लेकुरवाळा फणस

Submitted by मनीमोहोर on 6 May, 2016 - 10:52

"कुटुंब वत्सल उभा फणस हा कटि खांद्यावर घेऊन बाळे" अशा कवितांमधुन किंवा "भटो भटो कुठे गेला होतात" या सारख्या बडबड गीतां मधुनच भेटणारा फणस कोकणात मात्र आपल्याला पावला पावलाला भेटतो. आंबा हा कोकणचा राजा आहे आणि फणस आहे त्या राजाचा सरदार.

From mayboli

From mayboli

फणसाच झाड वाढत खुप उंच पण त्या मानाने त्याचा विस्तार कमी असतो. पानं असतात डार्क हिरवी आणि गळतात ही एकेक करुन, त्यामुळे झाड नेहमी हिरव दिसत. कायम सावली देत. पानांचे मुलाना खेळ म्हणून बैल आणि गाड्या ही करतात. या झाडाला भरपुर आयुष्य असत. आमची काही झाड माझ्या आजे सासर्‍यानी लावलेली आहेत आणि आजोबानी लावलेल्या झाडांची फळं नातवंडच नाही तर पंतवंड ही चाखत आहेत.

फणसाला फुल असं येतच नाही . साधारण डिसेंबर महिन्यात खोडाला डायरेक्ट छोटे छोटे फणसच लटकलेले दिसतात. साधारण फेव्रुवारी मार्च मध्ये फणस तयार व्हायला सुरवात होते. फणसाचे काटे रुंदावणे ही फणस तयार झाल्याची खुण आहे. फणस झाडावरुन खाली उतरविणे मोठ्या जोखमीचे काम आहे. प्रथम फणस सुंभानी बांधला जातो , नंतर एका हातात सुंभ धरुन दुसर्या हाताने डेख तोडतात आणि मग हळुहळु सुंभ आणि फणस खाली सोडतात. काही अति उंचीवरचे आणि फांदीच्या टोकावरचे फणस तर आम्ही उतरवत ही नाही. फणसांवरुन हात फिरवायला मला फार आवडत. काटे थोडे टोचतात हाताला पण थेट अॅक्युप्रेशरचा फील येतो. खाली उतरवलेल्या फणसाचा पिकुन चार पाच दिवसात घमघमाट सुटतो. तसेच त्यावर हलक्या हाताने थाप मारली तर एक वेगळाच आवाज येतो. आमच्या कडे सीझनचा पहिला फणस अगदी समारंभाने कापला जातो. न्याहारी झाली की सगळे जण गोल बसतात गरे खायला. एवढे मोठे बेंगरुळ आकाराचे जरा ही रंग रुप नसलेले फळ पण कापला की आतले सोनेरी रंगाचे, बोटभर लांबीचे, चारखंडाच्या कोंदणात बसविलेले गरे पाहुनच डोळे आणि मन तृप्त होते . त्या गोड, खुसखुशीत आत अगदी लहानशी आठळी असलेल्या गर्‍यांवर ताव मारतात सगळे. ज्या गड्याने फणस उतरविण्याचे अतिशय जोखमीचे काम केलेले असते त्याला ही आवर्जुन दिले जातात गरे

हापुसच्या सगळ्या झाडांच्या फळांची चव एक सारखीच असते पण फणसाची चव मात्र झाडागणीक बदलते. आमच्याकडे प्रत्येक फणसाला त्याच्या गर्‍याच्या रंग, रुप, चवीनुसार नाव दिली गेली आहेत. जसे थोरफळ्या - मोठे गरे असलेला, लोण्या - अगदी मऊ गरी असलेला , अमृत्या- अतिशय गोड गरे असलेला , लसण्या- लसणाच्या आकाराचे बारीक बारीक गरे असलेला , इरसाल.. इ इ..... इरसाल काप्याचे गरे तर गोड, खुसखुशीत सोनेरी रंगाचे असतातच पण याची चारखंड ही गोड असतात. हा फणस सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे थोड विषयांतर आहे पण सांगतेच. माझ्या एका सासर्‍यांना मराठी साहित्याची खुप आवड होती . त्यावेळचे प्रसिदध साहित्यिक मान. न. चिं केळकर हे त्यांच दैवत होत . त्यांच गाव ही आमच्या पंचक्रोशीतलच . आमच्या इरसाल काप्याचे गरे त्यांना फार आवडत असत . दरवर्षी न चुकता माझे सासरे जिवाचा आटापिटा करुन हा फणस न. चि केळकरांपर्यंत पर्यंत पोचवत असतच.

कापा आणि बरका अशा दोन जाती असतात कोकणात फणसाच्या. वरुन दिसायला जरी हे दोन्ही फणस सारखे दिसत असले तरी बाकी सगळ्यात त्यांच्यात खूप फरक आहे. काप्याचे खुसखुशीत असतात , तर बरक्याघे हातातुन निसाटणारे थोडेसे गुळगुळीत पण गोड आणि अतिशय रसाळ. बरका फणस खाण्याच एक तंत्र आहे जे आमच्या मुलांना लहानपणीच शिकवले जाते. बरका फणस हाताने ही कापता येतो, कापा कापायला मात्र विळी किंवा कोयती लागतेच. काप्या फणसातल्या आठळ्या अगदी छोट्या असतात तर बरक्यातल्या असतात खुप मोठ्या

कोवळ्या आणि लहान फणसाला म्हणजे ज्यात अजिबात गरे नसतात अशाला " कुयरी " असं म्हणतात कोकणात. अशा फणसाची वालाचे दाणे आणि भरपुर खोबर घालुन केलेली भाजी आमच्याकडे सर्वांना आवडतेच पण गर्‍या गोट्याची म्हणजे कोवळे गरे आणि शेंगदाण्यासारख्या कोवळ्या आठळ्या असलेल्या फणसाची भाजी म्हणजे मेजवानीच वाटते. पिकल्या फणसाचे गरे घालुन केलेली गोडसर कढी ही करतो आम्ही उन्हाळ्यात . फणसाच सांदण हा खास कोकणी पदार्थ. फणसाच्या रसात थोडा गुळ आणि तांवुळाच्या कण्या घालुन सरसरीत भिजवायच आणी नंतर ते वाटीत घालुन मोदकपात्रात वाफवायच . खाताना बरोबर दुध किंवा तुप आणि आंब्याच लोणच . मुंबईच्या चाकरमान्यांसाठी आणि खास पाहुण्यांसाठी केली जातातच ही सांदण कोकणची खासीयत म्हणुन. फणसाच्या पानांचे चोया टोचुन सामोसे करायचे ज्याला आम्ही "खोले" म्हणतो, त्यात ही सांदण केली जातात कधी कधी. ह्याना फणसाच्या पानांचा सुरेख स्वाद लागतो. फणसाचा रस आणि साखर याचे उन्हात पाच सहा दिवस थरावर थर घालायचे आणि मग कडकडीत वाळवायचे की झाली फणस पोळी. उन्हाळ्यात आमच अंगण यांनीच भरलेल असत. कच्च्या फणसाचे खोबरेल तेलात तळलेले काप म्हणजेच तळलेले गरे अतिशय टेस्टी लागतात, कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. रेसिपी एका ओळीत लिहुन झाली तरी याचा फार उटारेटा आहे. आधी कच्चा फणस फोडायचा त्याच्या मोठ्या फोडी करायच्या , खालची पाठ काढायची मग गरे काढायचे त्यातली आठ ळी काढुन ते उभे लांबट चिरायचे आणि अणि मग खोबरेल तेलात तळायचे .... दुपारच्या वेळी कामवाल्याना हाताशी घेऊनच हे करावे लागतात. तळताना खोबरेल तेलाचा आणि गर्‍यांचा वास घमगमतो. त्या वासाने खळ्यात खेळणारी मुलं मागीलदारी गोळा होतात. आमची नजर चुकवुन सारखा डल्ला मारत असतात गर्‍यांवर.
गरे तळताना

From mayboli

तळलेले गरे

From mayboli

फणसाच्या आठळीला कोंब फुटणे हे पाऊस जवळ आल्याचे लक्ष्ण मानले जाते आठळ्या ही खायला मस्त लागतात. . आम्ही त्यातल्या त्यात मोठया आठळ्या धुवुन वाळवुन त्यांना थोडी माती फासुन जमीनीत एक उथळ खड्डा करुन त्यात ठेवुन देतो. अशा आठळ्या चार सहा महीने मस्त टिकतात. कधी अळुच्या भाजीत कधी आमटीत तर कधी उकडुन मीठ लावुन ही खाता येतात. पण आठळ्या खाण्याची खरी मजा पावसाची झड बसुन हवेत गारवा आला की त्या पाणचुलीच्या विस्तवात भाजुन खाण्यात आहे.

कधी झाड जीर्ण झालयं म्हणून किंवा कधी वार्‍या वादळामुळे एखादा फणस पडल्याचा गावाहुन फोन येतो . खूप वाईट वाटत . त्यानंतर जेव्हा गावाला जाण होत तेव्हा ती उजाड ओसाड जागा प्रत्यक्ष बघताना तर मनात कालवत अक्षरशः . एवढी जुनी झाडं बघता बघता नजरेआड होताना बघणं अतिशय क्लेशदायक असत. पण इलाज नसतो. जागा भरुन काढण्यासाठी तिथे एखाद नवीन झाड ही लावलेले असत तरी ही ती जागा उजाडच भासते... गप्पा मारता मारता जाऊबाई त्या फणसापासून तयार केलेला एखादा नवीन पोळ्पाट अथवा एखाद स्टुल किंवा फडताळ दाखवतात त्या पोळपाटावरुन जरा जास्तच मायेने हात फिरवला जातो मग थोडासा तरी दिलासा मिळतो.... फणसाचं ला़कूड चांगल मजबूत समजल जातं आणि आमच्या घराचा मुख्य वासा असाच आमच्याच एका फणसाचा आहे..... अशा तर्‍हेने फणस आमच्या घराचा कायमस्वरुपी आधार बनला आहे.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Anju..tya sidle pratek gharasamor nirphansache ektari zaad astech....mumbait pan baryach junya society madhe he zaad baghitlay..

किती वाईट वाटल असेल एक ही गरा नाही हे बघितल्यावर.

एकदा अमच्याकडे काही तरी छोटासा समारंभ होता. गावाहून भाजीचा फणस आला होता ,सगळ्याना आवडते म्हणून तीच भाजी करायचं ठरवलं होतं. पण कापला आणि असाच निघाला ज्याचं काही ही करू शकत नव्हतो. शेवटी कोबी ची भाजी केली. फणसाच्या भाजीची स्वप्न बघणाऱ्या मंडळीना कोबीची बोअरिंग भाजी खावी लागली.

आता तो दुसरा तरी छान निघू दे ...

2 ra to khup phugir..ahe..bhargachh gare astil ase vattey..dev Karo n ha phanas lahan phansachi kamtarta bharun kadhnara nigho..

आईकडे असलेल्या फणसाच्या झाडाला बरीच वर्षे असेच फणस लागायचे.खूप आशेने एकदा फणस कापला तर त्यात एक गरा मिळाला.त्यानंतर 2-३ वर्षांनी 14 गरे मिळाले.त्या झाडाचा नादच सोडला.फक्त कोवळा असताना आई भाजी करते.जरा जून झाला की त्यात अशी चार निघते.

गेल्या आठवड्यात झाडावरून फणस पडून फुटला,पण त्यात गरे होते.खूप उंचावर असल्यामुळे काढला नव्हता.

Vadlat hyavarshi..barich zhade padli..ashach kitijanachya aathvani astil..amchya colonyt pan phansache zaad padle..tyachi pane mi khotte banvayala use karayachi..

आज दुसरा फणस कापला. "कापा" निघाला पण गरे फारच पातळ आणि आठळी मोठी निघाली. थोडक्यात यावर्षी मनासारखे फणस नाही मिळाले. परत बाजारात मिळाले तर घेईन.

आज दुसरा फणस कापला. "कापा" निघाला पण गरे फारच पातळ आणि आठळी मोठी निघाली. थोडक्यात यावर्षी मनासारखे फणस नाही मिळाले. >>> अरे रे, दोन पैकी एक तरी चांगला निघायला हवा होता.

इथे नीर फणसावर खूप मस्त चर्चा झाली अलीकडे.

ओहह कुंतल, वाईट वाटलं. पण ठीक आहे अगदीच काही नाही त्यापेक्षा. आठळ्या मीठ घालून उकडून, आमटी कढीत, मिक्स रस्सा भाजीत घालून खातात आमच्याकडे. काहीजण भाजीपण करतात, मी नाही करत. मला फार आवडत नाहीत पण नवऱ्याला आवडतात म्हणून करते मी हे सर्व. आता उन्हाळा संपला नाहीतर वाळवून पीठ करतात.

डाळीच्या आमटीत,गवारीच्या भाजीत आठल्या (gotya) मस्त लागतात.नुसत्या मीठ घालून उकडल्या तरी मस्त लागतात.
मोबाईल वरून लिहिताना चुका
होत आहेत तिथे दुर्लक्ष करा.

फणसाची चर्चा बाह्यरंगावरून अंतरंगावर ( आठळ्या) पोचलीये Happy
तिकडे पार उत्तर पूर्वेकडेही भरपूर बरका फणस होतो कापा मात्र दिसला नाही. कच्च्याची भाजी करतात व फळ म्हणूनही खातात पण उत्तरेतले लोकं फक्त भाजी म्हणूनच खातात. आपल्याप्रमाणे आमटीत आठळ्या घालायची पध्दत आसाममध्ये पण पाह्यली.

़kuntal gare sweet tari hote ka ?Aata marketmadchhe pavsalytala bhajicha alu pane ali ahet .. athlya astil tar aluchya bhajit ghala.. mastpaiki aluche phadphade hoil..

manglore..karwar la lagna .munji asha samarambhat.. phansache lonche aste.. tayla adgai ase mhantat.

Pages