फारश्या न आवडणार्‍या भाज्यांचं यम्मी सूप

Submitted by भानुप्रिया on 22 July, 2016 - 03:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल भोपळा, १०० ग्रॅम
गाजर, २ मध्यम हुन थोड्या छोट्या आकाराची
बीट, १ जरा लहानसं
कांदा, १ पिटुकला
लसुण, ४-५ छोट्याशा पाकळ्या
ऑऑ, १ टे स्पू
मीठ
मीरपूड
चिली फ्लेक्स
पास्ता सिझनिंग / मिक्स ड्राईड हर्ब्स
लिंबु
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

गेले बरेच दिवस पोटानी असहकार आंदोलन पुकारलेलं असल्यामुळे ताक, भात, पाण्याची कॉफी, गरम पाणी इत्यादी गोष्टींवर जगायचा प्रयत्न करतेय. जमेल असं वाटंत नाहीये, आणि त्यात भरीस भर म्हणून मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचं व्यसन! ह्या torturous कार्यक्रमामुळे माझ्या उपाशी हॄदयाला किती भोकं पडलीत देव जाणे!

गेले अनेक दिवस त्या तोंपासु डिशेस नुसत्याच बघत्येय. कदाचित त्याचाच बदला घ्यायला म्हणून पोटानी माझ्याशी हे असलं वागायचं ठरवलं असणारे. म्हटलं पोटाला मनवता येतंय का ते बघावं. पचायला हलकं आणि नुसत्याच उकडलेल्या मुग डाळ - भातापेक्षा थोडं जास्ती चवीचं काहबघावंम्हणून सूप करायचं ठरवलं.
इतरवेळी मी लाल भोपळा, बीट ह्या भाज्या फार उत्साहानी घरात आणतेच असं काही नाही (आणत नाही). पण काल केला मनाचा हिय्या. घेतला १०० ग्रॅम लाल भोपळा आणि एक पिटुकलं बीट सुद्धा. (उगाच नंतर मूड नाही झाला आणि वाया गेलं तर त्यातल्या त्यात कमी वाईट वाटेल म्हणून. भाज्या महागच आहेत अजूनही!) गाजर माझं लाडकं, त्यामुळे त्याचा तसा काही प्रॉब्लेम नाही. असो, फार लांबण लावली.

पाकृ:
OTG 180 डिग्री ला प्रिहिटला लावून ठेवा.
लाल भोपळा, बीट आणि गाजर धुवुन, सालं काढून घ्या आणि त्याचे साधारण १.५ सें.मी चे चौकोनी तुकडे करून घ्या.
कांद्याचे ६ तुकडे करा. लसूण सोलून घ्या. (लसूण आपण सबंधच वापरणार आहोत, चिरायची किंवा ठेचायची गरज नाही.)
ओव्हन मधे जो ट्रे वापरणार असाल तो धुवून, पुसून घ्या आणि सगळ्या भाज्या त्यावर पसरा. वरून ऑऑ आणि मीठ घालून हातानी भाज्यांना नीट चोळा. भा़या परत एकदा ट्रेवर नीट पसरून घ्या, जेणेकरून सगळीकडे आच नीट लागेल.
ट्रे ओव्हनमधे सरकवा, १८०-२०० डिग्री सेल्सियल वर साधारण ३० मिनिटंसाठी. (प्रत्येक ओव्हनचं हीट सेटिंग वेगवेगळं असतं, त्यामुळे अधूनमधून चेक करत राहिलेलं बरं.)

भाज्या चमच्यानी सहज मॅश होत असतील तर ट्रे बाहेर काढा आणि थोडं गार होऊ द्या.
रूम टेंपरेचर्ला आल्यावर पाणी घालून मिक्सर मधून अगदी एकजीव (प्युरे) होईपर्यंत फिरवून घ्या. आता ह्या मिश्रणात तुम्हाला हव्या असणार्‍या consistency प्रमाणे पाणी घाला, चवीनुसार मीठ, मिरपुड, चिली फ्लेक्स, पास्ता सिझनिंग / मिक्स्ड हर्ब्स घाला आणि एक मस्त उकळी आणा.
वरून मस्तपैकी लिंबू पिळा, हवी असल्यास (जबरदस्ती नाही. लागणार्‍या जिनसात घेतलीय म्हणून घालायचीच असा काही नियम नाही) कोथिंबीर भुरभुरवा.
गरमा गरम सर्व्ह करा आणि गिळायच्या आधी एक फोटो नक्की काढा (माझा राहिलाय काढायचा).

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात दोघं पुरवून खाऊ शकतात. पण एकासाठी पोटभरीचं.
अधिक टिपा: 

१. ट्रेला वरून अ‍ॅल्युमिनियम फॉईल लावली तर भाज्या जास्त मॉईस्ट राहातील. माझा जरा कोरड्या झाल्या होत्या.
२. एखादं तमालपत्र पण मस्तं स्वाद आणेल असं वाटतंय. करून बघितलं नाहीये.
३. ह्यात क्रीम-बीम ओतून अनहेल्दी कराय्चं का ते तुम्ही ठरवा.
४. स्वीट कॉर्न वगैरेही घालता येईल. (मी चवीची गॅरेंटी घेत नाही.)
५. सुचलं की संपादित करेन पोस्ट.

माहितीचा स्रोत: 
आत्मविश्वास
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भानुप्रिया , मी हे सूप करताना भाज्या सरळ कूकर ला लावते. दोन शिट्यांमधे सगळ्या भाज्या शिजतात आणि सूप ही झटपट होते किंवा मायक्रोवेव्ह मधे ५/७ मिनिटे.
बेक केल्यामुळे चवीत काही फरक पडतो का?

मी पण हे सुप करताना भाज्या कुकरला शिजवुन घेते किंवा पातेलित एकत्र शिजवुन घेते.
" एखादं तमालपत्र पण मस्तं स्वाद आणेल असं वाटतंय. करून बघितलं नाहीये." मी हे करुन बघितलय , छान लगत. पण एखद्याला उग्र वास चालत नसेल तर घालु नये.
"स्वीट कॉर्न वगैरेही घालता येईल. (मी चवीची गॅरेंटी घेत नाही.)" मी स्वीट कॉर्न घालते, त्यामुळे चवीत काही फरक पडत नाही. मुल स्वीट कॉर्न म्हणलं कि आणखी आवडीने सुप पितात.
या सुप मधे जर घरात हर्ब्ज नस्तील तर अमूल चे गार्लीक अणि हर्ब्ज बटर अगदी अर्धा चमचा घाला , मस्त चव येते.

सामी, अप्रतीम चव येते ग roast / bake केल्यानी. Slight caramelization पण होतं ना. कुकरमध्ये नुसताच लगदा होतो. निवांत वेळ असेल तेव्हा कर हा असा प्रयोग, worth it आहे.

रंगासेठ, वरती लिहिलंय तेच तुम्हाला पण लागू पडेल. आणि OTG नसेल तर अगदी कमी आचेवर पसरट कढईमध्ये भाज्या fry करून बघा. Without पाणी हां पण!

साती आणि क्रिशनन्त, धन्यवाद!!!

निर्झरा, थँक्स! मी पुढल्या वेळी नक्की घालेन तमालपत्र. आणि कुकरचा वापर टाळायचं कारण म्हणजे gourmet चं भूत. हे roasted veggies soup आहे ना (असं मला वाटतंय), मग त्याला तो फ्लेवर यायला कुकर उपयोगाचा नाही. (हेमावैम)

छान.. लाल भोपळा उकडून आणि भाजून... वेगवेगळी चव येते. भाजल्याने जास्त चांगला लागतो. ग्रील केला, किंवा आधी थेट गॅस फ्लेम वर थोडा भाजून मग उकडला तरी चालेल.

लाल भोपळा, गाजर आणि बीट तिन्ही फार प्रिय आहेत. आणि तिन्ही फार महत्त्वाचे आहेत Happy

पाककृती छानच पण मी जे काही शिजवते ते गॅसवरच. मला मावेमधले अन्न मानवत नाही.

सामी, अप्रतीम चव येते ग roast / bake केल्यानी.>भानुप्रिया हे माहीत न्हवते ग , आता नक्की बेक करुन बघेन.

*

मी अगदी असंच सूप करते. फक्त कुकरला भाज्या + लसूण पाकळ्या असं शिजवून घेते. उकळी आणल्यावर क्रीम न घालता साय काढलेलं थोडं दूध नक्की घालावं. चवही क्रीमी येते आणि डाएटही मोडत नाही.

कुकरमध्ये भाज्या उकडल्यास ह्या सूपला तेल-तूप काही लागत नाही.

दुधी भोपळा + एखादा छोटा बटाटा + कांदा, लसूण किंवा लाल भोपळा + एखादी लाल सिमला मिरची+ कांदा, लसूण ह्याचेही सूप सुंदर लागते. गाजर, टोमॅटो, बीटापेक्षा भोपळ्यांची सूप्स जास्त होतात आमच्याकडे.

हर्ट 'तो' आहे. त्यानीपण पोस्ट करतांना टायपो केलंय... Wink

भानुप्रिया, माशे चा ८ वा सिजन लईच मजा आणतोय आताशा.
Everybody's speaking gourmet with Masterchef Australia!
मै आऊर मेरी बायडीबी फ्यान आहोत याचे.

मस्त वाटतंय सूप! Happy

हाईला, हर्ट, माझ्या सिन्सिअर अपॉलॉजिज् हं!
योकु, अगदी अगदी! मी ही माझ्या कुकवाच्या धन्याला सवय लावलीय माशेची.

आणि धन्स! Happy

मस्त पाककृती आहे. ओव्हन मध्ये रोस्ट करून सूप केलेले नाही कधी. आता भोपळ्यांचा सिझन सुरू झाला की करून बघेन Happy

मी साधारण असंच टोमॅटो, रंगीत भोमि, कांदा, लसूण हे साहित्य रोस्ट करून करते. प्युरी करताना बेसिलची पानं - असल्यास ताजी- आणि थोडं दूध घालते त्यामुळे मस्त क्रीमी होतं सूप. उकळी आली की वरून पुन्हा बेसिलचं एखादं पान चुरून घालते. वाढून घेतल्यावर क्रश्ड पेप्पर. रोस्टेड भोपळ्याचं सूप हापिसच्या कॅफेटेरियात मिळायचं, भारी लागतं ते पण. आता घरी पण करून बघेन.

हा फोटो-

soup_0.JPG

मस्त रोस्टेड ची चव वेगळी लागत असेल तस इथे लाल भोपळ्याच साबार मसाला घालुन सुप आहे ते केल जात बर्‍याचवेळेस!

बीट, भोपला, दुधी वापरून करून पाहिले. दोन पाकल्या लसूण, तेजपत्ता घातले परतून घेताना. भो मिर्ची नी मका दाने नुसतेच जरा परतून घेतले. त्यांची पेस्ट नाही केली.
पिताना वरून मिरेपूड घातली.

खूपच छान चव. रंग नाही आवडला इतका लाल, पन चलता है!

खरंय सहेली, तो लाल रंग जरा अंगावर येतो बीटाचा. पण चव जमली की मज्जा येते. आणि बीटाची एक मस्त earthy चव असते, ती miss करु नये!

मस्त दिसतय! छान आहे रेसिपी.
आम्हीही कुकरमधेच शिजवतो. लसुण, कान्दा, गाजर, बीट, कोबी, कान्दा पात, टोमॅटो, लाभो, दुभो, छोटासा बटाटा वापरतोच, त्यात फ्लॉवर, शेवग्याच्या शेन्गा टाकल्या तर फार मस्त चव येते. विशेषतः शेवग्याच्या शेन्गा.

Pages