बलात्कार असाही आणि तसाही

Submitted by विद्या भुतकर on 29 August, 2016 - 08:01

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले. निदान सार्वजनिक संडास बांधले तर काही मदत होईल का असेही बोलणे झाले. असो. तर माझं त्यावरचं ज्ञान इतकंच. ह्याकडे मी पुन्हा वळेनच.

सध्या एक मावशी आमच्याकडे साफ सफाईला येत आहेत. आईंनी सर्व सेट करून दिल्याने मला त्यांचे नाव, गाव पत्ता फोन काहीच माहित नाही. त्या नियमित घरी येऊन सफाई करून जातात त्यामुळे त्यावाचून काही अडलेही नाही. मध्ये दोनेक दिवस त्या सलग आल्या नाहीत. म्हणून मी त्यांना विचारलेही, "मावशी काय हो आला नाहीत दोन दिवस?"

त्या,"होय, ते परवा आमच्या इथं असा किस्सा घडला ना? त्यामुळे सगळे घाबरले आहेत. "

खरंतर त्यांनी सांगितले तेंव्हा मला पहिल्यांदा कळले की काय झाले होते.

पुढे मग त्या बोलल्या,"अन दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुलीला बघायला पाव्हणे आले होते."

मी,"अरे वा ! काय झालं मग?"

त्या,"होय, येतील ते परत बोलनी करायला."

मी,"बरं."

आता हा विषय इथंच संपला असता. पण का कुणास ठाऊक मी विचारलं,"मावशी तुमची मुलगी किती वर्षाची आहे?"

त्या,"१४ झाले की आता."

आणि इथेच माझं धाबं दणाणलं. पण मी शांतपणे त्यांच्याशी बोलत राहिले. म्हटलं,"का हो मावशी इतक्या लवकर करताय? शाळेला जाते का? कितवीला जाते? "

त्या,"आता नववीला आहे. आमचे मिस्टर तर म्हणताय की आता हे असे किश्शे हितं व्हायल्यात. त्यापेक्षा पोरगी तिच्या घरी गेलेली बरी ना? आम्ही पण लवकरच गावाला जाणार आहे. ".

हे ऐकून तर मला अजून काही सुचेना. बरं आता अशा प्रसंगी काय धीर द्यायचा याचे माझ्याकडे हे ऑपशन होते आणि त्यातला कुठलाही योग्य नाहीये.

१. मावशी अहो, असं काय करताय? आता त्या पोरीचं झालं म्हणजे तुमचं असं होईल असं थोडीच आहे? - वा ! म्हणजे जिचं झालं ती बिचारी तर किती कष्टात आहे आणि केवळ त्यांच्या मुलीवर नाही झाला म्हणून हुश्श म्हणायचं? आणि मी तरी कसं सांगणार त्यांना हे ठणकावून?

२. अहो, आपल्या हातात थोडीच आहेत या गोष्टी? आपण आपले प्रयत्न करायचे? - म्हणजे काय? किती होपलेस वाक्य आहे? एक तर त्यात मी त्यांना सरळ सांगतेय की आपल्या हातात काही नाहीये. कुठेही धीर देऊ शकत नाहीये आणि शिवाय आपण प्रयत्न करणे म्हणजे तरी काय? पोरीला नीट अंग झाकून जा म्हणायचं? की आणखी काय?

३. गावी जाऊन किंवा लग्न करून काय होणार आहे?- म्हणजे लग्नानंतरही मुलीला सुरक्षिततेची काहीही अपेक्षा नाहीये आणि दुसऱ्या गावाला जाऊनही नाही. होय ना?

खरंच, यातलं एकही वाक्य मी त्यांना बोलू शकत नव्हते. मग बोलणार तरी काय?

मी म्हटलं,"मावशी, अहो असं काय करताय? १४ वर्षं लहान आहे."

त्या,"आता लगेच नाही करणार. अजून एक वर्ष आहे."

मी,"म्हणजे तरी १५ च ना? आणि तुम्हाला माहितेय ना १८ वर्षापर्यंत लग्न करता येत नाही कायद्यानं?"

त्या जरा बिचकल्या, म्हणाल्या,"होय माहितेय. पन आमच्याकडं लौकरच करत्यात. इतकी वर्ष नाय थांबणार."

मी,"अहो पण १४-१५ वर्षात लग्न करून मुलीला पुढं मुलंबाळं झाली लवकर आणि त्रास झाला तर?"

मी टीव्ही वरच्या सर्व जाहिराती आठवून त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याही मला उत्तरं देत होत्या.

मी,"अहो तिला निदान १२ वि तरी करू दे. शिकली तर पुढं स्वतःसाठी काहीतरी करेल."

त्या,"हा आम्ही करूच एक वर्ष तिचं १० वीचं. पन पुढं तिच्या सासरचे शिकवतील की त्यांना वाटलं तर."

मी आता काय बोलणार? म्हणजे एकतर मुलीला शिकवायचं नाही, इतक्या लहान वयात लग्न करायचं आणि शिवाय वाटलं तर सासरचे शिकवतील असं म्हणायचं? मी त्यांची उत्तरं ऐकून शांत झाले. एकदाच समजावणीच्या सुरात बोलले,"मावशी, उगाच घाई नका करू. मुलीला थोडं मोठं होऊ द्या अजून. शिकू द्या १२ वि तरी. "

हे सर्व बोलून मी तो विषय सोडून दिला. पुढं काही झालं तर बोलू म्हणून गप्प बसले. मध्ये दोन दिवस मी जरा बाहेर गेले होते. परत आल्यावर कळलं आमच्या मावशी कामाला येणार नाहीयेत.

आईंना म्हटलं,"काय झालं हो?"

त्या म्हणाल्या, "माहीत नाही. पण जमणार नाही म्हणाली आणि यायची बंद झाली".

मला वाटलं, त्यांचा नवरा म्हणाला होता की कामं सोडून तिच्यासोबत घरी राहा म्हणून खरंच त्या काम सोडून घरी राहत आहेत की काय. पण परवा मी त्यांना परत बिल्डिंग मध्ये पाहिलं आणि मला कळलं की त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात.

खरं सांगू का, थोड्या दिवसांत मी इथून जाणार. म्हणजे पुढं काय झालं ते मला कळणार नाहीच. जे काही होईल त्यात मी तिकडून काहीही करू शकणार नाही. त्यांचं आणि माझं आयुष्य असंच चालू राहील. त्या सोडून गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला नवीन व्यक्ती मिळाली कामाला. तीही बिचारी आपल्या लहान मुलींना आता स्वतः शाळेत सोडायला आणि आणायला जात आहे. हे सगळं ऐकून, बघून खूप वाईट वाटतं आणि चीडही येते, या भयानक मनोविकृतीची. आणि मी यात काय करायला हवं हेही कळत नाही. पण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटतेय माहितेय का? या एका बलात्कारामुळे या अशा किती लहान वयातल्या मुलींची लग्नं होऊन अजून जे बलात्कार होणारेत त्यांची.

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख पटला.तुमची कळकळ पोहोचली.
त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात.>>>> कदाचित त्यांना तुमच म्हणन पटल पण असेन.तुम्हांला काय उत्तर द्याव हे न कळुन त्यांनी सोडल असेल काम.किंवा नवर्याने सोडवायला लावल असेन.

आमच्या कामवाल्या काकुच्या मुलीला मी रीझल्ट नंतर गिफ्ट म्हणुन पाकीटातुन पैसे देते.आनि दर चार दिवसांनी ,काकु ती हुशार आहे,तिला शिकु द्या.चांगल्या पगाराची नोकरी मिळेन.अस त्यांना सारख अँव तँव मार्गाने सांगत असते.ह्याचा थोडाफार परिणाम नक्कीच होतो.

कायद्याने अज्ञान असणार्‍या व्यक्तिने दिलेला 'कन्सेन्ट' हा अश्या प्रकरणांत पकडले गेलात तर 'कन्सेन्ट' नसतो बहुतेक.

हायस्कूल सेक्स आणि अंडरएज मॅरिज दोन वेगळ्या गोष्टी नाहीत का?>>> कायद्याने अज्ञान असणार्‍या व्यक्तीनी / शी शरिरसंबंध ठेवणे मग हायस्कूल सेक्स असो वा अंडरएज मॅरिज त्याला बलात्कारच म्हणतात, पकडले जाणे हा परवलीचा शब्द आहे दोन्ही ठिकाणी.

लेखात दोन अल्पवयीन मुलींशी झालेल्या आणि होऊ घातलेल्या शरिरसंबंधाबद्द्ल बोलणे सुरु आहे. म्हणून मी अजून एक scenario आणला प्रतिसादात जे लैंगिक शोषण आहे. हायस्कूल सेक्स / Dating प्रकारच्या लैंगिक शोषणाबद्द्ल मी आजवर कोणालाच गळा काढताना अथवा त्यामुळे (त्याच्या अस्तित्वामुळे) कोणी भितीच्या आवरणाखाली जगतयं असं कधी वाचनांत आले नाही. म्हणून माझा प्रश्न असं का बरं होत असावं ? तिथे सुद्धा परिस्थिती सारखीच आहे पण कोणी ब्र काढत नाही. तरी युद्धग्रस्त देशांतील स्त्रीयांचे हाल मी प्रतिसादात आणले नाहीत. जिथे अराजकता (?) माजलेली नाही अश्या समाजांबद्दल्च बोलले.

सहसा माझा असं निरिक्षण आहे की व्यक्ती थोडाकाळ का होईना भारताबाहेर राहिल्या की ल्गेच भारतातल्या कायदा आणि सुव्यवस्था बाबतीत लंगड्या बाबी अचानक मॅग्निफाईड दिसायला लागतात. आत्तापर्यंत आपण सुद्धा ह्याच परिस्थितीत राहत होतो आणि भेदरून नाही तर taking things into our own stride हे विसरून जातात. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणा सार्ख्या गोष्टी ज्या कालपर्यंत इथे होतच होत्या आणि जिथे तुम्ही राहून आलात अथवा सध्या राहता तिथे पण होतच आहेत वेगळ्या नावाखाली पण कोणी काही त्याविरूद्द बोलत नाही, कल्चर म्हणून एकतर सोडून देतात अथवा आप्ल्याला कसं त्या परिस्थितीशी गुपचूप जुळवून घेता यीएल ते मार्ग शोधतात.

हे उगीचच भारताला अथवा इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेला टार्गेट केल्यासारखे नाही का? आता भारतात कायद्याची अंमलबजावणी नीट नाही म्हणून असे कोणी म्हणायच्या आधीच मी मुद्दा केला की इतरत्र त्या देशाच्या घटनेनेनी नागरिकांना / रहिवाशांना कधी मूड झाला तर समोरच्याला खलास करून टाकायची सोय करून दिलेलीआहे. त्याबाबतीत कोणाला कसली भिती वाटताना दिसत नाही की आज मी घराबाहेर पडलो आणि कोणाचा मूड झाला मी काही जिवंत परत येत नाही. Fear mongering भाष्य तिथल्या घटनांबद्द्ल होत नाही इथे घटना झाली की सगळ्यांना भारतात लोकं (विशेषतः महिला) दिवसा-ढवळ्या तरी कशा घराबाहेर पडतात अश्या प्रकारचे लेख, चर्चा, वादसत्र घडतात.

लेखात मला अनाठायी भितीचा सूर जास्त दिसला एका मुलीबरोबर दुर्दैवी घटना घडली तर त्याचे पडसाद ज्या तारतम्याने मोलकरणीवर उमटले अगदी तसेच लेखिकेवर पण उमटले, कसलाही सारसार विचार न करता, स्वतःला हीन-दीन ठरवून निर्णय घेऊन टाकायचा. एकीनी अल्पवयीन मुलीच लग्न कराचे रातोरात ठरवले आणि दुसरिने त्याबद्द्ल टाहो फोडायचे.

महिला आणि बाल्कल्याण मंत्रालय, NGOs अश्या कित्येक कितीतरी ठिकाणी मदत मिळू शकते. काहीतरी ठोस करायचे असेल तर. नुसती त्या मुलीची महिती अश्या संस्थांना पुरविली तर दुसरी मुलगी वाचू शकते. खरोखर काही सकारात्मक व्हावे असे वाटत असेल तर शिक्षणाचा वापर लेख लिहिण्याबरोबरच मदतीचा अर्ज करण्यात पण केला तर जास्त फरक पडेल. एकीला अजून वाचवू शकते ना? काहीच करणे शक्य नसेल तर दुसर्‍या मुलीबद्द्ल लेख लिहिणे योग्य आहे का? It's nothing but mere coffee table gossip. लेखिकेला वाईट वाटले आणि तिला फक्त लिहिणेच शक्य म्हणून तिने अजून लोकांना वाईट वाटवून दिल. जमल्यास थोडी दहशत पण पसरली. News flash : अश्या घटना सर्वत्र घडत असतात, त्याचे असे पडसाद पण बहुतेक पसरतात, सगळ्यांना ऐकून वाईट वाटत, बरेच लोक लेख लिहितात नाहीतर बातम्या देतात नाहीतर चर्चा करतात.

राजसी, भारतात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींची दुसर्‍या देशात घडणाऱ्या घटनांशी तुलना करणे फारसे उपयोगी आहे असे वाटत नाही. विशेषतः जेव्हा मूळ लेखात अशी तुलना केलेली नसताना.
अल्पवयीन विवाह रोखण्यासाठीचे तुम्ही सुचवलेले मार्ग हा एक मुद्दा वगळता तुमचे ह्या धाग्यावरचे प्रतिसाद पटले नाहीत.

महिला आणि बाल्कल्याण मंत्रालय, NGOs अश्या कित्येक कितीतरी ठिकाणी मदत मिळू शकते. काहीतरी ठोस करायचे असेल तर. नुसती त्या मुलीची महिती अश्या संस्थांना पुरविली तर दुसरी मुलगी वाचू शकते. खरोखर काही सकारात्मक व्हावे असे वाटत असेल तर शिक्षणाचा वापर लेख लिहिण्याबरोबरच मदतीचा अर्ज करण्यात पण केला तर जास्त फरक पडेल. एकीला अजून वाचवू शकते ना? काहीच करणे शक्य नसेल तर दुसर्‍या मुलीबद्द्ल लेख लिहिणे योग्य आहे का? It's nothing but mere coffee table gossip. लेखिकेला वाईट वाटले आणि तिला फक्त लिहिणेच शक्य म्हणून तिने अजून लोकांना वाईट वाटवून दिल. जमल्यास थोडी दहशत पण पसरली. News flash : अश्या घटना सर्वत्र घडत असतात, त्याचे असे पडसाद पण बहुतेक पसरतात, सगळ्यांना ऐकून वाईट वाटत, बरेच लोक लेख लिहितात नाहीतर बातम्या देतात नाहीतर चर्चा करतात. >>>> +१

माझ्याही मनात अगदी हेच आले होते पण प्रतीसाद देणे टाळल्

खरच तीला मदत करायची असल्यास अगदी गुपचुप ही माहिती एखाद्या NGO किंवा समाजसेवा संस्थेला द्या

बाकी ईतर वादात मला पडायचे नाही.

त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात>>>>
कदाचित त्यानी लग्न ठरवले तर मुलगी अल्पवयीन आहे अशी तुम्ही पोलिसात तक्रार कराल अशी भितीही वाटली असेल

कदाचित त्यानी लग्न ठरवले तर मुलगी अल्पवयीन आहे अशी तुम्ही पोलिसात तक्रार कराल अशी भितीही वाटली असेल>>>>>>>>>>> मला नाही वाटत तसे असेल म्हणून.मुळात कोणालाही सल्ला नको असतो.यांना,आपण काही चांगल्यासाठी सांगतो हे पटत नाही किंवा घरचे/आजूबाजूच्यांचे प्रेशर असते.

सर्वसाधारणपणे घरकाम करणार्‍या स्त्रिया ज्या आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमीतून आलेल्या असतात तेथे नवरेशाही, रुढी, जुनाट विचारसरणी ह्यांची तीव्रता अधिक असते. त्या लोकांना कोणी काही सांगून बहुधा फरक पडतच नाही. त्यांचे सगळे काही ठरलेले असते व ते तसेच करतात. वरवर दाखवायला 'हो ना, अगदी खरे आहे तुम्ही म्हणता ते' असे बोलून जोरजोरात माना डोलावतात पण नंतर 'मी काय करणार, घरच्यांचे सगळ्यांचेच मत असे होते' असे बोलून मोकळ्या होतात. किंबहुना, ते त्यांचे स्वतःचेही मत असू शकते

देवकी ह्यांचा वरील लेटेस्ट प्रतिसाद वाचून हे लिहावेसे वाटले.

असे ल्ग्न थांबवणे मला तरी अवघड वाटते.जरी त्या मुलीच्या घरच्यांना जर संशय आला तरी ते गावी जाऊन ल्ग्न करतील. त्या मूलीचे ल्ग्न जर १५ व्या वर्षी होणारच असेल तर, शालेय शिक्षणाबरोबर फॉल बिडिंग, टेलरिंग, अंगणवाडी सेविका, नर्सिंगसारखे तीला स्वताचा पायावर ऊभे रहाता येतील असे कोर्स करणे योग्य होईल.

ही घटना - विद्या आणि मी रहातो तिथून खूप जवळच्या ठिकाणी घडली. माझ्या मावशी रहतात त्या भागात. त्याचे पडसाद विद्याच्या लिखाणात - माझ्या सारख्या वाचकाच्या प्रतिसादात दिसू नयेत - ही अपेक्षाच मजेशीर आहें . आमच्या सोसायटीने त्या कुटुंबियाना मदत करण्याकरता कोंट्रिब्युशनही काढलय स्वत:हून.
ह्या घटनेचा परिणाम आम्हा सर्वांवर आमच्याकडे कामाला असलेल्या व्यक्तिंवर झालाय.
बलात्काराच्या बातम्या आपण सगळेच वाचतो - संतापतो- नंतर सोडून देतो.
पण जिथे ही गोष्ट घडली आहे तिथल्या बायकांवर ह्याचा किती गंभीर परिणाम होतो हे जाणवतय का? आमच्या मावशी तिथेच रहातात जवळं . त्याच्या मनात ही भिती स्पष्ट दिसते. त्या भागाच्या जवळ आम्ही सहज संध्याकाळी फिरायला जायचो. २ महिन्यातली ही दुसरी घटना म्हटल्यावर आता नकोच वाटणार ना! हा सरळसरळ माझ्या सुरक्षित वाटण्यावर - माझ्या बाहेर जाऊ शकण्यावर घालाच ना? जी भीती निर्माण झाली ती वेगळीच.
ह्याचा परिणाम मुलींवर - स्त्रियांवर अधिक बंधनं येण्यात आणि त्यांची लवकर लग्न होण्यात होतो. ह्या लवकरच्या लग्नांमुळे तत्यांचा आर्थिक- सामाजिक स्तर खालावतो.
शिक्षणाची - आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी हुकते. हे सगळं पुरेसं गंभीर नाहिये का?
ह्यात भारत अमेरिका कुठून आली?
आणि हा कंसेंट सकट असलेला अल्पवयीन प्रणय नव्हे. ती मुलगी त्या दिवसापासून बोलत नाहिये! She is in a state of deep shock!
विद्या न शेअर केलेला अनुभव हा अशा घटनांचा इतर बायकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो ह्याच चांगल डोक्युमेंटेशन आहें.

माझ्या माहितीनुसार

1. भारतात पालकांच्या परवानगीने १४+ वर्षाच्या मुलीशी लग्न करणे कायदेशीर आहे.
2. जर मुलीला स्वतःच्या मर्जीने पालकांच्या परवानगीशिवाय लग्न करायचे असेल तर त्यासाठी १८ वय लागते.
3. भारतात लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नाही.

त्यामुळे लेखातली मोलकरीण जे करतेय ते लिगल आहे.

आणि लग्न झाल्यावर शरीरसंबंधासाठी स्त्रिचा कंसेंट लागणे वगैरेतर प्रश्नच उद्भवत नाही वय १४+ असेल तर.

1. भारतात पालकांच्या परवानगीने १४+ वर्षाच्या मुलीशी लग्न करणे कायदेशीर आहे.
>> खरंच??? Uhoh

1. भारतात पालकांच्या परवानगीने १४+ वर्षाच्या मुलीशी लग्न करणे कायदेशीर आहे.>> नाही हो.

अ‍ॅमी ,
तुमची माहिती चुकीची आहे.

विवाहासाठीचे वय पालकांची संमती असेल तरी मुलींसाठी अठरा आणि मुलांसाठी २१ च आहे.
कंसेंट फॉर सेक्शुअल इंटरकोर्ससाठी १६ वर्षे जर ती मुलगी त्या माणसाची धर्मपत्नी असेल/ नसेल तर आणि १४ (की पंधरा) जर धर्मपत्नी असेल तरिहीअसे आहे.

मिनिमम एज फॉर मॅरिज कायद्याने बदलले पण त्याचवेळी कंसेंटचा कायदा मॉडीफाय करायचा बहुदा राहून गेले असावे.
Wink

विवाहासाठीचे वय पालकांची संमती असेल तरी मुलींसाठी अठरा आणि मुलांसाठी २१ च आहे. >> जर १८- मुलीने पळून जाऊन 'स्वतःच्या मर्जीने' लग्न केलं तर पालक तिच्या नवर्याविरूद्ध फूस लाऊन पळवणे+बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकतात. ie पालकांच्या विरोधात लग्न करण्यासाठी १८+ वय लागतं. पालकांची संमती असेल तर १४+ वयात लग्न करून देता येते.

कंसेंट फॉर सेक्शुअल इंटरकोर्ससाठी १६ वर्षे जर ती मुलगी त्या माणसाची धर्मपत्नी असेल/ नसेल तर आणि १४ (की पंधरा) जर धर्मपत्नी असेल तरिही असे आहे.
मिनिमम एज फॉर मॅरिज कायद्याने बदलले पण त्याचवेळी कंसेंटचा कायदा मॉडीफाय करायचा बहुदा राहून गेले असावे. >> लग्नांर्गत बलात्कार हा गुन्हा नाही त्यामुळे कंसेंटचा प्रश्नच येत नाही. लग्न केले म्हणजेच लाइफटाइम कसेंट दिलाय.
लग्न केले नसेल तर मात्र age of consent १८ आहे बहुदा.

कोणी वकील किंवा कायदेतज्ञ आहेत का इथे? त्यांनी जास्त प्रकाश पाडावा.

या वर्गात शिक्षणाचे एकुण प्रमाण कमी असते. मुलींना रसही नसतो शिक्षणात . १३ व्या वर्षी शिक्षण सोडून घरात बसलेल्या मुलीचे काय करायचे याचा पालकांना प्रश्न पडतो. वस्ती अशी असते की घरात एकटी मुलगी ठेवायचे पण जिवावर येते. (आई घरकाम आणि बाबा अशाच काहीतरी कामाला). माझ्या बाईची फार मोठी दर्दभरी कहाणी आहे या संदर्भात. तिच्या मुलींच्या प्रकरणामुळॅ तिच्या सतत दांड्या आणि सततच्या दांड्यांमुळे मला मनस्ताप. शेवटी मुलींचे लग्न करुन देऊन ती सुटली आणि मीही.

काहीच करणे शक्य नसेल तर दुसर्‍या मुलीबद्द्ल लेख लिहिणे योग्य आहे का? >> असहमत

बऱ्याच बाबतीत आपला मध्यमवर्गीय भिडस्त स्वभाव मध्ये येतो , किंवा इतर अजूनही इतर करणे असू शकतात. पण आपण मदत करू शकत नसल्यास , त्याबद्दल आपली मतेसुद्धा मांडू नयेत, ही अतिशयोक्ती ठरेल.
कदाचित अशा लेखांमुळे प्रत्यक्ष बदल घडत नसेल, पण विचारांचे आदानप्रदान घडते, हेही नसे थोडके. अशा छोट्या-छोट्या ठिणग्यांनी प्रत्येकवेळी अचानक वणवा पेटत नसला, तरी निखारे धगधगत राहतात.

त्या मुलीबद्दल किंवा तिच्या आईबद्दल मला इतकी माहिती नाही की ज्याने मी त्याच्याबद्दल तक्रार करावी. त्या मावशींनी मुलीची १० वी करणारच आहे असे सांगितले होते. त्यामुळे खरंच तिचं लग्न आता लगेच होईल का नाही हे माहिती नाही. त्यामुळे तिच्याबद्दल पोलिसात तक्रार करणे वगैरे गोष्टी मला योग्य वाटल्या नाहीत.पण बलात्काराच्या घटनेमुळे लोक असा विचार करतात हे मांडणं मला गरजेचं वाटलं.

भारतात, लग्नानंतरही बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकतो नवऱ्याविरुद्ध अशी एक केस मी मध्ये वाचली होती. ज्यात निकाल मुलीच्या बाजूने लागला होता.

माझ्या माहितीप्रमाणे, १८ वर्षे हे लग्नाचं वय आहे, संमतीशिवाय किंवा समंतीने. कुणाला तरी विचारून नक्की इथे सांगेन.

ही पोस्ट का लिहिली यावरचे कमेंट वाचून हसू आले. बाकी इतक्या अवांतर गोष्टीच्या चर्चा होऊ शकतात तर या विषयावर का लिहायचे नाही? अजून तरी मला माझे लेख प्रसिद्ध करण्यास अयोग्य आहेत असा मेसेज आलेला नाहीये. त्यामुळे मी लिहीनच !!!

नानबा, अतिशय योग्य कमेंट.
पियु, तुझी लिन्क वाचली होती आधीच. यात मुख्य पी आञ, जे होते सम्भाजी कदम यानी ती पोस्ट केली होती. त्यानी तपास करतानाचा त्यान्चा अनुभवही फेबू वर लिहिला आहे.
विद्या.

बलात्काराच्या घटनेमुळे लोक असा विचार करतात हे मांडणं मला गरजेचं वाटलं.>>>> this is news to you is a shocking surprise to me. Please, if possible ask maids and such why do they keep drunkard husbands even though they don't work or earn and hit them, also snatch their money and hit them more to go out and earn so that they can drink. You will get material for one more article and new realisation in the life. Happy realisation Happy

हम्म!
विद्या, तुम्हाला वाटणारी कळकळ पोहोचली.
नानबा, उत्तम पोस्ट!
पियू, लिंकबद्दल धन्यवाद.

इथे वर राजसी यांचा मुद्दा- >>हायस्कूल सेक्स / Dating प्रकारच्या लैंगिक शोषणाबद्द्ल मी आजवर कोणालाच गळा काढताना अथवा त्यामुळे (त्याच्या अस्तित्वामुळे) कोणी भितीच्या आवरणाखाली जगतयं असं कधी वाचनांत आले नाही. म्हणून माझा प्रश्न असं का बरं होत असावं ? तिथे सुद्धा परिस्थिती सारखीच आहे पण कोणी ब्र काढत नाही. >>
डेटिंग हे दोन्ही बाजूच्या मर्जीचा मामला. हायस्कूल सेक्स बाबत आमच्या स्टेट पुरते बोलायचे तर कसेंटचे वय १६ मात्र लैंगिक शोषण होवू नये म्हणून ऑथॉरिटी फिगरशी संबंध आल्यास तेच वय १८. जोडीला ज्याला स्टॅच्युटरी रेप म्हटले जाते त्या बाबत एक रोमिओ-ज्युलिएट कायदा आहे. यात १४-१५ वयाची व्यक्ती राजीखुशीने संबंध ठेवू शकते मात्र दोन पार्टीच्या वयातील अंतर ४ वर्षापेक्षा जास्त नको. त्यामुळे हे हायस्कूल मधील कंसेंटने सेक्सला रोमीओजुलिएट कायद्याचे संरक्षण असते. शोषण होऊ नये म्हणून सेक्स ऑफेंडर रजिस्ट्री , चाईल्ड प्रोटेक्शन सर्विस वगैरे प्रयत्न केले जातात. बाकी लैंगिक शोषण आणि ऑन कॅम्पस सेक्शुअल अ‍ॅसॉल्ट बद्दल इथेही मनात काळजी असतेच आणि त्याबद्दल आवाज उठवणे, व्यवस्था अजून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे चालते.
मला पडलेला प्रश्न - अमेरीकेतील राजीखुषीने चालणारे हायस्कूल डेटिंग/सेक्स आणि वस्तीतील असुरक्षित वातावराणात जगताना बलात्काराच्या भीतीमुळे अल्पवयीन मुलीचे पालकांनी ठरवून होणारे विवाह याची तुलना कशाला?

विद्या,
तू रहातेस त्याच सोसायटीत माझं माहेर आहे.
भारतवारीत पहिल्यांदा भावाच्या नवीन घरी आले तेंव्हा अगदी सेम कथा, कामवाल्या मावशी खूप गप्पा मारतात .
अर्थातच बोलण्यातून पोरींचा विषय निघाला, मुलींना घेउनही येतात कधीकधी त्या , १३-१४ वाटली वयानी.
त्यांना म्हंटलं इतकी लहान आहे लग्नं कसलं करता, रोज ब्रेन वॉश करायचा प्रयत्न!!
हो हो म्हणायच्या , मग म्हणे स्थळं चांगली येतात! त्यांना म्हंटलं लग्नं ठरवलत तर मीच आणते पोलिसांना.
त्यावर हसायला लागल्या, म्हंटल्या बर नाही करत तिच् लग्नं इतक्यात.
नंतर मी इथे परत आल्यावर एक दिवस आईनी सांगितलं कि झालं त्यांच्या पोरीचं लग्नं!
आईला त्या म्हंटल्या की ताईंना सांगु नका बर का :).
पुढच्या भारतवारीत् त्या पुन्हा भेटल्या , म्हंटलं केलत ना पोरीचं लग्नं, तर म्हणे आमच्यात घोडनवरी म्हणतात या वयातल्या मुलीला, सामाजिक प्रेशर इ. कारणं !
काय बोलणार, त्या ज्या कम्युनिटीत रहातात तिथला दबाव नसेल झेपला, शिवाय बिनकामाचा नवरा, दारु , या मुलीमागे अजुन मुली लग्नाच्या इ. इश्युज आहेतच.

सेकण्ड अमेण्डमेन्ट चा उल्लेख एडिट केला का? दिसलाच नाही कुठे राजसी च्या पोस्ट्स मध्ये.

पार्च्ड सिनेमा आठवला आताच बघितलेला.

पुण्यात अल्पवयीन लग्नाच्या केसेस घडत असतील असं वाटलं नव्हतं. मला वाटलं ह्या गोष्टी रुरल भागापुरत्याच घडतात.

Pages