इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन

Submitted by सई केसकर on 26 September, 2016 - 06:55

एप्रिल २०१६ पासून मी १० किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात. कित्येक लठ्ठ व्यक्ती आपण लठ्ठ आहोत म्हणून आधीपासूनच आहाराविषयी जागरूक असतात. जिम मध्ये जाणाऱ्या आणि शारीरिक हालचाल करण्याऱ्या कित्येक व्यक्ती लठ्ठच असतात. त्यामुळे लठ्ठ असूनसुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि आहार घेणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. एखाद्या लठ्ठ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असं कळलं की आपोआप वजन कमी करायचा सल्ला मिळतो. पण जी व्यक्ती बारीक आहे, आणि हृदयरोगी आहे किंवा जिला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत, त्यांना तोच सल्ला दिला जात नाही. त्यांना आहार बदलायचा सल्ला मिळतो. अर्थात, या सगळ्या व्याधी फक्त लठ्ठ व्यक्तींना होतात हे सतत केले जाणारे विधान फारसे बरोबर नाही. लठ्ठपणा या व्याधींना आमंत्रण देतो हे जरी खरं असलं तरी सगळ्या लठ्ठ व्यक्ती याला बळी पडत नाहीत आणि अचानक हृदयविकार होणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येत नाही.

प्रेग्नन्सीमध्ये मला गर्भधारणेत होणारा (आणि नंतर ताब्यात येणारा) डायबेटीस झाला. माझ्या डॉक्टरनी मला व्यायाम आणि आहार या दोन्हीच्या मदतीने तो ताब्यात ठेवायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे साडे आठ महिन्यापर्यंत मी रोज ३० मिनटं पोहायचे. आणि साखर, फळं आणि कर्बोदके कमी करून मी साखर ताब्यात ठेवली. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की जर ही व्याधी कायमची पदरात पडली तर आहार किती नियमित ठेवावा लागेल. आणि माझ्या वडिलांना टाईप १ डायबेटीस असल्यामुळे ती शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. म्हणून वजन कमी करण्याचा आत्ताचा प्रवास हा फारच अभ्यासपूर्ण होता.

नवव्या महिन्यापासूनच मी ऋजुता दिवेकर इत्यादी लोकांची पुस्तकं वाचू लागले आणि माझा मुलगा झाल्यावर सहा महिन्यांनी ते सगळे सल्ले अमलात आणू लागले. पण बाळ असल्यामुळे मला पूर्वीसारखा दोन दोन तास व्यायाम करता यायचा नाही आणि घरातून बाहेरदेखील पडता यायचं नाही. ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली. पण सतत डाएट करूनही आणि चालणे वगैरे व्यायाम करूनही काही केल्या माझं वजन कमी होत नव्हतं. म्हणून मी शरीरातील मेद साठवणाऱ्या आणि वितळवणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करायचं ठरवलं. तसं करायला लागल्यावर मला कित्येक साक्षात्कार झाले. आणि कुठल्याही जिम ची मेंबर न होता किंवा डाएटिशियनचा सल्ला न घेता मी हा प्रवास करू शकले. या मागे दोन कारणं आहेत:

१. डाएटबद्दल डाएटिशियन्स मध्येच असलेले काही समज जे आता शास्त्रीय दृष्ट्या चुकीचे ठरलेले आहेत
२. वजन कमी करण्यासाठी व्यायामाला दिलेलं अतिमहत्व

वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.

इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.

फक्त खाण्याचा विचार केला तर शरीराच्या दोन अवस्था होतात. एक म्हणजे पोट भरलेली अवस्था आणि उपाशी अवस्था. इन्सुलिन हे मेजवानीचे संप्रेरक आहे तर ग्लुकागॉन हे दुष्काळाचे संप्रेरक आहे. या दोघांचे एकमेकांशी असलेले नाते सीसॉ सारखे असते. याचा अर्थ जेव्हा शरीरात कर्बोदकांचा प्रवेश होऊन इन्सुलिन वर जाते, तेव्हा ग्लुकागॉन सिक्रीट होऊ शकत नाही आणि परिणामी साठवलेलं ग्लायकोजेन, फॅट वापरलं जाऊ शकत नाही. जेव्हा खाल्लेलं अन्न पचवून इन्सुलिन चे प्रमाण कमी होते आणि शरीरात काही काळ दुष्काळ तयार होतो, तेव्हाच ग्लुकागॉन त्याचे काम करून चरबी वापरू शकते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर इन्सुलिन वाढवणारे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत किंवा दिवसातील काही भाग उपाशी राहिलं पाहिजे.

कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही.

दर दोन तासांनी खाणं ही डाएट स्ट्रॅटेजी नापास होते यावर हल्ली बरंच संशोधन झालेलं आहे. आणि यातूनच इंटरमिटंट फास्टिंग हे हाय फाय नाव असलेलं पण भारतीयांना परिचित डाएट उदयास येत आहे. यात शरीराला रोज (किंवा आठवड्यातून काही दिवस) १६ ते २० तासांचे संपूर्ण लंघन देतात. म्हणजे दिवसभरासाठी ठरवलेली कर्बोदके आणि इतर घटक ४-८ तासात खाऊन उरलेले सगळे तास फक्त पाणी, कोरा चहा किंवा कोरी कॉफी पिणे. यामुळे शरीरात ग्लुकागॉन तयार होण्याची स्थिती तयार होते आणि फॅटचे विघटन होते. ही पद्धती आधी अवघड वाटली तरी एकदा सवय झाल्यावर कुठल्याही वातावरणात न मोडता वापरता येते. लंघन केल्यामुळे झोपेत सुधारणा होते (सुधारणा याचा अर्थ अतिझोपचे प्रमाण कमी होते). आणि मुख्य म्हणजे दोन वेळा पोटभर खाता येते. इंटरमिटंट फास्टिंग लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोक आठवड्यातील दोन दिवस ५०० कॅलरीज खातात आणि इतर दिवशी तीन वेळा जेवतात (फाईव्ह टू डाएट), माझ्या सारखे काही १६ तासाचा उपास करतात (ब्रेकफास्ट किंवा डिनर न घेता).

या जोडीला जर (फास्टिंग स्टेट मध्ये) ४० मिनिटापर्यंत व्यायाम केला तर थोडे जास्त वजन कमी होते. पण ४० मिनटं व्यायाम करून जर डाएट केले नाही तर मात्र वजन कमी होत नाही (आणि कधी कधी वाढते). आठवडाभर असे डाएट केले आणि रविवारी डाएट वरून सुट्टी घेतली की पुढच्या आठवड्यासाठी आपण पुन्हा सज्ज होतो. ही सुट्टीदेखील गरजेची आहे. कारण आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांसाठी भूक कधी कधी बरीचशी मनातच असते. त्यामुळे मनाला उगीच सारखं रागवून गप्प ठेवण्यात काही अर्थ नाही. Happy

वजन कमी होणे हा लंघनाचा सगळ्यात कमी महत्वाचा फायदा आहे. मध्यम वयात होणाऱ्या डायबेटीसची (टाईप २) सुरुवात इन्सुलिन रेसिस्टन्सनी होते. जेव्हा अन्नातल्या ग्लुकोजयुक्त पदार्थांचे प्रमाण सतत जास्त असते, तेव्हा शरीरात सतत इन्सुलिन स्त्रवत राहते. आणि शरीरातील पेशींना अति इन्सुलिन असण्याची सवय होते. आणि त्यांची इन्सुलिन वापरण्याची, परिणामी ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्सुलिन असूनही रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण वाढायला लागते. लंघन केल्यानी किंवा कर्बोदके कमी केल्यानी पेशींची ही क्षमता पुनः पहिल्यासारखी होऊ शकते. थोडक्यात टाईप २ डायबेटीस योग्य आहारानी घालवता येतो (यासाठी दुसरी लिंक बघा).

लंघन केल्यानी मज्जासंस्था बळकट आणि दीर्घायुषी होते. अल्झायमर्स सारखा आजार लंघनाने दूर ठेवायला मदत होऊ शकते (यासाठी तिसरी लिंक बघा). गरजेपेक्षा सरासरी ३० टक्के कमी खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत राहते याचे पुरावे आता संशोधनातून दिसू लागले आहेत. पण आप्ल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिवसातून एकदाच जेवणारे, नव्वदी ओलांडलेले खुटखुटीत आजोबा नाहीतर आजी असतात. आणि तल्लख बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि उत्साही असण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. अशा लोकांच्या आहारात डोकावून पाहिलं तर आपल्याला अजून कितीतरी गुरुकिल्ल्या मिळतील!

या विषयावरचे संशोधकांचे काही टॉक्स आणि लिंक्स मी इथे देत आहे.
१. पीटर आटिया (https://www.youtube.com/watch?v=UMhLBPPtlrY)
२.सारा हॉलबर्ग (https://www.youtube.com/watch?v=da1vvigy5tQ)
३. सान्ड्रीन थुरेट (https://www.youtube.com/watch?v=B_tjKYvEziI)

आलेल्या कॉमेंट्स मधून इथे काही मुद्दे अजून मांडावेसे वाटले

१. डायबेटिक लोकांनी फास्टिंग करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. पण कार्ब्स कमी करायला काही हरकत नाही.
२. बाळाला पाजवत असताना असली कुठलीही डाएट करू नयेत. जेव्हा बाळ इतर अन्नपदार्थ खाऊ लागेल तेव्हाच आईने आपल्या वजनाची चिंता करावी.
३. ज्यांना १६ तास न खाण्याची भीती वाटते त्यांनी प्रत्येक जेवणातले कार्ब्स कमी करून त्याची जागा सॅलेड्स आणि प्रोटीननी भरावी. जसं की २ फुलके आणि भात खाण्याऐवजी २ फुलके आणि एक पूर्ण वाटी डाळ आणि १ पूर्ण वाटी सॅलेड.
४. जेवणाच्या ताटाचा अर्धा भाग फायबरनी भरायचा (कोशिंबीर, सॅलेड) उरलेला २५% भाग प्रोटीन ने (नॉनव्हेज/डाळ/बीन्स/पनीर) आणि उरलेल्या २५% भागात कार्ब्स असावेत.
५. हे डाएट करताना पाण्याचे प्रमाण वाढवले तर डाएट ची सवय लवकर होते. आणि कधी कधी तहानेच सिग्नल भूक लागलीये असा घेतला जातो. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यायले की भूक भूक होत नाही.
६. मी प्रोफेशनल डाएटिशिअन नाही आणि डॉक्टरदेखील नाही. हा लेख फक्त शरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियांची माहिती देण्यासाठी आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो खाली दिलेल्या प्रोफेशनल डॉक्टर्सच्या संशोधनावर आधारित आहे. नुकतीच टाइम मॅगेझीनमध्ये देखील यावर चर्चा झालेली आहे ती मी इथे देते आहे.

http://time.com/4025410/meals-weight-loss/?xid=time_socialflow_facebook

माझे लेखन वाचण्यापेक्षा वाचकांनी या सर्व लिंक्स बघाव्यात. फास्टिंग बद्दल इंटरनेट आणि युट्युबवर खूप उलट सुलट माहिती दिली जाते. त्या प्रत्येक माहितीवर मी मत व्यक्त करू शकत नाही. पण मी दिलेले हे टॉक्स अधिकृत माहिती म्हणून वापरता येण्याच्या दर्जाचे आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉलिसॅच्युरेटेड किंवा मोनोसॅच्युरेटेड फॅट्स हे हेल्ती फॅट्स समजले जातात. हे बदामाचं उदाहरण बघा.
Almonds:
Amount Per 1 oz (23 whole kernels) (28.4 g)
Calories 163
% Daily Value*
Total Fat 14 g 21%
Saturated fat 1.1 g 5%
Polyunsaturated fat 3.4 g
Monounsaturated fat 9 g
Trans fat 0 g

साखर आणि फॅटचं लॉजिक मलाही नाही कळलं. वर सईनी लिंक दिली आहे त्यातल्या एका लिंक मध्ये त्यांनी कार्ब्,प्रोटिन आणि फॅट्स खालल्यावर किती इन्सुलिन रिलिज होतं ह्याचा ग्राफ दिलाय. थोडक्यात फॅट्स (हेल्ती फॅट्स) खालल्यावर सगळ्यात कमी इन्सुलिन रिलिज होतं. प्रोटिन क्रमाने दुसरा आणि कार्ब्स सगळ्यात जास्त इन्सुलिन रिलिज ला कारणीभुत ठरतात. बेसिकली, हेल्ती फॅट्स असलेले पदार्थ खालले की बॉडी त्या पदार्थांमधली साखर हळू हळू रक्तात सोडतं पण इतर खाल्लेल्या पदर्थांमधली साखरपण हळू रिलिज होईल का? मला नाही वाटत पण फारशी माहिती नाही.

मी सध्या इंटरमिटंट फास्टिंग सुरु केलय. सकाळी नाष्टा न करता दुपारी १च्या आसपास जेवण, नंतर ४:३०-५ ला चहा आणि हलकं खाणं. रात्री ८:३० ला २ ग्लास दूध आणि प्रोटीन पावडर अथवा चपाती भाजी.
दिवसभर अधून मधून पाणी पीत राहण्याने अजून तरी पित्त, गॅसचा त्रास नाही.

सकाळी ११:३०-१२:०० दरम्यान थोडी भूक लागते तेव्हा लेमन टी घेतो. कधी कधी शंका येते की, स्टार्वेशन करत नाहीयेना. बघू, या आठवडाभर प्रयोग करून.

--
माझ्या बायकोला दोन वर्षापूर्वी नोकरीनिमित्त सकाळी ७ ला निघावं लागायचं आणि जेवण थेट दुपारी एकलाच व्हायचं नंतर संध्याकाळी कॉफी आणि मग रात्री जेवण. आत्ता विचार करता हे तिचं अप्रत्यक्षपणे इंटरमिटंट फास्टिंग सुरु होतं, पण तिच वजन वाढतच गेलं. परत विटॅमिन डी/बी-१२ हे पण कमी झाले.

त्यात मी तिला सकाळच्या नाष्ट्याचं महत्व पटवून देत होतो आणि आत्ता मात्र मी नाष्टा करत नाहीये. Happy
त्यामुळे तिला मी आत्ता करत असलेल्या इंटरमिटंट फास्टिंगचे महत्व पटवून देण्यास अवघड जातय!

कदाचित फिस्टिंग विंडो मधे योग्य ते घटक पुरेशा प्रमाणात न घेतल्याने फॅटच प्रमाण वाढलं असेल.

रंगासेठ, पाण्याबद्दल अनुमोदन. सकाळी ब्रेकफास्ट स्किप केल्यामुळे खुप भुक लागेल असं वाटलं होतं पण पाणी पीत राहिलं की आजिबात तसं काही वाटत नाही. आता मी सहजपणे व्यायाम करुन मग ११:३० ला जेवतो.

घरी इतर मंडळींच्या डायट विषयी पण एकदम सारखीच परिस्थिती. बायको कित्येक वर्ष सकाळी फक्त चहा घेऊन कामावर जाते आणि मी ब्रेकफास्ट कसा स्किप नाही करायला पाहिजे हेच सांगत आलो. टर्न्स आउट इट वॉज ऑलवेज वर्किंग फोर हर. आता मी पण जॉईन झालो क्ल्ब मध्ये.

फीडिंग विंडो कमी झाल्यामुळे त्या वेळेत योग्य ते घटक जाणे फार गरजेचं आहे आणि त्याकडे लक्ष दिलच पाहिजे.

मी ब्रेकफास्ट कधी करायचो, कधी नाही. वजन कधीच वाढले नव्हते.
धुम्रपान सोडल्यावर वजन जरा वाढले- २ किलोने. म्हणजे ६२ चे ६४ झाले. वर्ष होतं आले तरी कमी होईना. या दोन किलोतले बहुतेक सगळे पोटावरच्या चरबीने वाढले असावे. मग मी ते कमी करायला ऋजुता दिवेकरच्या पुस्तका प्रमाणे डाएट करायचे ठरवले. पोट कमी करायचे असेल तर उठल्या उठल्या खाल्लं पाहिजे हे ऋजुताच्या पुस्तकात निक्षून सांगितलेले. उठल्या उठल्या जात नसताना निक्षून त्याची सवय लावली थोडे खायची. मग हळुहळु सवय लागली तशी उठल्या उठल्या सडकून भूक लागायला लागली, नाश्ताच व्हायला लागला उठल्या उठल्या १५- २० मिनिटात. आणि मग नंतरच्या सगळ्या भूकाही सडकून लागायच्या, कंट्रोल करणं महा कठीण झालं. त्यामुळे २ तासाला माफक खाणं जमेच ना. आणि माझं वजन काही महिन्यातच ६४ चं ६९ किलो झालं. पोट कमी न होता वाढलच. गोड न खाता. मी चहापण बिनसाखरेचा पितो. यापूर्वी मी लंघन सहज करु शकत असे, सारख्या टूरींग मुळे ते कित्येकदा घडायचं. पण या दरम्यान मला लंघन करणं अशक्यच होऊन बसलं होतं. दोन वर्षे अशीच गेली.

मग मी परत निक्षून उठल्या उठल्या खायची सवय तोडली. वेळ लागला पण जमलं. उठल्यावर व्यायाम, फिरणे, आंघोळ करुन मगच नाश्ता (उठल्यावर दोन- अडीच तासांनी). आणि मग जेवणावरही आधी सारखा कंट्रोल येऊ लागला. अडीच-तीन महिन्यात २ किलो वजन कमी झालं, खास व्यायाम न करता. उत्साहपण वाढलाय. व्यायाम हळु हळु वाढवतोय.

मी पण आठ दिवसांपासून इंटरमिटंट फास्टिंग सुरु केलंय. तशी मला रोजची १२ तास फास्टिंगची सवय होतीच. आता हळूहळू वेळ वाढवत नेलीय.
आधी मी जास्त वेळ उपाशी राहिले की खूप अॅसिडिटी आणि असह्य डोकेदुखी व्हायची. आता सतत पाणी पित राहिल्याने काहीच त्रास जाणवत नाही. पाणी पित रहायचा उपाय एकदम भारी आहे. Happy

आम्ही रात्री ७.३०-८ ला जेवतो. शक्यतो त्याननतर काही खाले जात नाही. कधीतरी कोफी घेतो. सकाळी फक्त चहा होतो आनि १२ ल दुपारचे जेवण. त्यामुळे तसे १६ तासात चहा सोडून काही घेतले जात नाही. व्यायाम तसा निय्मित आहे. गेल्या ५ वर्षात वजन फारतर किलोने इकडे तिकडे होते. रात्री काय खाते त्याने मात्र नक्की फरक पडतो. रात्री चपाती, भाजी, भात, वरण सर्व जेवण सतत करत राहिले की वजन नक्की वाढते. शक्यतो, सुप, सलाड, पोळी, भाजी, वरण्,आमटी हे सर्व खातो.
पाणीपूरी समोर आल्या तर वर लिहिलेले सर्व विसरुन, न थांबता खात्त रहायचे हापण एक नियम आहे.>>>+111111
मी त्यातले फक्त पाणी मोजते. Happy
विद्या.

तहान लागलेली नसताना पाणी प्याल्याने किडनीवर आणि मुत्रपिंडावर अतिरिक्त भार येत नाही का? प्रसन्न मनाने जितका वेळ लंघन करता येईल तितके करावे आणि प्रमाणात खावे. उगाच इतर करतात म्हणून स्वःताच्या शरीराला त्रास देऊ नये.

अहो बाडी उगा भूक लागली भूक लागली म्हणून खिन्नतेचे शिग्नल सोडते अन ते फॉलो करु करु पोटावर टायर यायलेत. मुळातच जर नको तेव्हा भूक लागत असेल तर ते लक्षात घेऊन बरोबर सवय लावता येते. मला नाही वाटत हे फास्टिंग म्हणजे उपासमार करणे आहे.
तुम्ही एका दमात १६०० कॅलरी खा, तुम्हाला प्रसन्न वाटेल पण काही वेळानी फूड डायजेस्ट झालं की परत भूक लागल्याचे फिलींग येइलच. ते आलं म्हणजे लगेच खाललं पाहिजे असं नाहीये. आणि बेसिकली तेच शिकायची गरज आहे. खरी भूक आणि सुडो भूक यातला फरक. ह्या उपर आपली बॉडी ही फास्ट आणि फिस्ट ह्या करताच डिझाईन्ड आहे. अर्थातच उपासमार करायला नकोच पण खरच उपासमार होतेय अशी परिस्थिती यायला बराच जास्त वेळ लागतो. मला वाटतं ७२ तास बिन काही खाता राहिलं की उपासमार सुरु होते.

आधी लिहायचं होतं पण राहिलं. हे सध्या जो इतका उहापोह करावा लागतोय डायट ह्या विषयावर त्याची कारणं मला तरी वाटतं सतत हाताशी उपलब्ध असलेलं फूड आणि जुन्या पुराण्या लाईफस्टाईल ला अनुसरुन लावून दिलेल्या अतिरिक्त खाण्याच्या सवयी, हे आहेत . हे फास्टिंग बिस्टिंग काहीही न करता भूक लागेल तेव्हा योग्य प्रमाणात खाणे आणि दिवस संपेपर्यंत खाललेल्या अन्नात पुरेशा कॅलरीज आणि घटक असतील हे बघणे येवढं जरी केलं तरी काम होऊन जाईल.

वैद्यबुवा, बरोबर.
नुसतेच carbohydrates Vs. carb+healthy fats यातला फरक साखरेची रक्तातली पातळी एकदम वाढणे व हळुहळु वाढणे हाच फरक आहे. शुगर स्पाईक हेल्दी फॅट बरोबर खाल्याने कमी होतो ... जसे वर लिहिले आहे... सध्यातरी नेहमीचे दही, हमस, दाणे/अक्रोड वगैरे घेतो... फळ, पोळ्या, भात कशाहीबरोबर. छोले केले तर प्रश्न नाछो, भाजी-कोशिंबीर असतेच. पुर्ण पांढरा भाता ऐवजी किंवा घालणे होतेच.

ह्या उपर आपली बॉडी ही फास्ट आणि फिस्ट ह्या करताच डिझाईन्ड आहे. <<<< भारी वाक्य ! लाख पते की बात वैद्यबुवा !

सुनिधी, तेच माझ्या लक्षात येत नाहीये. जमेल तसं जरा माहिती काढणार आहे. एका पदार्थातले हेल्ती फॅट्स दुसर्या पदार्थामधल्या साखरेचा रिलिज पण मंदावू शकतात हे मला माहित नव्हतं.

ह्या उपर आपली बॉडी ही फास्ट आणि फिस्ट ह्या करताच डिझाईन्ड आहे.>>>>>> हे वाक्य परत ज्यांना सध्या डायबिटीस नाहीये त्यांना लागू पडतं हे लिहायचं राहिलं.

>>तहान लागलेली नसताना पाणी प्याल्याने किडनीवर आणि मुत्रपिंडावर अतिरिक्त भार येत नाही का? प्रसन्न मनाने जितका वेळ लंघन करता येईल तितके करावे आणि प्रमाणात खावे. उगाच इतर करतात म्हणून स्वःताच्या शरीराला त्रास देऊ नये.<<

अर्थातच झेपेल तितकच आणि तसं लंघन करावं. पाण्याचं पण तसच, तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं.
काल मूळ लेखात दिलेले टेड टॉक्सचे विडिओज पाहिले, त्यात कार्ब वि. फॅट्स चा शरिरातील साखरेवर होणारा परिणाम छान सांगितलाय.

एक शंका, कदाचित आधीच्या प्रतिसादात विचारली असेल, की भारतीय आहार पद्धती मधे पूर्वी पासून कार्बच प्रमाण काहीसं जास्तच आहे. पोळी/भाकरी/भात यातून. मग कार्बरहित जीवनशैली अवलंबवल्यास आपल्या आहार पद्धतीवर शंका यायला लागते.

एकदा मालती कारवारकरांची पुस्तकं वाचली पाहिजेत.

मग कार्बरहित जीवनशैली अवलंबवल्यास आपल्या आहार पद्धतीवर शंका यायला लागते. >> पुर्वी आपल्याकडे शारीरीक कष्टाची कामे असत. आठवून पाहिले तरी घरात मैदा नामक प्रकार दिवाळी सोडल्यास फारसा येत नसे. गोड- धोड, मिठाई हे सणासुदीलाच खाणे व्हायचे. आहारात भाकरीचे प्रमाण चपातीपेक्षा अधिक होते. आमच्याकडे भात तर आठवड्यातून एकदाच व्हायचा.

हल्ली सहज मिळणार्‍या मिठाया, केक, मैदा खाण्याचे वाढलेले प्रमाण, बाजारात मिळणारे तळणीचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर, हॉटेल मध्ये जेवण्याचे वाढलेले प्रमाण.

आता एकदशी, महाशिवरात्री, नवरात्र इतर उपवास म्हटले तर त्यासाठी उपल्ब्ध असलेले खाण्याचे प्रकार पाहता आहारात झपाट्याने झालेला बदल जाणवेल.

शुगर स्पाईक हेल्दी फॅट बरोबर खाल्याने कमी होतो>> हे सहज पटण्यासारखे आहे कारण कार्बपेक्षा फॅट पचायला जास्त वेळ लागतो. परंतू साखरेचा किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणार्‍यांनी ह्याकडे लक्ष द्यायला हवे की मुळात त्यांना आहारतून घेतलेल्या तसेच कार्बमधून तयार होणार्‍या साखरेचे शरीरातील प्रमाण कमी असणे खूप म्हत्वाचे आहे.

मी एक तारखेपासून साखर गहू तांदूळ तळलेले आणि दूध सोडलेयं ९५% होतय. चहा ही बंद झाला आपसूक. त्या जागी हेल्दी पर्याय शोधलेत. उपाशी बिलकूल रहात नाहिये. आणि प्रत्येक जेवणात चौरस आहार घेतेय. एक फळ salad कार्ब्ज उसळी किंवा अंड आणि भाजी.
10 दिवसापासून आधी ६:३० आणि सध्या ५ च्या आत डिनर असं करतेय.
दुसर्या दिवशी ९ ला ब्रेक्फास्ट कम जेवण.
. एका जेवणात भाकरी ऐवजी ज्वारीच्या लाह्या मनुका फुटाणे बदाम असं मिक्स उसळी आणि salad बरोबर खातेय.
एका जेवणात अंड किंवा मिश्र धान्य डोसे.
आज भरपूर भाज्या घालून किनवा
अस आवडीच खातेय.
नाचणी वरई शिंगाडा राजगिरा ह्या पदार्थांच्या पोळ्या भाकरी उत्तम होतात. डोसे ही छान होतात डाळी घालून.
3 किलो वजन कमी झालय 18 दिवसात

हा लेख आणि प्रतिसाद वाचून लंघन करण्याचा मोह होतो पण केवळ उपासाच्या कल्पनेनेच मला दुप्पट भूक लागते. काय करावे Uhoh

नलिनी, एकदम खरं आहे, आत्ता माझी जीवनशैली पूर्णतः बैठीच आहे. Sad त्यामुळे व्यायाम पण आहेच सुरु आणि हे लंघन पण सुरु केलयं. मैदा आणि साखर आहारातून वगळण्याला १००+

कधीतरी खाल्ले जातील्च मैद्याचे पदार्थ, पण गिल्ट न येता.

नानबा, खरच प्रेरणादायी.
हे ज्वारी/साळीच्या लाह्या आणि दूध्/ताक घेतल्यान पोट पण भरतं आणि कमी कार्ब्स खाल्ले जातात हे कित्येक वर्षं वाचत आलोय, आत्ता यांचा पण समावेश केला पाहिजे.

>>शुगर स्पाईक हेल्दी फॅट बरोबर खाल्याने कमी होतो>> हे सहज पटण्यासारखे आहे कारण कार्बपेक्षा फॅट पचायला जास्त वेळ लागतो.>>>

समजा मी एकदा १०० कॅलरीज कार्ब्जमधुन घेतल्या आणि दुसर्‍यांदा ५० कॅलरीज कार्ब्ज आणि ५० फॅट मधुन घेतल्या तर पहिल्याच्या तुलनेत दुसर्‍यावेळेस शुगर स्पाईक सहाजीकच कमी असेल.

पण मी एकदा १०० कॅलरीज नुसत्या कार्ब्जमधुन घेतले आणि दुसर्‍यांदा १०० कॅलरीज कार्ब्ज सोबत फॅटसुद्धा घेतले,तर आता पहिल्याच्या तुलनेत दुसर्‍या वेळेस शुगर स्पाईक कमी असले का?

फॅट आणि साखर = मिठाया असेच तर असतात एकूणात.

पण खालचा परीणाम बघितल्यावर विसरायला होइल ...

फॅट आणि साखर = नको त्या कॅलरीज.

साखर हळू हळू रीलीज झाली तरी कॅलरीज वाढतातच. शिवाय केमिकल स्ट्रकचर बदलले जाते जेव्हा फॅट आणि साखर एकत्र केले असता आणि ते पचणे. आणाखी कठीण होते वा होवु शकते.

पनीर कच्चे आणि पनीरचे गुजा ह्यात पचनाच्या दृष्टीने (हलकं , जड , गरजू एन्झायम्स रेलीज्ड ) खूप फरक आहे.

रुजुता दिवेकर अशीच बतावणी करतेय. पण मधूमेहींना, वजन कमी करणार्‍यांनी दूर रहाणेच बरे.

--------

भारतातील खाद्य संस्कृती हि भौगोलिक आणि जीवनशैलीवरच आधारीत होती आणि आहे. अगदी प्रत्येक घटक हा का आणि कसा वापरला व कधी ह्याचे उत्तम उदाहरण आहे( होते). पण सध्या जशी जीवनशैली आहे आणि जसं पिकवतात त्यामुळॅ बोजड शरीरे, हार्मोन्स ची बिघडलेले असणे दिसतेय. ( एका आर्टीकल मधून साभार).

हाहा इथे इतकी डीप चर्चा सुरु आहे

टेक्निकली इतक्या खोलात शिरलेली मंडळी प्रत्यक्षात पण ६ आणि ८ प्याक्स असलेली असणार हे नक्की

एक फिटनेस फ्रिक ग ट ग व्हायला हवे मायबोलीवर

नानबा मीही असेच करतोय

अन्न हे.बी स्वरुपातच खावे असे माझे मत बनले आहे. त्यामुळे ड्र्याय्फ्र्ट बदाम , खारीक , फुटाणे वगैर आजपासून खानार आहे.

त्यात लाह्या चिरमुरे वगैरे गालता येतेल. लाह्या सुचवल्याबद्दल धन्यवाद.

पृथ्वीकर, मी इतके खोलात जाऊन विचारले नाही. त्याचे कारण मला वजन कमी करायचे नाही पण मधुमेह जितका दुर ठेवता येइल तेवढा ठेवायचा आहे. त्यामुळे हे साखर उड्डाणबद्दल बोलत होतो तेव्हा ती म्हणाली की जितक्या जोरात साखर उसळी मारते तितके जोरात शरीराला इंसुलीन पण फेकावे लागते. आणि हे सारखेच होत राहिले तर शरीर इन्सुलीनकडे दुर्लक्ष करायला शिकेल व मधुमेहाकडे वाटचाल करु. माझा व्यायाम खुप कमी झालाय त्यामुळे तो ही वाढवायला सांगितलाय कारण त्यानेही शरीर इन्सुलिनकडे दुर्लक्ष करतय. कार्बोदकं कमी करायला सुरुवात केलिये. ३ च्या ऐवजी २च फुलके सुरु केलेत. बाकी पोट भरायला जास्त भाजी, आमटी/उसळ व फळ(भरमसाठ नाही), थोडे दाणे/अक्रोड, दही वगैरे. बाथरूमला ३र्‍या मजल्यावरुन पहिल्या मजल्यावरच जायचे, टीव्ही पहातापहाता चकरा मारत रहायच्या, सकाळी उठले की ५-६ तरी सुर्य नमस्कार हे सोपे उपाय केले जातात.

वैद्यबुवा, काही माहिती मिळाली की लिहाल.

सुनिधी, हो.

माझ्या करता ह्या फॉरमॅट नी काही केलं असेल तर अतिरिक्त जाणार्‍या कॅलरीज कंट्रोल मध्ये आणल्या आहेत. मला वाटतं हा प्रॉबलेम जवळ जवळ सगळ्याच लोकांना आहे जे थोडे ओवरवेट साईडला आहेत. हा मुद्दा तसा साधा असला तरी नेमक्या अतिरिक्त कॅलरी जातात कशा हा थोडा निरिक्षण करुन नीट पडताळून बघायची गरज आहे. उदाहरण म्हणून, १५० पाऊंडाच्या माणसाला, जो अर्धा-एक तास लाईट व्यायाम करतो, त्याला साधारण २,००० कॅलरीजची गरज असते. आता सकाळी उठल्या पासून आपण नेमकं काय खातो ते बघूयात.
ब्रेकफास्टः
ओटमील (त्यात साखर किंवा मध). १६०-२०० कॅलरी. ह्यात जर तुम्ही आणखिन सामान घातलत, जसं की बदाम, अक्रोड वगैरे तर हाच ब्रेकफास्ट खुप पटकन ३५० कॅलरी पर्यंत जातो. बेगल वगैरे खात असाल तर काम तमाम. बेगल्=कॅलरिक बाँब असं म्हणतात ते खरं वाटतं मला. एका होल व्हिट बेगल मध्ये जवळ जवळ २६० कॅलरी असतात. त्यात अजून बटर्/चीझ अ‍ॅड केलेलं नाही. थोडक्यात सांगायचं तर, हेल्ती हेल्ती म्हणता म्हणता दिवसाच्या सुरवातीलाच बर्‍याच वेळा खुप कॅलरी/साखर/कार्ब्स/फॅट्स ह्याचा अतिरेक होऊ शकतो.

दुपारचं जेवण:
आता इथे तुम्ही सॅलड खात असाल तर ठीक आहे पण परत त्यात सुद्धा जर भरमसाठ गोड ड्रेसिंग, चीझ, अंडे, चिकन असं जर असेल तर ते सॅल्ड सुद्धा आरामात ८००-१,००० कॅलरी गाठतं. हे झालं फक्त सॅलड बाबतीत पण जर तुम्ही फार लक्ष देत नसाल तर मग तर हा आकडा किती पुढे जातो ते परमेश्वारालाच ठाऊक. इंडियन लंच बफे, चायनीज, इटालियन, थाय, असं कुठेही तुम्ही लंचला गेला की काम तमाम समजायचं कारण त्यात डिझर्ट वगैरे पण येतात. मी म्हणेन १,५०० पण ते ही कन्जर्वेटिव एस्टिमेट असेल. (ह्याच कारणाकरता लंच किंवा कुठलही खाणं नेहमी सोपं ठेवावं, ज्याचा कॅलरिक आणि न्युट्रिशनच्या हिशोबानी इंपॅक्ट किती असेल ते चटकन कळलं पाहिजे). आणि हो, ह्यात आपली घरची पोळी भाजी पण येते. अगदी छोटे फुलके असतील तर ते प्रत्येकी ८०-१०० कॅलरी तरी असतात. मोठ्या पोळ्या असतील तर मला वाटतं तेल तूपासकट त्या २०० च्या घरात जातात. त्यापुढे मग भाजी, त्यातलं तेल वगैरे.

रात्रीचं जेवणः
इथे परत जे काही लंच करता लिहिलं ते सगळं लागू होतं. दुपारी बाहेर खाललं म्हणून आता रात्री लाईट काहीतरी खाऊ असं म्हणून एखादी दुसरी जरी पोळी खालली तरी ते खुपच जास्त होतं. त्यात परत मी येता जाता आपण खात असतो (चरणे) ते स्नॅक्स वगैरे गृहित धरलेलेच नाहीयेत.

हे सगळं लिहायचा उद्देश कोणाला घाबरवणं नसून फक्त एक आढावा म्हणून लिहिलं आहे कारण बर्‍याच वेळा आपली तब्येत इतकी सुधृढ झालीच कशी हा आपल्याला नेहमीच पडणारा पण कधीच न सुटणारा असा गहन प्रश्न असतो.
वर लिहिल्याप्रमाणे आपण दररोज आरामात ४००-५०० आणि विकेंडला ह्या पेक्षाही जास्त ह्या वेगानी अतिरिक्त कॅलरीज खात असतो, वर्षानुवर्ष! आता विचार करा, ऑन अ‍ॅन अ‍ॅवरेज वीकडेजना समजा ३०० कॅलरी आणि विकेंडला ४०० कॅलरी जर आपण घेत असू तर एका आठवड्यातच हा आकडा ५ गुणिले ३०० + २ गुणिले ४०० = २,३०० कॅलरी इतका होतो. हा कमी करुन समजा आपण १,००० जरी आणला तरी एका महिन्यात ४,००० आणि एका वर्षात ४८,००० कॅलरी होतात. ह्या आकड्याचा परत अर्धा जरी केला तरी २४,००० कॅलरी होता = ६.८ पाऊंड वजन (एक पाऊंड फॅट = ३,५०० कॅलरी).
तर असं वाढतं वजन. Happy

Pages