लेकुरवाळा फणस

Submitted by मनीमोहोर on 6 May, 2016 - 10:52

"कुटुंब वत्सल उभा फणस हा कटि खांद्यावर घेऊन बाळे" अशा कवितांमधुन किंवा "भटो भटो कुठे गेला होतात" या सारख्या बडबड गीतां मधुनच भेटणारा फणस कोकणात मात्र आपल्याला पावला पावलाला भेटतो. आंबा हा कोकणचा राजा आहे आणि फणस आहे त्या राजाचा सरदार.

From mayboli

From mayboli

फणसाच झाड वाढत खुप उंच पण त्या मानाने त्याचा विस्तार कमी असतो. पानं असतात डार्क हिरवी आणि गळतात ही एकेक करुन, त्यामुळे झाड नेहमी हिरव दिसत. कायम सावली देत. पानांचे मुलाना खेळ म्हणून बैल आणि गाड्या ही करतात. या झाडाला भरपुर आयुष्य असत. आमची काही झाड माझ्या आजे सासर्‍यानी लावलेली आहेत आणि आजोबानी लावलेल्या झाडांची फळं नातवंडच नाही तर पंतवंड ही चाखत आहेत.

फणसाला फुल असं येतच नाही . साधारण डिसेंबर महिन्यात खोडाला डायरेक्ट छोटे छोटे फणसच लटकलेले दिसतात. साधारण फेव्रुवारी मार्च मध्ये फणस तयार व्हायला सुरवात होते. फणसाचे काटे रुंदावणे ही फणस तयार झाल्याची खुण आहे. फणस झाडावरुन खाली उतरविणे मोठ्या जोखमीचे काम आहे. प्रथम फणस सुंभानी बांधला जातो , नंतर एका हातात सुंभ धरुन दुसर्या हाताने डेख तोडतात आणि मग हळुहळु सुंभ आणि फणस खाली सोडतात. काही अति उंचीवरचे आणि फांदीच्या टोकावरचे फणस तर आम्ही उतरवत ही नाही. फणसांवरुन हात फिरवायला मला फार आवडत. काटे थोडे टोचतात हाताला पण थेट अॅक्युप्रेशरचा फील येतो. खाली उतरवलेल्या फणसाचा पिकुन चार पाच दिवसात घमघमाट सुटतो. तसेच त्यावर हलक्या हाताने थाप मारली तर एक वेगळाच आवाज येतो. आमच्या कडे सीझनचा पहिला फणस अगदी समारंभाने कापला जातो. न्याहारी झाली की सगळे जण गोल बसतात गरे खायला. एवढे मोठे बेंगरुळ आकाराचे जरा ही रंग रुप नसलेले फळ पण कापला की आतले सोनेरी रंगाचे, बोटभर लांबीचे, चारखंडाच्या कोंदणात बसविलेले गरे पाहुनच डोळे आणि मन तृप्त होते . त्या गोड, खुसखुशीत आत अगदी लहानशी आठळी असलेल्या गर्‍यांवर ताव मारतात सगळे. ज्या गड्याने फणस उतरविण्याचे अतिशय जोखमीचे काम केलेले असते त्याला ही आवर्जुन दिले जातात गरे

हापुसच्या सगळ्या झाडांच्या फळांची चव एक सारखीच असते पण फणसाची चव मात्र झाडागणीक बदलते. आमच्याकडे प्रत्येक फणसाला त्याच्या गर्‍याच्या रंग, रुप, चवीनुसार नाव दिली गेली आहेत. जसे थोरफळ्या - मोठे गरे असलेला, लोण्या - अगदी मऊ गरी असलेला , अमृत्या- अतिशय गोड गरे असलेला , लसण्या- लसणाच्या आकाराचे बारीक बारीक गरे असलेला , इरसाल.. इ इ..... इरसाल काप्याचे गरे तर गोड, खुसखुशीत सोनेरी रंगाचे असतातच पण याची चारखंड ही गोड असतात. हा फणस सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे थोड विषयांतर आहे पण सांगतेच. माझ्या एका सासर्‍यांना मराठी साहित्याची खुप आवड होती . त्यावेळचे प्रसिदध साहित्यिक मान. न. चिं केळकर हे त्यांच दैवत होत . त्यांच गाव ही आमच्या पंचक्रोशीतलच . आमच्या इरसाल काप्याचे गरे त्यांना फार आवडत असत . दरवर्षी न चुकता माझे सासरे जिवाचा आटापिटा करुन हा फणस न. चि केळकरांपर्यंत पर्यंत पोचवत असतच.

कापा आणि बरका अशा दोन जाती असतात कोकणात फणसाच्या. वरुन दिसायला जरी हे दोन्ही फणस सारखे दिसत असले तरी बाकी सगळ्यात त्यांच्यात खूप फरक आहे. काप्याचे खुसखुशीत असतात , तर बरक्याघे हातातुन निसाटणारे थोडेसे गुळगुळीत पण गोड आणि अतिशय रसाळ. बरका फणस खाण्याच एक तंत्र आहे जे आमच्या मुलांना लहानपणीच शिकवले जाते. बरका फणस हाताने ही कापता येतो, कापा कापायला मात्र विळी किंवा कोयती लागतेच. काप्या फणसातल्या आठळ्या अगदी छोट्या असतात तर बरक्यातल्या असतात खुप मोठ्या

कोवळ्या आणि लहान फणसाला म्हणजे ज्यात अजिबात गरे नसतात अशाला " कुयरी " असं म्हणतात कोकणात. अशा फणसाची वालाचे दाणे आणि भरपुर खोबर घालुन केलेली भाजी आमच्याकडे सर्वांना आवडतेच पण गर्‍या गोट्याची म्हणजे कोवळे गरे आणि शेंगदाण्यासारख्या कोवळ्या आठळ्या असलेल्या फणसाची भाजी म्हणजे मेजवानीच वाटते. पिकल्या फणसाचे गरे घालुन केलेली गोडसर कढी ही करतो आम्ही उन्हाळ्यात . फणसाच सांदण हा खास कोकणी पदार्थ. फणसाच्या रसात थोडा गुळ आणि तांवुळाच्या कण्या घालुन सरसरीत भिजवायच आणी नंतर ते वाटीत घालुन मोदकपात्रात वाफवायच . खाताना बरोबर दुध किंवा तुप आणि आंब्याच लोणच . मुंबईच्या चाकरमान्यांसाठी आणि खास पाहुण्यांसाठी केली जातातच ही सांदण कोकणची खासीयत म्हणुन. फणसाच्या पानांचे चोया टोचुन सामोसे करायचे ज्याला आम्ही "खोले" म्हणतो, त्यात ही सांदण केली जातात कधी कधी. ह्याना फणसाच्या पानांचा सुरेख स्वाद लागतो. फणसाचा रस आणि साखर याचे उन्हात पाच सहा दिवस थरावर थर घालायचे आणि मग कडकडीत वाळवायचे की झाली फणस पोळी. उन्हाळ्यात आमच अंगण यांनीच भरलेल असत. कच्च्या फणसाचे खोबरेल तेलात तळलेले काप म्हणजेच तळलेले गरे अतिशय टेस्टी लागतात, कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. रेसिपी एका ओळीत लिहुन झाली तरी याचा फार उटारेटा आहे. आधी कच्चा फणस फोडायचा त्याच्या मोठ्या फोडी करायच्या , खालची पाठ काढायची मग गरे काढायचे त्यातली आठ ळी काढुन ते उभे लांबट चिरायचे आणि अणि मग खोबरेल तेलात तळायचे .... दुपारच्या वेळी कामवाल्याना हाताशी घेऊनच हे करावे लागतात. तळताना खोबरेल तेलाचा आणि गर्‍यांचा वास घमगमतो. त्या वासाने खळ्यात खेळणारी मुलं मागीलदारी गोळा होतात. आमची नजर चुकवुन सारखा डल्ला मारत असतात गर्‍यांवर.
गरे तळताना

From mayboli

तळलेले गरे

From mayboli

फणसाच्या आठळीला कोंब फुटणे हे पाऊस जवळ आल्याचे लक्ष्ण मानले जाते आठळ्या ही खायला मस्त लागतात. . आम्ही त्यातल्या त्यात मोठया आठळ्या धुवुन वाळवुन त्यांना थोडी माती फासुन जमीनीत एक उथळ खड्डा करुन त्यात ठेवुन देतो. अशा आठळ्या चार सहा महीने मस्त टिकतात. कधी अळुच्या भाजीत कधी आमटीत तर कधी उकडुन मीठ लावुन ही खाता येतात. पण आठळ्या खाण्याची खरी मजा पावसाची झड बसुन हवेत गारवा आला की त्या पाणचुलीच्या विस्तवात भाजुन खाण्यात आहे.

कधी झाड जीर्ण झालयं म्हणून किंवा कधी वार्‍या वादळामुळे एखादा फणस पडल्याचा गावाहुन फोन येतो . खूप वाईट वाटत . त्यानंतर जेव्हा गावाला जाण होत तेव्हा ती उजाड ओसाड जागा प्रत्यक्ष बघताना तर मनात कालवत अक्षरशः . एवढी जुनी झाडं बघता बघता नजरेआड होताना बघणं अतिशय क्लेशदायक असत. पण इलाज नसतो. जागा भरुन काढण्यासाठी तिथे एखाद नवीन झाड ही लावलेले असत तरी ही ती जागा उजाडच भासते... गप्पा मारता मारता जाऊबाई त्या फणसापासून तयार केलेला एखादा नवीन पोळ्पाट अथवा एखाद स्टुल किंवा फडताळ दाखवतात त्या पोळपाटावरुन जरा जास्तच मायेने हात फिरवला जातो मग थोडासा तरी दिलासा मिळतो.... फणसाचं ला़कूड चांगल मजबूत समजल जातं आणि आमच्या घराचा मुख्य वासा असाच आमच्याच एका फणसाचा आहे..... अशा तर्‍हेने फणस आमच्या घराचा कायमस्वरुपी आधार बनला आहे.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो, नेहमीप्रमाणे मस्तच ग ! माझ्या सासरी (छत्तीसगढ) पण फणसाच झाड होतं .
मी मराठवाड्यातली लग्नापूर्वी मी कधी फणसाचं झाड पाहिलं नव्हतं. तिथले फणस पिकायचे नाही तसही तिकडे 'कटहल' (फणस) भाजी वर्गात मोडतो फळात नाही ... तुझे असे छान लेख आले की हेवाच वाटतो ग ....

ममो, बरक्यासारखाच गोड, रसाळ लेख!
सांदणांसाठी बरके गरे स्टीलच्या चाळणीत हाताने फिरवून रस काढून द्यायला मज्जा यायची लहानपणी.. मी तर आमरसापेक्षा फणसाचा रस जास्त आवडीने खायचे पोळीबरोबर Happy
आमच्या घरी पण एक बेस्टेस्ट इन द गाव कापा फणस आहे, मस्त गोड करकरीत गरे, त्याची आठवण आली..

ममो,काय सुंदर लिहितेस ग! तुझा लेख दाही दिशानी फणस दारात आणून ठेवतोय.फणसापेक्षाही रसाळ इतका घमघमतोय कि लिहिल्या शिवाय राहवत नाही.मस्त कोकण ,मस्त फणस व त्याहीपेक्षा मस्त तुझा लेख.लिहित रहा छान छान!!

सगळेच प्रतिसाद खूप सुंदर आहेत. खूप खूप आभार.

दिनेश, मी पण दुरियान बद्दल खूप ऐकुन आहे पण अजुन टेस्ट नाही केलय.

भाऊ, प्रतिसाद आणि चित्र दोन्ही छान.

सशल. तुम्ही कल्पना केलीय आमच्या घराबद्दल अगदी तसच आहे ते. नारळी पोफळी, आंबा फणस, चिकु या झाडानी वेढलेलें.

मानुषी, हो मांजर खूपच खातात तळलेले गरे . आम्हाला खूप संभाळाव लागत . आणि दोन पायांची मांजर सारखी मुठी मुठी भरुन भरुन खळ्यात पळत असतात ते वेगळच. ( स्मित)

सीमा, अगदी बरोबर आहे आपण आपल्या अनुभवांशी रिलेट करतोच काही वाचताना. पण तुम्हाला तुमच्या आजोळच्या घराची आठवण आली हे वाचताना हे वाचुन छान वाटल. बादवे फुलेप्रगती शेंगा म्हणजे काय ?

प्रज्ञा, या वर्षी ही तुला उकडगरे आणि सांदण नक्की मिळणार ( स्मित)

सई, तुझा पर्तिसाद खूप आवडला. आणि शिरोड्याच्या वेतोबाची महिती ही नवीनच समजली.

तुझा लेख दाही दिशानी फणस दारात आणून ठेवतोय >> मीरा हे खूप आवडल. अगदी खर आहे.

हर्पेन, बरक्याची आठळी लावली तर बरकाच येतो अस काही फिक्स नाहिये. कलम केल तरच गॅरेंटी देता येते तशी. आम्ही आमच्या इरसाल काप्याच कलम केल आहे दुसर्‍या फणसा वर पण तरीही ती ओरिजनल टेस्ट नाहीये कलमाच्या फणसाला

आभा पाणचुल म्हणजे मागीलदारी अंघोळीचे पाणी ज्या चुलीवर तापवेले जाते ती.

दोन पायांची मांजर सारखी मुठी मुठी भरुन भरुन खळ्यात पळत असतात ते वेगळच. ( स्मित)>>>>>>>
हो यांच्याबद्दल काय बोलणार!

सई,
हे वेतोबाचं मलाही माहित नव्हतं. पुरीच्या जगन्नाथाच्या मूर्ती अश्या घडवतात असे वाचले होते.

ममो, मुंबईला हिंदु कॉलनीत, पै हॉस्पिटलजवळ एक आडवा विस्तारलेला फणस आहे. त्याला फणसही खुप लागतात.

( माझ्या मुंबईच्या सर्वच आठवणीनंतर अजूनही असेल... असे का लिहावेसे वाटते ?? )

फणसाशी फारशी ओळख नाही, पण तुमचा लेख फार आवडला. मी मुलीला सुद्धा फोटो दाखवले आणि थोडे वाचून दाखवले. Happy

धन्यवाद सर्वांना परत एकदा.

पुरीच्या जगन्नाथाच्या मूर्ती अश्या घडवतात असे वाचले होते.>> दिनेश, मी ही अगदी हेच लिहीणार होते.

ममो, मुंबईला हिंदु कॉलनीत, पै हॉस्पिटलजवळ एक आडवा विस्तारलेला फणस आहे. त्याला फणसही खुप लागतात.>> दिनेश, तुम्हला सगळीकडची किती महिती आहे

मी मुलीला सुद्धा फोटो दाखवले आणि थोडे वाचून दाखवले. स्मित >> रैना खूप आवडलं हे.

मस्त लिहिलं आहेस ममो!
अगदी बालपणीचा सुखाचा काळ डोळ्यांसमोर उभा राहिला.
तरी परवाच आजोळचा फणस पोट फुटेस्तोवर खाल्ला आहे, पण त्याला सकाळी मऊभाताची न्याहरी करून झाल्यावर ओ येईस्तोवर आंबे खाऊन वर बरका फणस खाल्ल्याची सर नाही. Happy

गेले २-३ दिवस लेख बघत होते पण निवांत वाचायचा म्हणून ठेवला होता. आज वाचला आणि थांबल्याच चीज झालं Happy

मस्त लिहिलय. कापा माझ्यापण आवडीचा.

माझ्या आजीचे माहेर रत्नागिरीच्या जवळ बसणी ह्या गावी. शाळेतल्या सगळ्या सुट्ट्या मी तिच्याबरोबर बसणीला जायचे. मस्त महिनाभर. मग आंबे, फणस, रातंबे, करवंद, काजू सगळ्याचीच धमाल असायची. त्या दिवसांची आठवण झाली.

अवांतर - इथे पुण्यात माझ्या आत्याकडे एक मस्त गोड रसाळ फणसाचे झाड आहे. फणस येतात ही भरपुर. पण फणास कापणे / सोलणे फार जिकिरीचे काम. आत्याची सुन कधे वैतागाने म्हणते की बाकी सगळी झाडे लावावीत पणा फणासाचे झाड लाऊ नये Proud

पन्नास प्रतिसाद !!!! आभार खूप खुप सर्वांचे

तरी परवाच आजोळचा फणस पोट फुटेस्तोवर खाल्ला आहे, पण त्याला सकाळी मऊभाताची न्याहरी करून झाल्यावर ओ येईस्तोवर आंबे खाऊन वर बरका फणस खाल्ल्याची सर नाही. स्मित>> मंजूडी परफेक्ट आहे हे

फणास कापणे / सोलणे फार जिकिरीचे काम. >> हो खर आहे आम्ही पाच सही जणी तीन चार तास राबतो तेव्हा कुठे ते तलळेले गरे जन्मला येतात

ओ ते जरा तळलेले गरे पाठवून द्या ना!!!!! >> घरी या ना खायला

खूपच छान ! तुमच्या लिखाणातून हे सगळं अनुभवायला मिळंतं. आमच्या वडिलांचंही लाडकं फणसाचं झाड होतं, त्यांनी लावलेलं, पण आम्हाला तो अनुभव नाही मिळाला कधी.

ममो, किती सुरेख लिहितेस ग तू? तुझे कोकणावरचे लेख वाचताना खूप गलबलल्यासारखे होते ग ! ही सर्व मजा आता परत कधी अनुभवायला मिळणार असे होते.
कापा फणसाचे गरे ईथे विकत घेता येतात पण बरका फणस तर गेल्या बर्याच वर्षात मी खाल्ला नाही.
तुझा लेख वाचताना तुझ्या ठिकाणी मी मलाच पहात होते .

ममो.. नेहमीप्रमाणेच मस्त लिहलयं Happy
फणस म्हटलं की बडबडगीत आठवतं - भटोबा भटोबा कुठे गेला होतात? Happy
गेल्या महिन्यात पुण्यात मार्केटमधे भरपुर फणस आले होते ..मस्त गोड वास सगळीकडे ... लोकांची खादाडी सुरु होतीच .. २ मुली - बहुदा उत्तर भारतीय असाव्यात ,त्यातली एक म्हणे 'ये लोग इतना पागल होकर क्या खा रहे है यल्लो कलर का' Proud .. मग तिला फणस आहे असं सांगितलं Happy

ममो, खूप छान लिहीलसं. बालपणात फ़िरून आले. आमच्या घरचा पण एक बरका फ़णस होता. आकाराने अगदी लहान. गरे पण १०-१२च असतील, पण गरे एकदम गोड. आम्ही फ़णस मस्त हाताने फ़ाडून, ३-४ फ़णस एकेकटे संपवायचो.

सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, फ़णसची भाजी, सांदण, साठं , आठलांची भाजी, उकडलेल्या आठला, खूप खूप मजा यायची. धन्यवाद!

ममो, खुप खूप छान लिहीलत. तुमच लेखन वाचुन नेहमीच वाटतं , 'कोकणची माणसं साधी भोळी
बोलण्यात त्यांच्या फणसाची गोडी …'ही अतिशयोक्ती नाही...' बरका ' !

खूप खूप आभार लेख आवडला म्हणून

चनस, फणस माहित नाही म्हणून नवल वाटत ना आपल्याला. मस्त लिहील आहेस.

प्रज्ञा, इथे ठाण्याला पण खूप विकत मिळतात फणस पण मी अजुन एकदाही नाही घेतलाय. ( स्मित) खाईन तर घरचाच. नाहीतर ऩको अर्थात घरचे आहेत म्हणूनच चालत हे सगळ.

शोभा , आमच्याकडे एवढे लहान फणस नाहीत ग म्हणून तीन- तीन चार- चार फणस एकट्याने फस्त करणे ही कल्पनाच लय भारी.

कोकणची माणसं साधी भोळी
बोलण्यात त्यांच्या फणसाची गोडी …'ही अतिशयोक्ती नाही...' बरका ' ! >>> भुईकमळ, पोस्ट आवडली बरका !!!

मस्त लिहिलेस गं... मलाही फणस अर्थात कापाच आवडतो… गऱयांची भाजीही आवडीची. पण आमच्या आंबोलीत नाहीत आंबे फणस. मी गावी गेले कि वडलांच्या आतेबहिणीच्या गावी जाऊन फणस घेऊन येते.

Pages