निसर्ग, पर्यावरण आणि आपण ११: मानव हाच प्रश्न आणि मानव हेच उत्तर

Submitted by मार्गी on 4 July, 2016 - 03:19

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ७: काही अज्ञात पर्यावरणप्रेमी!

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ८: इस्राएलचे जल- संवर्धन

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ९: जगातील प्रमुख देशांमधील पर्यावरणाची स्थिती

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १०: काही कटु प्रश्न आणि काही कटु उत्तरे

मानव हाच प्रश्न आणि मानव हेच उत्तर

उत्तराखंडमध्ये होत असलेली हानी २०१३ च्या प्रलयाची आठवण करून देते आहे. तशीच आपत्ती परत आलेली दिसते आहे. खरं तर त्यामध्ये अनपेक्षित काहीच नाही. जे होतं आहे, ते सामान्य नाही, पण गेल्या सहा- सात वर्षांपासून सतत होतं आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये पर्वतरांगांमध्ये लँड स्लाईडस, ढगफुटी, नद्यांना पूर आणि जीविताची‌ व मालमत्तेची हानी हे सर्व नेहमीचंच झालंय. फरक इतकाच आहे की, त्यांचं प्रमाण आणि वारंवारता सतत वाढते आहे. नुकसानही जास्त होतं आहे. पर्यावरणावर होत असलेल्या अशा परिणामांना थांबवण्याचे काय उपाय आहेत? ह्या सर्व प्रश्नांवर उत्तरं काय आहेत? त्याचं खरं तर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे आपण. आपणच हे थांबवू शकतो. कारण हे सर्व आपणच केलेलं आहे. पूरामुळे नुकसान होत असलं तरी त्या पूराचं कारण आपणच आहोत आणि इच्छा असेल तर आपण ते थांबवूही शकतो.

आपण आधीच्या लेखांत पर्यावरण आणी मानवामध्ये असलेल्या तणावाच्या तीव्रतेची चर्चा केली. पर्यावरणावर मानवाचं बर्डन सतत वाढत आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर पर्यावरणाच्या सोबत तर काम करावंच लागेल- झाडं लावावी लागतील, जल संधारणाची कामं करावी लागतील; जंगल वाचवावी लागतील; पण त्यासोबत मानवाची परिपक्वता आणि दृष्टी वाढवण्याचेही प्रयत्न करावे लागतील. तेव्हा कुठे हळु हळु आपण नक्की काय आक्रमण करतोय हे आपल्याला समजेल आणि त्यापासून यु- टर्न घेता येईल. पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा हा प्रदीर्घकालीन फोकस असू शकतो. शॉर्ट टर्म फोकस अर्थातच पर्यावरणावर प्रत्यक्ष काम करणे हा आहे. ह्या लेखामध्ये मानवाची दृष्टी आणि सजगता वाढवणा-या काही मार्गांची चर्चा करूया.

मानव हा सुद्धा निसर्गातला एक प्राणीच आहे, पण त्याच्या बुद्धीमुळे आणि मनामुळे तो निसर्गापेक्षा वेगळा ठरतो आणि ह्याच कारणामुळे मानव आणि निसर्ग ह्यांच्यात ताण निर्माण होतो आणि मानवा- मानवामध्येही तणाव होतो. तसंच मानव निसर्गाला स्वत:पेक्षा वेगळं मानून त्यावर 'विजय' मिळवण्याच्या मागे लागतो. आजवरच्या इतिहासात मानवाची दृष्टी आणि सजगता वाढवणयचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत. त्याचं सगळं विज्ञान आज उपलब्ध आहे. त्याच्या अनेक टेकनिक्स विकसित केल्या गेल्या आहेत. पण हे विज्ञान वेगळ्या प्रकारचं विज्ञान आहे. स्वत:मध्ये शोध घेणारं हे विज्ञान आहे.

आपल्याला जे विज्ञान माहिती असतं ते प्रयोगशाळेत चीरफाड करणारं‌ विज्ञान. आपण एखाद्या पानाचा वैज्ञानिक अभ्यास करतो म्हणजे ते तोडून त्याला प्रयोगशाळेत नेतो आणि त्याचं‌ विश्लेषण करतो. पण आतमध्ये शोध घेणारं विज्ञान वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामध्ये स्वत:चा शोध घ्यायचा असतो. पण अनेकदा अनेक आध्यात्मिक मार्गांची नावं आणि वेगवेगळ्या पद्धतींमुळे त्यामध्ये संभ्रमच जास्त होतो. जसं आपण मानतो की, हिंदु, इस्लाम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख हे सगळे वेगवेगळे धर्म आहेत आणि बाहेरून जरी आपण सांगत नसलो तरी आपल्याला वाटत असतं की, हे सगळेच्या सगळे सत्य नाहीत. पण वस्तुस्थिती ही आहे की, हे धर्म नाहीतच, हे पंथ आहेत. हे त्या सत्याच्या शिखराच्या दिशेने जाणारे वेगवेळेवेगळे रूटस आहेत. आणि धर्म अनेक कसे असू शकतात? धर्म म्हणजे तर निसर्गाचा नियम- निसर्गाचा गुणधर्म. गुणधर्म शब्द धर्माचा सार अर्थ अचूक सांगतो. असे गुणधर्म ज्यानुसार सर्व निसर्ग- सर्व जीवन चालतं. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण हा एक गुणधर्म आहे. जर आपण ह्या नियमाशी जुळवून घेतलं तर आपण आरामात चालू शकतो. पण जर आपण ह्या नियमाशी जुळवून घेतलं नाही तर खाली पडतो. लाल रंग हा रक्ताचा गुणधर्म आहे. १०० अंश से. तपमानावर वाफ होणे, हा पाण्याचा गुणधर्म आहे. असे गुणधर्म म्हणजेच धर्म हिंदु, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम असे कसे होऊ शकतात? हे सर्व तर त्या गुणधर्माला सांगण्याचे व त्याच्याशी जुळवून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्या गुणधर्माविषयी वेगवेगळ्या लोकांनी विभिन्न कालखंडामध्ये भिन्न पद्धतीच्या समुदायांना ज्या पद्धतींनी सांगितलं होतं त्या ह्या पद्धती आहेत. शिखरावर घेऊन जाणारे फक्त रूटस आहेत. पृथ्वीवर कोणीही कुठेही असला तरी जर प्रत्येक जण उत्तरेच्या दिशेने निघाला, तरी कधी ना कधी उत्तर ध्रुवापर्यंत पोहचतोच. पण त्यांचा रूट अर्थातच वेगळा असतो.

थोडक्यात असं म्हणता येऊ शकतं की हा गुणधर्म अशा नियमांचा समूह आहे जो आपल्याला निसर्गासोबत संतुलन ठेवण्यासाठी मदत करतो. माणूस सोडून सर्व पशु- पक्षी- वृक्ष निसर्गासोबत संतुलन ठेवून आहेत. जर मानवानेही ह्या नियमांचं पालन केलं, तर तोही निसर्गामध्ये तितकाच एकरस होईल आणि मग त्याची स्थिती उत्तम राहील. हे नियम आपल्याला मार्ग सांगतात आणि आपली परिपक्वता आणि दृष्टी वाढवतात. आपल्याला योग्य मार्ग देतात. त्या मार्गावर चालल्यानंतर तणाव कमी होतात. जसं भगवान बुद्धांनी म्हंटलं होतं की, दु:ख आहे, दु:खाचं कारण आहे, दु:ख दूर करण्याचे उपाय आहेत आणि अशीही अवस्था असते ज्यावेळी काहीही दु:ख उरत नाही. जन्म घेताना प्रत्येक मूल बुद्धासारखंच असतं- काहीही अहंकार नसतो, काही वासना नसतात आणि मनसुद्धा नसतं. पण हळु हळु समाज आणि इतरांच्या संपर्कामुळे त्याच्यात अहंकार निर्माण होतो; वासना प्रकट होतात आणि मनसुद्धा निर्माण होतं. पण तरीही अंतरंगात खोलवर ते मूल बुद्धासारखंच असतं- निसर्गाशी एकरस. पण एक गॅप पडते. जशी शरीराची एक भूक असते; पण आपण खातो ते मनाच्या सवयीनुसार. त्यामुळे तणाव होतो. शरीराची झोप असते; पण आपण त्यानुसार झोपत नाही. त्यामुळे तणाव वाढत जातो.

सजगता आणि दृष्टी देणारे हे मार्ग अशा टेक्निक्स असतात ज्या आपल्याला पुन: एकदा आपलं मूळ स्वरूप प्राप्त करून देतात. संत कबीरांनी म्हंटलं आहे, "साहेब कबीर ने जतन से ओढी, ज्यो के त्यों धर दिनी चदरिया"; अर्थात् निसर्गाने जे निर्मळ रूप कबीरांना दिलं होतं, ते त्यांनी पुन: प्राप्त केलं. प्रयत्न करून, कष्टांनी समाजाने लावलेला मळ पुसला आणि आपलं मूळ रूप प्राप्त केलं. अशाच एका टेकनिकच्या संदर्भात एक गोष्ट आहे. नागार्जुनकडे एकदा एक तरुण आला. त्याने म्हंटलं, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. नागार्जुन म्हणाला, “तू एक काम कर. समोर ही छोटी गुहा आहे. त्यामध्ये बस आणि तीन दिवस हाच विचार कर की मी माणूस नाही तर म्हैस आहे. म्हणत राहा की मी म्हैस आहे आणि म्हैस होऊन जा. सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा प्रयोग करावा लागेल.” तो तरुणही जिद्दी होता. गेला गुहेत आणि बसला. झोपला नाही, काही खाल्लं नाही, काही पिलं नाही. मनाशी एकच म्हणत राहिला की मी म्हैस आहे, मी म्हैस आहे. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि आतमधून खरंच म्हशीचा आवाज सुरू झाला. इतरांनी जवळ जाऊन बघितलं. तो म्हशीसारखं रेकत होता. तिस-या दिवशी जेव्हा आवाज फार जास्त झाला, तेव्हा नागार्जुन त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला की मित्रा, आता बाहेर ये. त्या तरुणाने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर येऊ शकला नाही.

नागार्जुनने विचारलं की, काय झालंय. त्यावर तो म्हणाला की, मी बाहेर कसं येऊ? माझे शिंग. . . गुहा तर छोटी आहे! नागार्जुनने त्याला हलवलं आणि म्हणाला, “डोळे उघड! बघ तू खरंच म्हैस आहेस का? मी तुला हे करायला सांगितलं कारण आता तुला कळलं असेल संमोहन काय असतं. सत्य तर तुझ्याजवळ आहेच, पण तू ते बघत नाहीस आणि संमोहित झाल्यासारखा आहेस. तू म्हैस झाला नव्हतास, पण तू स्वत:ला म्हैस मानलंस. आणि मग तुला खरंच वाटलं की, तू म्हैस झालास. पण ते फक्त सम्मोहन होतं. तू तसा नव्हतासच. असंच सत्य तुझ्याकडे आहेच. फक्त ते पाहायला हवं.” आपलं स्व- रूपसुद्धा असंच मिळालेलं आहे, पण आपण स्वत:ला कोणी अमुक अमुक मानतो आणि त्याच्याशी तादात्म्य करतो. त्यामुळेच सर्व समस्या होतात. म्हणून डोळे उघडले पाहिजेत आणि मग तेव्हा आपण स्वत:मध्ये असलेल्या निसर्गाशी एकरूप होतो आणि मग तणाव उरत नाही. तेव्हा आपल्याला दिसतं की, झाडं- पशु- पक्षी- पहाड हे सर्व आपलाच विस्तार आहेत किंवा आपणही त्यांचेच भाग आहोत. तेव्हा मग सहजपणे निसर्गाशी आपण जुळवून घेतो. . .

ह्या लेखमालेच्या सर्व वाचकांना खूप खूप धन्यवाद!

(समाप्त)

माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users