ज्वारीच्या पिठावरचे प्रयोग

Submitted by दिनेश. on 12 June, 2016 - 15:29

आफ्रिकेत मक्याचे पिठ सहज मिळते. त्यातही बारीक पिठ, रवा, जाडसर तूकडे असे सर्व प्रकार असतात.
पण मला इथे चक्क एका दुकानात ज्वारीचे पिठ मिळाले. मिळाले म्हणून मी दोन किलो घेऊन आलो.
त्याच्या भाकर्‍या केल्या पण मी भाकरी करणार ती आठवड्यातून एकदा. त्यामूळे पिठ काही लवकर संपले नसते.

सायुशी बोलताना तिने इन्स्टंट बिबड्यांबद्दल सांगितले. ज्वारीच्या पिठाचा असा प्रकार मी आधी खाल्ला नव्हता.
माझ्या आजोळी सालपापड्या करतात त्या तांदळाच्याच. माझी आई पण घरी करत असे त्या. दोन्ही घरी ज्वारीचे
पिठ वापरात होते ( भाकरीसाठीच ) तरी असा प्रकार होत नसे.

सायुने सांगितल्याप्रमाणे हा प्रकार पिठ भिजवून, लगेच शिजवून करायचा होता. पण मला ते जरा आंबवावेसे वाटले,
म्हणून मी २४ तास ते भिजत ठेवले आणि त्यात थोडे ( चायनीज ) तांदळाचे पिठही मिसळले.

पुढची कृति तिचीच.. म्हणजे हे पिठ दुप्पट पाण्यात शिजवायचे. त्याचा थेंब पाण्यात टाकून बघायचा, तो जर
विरघळला नाही तर पिठ तयार झाले असे समजायचे. तसे ते शिजले कि ओल्या कापडावर त्याच्या बिबड्या
घालायच्या आणि वाळवायच्या. कापडावर वाळवल्या तर सोडवताना, उलट्या बाजूने पाणी शिंपून त्या
सोडवाव्या लागतात. म्हणून मी प्लॅस्टीकच्या कागदावर त्या घातल्या. इथे या दिवसात उन नसते म्हणून घरातच
वाळवल्या. त्या चांगल्या जमल्याही.

या तळायच्या आधीच्या

या तळल्यावर

या बिबड्या करताना लक्षात आले होते कि, ज्वारीचे आणि ( चायनीज ) तांदळाचे पिठ एकत्र करून भिजवल्यानंतर
ते चांगले आंबले होते. त्यावरून त्याचे डोसे करता येतील का ते बघायचे होते.

मायबोलीवर सीमाने लिहिलेली ज्वारीच्या पिठाच्या डोश्याची कृती आहे. तो रव्या डोश्यासारखा प्रकार आहे,
आणि त्या कृतीत पिठ भिजवून लगेच डोसे करायचे आहेत.

मी जरा वेगळा प्रकार केला. ज्वारीचे पिठ २ कप आणि तांदळाचे पिठ १ कप असे एकत्र भिजवले. पाऊण कप उडदाची डाळ वेगळी भिजवली. ती डाळ मग बारीक वाटून वरच्या मिश्रणात मिसळली. हे सगळे रात्रीच केले
होते. सकाळी पिठ छान फसफसले होते. मग त्यात आले, मिरच्या व कोथिंबीर वाटून टाकली. व मीठ घालून
नेहमीप्रमाणे डोसे केले.

हे डोसे मी दोन्ही प्रकारे म्हणजे जाड आणि पातळ असे करून बघितले. दोन्ही चवीला चांगले लागले पण
क्रिस्पी नाही लागले. ज्वारीचे पिठ वापरले होते म्हणून मी चटणीसाठी लसूण, खोबरे, धणे, चिंच व
लाल मिरच्या वापरल्या. हि चटणी चवीला छानच झाली होती ( पण लसूण कमी वापरायला हवा होता. )

एवढ्या प्रमाणात तयार केलेले पिठ बरेच झाले होते. एका वेळेस एवढ्या पिठाचे डोसे करायचे नव्हते ( डोसे करुन ठेवले असते तर नंतर चिकट झाले असते असे वाटले ) आणि पिठ तसेच ठेवले असते तर जास्त आंबत गेले असते. म्हणून त्याचा ढोकळा करुन बघितला.

नेहमीप्रमाणेच कूकरच्या डब्यात पिठ घालून १५ मिनिटे वाफवले. मग गार झाल्यावर तूकडे करून वरुन
फोडणी दिली.

आपण ढोकळ्यासाठी रवाळ पिठ वाटतो तसे इथे नव्हते. बहुतेक या कारणाने, ढोकळ्याला फार जाळी
सुटली नाही. तो अगदी हलका झाला नाही पण दडदडीतही झाला नाही. आणि हा ढोकळा मी फ्रिजमधे
हवाबंद डब्यात ठेवला होता. पुढे दोन दिवस खालला. चांगला राहिला होता.

फक्त माझी एक चूक झाली. मी हे पिठाचे मिश्रण आदल्या दिवशी सकाळी भिजवले होते पण ते जरा जास्त
आंबट झाले होते. त्यापेक्षा रात्री भिजवायला हवे होते.

तसेच मी तांदळाचे पिठ वापरले ते चायनीज दुकानातून घेतले होते. ते पिठ करताना कुठल्या तांदळाचे करतात
आणि त्यापुर्वी तांदूळ भिजवून वाळवून घेतात का त्याची कल्पना नाही. त्या पिठाला वेगळा वास येत नाही आणि
मी ते पिठ चपात्या लाटताना वापरतो.

तर असे हे माझे प्रयोग !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दी सुगरण.. ___________/\_____________ धन्य आहे तुझी!!!! >>>>>> +११११

बिबड्या हा अस्सल वर्‍हाडी प्रकार आहे पण आम्ही त्याला धापोडे म्हणतो. ह्या पिठात तिळ टाकले की धापोडे एकदम टेस्टी लागतात. काहीजण नुसते जिरे घालतात. आम्ही तर कच्चेच खातो. धापोडे उलटताना कापड उलटे करुन त्यावर पाणी शिंपडतात आणि मग उलटी बाजू सुकवातात. धापोडे सुकायला एक दोन दिवस कडक उन हवे असते.

छान दिसतायत सगळे प्रकार. Happy
दिनेशदा, बिबड्या म्हणजे "पापड्या" का ? फ़ोटो तरी तशाच दिसतायत.
दिनेश दी सुगरण.. ___________/\_____________ >>>>>>+१००००००००००
धन्य आहे तुझी!!!! >>>>>>>>>>...धन्य आहे तुमची. Proud

खरच जराही काही वाया न घालवता किती प्रकार केले त्याचे. साष्टांग नमस्कार! Happy

बिबड्या, स्लर्प! अमेय तुम्हाला बिबड्या मिळाल्या की जरुर खाऊन बघा. तळल्या की मस्त फुलतात आणी खायला तशाच खुसखुशीत लागतात. तेलात तळताना तेलाची मात्र काटकसर अजीबात नको, कारण बिबड्या काय किंवा कुरडया काय, तळायला भरपूर तेल लागते तरच त्या फुलतात.

दिनेशजी तुम्ही नित्य नवीन प्रयोग करत रहाता आणी आम्ही मात्र दररोज स्वयंपाक काय करावा म्हणून रडत बसतो.:फिदी: खरच करंटे आहोत आम्ही. डोसा लय भारी दिसतोय. ढोकळे तर मस्तच झालेत.

दिनेशदा ______/\_______

बिबड्यांबद्दल पहिल्यांदाच ऐकलंय, मस्त दिसतंय. Happy आधी माहित असत तर यंदाच्या उन्हाळ्यात घरच्यांना वाळवणाचा हाच प्रकार करायला सांगितला असता .;-)

ती बिबड्याची कृती लिहा ना..>>>>>>> +१.तशी लिहिली आहे तरीही साग्रसंगीत लिहा.
चिमण ढोकळा मजेदारच.बाकी काय ____/\____

कल्पकता...प्रयोग...सातत्य...... सततच आम्हाला दिसुन येते....
बिबडे करावेसे वाट्त होते....पण कल्पनेची भरारी... Uhoh आता वरील प्रमाणे करुन बघते... Happy

बिबडे मी येथे वाचले होते...
www.vadanikavalgheta.com / recipe index / maharashtrian specials / बिबडे - खानदेशी ज्वारीचे पापड

ही एकच कृती शिल्लक राहीली. बाकी दिनेशजींनी काढुन टाकल्याने हा बाफ उघडतांना जरा साशंकच होते. पण आता कॉपीच करुन ठेवते.