निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा

Submitted by मार्गी on 21 May, 2016 - 07:48

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न

पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा

भीषण दुष्काळाच्या वाळवंटात हिरवळ वाटावेत अशीही काही उदाहरणं आहेत! त्यापैकीच एक राजेंद्रसिंह राणा अर्थात् भारताचे पाणीवाले बाबा (Waterman of India)! आज ते कित्येक राज्यांमधल्या दुष्काळाशी लढताना दिसतात. राजस्थानातल्या कित्येक गावांमध्ये जोहड आणि जलस्रोतांना पुनरुज्जीवित केल्यानंतर आज ते देशभर फिरतात आणि लोकांना पाणी साठवण्याचा मंत्र देतात. अनेक सरकारी योजनांनाही ते मार्गदर्शन करतात. त्यांचं नाव द गार्डियनच्या अशा ५० लोकांच्या यादीमध्ये आहे जे पृथ्वीला वाचवू शकतात.

ह्या पाणीवाल्या बाबांची भेट झाली नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये. देगलूरमध्ये विश्व परिवार नावाच्या एका संघटनेच्या 'दुष्काळ निवारण परिषदेमध्ये' जाणं झालं. तिथे पहिल्यांदाच ह्या अवलियाची भेट झाली. त्यांचं भाषण ऐकणं हा एक अनुभव होता. त्यांना ऐकणं वेगळं वाटलं. दूरचा प्रवास करून ते आले, त्यांची‌ ट्रेन सहा तास लेट होती आणि ट्रेनमधून उतरून त्यांनी दोन तासांचा प्रवास केला. लोक खूप वेळेपासून वाट बघत होते, म्हणून ते रेस्ट हाऊसवर न जाता सरळ कार्यक्रमाच्या जागी आले आणि एकदम अनौपचारिक पद्धतीने त्यांनी भाषण केलं. भाषणापेक्षाही तो एक थेट संवाद होता. त्यांना ऐकताना असं वाटलं की, हा माणूस आपल्या ओळखीचा जवळचा डॉक्टर आहे आणि आपल्या रोगावर तो अचूक इलाज करू शकतो.

आधी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणा-या विश्व परिवाराची ओळख करूया. विश्व परिवार कित्येक वर्षांपासून नांदेडच्या गावांमध्ये कार्यरत असलेली संघटना आहे. त्याचे संयोजक श्री कैलास येसगे माझे प्रिय मित्र! अनेक वर्षांपासून विश्व परिवार (औपचारिक संस्था नाही, अनौपचारिक संघटन) अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहे. दर वर्षी व्याख्यानमाला, स्पर्धा, आरोग्य शिबिर, सरकारी योजनांचे लाभ घेण्यामध्ये लोकांना मदत करणे आणि गेल्या काही वर्षांमध्ये पाणीप्रश्नावर अनेक गावांमधील कार्य ही परिवाराच्या कामाची उदाहरणं. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर व उदगीरच्या गावांमधल्या तरुणांची ही सकारात्मक आणि सृजनात्मक काम करणारी संघटना आहे. तिचं काम आज शेकडो गावांपर्यंत पोहचलं आहे.

त्याची चुणूक देगलूरमध्ये पोहचतानाच आली. देगलूरमध्ये पत्ता विचारला तेव्हा एका सहप्रवाशाने लगेच विचारलं, परिषदेला आलास का! तोसुद्धा कैलासचाच मित्र आहे. एका मोठ्या मैदानात सभेचं आयोजन होतं. बघता बघता हजारो शेतकरी आले. बसण्याची जागा संपून गेली तरी लोक येत राहिले. आमदार व खासदारही आले; कलेक्टर आणि अन्य अधिकारीही आले. काही शेतक-यांनी आपलं मत मांडलं. पण सगळे वाट पाहात आहेत पाणीवाल्या बाबांची. ते आले तसे लोक आनंदित झाले. इतक्या वेळ वाट पाहणं सार्थक झालं. एक गोष्ट नक्कीच खटकली की जो माणूस अजिबात आराम न करता प्रवासातून सरळ इथे येतोय, त्यांचा किती वेळ आपण सगळ्यांच्या सत्कारामध्ये वाया घालवतोय. असो.

राजेंद्रसिंहांनी अनेक गोष्टी सांगितल्या. हळु हळु दुष्काळाचा कोड ब्रेक होत गेला. त्यांनी सांगितलं की, अनेक वेळा पावसाळ्यात आपण बघतो की, खूप ढग आलेले असतात. पण पाऊस पडत नाही. पाणी न देताच ते निघून जातात. त्याचं कारण ढगांखाली झाडं नसणं हे आहे. जिथे हिरवा पट्टा असेल, तिथे ढग खाली येऊन पाणी देतात. जर आपण वृक्षांचं आवरण जमिनीवर लावलं तर असे ढग पाणी दिल्याशिवाय जाणार नाहीत. त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, आपण अशी पिकं घ्यायला पाहिजेत जी इथल्या हवेला व वातावरणाला योग्य असतील. पण अनेकदा आपण चुकीची पिकंच घेतो. जल संधारणाचा एकच मार्ग आहे- पाणी वाचवत राहणे- जसं जमेल तसं पाणी थांबवा; त्याला पळू देऊ नका. त्यासाठी त्यांनी अनेक फॉर्म्युले सांगितले. जिल्ह्यातलं पाणी जिल्ह्याच्या बाहेर जायला नको. प्रत्येक ठिकाणी ते अडवायला पाहिजे. आणि असं अडवायचं की, सूर्यालाही पाण्याची चोरी करता येऊ नये! त्यामुळे वॉटर हार्वेस्टिंग, छोटे बांध, सीसीटी (कंटिन्युअस कोंटूर ट्रेंच) इत्यादी करायचे. जे पाणी पळतंय, त्याला संथ करायचं. छोट्या नद्यांची स्वच्छता करायची. त्यांनी सांगितलेला आणखी एक फॉर्म्युला म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या युवकांना नांदेडच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. तेव्हाच ही सगळी कामं होतील. हे लगेच पटलं.


सौजन्य: कैलास यसगे (vishwapariwar@gmail.com)

पाण्याच्या संधारणाची अनेक कामं महाराष्ट्रात झालीही आहेत. शिरपूर पॅटर्न असेल किंवा जलयुक्त शिवार योजना आणि इतरही आहेत. संपूर्ण देशातील ४०% धरणं एकट्या महाराष्ट्रात आहेत. तरीही हा दुष्काळ! त्याचं कारण एकच आहे की हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण करायला इच्छाशक्ती पाहिजे. जेव्हा कधी आपण आजारी पडतो, तेव्हा आपल्याला आजारी आहोत हे कळतं कारण आपल्याला आरोग्यही माहिती असतं. जर आपल्याला आरोग्य माहितीच नसतं तर रोग हा रोग वाटलाच नसता. आज आपण बघतोय की हा दुष्काळ आहे, कारण संपन्नता म्हणजे काय, हेसुद्धा आपल्याला माहिती आहे. फक्त आपण त्याच्याशी जोडू शकत नाही आहोत. ही फक्त एक प्रकारची डिस्कनेक्टिव्हिटी आहे. हे दूर करणं कठिण आहे, पण अशक्य नाही. त्यासाठी तीव्र इच्छा असलेले लोक हवेत. जिद्द हवी, उत्साह हवा. राजेंद्रसिंहांनी जसं राजस्थानामध्ये केलं. पाण्याच्या पारंपारिक जोहड व्यवस्थेला पुन: कार्यरत केलं. काळाच्या ओघात त्यामध्ये आलेले दोष दूर केले. हजारो गावांपर्यंत हे काम नेलं. हे काम करण्यासाठी एक मोठं जनसंघटन उभं केलं. छोट्या छोट्या कामांद्वारे लोकांना समोर नेलं. अनेकदा छोट्या कामांमधूनच मोठ्या कार्याचा पाया घातला जातो. गांधीजींनी जे काम केलं, त्याचा पायाही असाच तयार झाला होता. गांधीजींच्या कामाचं सूत्र हेच होतं की, करायला सोपे असलेले कार्यक्रम लोकांना द्यायचे. जसं एक दिवसाचा सत्याग्रह, एका छोट्या कृतीद्वारे सरकारविरोधात असंतोष जाहीर करणे इत्यादी. त्यामुळेच लोकांचा उत्साह वाढतो व ते सहभाग घेतात. आणि हेच योग्य आहे, कारण महान अशा कामाची अपेक्षा व्यापक समुदायाकडून ठेवता येत नाही. सगळे जण क्रांतीकारक होऊन फासावर जाऊ शकत नाहीत. पण प्रत्येक जण छोटं- मोठं काम तर करूच शकतो/ शकते.

बघितलं तर बदलासाठी रॉकेट सायंसची काहीच गरज नसते. सगळ्यांनी मिळून एक पाऊल उचललंं तरी मोठा टप्पा गाठता येतो. डॉ. अभय बंगांचं एक सूत्र आठवतं. त्यांनी जेव्हा बालमृत्युवर काम करायला सुरू केलं, तेव्हा त्यांच्या संशोधनात त्यांना बालमृत्युची १८ कारणं आढळली. पण सगळ्याच कारणांच्या परिस्थितीत सुधारणा करणं खूप अवघड होतं. मग अनुभवाने त्यांंना कळालं की, अठरामधल्या तीन- चार कारणांवरही काम करून बालमृत्युचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुख्य अशा तीन- चार घटकांवर काम केलं आणि काही वर्षांनी बालमृत्युचं प्रमाण कमी झालं. तसंच ह्या दुष्काळाचं ही असेल बहुतेक. कारणं अनेक आहेत आणि जास्त तर आपल्या नियंत्रणाबाहेरची आहेत. पण काही कारणं तरी आपल्या नियंत्रणात आहेत. त्यावर थोडं काम सगळ्यांनी केलं तरी परिस्थिती नक्कीच बदलेल.

पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादेव पायेंग

माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख
ही लेखमाला हा एक स्तुत्य उपक्रम आहे >>>> +११११

या उपक्रमात शहरी माणूस काय प्रॅक्टिकल मदत करु शकतो हे कळले तर बरे होईल.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!

मला वाटतं 'मदत' ही बाबच थोडी चुकीची आहे. 'मदत' आली की 'सेवा भाव' येतो आणि मग उदात्तपणा इ. इ. बाहेर कुठे मदत करणं हे एका अर्थाने आपल्या स्वत:पासून लांब जाणं (किंवा स्वत:ला मदत न करणं) नाही का?

ह्या लेखमालेचा विषय अशी मदत मिळवण्यापेक्षा जास्त डोळसपणे ह्या गोष्टींकडे कसं बघता येईल, हा आहे. अशी समज कशी वाढवता येईल, हा आहे. मदतीपेक्षा स्वयंस्फूर्तीने जिथे जसं वाटेल तसं आतून येईल ते करावं. कोणताही सहभाग. भले शहरातल्या लोकांना निसर्गाच्या जवळ जाणं शक्य नसेल. पण अनेकदा निव्वळ शिक्षणामुळे अनेक जण त्यांच्या "रूटस" पासून तुटताना दिसतात. आपण त्यांना रूटसपासून तुटण्याविषयी जागरूक करू शकतो. आणि प्रत्येक जण सहजपणे नेहमीच कुठे ना कुठे असं काहीतरी करत असतो. दर वेळेस 'मदतीचा' किंवा 'सेवेचा' आग्रह कशासाठी? असो. चु. भू. द्या. घ्या. Happy