आयपीएलच्या निमित्तानं पाणी प्रश्नाबद्दल थोडंसं..

Submitted by नानबा on 11 April, 2016 - 04:44

राज्यात तीव्र दुष्काळ असताना आयपीएल सारख्या स्पर्धांवर पाणी वाया घालवण्यावरून हायकोर्टानी कान उघडणी केल्यावर काही क्रिकेटरसिकांची टोकाची मतं ऐकू आली. क्रिकेटवरच बंदी का? हा मुद्दा आला. ह्याआधी होळीच्या दरम्यान असाच प्रश्न ऐकू आलेला.
लोकांमधे असलेलं कन्फ्युजन, ह्या वर्षीचा दुष्काळ, होळी आणि आयपीएलचे सामने ह्यावरून मला कळलेल्या काही गोष्टी लिहाव्या, असं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.
पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी फक्त २.५% पाणी वापरण्यासारखं आहे आणि त्यातलंही माणसाला उपलब्ध पाणी अजून कमी आहे हे लक्षात ठेवूया.

पहिल्यांदा पाण्याचे उपलब्ध स्त्रोत कुठले ते पाहूया.
१. मॉन्सून - हा सर्वात महत्त्वाचा आणि ज्यावर इतर सोर्स अवलंबून आहेत असा सोर्स. दरवर्षी फक्त काही महिन्यांपुरता पडतो. पडणार्या पावसातलं काही पाणी जमिनीत मुरतं, काही ओढ्यांतून नदीला आणि नदीवाटे समुद्राला मिळतं, बाकी बरंचस बाष्पीभवन होऊन जातं.
२. ग्राऊंड वॉटर/ जमिनीखालील जलसाठे - पाणी ठराविक प्रमाणात जमिनीवरून वहात राहिलं की त्यातलंच पाणी जमिनीत मुरून जमिनीखालील जलसाठ्यात वाढ होते. हेच पाणी काही ठिकाणहून झर्याच्या/विहिरीच्या/बोरवेलच्या पाण्याद्वारे बाहेर पडतं. हे जे जमिनीखालील जलसाठे आहेत ते हजारो वर्षात तयार झालेले आहेत.
३. धरणं, बंधारे - हे घालून पाणी साठवता येतं आणि शेती आणि शहरी माणसाच्या वापराकरता पाणी उपलब्ध होतं. पण हे पाणी शेवटी मॉन्सूनवरच अवलंबून असतं हे चर्चेत पुढं जाताना लक्षात ठेवूया.

हे सगळे साठे उपलब्ध असूनही, प्रॉब्लेम येतो कुठे?
ह्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया:
आयपीएल वाल्यांकडून भरपूर पैसे घेऊन ते पैसे दुष्काळी भागात पाठवावेत असे विचार काही ठिकाणी वाचायला मिळाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की पैसा - 'आहे त्या स्वरुपात' खाता/पीता येत नाही. पैशाचा वापर करून अन्न/पाणी ह्या गरजेच्या गोष्टी विकत घेता येऊ शकतात, पण कुठवर? त्या उपलब्ध असतील तरच. पैसा तयार करण्यासाठी नैसर्गिक संसाधन लागतात. पण नैसर्गिक संसाधन "तयार करणं" आपल्या हातात नाही. तसं असतं तर अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया सारख्या राज्याला दुष्काळाची झळ बसलीच नसती. निसर्गाच्या मर्यादेपुढे सब घोडे बारा टक्के हे चेनैईच्या पावसानं आणि त्यानंतर झालेल्या पूरपरिस्थितीनं दाखवून दिलच आहे.
ह्या संदर्भात आणखीन एक वाचण्यासारखी बातमी म्हणजे पाणी प्रश्नामुळे बँगलोर सारखं श्रीमंत , डेवलप्ड (!) शहर एका दशकात रिकामं करावं लागेल काय - अशी शक्यता वर्तवली जातीये. (ह्या विषयावर गूगल करा, अनेक बातम्या मिळतील).

हे सगळं सांगण्यामागे मतितार्थ इतकाच की आपल्याकडे कितीही पैसा असेल तरी नैसर्गिक संसाधनांशिवाय (पाणी, हवा, अन्न) माणूस जगू शकत नाही.

उपलब्ध जलस्त्रोताचे लिमिट्स
वर आपण तीन स्त्रोत पाहिले.
मॉन्सूनः माणसाच्या निसर्गाच्या हस्तक्षेपामुळे जागतिक पातळीवर हवामान बदल घडला आहे. त्यामुळे पावसाच्या महिन्यांमधे, प्रमाणामधे अनिश्चितता आली आहे.
ग्राऊंड वॉटर: हे रिचार्ज करणारी जंगलं आपण आपल्या वसाहतींकरता, धरणांकरता, उद्योगधंद्यांकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावर तोडली आहेत, तोडत आहोत. शहरात आणि इतर ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या वेडामुळे पाणी मुरू शकत नाही. सर्वत्र पाण्याचा प्रचंड उपसा चालू आहे, त्याप्रमाणात रिचार्जिंग विविध कारणानं शक्य नाही. शहरांमधे तर स्कायस्क्रॅपर्स बांधताना अतिशय खोल पाया घ्यावा लागतो - ते करताना लागलेलं सगळं पाणी संपेपर्यंत बिल्डर्स उपसून टाकतात. अशा रितीनं पाणी नुसतं वापराकरताच नाही तर विना-उपयोगाचंही वाया जातं. हे पाणी आपलं नाहीचे, ही आपल्या मुलाबाळांची ठेव आहे. जी वापरून संपतेय. त्याचबरोबर प्रदुषितही होतेय. आणि वेड्यावाकड्या विकासामुळे नष्टही होतेय.
नद्या/तलाव: आपल्या देशातल्या अनेक मोठ्या नद्या मृतपाय अवस्थेला आहेत. नद्यांचे नाले झाले आहेत, तलावांची डबकी! हे असं होण्यात इन्डस्ट्रियल पॉल्युशन, शेतातून जाणारी रसायने ह्याबरोबरच तुमच्या आमच्या घरातून जाणारे साबण, टूथपेस्ट, डिटर्जंटस, टॉयलेट क्लिनर्स, फिनेल आणि प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक ह्यांचा सहभाग आहे. ह्या सगळ्यातून अतिशय घातक, पृथ्वीवरून कधीच नाहिशी न होणारी रसायनं आपल्याच पोटात जातात. एका ग्लासमधे साबण घाला, पाणी घाला आणि ते पाणे पिण्याचा विचार करा. पिऊ शकता का? नाही ना? मग आपल्या नद्यांमधून हेच पाणी पुढच्या गावाला जातं आणि प्यावं लागतं. ह्याच पाण्यावर आपली पिकं येतात आणि आपल्याच पोटात जातात. ह्यावर अतिशय साधे सोपे पर्याय अपलब्ध आहेत (उटणं, मंजन/मीठ, रीठा वापरून कपडे, रीठा/राख वापरून भांडी धुणे वगैरे.) हे न केल्याने आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येमुळे नद्यांची अवस्था भयावह आहे.
धरणं: धरणांचा जमिनीखालील जलसाठे वाढवायला उपयोग होत नाही. इथे फारसे जीव अतीदाबामुळे तगू शकत नाहीत. ह्या खालचा गाळ वापरून (त्यावर खूप इनपुटस घातल्याशिवाय) काहीही उगवू शकत नाही. आपल्या इथल्या उष्ण हवामानामुळे, पाण्याची वाफ होऊन उडून जाण्याचे प्रमाण प्रचंड असते. धरणं बांधताना तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, त्यामुळे जैववैविध्यावर, जुन्या आणि उत्तम नैसर्गिक परिसंस्थांचा नाश, तिथे रहाणार्या लोकांचे पुनर्वसन, त्या पुनर्वसनाचे त्या लोकांवर होणारे गंभीर परिणार, त्यांच्यावर सरकारी नियम आणि यंत्रणांमुळे होणारे अन्याय आणि इतकं करून समोर दिसत असलेलं पाणीही त्यांना वापरायला न मिळणं - ते कुठल्यातरी शहराकडे वळवणं - ह्या गोष्टींबाबत बोलण्यासारखं खूपच आहे.
शहरांची अतीप्रचंड लोकसंख्या आणि पाण्याचा/ वीजेचा अतीवापर ह्या दोन गोष्टींचा परिणाम म्हणून अधिकाधिक धरणे आणि त्यातून निर्माण होणारे इतर प्रश्न ही न संपणारी सायकल झाली आहे.

आयपीएलचं पाणी दुष्काळी भागात वळवता येईल का? :
आयपीएलचं पाणी दुष्काळी भागात वळवता येईल का? हा मुद्दा येतो, तेव्हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा मुंबईची/शहरांची गरज कुठल्याही कारणानं वाढते, तेव्हा ती पूर्ण करण्याकरता कुठूनतरी पाणी आणावं लागतं. ते मग दुसरीकडचं पाणी पळवून, तिथल्या लोकांना आणि पर्यावरणातल्या घटकांना विस्थापित करूनच मिळतं. आणि हेच पाणी त्याच घटकांना नाकारलं जातं. (जवळजवळ कुठल्याही धरणाच्या कॅचमेंट एरियामधे जाऊन हे विधान तपासून बघू शकता!)
एका व्यक्तीनं मधे एक छान प्रश्न विचारलेला की मुंबई का महत्त्वाची? जीडीपी वाढवते म्हणून! मग काही दिवस, मुंबईला बाहेरून होणारा पुरवठा बंद करा आणि बघा जीडीपी वाढतोय का? म्हणजे, ज्यावर "जीवन" अवलंबून असतं ते घटक आपल्याला बाहेरून मिळताहेत, ते कुठून तरी काढून घेऊन मिळताहेत हे भान वीजपाणी आणि इतर गोष्टी वाया घालवताना ह्या शहरांनी ठेवलं पाहिजे.
दुष्काळ सगळीकडेच आहे. यंदा तो जास्त तीव्र प्रमाणात जाणवतोय. पण ह्यापुढेही क्लायमेट चेंज (हवामान बदल) मुळे त्याचे परिणाम अधिकाधिक जाणवत रहाणार आहेत.
इतिहासात डोकावून पाहिलं की मायन, सुमेरियन संस्कृतीच्या र्हासामागे सुजलेली शहरं , प्रचंड प्रमाणात इरिगेशन आणि मग पडलेल्या दुष्काळाला सामोरं न जाता येणं हेच दिसतं. मग आपणही तेच करायचं का? नद्या जोड प्रकल्प, नदीची एकोसिस्टीम मारून ती खोल खणून नदीचा हौद करणं, समुद्रात पाण्याचा टिपूसही जाऊन देणार नाही म्हणणं ह्याच्या परिणामांचा विचार आपण करायला हवा. सगळ्याच गोष्टींबद्दल लिहित नाही, पण भारतातून समुद्रात पाण्याचा टिपूसही जाऊ दिला नाही तर समुद्राच्या सॅलिनिटीवर परिणाम होईल, ज्याचा तिथल्या जीवसृष्टीवर, लाटांच्या उंचीवर परिणाम होईल. माणूस अशी सोल्युशन्स परिपूर्ण विचार न करता शोधतो/मांडतो तेव्हा त्यामुळे होणारं नुकसान प्रचंड आणि दुरगामी असतं (उदा. पंजाबातील हरितक्रांती आणि तिथलं केंसरचं प्रमाण)

मुद्दा काय?
शेती असो, सोसायटीमधली अनावश्यक आणि पाणी वाया घालवणारी लॉन्स असोत, कार धुणारी माणसं असोत, तुटके नळ असोत, बिल्डर्स असोत वा पाणी प्रदुषित करणारे उद्योग/घरातली घाण असो, पाण्याची समस्या असताना खेळलेली होळी असो ((वा कुठल्याही धर्माची पाण्याची नासाडी करणारी कुठलीही इतर धार्मिक कृत्ये असो) वा भर दुष्काळात आखलेली आयपीएल असो.
सामान्य माणसानी एज्युकेट होऊन स्वतःत बदल, सरकारवर दबाव गट तयार करण्याची आणि इतरांना सांगत रहायची गरज आहे. तुम्हाला आज कदाचित फरक पडत नसेल, पण उद्या पडणार आहे. दॅट इज इनेविटेबल! तेव्हा 'आयपीएलच का, शेतीवर का बोलत नाही? धार्मिक कार्यक्रमाबद्दलच का बोलता' अशा सगळ्या प्रश्नात न पडता जे जे आपल्या स्तरावर शक्य आहे ते करणं, जिथे चुकीचं धोरण दिसेल तिथे विरोध करणं, आपल्या घरातून रसायनं नदीत जाणार नाहीत ह्याची काळजी घेणं, पाणी वाया जाऊ नये ह्यासाठी सजग रहाणं, गरज आणि चैन ह्यातला फरक समजून घेऊन वागणं अशा गोष्टी आपआपल्या परीनं करत रहायला पाहिजेत. नव्हे, करत रहायला पाहिजेत!
कारण आपण स्वत:च वेळीच शिकलो तर ठीक! नाहीतर आपोआप शिकायला लागेलच - पण तेव्हाची किंमत कदाचित खूप जास्त आणि न परवडणारी असेल!
ज्या फांदीवर बसलोय तीच फांदी तोडणार्याचं काय होतं माहितीये ना?

~ शिरीष कोठावळे
तळटीप: लेखात काही तृटी राहिल्या असल्यास, लेखिकेला संपर्क करून कळवू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती... लेख..
थोडक्यात मला जे भावले ते तथ्य असे की "आयपीएला" ला पाण्यावरुन विरोध करीत तत्कालिक "कंडु शमवुन" घेणे ही एक बाब, पण त्यामुळे सर्वदूर उधळपट्टीच्या मूलभुत सवईत बदल घडणे नाही.

आमच्या वसाहतीत या अनुषंगाने सध्या खालील उपाय तरी अंमलात आणले गेले आहेत -
१. प्लंबर बोलावून वसाहतीतील सगळ्या घरातील नळ गळतीसाठी तपासून त्यांची डागडुजी.
२. वाहने दोन आठवड्यातून एकदा (तेही अगदीच घाण झाले असेल तर) धुणे. एरवी फडक्याने पुसून घेणे.
३. पिण्याचे पाणी सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तासच सोडणे.
४. बोरवेलचे पाणी आधी सदासर्वकाळ चालू होते. ते आता सकाळी-संध्याकाळी काही तास सोडण्यात येते.
५. प्रांगणातले लॉनसाठी आता पाणी न वापरणे. पाऊस पडल्यावर त्याची डागडुजी करण्यात येईल.

सध्या या मुद्द्यांवर तरी सगळ्यांचे एकमत होऊन (!) ते अंमलात आणले गेले आहेत.
दुसरे म्हणजे, सदासर्वकाळ सढळ हस्ते पाणी वापरायची सवय असल्यावर हे वरचे उपाय सुरुवातीला फार कोंडमारा करणारे वाटले तरी ते तितके गैरसोयीचे अजिबात नाहीत, हे तीन चार दिवसांतच लोकांच्या लक्षात आले.

atishay uttam Gajanan!
Hyabarobarach utaNe, reethaa, shikekai sarakhe upay amalat anata yetat ka te paha.

हे सगळे तुम्ही एक रॅशनल माणूस डोळ्यांसमोर ठेवून लिहिले आहे. आम्ही ईरॅशनल आहोत आमच्याशी कसे अर्ग्यू करणार तुम्ही?
शहरात नगरसेवकच चालवतो टँकर लॉबी चालवतो, व्यासपीठांवर आम्ही ह्या असामीचा त्याच्या नागरिकांप्रती कार्यासाठी सत्कार करून त्याला बिसलरीचे पाणी पाजतो.
समुद्राची सॅलिनिटी.. बापरे, सकाळच्या मिसळीच्या तर्रीमध्ये मीठ कमी आहे ह्याच्याऊप्पर विचार करायला आम्हाला वेळ आहे का?
आयपीएल ला आम्ही पाणी नाही म्हणणार, बीसीसीआयवर खाजगी बैठकीत कोरडे ओढणार, पण आयपीएल झालीच तर आम्ही रोज सामने बघणारंच, टीआरपी वाढवणारंच आणि पाणी नाही तर मैदानात जावुन कोक पिऊ.

ईरॅशनल वागणे हा आमचा जन्मसिद्ध हक्कं आहे आणि आम्ही तो बजावणारंच.

हायझेनबर्ग, तुम्ही म्हणता ते खरं असलं तरीही प्रत्येकानं आपल्या परीन प्रयत्न केलेच पाहिजेत. तो नाही करत तर मी का करू म्हणण्यापेक्षा मी करेन असं अनेक जण म्हणतात तेव्हा गोष्टी होतात.
माझ्या घरातले लोक उटण वापरायला तयार नव्हते. मी सुरुवात केली.. ते बंद पडलं .. मग पुन्हा सुरुवात केली.. आता अंगवळणी पडलय. हळूहळू बघून बघून घरातलेही तयार होतायत, मधेमधे उटण वापरताहेत. होतील ते ही तयार.
जे आपल्याला पटलय ते करण्याचा प्रयत्न करत रहाण महत्त्वाचं.

हा संघर्ष स्वतःशीही असतो.. स्वतःला बदलणं सगळ्यात अवघड! तत्त्वानुसार वागण्याचा प्रयत्न ट्प्प्याटप्यात करत रहायचा.. धडपडलो तरी उठून पुन्हा प्रयत्न करायचा..

नानबा लेख आवडला आणि एक मुद्दा सोडुन बाकी सगळे मुद्दे पटले
पाण्याबाबत नैसर्गिक संसाधन "तयार करणं" आपल्या हातात नाही हा मुद्दा पटला नाही. आणि त्यासाठी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया चे उदाहरण योग्य नाही. ह्या युगात कितीतरी देश असे आहेत की त्याचाकडे १००% पाणि आयात होते किवा समुद्रासारख्या अनैसर्गिक सोत्रा पासुन तयार होते किंवा रिसायकल केले जाते.
उदाहरण द्यायचे झाले तर सिंगापुर चे घ्या. ह्या देशाकडे स्वताचा पाण्याचा साठा नाही. त्यानी १९६१ मध्ये मलेशियाशी ३ सेंट (४५ पैसे) प्रती १००० लिटर नी १००% पाण्याची गरज भागवण्याचा १०० वर्षासाठी करार केला . १० वर्षापुर्वी मलेशियानी हा करार २०६१ नंतर चालु ठेवण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे सिंगापुर ने समुद्राचे पाणि आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळे अत्ता साधारणतः ७५% पाणि मलेशियातुन येते. जर २०६१ नंतर कराराचे नुतनीकरण न झाल्यास १००% पाणि हे समुद्राच्या आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन येईल.
भारताच्या लोकसंखेच्या गरजे नुसार समुद्राचे आणि सांडपाणि शुद्धीकरण करुन वापरणे ही काळाची गरज आहे.

हे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात, ह्याबद्दल थोडस लिहाल का?
ऑईल हा स्त्रोत वापारात येत असेल तर तो किती वर्ष पुरणार्‍ आहे हा महत्त्वाचा मुद्दा बघितला पाहिजे

http://www.pub.gov.sg/water/newater/newatertech/PublishingImages/Reverse...

ह्या सरकारी साईट वर माहिती आहे. आजुन काही खाजगी कंपन्या पण ही काम करतात ते कोणती टेकनिक वारतात त्याबद्दल कधी अभ्यास केला नाही.

सुंदर, अभ्यासपूर्ण लेख नानबा. साहिल शहा ह्यांच्या प्रतिसादातली माहितीही खूप आवडली.

मला एक मुद्दा सुचला म्हणजे उटणं, रीठा, शिकेकाई इत्यादी बायोडिग्रेडेबल (?) उत्पादनं वापरा हा उपाय पटण्यासारखा आहे पण कदाचित (आणि मी अमेरिकेत रहाते तेव्हा इकडच्या लाइफस्टाईल ला अनुसरून बोलते आहे) परवडण्यासारखा असेलच असं नाही कॉमन मॅन ला.

हायझनबर्ग ह्यांच्या पोस्ट मधला उपहास सोडला तर कॉमन मॅन ला सहज सुलभ रित्या असे बदल कसे करता येतील त्यांच्या जीवनसरणीत ह्याबद्दल विवेचन करणारे लेख आणि अवेअरनेस ह्यांची गरज आहे. जिज्ञासा ने असा एक थ्रेड चालू केला होता पुर्वी पण शेवटी प्रश्न हाच येतो की सध्या जेव्हढा खारीचा वाटा उचलणं शक्य आहे तेव्हढंच केलं जातं.

मराठवाडा तहानेला असतांना, पाण्यासाठी सणावर, खेळावर टिका होत असतांना,

बाळासाहेब थोरात यांनी जायकवाडीतुन कालवा टाकुन स्वतःच्या शेतीला पाणी पळवले, - ABP माझा न्युज.

आपण बसतो हे बंद, ते बंद करा, बादलीत आंघोळ करा, अर्धा ग्लास पाणी द्या.

जय श्रीराम

साहिल ह्यांच्या पोस्ट च्या अनुशंगानं :
सिंगापूर आणि भारताची तुलना होउ शकत नाही .
१. भारताचे क्षेत्रफ़ळ 3.288 million km² सिंगापॊरचे क्षेत्रफ़ळ 719.1 km²
२. भारताची लोकसंख्या 1200 million सिंगापॊरची लोकसंख्या 5.54 million
३. वरच्या दोन मुद्द्यांवरून भारतात पाण्याची गरज किती जास्त प्रमाणात आहे आणि ते किती मोठ्या प्रमाणावर/एरीयात पुरवावे लागेल ह्याची कल्पना येईल.
४. पाणी आयात केल्यास शेजारील देशावरची डिपेंडंसी वाढेल. आपले आपल्या शेजार्यांशी असे संबंध आहेत का?
५. आपल्या शेजार्यांची स्वत:चीही अवस्था ह्या बाबतीत बिकट आहे. त्यामुळे ही पाणी आयात शक्या नाही
६. सिंगापूर कुठल्याही प्रकारचे पोल्युशन पिण्याच्या पाण्यात जाउ देत नाही . हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होणं गरजेच आहे. पण सध्या एकंदरच आनंद आहे. मुठेच्या पोल्युशन मधले ७०% पोल्युशन घरातून जाणार्या सांडपाणी , साबणं ह्यामुळे आहे. हे रोखणं आपल्याला शक्य आहे. ७ सिंगापूर च्या एकूण पाण्यापैकी फक्त १०% पाणी खाऱ्या पाण्यातून येते , तेच प्रमाण आपल्या लोकसंख्येला लावल्यास अजून कमी होईल
8. येवढ्या मोठ्या प्रमाणावर खारं पाणी गोडं करण practically शक्य आहे का ते ही बघितलं पाहिजे
८. सिंगापॊरचा नाईलाज आहे कारण त्यांच्या कडे फ्रेश पाण्याचे स्त्रोत नाहॆत. आपल्याकडे नियोजनाची आणि नियंत्रणाची गरज आहे. रोग वेगळा आणि इलाज वेगळा असं नको व्हायला

नानबा उटण शिकेकाई रिठा वापर करण्याच्या सल्ल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
कपडे धुण्यासाठी काही असच बायोडिग्रेडेबल / रसायन विरहीत वापरता येईल का?

राजेश्वर नक्की जायकवाडीतुन पाणी घेतलय का? तुम्हाला नक्की माहीत आहे ना जायकवाडी कुठय आणि थोरातांच गाव कुठ आहे ते?

नानबा, रीठा, उटणे वगैरे रोजच्यासाठी वापराचा पर्याय खरेच चांगला आहे. धन्यवाद. त्याची सहज उपलब्धता चाचपून बघायला हवी. पूर्वी केसांकरता शांपू/साबणाऐवजी दादरच्या एका आयुर्वेदिक दुकानातून रीठा, शिकेकाई यांची भुकटी आणली जायची. अर्धे सदस्य ती वापरायचे. आता तिकडे जाणे होत नाही / आवर्जून जावे अशा टप्प्यात ते येत नाही. त्यामुळे ते बंद झाले. सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस हे पर्याय वापरायचे, अशी सुरुवात करण्यासारखे आहे.

सिंगापूर कुठल्याही प्रकारचे पोल्युशन पिण्याच्या पाण्यात जाउ देत नाही . <<< तिथे सांडपाण्याची व्यवस्था कशी केली जाते?

नानबा - ह्या धाग्याबद्दल आभार

गजानन - माझ्या माहितीनुसार आपल्याकडची कुठलिही व्यवस्था / तंत्रज्ञान जगापेक्षा खूप मागास / कमी प्रतीची वगैरे नाही. राबवणे / अंमल्बजावणी ह्यात फरक आहे.
वापरून झालेल्या पाण्याच्या विसर्जनाबाबत आपले बरेच कायदे नियम देखिल यथायोग्य आहेत ( अगदीच कालबाह्य झाले नाहीयेत)

पण हा पण आडवा येतो नेहेमीच Sad

उत्तम, अभ्यासपूर्ण लेख.

आणखी काही मला सुचलेले उपायः

१. रेन वॉटर हार्वेस्टींग - सरकारने नविन इमारतींकरता सक्तीचे केले आहे. पण जुन्या इमारतींनी पण आपली जबाबदारी ओळखून करून घ्यायला हवे. लोकांची जमीनीतून पाणी उपसण्याकरता पैसे द्यायची तयारी असते पण तो जलसाठा वाढवण्याकरता अगदी थोडासा अधिक खर्च करायची तयारी नसते. मला अगदी माझ्याच सोसायटीत हा अनुभव आला आहे.

२. आपल्या देशात पिण्याचे पाणी फार स्वस्त मिळते. जर ते अधिक महाग केले तर सहाजीकच त्याचा वापर जबाबदारीने होईल. हा उपाय थोडासा ट्रीकी आहे (पाण्याची तस्करी, पाइपलाईन तोडणे इ. घडू शकते) पण नीट अंमलबजावणी केली तर अशक्य नक्कीच नाही.

राजेश्वर नक्की जायकवाडीतुन पाणी घेतलय का? तुम्हाला नक्की माहीत आहे ना जायकवाडी कुठय आणि थोरातांच गाव कुठ आहे ते?
>>>
चुक होऊ शकते,, पण पाणी पळवले, ही न्युज होती

माझाच्या बातमीनंतर जायकवाडीतील पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, बातमीनंतर अवघ्या 3 तासात प्रशासनाकडून दखल - ABP MAZA

Will try to write on chemical free living based on what I am following and what I know can be done in 1-2 weeks.

उत्तम पोस्ट नानबा!!
खालच्या चर्चेत सिंगापूर वगैरे वाचून गल्ली चुकतो आहोत असे वाटले. उर्जा आणि पैसा या दोन्हीचा तुटवडा हा आपला मुख्य प्रश्न आहे. उर्जेच्या तुटवड्यामुळे आणि ढिसाळ वितरणव्यवस्थेमुळे आहे ते पाणीसुद्धा लोकांपर्यंत जात नाहीये. एका रिपोर्टनुसार फक्त मराठवाड्यातील धरणांमध्ये आता २७२ मिलिअन क्युबिक मीटर 'लाइव्ह वॉटर' आहे. त्याला मराठवाड्याच्या २ कोटी लोकसंख्येने भागले तरी आकडा येतो माणशी १३५०० लिटर. आता सगळी तूट धरून समजा आपण यातील ५००० लिटर जरी पोहोचवु शकलो तरी रोज २५ लिटर प्रमाणे २०० दिवस पुरवता येईल. त्यानंतर डेड वॉटरही आहेच. पण हे पोहोचत नाही.

हा आताचा तात्कालिक मुद्दा सोडून, महाराष्ट्रात सरासरी १००० मिमी पाऊस पडतो (कोकणात तर ३०००). महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे ३००००० चौ किमी. म्हणजे जवळ्जवळ ३*१०^११ घनमीटर= ३*१०^१४ लिटर पाणी निसर्ग आपल्यावर ओततोय. आपलीच ओंजळ गळकी आहे. मला वाटते की, आणखी पाणी 'तयार' करण्यापेक्षा (विकत घेणे, सांडपाणी/ समुद्रपाणी रिसायकल करणे इ इ पेक्षा) आहे ते पाणी साठवणे आणि पुरवणे याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.

अहो, गुगलमध्ये 'Traditional Water Conservation Methods in India' हे टाईप केल्यावर बरीचशी उत्तरे मिळतील. Happy
मा़झे म्हणणे आहे की सरकारसहीत सगळेजण मोठमोठाले प्रकल्प, धरणे यांचाच विचार करतात. प्रकल्प जितका मोठा, तितकी गळती जास्त आणि उपयुक्तता कमी. जायकवाडी धरणाचं उदाहरण समोर आहेच की. मराठवाड्याला पाणी मिळावं म्हणून ५००० कोटींचं धरण बांधलं, उपयोग शून्य. त्यात अजून पाण्याची आयात आणि समुद्रपाण्याचे शुद्धीकरण नको.

भुत्या +१ ..

काँग्रेस-राकॉं यांनी जलसिंचनासाच्या नावाखाली आपल्या तुंबड्या भरुन घेतल्या. त्यामुळे नविन मोठे प्रकल्प हाती न घेता गावपातळीवर पाणी साठवणे, त्याचा योग्य प्रमाणात विनियोग करणे असे प्रकल्प हाती घ्यावेत. जलयुक्त शिवार, शेततळी यांच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन करण्याची गरज यंदाच्या दुष्काळमुळे अधोरेखित झाली आहे.

ओंजळ गळकी आहे पण ती एवढी पण गळकी नाही की ती जर निट केली तर सगळी समस्या सुटेल. आणि जरी १००० मिमि सरासरी पाउस पडत असला तरी तो फक्त ३ महिने पडतो आणि त्यातिल बराच पाउस हा शेतात पडतो आणि पिकासाठी वापरला जातो ते पाणि कॅचमेंट साठी वापरता येत नाही.

महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी १.१*१०^७. समजा एका माणसाला १ दिवसाला १०० लिटर पाणि लागते तर १ वर्षाला ३६५०० लिटर. म्हणजे घरगुती पाणि ४.०१*१०^११ लिटर. एवढे पाणि जनरेट होउ शकत नाही ( शेती आणि उद्योग तसेच ठेवल्यास) . ह्याच कारणामुळे गेल्या ५० वर्षात जमिनिखालिल पाण्याचा साठा वापरला गेला . आता तो पण संपल्यात च जमा आहे.

या विषयावर सर्व जण विचार करताहेत ते फार छान.

अनेक वर्षांपासून ( खरे तर दशंकापासून ) गंगा कावेरी प्रकल्पाबद्दल बोलले जात आहे. पण कुणीही तो प्रकल्प अंगावर घेत नाही. कागदावर तरी तो चांगलाच वाटतो आहे. रस्ते होऊ शकतात तर कालवे का नाहीत ? रस्त्यासोबतच त्यांचा विचार होऊ शकतो.

नानबा, लेख आवडला आणि तू दिलेले प्रतिसादही!
समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण हा उपाय पर्यावरणदृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या बरीच किम्मत द्यावी लागणारा उपाय आहे. इस्राएल, सिंगापूर अशा देशांना दुसरा पर्याय नाही मात्र भारतासारख्या देशात आहे त्या पावसाच्या पाण्याची साठवणूक, नियोजन करणे, नद्यांचे स्वास्थ्य परत मिळवणे, पारंपारीक पद्धती आणि नवे तंत्रज्ञान याची सांगड घालणे यावर भर हवा. भारतात पाणी वितरणातली गळती देखील खूप होते आणि पाणी चोरीही.

Pages