'कोयने'ची स्वारी

Submitted by पराग१२२६३ on 26 March, 2016 - 07:10

सकाळी जरा लवकरच कोल्हापूरच्या स्टेशनवर पोहचलो होतो. रेल्वे फाटकाच्या बाजूने मुद्दामच स्थानकावर गेलो, म्हणजे कोयनेचा कार्य अश्व (इंजिन/लोको) दिसेल, असा विचार केला होता. मी पोहचायच्या दोन मिनिट आधी १७४११ महालक्ष्मी दोन नंबरवर आली होती. या गाडीने रेल्वेचा बडा अधिकारी कोल्हापुरात आला होता. त्यामुळे त्याच्यासाठीचा खास डबा महालक्ष्मीला सगळ्यात मागे जोडलेला होता. अधिकारी अजून डब्यातून उतरला नसला असावा. कारण त्या डब्याच्या दरवाज्याच्या आजूबाजूला अन्य अधिकारी आणि रेल्वे पोलिसांचा गोतावळा होता. ही गर्दी महालक्ष्मीतून उतरून रेल्वे फाटकातून रिक्षा/बस पकडण्यासाठी जात असलेल्या गर्दीच्या नजरेतून सुटत नव्हती. प्रत्येक जण उत्सुकतेने त्याकडे पाहत होता. दरम्यान, इकडे कोयनेच्या लोको पायलट्सची पूर्वतयारी सुरू झालेली होती, तर तिकडे तिसऱ्या फलाटावर हैदराबाद एक्सप्रेस तिची सुटण्याची पूर्वतयारी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता फक्त स्टार्टर सिग्नल ऑफ होण्याची वाट पाहत होती. मी काही क्षण महालक्षमीच्या त्या खास डब्याजवळ रेंगाळून कोयनेतील माझ्य़ा जागेवर जाऊन बसलो.

अप कोयना एक्सप्रेस असली तरी तिला सांगलीपर्यंत पॅसेंजरप्रमाणे ट्रीट केले जाते. कारण कोल्हापूर-सांगली दरम्यानच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या स्टेशनवर ती थांबते. म्हणूनच तिचे तिकीटही पॅसेंजरचेच घेतले जाते या दोन स्टेशन्सदरम्यान. मी माझ्या जागेवर बसलोच होतो, तेवढ्यात पलीकडच्या फलाटावरील हैदराबादच्या कार्य अश्वाची एक दीर्घ गर्जना ऐकू आली. नियोजित वेळ झाल्याने पुण्याहून सेक्शन कंट्रालरने हैदराबाद एक्सप्रेसला निघण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे ती निघत असल्याचा तो संकेत होता. तिकडे महालक्ष्मी मोकळी झाली होती, अधिकारीही बाहेर गेले होते आणि तिकीट तपासनीस जाता-जाता फलाटावर असलेल्या लोकांची तिकिटे तपासून गेलेले मी माझ्या खिडकीतून पाहिले. अशा प्रकारे कोल्हापूरच्या स्टेशनवर तिकीट चेकींग सुरू असल्याचे मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. त्यानंतर मीही जरा खाली उतरून कोयनेची तयारी पाहत होतो. आता कोयनेची वेळ होत होती. त्यामुळे स्टेशनवर आणि गाडीत एकीकडे प्रवाशांची लगबग सुरू होती, तर दुसरीकडे रेल्वेचे कर्मचारीही हैदराबाद एक्सप्रेसकडून कोयनेच्या बाजूला आले होते. आदल्या रात्री कोल्हापुरात आलेली ११०२९ डाऊन कोयना आज ११०३० अप कोयना म्हणून निघणार होती. रात्री सुरू झालेली कोयनेची संपूर्ण तपासणी (इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल), पाणी भरणे वगैरे सर्व कामे पिट/वॉशिंग लाईनवर पहाटेपर्यंत आटोपली होती. त्यामुळे कोयनेच्या नियोजित (म्हणजेच आदल्या रात्री डाऊन कोयना आणलेल्या) कार्यअश्वाकडेच आजच्या अप कोयनेची जबाबदारी होती. तास-दीडतास आधीच या अश्वाने शंटर पालयटच्या मदतीने कोयना एक नंबरवर आणून उभी केली होती. तो शंटर पालयट (शंटींग करणारा चालक) या गाडीला त्याच्या अश्वासकट तेथे सोडून दुसऱ्या इंजिनात ड्यूटी करण्यासाठी निघून गेला होता. त्यानंतर कोयनेवर ड्यूटीवर असलेल्या गार्ड आणि चालकाचे बॉक्सेस बॉक्स बॉयने ट्रॉलीवरून शेवटच्या डब्यातील गार्डच्या केबिनमध्ये आणि इंजिनामध्ये ठेऊन दिले होते. वाटेत गाडीला अपघात झाला किंवा काही अडचणी आल्या त्यावेळी उपयोगी पडतील अशी आवश्यक साधने सर्व गाड्यांच्या मुख्य चालक आणि गार्डच्या या बॉक्सेसमध्ये उपलब्ध असतात. फ्लेअर्स, टॉर्च, दिवस व रात्रीसाठीचे हॅंड सिग्नल्स, छोटी स्फोटके इत्यादी.

काही वेळातच गाडी सुटायच्या पाऊणतास आधी कोयनेवर ड्यूटीवर असलेल्या लोको पायलट (मेल) आणि असिस्टंट लोको पायलटने आमच्या गाडीच्या हुबळीच्या डब्ल्यूडीपी-४ (क्र. २००२६) या कार्यअश्वाचा ताबा घेतला. आमच्या गाडीसाठी पुण्याला वाहतूक विभागातच असलेल्या पॉवर कंट्रोलरने इंजिनाची आणि या लोको पायलट्सची नेमणूक केली होती. मुख्य लोको पायलटने इंजिनात चढण्याच्या या अवजड अश्वाला नमन केले, तोपर्यंत असिस्टंटने आपली बॅग केबीनमध्ये ठेऊन इंजिनाचे ब्रेक प्रेशर, फ्युअल लेव्हल आणि इंजिनाच्या ठराविक भागांची तपासणी करून या अश्वाची तब्येत ठणठणीत असल्याची खात्री करून घेतली. मुख्य लोको पायलटनेही इंजिन आणि डब्यांना जोडलेले कपलिंग आणि ब्रेक पाईप्स व्यवस्थित बसल्याची खात्री करून घेतली. त्याआधी या दोन्ही लोको पायलट्सनी ड्यूटी जॉईन करण्याआधी दोन नंबरच्या फलाटाच्या शेवटी असलेल्या लोको पायलट लॉबीत हजेरी लावली होती. तेथे त्यांना ब्रेथ लायजरची चाचणी द्यावी लागली. त्यामुळे दोघांनीही गेल्या दीड दिवसात अल्कोहोलचे (मद्याचे) सेवन केले आहे की नाही याची खातरजमा होणार होती. जर त्यात त्यांच्यापैकी एकानेही मद्यसेवन केल्याचे आढळले असते, तर त्याला ड्युटी देण्यात आली नसती. मात्र असे होण्याचे प्रकार तसे नगण्यच आहेत. हे झाल्यावर त्यांच्या मस्टरवर सह्या घेतल्या जातात आणि मग लोको पायलट लॉबीत ठेवलेल्या सेक्शन इंजिनियरने ठेवलेल्या नोंदींच्या फायलींवर त्यांनी नजर टाकणे आवश्यक असते. कारण पूर्ण सेक्शनमध्ये आज कुठे कामे सुरू आहेत, कुठे वेगमर्यादा घालण्यात आल्या आहेत इत्यादींची माहिती त्यातून त्यांना मिळत असते. त्यानंतर हे दोघेही कोयनेची जबाबदारी घेण्यासाठी आले होते. ड्यूटीचा चार्ज घेण्याआधी गार्डलाही हे सर्व करावे लागते.

कोयनेच्या मुख्य चालकाने केबीनमध्ये बसल्यावर त्याच्याकडे आलेल्या कॉशन ऑर्डर्सवर नजर टाकली. या ऑर्डर्स पुण्याला असलेल्या सेक्शन कंट्रोलरकडून आलेल्या होत्या. त्याद्वारे गाडीच्या वेळापत्रकातील तात्पुरते फेरबदल आणि अन्य बाबींची माहिती त्यात असते. त्याबरोबर प्रवासादरम्यान संबंधित संपूर्ण सेक्शनसाठी लागू असलेले वर्किंग टाईमटेबल प्रत्येक लोको पायलट, गार्डकडे दिलेले असते. त्यात प्रत्येक किलोमीटरचा हिशेब जसे, प्रदेशातील उंच-सखलपणा, त्यावर पाळायच्या वेगमर्यादा इत्यादी बाबी दिलेल्या असतात. तोपर्यंत एक पॉईंटस्मन कॅरेड अँड वॅगन डिपार्टमेंटकडून आलेले ब्रेक पॉवर सर्टिफिकेट घेऊन येत असल्याचे दिसले. मग मी माझ्या डब्याकडे परत गेलो. माझा डबा शेवटी-शेवटी असल्यामुळे आणि फलाट वक्राकार असल्यामुळे तिथे गार्डची तयारी मला माझ्या सीटच्या खिडकीतूनच पाहता येत होती. त्याच्या लाल गोल पार्श्वभूमीवर एलव्ही असे लिहिलेली चकती त्याने आपल्या डब्याच्या मागे अडकवली होती. ज्यामुळे प्रवासादरम्यान चुकून मागच्या बाजूने दुसरी गाडी किंवा इंजिन त्याच लाईनवर आले तर त्या चालकाच्या लक्षात येईल की ही गाडी लोडेड आहे. मग त्यालाही कॉशन ऑर्डरवर नजर टाकून घेतली होती.

प्रत्येक डब्यात येऊन इलेक्ट्रीकल विभागाच्या कर्मचाऱ्याने आधीच पंखे आणि लाईट सुरू असल्याची खात्री करून घेतली होती. आमचा डबा २०११ मध्ये तयार केलेला होता आणि या महिन्यातच त्याला पीओएचसाठी (पिरिऑडीकल ओव्हरहॉल) त्याच्या नियोजित कोचिंग डेपोत न्यावे असे सांगणारी तारीख त्याच्यावर चिकटविण्यात आली होती. अखेर कोयनेची वेळ होताच स्टेशन मास्तरला पुण्याच्या वाहतूक विभागातील सेक्शन कंट्रोलरने गाडीला सोडण्याची परवानगी दिली आणि स्टेशन मास्तरने पुढच्या गूळ मार्केटच्या स्टेशन मास्तरकडून ब्लॉक इंस्ट्रुमेंटच्या मदतीने इलेक्ट्रॉनिकरित्या लाईन क्लिअर घेतली. त्यानंतर स्टार्टर आणि ॲडव्हान्स स्टार्टर ऑफ झाले आणि गार्डने हिरवा बावटा दाखविल्यावर कोयनेने आपला प्रवास सुरू केला. त्यावेळी फलाटाच्या शेवटी असलेल्या रोलिंग-आऊट हटमधून कर्मचारी कोयनेच्या चाकांवर अखेरची नजर टाकत होते.

मजल-दरमजल करत गाडी जयसिंगपूरला आली. तोपर्यंत रोज अप-डाऊन करणाऱ्यांची गर्दी गाडीत वाढलेली होती. आमचा रिझर्वेशनचा डबा असला तरी सांगलीपर्यंत ही गाडी पॅसेंजरच असल्याने एसी व्यतिरिक्त अशा प्रवाशांना आरक्षित डब्यात येण्यास कोणताही प्रतिबंध नव्हता. जयसिंगपुरात नेहमीपेक्षा जास्त वेळ म्हणजे तब्बल २३ मिनिटे कोयना डिटेन करण्यात आली. कारण मिरजेहून इथे रोज ८.४५ ला येणारी ५१४४१ डाऊन सातारा-कोल्हापूर पॅसेंजर लेट होती आणि तिला मिरजेहून जयसिंगपूरला येण्यासाठी आम्ही येण्याआधीच लाईन क्लिअर दिली गेली असल्यामुळे आम्हाला तिथे थांबण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. त्यामुळे या नियोजनात सेक्शन कंट्रोलर गडबडल्यासारखे वाटले. नाहीतर आम्हाला इथे २३ मिनिटे थांबवण्यापेक्षा त्याला जयसिंगपूरच्या स्टेशन मास्तरला कोयनेला लाईन क्लिअर देण्याची सूचना करता आली असती. परिणामी पुढच्या १०-१२ मिनिटांत कोयना मिरजेत पोहचली असती आणि असे करूनही पॅसेंजर याचवेळी इथे आली असती. अखेर ९.३० ला मिरजेत पोहचल्यावर गाडीतील बरीच गर्दी कमी झाली, पण नवीन आलेल्या प्रवाशांमध्ये आरक्षण असलेल्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने गाडीत गडबड कमी झाली.

मिरजेत आल्यावर एक फरक हल्ली जाणवत आहे. गाडीत किंवा खिडकीजवळ पाणी बाटलीवाले आणि वडापाववालेच प्रामुख्याने येतात. पूर्वीचे इडली-वडेवाले हल्ली दिसत नाहीत. फळविक्रेत्यांच्या गाड्याही कमी दिसताहेत. मिरजेत आम्ही आलो, तेव्हा पलीकडे २ नंबरवर मिरज-बेळगाव पॅसेंजर उभी होती. नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे जास्त थांबा घेऊन कोयना ९.४५ ला सुटली. मग कोयनेविषयीच्या जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. अलीकडे बरीच वर्षे कोयनेचे ट्रॅक रेकॉर्ड सुधारलेले आहे. गाडी फारशी लेट होत नाही. मात्र या दिवशी मी बऱ्याच वर्षांनी जुना प्रकार अनुभवत होतो की, मालगाडी आणि पॅसेंजरपासून कोणत्याही गाडीला मार्ग उपलब्ध करून द्यायचा असला तर कोयनेला बाजूला काढले जात आहे. नावात एक्सप्रेस असूनही प्राधान्यक्रमात तिची अवस्था पॅसेंजरपेक्षा दयनीय आहे. यावेळीही १६५०७ जोधपूर-बेंगळुरु सिटी जं. एक्सप्रेस मिरजेत आलेली दिसली नाही. म्हणून वाटले की, इतका वेळ त्या गाडीसाठीच आम्ही थांबलेलो आहोत. पण आमचीच गाडी निघाल्यावर लक्षात आले की, ती गाडी अजून लांब आहे. कदाचित सांगलीत क्रॉसिंग होईल, म्हणून मी सावधच होतो. कारण मिरजेकडून सांगलीत शिरताना मोठे वळण आहे आणि त्यामुळे सांगलीचे संपूर्ण स्टेशन नजरेच्या एकाच टप्प्यात येते. अशा वेळी आपली वळणारी कोयना आणि जोधपूर-बेंगळुरू सिटी एक्सप्रेस पाहण्याचा मोह मला आवरत नव्हता.

सांगलीत शिरत होतो, तेव्हा शेजारी गुड्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीच्या वाघिणी दिसल्या. तर समोर तीन नंबरवर एक ईएमडीचे डब्ल्यूडीजी-४ दिसत होते. त्याचवेळी अप बाजूने एक गाडी आत २ नंबरवर येत असलेली दिसली. कोयना आणि बेंगळुरू एक्सप्रेसच्या लागोपाठच्या हालचालींमुळे या दोन्ही गाड्यांना इथे फारवेळ थांबावे लागले नाही. मात्र त्याचवेळी तीन नंबर वर स्टार्टर ऑफ होण्याच्या प्रतीक्षेत एकटेच उभे असलेले पुण्याचे डब्ल्यूडीजी-४ जणू स्मितपणे या हालचाली न्याहाळत होते. त्याच्याकडे नीट पाहिल्यावर लक्षात आले की, कोयनेपाठोपाठ तेही पुण्याकडे एकटेच (लाईट) जाणार आहे. कदाचित ते सांगलीच्या गुड्स यार्डात उभी असलेली मालगाडी घेऊन ते आले असावे आणि पुण्यामध्ये येत्या एक-दोन दिवसांमध्ये इंजिनांची कमतरता भासेल हे लक्षात घेऊन पॉर कंट्रोलरने हे इंजिन परत पुण्याकडे पाठविण्यास सांगितले असेल.

हल्ली कोल्हापूरहून कोयनेनं प्रवास करताना सांगली आले म्हटले की, धडकीच भरू लागली आहे. तशी सांगलीकरांची कोयनेला चांगली पसंती आहे. त्यामुळे सांगली आले की, गर्दी एकदम आत शिरते. त्यात मग त्यांचे वेगवेगळे आसन क्रमांक आल्यामुळे ते एकत्र बसण्यासाठी इतर प्रवाशांना जागा बदलण्यासाठी गळ घालू लागतात. मीही त्याचा अनुभव घेतला आहे. पण यावेळी तसे झाले नाही. नशीब बलवत्तर म्हणून आजूबाजूला २०-२२ वर्षांचे तरुणच आले. त्यामुळे सीट एक्सचेंजचा प्रश्नच आला नाही. पण संपूर्ण डब्यात इतर प्रवाशांचे मग चांगलेच कोणाची सीट कोणती आणि तुम्ही इकडे बसा, इथून उठा वगैरे वाकयुद्ध रंगले होते. मात्र हे युद्ध बरेच लवकर संपले. आजच्या हायटेक युगातील युद्धे अशीच अल्पकाळ असतील असे सामरिकशास्त्राच्या तज्ज्ञांकडून सांगितले जात आहेच. सांगलीतून निघाल्यावर नांद्रे क्रॉस केले आणि देशातील दुष्काळाची छटा पाहायला मिळाली. एरव्ही बंधाऱ्यावरून खळखळून वाहणारी येरळा नदी आज मात्र कोरडी ठणठणीत होती.
Yerala River, Nandre, 25-3-16.jpgएकीकडे वाढत्या उन्हाच्या झळा गाडीतही जाणवत होत्या आणि दुसरीकडे डोळ्यांना सुखावणारे हे चित्रही रुक्ष झालेले होते. नांद्रे जरा दमानेच क्रॉस केले. स्टेशन मास्तर लोको पायलट्स आणि गार्डबरोबर सिग्नल एक्सचेंज करत असताना पाहून एक खात्री पटली की, गाडी थांबणार नाही आहे. मग लक्ष गेले की या स्टेशनमध्ये रुळांखालच्या स्लीपर्सचे काम नुकतेच झालेले आहे. त्यामुळे तेथे वेग कमी ठेवण्यात आला होता. लोको पायलटला याची सूचना कोल्हापुरातच मिळालेली होतीच. त्यामुळे तोही सावध होता.

आता चेकर तिकीटे तपासायला आला. आज त्याचा मूड काही वेगळाच होता. प्रत्येकाकडे तो तिकिटाबरोबरच आयडी प्रुफ मागत होता. मग माझ्या पुढे बसलेल्या आजींकडे आयडी प्रुफ नव्हते. ते पाहून तो म्हणाला की, ७७० रु. दंड भरा. आजी मनातून घाबरल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही की, त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मग आजूबाजूच्या प्रवाशांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. एकाने आयडिया दिली की, एसएमएस करून मोबाईलवर आधार कार्डची माहिती मिळते ती टेकरला दाखवूया. पण चेकर म्हणाला की, सॉफ्ट कॉपी नाही चालणार, हार्ड कॉपी दाखवा.

किर्लोस्करवाडीत आलो तोवर सांगलीकरही आपापल्या जागांवर स्थिरावले होते. अजूनही कोयना थोडी लेटच धावत होती. त्यातच महाराष्ट्र पलीकडे न दिसल्याने धाकधूक वाढली. वाटले आता महाराष्ट्रसाठी कोयना डिटेन होते की काय. पण गाडी थांबली तेव्हा बाहेरची उद्घोषणा ऐकू येऊ लागली की, महाराष्ट्र लेट आहे. मग हुश्श झाले. तेवढ्यातच पलीकडे कोयनेला मार्ग देण्यासाठी किर्लोस्करवाडीत थांबवून ठेवण्यात आलेली एक बीआरएन आणि बोस्ट प्रकारातील वाघिण्यांची मालगाडी धड-धड-धड-धड असा वाघिण्या ओढल्या जात असतानाचा टिपिकल आवाज करत वेग घेत मिरजेच्या दिशेने निघून गेली. त्याधी त्याच्या डब्ल्यूडीजी-४ कार्यअश्वाने टिपिकल मोठ्या आवाजात गर्जना केली होतीच. ही गाडी पुढे कर्नाटकात जाणार होती. पण त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जाणार असलेली बीसीएन वाघिण्यांची मालगाडी कोयना आणि नंतर महाराष्ट्र अशा दोन्ही गाड्यांसाठी रोखून धरण्यात आली होती. हेही नियोजन पुण्याहून सेक्शन कंट्रोलरनेच केले होते. किर्लोस्करवाडी सोडताना कोयनेतील काही बदल नजरेस पडले. माझ्या कोयनेबरोबरच्या आजवरच्या वाटचालीत हे बदल पहिल्यांदाच दिसत होते. एक म्हणजे मिरज येऊन गेले तरी अजूनही गाडीत विक्रेत्यांची संख्या अतिशय तुरळक दिसत होती. दुसरा बदल म्हणजे गाडीत नेमलेला ऑन-बोर्ड हाऊसकिपींग स्टाफ. हा स्टाफ वरवर का असेना पण गाडीचे फ्लाअरींग पुसून गेला. त्यांनी माझ्या शेजारच्या तरुणांकडून फीडबॅक भरून घेतला. आणि तिसरा बदल म्हणजे पुण्यापर्यंत चेकर गाडीत सतत फिरत होता आणि आरक्षित प्रवाशांनाच आत येऊ देत होता.

पुढे ताकारीला अधिकृत थांबा घेताना तिथे कृष्णराजपुरमच्या दोन डब्ल्यूडीएम-३ए कार्यअश्वांसह उभी असलेली ११०४० महाराष्ट्र दिसली. आम्ही आत आल्याबरोबर तिला लाईन क्लियर मिळाली. सध्या इलेक्ट्रॉनिक ब्लॉक सिस्टीममुळे गाड्यांची हालचाल झटपट झाली आहे, ती अशी. महाराष्ट्र आज डबल-हेडेड पाहून मनात एका क्षणात अनेक विचार येऊन गेले, अगदी न्यूज चॅनेल्सवरच्या अँकर्ससारखे. जसे, अरेच्या महाराष्ट्रचे इंजिन फेल झालेले आहे वाटतं. म्हणूनच गाडी लेट दिसत आहे. पण पुढे गेल्यावर लक्षात आले की दोन्ही कार्य अश्व ठणठणीत बरे आहेत. मग वाटले आज जादा डबे आहेत वाटतं. पण डब्यांमध्ये काहीच फरक दिसला नाही. मग शेवटी एक विचार आला की, आता गरज नसताना पुणे विभागाच्या सांख्यिकी नोदींमध्ये यांची नोंद असिस्टींग रिक्वायर्ड ट्रेन इंजिन अवर्समध्ये करावी लागणार. पण काही म्हणा कृष्णराजपुरमचे ते गडद निळ्या-आकाशी रंगसंगतीतील दोन्ही चकचकीत अश्व मस्त फ्रेश दिसत होते. आज मसूरलाही आम्ही आल्याबरोबरच पुढच्या अर्ध्या मिनिटातच तिथे रोखून धरलेली बीआरएन वाघिण्यांची मालगाडी तसाच टिपिकल धड-धड-धड-धड आवाज करत मिरजेच्या दिशेने गेली.

पुढे कोरेगावला त्या आजींचे तिकीट घेऊन गेलेला चेकर पुन्हा आला आणि आजींकडे दंडाची मागणी करू लागला. दरम्यान सातारा आले होते. स्टेशनमध्ये शिरतानाच एका पॉईंटवर पिकिंग अप स्लॅक्स काम सुरू असल्याचे दिसले. म्हणजे दोन मार्ग जोडणाऱ्या सांध्यांची संपूर्ण, अगदी खडीसकट डागडुजी चालू होती. साताऱ्यात फलाट एकवर कोयना थांबली आणि लगेचच वारकऱ्यांच्या वेषातील २७ जणांचा (चेकरनेच मोठ्याने त्यांची संख्या मोजली होती) गट आत आला. चेकरलाही आधी शंका आली. पण ते सगळे आरक्षण असलेले प्रवासी होते. तोपर्यंत आज शुक्रवार असल्याने १२१४८ निझामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेसचे क्रॉसिंग येथे होणार होते. तेवढ्याच पुण्याच्या दिशेने जोरात आवाज करत एक गाडी तिसऱ्या क्रमांकाच्या फलाटाकडे येत आहे असे लांबून जाणविले. पण तिची गर्जना ऐकून ही कोणती गाडी असे क्षणभर वाटले. कारण तिची गर्जना अशी चालली होती की, जशी ती २२६८६ किंवा १२६३० या कर्नाटक संपर्क क्रांत्यांसारखी ती असावी आणि तिला नॉन-स्टॉप पुढे जायचे आहे. समोर आल्यावर पाहिले, तर ती १२१४८ च होती. पण फलाट आला तरी तिचा वेग पाहून मनात विचार आला की, काय आज हिला साताऱ्यात थांबायचे नाही वाटतं. पण पुढच्या पाचच सेकंदात एकदम वेग कमी करत ती गाडी तिथे थांबली. यानंतर कोयना हलल्यावर त्या वारकऱ्यांकडून एकच - पुंडलिक वरदे हरी विठ्ठल - असा जयघोष झाला.

साताऱ्यानंतर चेकरची पुन्हा नव्याने आलेल्यांबरोबर आयडी प्रुफवरून वादावादी सुरू झाली. त्यामुळे आज कोयनेचा आतला महोल काही औरच वाटत होता. पळशीला गुत्तीच्या बीसीएनएचएस वाघिण्यांच्या मालगाडीला वाट करून देण्यासाठी आम्ही लुपवर गेलो. आता गाडीत भळवाले, भजी-वडापाववाले, चहावाले, कोल्डड्रींक-चणेफुटाणेवाले यांची वर्दळ बरीच वाढली होती. कारण साताऱ्यात निजामुद्दीनमधून हे विक्रेते परत पुण्याच्या दिशेने कोयनेत चढले होते.

वाठारला एक गडबड झाली. इथे स्टेशन मास्तरचे नियोजन जरा चुकले. का माहीत नाही, त्याने नेहमीप्रमाणे आमची कोयना एक नंबर घेतली. पण इथे पुणे-कोल्हापूर पॅसेंजरचे नियमित क्रॉसिंग होण्याची शक्यता दिसत नव्हती. कारण पलीकडच्या दोन नंबरच्या फलाटावर पुण्याकडे जाणारी बीसीएन वाघिण्यांची मालगाडी आमच्यासाठी रोखून धरली होती. मग वाटलं की, पॅसेंजर कदाचित लेट असेल. कोयनेनंतर ती येणार असेल. तेवढ्या पुण्याच्या डब्ल्यूडीएम-३डी या भगव्या-पिवळ्या रंगातील अश्व पॅसेंजरला घेऊन मधल्या, मेन लाईनवर उभा राहिला. यामुळे माझ्या जवळच्या डब्यातून त्या गाडीतील प्रवाशांची तारांबळ दिसत होती.

आता प्रवासातील पहिला घाट सुरू होणार होता. 11030 heading twrds, 25-3-16.jpgआदर्की स्टेशनच्या आधीची धोकादायक वळणे घेत असतानाच एका वळणावर मला आदर्कीचा डिस्टंड डबल-यलो दिसला. आता म्हटलं कोणाचं क्रॉसिंग. आज कोयनेनं आपलं जुनं रुप पूर्णपणे दाखवून द्यायचा चंग बांधला आहे काय असं वाटलं. पण ही सर्व क्रॉसिंग पुण्याहून सेक्शन कंट्रोलरने दिलेल्या निर्देशांनुसारच होत होती. डिस्टंटनंतर होम पिवळा होता आणि शिवाय त्याचे उजव्या फाट्याचे लाईट्स लागलेले होते. म्हणजेच गाडी फलाटावर जाणार होती. मग म्हटले खरेच कोयना इथे डिटेन होणार वाटत. तेवढ्यात मेन लाईनवर मिरजेकडे जाणाऱ्या टँकर वाघिणींसह उभ्या असलेल्या गुत्तीच्या ईएमडीच्या डब्ल्यूडीजी-४ या दोन कार्यअश्वांची धडधड पलीकडून हळूच कानावर आली आणि मग हुश्श वाटलं. आदर्की ओलांडल्यावर आम्ही बोगद्यातून यू-टर्न घेऊन पुढे जातोय, तोच तिकडून ती मालगाडीही पुढे निघाल्याचे दिसत होते. यू-टर्नमुळे खरंच असं भासत होतं की, या दोन्ही गाड्या एकाच दिशेनं निघाल्या आहेत.

आता पुन्हा लोणंदला मालगाडीसाठी डिटेन झालो. पण फार वेळ नाही. दुपारी २.२२ वाजता वाल्ह्याला आलो तेव्हा परत १० मिनिटं होम सिग्नलवर थांबलो होतो. कारण तिकडून डाऊन कोयना आत येत होती. ती लूपवर गेल्यावर आम्हाला लाईन क्लियर मिळाली. पुढे या प्रवासातला दुसरा घाट - शिंदवणे घाट ओलांडून खाली आलो. IMG_3153.jpgया घाटातच त्या आजींचे तिकीट घेऊन गेलेला चेकर परत आला आणि त्यांना सांगू लागला की, चला पुण्यात तुम्हाला पोलिसांकडे देतो. तुम्ही काही दंड भरत नाहीए. ता मात्र आजींचा चेहरा गंभीर होऊ लागला. मग माझ्या शेजारच्याने चेकरला समजावयाचा प्रयत्न केला की, अहो तुम्हाला या आजी चेहऱ्यावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमधल्या वाटतायत का. या तशा नाहीत वगैरे. तोही मिरजेपासून चेकरची बोलणी खात होताच.

घाट संपल्यावर पुढच्याच ब्लॉक स्टेशनमध्ये, शिंदवणेमध्ये मिरजेकडे निघालेली बीटीपीएन टँकर वाघिणींची मालगाडी काझीपेटच्या डब्ल्यूडीजी-४डी आणि डब्ल्यूडीजी-४ या इंजिनांसह मेन लाईनवर उभी होती. त्यामुळे शिंदवणेचा डीस्टंट डबल-यलो मिळाला आणि होम पिवळा. शिवाय डावीकडच्या फाट्याचे लाईट्स लागले होते. दरम्यान निऱ्यापासून गरमी वाढली होती, शिवाय पावसासारखे वाटत होते.

दुपारी ३.३० ला सासवड रोडला शेवटचे क्रॉसिंग पूर्ण करत धडाडत कोल्हापूर-पुणे पॅसेंजरला ओलांडले आणि घोरपडीला येऊन थांबलो. घोरपडीतून पुढे आल्यावर मालगाड्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी सोडण्याची तयारी सुरू असलेली दिसली. त्यापाठोपाठ पलीकडून ११३०२ अप उद्यानही पुण्यात शिरत असल्याचे दिसले. तेव्हाच मनात आले की, आता कोणाला प्राधान्य मिळणार. कारण दोन्ही गाड्या फलाटावर जाण्यासाठी एकमेकींचे मार्ग पुढे छेदणार होत्या. अखेर उद्यानलाच प्राधान्य मिळाले. दोन मिनिटे इंटरमिडीएट होमला डीटेन होऊन कोयना चार नंबरच्या दिशेने निघाली. मात्र आपली गाडी दुसऱ्या गाडीसाठी थांबवलेली पाहून आमच्या डब्यातून एका ज्येष्ठ नागरिकाची संतप्त प्रतिक्रियाही ऐकू येऊ लागली. त्या व्यक्तीचे असे म्हणणे होते की, अटलजींचे सरकार सगळ्यात चांगले होते. त्यांच्यावेळी एक्सप्रेसवे, हायवे झाले. पण राज्यातील राष्ट्रवादी आणि आताच्या सरकारच्या काळात कोणताही प्रश्न सुटलेला नाही किंवा सुटणारही नाही. अटलजींसारखे सरकार पुन्हा होणे नाही. मात्र डब्यातील अन्य लोकांच्या चेहऱ्यावर त्याबाबत फारशा प्रतिक्रिया दिसत नव्हत्या. कारण सगळे जण हे असच चालायचं असं मनातल्या मनात म्हणत पुण्यात उतरण्याच्या तयारीत होता. अखेर ठीक ४ वाजता (पंधरा मिनिटे उशीरा) पुण्यात येऊन कोयना थांबली.

नंतर माझ्या पुढे उभ्या असलेल्या त्या आजीबाई चेकरच्या भितीने जरा घाबरत-घाबरतच खाली उतरल्या आणि चेकरच्या नजरेतून सुटण्याचा प्रयत्न करत घाईगडबडीने निघून गेल्या. दरम्यान गरमीमुळे पाणीही हवे होते. गाडीत विक्रेते येत होते, पण मधल्या स्टेशनवरचे पाणी संपले होते. पुण्यातही पाण्याला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे शेवट कॉफी घेऊन तहान भागविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात ६ नंबरवर मुंबई-नागरकोईल आली. त्याआधी कोयना फलाटावर विसावलीही नव्हती, तेवढ्यात तीन नंबरवरून ११०७८ अप झेलमचे शंटींग सुरू झाले होते. मग मी माझ्या सवयीप्रमाणे स्टेशनवरून बाहेर पडण्याआधी फेरफटका मारत होतो, तोच उद्यानही मुंबईकडे जाताना दिसली. अशा प्रकारे आज बरीच क्रॉसिंग करत कोयनेचा प्रवास पूर्ण झाला. आजच्या प्रवासात प्रवाशांकडूनही रेल्वेगाडी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न झाल्यासारखे वाटले. कारण दोन तृतीयांश प्रवास पूर्ण करूनही कोयना बरीच स्वच्छ होती. स्टेशनमधून बाहेर पडल्यावर डब्ल्यूडीपी-४ ची गर्जना ऐकू आली. हा संकेत होता कोयनेने पुढच्या प्रवासाला सुरुवात केल्याचा.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमी प्रमाणे खासच लिहिलंय.
तुमच्याबरोबर सगळा प्रवास केला. आजी नीटपणे स्टेशनच्या बाहेर गेल्याचे दिसल्याने तेवढच जरा बरं वाटलं Happy

हो, निऱ्यात गाडीत ४-५ अंजीर विक्रेते शिरले. त्यातल्या एकाचा तोंडाचा पट्टा जरा जास्तच चालत होता. या सगळ्यांचा प्लॅन होता, रोजच्या प्रमाणे जेजुरीपर्यंत जाऊन डाऊन कोयनेनं निऱ्याला परतायचे. पण अप कोयना लेट असल्याने डाऊन बरीच पुढे सरकविण्यात आली होती.

.

मस्त लिहिलंय... हे लेख वाचून एखाद्या विमानाची सुटण्याची प्रक्रिया कशी असते, ते कुणीतरी लिहावे असे वाटायला लागले आहे.

मस्त वर्णन. मिरज पुणे कोयनाने जाणे हा अगदी नेहेमीचा अनुभव. पण तुमच्या लेखातून नवीन कित्येक गोष्टी कळतात.
फक्त ते येरळा नदीचे वाचून आश्चर्य वाटले नाही. ही पूर्व भागात म्हन्जे कवठेमहंकाळ तालुक्यात कोरडीच असते. आता गेली काही वर्षे वरती पण कोरडी होत आहे.

फार सुंदर वर्णन..!

लॉकडाऊनच्या आधी खंडाळ्यातील मंकी हिल जवळ गेल्या वर्षीच्या पावसामुळे कोसळालेल्या कड्यामुळे कोयना कितीतरी महिने मुंबईला जातच नव्हती. पुण्यापर्यंतच धावायची. अत्यंत बेभरवशी कारभार करुन ठेवला होता तिचा. दर महिन्याला नवीन अपडेत येऊन "मंकी हिलच्या कामामुळे कोयना पुण्यापर्यंतच धावेल" ही बातमी वाचुन वाचुन वर्ष होत आलेले. या प्रकारामुळे कोयना कायमची बंद होईल की काय अशी भिती वाटत असतानाच लॉकडाऊन लागले अन लॉकडाऊन पुर्ण संपल्यावर कोयना एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावेल अशी आशा वाटत आहे. बघुया काय होतं ते.. मीही पुन्हा एकदा कोयनेतुन सफर करायला उत्सुक आहे.. Bw

पुणे ते कोल्हापुर दुहेरी मार्ग अन एलेक्ट्रिफाईंग च्या कामाला लॉकडाऊन मुळे खीळ बसली आहे की काम पुर्ण झाले आहे हे कळायला काहीच मार्ग नाही... गेल्या वर्षभरात मी ट्रेनने प्रवासच केला नाही.

DJ, कोयना सध्या कोविड-19 विशेष म्हणून कोल्हापूर-मुंबई अशी धावत आहे.
पुणे-मिरज मार्गाचे साधारण 50 किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झालेले आहे. विद्युतीकरणाचा वेग मात्र त्यापेक्षा जास्त आहे. जवळजवळ 80-85 टक्के काम होत आलं आहे. मिरज-कोल्हापूर मार्गावर विजेची इंजिनं धावू लागली आहेत.

पराग१२२६३ , अपडेटेड माहितीबद्दल धन्यवाद Bw

लवकरात लवकर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पुर्ण व्हावे जेणेकरुन या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढेल तसेच नवीन गाड्याही सुरु होतील.

कोयना सध्या कोविड-19 विशेष म्हणून कोल्हापूर-मुंबई अशी धावत आहे >> तरीच तिच्या येण्या-जाण्याच्या वेळी रोज न चुकता तिचा आवाज येतो Wink

छान वर्णन. पुणे सांगली असा प्रवास केलाय कोयनेने बरेचदा. कोयना नाहीतर ती महाभयंकर पुणे मिरज पॅसेंजर. आदरकि स्टेशनला तो गोल वेढा आहे ना? तिथे क्रॉसिंग पण असते. निरेला बहुदा उडीद वडे मिळायचे आणि किर्लोस्करवाडीला बरेच कामगार लोक चढायचे गाडीत. पण खरेतर हा रेल्वेचा खूप रुक्ष मार्ग आहे, महबोरिंग..सांगली रेल्वे स्टेशनपण एकदम आड बाजूला आहे.. आणि आता बंगळुरू हायवे असताना रेल्वेला पास.. कोयनेचा पुणे चिंचवड असा प्रवास पण केला आहे कॉलेजमध्ये असताना बरेचदा. 4ची लोकल लेट किंवा रद्द झाली की हमखास कोयना.

नाही लंपन. उलट या रुट्चा रेल्वे प्रवास अगदी छान वाटायचा. सिंगल लाईन आणि डिझेल इंजिनामुळे आधीच या मार्गावर खुप कमी गाड्या धावतात. आणि हा मार्ग अगदी अन-टचेबल अशा निसर्गरम्य परिसरातुन जातो त्यामुळे खुप छान वाटतं. कुठेही मोठे शहर नाही.. कुठल्याही स्टेशन च्या आसपास झोपदपट्टी नाही.. कुठेही शेजारुन अंगावर आल्या सारख्या धडाडत जाणार्‍या ट्रेन्स नाहीत.. सगळं कसं आपल्याच तालात.

पुणे सोडलं की शिंदवणे घाट येई पर्यंत काय नजारा दिसतो.. तिच गोष्ट घाट चढताना. घाट चढुन वर आलं की जेजुरी, निरा, लोणंद सारख्या परिसरातुन जाताना किती छान वाटतं. तोवर आदर्की घाट. एकही झाड नसणार्‍या त्या आदर्की-वाठार ट्रॅक वर प्रवास करताना इतक्या लांबवर क्षितीज दिसतं की हा प्रवास संपुच नये असं वाटतं. वाठारचं स्टेशन तर माय फेवरीट..! Bw . ते सोडुन गाडी जरंडेश्वर अन सातार्‍याच्या दिशेने जाताना आजुबाजुचे डोंगर आणि आजुबाजुला पसरलेली आलं, ऊस यांची शेती अगदी कोरेगाव येईपर्यंत पाठ सोडत नाही. सातार्‍याच्या स्टेशन वर असणारी शांतता अन तिथुन दिसणारा अजिंक्यतारा म्हणजे या प्रवासातला चार चांद..! सातारा सोडलं की गाडी कुठुन कशी कोरेगावात येते हे गौड्बंगाल मला आजवर सुटलं नाही Wink कोरेगावातला इंग्रजांच्या काळातला उंच दगडी पुल अन त्यावरुन जाणारे आपण ट्रेनच्या घुमलेल्या आवाजाने धीरगंभीर होतो.. कोरेगावचं स्टेशन पण कसं एकदम वळणदार..! तिथुन तारगाव, रहिमतपुर, मसुर, शिरवडे ही स्टेशने देखील वाठार स्टेशन प्रमाणेच बांधल्यापासुन अनटचड्.. आणि म्हणुनच बघत बसावं असं वाटणारी..! मसुर येईपर्यंत डोंगरांची रांग साथीला असते.. किती भारी वाटतं इथं असताना.. शिरवडे सोडलं की मग मात्र नाईलाजाने प्रवास थांबत आहे याची रुख रुख लागते अन मग अगदी स्वागताला उभे आहोत अशा अविर्भावात उभ्या असलेल्या कराड स्टेशन मधे गाडी दिमाखात प्रवेश करते.. नवीन झालेल्या प्लॅटफॉर्मवर येऊन गाडी उभी राहिली की मग उतरावंच लागतं. डावीकडच्या सदाशिव गडाच्या कुशीवर वसलेल्या कराड स्टेशन मधे उतरलं की मग सदाशिव गडावर प्रेमाने नजर भिरभिरते अन स्टेशन वर लावलेल्या रंगेबीरंगी बोगन वेलींची फुले न्याहाळत जिना चढुन प्लॅटफॉर्म एक वर येत तिथलं आदबीनं जपलेलं जुनेपण डोळ्यात साठवत पुढील प्रवास कधी होणार या हुरहुरतेनंच मेन गेट मधुन बाहेर पडावं लागतं..

हा प्रवास आता दुहेरीकरणाच्या कामामुळे बराच रुक्ष वाटु शकतो कारण आधिचं 'अन-टच' फीलिंग आता लोप पावत चाललाय हे दुर्लक्षुन चालत नाही.. विद्युतीकरणामुळेही अंतरा-अंतरावर विजेचे खांब आलेत ज्यामुळे बाहेरील सौंदर्य बघताना नक्कीच फरक पडला असणार.

मी ३ वेळा कोयना ने गेलोय ज्यातील एकदा ए.सि. सिटिंग कोच ने... भारी अनुभव. पण हिला स्टोप्स जास्त आहेत म्हणुन नंतर मी ह. निझामुद्दीन - कोल्हापुर सुपरफास्ट नेच जातो. ती तास्भर लेट येते पुण्यात पण एकदा सुटली की मग सुसाट असते. गर्दी पण नसते. पण तिच्याच वेळेत शनिवारी असणार्‍या हबिबगंज-धारवाड हॉलिडे स्पेशल या नावाला भुलुन चुकुनही जाऊ नये... महाभयंकर स्लो आहे ही बया..! या ट्रेन चं महागडं तिकिट काढुन प्रवास करणे म्हणजे स्वतःच स्वतःच्या मुस्काडीत मारुन घेण्या सारखं आहे. घरच्यांचे फोन वर फोन येत रहातात की बाबा कुठवर आलाय्स...? तुला ट्रेन ची लै हौस.. बाय रोड आला असता तर एव्हाना दोन वेळा जाउन-येऊन केलं असतं. Biggrin

नाही डी जे मी हे लिहिलंय ते लेट 80 आणि मिड 90 पर्यंतच आहे. तेंव्हा दुहेरी मार्ग नव्हता. आणि सुट्टीत जाणे व्हायचं उन्हाळ्याच्या त्यामुळे सगळीकडे नुसता रखरखाट. स्टेशनांची ही सगळी नावं परिचयाची आहेत. आजोबा रेल्वेतुन रिटायर झाले होते त्यामुळे त्यांना रेल्वे बद्दल अपार प्रेम आणि फ्री प्रवास. हा प्रवास त्यांच्या बरोबरच होत असे. ते गाडी सुटताच जी जी स्टेशन येतील त्यांची नावे लिहायला सांगत. बाहेरचे खाणे अजिबात वर्ज्य. त्यांची नजर चुकवून आजी आणि आम्ही वडे इ घेत असू आणि नजर चुकवत खात असू :)ते आले की आम्ही एकदम तोंडे लपवत असू:) शाळेत असतानाच साधारण 96 मध्ये मद्रास मुंबई मेलने पुणे- रेणीगुंटा प्रवास शाळेच्या ट्रिप मुळे घडला होता, तो प्रवास खूप आवडला होता. पुण्यातुन ही गाडी पहाटे 3ला सुटते आणि शाळेने आम्हाला चिंचवडातून रात्री डबल डेकरने पुणे स्टेशनला नेले होते:)

हो.. उन्हाळ्यात जेजुरीचे पठार अन त्यानंतर वाठारचे पठार रखरखाट वाटु शकते.. मीही ते पाहिलं आहे पण त्यात सुद्धा एक सौंदर्य दिसलं. उन्हाने पिवळं झालेलं गवत अन डोंगरांचे काळ्या कपारीचे कडे यांच्या जोडीला निळंशार आकाश. अशा वेळी तिथुन जाताना वार्‍यासोबत गरम हवेचे झोत गाडीत शिरल्यावर असह्य होऊ शकतं नाही असं नाही.. पण बाय रोड चा कृत्रीम पणा या रुटवर कधीही जाणवत नसे. आता मात्र दुहेरीकरण अन विद्युतीकरणामुळे रुळांच्या कडेने तोडफोड, कापाकापी होऊन मनात चुकचुकल्यासारखं होतं. पण या मार्गावर रहदारी वाढण्यासाठी हे करणं गरजेचं होतंच.. Bw

कोयनेला खरं तर आता एल.एच.बी. कोच द्यायला हवेत.. आणि स्पीड वाढवून काही उगिचचे थांबे पण बंद करायला हवेत.

एल.एच.बी. च्या ए.सी. कोचेस मधुन निसर्ग आ...हा... दिसतो..! Bw