पडवळाच्या सालीची चटणी

Submitted by सायो on 30 June, 2016 - 19:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजीकरता वापरलेल्या पडवळाची साल, अर्धी वाटी सुकं खोबरं- भाजून, पाव वाटी तीळ- भाजून, ८,१० शेंगदाणे- भाजून, लसणीच्या पाकळ्या- २,३, कढिपत्त्याची पानं- ४,५, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, साखर आणि फोडणीकरता तेल, जिरं, हिंग, हळद.

क्रमवार पाककृती: 

भाजीकरता आणलेल्या पडवळाची सालं काढून धुवून घेऊन किचन पेपरवर कोरडी करून घ्यावीत. हातानेच तुकडे करून घ्यावेत. तेलाची जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यात लसणीच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या, कढिपत्त्याची पानं परतून मग त्यावर पडवळाची साल परतून घ्यावी. झाकण घालून वाफ काढून घ्यावी. त्यात कोरडं भाजलेलं खोबरं, तीळ आणि शेंगदाणे घालून पुन्हा जरा वाफ काढावी. वरून मीठ, साखर, तिखट घालून गॅस बंद करून गार करावं आणि मग मिक्सरला फिरवून चटणी करून घ्यावी.

chutney.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तशी आणि तितकी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पडवळाची साल काढतात का?
आम्ही अशीच पडवळाच्या बियांची चटणी करतो वजा लसूण. किंवा भोपळ्याच्या सालांची.
भाकरी बरोबर भारी लागते.

छान प्रकार. आता करून बघेन.

पडवळाची साल काढत नाही कधी. पण साधारण ह्याच कृतीने आम्ही पडवळाच्या बिया, लाल भोपळा, दुधी भोपळा, कोहळा यांच्या साली आणि फ्लॉवरचे कोवळे दांडे यांची चटणी करतो. कधी चटणी न करता नुसते ह्या प्रकारे परतून खातो.

आता वरचे दोन प्रतिसाद वाचून मी कन्फ्युज झाले आहे की आमच्याकडे आई सालं काढते की नाही. असो, दोडक्याच्या सालीची आणि बहुतेक दुधीच्या सालीचीही ह्याच रेसिपीने चांगली लागते.

आम्ही पण याच कृतीने पडवळांच्या बीयांची आणि दुधीच्या सालींची चटणी करतो - फक्त सु.खो. ऐवजी ओ.ना. घालतो आणि तिखटाऐवजी हि.मी.

पडवळ जून असेल तरच साल काढताना बघीतलय.

पडवळाची साल नाही काढली जात, कारण शिजायला हे फार वेळ घेत नाही. मात्र दुधीच्या आणि दोडक्याचा सालाची चटणी करतात बऱ्याच ठिकाणी

भारीच! करून पाहायला हवीच या पद्धतीने एकदा.
य वर्षे झालीत आता सालींच्या चटण्या खाऊन.

आई दुधीच्या सालांची, कढीलिंबांच्या पानांची, शिरादोडक्यांच्या सालांची पण चटणी करते

त्या सालांना एक उग्र वास येतो ना तो मला लहानपणापासून नाही आवडत. पण ह्या चटणीमुळे तो वास जाईल अस वाटत.

मस्त!
आमच्याकडे दोडक्याच्या (शिराळं) शिरांची आणि भोपळ्याच्या पाठींची करतात अशी चटणी.
तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या.

मी पहिल्यांदा केली तेव्हा मिरच्याच घातल्या होत्या बहुतेक. ह्यावेळी माझ्या अजिबातच लक्षात नव्हतं काय काय घातलं होतं ते. अंदाजे ढकललं आहे सगळं.

हो, दोडक्याच्या सालीची करतात ते माहितीये पण खाल्ली नसावी बहुधा कधी. आई भोपळ्याच्या सालीची चटणी करते मात्र.

मस्त रेसिपी :).
अशी चटणी फक्त दोडक्याच्या सालीची ऐकली आहे आणि केली आहे. भोपळ्याच्या सालीची चटणी करताना आम्ही लसूण घालत नाही Happy , पडवळाच्या सालींची चटणी करत नाही कारण साल काढत नाही, पडवळाच्या बियांची चटणी ह्या पद्धतीने करत नाही Proud