बलात्कार असाही आणि तसाही

Submitted by विद्या भुतकर on 29 August, 2016 - 08:01

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले. निदान सार्वजनिक संडास बांधले तर काही मदत होईल का असेही बोलणे झाले. असो. तर माझं त्यावरचं ज्ञान इतकंच. ह्याकडे मी पुन्हा वळेनच.

सध्या एक मावशी आमच्याकडे साफ सफाईला येत आहेत. आईंनी सर्व सेट करून दिल्याने मला त्यांचे नाव, गाव पत्ता फोन काहीच माहित नाही. त्या नियमित घरी येऊन सफाई करून जातात त्यामुळे त्यावाचून काही अडलेही नाही. मध्ये दोनेक दिवस त्या सलग आल्या नाहीत. म्हणून मी त्यांना विचारलेही, "मावशी काय हो आला नाहीत दोन दिवस?"

त्या,"होय, ते परवा आमच्या इथं असा किस्सा घडला ना? त्यामुळे सगळे घाबरले आहेत. "

खरंतर त्यांनी सांगितले तेंव्हा मला पहिल्यांदा कळले की काय झाले होते.

पुढे मग त्या बोलल्या,"अन दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुलीला बघायला पाव्हणे आले होते."

मी,"अरे वा ! काय झालं मग?"

त्या,"होय, येतील ते परत बोलनी करायला."

मी,"बरं."

आता हा विषय इथंच संपला असता. पण का कुणास ठाऊक मी विचारलं,"मावशी तुमची मुलगी किती वर्षाची आहे?"

त्या,"१४ झाले की आता."

आणि इथेच माझं धाबं दणाणलं. पण मी शांतपणे त्यांच्याशी बोलत राहिले. म्हटलं,"का हो मावशी इतक्या लवकर करताय? शाळेला जाते का? कितवीला जाते? "

त्या,"आता नववीला आहे. आमचे मिस्टर तर म्हणताय की आता हे असे किश्शे हितं व्हायल्यात. त्यापेक्षा पोरगी तिच्या घरी गेलेली बरी ना? आम्ही पण लवकरच गावाला जाणार आहे. ".

हे ऐकून तर मला अजून काही सुचेना. बरं आता अशा प्रसंगी काय धीर द्यायचा याचे माझ्याकडे हे ऑपशन होते आणि त्यातला कुठलाही योग्य नाहीये.

१. मावशी अहो, असं काय करताय? आता त्या पोरीचं झालं म्हणजे तुमचं असं होईल असं थोडीच आहे? - वा ! म्हणजे जिचं झालं ती बिचारी तर किती कष्टात आहे आणि केवळ त्यांच्या मुलीवर नाही झाला म्हणून हुश्श म्हणायचं? आणि मी तरी कसं सांगणार त्यांना हे ठणकावून?

२. अहो, आपल्या हातात थोडीच आहेत या गोष्टी? आपण आपले प्रयत्न करायचे? - म्हणजे काय? किती होपलेस वाक्य आहे? एक तर त्यात मी त्यांना सरळ सांगतेय की आपल्या हातात काही नाहीये. कुठेही धीर देऊ शकत नाहीये आणि शिवाय आपण प्रयत्न करणे म्हणजे तरी काय? पोरीला नीट अंग झाकून जा म्हणायचं? की आणखी काय?

३. गावी जाऊन किंवा लग्न करून काय होणार आहे?- म्हणजे लग्नानंतरही मुलीला सुरक्षिततेची काहीही अपेक्षा नाहीये आणि दुसऱ्या गावाला जाऊनही नाही. होय ना?

खरंच, यातलं एकही वाक्य मी त्यांना बोलू शकत नव्हते. मग बोलणार तरी काय?

मी म्हटलं,"मावशी, अहो असं काय करताय? १४ वर्षं लहान आहे."

त्या,"आता लगेच नाही करणार. अजून एक वर्ष आहे."

मी,"म्हणजे तरी १५ च ना? आणि तुम्हाला माहितेय ना १८ वर्षापर्यंत लग्न करता येत नाही कायद्यानं?"

त्या जरा बिचकल्या, म्हणाल्या,"होय माहितेय. पन आमच्याकडं लौकरच करत्यात. इतकी वर्ष नाय थांबणार."

मी,"अहो पण १४-१५ वर्षात लग्न करून मुलीला पुढं मुलंबाळं झाली लवकर आणि त्रास झाला तर?"

मी टीव्ही वरच्या सर्व जाहिराती आठवून त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याही मला उत्तरं देत होत्या.

मी,"अहो तिला निदान १२ वि तरी करू दे. शिकली तर पुढं स्वतःसाठी काहीतरी करेल."

त्या,"हा आम्ही करूच एक वर्ष तिचं १० वीचं. पन पुढं तिच्या सासरचे शिकवतील की त्यांना वाटलं तर."

मी आता काय बोलणार? म्हणजे एकतर मुलीला शिकवायचं नाही, इतक्या लहान वयात लग्न करायचं आणि शिवाय वाटलं तर सासरचे शिकवतील असं म्हणायचं? मी त्यांची उत्तरं ऐकून शांत झाले. एकदाच समजावणीच्या सुरात बोलले,"मावशी, उगाच घाई नका करू. मुलीला थोडं मोठं होऊ द्या अजून. शिकू द्या १२ वि तरी. "

हे सर्व बोलून मी तो विषय सोडून दिला. पुढं काही झालं तर बोलू म्हणून गप्प बसले. मध्ये दोन दिवस मी जरा बाहेर गेले होते. परत आल्यावर कळलं आमच्या मावशी कामाला येणार नाहीयेत.

आईंना म्हटलं,"काय झालं हो?"

त्या म्हणाल्या, "माहीत नाही. पण जमणार नाही म्हणाली आणि यायची बंद झाली".

मला वाटलं, त्यांचा नवरा म्हणाला होता की कामं सोडून तिच्यासोबत घरी राहा म्हणून खरंच त्या काम सोडून घरी राहत आहेत की काय. पण परवा मी त्यांना परत बिल्डिंग मध्ये पाहिलं आणि मला कळलं की त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात.

खरं सांगू का, थोड्या दिवसांत मी इथून जाणार. म्हणजे पुढं काय झालं ते मला कळणार नाहीच. जे काही होईल त्यात मी तिकडून काहीही करू शकणार नाही. त्यांचं आणि माझं आयुष्य असंच चालू राहील. त्या सोडून गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला नवीन व्यक्ती मिळाली कामाला. तीही बिचारी आपल्या लहान मुलींना आता स्वतः शाळेत सोडायला आणि आणायला जात आहे. हे सगळं ऐकून, बघून खूप वाईट वाटतं आणि चीडही येते, या भयानक मनोविकृतीची. आणि मी यात काय करायला हवं हेही कळत नाही. पण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटतेय माहितेय का? या एका बलात्कारामुळे या अशा किती लहान वयातल्या मुलींची लग्नं होऊन अजून जे बलात्कार होणारेत त्यांची.

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बलात्काराच्या भितीनेच नव्हे तर इतरही गोष्टी त्यात समाविष्ट असाव्यात.दारिद्र्य,अपुरी जागा,शिक्षणाचा अभाव,भाईगिरी इ.

माझ्या मुलाला सांभाळायला येणार्‍या मुलीचे लग्न असेच १४-१५ वर्षी झाले होते.तिच्या आजीने ठरवले होते.मुलगी मला म्हाणाली 'ताई, तुम्ही पोलिसात तक्रार करा'.मी म्हटले तू स्वतः लग्न करणार नाही म्हणून सांग(.तेवढे त्यांच्या घरी वातावरण चांगले होते).तिच्या आईला बोलावून घेतले आणि सांगितले की माझ्या कामासाठी नाही म्हणत मी,तिला थोडी मोठी होऊ दे.त्यावर कळले की ती आई तिची सावत्र होती.तिने आजीला यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला होता.पण आजी म्हणाली की तुला कुठे बघवतंय,सवतीच्या मुलींचे चांगले झालेले.आजीने माझ्याविषयी पण तिला सांगितले की या बायकांना तुमच्या जिवावर नोकरी करायची असते म्हणून त्या लग्न करू नको म्हणतात.
लग्न झाल्यानंतर २-३ महिन्यांत ती परत आली.

देवकींच्या म्हणण्याप्रमाणे इतरही अनेक करणे आहेत. मला तरी वाटते, खरी करणे वेगळीच असावीत. पण बलात्काराचे कारण दिले, की विचारणाऱ्यांची तोंडे आपसूक बंद होतात.
पण म्हणून बलात्कार हे कारण असूच शकत नाही, असे नाही. कारण अजूनसुद्धा आपल्या मनात खोलवर असणाऱ्या योनिशुचितेच्या मध्ययुगीन कल्पना. एका बाजूने शरीरसंबंधाविषयीचा चोरटेपणा आणि पावित्र्याच्या चुकीच्या धारणांमुळे बलात्कारात वाढ होतेय, अन दुसरीकडे जिने प्रत्यक्ष अत्याचार सहन केलेत, तिच्याविषयी सहानुभूती सोडा, शिव्यांची लाखोली वाहिली जाते.
आज उपवर मुलांमधले किती जण बलात्कारितेशी लग्न करण्यास तयार होतील? काही अपवाद असतील, ते नियम सिद्ध करण्याइतपतच. Sad

या एका बलात्कारामुळे या अशा किती लहान वयातल्या मुलींची लग्नं होऊन अजून जे बलात्कार होणारेत त्यांची.>>>> आपले म्हणणं खरंय!

Please ch.

Tyaa American na kasa bharat dakhavaycha asel tar bakalpana aani ughadi-nagdi mula aani bhar Mumbai the firnare hatti aani sadodit galyat har latkavun firnare lok dakhavatat tase so called American Indian na suttit bhartat aala ki athava tithe basun fakt ashyach batmya filter hooun distat

राजसी, मी झालेला किस्सा लिहिला आहे. यात कुठेही काहीही जास्त कमी लिहिले नाहिये. आणि जे लिहिले आहे त्यावर मत द्याल तर बरे होईल. माझ्याबद्दल अशी तुम्हाला काय माहिती आहे ज्यावरुन तुम्ही असे मत देत आहत?

राजसी मी भारतीय असल्याने अमेरिकन न्यायव्यवस्थेवर जास्त बोलू शकत नाही. पण माझे जिथे जे अनुभव येतात आणि त्याबद्दल जरुर लिहिते. मग ते कुठलेही असोत.

स्वाती, प्रयत्न करते अमेरिकेत टूरिस्ट व्हीसावर जाऊन आल्यावर. Happy
पण केवळ एका प्रसन्गामुळे किती लोकाना कसा परिणाम होऊ शकतो हे जवळून पाहिले. आणि त्यातही लहान मुलीन्चे नुकसान होत आहे हे पाहून वाईट वाटले.

विद्या.

Whether high school dating doesn't involve under age sex? Does it have some different name or falls under different category? Why not compare two underage sex scenarios? Why it''s big debate point if it happens in India but in America it's called culture? What's the difference? If someone wants to raise voice against an inappropriate thing I am here to give +1. But don't just target Indian scenario; make a complete write up about us or other developed countries as well as wherever ladies are going through such a situation all over world.

'कन्सेन्ट' असा एक शब्द माहीत आहे का तुम्हाला?

>>> ut don't just target Indian scenario
का? त्या भारतीयच आहेत. त्यांनी का नाही लिहायचं भारताबद्दल?
तुम्हाला खरंच वाईट वाटलं असेल तर नीट माहिती काढा आणि लिहा एक तौलनिक लेख जगभरातल्या स्त्रियांबद्दल. ते खरं उत्तर ठरेल.
आक्षेप घ्यायला काय लागतं?!

Where is the consent in Indian scenario?

अंडर एज सेक्स आणि अंडर एज लग्न सारखंच आहे का हल्ली भारतात? अमेरिकेत तरी नाही ब्वा. का सेक्स म्हणजे लग्नच?
विभू ना काय वाटतं ते त्यांनी लिहिलं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा. त्यांनी हेच लिहिलं पाहिजे हे जरा अती नाही का होत?

लेख परत दोनदा वाचला. कुठेही अमेरीकेचा उल्लेख आढळला नाही. त्यात हे सेकंड अमेंडमेंटचं काय अजून? राजसी, त्या मुलीवर बलात्कार झालाय हे लिहीलेलं वाचलंत ना तुम्ही? की यात अमेरीकेचा हात आहे असं वाटतंय तुम्हाला? रीअली कन्फ्युज्ड...

राजसी हायस्कूल सेक्स आणि अंडरएज मॅरिज दोन वेगळ्या गोष्टी नाहीत का?

अंडरएज मॅरिजनंतर गळ्यात अख्ख्या संसाराची जबाबदारी/ मुलंबाळं सगळं पडणार असतं, त्या मुलीचं सगळं बालपण संपून पोक्तपण येणार असतं. ते ही जबरदस्तीने, आईवडिल सांगतात म्हणून.

हायस्कूल सेक्सनंतर (सेफ सेक्स) गरोदरपण, संसाराचि जबाबदारी येईलच असे नाही.
आईवडिल कदाचित या सगळ्यातून काही काँप्लिकेशन्स झाले तर बाहेर पडण्यास मदत करू शकतात.
आणि बालपण हरपतंय किंवा लवकर पोक्तपण येतंय असंच काही नाही.

तेवढ्यापुरता अनुभव घेऊन मुली मूव्ह ऑन होऊ शकतात जे घरच्यांनी लग्न लावून दिल्यास अजिबातच शक्य नाही.

अंजली, कन्फ्यूज नको होऊस.
अमेरिकेत गन कन्ट्रोल झालेला नसताना भारतीयांनीतरी भारतात घडलेल्या स्त्रीशोषणाच्या घटनेबद्दल का लिहायचं - असं त्या म्हणतायत.

क्लिअरली अनुक्रमे (ऑब्झर्व्ड डिवेलप्ल्ड आणि डिवेलपिंग ऑर अंडर डिवेलप्ड) थर्ल्ड वर्ल्ड आणि फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज मधले प्रॉब्लेम्स आहेत. आता थर्ड वर्ल्ड संबोधण्यालाही निगेटीव कनोटेशन आहे पण त्याबद्दल सॉरी.

अमेरिकेत गन कन्ट्रोल झालेला नसताना भारतीयांनीतरी भारतात घडलेल्या स्त्रीशोषणाच्या घटनेबद्दल का लिहायचं - असं त्या म्हणतायत.>>> Happy

अंडरएज मॅरिजनंतर गळ्यात अख्ख्या संसाराची जबाबदारी/ मुलंबाळं सगळं पडणार असतं, त्या मुलीचं सगळं बालपण संपून पोक्तपण येणार असतं. ते ही जबरदस्तीने, आईवडिल सांगतात म्हणून. >> +1

मुळात, दुसर्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून आपल्या १४ वर्हाच्या मुलिचे लग्न करायला जाणे यात कुणालाच काही चूक वाटत नाहिये का?
मला या फालतू, अमेरिका आणि भारत या मधेच घुसडलेल्या विषयाचा अतिशय राग येत आहे सध्या. बलात्कारामुले बाकी लोकान्वर काय परिणाम होतात हे जवळून पाहिल आणि तो अनुभव लिहिला आहे. त्यावर बोललात तर बरे होईल.
विद्या.

मला तर या फालतू अमेरिका आणि भारत घुसडलेल्या विषयाने फार मज्जा येत आहे. रादर त्यामुळेच इथे आलो.

बाकी बलात्कार इ. विषय चावून चोथा झालेले आहेत. त्यावर बोलण्यासारखं काहीही नाही. (ते प्रश्न खरेच आहेत. वास्तव आहेत. भयानक आहेत, प्रचंड आहेत हे जाणतो. पण या व्यासपीठावर धागा काढून एकत्र चार अश्रू ढाळणे सोडून काहीही होणार नाही. अर्थात काही झालं तर उत्तमच आहे)
अमित

विद्या
मला या फालतू, अमेरिका आणि भारत या मधेच घुसडलेल्या विषयाचा...

अमितव
मला तर या फालतू अमेरिका आणि भारत घुसडलेल्या विषयाने....

विद्या यांनी फालतू या शब्दानंतर स्वल्पविराम दिला तसा अमितव यांनी न दिल्याने ते "फालतू अमेरीका" असे झाले आहे आणि भारतीयांनी ईथे एक गुण पटकावला आहे Happy

राजसी तै विषय भरकटवण्यात माहिर आहेतच. त्यांना काय मनावर घ्यायचं?? पॉईंट काय आहे लेखाचा ते न बघता द्यायचं टायपून आपलं काहीही!

विद्या, तुझी तळमळ पोहोचली. तू तुझा अनुभव लिहीलास, तुझ्या परीने प्रयत्न केलास एक अंडरएज लग्न थांबवण्याचा.

मान्य आहे - इथे चर्चा करून काही हाती येत नाहीत पण म्हणून अनुभव लिहू नये असं थोडंच आहे!

राजसी, तुम्ही आधी मराठीत लिहायला शिका.
भारत अमेरिका नंतर बोलू.
विषय काय तुम्ही बोलताय काय.. काहीही.

नंबर ३ वाक्य बोलून दाखवायचे की. लग्नानंतर पोरीवर बलात्कार झाला आणि नवर्‍याने परत तुझ्या दारात आणून टाकली तर तिला तुझ्यासारखी सफाई कामाला लावणार का? असं खडसून विचारायचं की. रोजगार मिळेल असे एखादे तरी कौशल्य शिकून मग लग्न करावे, नुसते १० वी केली, १२ वी केली तर काय होणार.

हा लेख अतिशय आवडला. एखाद्या मुलीच्या आयुष्याने असे वळण घ्यावे आणि आपण फार काही करू शकत नाही ही जाणीव होते - असे अनुभव मनातून पटकन पुसता येत नाहीत. इथे शेयर करणे योग्यच.

या धाग्याच्या विषयासंदर्भात, राजसी सोडुन बाकी बायकांची मते पटली. बरेचदा असंच होतं ना? म्हणजे कोणीतरी एखादा आलेला अनुभव लिहितो आणि मग प्रतिसादात त्या विषयाच्या जवळ जाणारे इतर अनुभव लिहिले येतात.

मुळ लेखात अमेरीकेचा उल्लेख नाही मग अचानक विषय तिकडे कसा फिरला? इसकाळ च्या मु.पी. सारखा राजसीचा प्रतिसाद वाटतो. असो. . !

Pages