अकोल्यातले दिवस - श्री. आनंद मोडक

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

शाळेत तिसरीचौथीत असताना एका कुठल्याश्या बुधवारी का गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर गादीवर मी लोळत पडलेलो असताना आईनं टीव्ही लावला. म्हणाली, ’आता सुरू होणार आहे तो कार्यक्रम नीट ऐक. पु. ल. देशपांड्यांचा कार्यक्रम आहे. आपल्या घरी त्यांची पुस्तकं आहेत. तुला कार्यक्रम आवडला तर लायब्ररीतून तुला त्यांची अजून पुस्तकं आणून देईन.’ कार्यक्रमाचं नाव होतं ’निवडक पु.ल.’. कार्यक्रम सुरू झाला आणि संपला. आई, आजी खदखदून हसत होत्या. टीव्हीतले पुलंसमोरचे प्रेक्षकही खोखो हसत होते. मला फारसं काही कळलं नाही. पण तरीही पुढच्या आठवड्यात आईनं सांगण्याआधी मी टीव्ही सुरू केला. कारण पुल काय बोलले ते नीट कळलं नसलं तरी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी पेटीची अप्रतिम सुरावट मला फार आवडली होती. ती सुरावट आठवडाभर आपोआप माझ्या डोक्यात वाजत होती. आताही कार्यक्रम सुरू होण्याआधीची पेटीवरची ती सुरावट मला ऐकायची होती.

त्या दिवशी कार्यक्रम संपल्यावर मी ती सुरावट गुणगुणत होतो, तेव्हा आजी म्हणाली, "ही चाल आपल्या आनंदा मोडकची आहे." आजीनं मला मग त्या ’आपल्या आनंदा मोडक’बद्दल सांगितलं. मोडककाका अकोल्याचे होते. माझ्या वडिलांच्या शाळेत शिकले. त्यांच्या एकदोन वर्षं पुढेमागेच होते. घरची गरिबी, प्रचंड कष्ट करून घेतलेलं शिक्षण, गाण्यावरचं प्रेम, पुण्यामुंबईला त्यांची गाजलेली आणि गाजत असलेली नाटकं असं सगळं आजीकडून ऐकलं. मोडककाकांच्या पेटीसाठी मी पुलंचा कार्यक्रम बघू लागलो.

नंतर चारपाच वर्षांनी मी एका तरुणीच्या प्रेमात पडलो. तिचं नाव आशा. तिचा आवाज ऐकूनच माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. दिवसभर तिची गाणी आमच्या घरी वाजत असायची. माझ्या प्रेमाचा घरच्यांना कितीही त्रास झाला तरी मी बधलो नाही. आशावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं. माझ्या या उत्कट प्रेमाला मोडककाकांची गाणीही कारणीभूत होती. ’मना तुझे मनोगत’, ’भरलं आभाळ’, ’मी गाताना गीत तुला लडिवाळा’ अशा अफाट गाण्यांमुळे मी आशाच्या प्रेमात खोलवर बुडलो आणि मोडककाकांच्या प्रतिभेला अनेकदा हात जोडले.

कॉलेजात गेल्यावर मोडककाका पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटले. आमच्या इंजिनीयरिंग कॉलेजाजवळच त्यांची बॅंक होती. तिथे खालच्या मजल्यावर ते असत. काका भेटले आणि मग त्यांची इतर अनेक गाणीही भेटली. 'दोघी’मधल्यासारखी गाणी मी पूर्वी कधी ऐकली नव्हती. मोडककाकांनी दिलेली ’दोघी’ची कॅसेट मी माझ्या वॉकमनवर पाचदहा हजारवेळा तरी वाजवली असेल. ’मुक्ता’ची गाणी तेव्हा गाजत होती. ’साजणवेळा’चा पहिला प्रयोग नुकताच झाला होता. मोडककाकांची गाणी तेव्हा मला रोज नव्यानं प्रेमात पाडत होती. मोडककाकांच्या ऑफिसात जाऊन त्यांना ’काका, मला गाणी आवडली’ एवढं सांगणंसुद्धा मला खूप समाधान देत होतं.

मोडककाकांना भेटल्यावर कळलं की, आपलं मोठेपण ते इतरांना ओझ्यासारखं वाहवू देत नाहीत. आपल्या मोठेपणाचं ओझं त्यांनी स्वत:च उतरवून ठेवलं असल्यानं इतरांना ते जाणवण्याचा प्रश्नच नव्हता. प्रतिभा, ज्ञान, प्रज्ञा असं सगळं त्यांच्या ठायी एकवटलेलं असलं तरी त्यांचा दरारा कधीच जाणवत नसे. काका सगळ्यांचे मित्र होते. प्रत्येकाशी त्याच्या पातळीवरून बोलण्याचं आणि वागण्याचं असामान्य कसब त्यांच्या अंगी होतं. काकांच्या साधेपणामागे आपला कल्ट निर्माण करण्याचा हव्यास अजिबात नव्हता. साधुगिरी नव्हती. काकांच्या साधेपणाला दर्प नव्हता. त्यांचा स्वभावच होता तो. हा त्यांचा स्वभाव मला कायम त्यांच्या गाण्यांत दिसतो, ऐकू येतो.

मोडककाकांचं वाचन अफाट, स्मरणशक्ती एकपाठी. कुठलाही संदर्भ त्यांना नेमका आठवे. ते केवढं वेगवेगळं गाणं ऐकत! जगभरातल्या गाण्याचा त्यांच्याकडे साठा होता. इंटरनेटमुळे तर त्यांना खजिनाच सापडला होता. त्यांना आवडलेल्या गाण्याच्या लिंका अनेकांच्या इनबॉक्सात जाऊन पडत. फेसबुकवरही ते भरभरून लिहीत. गाण्याबद्दल बोलताना काकांमधलं सळसळतं चैतन्य वेगानं समोर यायचं. अशावेळी त्यांचे डोळे वेगळेच तेजस्वी दिसत. प्रत्येक आविर्भावात आत्मविश्वास असे. काका एखाद्या गाण्याबद्दल, गायकाबद्दल बोलत असताना जाणवे की, त्यांनी त्या विषयाच्या गुणदोषांची व्यवस्थित मांडणी केली आहे, त्यांचं आकलन तर्कशुद्ध आहे. गाण्याबद्दल बोलता मग ते अचानक गाणं गाऊ लागत. काकांचा आवाज मला कधी गायकाचा वाटला नाही, पण त्यांच्या गाण्यात केवढा गोडवा असे! आवाज ओबडधोबड, घोगरा पण त्यांचं गाणं खूप भारून टाकणारं असे.

त्यांचं लिहिणंबोलणंगाणं असं काहीच हातचं राखून नसे. इतरांचं, विशेषत: समकालीनांचं आणि तरुणांचं, कौतुक करणं हा अतिशय दुर्मीळ गुण त्यांच्या ठायी होता. नवे गायक-संगीतकार-वादक-दिग्दर्शक यांचं केवढं कौतुक ते करत! एकदा त्यांच्याकडे गेलो असताना त्यांना आशाची एक नवी लावणी ऐकवली. ती लावणी गाण्यासाठी आशानं घेतलेल्या मेहनतीबद्दल ते बराच वेळ बोलले. माझा एक (स्वभावानं) आगाऊ मित्र बरोबर होता. ती लावणी ऐकून तो मोडककाकांना म्हणाला, ’मला गाण्यापेक्षा संगीतसंयोजनच आवडलं.’ कणभरही नाराजी चेहर्‍यावर न दाखवता त्यांनी आपल्या तरुण संगीतसंयोजकाच्या कामाची तारीफ केली, ती पूर्ण प्रक्रिया समजवून सांगितली.

मोडककाकांच्या वाट्याला आलेल्या जगानं खूप काळ त्यांची दखल घेतली नाही. पैसा नसल्यानं त्यांच्या वाट्याला आलेल्या अपमानांचे प्रसंग मी काहीजणांकडून ऐकले होते. काकांची जिद्द, परिश्रम करण्याची विलक्षण ताकद, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं सोशिकपण यांबद्दलही मी ऐकलं होतं. पण त्यांच्या लिखाणात किंवा बोलण्यात या उपेक्षेचे, अवहेलनेचे उल्लेख कधी आले नाहीत. उलट आपल्या शिक्षकांबद्दल, मदत करणार्‍यांबद्दल बोलताना त्यांना भडभडून आलेलं मी पाहिलं आहे. माझे एक आजोबा, श्री. रमेश ठोसर, हे त्यांचे आवडते शिक्षक. ठोसरआजोबांच्या कितीतरी आठवणी ते सांगत. त्यांच्याबद्दल काकांनी एकदोन लेखांमध्येही लिहिलं. पण पुण्यात पाय रोवताना झालेल्या अवहेलनेविषयी त्यांनी कधीही जाहीरपणे बोलून, लिहून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. मोडककाकांची अनेक सुंदर गाणी प्रकाशात आली नाहीत. ’जिंदगी जिंदाबाद’सारख्या चित्रपटातली नितांतसुंदर गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. पण ते काम करत राहिले. सतत नवनवे प्रयोग करत राहिले. प्रखर बुद्धिमत्ता आणि तिला पेलून धरणारा उत्साह त्यांच्या ठायी होता. या उत्साहाच्या जोरावर ते सुरेख गाणी तयार करत राहिले.

मला मोडककाकांचं लेखन आवडायचं. त्यांनी आत्मचरित्र लिहावं म्हणून मी त्यांच्या मागे लागलो होतो. आठवणींचा केवढा मोठा खजिना त्यांच्याकडे होता. महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीचे, चित्रपटांतल्या नव्या प्रयोगांचे ते एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते. ’शब्दवेध’चे कित्येक सुंदर कार्यक्रम त्यांनी उभे केले होते. आकाशवाणीच्या बहारीच्या काळात ते रेडिओसाठी कार्यक्रम करत. दूरचित्रवाणीनं भारतात पाय रोवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी टिव्हीवर आपल्या संगीताची जादू पसरवली. 'संगीताचे अभ्यासक' असं बिरुद न मिरवता त्यांनी खरोखर अधाशासारखा गाण्याचा अभ्यास केला होता. आपली स्वतःची अशी तात्त्विक बैठक तयार केली होती. हे सगळं त्यांनी लिहिणं महत्त्वाचं होतं. पण लेखनासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांच्या काही आठवणी मी ध्वनिमुद्रित केल्या होत्या. आपण रेकॉर्ड करू आणि मग कसं लिहायचं ते नंतर बघू, असं ठरलं होतं. पण ही ध्वनिमुद्रणं काही सलग होत नव्हती. काका कायम कामात बुडलेले असत.

दोन वर्षांपूर्वी मी ठरवून त्यांच्या मागे लागलो. आठवडाभर रोज दोन तास बसून आपण रेकॉर्डिंग करू, असं मी त्यांना म्हणालो. एप्रिल महिन्यात मला ते म्हणाले, हरकत नाही, मी बोलतो, तू रेकॉर्ड कर, तू मला २३ मेला फोन कर, त्या दिवशी माझा एक प्रोजेक्ट संपतोय, मग नंतर मला वेळ आहे. मी बरं म्हटलं.

२३ मेला संध्याकाळी मी फोन करणार होतो. मोडककाका त्या दिवशी सकाळीच गेले.

मोडककाका मला रोज आठवतात. महात्मा सोसायटीच्या रस्त्यांवर फिरायला जाताना चट्टेरीपट्टेरी शर्ट घातलेले मोडककाका दिसायचे. अजूनही त्या भागातून जाताना मोडककाका दिसावेत, असं वाटतं. त्यांचं गाणं ऐकलं नाही, असा एकही दिवस गेल्या अनेक वर्षांत गेलेला नाही. काकांच्या गाण्यांनी मला अनेकदा निर्धास्त केलं आहे, मनातला सगळा कुंदपणा घालवला आहे. काका गेल्यानंतर बराच काळ त्यांची गाणी ऐकताना त्रास व्हायचा. डोळे भरून यायचे. ते गेल्यानंतर ते माझ्यासारख्या कितीतरी लोकांच्या आयुष्याचा भाग झाले होते, हे कळलं.

प्रस्तुत लेख मी त्यांच्या मागे लागून लिहून घेतला होता. सुधीर फडके आणि वसंत देसाई यांच्यावर ते अगोदर लिहिणार होते. रेडिओ हा मोडककाकांचा पहिला गुरू. मग ठरलं त्यांनी या गुरूबद्द्ल लिहायचं. पण काकांचं लिहून होईना. मग काका म्हणाले मी माझ्या कॉलेजबद्दल लिहितो. तर तो हा लेख. महत्त्वाचा अशासाठी की मोडककाकांच्या सांगीतिक आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलचा हा लेख आहे.

anand-modak.jpg

शालेय शिक्षण संपेपर्यंत ‘सीताबाई आर्ट्स व सायन्स कॉलेज’ मला केवळ ऐकून माहीत होतं. चौधरी हॉस्पिटलच्या गल्लीतून कधीतरी गेलो होतो, पण कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत कधीही गेलो नव्हते. कॉलेजचे प्रिन्सिपॉल (प्राचार्य) एम. जी. जोशीसर यांचाच काय तो परिचय होता. सदैव ‘सीना तानके’ चालणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे जोशीसर.

नॅशनल कंडेट कोअर अर्थात एनसीसीच्या महाविद्यालयीन पातळीवर सक्रिय असल्यानं मी आठवी-नववीत असताना ज्यांची प्रथम भेट मला स्मरते. अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजमधील मराठीचे प्राध्यापक अनंत अडाळकर सरांनी एनसीसी डेच्या निमित्तानं सादर झालेल्या एका ‘टॅब्लो’ची संहिता लिहिली होती. त्यात काही गाणुली (सॉंगलेट्स) होती. विनय भिडे, अंजली काटे अशी गायक/गायिका मंडळी एम. जी. सरांच्या घरी तंबोरा/पेटी/तबला यांसह गाण्यांना चाली लावण्याच्या खटपटीत - अचानक एम. जी. सरांना काय वाटलं कुणास ठाऊक? कुणाला तरी माझ्या घरी पिटाळून मला बोलावून घेतलं आणि हातातला कागद माझ्या हातात देऊन मला एका गाणुल्याला चाल लावण्याची ऑर्डर दिली. ‘स्वातंत्र्याचा रवि उगवला...’ अशी सुरुवात असलेल्या त्या चार ओळींच्या गाणुल्याला मी देसकाराच्या सुरावटीत बांधलं... गाऊन दाखवलं. सर्वांना फार आवडलं... त्याच्यापाठोपाठ पुढची सारी कवनं मी त्याच बैठकीत स्वरबद्ध केली.

एम. जी. जोशीसरांच्या चेहर्‍यावर समाधान होतं आणि डोळ्यांत कौतुक. हा माझा ‘सीताबाई आर्ट सायन्स कॉलेज’चे प्रिन्सिपॉल एम. जी. जोशीसरांशी झालेला (माझ्या कॉलेज प्रवेशापूर्वी) परिचय. त्यानंतरची दोन वर्षं शालेय शिक्षण पूर्ण करण्यात गेली. अकोल्यातल्या ‘गव्हर्नमेंट बॉईज हायस्कूल’मध्ये (नंतरचं ‘आगरकर उच्च माध्यमिक विद्यालय’) शिकणार्‍या मला तीन पायांची शर्यत, शंभर मीटर दौड, क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस असे खेळ खेळणं, सायन्स फेअरमध्ये मॉडेल मेकिंग, गाणं, बुलबुलतरंग वादन, नाटक, भाषण, ऑर्केस्ट्रा, वर्गाच्या हस्तलिखिताचं संपादन, एन. सी. सी.मध्ये सार्जंटगिरी या सगळ्यांइतकंच वाचन आणि रेडिओवरून संगीत-श्रवणभक्ती अशा अनेकविध गोष्टींमध्ये प्रचंड रस होता.

स्टेशनवरून टॉवरच्या काठानं येणार्‍या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली ‘अलायन्स लायब्ररी’ ही ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेली अकोल्याच्या सगळ्या वर्‍हाडीपणाला छेद देणारी एकदम फॉरीन वाटणारी जागा होती. जिथे माणसं अत्यंत कमी-आवश्यक तेवढंच आणि मंद मंद्र स्वरात बोलायची. एकूणच वास्तू, त्या भोवतीचा आसमंत, आतल्या दालनांतली पुस्तकांची शेल्फं, वाचकांकरता खुर्च्या-टेबलं, रंगसंगती, तिथल्या व्यवस्थापनाचे कर्मचारी... सगळं सगळं क्लासिक होतं, अभिजात होतं. आत गेल्यावर बाहेरच्या रुक्ष, कोलाहलयुक्त वातावरणाचा विसर पडायचा आणि पुस्तकांच्या अलीबाबाच्या गुहेत मी हरवून जायचो. आठवड्यातून किमान दोन संध्याकाळी ‘अलायन्स लायब्ररी’त मी ती बंद होईस्तोवर रमायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर बहुधा रोज संध्याकाळ मी ‘अलायन्स लायब्ररी’त असायचो.

रामदास पेठेतल्या माझ्या घरापासून स्टेशन रोडवरची दिवाणी कोर्टाशेजारची माझी शाळा, जिमखान्याचं मैदान, ‘भाटे ग्राऊंड’वर भरणारा रविवारचा भाजीबाजार (साप्ताहिक भाजी खरेदीच्या निमित्तानं) आणि ‘अलायन्स लायब्ररी’ एवढाच माझा स्टेशन रोडवर संचार होता.

उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्यावर पहिल्यांदा मी ‘सीताबाई आर्ट्स ऍन्ड सायन्स कॉलेजा’त ‘प्रवेश घेण्यासाठी’ प्रवेश केला. एफ. वाय. सायन्स अर्थात इंटर सायन्सला थेट प्रवेश घेण्यासाठी प्राचार्य एम. जी. जोशीसरांच्या ऑफिसमध्ये प्रवेश. पांढर्‍या शुभ्र पोशाखातल्या एम. जी. जोशीसरांनी माझी मार्कशीट पाहिली. मराठी/हिंदी दोन भाषांतलं मला मिळालेलं डिस्टिंक्शन पाहून मला कलाशाखेत प्रवेश घेण्याविषयी सुचवलं. पण माझ्या हट्टाखातर मला इंटरसायन्सला थेट प्रवेश दिला. खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट हा पहिलीपासून अकरावीपर्यंतचा पोशाख जाऊन चार शर्ट आणि फुलपँट्सची खरेदी माझ्या कॉलेजकरता केली गेली. मात्र घरातली एकमेव सायकल वडील वापरत असल्यानं कॉलेजला अस्मादिक पायीपायी (तेव्हा आम्ही त्याला ‘विनोबा एक्स्प्रेस’ असं ‘टायटल’ दिलं होतं.) जायचे. रामदास पेठेतल्या मुकुंद मंदिराजवळच्या मुळ्यांच्या वाड्यातल्या माझ्या आऊटहाऊसवजा घरातून निघून संघाचं ग्राऊंड ओलांडून सावजी हॉस्पिटल आणि लेडी हार्डींग हॉस्पिटलची भिंत यांच्यामधल्या रस्त्यानं चौधरी हायस्कूलवरून उर्दू हायस्कूलच्या मागच्या मोठ्या मैदानातल्या पायवाटेनं कॉलेजच्या मागच्या दारातून कॉलेजला पोचायचो. खूप पाऊस असेल तेव्हा मात्र स्टेशन रोडनंच जावं लागे. मुख्य द्वारातून प्रवेशताच उजव्या बाजूला खोखो/क्रिकेट/कबड्डी याकरता मोठं मैदान. मुख्य इमारतीत प्राचार्यांचं ऑफिस, कॉलेजच्या अकाऊंटंट, हेडक्लार्क, क्लार्क, टायपिस्ट, शिपाई यांच्यासाठी ऑफिसेस, प्रिन्सिपॉल ऑफिसच्या मागच्या बाजूस व्हरांडा असलेली लायब्ररी. तिच्या पलीकडे कॉलेजातला सर्वांत मोठा हॉल, जिथे वर्षाच्या पहिल्या दिवशी प्राचार्यांचं विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण होई. गाण्याच्या/वक्तृत्वाच्या स्पर्धा आणि कॉलेजच्या गणेशोत्सवातील कार्यक्रम तसंच विविध मंडळांचे (इतिहास मंडळ, साहित्य मंडळ, विज्ञान मंडळ इ.) कार्यक्रम इथे घेतले जात. त्याच्या अवतीभवती दोन-तीन छोट्यामोठ्या क्लासरूम्स. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताना डावीकडे इमारत. त्याला लागूनच 'एल' आकाराची दुमजली इमारत. यात शास्त्र शाखेतल्या प्रयोगशाळा आणि चार वर्षांच्या विद्यार्थ्यांकरता वर्गांचे हॉल. नव्या तिमजली इमारतीच्या तळमजल्यावर विद्यार्थ्यांसाठी तो जनरल हॉल, जिथे ठेवलेल्या टेबल टेनिसच्या टेबलावर बहुतांशी प्राध्यापक मंडळी खेळण्यात रमलेली असायची. एरवी विद्यार्थ्यांवर अत्यंत जरब बसवलेले कडक स्वभावाचे राजनेकर सर इतर प्राध्यापकांबरोबर खेळताना खळाळून हसत विनोद करताना पाहून मला अत्यंत विस्मय वाटत राही. कंपल्सरी इंग्लिश शिकवणारे सहा फूट उंचीचे देखणे शर्मासर आम्हाला ‘इन्स्पेक्टर कॉल्स’ हे नाटक शिकवताना नाटककार जे. बी. प्रिस्लेनं एकूण समाजव्यवस्थेतल्या दंभावर केलेल्या प्रहारांविषयी फार समरसून बोलायचे... त्यांचं बोलणं-शिकवणं मंत्रमुग्ध करणारं असे.

कॉलेजमध्ये सकाळी कलाशाखेचे वर्ग असायचे, तर दुपारी विज्ञानशाखेचे. प्री युनिव्हर्सिटी, एफ. वाय. आणि टी. वाय. अशा वर्षांच्या परीक्षांकरता विद्यार्थी शिकत. पैकी एस. वाय.चं वर्ष हे रेस्ट इयर होतं कारण त्याकरता युनिव्हर्सिटीची परीक्षा नसे. एफ. वाय. आणि टी. वाय.च्या अभ्यासक्रमाकरता एकत्रित परीक्षा टी. वाय.ला युनिव्हर्सिटी घेई आणि एफ. वाय. + टी. वाय. या युनिव्हर्सिटी परीक्षांच्या मार्कांची एकत्रित बेरीज घेऊन पदवीचे गुण आणि त्यानुसार क्लास ठरत असे.

कॉलेजविश्‍वात प्रवेश केल्यावर थेट एफ. वाय.ला प्रवेश घेतल्यामुळे आणि विज्ञान शाखेत फिजिक्स/केमिस्ट्रीचे प्रॅक्टीकल्स आणि गणित/फिजिक्स/ केमिस्ट्रीचे थिअरीचे तास यामध्ये खरं तर मी पुरता गुंतून जायला हवं होतं. पण वारा प्यायलेल्या शिंगरासारखी माझी अवस्था झाली होती. कॉलेजच्या निवडणुका, कॉलेजची क्रिकेट टीम, कॉलेजचा गणेशोत्सव, गाण्याच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपाचं नेतृत्व, नाटकांतला साभिनय सहभाग, गॅदरिंगमध्ये सादर केलेल्या विद्यार्थी वाद्यवृंदांचा संचालक- असा माझा सर्वत्र संचार होता. विज्ञानशाखेत शिकणारा मी खरं तर कलाशाखेतल्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रमायचो. रविंद्र कठाळे हा ‘अमेरिकेन फिल्ड सर्व्हिस’तर्फे १९६७-६८ मध्ये एक वर्षाकरता अमेरिकेतल्या एका कुटुंबात वर्षभर राहून आणि शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून आमच्या बॅचला (म्हणजे एफ. वाय. बी. ए.ला) सामील झाला होता. त्याच्याशी माझं फार जमलं होतं. वर्गातल्या काही कंटाळवाण्या लेक्चर्सला मागच्या बाकावर बसून आमच्या टवाळक्या चालायच्या. नवनवे जोक्स, पु. ल. देशपांड्यांच्या लिखाणातले खास पंचेस हे वहीच्या मागल्या पानांवर लिहून एकमेकांकडे पास व्हायचे आणि वाचून हसू आवरताना पुरेवाट व्हायची... शिकवणार्‍या सरांची नजर वळणार असा अंदाज येताना खूप काही समजत असल्याचा साळसूदपणाचा आव आम्ही स्वतंत्रपणे आपापल्या चेहर्‍यांवर आणि एकूणच देहबोलीतून भासवायचो. ललिता करंदीकर, रोहिणी-रमणी दासरी भगिनी, सुषमा-अंजली काटे भगिनी, बाळ जोशी आणि त्याचा भाऊ- भय्या भागवत- अशी काही गाणार्‍या मंडळींची नावं स्मरतात. ही सगळी कलाशाखेची मंडळी. प्रा. पद्माकर दादेगावकर (संस्कृत), प्रा. पंढरीनाथ मांडवगणे, प्रा. अनिक फडके आणि स्वत: प्राचार्य एम. जी. जोशी मंडळी गाणं, नाटकं यात खूप रस असलेली. मला आठवतं, वर्षाच्या सुरुवातीला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सादर व्हायच्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले, शिवास्पदे शुभदे’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या स्वातंत्र्यदेवीच्या स्तोत्राच्या समूहगायनाची तालीम आमच्या गानवृंदाकडून मी करवून घेताना कॉलेजच्या लायब्ररीशेजारच्या व्हरांड्यात अचानक अकोल्यातले संगीत/नाटक या क्षेत्रातले दिग्गज असलेले आणि ‘सीताबाई आर्ट्स कॉलेज’चे माजी प्राचार्य आदरणीय बाबूराव जोशी सर येऊन उभे राहिले आणि ‘यशोयुतां’ या शब्दांतल्या ‘ता‘वरल्या अनुस्वाराचा उच्चार ‘ताम्’ असा चुकीचा करणार्‍या आम्हा सर्वांना ‘ताऔं’ असा शिकवून, बिनचूक उच्चारण करण्याची संधी दिली. मुळात संस्कृतचे प्राध्यापक असलेल्या प्राचार्य बाबूराव जोशी सरांमुळे वेगवेगळ्या अक्षरांवर येणार्‍या अनुस्वारांकरता वेगवेगळे उच्चारण निर्दोषपणे कसं करावं याचा वस्तुपाठ मिळाला, जो मला जन्मभर पुरत राहिला आहे. स्वातंत्र्यदिनी आम्ही सादर केलेलं ‘स्वातंत्र्यदेवी’चं स्तोत्र सर्वांना खूप आवडलं आणि प्रत्येक विभागाच्या मंडळाच्या उद्घाटन समारंभाला अगर इतर कार्यक्रमांना स्वागतावर किंवा विषयानुरूप गाणं सादर करायची सुपारी आमच्या गानवृंदाला मिळू लागली.

आठवी-नववीपर्यंत चित्रपटही न पाहणारा मी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर निकाल लागेपर्यंतच्या दोन-अडीच महिन्यांत बहुतांशी जुने (म्हणजे मॅटिनीला दाखवले जाणारे) पन्नास साठ हिंदी/इंग्रजी चित्रपट पाहिले. आणि तो सिलसिला कॉलेजच्या वर्षातही चालू राहिला. तसा रेडिओ हा माझ्या बालपणापासूनन अगदी जवळचा आप्त-सखा बनून गेलाच होता. चित्रपटसंगीताबरोबरच चित्रपटातल्या पार्श्‍वसंगीतानं मी मोहून जाऊ लागलो. मला आठवतं ‘गाईड’ हा चित्रपट मी १९६७ पासून पुढची सुमारे पंधरा एक वर्षं चित्रपटगृहात जाऊन इतक्यांदा पाहिला, की पुढे मोजणं सोडून दिलं. आणि पाहत राहिलो. तेव्हा तर माझं स्वप्न होतं, की ‘गाईड’ची एक प्रिंट विकत घ्यायची आणि एक प्रोजेक्टरही म्हणजे घरबसल्या कधीही तो चित्रपट पाहता यावा आणि तेव्हा खुळचट आणि अशक्यप्राय वाटणारी गोष्ट विज्ञानानं आता फारच सोपी करून टाकलीय. आत्ता माझ्याकडे ‘गाईड’ची व्हीएचएस/सीडी/डीव्हीडी अशी तिन्ही संस्करणं आहेत.

एफ. वाय. बी. एस्सी.च्या परीक्षेनंतरच्या सुट्टीत मी ‘चित्रा’ टॉकीजच्या लगतच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या (टॉकीजमधून) बाहेर द्वाराच्या बाहेर (स्टँडवर लावलेल्या) सायकलवर बसून तेव्हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ या ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटाचे रात्रीच्या साडेनऊचे शो मी अनेक रात्री फुकटात ऐकले, ते केवळ संगीतकार सलील चौधरींच्या पार्श्‍वसंगीताकरता आणि अमिताभ आणि राजेश खन्नाच्या डायलॉग्जकरता. गाण्यांच्या आणि पार्श्‍वसंगीताच्या वेगवेगळ्या वाद्यांवर वाजणार्‍या परस्परपूरक संगीत खंडांचा अभ्यास याविषयी माझ्या मनात याच काळात प्रचंड आकर्षण निर्माण झालं... आणि मी त्याचा ध्यासच घेतला म्हणेनात. गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद मी दिग्दर्शित केला तेव्हाही भारूडापासून भावगीतापर्यंत, चित्रपटगीतांपासून देशभक्तीपर गीतांपर्यंतचं वैविध्य मी त्यात आणलं.

‘सुंदर मी होणार’ या पु. ल. देशपांडे लिखित आणि प्रा. पंढरीनाथ मांडवगणे दिग्दर्शित नाटकातली छोटीशी भूमिका असो अगर कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये डावखुरा मंदगती गोलंदाज आणि फलंदाज असो, मी सर्वत्र सारख्याच असोशीनं उत्कटतेनं असायचो. कॉलेजची हार्मोनियम -वर्षभर जवळ- माझ्या घरीच होती. कार्यक्रमाची तालीम आणि कार्यक्रमापुरती ती कॉलेजात सायकलच्या कॅरिअरवर ठेवून न्यायची-आणायची. माझ्या घरी माझं स्वत:चं असं बुलबुल तरंग हे एकमेव वाद्य होतं त्यामुळे गळ्यातून निघणारा स्वर शोधत पोटापुरती हार्मोनियम वाजवायला शिकलो ते कॉलेजच्या हार्मोनियमवर. प्रा. पद्माकर दादेगावकर सरांच्या घरी असलेल्या रेकॉर्डप्लेअरवर ‘तिसरी मंजील’ची लॉंग प्ले रेकॉर्ड मी आणि प्रभंजन मराठे (माझा शाळेपासूनचा गायक मित्र) तव्यावरची भाकरी उलटीसुलटी करावी तशी तासन् तास ऐकत राहायचो. दादेगावकर सर, ललिता करंदीकर ही माझी कॉलेजातली सिनिअर मैत्रीण आणि चंदूदादा गानू (माझा मित्र- सुनील गानूचे ज्येष्ठ बंधू) यांच्या घरी नाट्यसंगीतापासून आणि शास्त्रीय संगीतापासून भावसंगीतापर्यंत आणि शास्त्रीय संगीतापासून भक्तिसंगीतापर्यंत असंख्य ध्वनिमुद्रिकांची श्रवणभक्ती अकोल्यातल्या माझ्या महाविद्यालयीन कालखंडात केली आणि समृद्ध झालो. माझ्याकडे त्या काळात दहा पैसे अगर दोन आण्यांना फुटपाथवर मी खरिदलेल्या चित्रपटगीतांच्या पद्यावल्या, जवळजवळ दोनशे एक अजूनही आहेत. मी तीन-चार दोनशे पानी वह्या भरून अनेक गाण्यांचे शब्द लिहून संग्रहीत केले होते.
आमच्या एखाद-दोन वर्षांआधीच्या बॅचमधल्या मुकुंद जोशी-रमणी दासरी, प्रमोद पुराडउपाध्ये, बंडू क्षीरसागर, शरद देशमुख, सुरेश कोलाटकर, सूर्यकांत लंगड व सुभाष कान्हेड अशा आठ मित्रांनी ‘एट फेल्युअर्स क्लब’ नावाचा एक क्लब स्थापन केला होता. त्याचा मेंबर व्हायला किमान पात्रता होती, एकदा तरी नापास झालं असण्याची. ही सगळी नाटक साहित्य, संगीतवेडी मंडळी होती. या सगळ्यांना माझं फार कौतुक होतं पण क्लबचा मी अधिकृत सभासद होऊ शकत नव्हतो कारण शालांत परीक्षेपर्यंत मी उत्तम गुणांनी सदैव उत्तीर्ण होत आलो होतो.

माझ्या आगेमागे असणारे बाळ वडोदकर, माधव धोडपकर हे युनायटेड वेस्टर्न बँकेत उच्चपदस्थ झाले. रवि कठाळे, श्रीराम चित्रे हेही स्टेट बँकेत एक्झिक्युटिव्ह पदांवर पोचले. विनय भिडेसारखा गायक पॅरिसला एम. एस. करत व्हाया दिल्ली सध्या कॅनडात स्थायिक झालाय. कुणी डॉक्टरेट झाले, कुणी अभियंते.... ही सगळी मंडळी ‘सीताबाई आर्ट्स सायन्स कॉलेज’मधल्या ऍकडमीक शिक्षणविषयी कृतज्ञ असतील.

मी मात्र ‘सीताबाई कॉलेजा’त वर्षभरात विज्ञान शाखेतल्या शिक्षणक्रमात फारशी प्रगती दाखवली नसली आणि त्या आधारावर पुढचा प्रवास केला नसला, तरी या कॉलेजमधील वास्तव्यात मला माझ्या पुढील आयुष्यात मी संगीताच्या क्षेत्रात असेन- जगेन किंवा मरेन- असा साक्षात्कार झाला. जगण्याकरता एकमेव ध्येय कोणतं याचं भान आलं आणि याहून वेगळं मी काहीही करू शकणार नाही, हेही कळून चुकलं- आपल्या आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचंय आणि त्याकरता काय केलं पाहिजे, या विचाराचं बीज मनात रुजलं.

जन्मापासूनच्या पहिल्या वीस वर्षांतल्या अकोल्यातल्या माझ्या जडणघडणीत ‘सीताबाई आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज’मधल्या वास्तव्यानं, संस्कारांनी मला प्रेरित केलं, आत्मभान दिलं. बी. एस्सी.च्या प्रथम वर्षातल्या शिक्षणात स्वल्प किंबहुना न रमलेल्या मला त्या वर्षी विद्यापीठाच्या परीक्षेत (मला अपेक्षित असलेलं) अपयश मिळालं! ‘एट फेल्युअर्स क्लब’चा मी अखेर अधिकृत सभासद झालो आणि याच अपयशाच्या पायरीवरून मी आज जो काही संगीतकार म्हणून थोडंफार नाव आणि स्थान मिळवलं, तिथपर्यंत पोचलो! म्हणूनच माझ्या कलाप्रवासात ‘सीताबाई आर्टस ऍन्ड सायन्स कॉलेज’च्या योगदानाचा मोलाचा वाटा मी मानतो आणि त्याविषयी सदैव कृतज्ञ आहे.

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती रागिणे एमोडक व श्रीमती सुजाता देशमुख यांचे मनःपूर्वक आभार.

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०११)

***

लेखातलं श्री. आनंद मोडक यांचं छायाचित्र मोडक कुटुंबीयांच्या सौजन्यानं. छायाचित्रकार अज्ञात.

***
प्रकार: 
शब्दखुणा: 

छान आहे लेख . आवडला . त्यांनी संगीतबद्ध केलेलं तू तिथं मी मधलं दाही दिशा भरुनी उरे हे गाणं विशेष आवडीचं आहे.

(अवांतर - माझेही मोडककाका असेच होते. एकंदरीतच मोडक नावाच्या व्यक्ती लोभस असतात )

मस्त लिहीलेय !
प्रा. वसंत देश्पांडे ही असतील ना शिकवायला !
ते माझे चुलत सासरे !

लेख छान आहे पण हा लेख अकोल्याबद्दल आहे असे वाचताना कुठेही जाणवले नाही. अकोल्याला शब्दात मांडण इतक सोपं नाहीच!!!!

धन्यवाद चिनूक्स. रागवू नकोस. प्रांजळ प्रतिक्रिया द्यायला आवडतात म्हणून लिहिले.

लेख आवडला. फार पूर्वी आईच्या कॉलेजच्या कलामंडळासाठी त्यांची मुलाखत आणि त्यांची गाणी असा एक कार्यक्रम आईने केला होता. त्यावेळेला तालमींना, चर्चांना ते बरेचदा घरी यायचे त्यामुळे तेव्हा त्यांची ओळख झाली होती. भरपूर गप्पाही झाल्या होत्या.
त्याच दरम्यान माझं नाटकवेड विकोपाला जायला लागलेलं असल्याने त्यांच्या मित्रमंडळींशी संपर्क येऊ लागला होता.
नंतर वामन केंद्र्यांनी 'जळ्ळी तुझी प्रीत' केलं (निर्मिती - थिएटर अ‍ॅकेडमी). त्याचे संगीत त्यांचे होते. नाटकात आम्ही सगळे गायचो आणि अभिनयही करायचो. आम्हा सगळ्या नवख्या मंडळींकडून त्यांनी मस्त गाऊन घेतलं. ग्रामीण बाजाने गायचे बारकावे आमच्या गळ्यांमधून काढून घेतले. फिमेल सिंगर्समधे आमच्या दोघींच्याच(मी आणि अपर्णा धर्माधिकारी) तोंडापुढे माइक ठेवायचा हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा गळाठलो होतो. पण त्यांनी काय केलं काय की. आम्ही बर्‍या गायलो तेव्हा. क्षणार्धात गाण्याचा मोड बदलून वाचिक अभिनयाच्या मोडवर जायचे असायचे अनेकदा. ते त्यांनी आणि केंद्र्यांनी फार मस्त प्रकारे करून घेतले आमच्याकडून.

आणि मग तालमी सोडून उरलेल्या वेळात विविध देशोदेशीच्या गोष्टी, गंमती सांगायचे म्युझिक संदर्भातल्या. मजा यायची.

अश्या खूप आठवणी आहेत. मी पुणं सोडलं आणि नंतर संपर्क कमी होत गेला. एकाच क्षेत्रातले असल्याने कधी कुठे भेट होत असे तेवढेच.

मग फेसबुकवर सापडले. तिथे परत गप्पा सुरू झाल्या. आता पुण्यात आलीस की घरी ये म्हणाले आणि नंतर गेलेच ते.

मस्त आहे लेख !
माझा आवडता संगीतकार
हा गुणी प्रयोगशील संगीतकार सध्याच्या मराठी चित्रपटांना आलेल्या भरभराटीच्या काळात हवा होता असे राहून राहून वाटते.

फार फार आवडला लेख चिनुक्स दादा , मोडक काका अकोल्याचे होते इतके ऐकुन होतो, त्यांचे चौकट राजा मधील एक झोका ऐकूनच हा माणुस काय वल्ली अन नितांत मनस्वी असेल ह्याची पहिली ओळख मला झाली.

पुढे नमूद केलेल्या एट फेलीयर्स क्लब मधील श्री बंडू क्षीरसागर उपाख्य विनायक क्षीरसागर उपाख्य बंडू पैलवान हे मला प्राचार्य म्हणून लाभले होते , ते न्यू इंग्लिश हाइस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, अकोलाचे प्राचार्य होते तेव्हा , gathering मधे गाणी बसवताना पोरांना "आपला मित्र" 'आनंदा' विषयी भरभरुन बोलताना मी त्यांना साक्षात् अनुभवले आहे. त्यांनी सांगितलेली एक आठवण इथे तुमच्या ताजमहालाला वीट म्हणून लावायचा मोह मला टाळता येत नाहीये त्याबद्दल क्षमस्व. ती आठवण म्हणजे श्री क्षीरसागर सर एकदा काही वैयक्तिक कामानिमित्त पुण्यास गेले असता त्यांना मोडक सरांना भेटायचे होते तर त्यांस संपर्क करता मोडक सरांनी त्यांना "तू शिवरंजनी (स्टूडियो)ला ये एक छोटे काम आहे ते आटपुन तिथे मग आपण गप्पा मारू" असे सुचवले, ठरल्याप्रमाणे क्षीरसागर सर तिथे पोचता त्यांना 'आनंदा' एका खोलीत ३ पोती टाळ उकलुन जी रास तयार झाली होती त्यात बसलेले दिसले. काय चाललंय कलाकार असे विचारताच एक अतिशय सरळ उत्तर आले ते म्हणजे "अरे बंडू एक नवी चाल बसवतो आहे रे तिला साजेसा टाळेचा आवाज काही सापडत नाहीये बघ" तो एक आवाज मिळावा म्हणून हा परफेक्शनिस्ट अवलिया माणुस तीन पोती टाळी समोर घेऊन बसला होता, जवळपास दोन तास , एक टाळ हाती घ्यायची ती कानाजवळ आणून वाजवायची अन नकारात्मक उहुं करुन बाजूला टाकायची हा कार्यक्रम चालला होता शेवटी एकदाचा जेव्हा नेमका स्वर इफ़ेक्ट देणारी टाळ सापडली तसे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला , ती टाळ एखादे नवजात बाळ धरावे तशी उचलून त्यांनी त्यांच्या सिग्नेचर शबनम मधे ठेवली अन म्हणाले "आज मजा आली बघ पैलवान उद्या कशी मस्त चाल बांधतो ते, चल आता इडली खाऊ" म्हणून क्षीरसागर सरांना बाहेर नेले. अश्या एका व्यक्तिमत्वा बद्दल माझ्या आवडत्या शिक्षकांच्या मुखातुन ऐकणे हा माझ्यासाठी परमानेंट संस्कार करणारा क्षण होता बघा.

तुफान लेख लिहिला आहात आपण

आठवणीत चिंब

बाप्या

साधेपणा कसा असतो याचा मूर्तीमन्त वास्तुपाठ म्हणजे श्री आनन्द मोडक.
महाविद्यालयात असताना मला स्पर्धेसाठी " ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता" हे गाणे गायचे होते. या गाण्याची ध्वनिमुद्रिका येण्यापूर्वीची ही गोश्ट आहे ही (सन१९८२ असावे). तेव्हा कोणितरी सान्गितल्यावरून कोणतीही ओळख नसताना मी त्यन्च्या कडे हे गाणे शिकायला म्हणून गेलो. ( ते पर्वतीत आमच्या घराजवळ रहात असल्याचे माहित होते). रविवार सकाळ होती. आम्ही आमची ओळख (मी आणी माझा महाविद्यालयातला मित्र रामदास पळसुले ज्याना आता पन्डित रामदास पळसुले म्हणून आपण ओळखतो) स्व तःच करून दिली. इतक्याशा ओळखीवर त्यानी आमचे लगेच स्वागत केले. "बसा" म्हणून आतल्या खोलीत गेले आणी २ मिनितात हार्मोनियम घेउनच बाहेर आले.
आम्ही थक्कच झालो.
१५ मिनि टात सर्व बारकाव्यासकट ते गाणे त्यानी मझ्यासमोर उलग डून ठेवले. विविध पैलू दाखवले.
दुसर्या उच्च कलाकाराचे अप्रतीम composition इतक्या प्रेमाने आणी आदराने त्यानी आत्मसात केले होते . तितक्याच आनन्दाने ते मला त्यातले सॉन्दर्य दाखवत होते. एका कलाकाराने दुसर्या कलाकाराचे काम कसे apreciate करावे याचे जागते प्रात्यक्शिक मी पाहिले.
अजूनही ते गाणे गाताना मला त्यान्ची आठवण होते. त्यान्चा स्वर आणी मुद्रा डोळ्यासमोर येते.

छान लेख. त्या आधीचे तुमचे मनोगतदेखील ह्रुद्य आहे. नीधप, बापू आणि पशुपत ह्यांचे प्रतिसादही वाचनीय आहेत. माझे लहान पण संगीताच्या अभ्यासकांच्यातच गेले असल्याने एक प्रकारची आत्मीयता जाणवली. कायम घरी कसले ना कसले डिस्कशन, सुरावटी , वादन किस्से सांगणे असे चालू असे. लोक भेटायला येत. गांधर्व महा विद्यालयाच्या परीक्षा घेतल्या जात. त्या दिवसांची आठवण आली.

@चिनूक्स..

नेहमीप्रमाणेच अतिशय छान लेख.

अकोल्याच्या अनेक आठवणी जागवल्यात.

काही लोक मुळातच जिनिअस असतात,मोडक त्यातलेच एक.आमच्या श्री.संतोष आपटे सरांनी मी पुण्यात राहायला आल्यावर ,माझी नाटक-संगीतातली असलेली थोडीफार रुची माहीत असल्याने, त्यांना जरुर भेटण्यास सुचवलं होतं. परंतु इतकी वर्षे तिथे असूनही ते राहूनच गेलं.असो.

काही वर्षांपूर्वी त्यांनी लोकसत्तातूनही आठवणीपर सदर चालवल्याचं आठवतं. त्याचं संकलन प्रसिद्ध झालं का याची कल्पना नाही.

@सोन्याबापू

तुम्ही न्यू इंग्लिषवाले का?