संगीतकार आणि त्यांची वैशिष्ट्ये

Submitted by गजानन on 7 June, 2016 - 03:44

बर्‍याचदा तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि गाणे संपत असताना तुम्ही तुमच्या मनात 'या गाण्याचा संगीतकार कोण असावा?' याचा अंदाज बांधता. बर्‍याचदा तो बरोबर निघतो. कारण एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकून ऐकून त्याच्या वेगळ्या शैलीची काही व्यक्त/अव्यक्त गणितं किंवा नोंदी तुमच्या मेंदूने नोंदून ठेवलेल्या असतात. यात चाल, वापरलेली वाद्ये आणि गायक/गायिकेच्या किंवा वाद्यांच्या आवाजाचा विशिष्ट पद्धतीने करून घेतलेला वापर, इ. चा समावेश असतो, असे म्हणता येईल.

हा धागा संगीतकारांच्या अश्या शैलींची (लक्षणांची?) चर्चा करण्यासाठी. त्यामुळे पुन्हा ऐकताना त्या त्या गाण्यांची / संगीताची मजा आणखी वाढेल, अशी आशा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, सिनेसंगीत, भावगीतं, इ. सर्वप्रकारच्या संगीतासाठी.

कोणते संगीतकार तुम्ही कोणत्या आधारे अचूकरित्या ओळखू शकता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ.पी.
टांगा रिदम करता ओ.पी. ओळखले जातात पण त्यांच्या इतका सारंगीचा सुंदर वापर फार कमी जणांनी केला असेल.
आशा जेंव्हा खर्जात गाते तेंव्हा ९०% ते गाणे ओपीचेच असते (उरलेले १०% आरडी). उदा द्यायची झाली तर...
१. आईये मेहरबा
२. चैनसे हमको कभी
पंजाबी ठेका पण खूप सुंदर वापरलाय ओपीने:
१. मेरे हाथ मे तेरा हाथ
२. एक परदेसी मेरा दिल ले गया

शंकर जयकिशन
व्हायोलीन्स / चेलोचा सढळ वापर असलेले ऑर्केस्ट्रेशन.
लताचा टिपेला जाणारा आवाज आणि त्या टिपेला पोहचल्यावर गोल गोल फिरत खालच्या / मध्यम पट्टीवर येणारी संगीत रचना. माझ्या लहानपणी जत्रेत एक खेळणे मिळायच. त्यात एक स्पायरल आकाराची तार असायची. दुसर्‍या एका दांडीवर दोन विमाने बसवलेली असायची आणि त्याला मधोमध हूकासारखा बाक दिलेला असायचा. ती दांडी त्या स्पायरल तारेच्या वरच्या टोकावर ठेवायची आणि मग ती दोन विमाने गिरक्या घेत घेत खाली येत. एसजेंकडची लता ऐकताना खूपवेळा अगदी तसा फील येतो.
१. तेरा जाना दिलके अरमानोंका
२. सुनता जा ओ सुनता जा (हलाकू)

रोशनलाला
कव्वाली किंग

एसडी
बंगाली बाऊल संगीत:
१. आन मिलो शाम सावरे
२. मेरे साजन है उस पार
बंगाली संगीतात एक डफासारखे तालवाद्य असते. एसडीकडे त्याचा वापर खूप आढळतो.

सी.रामचंद्र
लताच्या आवाजाचा सगळ्यात सुंदर पोतः
१. मुझसे मत पुछ मेरे इश्क मे
२. तू ना आया और होने लगी शाम रे
लाला ढोलकीवाला यांची ढोलकी ओळखू आली तर ते गाणे सी.रामचंद्र किंवा ओपीचे असते:
१. अपलम चपलम

माधव, ग्रेट. एस डींच्या गाण्याचं लक्षात आलं नव्हतं. लाला ढोलकीवाले वगैरेंबद्दल तर माहिती पण नाही काही.

बाकीच्या चौघांच्याही गाण्यांमधली तुम्ही दिलेली वैशिष्ट्ये पटकन जाणवली. एसजेंच्या त्या उतरत्या फिरतीचं वर्णन एकदम चपखल केलंत. ते खेळणं मी बघितलेलं नाही, तरी काय म्हणायचं ते समजतंय.

सी. रामचंद्रांच्या गाण्यातला लताचा पोत खरंच निर्विवाद सुंदर. तुम्ही दिलेली उदाहरणे एकदम ठळक आहेत. त्यांच्या कंपोझिशन्समधे एक अंगभूत बाळबोध गोडवा पण असतो. कोणत्याही भावाचं गाणं असो, ती गोड असतात. मिस मेरी, अपलम चपलम्चा चित्रपट कोणता - आईशपथ नाव आठवेना! (लताची तीन अप्रतिम सोलो आहेत त्यात), अलबेला, नवरंगचं पर्टिक्युलरली श्यामल श्यामल बरन. (फक्त आ दिलसे दिल मिला लेमधे त्या गोडव्याचा मिट्टपाक होतो)

जी. एस. कोहली हे ओपीचे असिस्टंट होते. ज्यांना ओपी परवडायचे नाहीत ते निर्माते त्यांना घ्यायचे. त्यामुळे त्यांच्या गाण्यावर ओपीची झाक आहे. Also लता त्यांच्यासाठी गायली आहे. त्यामुळे ओपी आणि लताच्या combination चा अंदाज येऊ शकतो. उदा: तुमको पिया दिल दिया (शिकारी), मेरे दो नैना मतवारे ( नमस्ते जी), चमन के फूल भी तुझको (शिकारी), नजर ने उठते ही ऐसा काम किया (गुंडा). सर्व गाणी YouTube वर आहेत.

सई, अपलम चपलम आझाद मध्ये आहे.

आ दिल से दिल मिला ले बद्दल: आशा जिच्यावर गाणे चित्रीत होणार आहे त्या अभिनेत्रीचे निरीक्षण करीत असे. आणि मग तिला शोभेल अशा आवाजात गात असे. या गाण्यातल्या अभिनेत्रीला जास्तच मोठा आ वासून गायची सवय होती. त्यामुळे आशाने तो खास आवाज लावला होता असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. हे गाणे अगदीच रटाळ आहे पण या सवयीमुळेच आशाचा आवाज हेलन आणि मधुबाला यांच्या तोंडी अगदी चपखल बसतो.

लाला ढोलकीवाले हे कोल्हापूरच्या फडात ढोलकी वाजवायचे. त्यांच्या बोटातली जादू ओळखून सी. रामचंद्रांनी त्यांना चित्रपटसंगीतात आणले. 'चंदेरी'मध्ये त्यांच्यावर एक लेख आला होता त्यात त्यांनी ढोलकी वाजवलेली सगळी गाणी दिली होती. आता अपलम चपलम आणि ओ बलिये चल चलीये ही दोनच आठवताहेत.

येस, आझाद! थँक्स. काही केल्या आठवलं नाही मला. चिडचीड होते पण तरी अशावेळी मुळीच गुगल करायची इच्छा होत नाही.

आ दिलसे दिल मिला ले खरंच रटाळ आहे.

लाला ढोलकीवालेंच्या माहितीसाठी धन्यवाद.

भास्कर चंदावरकरांनी दिलेले, भारत एक खोज या मालिकेचे संगीत खुपच छान होते. या मालिकेचा आवाका खुपच मोठा होता ( रामायणापासून स्वातंत्रलढ्या पर्यंत ) भारतातील अनेक राज्यांचे संदर्भ त्यात आले होते. त्यामूळे त्या त्या राज्यातील पारंपरीक संगीत त्यात ऐकता आले. आणखी एक म्हणजे हि सर्व गाणी हिंदीत होती.

एक उदाहरण म्हणजे त्यातील शाकुंतल वरचा जो भाग होता त्याचे संगीत थेट मराठी नाट्यगीतांची आठवण करुन देणारे होते. ती गाणी अजित कडकडे आणि फैयाज यांनी गायली होती. >>>>> दिनेश,
भारत एक खोज चे म्युजिक वनराज भाटियांचे आहे ना! >>>> हो हो म्युजिक वनराज भाटियांचे आहे. ते नास दिय सुक्त आहे. जे अप्रतिम चालि त बांध् लंय.

Pages