अमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'

Submitted by पराग१२२६३ on 15 May, 2016 - 06:03

‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.

l2016050483234.jpg

अलास्का येथील यंदाच्या युद्धसरावांमध्ये भारतीय हवाईदलाने १२ विमाने धाडली होती. त्या सरावांसाठी पोहचण्यासाठी हवाईदलाने लांबचा मार्ग निवडला होता. यामुळे भारतीय हवाईदलाला ‘खंडपार तैनाती’तही आपली कार्यक्षमता किती उच्च पातळीची आहे, हे जगाला दाखवून देता आले. अमेरिकेत ‘रेड फ्लॅग’ हवाई युद्धसरावांचे आयोजन आपल्या तसेच मित्रराष्ट्रांच्या हवाईदलांना उच्च कोटीचे प्रशिक्षण पुरवून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या हेतूने केले जाते. व्हिएतनाम युद्धातील नामुष्कीनंतर अमेरिकेने १९७५ पासून हे युद्धसराव सुरू केले. यामध्ये खऱ्या-खुऱ्या लढाईसारखी परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्यासाठी अमेरिकेन हवाईदलाच्या दोन वेगवेगळ्या तळांवरून दोन गटांमध्ये सहभागी राष्ट्रांची विमाने उड्डाण करत असतात. अलास्कामधील सरावांचे आयोजन आईल्सन आणि एल्मन्डॉर्फ येथील हवाईतळांवर केले जाते.

भारतीय हवाईदल २००८ पासून ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये सहभागी होऊ लागले आहे. अलास्कातील युद्धसरावांमध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाईदल सहभागी झाले होते. या युद्धसरावांना जाण्यासाठी ३ एप्रिल रोजी जामनगरच्या हवाईतळावरून ४ सुखोई-३० एमकेआय, ४ जग्वार डॅरिन-२, २ आयएल-७८ एमकेआय आणि २ सी-१६ ग्लोबमास्टर-३ या विमानांनी अलास्काच्या दिशेने उड्डाण केले. वाटेत बहरिन, इजिप्त, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा या देशांना भेट दिली. त्यात कॅनडातील तीन हवाईतळांची भेटही सामील आहे. चार खंडांमधून सुमारे २० हजार किलोमीटरचे अंतर १८ दिवसांमध्ये पार करत भारतीय हवाईदलाची विमाने २० एप्रिलला अलास्कातील नियोजित आईलसन हवाईतळावर पोहोचली. युद्धसरावांसाठी जाताना आणि येताना मध्ये थांबा घेतलेल्या देशांबरोबरच्या भारताच्या संबंधांना चालना देण्याचा आणि दोन्ही देशांच्या हवाईदलांमध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

अलास्का येथे होणारे ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव १९७६ ते १९९१ या काळात फिलीपिन्समध्ये आयोजित केले जात होते. त्या आयोजनाच्या ठिकाणाला सामरिकदृष्ट्याही महत्त्व होते. मात्र १९९२ मध्ये तेथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात या सरावांसाठीच्या हवाईतळाचे इतके नुकसान झाले की, तो तळच बंद करावा लागला. परिणामी हे सराव अलास्कामध्ये स्थानांतरित करण्यात आले. २००६ पर्यंत हे सराव ‘कोप थंडर’ नावाने ओळखले जात. ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये मिळणारे प्रशिक्षण जवळजवळ युद्धजन्य परिस्थितीत मिळत असल्यामुळे ते अतिशय उच्च दर्जाचे ठरते. या सरावांसाठी सुमारे पावणेदोन लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचे हवाईक्षेत्र निश्चित केले जात असल्यामुळे विमानांना पूर्ण क्षमतेने सरावांमध्ये उतरता येते.

विविध देशांचा सहभाग असलेल्या ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये भारतीय हवाईदलाने २००८ पहिल्यांदा सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये अमेरिकेतील आकाश गाजविले होते. अलास्काहून परत भारतात येताना या पथकातील सुखोई विमानांचा ताफा संयुक्त अरब अमिरातीला थांबून द्वीपक्षीय युद्धसराव करणार आहेत.

या युद्धसरावांमध्ये अमेरिकेबरोबरच अन्य सहभागी मित्रदेशांची हवाईदले निळ्या (आक्रमक) गटात, तर त्यांना प्रतिकार करण्यासाठी अमेरिकन हवाईदल आणि नौदलाबरोबरच अन्य अमेरिकन दलांची युनिट लाल (संरक्षक) गटात समाविष्ट होत असतात. भारतीय हवाईदलाने या दोन्ही गटांमध्ये भाग घेतला होता.

भारतीय हवाईदल आता ‘सामरिक हवाईदल’ झाल्याची माहिती हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी गेल्या वर्षी हवाईदल दिनी दिली होती. अर्थातच त्यांच्या त्या माहितीचा अर्थ आपल्या ‘मराठी बाण्याच्या धडाडी’च्या प्रसारमाध्यमांना समजली नाही. म्हणूनच त्यांनी ‘लोकांना काय पडले आहे त्याचे किंवा लोकांनाच इंटरेस्ट नाही’ या आपल्याच समजुतीचा आधार घेत हवाईदल प्रमुखांच्या त्या माहितीकडे दुर्लक्ष केले. पण आपण आता ‘सामरिक हवाईदल’ झाल्याची प्रचिती देत भारतीय हवाईदलाने अमेरिकेतील ‘रेड फ्लॅग’ सरावांमध्ये पुन्हा एकदा ‘खंडपार तैनाती’मध्येही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.

या युद्धसरावांच्या काळात संसदेतही भारताने इतक्या दूरवर सरावांसाठी आपली विमाने पाठविण्याबाबत प्रश्न विचारले गेले होते. त्याला संरक्षण मंत्र्यांनी उत्तर देऊन अशा युद्धसरावांचे महत्त्व विषद केले होते. अशा युद्धसरावांमुळे जगातील विविध हवाईदलांशी आपल्या हवाईदलाची तुलना करून त्यात आवश्यक सुधारणा करणे शक्य होत असते. तसेच जगाच्या कोणत्याही प्रदेशात कार्यरत राहण्याची क्षमताही यामुळे हवाईदलाला लाभत असते.

नियोजित ठिकाणी पोहचल्यावर भारतीय वैमानिकांनी आपल्या विमानांसोबत सरावांसाठीच्या प्रदेशाची, नाटोच्या वैशिष्ट्यपूर्ण संकेतांची, रेडिओ संदेशवहन संकल्पनांची माहिती करून घेतली. या सुरुवातीच्या टप्प्यातच निळ्या गटात समाविष्ट असलेल्या अमेरिकन एफ-१६ विमानांच्या तुकडीने भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. यानिमित्ताने अमेरिकेच्या हवाईदलाने कोणत्याही सरावांमध्ये प्रथमच पाचव्या पिढीचे एफ-२२ विमान उतरविले होते. त्याबरोबर एफ-१५, एफ-१६, एफ-१८ या अमेरिकन लढाऊ विमानांसह सुखोई विमानांचा प्रामुख्याने आक्रमक (निळ्या) गटात सहभाग होता. त्यामुळे या जगातील आघाडीच्या आणि अत्याधुनिक विमानांबरोबर सराव करून महत्त्वाचा अनुभव भारतीय वैमानिकांना घेता आला. त्याचवेळी जगातील सर्वोत्कृष्ट बॉम्बिंग ग्राऊंड म्हणून ओळख असलेल्या जेपीएआरसी या मैदानात भारतीय जग्वार डॅरीन-२ विमानांनी अमेरिकन विमानांच्या साथीने बॉम्बवर्षावाचा सराव केला.

या सरावांद्वारे भारतीय हवाईदलाला शून्याच्या जवळ असलेल्या तापमानात आपली विमाने कशी कार्यरत ठेवायची आणि मुख्य भूमीपासून इतक्या दूरवरच्या प्रदेशातही कर्मचारी आणि विमाने कशी कार्यक्षम ठेवायची याचाही महत्त्वाचा अनुभव रेड फ्लॅग अलास्का १६-१ या युद्धसरावांमुळे भारतीय हवाईदलाला प्राप्त झाला आहे. अशा किचकट युद्धसरावांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यामध्येही सुखोई आणि जग्वार विमानांच्या ताफ्यातील हवाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण युद्धसरावांमध्ये तीन मोहिमांचे नेतृत्व पूर्णपणे भारतीय हवाईदलाने केले होते. यावेळी शत्रुच्या हल्ल्यात आपले लढाऊ विमान कोसळलेच, तर त्यातून वैमानिकाची तातडीने सुटका करून विमानांचे अवशेष तेथून परत आणण्याचाही सराव करण्यात आला.

अतिशय विस्तृत प्रदेशात पार पडणारे हे सराव खऱ्या युद्धाप्रमाणे असतात. त्यामुळे त्यातील तांत्रिक किचकटपणा बराच वाढत असतो. हे युद्धसराव प्रामुख्याने सोव्हिएट संघाच्या आव्हानाचा प्रतिकार करण्याच्या हेतूने अमेरिकेने मित्रदेशांबरोबर सुरू केले होते. मात्र शीतयुद्धानंतरच्या काळात यामध्ये नाटोबाहेरचे देशही सहभागी होऊ लागले आहेत.

शून्याच्या जवळपास असलेल्या तापमानातही आपली सर्व विमाने युद्धसरावांसाठी सज्ज ठेवण्यासाठी अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्याचे फळ असे मिळाले की, संपूर्ण तीन आठवड्यांमध्ये सर्वच्या सर्व विमाने उपलब्ध राहिली. म्हणजेच त्यांची उपलब्धता १०० टक्के होती.

हे युद्धसराव संपल्यावर या सरावांच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या अमेरिकेच्या ३५४व्या फायटर विंगचे व्हाईस कमांडर कर्नल विल्यम कल्व्हर यांनी काढलेले उद्गार भारतीय हवाईदलाच्या क्षमतेला दाद देणारेच होते. ते म्हणाले, यंदाचे सराव मी आजपर्यंत पाहिलेल्या सरावांमध्ये सर्वोत्कृष्ट होते. भारतीय हवाईदलाने या सरावांमध्ये प्रदर्शित केलेल्या अत्युच्च दर्जाचे मला कौतुक केलेच पाहिजे. इतक्या दूरवर आणि विरुद्ध वातावरणात भारतीय हवाईदलाने आणलेल्या विमानांची उपलब्धता १०० टक्के राहिल्याचे पाहून त्यांनी देखभाल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

१३ मेला युद्धसराव संपल्यावर भारतीय विमानांनी १४ मेपासून परतीची वाट धरली आहे. या सरावांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठा खर्च येत असल्यामुळे दर वर्षी चार वेळा पार पडणाऱ्या या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने पाच वर्षांतून एकदा सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदाच्या सरावांमध्ये सहभागी होण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आला आहे. पण या १०० कोटींच्या खर्चातून मिळणारा अनुभव कित्येक पटींनी जास्त मोलाचा आहे.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख! इथे दिल्याबद्दल धन्यवाद. पण 'सामरिक हवाईदल' म्हणजे नक्की काय? त्याची इंग्लिश टर्मसुद्धा सांगाल का? Happy

पराग - भारतीय रेल्वे, भारतीय सेना याविषयींचे तुमचे अभ्यासपूर्ण, अप्रतिम लेख वाचले आहेत व आता हे भारतीय विमानांसंबंधीं लेखही खूप अपिल होत आहेत.. Happy अनेकानेक धन्यवाद...

असेच अभ्यासपूर्ण व हटके लेख अजून येऊंदेत...

अनेकानेक शुभेच्छा...

अत्यंत महत्वपूर्ण माहिती सोप्या शब्दात दिल्याबद्दल धन्यवाद.
अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

याच महिन्यात संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी पण F-16 चालवायला मिळण्यापेक्षा F-16 विरुध्द्द लढण्याचा अनुभव महत्वाचा आहे हे नमूद केले. कदाचित याच अभियानाचा संदर्भ असेल.

>>पण या १०० कोटींच्या खर्चातून मिळणारा अनुभव कित्येक पटींनी जास्त मोलाचा आहे. _/\_
या आधी अनेक घोटाळ्यांमधे हजारो कोटी गेले नसते तर ते अशा विधायक कामी आले असते.

होय आपल्याकडे घोटाळ्यांसाठी अमाप पैसा आहे, पण संरक्षण आणि विकासकामांसाठी पैशाची चणचण असते. इतिहास नुसता परिक्षेत मार्क्स मिळवण्यापुरता अभ्यासायचा, त्याच्या अनुभवांमधून शिकायची आपली (समाजाची आणि परिणामी राजकीय नेतृत्वाचीही) तयारी दिसत नाही. म्हणून संरक्षणावरील खर्चाला कात्री लागते किंवा संरक्षण दले विशेष कामगिरी करतात, तेव्हा त्याची दखल मराठी प्रसारमाध्यमे घेत नाहीत.

भारतीय हवाई दलाच्या अभिमानास्पद कामगिरी ची ओळख करुन देणार्‍या या माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेक धन्यवाद !

नव्या नेतृत्वाकडून आशा होतीच, अलीकडच्या हालचाली आणि त्या संदर्भात राष्ट्रीय माध्यमांमध्ये येणार््या बातम्यांमुळे ती 'भोळी आशा' ठरण्याची शक्यता वाटत आहे.

वेगळा विषय, छान आढावा आणि विवेचन. लेख आवडला.

2004 मध्ये अलास्कात पहिल्यांदा आपल्या हवाईदलाने सराव अभ्यास केला होता. जाग्वार आणि त्यावेळी नवी असलेली (हवेत इतर विमानांना इंधन देऊ शकणारी) इल्यूशीन-78 विमाने सहभागी झाली होती असे आठवते. लेखात लिहिल्याप्रमाणे त्यावेळी सरावाचे नाव 'कोप थन्डर' होते.

इतक्या मोठ्या प्रमाणात कापलेले अंतर आणि लढाऊ विमानांची गुंतागुंतीची कार्यप्रणाली पाहता सर्वच मोहीम-सदस्यांनी किती आधीपासून आणि काटेकोर नियोजन केले असेल याचा विचार स्तिमित करणारा आहे. या विमानांना प्रत्येक उड्डाणानंतर नित्य प्रचंड देखभाल लागते याची कल्पना आहे त्यामुळे आखणी करताना सर्व अनुरक्षण सामग्रीची काळजीपूर्वक जुळणी करावी लागते अन्यथा परक्या देशात छोट्याश्या कलपुर्जांसाठी विमान अडकून राहण्याची नामुष्की उद्भवू शकते.

मोहिमेशी निगडीत सर्वच अभिनंदनास पात्र आहेत.

शशांक जी,
माझ्या मायबोलीवरच्या लेखनाला उत्स्फूर्त दाद देण्यासाठी धन्यवाद.

परत एकदा पराग भाऊ ह्यांची अप्रतिम शैली! रिपोर्ताज पैटर्न मधे सुद्धा इतके सुरस अन उत्कण्ठावर्धक अन प्रवाही लिहिता येते हे सांगणारे मानदंड ठरावी अशी शैली आहे परागदादा तुमची , लेख खुप जास्त आवडला.

रेड फ्लॅग एक्सरसाइज बद्दल खुद्द एका वायुसेनेच्या गृप कॅप्टन कडून खुप सुंदर अनुभव ऐकायला मिळाला होता, २००८ मधे हे अधिकारी भरतीय दस्त्यासमवेत रेड फ्लॅग ला गेले होते. तेव्हा बहुदा भारतीय वायुसेनेने "ऐस" कार्ड (प्रथम क्रमांक) सुद्धा पटकावला होता, त्याच दरम्यान जेव्हा एक्सरसाइज सुरु असतात तेव्हा रोज संध्याकाळी सगळे फ्लाइंग ऑफिसर्स मेस ला "इवनिंग ड्रिंक्स" ला भेटून आपापले अनुभव शेयर करतात व चर्चा करतात असे त्या ड्रिंक्स टाइमचं स्वरुप असतं. अश्याच एका संध्याकाळी सदर ऑफिसर हे बार काउंटरवर बसले असता पलीकड़े दोन तरुण ब्रिटिश एयरफोर्स (RAF) चे अधिकारी बोलत बसले होते त्यांचे बोलणे ह्यांच्या कानावर आले, त्यातला एक दुसऱ्याला म्हणाला की

"Today I recieved the best compliment till date from an Israel air force pilot"

"And what was that?"

"He complimented and said me that today I flew my bird as excellet as an Indian Air Force pilot officer"

आमच्या ओळखीच्या त्या अधिकार्यानुसार हे ऐकून आनंद तर झालाच होता त्याला पण सोबत जबाबदारीची एक प्रचंड जाणीव सुद्धा झाली होती.

उपलब्ध असेल त्या तंत्रज्ञानाला पुर्ण एफिशिएंसी ने वापरून किमान नासवडा अन नुकसान सोसत कार्यभाग आटोपणे, ह्या बाबतीत भारतीय वायुसेना जगातली सर्वोत्तम मानली जाते ते बहुदा असल्या जिगरबाज फ्लाइंग अन ग्राउंड ड्यूटी ऑफिसर्स मुळेच असे मनापासुन वाटते

"He complimented and said me that today I flew my bird as excellet as an Indian Air Force pilot officer" _/\_ नतमस्तक Happy

"He complimented and said me that today I flew my bird as excellet as an Indian Air Force pilot officer" _/\_ नतमस्तक +१

Pages