सिरीयल किलर डॉक्टर ......

Submitted by अजातशत्रू on 16 August, 2016 - 23:40

'डॉक्टर म्हणजे देवदूत' या समाजाला छेद देणारी घटना इतकंच या घटनेचे वर्णन करून चालणार नाही तर हे कसे शक्य झाले अन हे का घडले याचाही विचार होणे गरजेचे आहे .....
निसर्गरम्य सातारा जिल्ह्यातील धोम या गावातली काळजाचा थरकाप उडवणारी ही गोष्ट. एका पाठोपाठ सहा खून घडूनही तिथं एक डॉक्टर स्वतःला देवदूत असल्याचे भासवत होता. प्रत्यक्षात तो होता खुनी यमदूत ! त्या डॉक्टर संतोष पोळवरची ही पोस्ट...
डॉ. पोळच्या डोक्यात ज्याला मारायचे आहे त्याची पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार असायची. हत्या करण्याचा पूर्ण प्लॅन तयार असायचा. हत्या करण्याचा कालावधी तो आधी निश्चित करायचा अन मुक्रर केलेल्या दिवसाआधी तीन महिने तो कामाला लागायचा. त्यासाठी आधी तो जेसीबी भाड्याने घ्यायचा. जेसीबीवाल्याला त्याच्या फार्महाऊसवर घेऊन जायचा. खेडेगावात शिवारात असते तसे खोपटवजा आणि थोडे कच्चे बांधकाम केलेल्या त्याच्या या फार्महाऊसच्या मोकळ्या जागेपाशी जेसीबी आला की तो तिथं चार बाय दोनचा मोठा खड्डा खोदून घ्यायचा. सहा सात फुट खोल खांदून झाले की जेसीबीवाल्याची मजुरी देऊन त्याला आठवणीने सांगायचा, "मला शेतात नारळाची झाडे आवडतात. नवीन रोपे आणून या खड्ड्यात लावणार आहे !"
प्रत्यक्षात त्या खड्ड्यात तो त्याचे 'सावज' खलास झालं की पुरून टाकायचा.
त्यासाठी ज्याचा खून करायचा आहे त्याला कधी आमिष दाखवून, तर कधी गोड बोलून तर कधी ब्लॅकमेल करून तिथं बोलवायचा. मग त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून तो त्यांना विषारी वा तत्सम औषधांचे ओव्हरडोस द्यायचा. शिकार गर्भगळीत झालं की तो त्याला संपवून टाकायचा.

डॉ. संतोष पोळने डॉक्टरीची सुरुवात धोम या आडवळणाच्या गावातून केली. मातीचे घर आणि त्यावर पत्रे अशा रुपात त्याचा दवाखाना होता. धोमसह आसपासच्या गावातील नागरिकांना त्याचाच दवाखाना सर्वात जवळचा होता. महाराष्ट्रात आजही अनेक खेडोपाडी असे शेकड्याने डॉक्टर आढळतील, विशेष म्हणजे यांच्या पदवीची खातरजमा करण्याची कोणतीही यंत्रणा इंडियन मेडिकल कौन्सिलकडे नाही. ते पोलिसांच्या मागे टुमणे लावतात. आहे त्या कामांनी अन पुढारयांना सलाम ठोकून 'बेजार' झालेले पोलीस तरी काय काय करणार ? असो... तर ह्या डॉक्टरची लवकरच पंचक्रोशीत ख्याती झाली, गावातील राजकारणी आणि उच्चभ्रू लोकांसोबत उठबस वाढली. त्याच्याकडे येणारया लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली अन त्याची नियत बिघडू लागली. आर्थिक देवाण घेवाणी वरून ज्याच्याशी वाद होऊ लागले त्यांना गोत्यात आणण्यासाठी त्याने एक नामी अस्त्र शोधून काढले. त्याच्याकडे येणारया 'नेमक्या' महिलांना तुम्हाला गुप्तरोग आहे असे सांगायचा अन पुरुषांना सांगायचा की तुम्हाला एड्स झाला आहे. असे खोटेनाटे सांगून तो ब्लॅकमेलिंग करू लागला. त्याच्याकडे गेलेल्या पेशंटला तो म्हणायचा, 'तुम्हाला गंभीर आजार झाला आहे. त्यासाठी तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावे लागेल. उपचारासाठी परत-परत यावे लागेल,' असे सांगून तो रुग्णाला कधी इलाजाच्या बहाण्याने तर कधी कामाच्या निमित्ताने त्यांना फार्महाऊसवर नेऊ लागला. त्या व्यक्तींना तिथं नेऊन तो त्यांच्याशी लैंगिक कृष्णकृत्ये करायचा. त्याच्या या ब्लॅकमेलिंगची लोकांना कुणकुण लागली होती पण त्याचे त्यांपुढचे अघोरकर्म लोकांच्या नजरेस पडले नव्हते त्यामुळे दबक्या आवाजात त्याच्या बद्दल चर्चा वाढू लागली होती. त्याच्या सामाजिक प्रतिष्ठमुळे लोक त्याच्याविरोधात बोलण्यास घाबरत होते. त्याचा नेमका फायदा संतोष पोळने घेतला आणि त्याची 'चटक' व 'तलफ' वाढत गेली.....

मांजराने जरी डोळे झाकून दुध पिले तरी जगाला ते दिसत असते. सत्य हे कधी न कधी बाहेर येतेच. संतोष पोळचेही बिंग असेच फुटले. अंगणवाडी सेविका मंगल जेधे या अंगणवाडी सेविकांच्या संघटनाच्या पदाधिकारी महिलेची मिसिंगची तक्रार आली अन पोलीस खात्यावर दबाव वाढला तसे पोलीस लगेच सक्रीय झाले.
२००३ पासून वाई पोलिस स्टेशन हद्दीतून महिलांच्या मिसिंग कसे समोर येत होत्या. त्यामुळे वाई आणि आसपासच्या पोलिस स्टेशन अंतर्गत किती महिला मिसिंग आहे याची माहिती क्राइम ब्रँचने घेतली. यात मंगला जेधे, सलमा शेख, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, सुरेखा चिकने यांचे प्रकरण गंभीर होते. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात आल्यानंतर वेगाने तपास सुरु झाला. यातील सलमा, वनिता ह्या संतोषकडे नर्स म्हणून पूर्वी कामास असल्याची माहिती आल्यामुळे पोलिसांचे लक्ष या यमदूत डॉक्टरकडे गेले. शिवाय ज्या दिवशी मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवसाच्या लास्ट मोबाईल कॉलचे लोकेशन आणि त्याच काळातले संतोष पोळच्या मोबाईल लोकेशन एकच निघाले. आपल्यावर संशय घेऊन तपासाचा फास आवळला जातोय हे लक्षात येताच संतोषने कौटुंबिक कारणं सांगून तिथून सुं बाल्या केला. मंगल जेधे ह्या १६ जूनपासून गायब होत्या अन पोलिसांनी पाळत ठेवून १३ ऑगस्टला दादरजवळ अटक केली अन या सर्व गोरखधंद्यावरचा पडदा उठला. त्याला जेरबंद केल्यावर त्याने सर्व गुन्हे कबुल केले मात्र त्याने जी हकीकत सांगितली ती मात्र चक्रावून सोडणारी अन माणुसकीला काळीमा लावणारी होती. डॉक्टरी पेशाला तर पूर्णतः कलंकित करणारी होती.

घटना घडल्या दिवशी मंगल जेधे ह्या वाई येथून मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला निघाल्या होत्या. मात्र मंगल जेधे तेथे पोहोचल्याच नाहीत. ज्या ज्योती मांढरेमुळे मंगल जेधे आणि संतोष पोळ यांच्यात वाद झाला होता त्या ज्योती मांढरे हिला त्याने नर्स म्हणून कामावर ठेवले होते. पोलिसांनी तिलाच जेंव्हा आपल्या रडारवर घेतले तेंव्हा ती पोपटासारखी बोलू लागली अन सगळे क्ल्यू खुले झाले. तिने आपण तीन जीवांना विषारी औषधाचे ओव्हरडोस दिल्याचे कबूल केले. ज्योतीच मंगलला वाई बसस्टँडवरुन पोळच्या फार्म हाऊसवर घेऊन गेली होती. वाईपासून हे फार्म हाऊस १३ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून ह्या दोघी थेट फार्महाऊसवर आल्या अन मंगल जेधे आपल्या जीवाला मुकल्या...

मंगल जेधेंना संतोषच्या भानगडींची कुणकुण लागली होती. त्याचे आणखी काही स्त्रियांसोबत संबंध असावेत असा त्यांचा संशय होता अन झालेही तसेच. ज्योती मांढरे सोबत रासलीला करताना त्यांनी संतोष पोळला रंगेहाथ पकडले. आता मंगल जेधे आपल्याला जड जाईल हे लक्षात येताच संतोषने त्यांचा काटा काढला. फार्महाऊसवर 'नारळाच्या खड्डयाचे' खोदकाम करून घेतले ! २२ मे २००३ ला त्याने पहिला खून केला होता तो सुरेखा चिकणे यांचा होता. त्यांनतर १२ऑगस्ट २००६ रोजी वनिता गायकवाड, तर १५ ऑगस्ट २०१० रोजी जगबाई पोळ, १० डिसेंबर २०१५ ला नथमल भंडारी आणि १७ जानेवारी २०१६ ला सलमा शेखचा खून केला, आणि १६ जून २०१६ ला मंगल जेधे यांची हत्या केली. त्याने आणखी किती हत्या केल्या, किती जणांचे शोषण केले हे आणखी काही दिवसात स्पष्ट होईल.

संतोष पोळने त्याच्याकडे येणारे रुग्ण सोडले नाहीत की त्याच्या सहायक असणारया परिचारिका सोडल्या नाहीत. त्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत त्यांनाही औषधाचा डोस पाजून त्याच्याशी संबंध ठेवू लागला. याच साखळीत त्याने मंगल जेधेंना अडकवले. त्यानाही भूलथापा ठोकल्या. मात्र त्यांच्या हत्येतील तपासातच त्याचे आधीचे सर्व गुन्हे उघडकीस आले...

जिथे डॉक्टरची डिग्री खरी की खोटी हे लोकांना माहिती नसते तिथे औषधांविषयी असणारे शून्य ज्ञान, आपल्याला कोणती ट्रिटमेंट दिली जातीय हे माहिती नसणे या गोष्टी अशा लोकांच्या पथ्यावर पडतात. लोकांमध्ये काही रोगांची भीती असते, त्याबद्दल ते वाच्यता करायला घाबरतात वा त्याची खरी माहिती किंवा उपचारपद्धतीही त्यांना ठाऊक नसते. त्याचा अचूक फायदा घेण्याची मनोवृत्ती तिथे बळावते. मग गुन्हेगारी अन विकृतीला तिथे पालवी फुटते अन असे किस्से अधूनमधून आपल्या कानावर येत राहतात. भ्रामक कल्पना डोक्यात ठेवून सहज विश्वास ठेवणे, तथाकथित उच्चभ्रू लोकांना घाबरणे आणि सत्य समोर मांडायला कचरणे यामुळे या प्रवृत्तीचे फावते आणि आपण नेहमीप्रमाणे बैल गेला झोप केला या उक्तीने पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर कामाला लागतो. सजग आणि निर्भीड समाजच असे दुष्प्रकार थोपवू शकतो हे वेगळे सांगायला नको. पण या सर्व प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रास एक काळिमा लागला हे देखील खेदाने नमूद करावे वाटते एकीकडे असे किस्से कानावर येत असताना काही डॉक्टर्स आपल्या पदराला खार लावून रुग्णसेवा करतात त्यांचे मोठेपण अशा प्रसंगानंतर अधिक उठून दिसते .....

- समीर गायकवाड.

अधिक वाचनासाठी ब्लॉगवर भेटा ...
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_85.html

untitled-3_1471325232_147.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यालाच "विकृत" असे म्हणतात.
काल बातम्यांमधे या इसमाचे "डिपार्टमेंटमधिल" कनेक्शन बद्दलही बरेच सांगत होते. हे सर्व भयावह आहे, डिपार्टमेंटवरील विश्वास डळमळीत करणारे आहे.

आजच पेपरमध्ये वाचले. असे अनेक डॉक्टर्स अजूनही असतील.

>>>>यांच्या पदवीची खातरजमा करण्याची कोणतीही यंत्रणा इंडियन मेडिकल कौन्सिलकडे नाही.<<<<

म्हणजे काय? मुळात ही खातरजमा त्या कौन्सिलने का करावी? ते ज्यांना पदव्या देतात त्यांना ते डॉक्टर्स समजतात. त्यांनी पदवीच न दिलेला माणूस डॉक्टर म्हणून वावरू लागला तर त्याच्या खोटेपणाचा छडा लावण्याचे काम ह्या कौन्सिलचे कसे? ते तर पोलिसांचे काम ना? पोलिसांनी त्या भोंदूची पदवी क्रॉसचेक करण्यासाठी कौन्सिलची मदत घेणे समजू शकतो. तसाही मूळ संशय यायला हवा नागरिकांना! रुग्ण अंधविश्वास ठेवतात त्यामुळे फावते.

ह्या सगळ्याचं मूळ तद्दन सुमार शिक्षण दिले जाणे आणि जे शिक्षण मिळते त्याहीबाबत उदासीन राहणे ह्यात आहे.

-'बेफिकीर'!

(माझं म्हणणं होतं की गावाकडे स्वैराचार लपवायला इतके चार पाच खून करणे अटळ होते का?नुसते पैसे वगैरे देऊन किंवा दुसरीकडे पळून जाऊन मिटवता आले नसते का?जे सी बी वाला बोलावून पुराव्याचा धोका, खुद्द पुरण्याची मेहनत इ.इ. हे जरा जास्त वाटते.हां आता खूनाचीच चटक असेल तर बरोबर आहे.)

अनु, त्याचे त्या गावत established असणे हे गुन्हे लपवायला मदत करत होते, दुसरीकडे पळून जाऊन परत establish होणे त्याला जमण्यासारखे नसेल

पण बेकार आहे एक डॉ. १३ वर्षं बिनबोभाट असे करत असणे.
याला १३ वर्षे इतके संशयाचे वलय असून पेशंट कसे मिळत राहिले?

अवघड आहे. Sad

चुकीच्या समजुती व माहीतीचा फायदा असे लोक घेतात. परवा कानीफनाथाजवळ एक शेतकरी भेटला, सहज गप्पा मारताना त्याला विचारत होतो की इकडे काही प्राणी वगैरे दिसतात का. तर सांगायला लागला हरणे दिसतात ससा पकडला होता.तसेच मांडुळ पकडले होते ते खाऊन म्हणे एडस बरा होतो. डोक्याला हात लावला मी. Uhoh

विकृत 'डॉक्टर' आहे हा संतोष पोळ.
रक्तदान केल्यानंतर जशी रक्ताची भरपाई पुन्हा शरिरात होते तसे एकदा किडीनी दान केल्यावर ती पून्हा 'येते' असे सांगणारे हिरानंदानी हॉस्पिटलातील "डॉक्टर" तितकेच हव्यासी आणि विकृत होते असे म्हणता येईल.

हा डॉक्टर महीलांशी लैंगिक संबंध ठेवायचा असे कुठल्याच वर्तमान पत्रात आलेले नाही.याला फक्त खूनाची चटक असावी.

रक्तदान केल्यानंतर जशी रक्ताची भरपाई पुन्हा शरिरात होते तसे एकदा किडीनी दान केल्यावर ती पून्हा 'येते' असे सांगणारे हिरानंदानी हॉस्पिटलातील "डॉक्टर" तितकेच हव्यासी आणि विकृत होते असे म्हणता येईल >>>> खरच असं सांगायचे?

अतिशय भयंकर वाटलं या डॉक्टरबद्दल वाचून. आजच्या पेपर मध्ये (स काळ) ला अगदीच तोकडी बातमी दिली आहे. त्यात याने इतके खून का केले याबद्दल अजिबात वाच्यता नाही,
इतके खू न करून माणूस शांत झोपु कसा शकतो रात्री? Uhoh

पहिली गोष्ट म्हणजे हा कुठलाही डॉक्टर नव्हता. कोणत्याही पथीची डिग्री त्याच्याकडे नाही. तो शुद्ध क्वॅक आहे. त्यामुळे डॉक्टरी व्यवसायाशी त्याचे नाव अजिबात जोडले जाऊ नये.दुसरे अण्णा हजारेंनी ग्रामीण भागात( आणि शहरीही ) जो अनेकाना बिनभांडवली रोजगार उपलब्ध करून दिला आहे म्हणजे माहितीच्या अधिकाराचे भरमसाठ अर्ज करून सरकारी यांत्रणेला ब्लॅक मेल करणे यामुळे पोलीसही त्याला टरकून असायचे. आणि हा प्राणी पोलीसानाही दम द्यायचा . नव्याने आलेले इन्स्पेक्टर वेताळ यांच्याशीही त्याचा वाद झाल्याने तो त्यांच्या रडारवर होताच. त्याची मैत्रीण ज्योती पांढरे व बायकोच्या मदतीने त्याने वेताळांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या व त्यांच्या बदली साठी प्रयत्ने केले. चेक बाऊंस प्रकरणात त्याच्यावर पुणे कोर्टाचे अटक वारंट होते ते बजवायलाही पोलीस घाबरायचे. त्याच्यावर वॉरन्ट आहे हे वेताळांच्या लक्षात आल्यावर वेताळ कामाला लागले आणि त्या संदर्भात मण्गला जेधे प्रकरणात त्याचे नाव येताच वेताळांनी बरोबर नेम साधला.....

इतके खू न करून माणूस शांत झोपु कसा शकतो रात्री? अ ओ, आता काय करायचं
>> अहो खून केल्याशिवाय त्याना शान्त झोपच येत नाही Happy . जसे काहीना मांसाहार केल्याशिवाय चैनच पडत नाही तसे

>>दुसरे अण्णा हजारेंनी ग्रामीण भागात( आणि शहरीही ) जो अनेकाना बिनभांडवली रोजगार उपलब्ध करून दिला आहे म्हणजे माहितीच्या अधिकाराचे भरमसाठ अर्ज करून सरकारी यांत्रणेला ब्लॅक मेल करणे यामुळे पोलीसही त्याला टरकून असायच>>>

या वाक्याचा पुर्वार्ध अनावश्यक आहे.

झी मराठी न्यूज चॅनेल वर आठवडा भर कव्हरेज आहे बातमीचे. काल परवा टाइम्स ऑफ इंडिया व लोकसत्ता ने न्यूज पिक अप केली आहे. लोकसत्तेतील कव्हरेज वाचा. फारच विचित्र व भयानक.

हिरानंदानीची न्यूज ब्रेक झाली मग लगेच ही.

<<<अहो खून केल्याशिवाय त्याना शान्त झोपच येत नाही स्मित . जसे काहीना मांसाहार केल्याशिवाय चैनच पडत नाही तसे>>>>>>
या वाक्याचा उत्तरार्ध अनावश्यक आहे. Lol

या वाक्याचा पुर्वार्ध अनावश्यक आहे.
>>
तो अगदी आवश्यक आहे म्हणूनच मुद्दाम टाकला आहे.

Pages