वन्य जीवनाचे व प्राणी संग्रहालयाचे अनूभव.

Submitted by रश्मी. on 3 June, 2016 - 07:21

तुम्हाला॑ दैनंदिन जीवनात वन्य प्राण्यांचा कधी सहवास लाभलाय का? तुम्ही त्यांच्या कितपत जवळ गेले आहात? तुम्हाला काही अतर्क्य अनूभव आलेत का? असल्यास जरुर शेअर करा. खरे तर आपले वेमा, अजय यांचाही असा एक अनूभव आहे. पण मी भारतातल्या बद्दल बोलतेय. कारण लहानपणापासुन आपल्या सहवासात आलेले भुभु आणी माऊ तसेच हम्मा व बकरी सोडले तर इतर वन्यजीव जवळ यायची शक्यता कमीच किंवा दुर्मिळ. कधीतरी घरात वा घराजवळ निघालेले विषारी साप सोडले तर आम्हालाही असे अनूभव फार आले नाही.

पण माझा मामा, स्वारगेटजवळ जेव्हा रहात होता, तेव्हा माकडांच्या आणी वानरांच्या झुंडी मात्र यायच्या त्या कॉलनीत. पेरु, जांभळे, आंबे खाण्यासाठी ही वानरे नुसती हैदोस घालायची. मी लहानपणी वानरांना फार घाबरायचे.मामाकडे रात्री जेवायला बसले की मागच्या दाराच्या अंधारात पहायला पण घाबरायचे.

अजूनही मला हे आठवले की हसू येते. एकदा जळगावला काकुकडे गेलो तेव्हा ती म्हणाली की चला मेहेरुण तलावाकडे फिरायला जाऊ. मग गेलो तिथे. तिथे भेळ घेतली, चुलत बहीण म्हणाली इथे वानरे दिसतील. मी अवाक! मग खरच तिथे काही वानरे आली. मी हातात चुरमुरे घेतले, एक वानर जवळ आले त्याने ते वेचुन खाल्ले. पण जेव्हा मी त्याच्या डोक्यावर हात फिरवायला गेले ( कुत्रे व मांजराला करतो ना तसे) तर ते भयानक पद्धतीने दात विचकुन माझ्या अंगावर आले. मी भयंकर घाबरले. त्यानंतर मी कधी हिम्मत केली नाही.

पण आता मागच्या आठवड्यात घरी ( माहेरी ) गेले, तेव्हा बरीच पाणी टंचाई होती तेव्हा आम्ही मागच्या वाड्यातुन पाणी घ्यायला आलो तेव्हा २ वानरे मागच्या हॉटेलजवळ बसली होती. आधी आम्ही त्याना पाहुन खुश झालो, लहान मुले पण खुश! त्या पाणीवाल्या वहिनीनी एका बादलीत पाणी ठेवले, मग एक मोठे वानर येऊन ते पाणी प्यायले. नंतर आमच्या शेजार्‍यांनी त्यांना खायला म्हणून लादी पाव फेकले, तर ते वानर अंगावर धावुन आले. आमच्या बरोबर आमच्या शेजार्‍यांची सून व तिची २ वर्षाची मुलगी उभी होती. मी आधी त्या सुनेला, माझ्या आईला व मुलीला घरात पळायला सांगीतले. पण माझी आई, माझी मुलगी व ती सून ( सारीका) काही जागच्या हलेनात.:अरेरे: मग मी तिच्या मुलीला घेऊन बिल्डिंगमध्ये पळाले.

त्या दरम्यान वरतुन माझ्या मुलीने केळे आणुन त्या वानराकडे टाकले, त्यामुळे ते जाईच ना. इकडे ओरडुन मी हैराण! माझी आई, मुलगी व माझी सासु तिघी एकाच जातकुळीतल्या असल्याने त्या कधीही कुणाचे चांगले सांगीतलेले ऐकत नाहीत.:राग: त्यामुळे माझा सिंघम होऊन बर्‍याच वेळा सटकते. मग पलीकडल्या मुलाचे कुत्रे भुंकायला लागल्यावर ते वानर पळाले. तरी पण मला त्याची चांगलीच दहशत बसली होती.

मागे आमच्या शेजार्‍यांच्या नातीला झू मध्ये माकड हाताला चावले होते. त्या माकडाने तिचा हातच आधी पकडला होता. हे ऐकुन मला माकडांची भीतीच बसलीय. सर्कशीनिमीत्त हत्ती, वाघ, सिंह पाहीलेत तेही बंद पिंजर्‍यातच. पेशवे पार्कमध्ये गेलो ते लहानपणीच.
एकदा ओळखीच्यांबरोबर निगडी येथे अप्पु घर व भक्ती-शक्तीला गेलो होतो. नवरा म्हणाला घोड्यावर बसुन बघ. मी आधी कधी बसलेले नव्हते त्यामुळे घोडा पळायाल लागल्यावर माझे धाबे दणाणले, मी आरडा-ओरडा करुन घोडेवाल्या मुलाला घोडा थांबवायला सांगीतला. सगळे हसत होते, पण मी परत कधी बसले नाही. नंतर तिथेच दुसर्‍या वेळी टांग्यात बसलो ( आधीची दहशत होतीच ) पण घोड्याला काय झाले माहीत नाही, तो झिगझॅग पळत सुटला. गाडीवाल्याला आवरेना. एकतर रस्त्यात गाड्या सुसाट होत्या, त्यातुन हे ध्यान उधळलेले. त्यामुळे बाकी सर्व मजा बंद करुन घरी आलो एकदाचे.

तुमचे अनूभव वाचायला आवडतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.

माथेरानला एकदा सनसेट पॉइंटवर आम्ही बसलो होतो. जवळ एक बाई तान्ह्या बाळाला मांडीवर झोपवून बाटलीने दूध पाजत होती. तेवढ्यात एका माकडीणीने तिच्या हातातली बाटलीच खेचून नेली.. आणि कहर म्हणजे त्या बाटलीने ती आपल्या पिल्लाला पाजू लागली.

तिथली माकडे आक्रमक झाली आहेत. दुकानदार त्यांना मारतात म्हणून दूकानातील वस्तूंवर हल्ला करत नाहित. पण एकदा का ती वस्तू तूमच्या हातात आली, तर त्यांनी लांबवलीच समजा.

लोणावळ्याला राजमाची पॉइण्टच्या बागेत माकडं आहेत. एका माकडाने माझ्या मुलीचे केस धरले होते. ती पाच वर्षांची होती. ते सोडायला तयार नव्हतं. लहान मुलांच्या हातातला खाऊ हिसकावून घेतला. दिला नाही तर चावायला पहात होते. मी जवळ आल्यावर त्याने केस सोडले. मुलगी खूप घाबरून गेली होती. नशीब कि तिला माकडाची भीती नाही बसली.

नागपूर जवळ रामटेक नावाच ठिकाण आहे.. तिथे पण भरपूर माकड आहेत.. हातातल काही पळवून नेण्यात तर त्यांचा हातखंडा.. भरपूर अनुभव आहेत.. लिहेल नंतर..

शिमल्याचं झक्कू टेम्पल . तिथेही माकडांचा उपद्र्व आहे. हातातलं काहीही पळवून नेऊन दरीत फेकून देतात.

रश्मी, छान लिहीले आहे

एकदा आम्ही बंगलोरला नन्दी हिल्स जवळच्या बागेत गेलो होतो . तिथे ही माकड होतीच. माझ्या बहिणीची पर्स ज्यात तिच्या सगळ्या गोष्टी होत्या, ती माकडाने लांबवली आणि ते झाडावर जाऊन बसल. पर्स उघडण्याचा प्रयत्न करु लागल. इकडे खाली आमच्या जीवाच पाणी पाणी झाल. जास्त ओरडता पण येत नव्हतं कारण घाबरुन पर्स सकट ते लांब पळून जाईल ही भीती होती. पण दुसर्‍या बहिणीने आयडिया केली. तिने तिची पर्स घेतली आणि जोरात खाली फेकली. त्या बरोबर त्या माकडाने ही त्याच्या हातातली पर्स खाली टाकली. आम्ही ती झडप मारुन घेतली आणि सुटकेचा नि:श्वास टाकला. सेम माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीतली युक्ती उपयोगी पडली

हा किस्सा माझ्या काकूच्या बाबतीत घडलेला. साधारण १५-१६ वर्षांपूर्वीचा.
नागपूर जवळच्या भिवापूर येथे जंगलाच्या सीमेलगत आमचे वडिलोपार्जित घर आहे. नुकतीच थंडी पडायला सुरुवात झाली होती म्हणून काकूने घरातील गोधड्या, ब्लँकेट, राजया इ. दुपारी उन दाखवायला म्हणून मागच्या अंगणात घातल्या. रात्री त्या घरात आणून ठेवायला पार विसरली. मग सकाळी उठून मागचे दार उघडले तर काय एक मोठ्ठे वाघोबा (बिबट्या न्हवे) एका गोधडीवर बसलेले. एका क्षणातच काकूने दरवाजा बंद करून घेतला आणि आत पलायन केले. मग काका आणि आजोबांनी घरातले डबे वगैरे मोठमोठ्याने वाजवून वाघाला पळवून लावले.
काकूने नंतर सांगितले की भीती काय चीज असते ते त्यावेळी तिने अनुभवले.

मलेशियाला बाटु गुहा पाहायला गेलो तेव्हाची गोष्ट. वर जाण्यासाठी असलेल्या हजार पायऱ्या चढून वर गेल्यावर लक्षात आले की अजून वर थोड्या पायऱ्या व त्यावर एक लहान देऊळ आहे. आईने निघताना सोबत खादाडीची पिशवी घेतलेली व ती माझ्या हातात होती. वर गेल्यावर आई तिथेच बसली, आम्ही त्या अजून थोड्या पायऱ्या चढून वर गेलो. बाटु ही चुनखडीच्या दगडातून बनलेली टेकडी व गुहा आहे , तिथे अनेक ठिकाणी वरून ओतल्यासारखे दगड ओतलेले आहेत. अशाच एका दगडाखाली उभे राहून त्याला धरले की आपण तो दगड उचलून धरलाय असा भास होतो.

मीही असा एक फोटो काढण्यासाठी हातातली पिशवी खुर्चीवर ठेवली व तिथून दूर गेले. तिथल्या असंख्य माकडांपैकी एकाने ती उचलली. त्याने पिशवी उचलताच मी किंचाळले त्यामुळे तिथे उपस्थित देशी विदेशी पर्यटकांचे लक्ष माझ्याकडे व माझ्याकडून माकडाकडे गेले. माकड सरसर वर जाऊन बसले व पिशवी उघडून पाहू लागले. मी खालून खूप आरडा ओरडा, हातवारे, काही फेकायला मिळाले तर ते त्याच्या अंगावर फेक वगैरे खूप प्रयत्न केले पण त्यामुळे पर्यटकांची करमणूक झाली, माकडाने पाहिलेही नाही. थोडा वेळ तिथे थांबून निराश होऊन खाली निघत होतो तेवढ्यात माझी पिशवीत असलेली टोपी माकडाने खाली फेकली. दुसऱ्या माकडाने ती उचलायच्या आधीच मी ती धावत जाऊन उचलली. सुदैवाने पिशवीत फक्त खाद्य वस्तूच होत्या.

खाली आल्यावर आईच्या कानावर ही बातमी घालताच तिने ब्रह्मांड कोसळल्याचा देखावा निर्माण केला. शुद्ध तुपात बनवलेले बेसन लाडू माकडांच्या हातात ही बातमी तिला पुरेशी होती. आम्ही जिथे उभे होतो तिथून वर माकड, पिशवी, हातातले लाडु वगैरे सगळे यथासांग दिसत होते. बाटु गुहेच्या आजूबाजूला राम हनुमान वगैरे देवळे आहेत. प्रत्यक्ष हनुमान तुझे बेसन लाडू खातोय या शब्दात आईचे खूप सांत्वन केले पण उपयोग शून्य. लाडू माकडाने खाल्ले आणि मी शाब्दिक मार खाल्ला.

खाली आल्यावर ऊन होते म्हणून मी टोपी परत डोक्यावर चढवली. चार पाच लोकांनी टोपीवरून मला ओळखून परत विचारपूस करून आईच्या दुःखावर परत डागण्या दिल्या.

माकडांचाच अनुभव आहे. एकदा घारापुरी लेण्यात गेलेलो तेव्हा कुल्फी घेतलेली तर एक मोठं माकड अंगावर धावुन आलं.
नवर्‍याने आणि मुलीने आधीच कुल्फी फेकुन दिलेली ती दुसर्‍या दोन माकडांनी घेतलेली आणि खात होते.
अर्थात माझं ह्याकडे लक्ष नव्हतं म्हणुन मी कुल्फी हातातच धरुन ठेवलेली.
ते माकड दात विचकुन अंगावर येत होतं तरी मी कुल्फी हातात धरुन डोळे बंद करुन किंचाळत होते.
दोघेही ओरदुन सांगत होते की कुल्फी फेक. पण ते डोक्यात शिरायला काही सेकंद लागलीच.
मग कुल्फी झटकन फेकुन दिली तेव्हा ते माकड कुल्फीच्या दिशेने गेलं.
दुसरा अनुभव माथेरानला आला. तेव्हा हातात बिसलेरीची बाटली होती.
पण हा वरचा अनुभव असल्यामुळे माकड माझ्या जवळ येताच आधी बाटली फेकली आणि मग डोळे बंद करुन किंचाळले. Lol

माकडांचाच किस्सा.... आमची कुलदेवी नाशिकची वणीची देवी. सहकुटुंब वर्षातून एकदा जायचो. तिथे माकडांचा उपद्रव असाच खूप. खाण्याच्या पिशव्या पळवणे इ. इ.
एकदा आजीने देवळाच्या आवारातच एका माकडला काहीतरी खायला दिले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. झालं, त्याने आजीचा हातच पकडला आणि कडकडून चावा घेतला. बिचारी चांगलीच कळवळली. मग डॉक्टरसाठी धावाधाव केली कारण माहित नव्हतं असा प्राणी कधी चावला तर काय करावं लागतं.... पुढचं एवढं काही आठवत नाही. बहुधा इंजेक्शन्च दिलं...... पण तो वण खूप दिवस होता.

बापरे साधना. श्रीलंकेत पण माकडांचा बराच उपद्रव आहे. मलेशियाबद्दल माहीत नव्हते.

अंजली, प्राण्यांमध्ये माकडे, मांजर आणी कुत्रा या पैकी कुणीही चावल्यावर लगेच उपाय योजना करावीच लागते, कारण माकडे आणी कुत्रे या दोघांमुळे रेबीज होते असे वाचलेय. जर कोणी डॉक लोकांनी हे वाचले तर ते खुलासा करतील.

मनीम्याऊची काकी वाघाला घाबरली? Lol

मनीम्याऊ, तुझी काकु लकी आहे गं बाई.

हो, माकड, मांजर, कुत्रा, वटवाघूळ यापैकी काहीही चावला तरी रेबीज होऊ नये म्हणून 3 इंजेक्शने घ्यावी लागतात. माझ्या मुलीला हाताला मांजरीने साधा पंजा मारला. पण रक्त आलेले असल्यामुळे इंजेक्शन घ्यावे लागले.

माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे कुत्रे, मांजरं, वटवाघळं, माकडं, रॅकुन्स अशा बर्‍याच प्राण्यांपासून रेबीजचा प्रसाद मिळू शकतो जर ते आधीच इन्फेक्टेड असतील तर. प्राण्यांना रेबीज वॅसिनेशन दिले असेल आणि मग ते चावले/बोचकारले तर आपल्याला धोका नसतो. अर्थात हे पाळीवप्राण्यांच्या बाबतीत, मोकाट माकडांना कोण पकडून वॅसिनेट करेल. वॅसिनेशन झालेले असेल तरी त्यांच्या नखांवरील किंवा दातांवरील बॅक्टेरियापासून जंतुसंसर्ग होउ शकतो. त्यासाठी अ‍ॅन्टिबायाटिक्स देतात.

हा धादा वाचायला आणि संध्याकाळी ५.३० वाजता स्वयंपाकघरात खुडबुड ऐकू आली.पाठोपाठ काही पडल्याचे आवाज ऐकू आल्यामुळे आधी मुलाच्या नावाने ओरडत होते ती आत गेले.बघते तर काय एक खार स्वयंपाकघराच्या ओट्यावर बागडत होती.बिचारी चुकून आत शिरली आणि निघायचे कसे ते कळेना.तिचा धूडगूस पाहून २ मिनिटे मलाही सुचेना.जाळीची खिडकी बंद होती,ती उघडून ठेवल्यावर खार बाहेर सटकली.२-३ मिनिटाचा प्रश्न होता.कशी आत शिरली हे पण एक कोडेच आहे.कदाचित जाळीचा दरवाजा तिच्याकडून चुकून सरकला असावा.मोबाईलवर क्लिक करायला हवे होते असं नंतर वाटले.

बाकी माकडांचेच किस्से आहेत.एकच लिहिते.पेपर वाचताना सहज खिडकीकडे लक्ष गेले तर प्रथम मांजर वाटले पण माकडाचे पिल्लू ४ पायांवर चालत कुंडीतल्या झाडांच सत्यानाश करत चालत होते.नवरा अगदी जवळ होता तरी त्याला पत्ताही लागला नाही. स्वयंपाकघराच्या खिडकीला जाळीची सरकती खिडकी आहे.ती खिडकी सरकवून एक माकड आले आणि ओट्यावर ठेवलेले टॉमेटो उचलून पळाले.ते बघताना मीही आत पळाल्यामुळे संत्री वाचली.

आमच्या गावी व सावंतवाडीत गेले दोन वर्षे माकडे धुमाकूळ घालताहेत. एका घरात म्हणे एक माकड आठवडाभर येत होते. घरातील लोक सकाळी जेवण बनवून उरलेले झाकून ठेऊन दाराला कुलूप कामाला जात. घर कौलारू होते, माकड कौल काढून उतरायचे, जे हाताला मिळेल ते खाऊन पिऊन टुम्म्म होऊन दुपारची झोप काढून संध्याकाळी परत वरच्या कौलातून बाहेर जायचे. असे चार पाच दिवस झाल्यावर एका दुपारी घराची मालकीण अवचित परतली. माकड बेडरूममध्ये झोपले होते Happy तिने उगीच किंचाळून त्याची झोपमोड केली. ते जागे होऊन कौलातून पळून गेले तेव्हा कळले माकड कुठून यायचे ते.

माकड कौल काढून उतरायचे, जे हाताला मिळेल ते खाऊन पिऊन टुम्म्म होऊन दुपारची झोप काढून संध्याकाळी परत वरच्या कौलातून बाहेर जायचे.
नवीन Submitted by साधना on 14 April, 2018 - 16:08
<<

ते माकड खाऊन पिऊन टुम्म्म होऊन दुपारची झोप काढून संध्याकाळी परत वरच्या कौलातून बाहेर जायचे त्यावेळेस काढलेले कौल परत लावून जायचे की कसे ? कारण ते माकड आठवडाभर घरात येत होते आणि घरच्यांना त्याचा पत्ता नाही म्हणून विचारले.

अनिरुद्ध तुमचा प्रश्न बरोबर आहे पण मला उत्तर माहीत नाही. गेल्या वर्षी मी गावी गेले तेव्हा घरच्यांनी हा माकडी किस्सा ऐकवला, नंतर वाडीला गेले तिथेही मी विचारून किस्सा खरेच घडलेला का याची खातरजमा करून घेतली. खरेच घडलेला. कदाचित माकड कौल तसेच उघडे ठेऊन जात असेल, उन्हाळ्यात लक्षात येणार नाही, पावसाळ्यात कळले असते.

तेव्हा माकडांचे अजून काही किस्से ऐकले होते जे आता विस्मरणात गेले. सावंतवाडीला सगळ्यांनी खिडक्यांच्या ग्रिलला प्लास्टिक जाळी बसवून घेतलीय कारण लहान माकडे ग्रिलमधून घरात शिरायला शिकली.

माकडांचे हे आक्रमण खरेतर सूचना आहे, त्यांच्या नैसर्गिक खाण्यावर व राहण्यावर माणसाचे आक्रमण झाल्याची.

सावंतवाडीला सगळ्यांनी खिडक्यांच्या ग्रिलला प्लास्टिक जाळी बसवून घेतलीय कारण लहान माकडे ग्रिलमधून घरात शिरायला शिकली.
<<

ओके, किस्सा कोकणातला आहे होय,
कोकणातल्या घरांना आतून माळा केलेला असतो तेंव्हा मळ्यावर चढून वर पाहील्या शिवाय अथवा पावसळ्याचे दिवस असल्या शिवाय कौल काढल्याचे लक्षात येणार नाही.

धागा माकडांनी पळवलाय Happy

मित्राच्या मामाच्या गावी शिकारीला गेलो असताना रस्त्याकडेच्या जंगलात एका विस्तीर्ण मोकळ्या जागी वाघोबांचे दर्शन झाले. अंधारात फोकस मारला आणि छानपैकी दिसले. गावाकडचे येडे धाडसी लोकं गाडी रस्त्यावरून उतरवून आत मैदानात नेत होते. मी मित्रासोबत जीपच्या छतावर फोकस पकडून बसलेलो. आम्हीच घाबरून आरडाओरडा केला तेव्हा त्यांनी घुसवलेली गाडी पुन्हा रस्त्यावर मागे फिरवली.

मग एका रानडुकराचे दर्शन झाले. त्यामागे दोघे येडे पुन्हा आत धावले. नशीब सुखरूप परत आले. डुक्कर निसटले.

मग रानससे दिसले. Tiपले. मस्त मेजवानी झाली.

नॅशनल पार्कचे अनुभव नंतर लिहितो.... आता झोप आली.

ऑस्ट्रेलियात असताना न्यूकासल विद्यापीठात काम करते होते. विद्यापीठात मोठे जंगल होते. तेव्हा नियमितपणे वॉलबीज, पॉसम्स, कोआलाज दिसायचे. सुरुवातीला भीती वाटायची नंतर नंतर सवय झाली. यु.के. ला आल्यावर हरणे, कोल्हे अगदी जवळून पाहिले आहेत. केनिया सफारी केली तेव्हा अनेक वन्यप्राणी अगदी जवळून बघितले आहेत. खूप मस्त अनुभव!! सफारी आणि प्राणिसंग्रहालयाचे पुष्कळ अनुभव आहेत. लिहिते वेळ मिळेल तसे.

माझे इथे थायलंडच्या टायगर टेंपल (तसकरीच्या आरोपाखाली ते टायगर टेंपल आता थाई सरकारने बंद केले आहे), अ‍ॅमेझॉन सफारीबद्दल लेख आहेत. केनिया सफारीवरसुद्धा एक लेख लिहितेच आता. Happy

कोआला प्रत्यक्ष जंगलात? >>> होय अनु. निलगिरीच्या झाडांवर दिसतात कोआला. नंतर झूमध्ये कोआला कडलिंग वगैरे प्रकारपण केलेत. पण वाइल्डमध्ये प्राणी बघण्याचा आनंद वेगळाच असतो.

निलगिरीच्या झाडांवर दिसतात कोआला.>> यावरून एक आठवलं. माणूस ऑस्ट्रेलियात पोचला तेव्हा त्याने जंगलं जाळून स्वतःला सोयीचे असे गवताळ प्रदेश तयार होऊ दिले ( जेणेकरून गवत खाणार्या प्राण्यांची शिकार करणे सोपे होईल). निलगिरी म्हणजेच युकॅलिप्टिसची झाडं सहजासहजी जळत‌ नाहीत. त्यामुळे ती वाचली. त्याबरोबर त्या झाडांवर जगणारे कोआलासारखे प्राणीही वाचले आणि त्यांची भरभराटही झाली Happy
धाग्यावरचे एकेक अनुभव मस्त आहेत. चारधाम यात्रेत माझ्या आईचाही चष्मा माकडाने पळवला होता.

Pages