अमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'

Submitted by पराग१२२६३ on 15 May, 2016 - 06:03

‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.

l2016050483234.jpg

अलास्का येथील यंदाच्या युद्धसरावांमध्ये भारतीय हवाईदलाने १२ विमाने धाडली होती. त्या सरावांसाठी पोहचण्यासाठी हवाईदलाने लांबचा मार्ग निवडला होता. यामुळे भारतीय हवाईदलाला ‘खंडपार तैनाती’तही आपली कार्यक्षमता किती उच्च पातळीची आहे, हे जगाला दाखवून देता आले. अमेरिकेत ‘रेड फ्लॅग’ हवाई युद्धसरावांचे आयोजन आपल्या तसेच मित्रराष्ट्रांच्या हवाईदलांना उच्च कोटीचे प्रशिक्षण पुरवून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या हेतूने केले जाते. व्हिएतनाम युद्धातील नामुष्कीनंतर अमेरिकेने १९७५ पासून हे युद्धसराव सुरू केले. यामध्ये खऱ्या-खुऱ्या लढाईसारखी परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्यासाठी अमेरिकेन हवाईदलाच्या दोन वेगवेगळ्या तळांवरून दोन गटांमध्ये सहभागी राष्ट्रांची विमाने उड्डाण करत असतात. अलास्कामधील सरावांचे आयोजन आईल्सन आणि एल्मन्डॉर्फ येथील हवाईतळांवर केले जाते.

भारतीय हवाईदल २००८ पासून ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये सहभागी होऊ लागले आहे. अलास्कातील युद्धसरावांमध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाईदल सहभागी झाले होते. या युद्धसरावांना जाण्यासाठी ३ एप्रिल रोजी जामनगरच्या हवाईतळावरून ४ सुखोई-३० एमकेआय, ४ जग्वार डॅरिन-२, २ आयएल-७८ एमकेआय आणि २ सी-१६ ग्लोबमास्टर-३ या विमानांनी अलास्काच्या दिशेने उड्डाण केले. वाटेत बहरिन, इजिप्त, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा या देशांना भेट दिली. त्यात कॅनडातील तीन हवाईतळांची भेटही सामील आहे. चार खंडांमधून सुमारे २० हजार किलोमीटरचे अंतर १८ दिवसांमध्ये पार करत भारतीय हवाईदलाची विमाने २० एप्रिलला अलास्कातील नियोजित आईलसन हवाईतळावर पोहोचली. युद्धसरावांसाठी जाताना आणि येताना मध्ये थांबा घेतलेल्या देशांबरोबरच्या भारताच्या संबंधांना चालना देण्याचा आणि दोन्ही देशांच्या हवाईदलांमध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

अलास्का येथे होणारे ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव १९७६ ते १९९१ या काळात फिलीपिन्समध्ये आयोजित केले जात होते. त्या आयोजनाच्या ठिकाणाला सामरिकदृष्ट्याही महत्त्व होते. मात्र १९९२ मध्ये तेथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात या सरावांसाठीच्या हवाईतळाचे इतके नुकसान झाले की, तो तळच बंद करावा लागला. परिणामी हे सराव अलास्कामध्ये स्थानांतरित करण्यात आले. २००६ पर्यंत हे सराव ‘कोप थंडर’ नावाने ओळखले जात. ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये मिळणारे प्रशिक्षण जवळजवळ युद्धजन्य परिस्थितीत मिळत असल्यामुळे ते अतिशय उच्च दर्जाचे ठरते. या सरावांसाठी सुमारे पावणेदोन लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचे हवाईक्षेत्र निश्चित केले जात असल्यामुळे विमानांना पूर्ण क्षमतेने सरावांमध्ये उतरता येते.

विविध देशांचा सहभाग असलेल्या ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये भारतीय हवाईदलाने २००८ पहिल्यांदा सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये अमेरिकेतील आकाश गाजविले होते. अलास्काहून परत भारतात येताना या पथकातील सुखोई विमानांचा ताफा संयुक्त अरब अमिरातीला थांबून द्वीपक्षीय युद्धसराव करणार आहेत.

या युद्धसरावांमध्ये अमेरिकेबरोबरच अन्य सहभागी मित्रदेशांची हवाईदले निळ्या (आक्रमक) गटात, तर त्यांना प्रतिकार करण्यासाठी अमेरिकन हवाईदल आणि नौदलाबरोबरच अन्य अमेरिकन दलांची युनिट लाल (संरक्षक) गटात समाविष्ट होत असतात. भारतीय हवाईदलाने या दोन्ही गटांमध्ये भाग घेतला होता.

भारतीय हवाईदल आता ‘सामरिक हवाईदल’ झाल्याची माहिती हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी गेल्या वर्षी हवाईदल दिनी दिली होती. अर्थातच त्यांच्या त्या माहितीचा अर्थ आपल्या ‘मराठी बाण्याच्या धडाडी’च्या प्रसारमाध्यमांना समजली नाही. म्हणूनच त्यांनी ‘लोकांना काय पडले आहे त्याचे किंवा लोकांनाच इंटरेस्ट नाही’ या आपल्याच समजुतीचा आधार घेत हवाईदल प्रमुखांच्या त्या माहितीकडे दुर्लक्ष केले. पण आपण आता ‘सामरिक हवाईदल’ झाल्याची प्रचिती देत भारतीय हवाईदलाने अमेरिकेतील ‘रेड फ्लॅग’ सरावांमध्ये पुन्हा एकदा ‘खंडपार तैनाती’मध्येही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.

या युद्धसरावांच्या काळात संसदेतही भारताने इतक्या दूरवर सरावांसाठी आपली विमाने पाठविण्याबाबत प्रश्न विचारले गेले होते. त्याला संरक्षण मंत्र्यांनी उत्तर देऊन अशा युद्धसरावांचे महत्त्व विषद केले होते. अशा युद्धसरावांमुळे जगातील विविध हवाईदलांशी आपल्या हवाईदलाची तुलना करून त्यात आवश्यक सुधारणा करणे शक्य होत असते. तसेच जगाच्या कोणत्याही प्रदेशात कार्यरत राहण्याची क्षमताही यामुळे हवाईदलाला लाभत असते.

नियोजित ठिकाणी पोहचल्यावर भारतीय वैमानिकांनी आपल्या विमानांसोबत सरावांसाठीच्या प्रदेशाची, नाटोच्या वैशिष्ट्यपूर्ण संकेतांची, रेडिओ संदेशवहन संकल्पनांची माहिती करून घेतली. या सुरुवातीच्या टप्प्यातच निळ्या गटात समाविष्ट असलेल्या अमेरिकन एफ-१६ विमानांच्या तुकडीने भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. यानिमित्ताने अमेरिकेच्या हवाईदलाने कोणत्याही सरावांमध्ये प्रथमच पाचव्या पिढीचे एफ-२२ विमान उतरविले होते. त्याबरोबर एफ-१५, एफ-१६, एफ-१८ या अमेरिकन लढाऊ विमानांसह सुखोई विमानांचा प्रामुख्याने आक्रमक (निळ्या) गटात सहभाग होता. त्यामुळे या जगातील आघाडीच्या आणि अत्याधुनिक विमानांबरोबर सराव करून महत्त्वाचा अनुभव भारतीय वैमानिकांना घेता आला. त्याचवेळी जगातील सर्वोत्कृष्ट बॉम्बिंग ग्राऊंड म्हणून ओळख असलेल्या जेपीएआरसी या मैदानात भारतीय जग्वार डॅरीन-२ विमानांनी अमेरिकन विमानांच्या साथीने बॉम्बवर्षावाचा सराव केला.

या सरावांद्वारे भारतीय हवाईदलाला शून्याच्या जवळ असलेल्या तापमानात आपली विमाने कशी कार्यरत ठेवायची आणि मुख्य भूमीपासून इतक्या दूरवरच्या प्रदेशातही कर्मचारी आणि विमाने कशी कार्यक्षम ठेवायची याचाही महत्त्वाचा अनुभव रेड फ्लॅग अलास्का १६-१ या युद्धसरावांमुळे भारतीय हवाईदलाला प्राप्त झाला आहे. अशा किचकट युद्धसरावांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यामध्येही सुखोई आणि जग्वार विमानांच्या ताफ्यातील हवाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण युद्धसरावांमध्ये तीन मोहिमांचे नेतृत्व पूर्णपणे भारतीय हवाईदलाने केले होते. यावेळी शत्रुच्या हल्ल्यात आपले लढाऊ विमान कोसळलेच, तर त्यातून वैमानिकाची तातडीने सुटका करून विमानांचे अवशेष तेथून परत आणण्याचाही सराव करण्यात आला.

अतिशय विस्तृत प्रदेशात पार पडणारे हे सराव खऱ्या युद्धाप्रमाणे असतात. त्यामुळे त्यातील तांत्रिक किचकटपणा बराच वाढत असतो. हे युद्धसराव प्रामुख्याने सोव्हिएट संघाच्या आव्हानाचा प्रतिकार करण्याच्या हेतूने अमेरिकेने मित्रदेशांबरोबर सुरू केले होते. मात्र शीतयुद्धानंतरच्या काळात यामध्ये नाटोबाहेरचे देशही सहभागी होऊ लागले आहेत.

शून्याच्या जवळपास असलेल्या तापमानातही आपली सर्व विमाने युद्धसरावांसाठी सज्ज ठेवण्यासाठी अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्याचे फळ असे मिळाले की, संपूर्ण तीन आठवड्यांमध्ये सर्वच्या सर्व विमाने उपलब्ध राहिली. म्हणजेच त्यांची उपलब्धता १०० टक्के होती.

हे युद्धसराव संपल्यावर या सरावांच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या अमेरिकेच्या ३५४व्या फायटर विंगचे व्हाईस कमांडर कर्नल विल्यम कल्व्हर यांनी काढलेले उद्गार भारतीय हवाईदलाच्या क्षमतेला दाद देणारेच होते. ते म्हणाले, यंदाचे सराव मी आजपर्यंत पाहिलेल्या सरावांमध्ये सर्वोत्कृष्ट होते. भारतीय हवाईदलाने या सरावांमध्ये प्रदर्शित केलेल्या अत्युच्च दर्जाचे मला कौतुक केलेच पाहिजे. इतक्या दूरवर आणि विरुद्ध वातावरणात भारतीय हवाईदलाने आणलेल्या विमानांची उपलब्धता १०० टक्के राहिल्याचे पाहून त्यांनी देखभाल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

१३ मेला युद्धसराव संपल्यावर भारतीय विमानांनी १४ मेपासून परतीची वाट धरली आहे. या सरावांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठा खर्च येत असल्यामुळे दर वर्षी चार वेळा पार पडणाऱ्या या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने पाच वर्षांतून एकदा सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदाच्या सरावांमध्ये सहभागी होण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आला आहे. पण या १०० कोटींच्या खर्चातून मिळणारा अनुभव कित्येक पटींनी जास्त मोलाचा आहे.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याबापू जी प्रशंसेबद्दल धन्यवाद. पण तुमच्या प्रतिक्रियेतील <<"He complimented and said me that today I flew my bird as excellet as an Indian Air Force pilot officer" हे वाक्य आणि त्याचा संदर्भ वाचून सर्वाधिक आनंद आणि अभिमान वाटला.

माहितीपूर्ण आणि तेवढाच रंजक लेख.

<यंदाच्या सरावांमध्ये सहभागी होण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आला आहे. पण या १०० कोटींच्या खर्चातून मिळणारा अनुभव कित्येक पटींनी जास्त मोलाचा आहे.>

काही गोष्टींचे मोल पैशात करता येणार नाही त्यापैकी एक.....

धन्यवाद हा लेख शेअर केल्याबद्द्ल !

रंगासेठजी, तुम्ही एफ-१६ विमानांबद्दल मांडलेली माहिती अगदी अचूक आहे. लोक सभेत 'रेड फ्लॅग'सारख्या सरावांबाबत विचारलेल्या प्रश्नाला संरक्षण मंत्र्यांनी दिलेले ते उत्तर होते.

अलास्कातील रेड फ्लॅग हवाई युद्धसराव आटपून परत येताना भारतीय हवाई दलाच्या पथकाने वाटेत यूएईतील अल धाफ्रा तळावर थोडा विसावा घेत आता यूएईच्या हवाई दलाबरोबर युद्धसराव सुरूकेले आहेत. सामरिकदृष्ट्या महत्वपूर्ण या प्रदेशातील या सरावाना भारताच्या सामरिक हितांच्या दृष्टीनेही महत्व आहे.

"He complimented and said me that today I flew my bird as excellet as an Indian Air Force pilot officer">>> भारी वाटले वाचून.

आजच बंगलोरमधल्या एचएएल म्युझियमला भेट देउन आले आहे. त्यात आपल्या या क्षेत्रातल्या प्रगतीचे आलेख बघून अभिमान वाटलाच होता, आणि आता हे वाचून फारच कौतुक वाटते आहे.
शेठ वालचंद हिराचंदजी यांचे ( यांनी १९४० साली दूरदृष्टीने एचएएलची स्थापना केली होती.) आपण आभार मानलेच पाहिजेत.

सुरेख, माहितीपूर्ण लेख. भारताबद्दल खूप अभिमान वाटला! लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

एक नेहमी पडणारा प्रश्न. कदाचित सोन्याबापू उत्तर देऊ शकतील.
भारतीय तिन्ही सेना, बॉर्डर सिक्युरीटी फोर्स दिवसेंदिवस शक्तीशाली होत आहेत. आर्मी, वायुदल व नौदल यांचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थांबद्दल मायबोलीवरही इतक्यात बरेच वाचनात आले. या संस्थांचा काळ/इतिहास पार ब्रिटीश काळापर्यंत जातो. अभ्यासक्रमांमागेही मूळ ब्रिटीश शिस्त, कल्पना, प्रोटोकॉल्स इत्यादी आहेत (असे वाचले, माहितीची अ‍ॅक्यूरससी तपासलेली नाही).
तर माझा प्रश्न असा की पाकिस्तानचे सैन्य (तिन्ही दल)आपल्या तुलनेत कुठे आहे? (आत्तपर्यंच्या तीन युद्धांचे निकाल याचं उत्तर आहे खरंतर, पण तरीही ... ) त्यांचा सैनिकी अभ्यासक्रम ठरवताना आपल्याप्रमाणेच ब्रिटीश पाया वगैरे आहे का? पाकिस्तानही अशा सरावांमधे भाग घेते का?

अंजली जी, तुम्ही पाकिस्तानी सैन्याबाबत विचारले आहे, तर आपल्या तुलनेत (क्षमता, प्रशिक्षण इत्यादी बाबतीत) बरेच मागे आहे. आपले लष्कर व्यावसायिकता, राजकारणापासून अलिप्त आणि धर्मनिरपेक्षता या मजबूत पायांवर आधारलेले आहे. पाकिस्तानी लष्करात नेमका यांचाच अभाव आहे. भारतीय लष्कर (तिन्ही दले) आता सामरिक दले झालेली आहेत. पाकिस्तानकडे ती क्षमता नाही. पाकिस्तानी सैन्यही दुसऱ्या देशांबरोबर सराव करते.

एयरफोर्स बद्दल चर्चा सुरु आहे तेव्हा एक गंमत सांगितलीच पाहिजे, अमेरिका म्हणे पाकिस्तानला एफ १६ द्यायला तयार होती पाक मधे सरकार अन डिफेन्स ने एकदम excitment दाखवली नंतर लक्षात आले की आफ्टरबर्नर असलेली विमाने येऊन नुसती गंजत पडणार आहेत कारण पाक एयरफोर्सला त्याच्या इंधनाचा खर्चच न झेपणाऱ्यातला आहे Lol

संयुक्त अरब अमिरात हवाई दलाबरोबरच्या अल धाफ्रा येथील डेझर्ट ईगल-२ या युद्धसरावांमध्ये भारतीय हवाई दलाची सुखोई-३० एमकेआय ही लढाऊ विमाने सहभागी झालेली आहेत. अलास्कातील रेड फ्लॅग युद्धसराव आटपून परतत असताना त्यातले सुखोईचे पथक अल धाफ्राला थांबले आहे. संयुक्त अरब अमिरातीची मिराज २०००-९ आणि एफ-१६ विमाने युद्धसरावात उतरलेली आहेत. तिथलेही आकाश हे अत्याधुनिक भारतीय 'पक्षी'च गाजवतील अशी खात्री वाटते.

भारत आणि यूएई यांच्यात अल धाफ्रामध्ये १० दिवस चाललेल्या संयुक्त हवाई युद्धसरावांचा आज (३ जून) शेवटचा दिवस आहे.

"He complimented and said me that today I flew my bird as excellent as an Indian Air Force pilot officer">>> अभिमानाने छाती फुलली ....

सदैव देशाच्या रक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणार्‍या तिन्ही दलातील जवानांना सलाम .....
_______________/\_____________

अमेरिकेत युद्धसरावांसाठी दोन महिन्यांपूर्वी गेलेल्या भारतीय हवाईदलाच्या 'पक्ष्यांचा थवा' आता मायदेशी परतू लागला आहे.

Pages