'अस्तु' - गाणी आणि ट्रेलर

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

'अस्तु' हा नितांतसुंदर चित्रपट गेली दोन वर्षं निधिअभावी महाराष्ट्रात पुण्याशिवाय इतरत्र प्रदर्शित होऊ शकला नव्हता. पण क्राऊड-फंडिंग'च्या माध्यमातून निधी गोळा करून हा चित्रपट आता उद्या, म्हणजे १५ जुलैला, महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

Astu-poster.jpg

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गौरवल्या गेलेल्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पारितोषिकं (सर्वोत्कृष्ट संवाद - श्रीमती सुमित्रा भावे, सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - श्रीमती अमृता सुभाष) आणि इतर असंख्य पुरस्कार या चित्रपटाला लाभले आहेत.

या चित्रपटातली गाणी ऐकण्यासाठी आता निर्मात्यांच्या सौजन्यानं मायबोलीच्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत.

'अस्तु'मध्ये दोन गाणी असून ती संस्कृत आणि कन्नड या भाषांमध्ये आहेत.

चित्रपटातलं 'कोहम' हे पहिलं गाणं संस्कृतभाषेतलं गाणं श्री. विजय कोपरकर यांनी गायलं आहे. श्री. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी ते लिहिलं असून श्री. धनंजय खरवंडीकर यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.

संस्कृतभाषेत गाणं असणारा 'अस्तु' हा पहिला चित्रपट आहे.

चित्रपटातल्या गाण्यांबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. सुनील सुकथनकर यांनी सांगितलं - 'डॉ. चक्रपाणि शास्त्री हे संस्कृतभाषेचे गाढे अभ्यासक. प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील प्राध्यापक. अतिशय विद्वान अशा डॉ. शास्त्र्यांना अल्झायमर्सनं ग्रासलं आहे. एका अनपेक्षित ठिकाणी ते आल्यावर त्यांची मनस्थिती संस्कृत गीतातून व्यक्त व्हावी, असं आम्हांला वाटलं. श्री. धनंजय खरवंडीकर हे आमचे संगीतकार-मित्र आहेत. त्यांचे वडील श्री. देवीप्रसाद खरवंडीकर हे संस्कृतपंडित आहेत. ते नगरला असतात. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना चित्रपटातल्या गाण्याची पार्श्वभूमी सांगितली. विशेष बाब अशी की, त्यांनी खास या चित्रपटासाठी संस्कृतमध्ये गाणं आम्हांला लिहून दिलं. हे गाणं म्हणजे एखादा जुना संस्कृत श्लोक किंवा सुभाषित नाही.

'मी कोण आहे?' हा प्रश्न या अल्झायमर्सच्या रुग्णाला पडतो. स्मृती नष्ट झाल्यामुळे डॉ. शास्त्र्यांना हा प्रश्न पडला असला, तरी एका आध्यात्मिक पातळीवर तुम्हां-आम्हां सर्वांनाच हा प्रश्न कधी ना कधी पडतो. मी कोणाचातरी मुलगा आहे, नवरा आहे, आई आहे, बाप आहे...पण या सर्व नात्यांच्या पलीकडे मी कोण आहे, हा शोध संपूर्ण मानवजातीचा सतत सुरू असतो, आणि तो या गाण्यातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.'

या चित्रपटातलं दुसरं गाणं कन्नड भाषेत आहे. हे गाणं सुरुवातीला चित्रपटात घेण्याची आमची योजना नव्हती. 'अस्तु'मध्ये अमृता सुभाषनं माहुताच्या बायकोची भूमिका केली आहे. तिचे बरेचसे संवाद कन्नड भाषेत आहे. चित्रीकरणाच्या आधी जेव्हा ती सुप्रसिद्ध अभिनेत्री-गायिका श्रीमती बी. जयश्री आणि लेखिका सौ. उमा कुलकर्णी यांच्याकडे कन्नडचा अभ्यास करत होती, तेव्हा आम्ही तिला त्यांच्याकडून काही कन्नड अंगाईगीतं मिळतायत का पाहा, असं सांगितलं होतं. तिनं उमाताईंकडून दोनतीन गाणी मिळवली. चित्रपटात वापरलेलं 'जो जो मलगय्या' हे गाणं तिला बी. जयश्रींकडून मिळालं. ही एक पारंपरिक रचना आहे आणि बी. जयश्री त्यांच्या एका ऐतिहासिक नाटकात ती वापरतात.

देवाला उद्देशून म्हटलेलं, देवाला झोपवण्यासाठी म्हटलेलं हे गीत आहे. अमृता हत्तीला नदीत अंघोळ घालते, अशा चित्रपटातल्या एका प्रसंगात ते गाणं वापरून बघावं, असं आम्हांला वाटलं. चित्रीकरणानंतर चित्रपटाचं डबिंग सुरू असताना अमृता हे गाणं कुठल्याही वाद्यांच्या संगतीविना गायली. नंतर मग साकेत कानेटकर या आमच्या संगीतकारानं या गाण्यामध्ये रिदम आणि इतर वाद्यं वापरून गाणं पूर्ण केलं.

***

'अस्तु'ची एक झलक आपल्याला इथे पाहता येईल -

***

'अस्तु'

निर्माते - डॉ. मोहन आगाशे व शीला राव
दिग्दर्शन - सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर
कथा, पटकथा, संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - मिलिंद जोग
संकलन - मोहित टाकळकर
संगीत - धनंजय खरवंडीकर, साकेत कानेटकर
पार्श्वसंगीत - साकेत कानेटकर
कलादिग्दर्शन - सुमित्रा भावे, संतोष सांखद
वेशभूषा - सुमित्रा भावे, कल्याणी कुलकर्णी गुगळे, राधिका पाठक

कलाकार - डॉ. मोहन आगाशे, इरावती हर्षे, अमृता सुभाष, मिलिंद सोमण, इला भाटे, नचिकेत पूर्णपात्रे, देविका दफ्तरदार, डॉ. शेखर कुलकर्णी, ज्योती सुभाष, शुभांगी दामले आणि लक्ष्मी हत्तीण

***

'अस्तु'ची गाणी आणि ट्रेलर 'मायबोली'च्या यूट्यूब वाहिनीवर अपलोड करण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. मोहन आगाशे, श्रीमती शीला राव व श्री. गणेश राव (गौरिका फिल्म्स), श्रीमती सुमित्रा भावे - श्री. सुनील सुकथनकर (विचित्र निर्मिती) यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

साधारण २ वर्षांपूर्वी LA मधे स्क्रीनिंग शो पाहिला होता ,सिनेमा आवडला, छान कथानक आहे.
मोहन आगाशे आणि अमृता सुभाष दोघांचाही अप्रतिम अभिनय आहे.

मंगला (दु. १२), सिटीप्राईड अभिरुची (दु. २.४५), सिटीप्राईड कोथरुड (संध्या. ५.३०), किबे लक्ष्मी (संध्या. ६.३०), सिनेपोलिस वेस्टएण्ड (संध्या. ५.१५), सिनेपोलिस सिझन्स मॉल (संध्या. ६.२५), आयनॉक्स बंडगार्डन (संध्या. ५.१५), आयनॉक्स अमानोरा हॉल (संध्या. ५.३०), आयनॉक्स जय गणेश (दु. १), अरुण (संध्या. ६.३०), वैभव (सध्या. ७.१५).

चित्रपटगृह आणि खेळाच्या वेळा पुन्हा एकदा तपासून घ्याव्यात, ही विनंती.

छान.
धन्यवाद चिनुक्सा.
आणि वॉव....देवीप्रसाद खरवंडीकरांकडेच संगीत विशारद केलंय मी. सो प्राउड ऑफ हिम. ते कुटुंब संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेलं कुटुंब.
>>>>>> आहेत. ते नगरला असतात. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना चित्रपटातल्या गाण्याची पार्श्वभूमी सांगितली. विशेष बाब अशी की, त्यांनी खास या चित्रपटासाठी संस्कृतमध्ये गाणं आम्हांला लिहून दिलं. हे गाणं म्हणजे एखादा जुना संस्कृत श्लोक किंवा सुभाषित नाही.>>>>
> चित्रपटाचे डीटेल्स वाचून वाटतंय...काय योग्य व्यक्ति निवडली सुकथनकरांनी...संगीतासाठी!. आणि धनंजयही पुढच्या पिढीतला आश्वासक शिलेदार! ( आणि कोपरकरांचा आवाज! )
खरवंडीकर सरांकडे शिकताना त्यांनी स्वता: रचलेल्या आणि त्या त्या रागात बांधलेल्या काही चीजा शिकवल्या होत्या.
संस्कृत पांडित्य आणि संगीत....इतका सुंदर मिलाप जाणवायचा त्यांच्याकडून शिकताना!
पहिली काही वर्षं सौ. कीर्तिदेवी शिकवायच्या. (सरांच्या पत्नी) . नंतर सर स्वतः. ते भाग्य मला लाभलं!

धन्यवाद चिन्मय.
ही गाणी बघायला आणि ऐकायलासुद्धा छान आहेत.

सुंदर, विचारात टाकणारा, खुप आवडलेला चित्रपट आहे. माझ्या लेकालाही आवडला होता तेव्हा. आता परत बघू आम्ही Happy

नक्की बघणार हा चित्रपट.

मेलबर्न सोडून इतर शहरांत हा सिनेमा दोन वर्षपूर्वी दाखवला होता. डॉ आगाशे पण तेव्हा आलेले होते.

धन्यवाद चिनुक्स ! सुंदर ओळख करून दिली चित्रपटाची. चित्रपटगृहातच प्रदर्शित करण्याची कळकळ जाणवली तुझ्या लेखातून. सध्या तरी फक्त जाहिरात करू शकतो. इथे प्रदर्शित करता आला तर कळव.

सुंदर चित्रपट आहे. गेल्या भारतवारीत बघितलेला. आगाशे अक्षरशः जगलेत ती भूमिका. इतके दिवस पूर्णपणे विस्मृतीत गेलेला हा चित्रपट पण आत्ता ट्रेलर बघून एकेक दृश्य समोर येतंय. या पूर्वीच्या स्मृती आपल्याला हव्या त्यावेळी आठवणं ही एक देणगीच! अर्थात जो पर्यंत आहे तो पर्यंतच. Happy
चित्रपटात शास्त्रीना अल्झायमर्स आहे, तो अलगत उलगडत जातो. अनेकदा कथा टिपिकल होतेय की काय वाटत असताना नवीन वळण मिळतं. व्यक्तीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ आणि बरोबर गोतावळ्याच्या भल्याबुऱ्या आठवणी, किती कोडी उलगडतात कितींचे मधले एक दोन तुकडे जोडता न आल्याने भलते समज होतात.
ज्याना शक्य असेल त्यांनी जरूर बघा.

फारच आवडलेला चित्रपट खूपच वेगळा . अतुल कुलकर्णीच्या देवराई नंतर मला खूप आवडलेला मराठी चित्रपट. ह्याच गाण जरी कन्नड मध्ये असल तरी त्याचा अर्थ खूप मस्त आहे. दोन वर्ष मी ह्या पिक्चर च्या शोधात होतो. चित्रपट गृहात बघितलेला हा चित्रपट मनाला खूप खूप भावाला. साथीला मोहन आगाशे यांची भूमिका म्हणजे काय बोलायचं ? शेवटी जेव्हा ते आई आई म्हणू आर्त हाक मारतात तेव्हा खरंच तो चित्रपट वेगळ्याच उंचीवर जातो. तेवढ्याच ताकदीची भूमिका अमृता सुभाष केलीय. खरंच चित्रपट नक्की बघा. मी परत जाऊन बघणार आहे. कारण मला माहिती आहे की ह्याची सीडी मिळणं कठीण आहे.

ट्रेलर जबरी आहे. गेल्या वर्षी मोहन आगाशे बीएमएम ला एले मधे आले होते तेव्हा या चित्रपटाविषयी ऐकलं होतं. पाहायची इच्छा आहे. अमेरिकेत रिलिज आहे का? एखादा जरी शो जवळपास असेल तरी नक्की जाऊ. मोहन आगाशेंचं काम नेहमीच आवडतं. अगदी जैत रे जैत पासून अलिकडच्या देऊळ पर्यंत. Happy