.
Mobile varun type kartana tras hotoy.

पित्त प्रकृती असेल तर असा चहा उपासाच्या पहिल्या ६ तासा पर्यंत ठीक.
सकाळी घेतल्यास पित्ताचा त्रास होउ शकतो.

ओके! कमी दुधाचा, बिनसाखरेचा चहा घेता येईल!
ग्रीन टी (यक!!) >> +१११
पित्त प्रकृती नाही त्यामुळे त्रास होणार नाही बहुतेक.

चहा, बिना साखरेची पेये, कॉफी वगैरे सगळे अलाउड आहे.

झिरोस्टिफ नावाचा एक सॅशे मेडिकल मध्ये मिळेल. बेसिकली एनर्जी साठी ती पावडर उपयोगी आहे. त्यात ३६ कॅलरीज , ९ ग्रॅम प्रोटिन आणि शून्य साखर. मी कधीकधी अल्ट्रा एन्डुरंस साठी म्हणजे १२ तास ते २४ तास सलग सायकल चालविण्यासाठी वापरले आहे. अगदीच उत्साही वाटत नसेल तर प्यायला हरकत नाही.

BTW मला वजन कमी करायची अजिबात गरज नाही. पण माझा IF चा अनुभव लिहितो.

IF फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही, तर ते मेंटेन ठेवण्यासाठी पण आहे. मी तसे गेले दोन तीन महिने IF करत आहे. पूर्वी मी शंका घेत होतो. पण आता अजिबात नाही. ब्रेकफास्ट ऑलमोस्ट बंद आणि दोनच जेवणं. मध्ये काहीच नाही. माझा व्यायाम देखील ५ ( धावणे आणि सायकल) दिवस असतो. आणि इतके करूनही माझे वजन अजिबात कमी झालेले नाही. आणि अश्या IF मुळे मला एन्डुरंस कमी झाला आणि ती अ‍ॅक्टिव्हिटी करता येत नाही असेही झालेले नाही.

सईच्या लेखानंतर मी ह्यावर शोध घेतला, कारण इथे मीच लिहिले होते की ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनीच असे करावे, पण आता लिहितो आहे की, ही एक जर्नी आहे. ( अर्थात मी लिहिलेल्या इतर पोस्टही - एन्डुरंस आणि न्युट्रिशन, तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण IF चा आपल्या लाईफस्टाईल मध्ये तिचा समावेश असावाच असावा. आणि इट स्टॉप इट ह्या पुस्तकामुळे मला व्यायाम करतानाही हे सर्व करता येते हे कळाले.

पुस्तकाची वेबसाईट eatstopeat.com - मार्केटिंग आहे, पण ह्याचा फायदा अनेकांना झाला आहे.
www.leangains.com ही आणखी एक वेबसाईट, ज्यात अ‍ॅक्टिव्ह माणसांना उपयोगी माहिती आहे.

-
IF ही एक प्रोसेस आहे. मला स्वतःला वेट गेनचा त्रास कधीच नव्हता. पण उपाशी राहणेही जमत नव्हते. आताश्या हळूहळू जमायला लागले आहे. मे बी आपण आपल्या सर्वांचा एक सपोर्ट ग्रूप करावा, आणि एकमेकांना उत्साहित करावे.

अर्थात! तिचे डाएट चार्ट मला पाठ आहे. त्यात ७-८ वेळा खायचं हा पहिला रूल. मान्य. आणि स्तुत्य.
पण पुस्तकात दिलेल्या डाएट चार्ट मध्ये १ ग्लास ताक (१००) हे एक जेवण मानले आहे. मूठभर दाणे (१६०) हेही एक जेवण आहे. एक स्लाइस चीज (६२).
ती पोहे खायला सांगते अर्धी वाटी (१५०), दुपारी १ ब्राउन ब्रेड सॅण्डविच ( १००), एक फळ (८०) रात्री एक फुलका आणि भाजी (१२०).
याची एगझॅक्ट बेरीज ७७२ कॅलरीज इतकी होते.

>>>> हा माझा सकाळचा नाश्ता होईल सर्वच्या सर्व. Happy

आता हेच आपण नॉर्मल डाएटिशियन किंवा डॉक्टर जे हाच सल्ला देतात ते काय खायला सांगतात ते बघू
ब्रे. फा. २ अंडी आणि चहा (शुगर नसलेला) --- २००
स्नॅक: १ बोल फळ आणि ताक -- २००
लन्च: २ फुलके, भाजी, कोशिंबीर, डाळ, --३३०-४००
स्नॅक: १ कप चहा आणि शेंगदाणे/खाकरा -- १६०
डिनर (७:३० च्या आत) : १ फुलका, भाजी, कोशिंबीर -- २००

>> हे माझ्या दुपारच्या जेवणासाठीही कमी आहे.

मी दोन्ही वेळेला मजबूत जेवतो. चार पोळ्या, भाजी, भात, वरण. आता गव्हाच्या पोळ्या बंद करुन ज्वारी व बाजरीच्या भाकरी सुरु केल्यात. फरक जाणवतोय. उपाशी राहायचे डायट परवडत नाही.

१६ तास उपाशी राहायचा प्रयोग मागे एकदा केला होता. दिवसातून एकदाच जेवायचो. रात्री नाही. महिनाभरात चक्कर येण्याचे प्रमाण वाढले. डोके बधिर होऊन जायचे. एकदा कलंडलो. उठायला जमत नव्हते. मग डॉक्टरला गाठले, तो बोलला, शुगर कमी झालीये. फालतू फॅड सोड. आणि पाहिजे तेवढं पोटाला खात जा. आणि खरंच दोन दिवसात नॉर्मल ला आलो. शुगर कमी झाल्याने मेंदूला पुरेसा खुराक मिळत नसावा त्यामुळे मेंदूची काम करण्याची क्षमता कमी झाली असावी. असो.

तर लेखात उल्लेखलेले किंवा इतर कुठलेही डायट करण्याआधी स्वतःच्या प्रकृतीवर आधारित डॉक्टरी सल्ला अतिशय आवश्यक आहे असे माझे मत आहे. इथल्या प्रतिसादांमधे व लेखामध्ये असे डिस्क्लेमर आहे काय?

Pages