आयपीएलच्या निमित्तानं पाणी प्रश्नाबद्दल थोडंसं..

Submitted by नानबा on 11 April, 2016 - 04:44

राज्यात तीव्र दुष्काळ असताना आयपीएल सारख्या स्पर्धांवर पाणी वाया घालवण्यावरून हायकोर्टानी कान उघडणी केल्यावर काही क्रिकेटरसिकांची टोकाची मतं ऐकू आली. क्रिकेटवरच बंदी का? हा मुद्दा आला. ह्याआधी होळीच्या दरम्यान असाच प्रश्न ऐकू आलेला.
लोकांमधे असलेलं कन्फ्युजन, ह्या वर्षीचा दुष्काळ, होळी आणि आयपीएलचे सामने ह्यावरून मला कळलेल्या काही गोष्टी लिहाव्या, असं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.
पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी फक्त २.५% पाणी वापरण्यासारखं आहे आणि त्यातलंही माणसाला उपलब्ध पाणी अजून कमी आहे हे लक्षात ठेवूया.

पहिल्यांदा पाण्याचे उपलब्ध स्त्रोत कुठले ते पाहूया.
१. मॉन्सून - हा सर्वात महत्त्वाचा आणि ज्यावर इतर सोर्स अवलंबून आहेत असा सोर्स. दरवर्षी फक्त काही महिन्यांपुरता पडतो. पडणार्या पावसातलं काही पाणी जमिनीत मुरतं, काही ओढ्यांतून नदीला आणि नदीवाटे समुद्राला मिळतं, बाकी बरंचस बाष्पीभवन होऊन जातं.
२. ग्राऊंड वॉटर/ जमिनीखालील जलसाठे - पाणी ठराविक प्रमाणात जमिनीवरून वहात राहिलं की त्यातलंच पाणी जमिनीत मुरून जमिनीखालील जलसाठ्यात वाढ होते. हेच पाणी काही ठिकाणहून झर्याच्या/विहिरीच्या/बोरवेलच्या पाण्याद्वारे बाहेर पडतं. हे जे जमिनीखालील जलसाठे आहेत ते हजारो वर्षात तयार झालेले आहेत.
३. धरणं, बंधारे - हे घालून पाणी साठवता येतं आणि शेती आणि शहरी माणसाच्या वापराकरता पाणी उपलब्ध होतं. पण हे पाणी शेवटी मॉन्सूनवरच अवलंबून असतं हे चर्चेत पुढं जाताना लक्षात ठेवूया.

हे सगळे साठे उपलब्ध असूनही, प्रॉब्लेम येतो कुठे?
ह्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया:
आयपीएल वाल्यांकडून भरपूर पैसे घेऊन ते पैसे दुष्काळी भागात पाठवावेत असे विचार काही ठिकाणी वाचायला मिळाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की पैसा - 'आहे त्या स्वरुपात' खाता/पीता येत नाही. पैशाचा वापर करून अन्न/पाणी ह्या गरजेच्या गोष्टी विकत घेता येऊ शकतात, पण कुठवर? त्या उपलब्ध असतील तरच. पैसा तयार करण्यासाठी नैसर्गिक संसाधन लागतात. पण नैसर्गिक संसाधन "तयार करणं" आपल्या हातात नाही. तसं असतं तर अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया सारख्या राज्याला दुष्काळाची झळ बसलीच नसती. निसर्गाच्या मर्यादेपुढे सब घोडे बारा टक्के हे चेनैईच्या पावसानं आणि त्यानंतर झालेल्या पूरपरिस्थितीनं दाखवून दिलच आहे.
ह्या संदर्भात आणखीन एक वाचण्यासारखी बातमी म्हणजे पाणी प्रश्नामुळे बँगलोर सारखं श्रीमंत , डेवलप्ड (!) शहर एका दशकात रिकामं करावं लागेल काय - अशी शक्यता वर्तवली जातीये. (ह्या विषयावर गूगल करा, अनेक बातम्या मिळतील).

हे सगळं सांगण्यामागे मतितार्थ इतकाच की आपल्याकडे कितीही पैसा असेल तरी नैसर्गिक संसाधनांशिवाय (पाणी, हवा, अन्न) माणूस जगू शकत नाही.

उपलब्ध जलस्त्रोताचे लिमिट्स
वर आपण तीन स्त्रोत पाहिले.
मॉन्सूनः माणसाच्या निसर्गाच्या हस्तक्षेपामुळे जागतिक पातळीवर हवामान बदल घडला आहे. त्यामुळे पावसाच्या महिन्यांमधे, प्रमाणामधे अनिश्चितता आली आहे.
ग्राऊंड वॉटर: हे रिचार्ज करणारी जंगलं आपण आपल्या वसाहतींकरता, धरणांकरता, उद्योगधंद्यांकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावर तोडली आहेत, तोडत आहोत. शहरात आणि इतर ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या वेडामुळे पाणी मुरू शकत नाही. सर्वत्र पाण्याचा प्रचंड उपसा चालू आहे, त्याप्रमाणात रिचार्जिंग विविध कारणानं शक्य नाही. शहरांमधे तर स्कायस्क्रॅपर्स बांधताना अतिशय खोल पाया घ्यावा लागतो - ते करताना लागलेलं सगळं पाणी संपेपर्यंत बिल्डर्स उपसून टाकतात. अशा रितीनं पाणी नुसतं वापराकरताच नाही तर विना-उपयोगाचंही वाया जातं. हे पाणी आपलं नाहीचे, ही आपल्या मुलाबाळांची ठेव आहे. जी वापरून संपतेय. त्याचबरोबर प्रदुषितही होतेय. आणि वेड्यावाकड्या विकासामुळे नष्टही होतेय.
नद्या/तलाव: आपल्या देशातल्या अनेक मोठ्या नद्या मृतपाय अवस्थेला आहेत. नद्यांचे नाले झाले आहेत, तलावांची डबकी! हे असं होण्यात इन्डस्ट्रियल पॉल्युशन, शेतातून जाणारी रसायने ह्याबरोबरच तुमच्या आमच्या घरातून जाणारे साबण, टूथपेस्ट, डिटर्जंटस, टॉयलेट क्लिनर्स, फिनेल आणि प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक ह्यांचा सहभाग आहे. ह्या सगळ्यातून अतिशय घातक, पृथ्वीवरून कधीच नाहिशी न होणारी रसायनं आपल्याच पोटात जातात. एका ग्लासमधे साबण घाला, पाणी घाला आणि ते पाणे पिण्याचा विचार करा. पिऊ शकता का? नाही ना? मग आपल्या नद्यांमधून हेच पाणी पुढच्या गावाला जातं आणि प्यावं लागतं. ह्याच पाण्यावर आपली पिकं येतात आणि आपल्याच पोटात जातात. ह्यावर अतिशय साधे सोपे पर्याय अपलब्ध आहेत (उटणं, मंजन/मीठ, रीठा वापरून कपडे, रीठा/राख वापरून भांडी धुणे वगैरे.) हे न केल्याने आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येमुळे नद्यांची अवस्था भयावह आहे.
धरणं: धरणांचा जमिनीखालील जलसाठे वाढवायला उपयोग होत नाही. इथे फारसे जीव अतीदाबामुळे तगू शकत नाहीत. ह्या खालचा गाळ वापरून (त्यावर खूप इनपुटस घातल्याशिवाय) काहीही उगवू शकत नाही. आपल्या इथल्या उष्ण हवामानामुळे, पाण्याची वाफ होऊन उडून जाण्याचे प्रमाण प्रचंड असते. धरणं बांधताना तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, त्यामुळे जैववैविध्यावर, जुन्या आणि उत्तम नैसर्गिक परिसंस्थांचा नाश, तिथे रहाणार्या लोकांचे पुनर्वसन, त्या पुनर्वसनाचे त्या लोकांवर होणारे गंभीर परिणार, त्यांच्यावर सरकारी नियम आणि यंत्रणांमुळे होणारे अन्याय आणि इतकं करून समोर दिसत असलेलं पाणीही त्यांना वापरायला न मिळणं - ते कुठल्यातरी शहराकडे वळवणं - ह्या गोष्टींबाबत बोलण्यासारखं खूपच आहे.
शहरांची अतीप्रचंड लोकसंख्या आणि पाण्याचा/ वीजेचा अतीवापर ह्या दोन गोष्टींचा परिणाम म्हणून अधिकाधिक धरणे आणि त्यातून निर्माण होणारे इतर प्रश्न ही न संपणारी सायकल झाली आहे.

आयपीएलचं पाणी दुष्काळी भागात वळवता येईल का? :
आयपीएलचं पाणी दुष्काळी भागात वळवता येईल का? हा मुद्दा येतो, तेव्हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा मुंबईची/शहरांची गरज कुठल्याही कारणानं वाढते, तेव्हा ती पूर्ण करण्याकरता कुठूनतरी पाणी आणावं लागतं. ते मग दुसरीकडचं पाणी पळवून, तिथल्या लोकांना आणि पर्यावरणातल्या घटकांना विस्थापित करूनच मिळतं. आणि हेच पाणी त्याच घटकांना नाकारलं जातं. (जवळजवळ कुठल्याही धरणाच्या कॅचमेंट एरियामधे जाऊन हे विधान तपासून बघू शकता!)
एका व्यक्तीनं मधे एक छान प्रश्न विचारलेला की मुंबई का महत्त्वाची? जीडीपी वाढवते म्हणून! मग काही दिवस, मुंबईला बाहेरून होणारा पुरवठा बंद करा आणि बघा जीडीपी वाढतोय का? म्हणजे, ज्यावर "जीवन" अवलंबून असतं ते घटक आपल्याला बाहेरून मिळताहेत, ते कुठून तरी काढून घेऊन मिळताहेत हे भान वीजपाणी आणि इतर गोष्टी वाया घालवताना ह्या शहरांनी ठेवलं पाहिजे.
दुष्काळ सगळीकडेच आहे. यंदा तो जास्त तीव्र प्रमाणात जाणवतोय. पण ह्यापुढेही क्लायमेट चेंज (हवामान बदल) मुळे त्याचे परिणाम अधिकाधिक जाणवत रहाणार आहेत.
इतिहासात डोकावून पाहिलं की मायन, सुमेरियन संस्कृतीच्या र्हासामागे सुजलेली शहरं , प्रचंड प्रमाणात इरिगेशन आणि मग पडलेल्या दुष्काळाला सामोरं न जाता येणं हेच दिसतं. मग आपणही तेच करायचं का? नद्या जोड प्रकल्प, नदीची एकोसिस्टीम मारून ती खोल खणून नदीचा हौद करणं, समुद्रात पाण्याचा टिपूसही जाऊन देणार नाही म्हणणं ह्याच्या परिणामांचा विचार आपण करायला हवा. सगळ्याच गोष्टींबद्दल लिहित नाही, पण भारतातून समुद्रात पाण्याचा टिपूसही जाऊ दिला नाही तर समुद्राच्या सॅलिनिटीवर परिणाम होईल, ज्याचा तिथल्या जीवसृष्टीवर, लाटांच्या उंचीवर परिणाम होईल. माणूस अशी सोल्युशन्स परिपूर्ण विचार न करता शोधतो/मांडतो तेव्हा त्यामुळे होणारं नुकसान प्रचंड आणि दुरगामी असतं (उदा. पंजाबातील हरितक्रांती आणि तिथलं केंसरचं प्रमाण)

मुद्दा काय?
शेती असो, सोसायटीमधली अनावश्यक आणि पाणी वाया घालवणारी लॉन्स असोत, कार धुणारी माणसं असोत, तुटके नळ असोत, बिल्डर्स असोत वा पाणी प्रदुषित करणारे उद्योग/घरातली घाण असो, पाण्याची समस्या असताना खेळलेली होळी असो ((वा कुठल्याही धर्माची पाण्याची नासाडी करणारी कुठलीही इतर धार्मिक कृत्ये असो) वा भर दुष्काळात आखलेली आयपीएल असो.
सामान्य माणसानी एज्युकेट होऊन स्वतःत बदल, सरकारवर दबाव गट तयार करण्याची आणि इतरांना सांगत रहायची गरज आहे. तुम्हाला आज कदाचित फरक पडत नसेल, पण उद्या पडणार आहे. दॅट इज इनेविटेबल! तेव्हा 'आयपीएलच का, शेतीवर का बोलत नाही? धार्मिक कार्यक्रमाबद्दलच का बोलता' अशा सगळ्या प्रश्नात न पडता जे जे आपल्या स्तरावर शक्य आहे ते करणं, जिथे चुकीचं धोरण दिसेल तिथे विरोध करणं, आपल्या घरातून रसायनं नदीत जाणार नाहीत ह्याची काळजी घेणं, पाणी वाया जाऊ नये ह्यासाठी सजग रहाणं, गरज आणि चैन ह्यातला फरक समजून घेऊन वागणं अशा गोष्टी आपआपल्या परीनं करत रहायला पाहिजेत. नव्हे, करत रहायला पाहिजेत!
कारण आपण स्वत:च वेळीच शिकलो तर ठीक! नाहीतर आपोआप शिकायला लागेलच - पण तेव्हाची किंमत कदाचित खूप जास्त आणि न परवडणारी असेल!
ज्या फांदीवर बसलोय तीच फांदी तोडणार्याचं काय होतं माहितीये ना?

~ शिरीष कोठावळे
तळटीप: लेखात काही तृटी राहिल्या असल्यास, लेखिकेला संपर्क करून कळवू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रस्ते होऊ शकतात तर कालवे का नाहीत ? >> तिथे भूसंपादन आडवे येते. आणि हे वेळकाढु प्रकल्प आहेत. Micro level वर जितकी कामे होतील (जनसहभाग गृहित धरला आहे) त्यामुळे बराच फरक पडेल. उदा. एखाद्या गावात तळे असेल तर त्यातील गाळ काढुन/ खणुन खोली वाढवल्यास पाण्याचा साठा वाढु शकेल. बोअर वेल संबंधी देखिल एक धोरण ठरवुन त्यानुसारच बोअरसाठी परवानगी द्यावी.

साहिल.. ४*१०^११ हे सरासरी पावसाच्या ०.१% आहे. समजा एकुण पावसाच्या १०% कॅचमेंट असली तरी त्यातील ९९% पाणी आपल्या वापरानंतर शिल्लक राहील. हाच रेशो वेगळ्या पद्धतीने सांगायचा झाला तर, पडणार्या पावसाचे १% पाणी साठवले आणि ते सगळ्या महाराष्ट्राने दरडोई दररोज १०० लिटरप्रमाणे वापरले तरी साठवणूकीतले ९०% शिल्लक असेल. त्यात शेती-उद्योग हवे तेवढे चालवता येतील.

(समुद्राच्या पाण्याच्या शुद्धीकरणाबद्दल दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऊर्जा. समुद्रसपाटीवर तयार झालेले पाणी महाराष्ट्राच्या उंचीवर (किमान ५०० मीटर) आणायला आणि तिथुन ५०० ते ७०० किमी अंतरावर पाठवायला प्रचंड ऊर्जा लागेल. साधारण १ किमी म्हणजे १ मजला हे समीकरण धरले तरी किमान ७०० व्या मजल्यावर राहायला गेल्यासारखे होईल. ते परवडणारं नाही. आपल्याकडे आधीच विजेचा तुटवडा असतो. सिंगापूर समुद्रकिनार्यावर आहे तिथे हे चालू शकते.)

विठ्ठल + १
आमच्या गावातले काम आमच्या आजोबांच्या काळापासून रखडलेय. गेल्या वर्षी काम सुरू झाले एकदाचे! जनतेने सुस्कारा सोडला. पण हाय दुर्दैवा! त्याला गेल्या सहा महिन्यापासून पुन्हा (बहुतेक क्ष वर्षांकरता) खोडा बसलाय.

विठ्ठल- सहमत. मध्यंतरी अंकोलीच्या अरुण देशपांड्यांची मुलाखत पाहिली होती. त्यांच्या वसाहतीसाठी त्यांनी असेच एक शेततळे केलेले आहे. त्यांचं म्हणणं होतं की पाणी हे पैशाप्रमाणे वापरलं पाहिजे. हिशोब ठेऊन. आपल्या तळ्याला ते 'वॉटरबँक' म्हणतात.

do we really need and whether we should really go for options like connecting the rivers is the question that we should ask.
I will try to write on what policy level and individual changes that can be done

ओंजळ गळकी आहे पण ती एवढी पण गळकी नाही की ती जर निट केली तर सगळी समस्या सुटेल. आणि जरी १००० मिमि सरासरी पाउस पडत असला तरी तो फक्त ३ महिने पडतो आणि त्यातिल बराच पाउस हा शेतात पडतो आणि पिकासाठी वापरला जातो ते पाणि कॅचमेंट साठी वापरता येत नाही.
>> There is a fantastic example where ground water levels are increased for entire catchment which has helped farming as well. And this has happened in a draught struck area. I will write about this example too.

Pages