'चरित्रपट किंवा एखाद्या सत्यघटनेवर बेतलेला चित्रपट बनवणे' हा एक प्रकारचा ट्रेंड सध्या सुरु आहे. हे चांगलं की वाईट, हा प्रश्न नाही. पण मध्यंतरी (हम आपके है कौन) नंतर कौटुंबिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. एक तर संपूर्ण चित्रपटच कौटुंबिक भपकेबाज किंवा कुठून तरी काही तरी करून एखादं लग्नातलं/ 'मंगनी'तलं गाणं वगैरे घुसडायचं, असं चाललं होतं. जे अजूनही अधूनमधून दिसतंच. त्या ट्रेंडने बऱ्याच प्रेक्षकांना चित्रपटापासून दूर नेलं. त्यांतल्या बहुतेकांना चित्रपटाकडून जी 'सेन्सिबिलीटी'ची अपेक्षा होती, ती त्याच सुमारास झालेल्या इंटरनेट व केबल टीव्ही क्रांतीमुळे सहज उपलब्ध झालेल्या परदेशी चित्रपटांत मिळाली आणि तो प्रेक्षकवर्ग दुरावला तो कायमचाच. आता हा एक ट्रेंड आला आहे. ठराविक कालावधीनंतर एखादा चरित्रपट येतोच येतो. सत्यघटनेवर आधारित चित्रपट येतोच येतो. आता ह्यातही 'तोचतो'पणा वाटायला लागला आहे. असं वाटायला लागलं आहे की असे चित्रपट बनवत असताना कथानक व बऱ्याच अशी पटकथाही बऱ्यापैकी 'तयार'च असते आणि त्याला सत्यतेची पार्श्वभूमी असल्यावर 'सेन्सिबिलीटी' तर असली/ नसली तरी गृहीत धरली जातेच जाते. मग मिल्खा सिंगवर राकेश मेहरांनी बनवलेल्या लांबसडक चित्रपटात फरहान अख्तर काही दृश्यांत सपशेल तोकडा पडला असतानाही त्याचं कौतुक होतंच. 'मेरी कोम'वरील चित्रपटाला पाहताना, जो विषय आजपर्यंत नेहमीच चित्रपटांनी अव्हेरला आहे, तो - 'ईशान्येकडील लोकांच्या समस्या' - पुन्हा एकदा पूर्णपणे टाळला असतानाही, 'मेरी कोम'चा संघर्ष त्यात पूर्णपणे आला असल्याचीच हवा होते. कधी कधी वाटतं की 'मांझी', 'एअरलिफ्ट' हे चित्रपट 'सत्यघटनेवर आधारित' असं न सांगता बनवले गेले असते, तर ती कथानकं लोकांनी स्वीकारली तरी असती का ? पण मार्क ट्वेनने म्हटलंय, '“Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.” म्हणूनच 'आधारित' शब्दाचा फायदा घेऊन जेव्हा सत्यघटनेला मनासारखं सादर केलं जातं, तेव्हा त्यालाही स्वाभाविकपणे 'सेन्सिबल' मानलं जातं. त्यातूनही जर देश, जातीभेद, स्त्री शक्ती वगैरे संवेदनशील विषय असेल, तर त्याच्या निवडीतच ७५% यश दडलेलं असतं.
राम माधवानी ह्यांनी आपला पहिला (फुल लेंग्थ) चित्रपट करण्यासाठी असाच काहीसा 'सेफ गेम' खेळला आहे.त्यांनी विषय निवडला 'नीरजा भानोट'चा.

१९८६ साली अयशस्वी अपहरण करण्यात आलेल्या 'Pan Am 73' ह्या विमानाची हेड अटेंडंट असलेल्या नीरजा भानोटने आपल्या जीवाची पर्वा न करता विमानातील प्रवासी, सहकर्मचारी ह्यांचे जीव वाचवण्यास प्राधान्य दिले आणि त्या प्रयत्नात तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. ह्या अद्वितीय शौर्यासाठी तिला भारत, पाकिस्तान व अमेरिका ह्या देशांकडून अनेक मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. सर्वोच्च भारतीय सन्मान 'अशोक चक्र' तिला देण्यात आला. वय वर्ष २३. कुठून आलं असेल तिच्यात इतकं मानसिक बळ ? एका अत्यंत बिकट प्रसंगी तिने प्रसंगावधान बाळगून स्वत:चा जीव धोक्यात टाकूनही इतरांचे जीव वाचवले, हे शौर्य कुठून आलं असेल ? संस्कार, शिक्षण हे विचारांची दिशा ठरवतात. पण पराकोटीच्या तणावपूर्ण प्रसंगी निर्णयक्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठी लागणारं मनोधैर्य हे फक्त आणि फक्त अनुभवांतून येतं. कुठल्या अनुभवातून काय शिकवण मिळेल हे सांगता येत नाही. लहान मुलाला आपण रस्त्यावरच्या गाड्या दाखवत असताना ते दिव्यांना ओळखायला शिकतं. तसंच आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगातून आपण स्वत:सुद्धा काय वेचून, टिपून घेऊ ह्याचा नेम नसतो. जेव्हा दशरथ मांझीने एकट्याने एक पहाड खोदून त्याच्या गावाला जोडणारा रस्ता बनवला, तेव्हा वर्षानुवर्षं त्या शुद्ध वेडेपणा वाटणाऱ्या कामासाठी झटताना लागलेलं मनोधैर्य त्याला त्याच्या पत्नीवरील प्रेमातून किंवा त्याच्या जातीमुळे समाजाकडून मिळालेल्या तुच्छ वागणुकीबद्दलच्या असंतोषातून असेल किंवा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाच्या संतापातून मिळालं असेल. 'मांझी' बनवताना केतन मेहतांनी ह्या सर्व विषयांना सूचकपणे सादर केलं. त्यांनी फक्त 'मांझी'चा पराक्रमच दाखवून शॉर्ट कट मारला नाही. 'नीरजा'ची कहाणी दाखवताना मात्र 'नीरजा'च्या संघर्षाला नीट सादर केलं जात नाही. एका अयशस्वी लग्नाबाबतचे संदर्भ फ्लॅशबॅकमध्ये येतात. निकराने विरोध करून उभं राहण्याची मन:शक्ती तिला ह्या अनुभवातून मिळालेली असेल का ? असू शकते. लग्नानंतर होणारे अत्याचार एका स्त्रीला पूर्णपणे ध्वस्त करतात किंवा तिच्यात हजार स्त्रियांचं बळ आणून सगळ्यांविरुद्ध उभं करतात, अशी कित्येक उदाहरणं आजूबाजूला दिसतील. ह्या व्यतिरिक्तही नीरजाच्या पूर्वायुष्यात असे अनेक संदर्भ असू शकतात, ज्यांची नोंद तिच्या संवेदनशील मनाने घेतलेली असणार आणि ह्या सगळ्याचं एकत्रित फलित ५ सप्टेंबर १९८६ रोजी तिच्यात अपरिमित शौर्याच्या रूपाने आलं असणार. 'सिनेमॅटिक लिबर्टी' हे साधन ह्या सगळ्या विचारमंथनासाठीसुद्धा वापरलं गेलं पाहिजे. जसं ते 'मांझी'मध्ये वापरलं गेलं. मात्र हे सगळं बळ तिला वडिलांच्या फिल्मी संवादांतून मिळालं असल्याची पोरकट थिअरी इथे प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. Is this some kind of a joke ? अद्वितीय शौर्याचा आढावा घेताना तुम्ही ह्याहून पुढे विचार करू शकत नाही ?

ह्या सगळ्याच्या जोडीला आहेत अत्यंत सपक संवाद व कमकुवत लेखन. कराची विमानतळावरील अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा सुंदर खुलवता येऊ शकली असती. 'गुलजार'च्या 'अचानक' मध्ये ओम शिवपुरींनी साकारलेली 'डॉक्टर'ची छोटीशी व्यक्तिरेखा असो किंवा प्रमोद चक्रवर्तींच्या 'मजबूर'मध्ये 'सज्जन'ने साकारलेली तशीच अतिशय छोटीशी 'डॉक्टर'ची व्यक्तिरेखा असो. १-२ दृश्यांत ह्या दोघांनी आपापली छाप सोडली होती. अतिरेक्यांशी संवाद साधण्यासाठी झटणारा तो कराची विमानतळावरील अधिकारी शेवटी तीच हताशा अनुभवतो, जी ह्या डॉक्टरांनी अनुभवली. पण लेखकाला ते दिसत नाही. संपूर्ण चित्रपटातला एकही संवाद लक्षात राहू नये. वजन आणण्यासाठी राजेश खन्नाच्या चित्रपटांतील 'पुष्पा, आय हेट टियर्स' , 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही' वगैरे डायलॉग उधार घेऊन त्यातच सार्थक मानावं, काहीच ओरिजिनल देऊ नये ह्याचं वैषम्य वाटावं.
अतिरेक्यांशी संवाद साधणे, वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे वगैरे प्रयत्न पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेलेच दाखवणे क्रमप्राप्त होतं कारण घटना त्यांच्या भूमीतली. पण भारत, अमेरिका व इतर देशांकडून पाकिस्तानमार्फत का होईना काही प्रयत्न झाले किंवा न झाले हे दाखवूसुद्धा नये, हेसुद्धा पटलं नाही. 'मिशन'वर निघता एक अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्याला प्लान सांगतो, हे पाहून तर हबकायलाच होतं.
मुख्य व्यक्तिरेखेपासून अगदी छोट्यातल्या छोट्या सहाय्यक व्यक्तिरेखेपर्यंत कुणीही बारकाईने लिहिल्यासारखं वाटतच नाही.

सोनम कपूरचा चेहरा 'नीरजा भानोट'शी बराच मिळता-जुळता वाटतो. ती दिसलीही सुंदर आणि फ्रेश आहे. 'सांवरिया'पासून 'प्रेम रतन धन पायो' पर्यंत सुमार अभिनयाच्या पायऱ्या चढत गेलेल्या सोनमसाठी 'नीरजा' ही एक चांगली संधी होती, जीनाच बदलण्याची. त्या संधीचं तिने सोनं केलं, असं म्हणता येणार नाही, हे अनिल कपूरचं दुर्दैव. मरतानाचा अभिनय 'अग्निपथ'मध्ये हृतिकला जमला नाही आणि इथे सोनम कपूरला. तिला मरतानाचा काय, झोपतानाचाही अभिनय जमलेला नाही. रात्री एक वाजता तिची आई शबाना आझमी तिला उठवत असताना इतका कंटाळा येतो की वाटतं बादलीभर गार पाणी ओतावं आता ! तुकड्या-तुकड्यांत ती चांगली कामगिरी करते. आपल्याला वाटतं की 'आता हिने पकड घेतली', की लगेच गैरसमज दूर होतो.
'योगेंद्र टिक्कू'नी साकारलेला बापसुद्धा सहज वाटत नाही. विमान अपहरणाची पहिली बातमी कार्यालयात असताना समजल्यावर 'त-त-प-प' करत घरी फोन करुन सांगतानाचा प्रसंग सपशेल नाटकी झाला आहे. कथानक संपल्यावरही चित्रपट सुरूच राहतो. ह्या वाढीव १५-२० मिनिटांत शबाना आझमी पीळ-पीळ पिळतात. 'नीरजा'च्या मृत्यूनंतर एका वर्षाने तिला श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्यांच्यासाठी जे भाषण लिहिलं आहे, ते लेखनाच्या सपकतेची परिसीमा आहे. हा सगळा वाढीव भाग फक्त आणि फक्त शबाना आझमींना 'फुटेज' देण्यासाठी जोडलेलं एक निरर्थक ठिगळ आहे. त्यामुळे, थरारनाट्याने मागे सोडलेला प्रभाव दूर होतो.
तीन लहान मुलांना वाचवण्यासाठी स्वत: गोळ्यांना झेलणारी नीरजा दाखवताना कॅमेरावर्क शेवटच्या गटांगळ्या खातं. चित्रपटभर आपण ते सहन करत असतो. पण एक अत्यंत महत्वाचा प्रसंगसुद्धा 'जस्ट अनदर थिंग' म्हणून चित्रित व्हावा ?
'नीरजा'ची कहाणी वाचताना जो रोमांच येतो, तो रोमांच ही कहाणी पडद्यावर पाहताना येऊन पुरेसं नव्हतं. पडद्यावर हे नाट्य दाखवताना प्रेक्षकाला खुर्चीच्या टोकावर आणणं अपेक्षित व शक्यही होतं. फक्त डोळे पाणावणे पुरेसं नव्हतं, तर कित्येक ठोके चुकणं आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना सुन्न मनस्थिती असणं अपेक्षित व शक्यही होतं. असं काही न होता मी पाहिलं की लोक चित्रपट संपण्यापूर्वीच बाहेर पडत होते आणि बाहेर पडल्यावरसुद्धा 'चांगला होता मूव्ही' वगैरे पॉपकॉर्नी गप्पा चघळत रस्ता धरत होते.
Neerja deserved more, much more than this.
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2016/02/she-deserved-more-movie-review-ne...
हा सिनेमा पाहिला. सिनेमा मधली
हा सिनेमा पाहिला. सिनेमा मधली खऱ्या नीरजा ची गोष्ट सोडून काहीच आवडलं नाही. सोनम तर अजिबात नाही रुचली. खूप लाडात येउन बोलते असा वाटलं. खरी नीरजा जितकी सुंदर होती तितकीच कणखर पण होती. तिचा व्यक्तिमत्व खूप उठावदार आणि ठसठशीत होतं. सोनम नुसतीच छान दिसली.
पण तरीही या सिनेमा मुळे नीरजा चं शौर्य जगासमोर आलं. मी स्वत: नीरजा च्या कित्येक जाहिराती पहिल्या होत्या पण हीच ती नीरजा हे माझ्या गावी पण नव्हतं(खूप लहान होते मी त्यामुळे असेल) पण आता जेव्हा सगळ्या जाहिराती पहिल्या तेव्हा तिच्या साठी खूप वाईट वाटलं कि इतका बहारदार आयुष्य तिने अक्षरश: झोकून दिलं. पण तेवढाच तिच्यासाठी अभिमान सुद्धा वाटला. नीरजा च्या शेवटच्या announcement चा audio ऐकला तू नळी वर.. खूप लाघवी, स्पष्ट आणि आश्वासक होते तिचे शब्द. आता सुद्धा गूगल मध्ये नीरजा चा search top ला आहे.
तिच्या बद्दल माहिती करून दिल्याबद्दल माझी या सिनेमाबद्दल काहीच तक्रार नाही.
पाहिला सिनेमा . आवडला.
पाहिला सिनेमा . आवडला. वयाच्या २३ व्या वर्षी दाखवलेल्या शौर्याला खरंच हॅट्स ऑफ . सोनम कपूरनेही छान काम केलेय
तिच्याइतर चित्रपटाच्या तुलनेत . शेखर राजियानी छोट्याश्या भूमिकेत छान वाटला .
मो ची पोस्ट आवडली
शेवटी डोळे पाणावले हे निश्चित. पण सोनम मुळे नाही. खर्याखुर्य नीरजा साठी.>>>>> +१
चित्रपट आवडला. सोनमने खराब
चित्रपट आवडला. सोनमने खराब काम केले म्हणून चित्रपटच पाहू नये - इतके खराब काम तिने नाही केलेले.
थोडेसे अतिलाडात येउन बोलणे आहे काही ठिकाणी.
अजुन हाताळनी, पटकथेचा विस्तार ई. खुप चांगले होऊ शकले असते यात वादच नाही, पण चित्रपट आत्ता जसा आहे तसा तो नक्कीच चांगला आहे - सगळ्यांच्या अभिनयासकट - नक्की बघावा असा.
बाजीरावांच्या बाबतीत फालतु सिनेमातुन बाजीराव आजच्या अमराठी जनतेपर्यंत पोहोचले.
तसे इथे झालेले नाही. चांगल्या सिनेमातुन आजच्या पिढीपर्यंत नीरजा पोहोचली आहे.
शेवटी डोळे पाणावले हे निश्चित. पण सोनम मुळे नाही. खर्याखुर्य नीरजा साठी
+१
फिल्मी डायलॉग आहेत पण डोक्यात गेले नाहीत.
शेवटचे शबाना यांचे भाषण व पुरस्कार स्विकारतानाची चित्रफित / छायचित्र काल्पनीक दाखवण्याऐवजी, ख-या आईचे भाषण (कोणतीही स्क्रिप्ट न देता) व खरी चित्रफित दाखवली असती, तर जास्त शोभले असते असे मला वाटले. त्या एवजी तिचे, परिवाराचे फोटो पुरस्कार स्विकारतानाचा खरा फोटो शेवटी श्रेयनामावलीत दाखवला आहे.
(आता चित्रपट संपला असे समजुन ८०% प्रेक्षक उठुन जात होते, तेव्हा शेवटी नदीकिना-याच्या पार्शभुमीवर ख-या निरजाबद्दलची माहिती शब्दांतुन दाखवली आहे. तेव्हा सगळेजण जाण्याऐवजी आहे तिथेच थांबुन ते सगळे वाचत होते. त्यामुळे नाईलाजाने मलाही उभे राहुन स्क्रिन बघावी लागली.)
चांगल्या सिनेमातुन आजच्या
चांगल्या सिनेमातुन आजच्या पिढीपर्यंत नीरजा पोहोचली आहे.>> हे मात्र खरं आहे . ह्या घटनेच्या वेळी माझा जन्मही झाला नव्हता . चित्रपटाच्या माध्यमातूनच नीरजा माझ्यापर्यत पोचली . विकीवर गुगलून अधिक माहिती मिळवली . अश्या प्रकारच्या चित्रपटाच हे ही एक यश म्हणायला हवेय
<<<<<सोनमने खराब काम केले म्हणून चित्रपटच पाहू नये - इतके खराब काम तिने नाही केलेले.
थोडेसे अतिलाडात येउन बोलणे आहे काही ठिकाणी.
अजुन हाताळनी, पटकथेचा विस्तार ई. खुप चांगले होऊ शकले असते यात वादच नाही, पण चित्रपट आत्ता जसा आहे तसा तो नक्कीच चांगला आहे - सगळ्यांच्या अभिनयासकट - नक्की बघावा असा.>>>>> या परिच्छेदालाही अनुमोदन
रसप, लेखिकेच्या नावासकट
रसप, लेखिकेच्या नावासकट स्क्रिनशॉट देत आहे, म्हणजे जास्त ऑथेंटिक वाटेल.
http://www.bollywoodlife.com/
http://www.bollywoodlife.com/news-gossip/neerja-bhanots-colleague-is-not...
http://neerjabhanot.org/fathe
http://neerjabhanot.org/father.htm
मी पाहिला हा सिनेमा आणि ह्या
मी पाहिला हा सिनेमा आणि ह्या घटनेबद्दल नेट वर खूप काही वाचन सुद्धा केल. मला हा सिनेमा प्रचंड आवडला. सोनम कुठेही कमी पडलेली दिसत नाही. पुर्ण सिनेमाभार माझ्या हाताला घाम आणि हृदयाची धडधड होताना मी अनुभवली आहे. तिची छबी तिला उमटवता आली.
विमानात अशा जीवघेण्या परिस्थितीत आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ह्याचे सेन्स आपल्याकडे असते का? ज्यावेळी ईंधन संपल्यामुळे विमानातील दिवे जातात आणि गोळीबार व्हायला सुरवात होते त्यावेळी कदाचित खर्या नीरजा भानोतने कमालिचे काम केले असेल. अशा भयाण परिस्थितीमधे अनेकांना ती दिसली नसेल. प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरुन पळापळ करत असतील. विमानात गोळ्यांचा आवाज, लोकांच्या ओरडण्याचा आवाज, समोर काळोख आणि शरिरात भितीचे कंप सुरु - अशा परिस्थितीमधे नीरजाने लोकांचे प्राण वाचवले. तिच्या कलीग्सच्यामते तिच्याइतकेच साहस आम्हीपण दाखवले आहे. सिनेमात नीरजाने ज्या गोष्टी केल्यात त्या अशा आहेतः
१) तिने लगेच विमानाच्या पायलट लोकांना विमान हायजॅक झाल्याचे कळवले.
२) तिने इमरान खान जो रेडियो अभियंता असतो त्याला नजरेने खुणावले की तू तुझ्याबद्दल सांगू नकोस.
३) तिने अमेरिकन पासपोर्ट घ्यायचा नाही असे आपल्या क्र्यूला सांगितले.>> आणि विचार करा जर ते लपवलेले पासपोर्ट हायजॅकरना सापडले असते तर नीरजाचे काय झाले असते पण तिने तो विचार केला नव्हता. शेवटी ती गेलीच पण तरीसुद्धा तिने पासपोर्ट लपवून अनेक अमेरिकन लोकांचे प्राण वाचवले.
४) तिने लोकांना चहापान आणि खायला सॅन्डविच देऊन त्यांच्यामधे थोडी शक्ती आणली.
५) तिने तीन लहान मुलांना जवळ धरुन त्यांचे सरंक्षण केले.
६) तिने मॅगझिनवर ईमर्जन्सी डोअर कसा उघडवा ह्याबद्दल सुचना लिहिल्यात.
७) विमानाचे इंधन संपल्यानंतर तिने झटकन दरवाजा उघडून लोकांना बाहेर पडायची वाट दाखवली.
८) ती स्वतः आधी दरवाज्यातून बाहेर निसटली असती पण असे न करता तिने इतरांची मदत केली आणि स्वतःचे प्राण वाचवले.
९) ह्या विनानात प्रवास करणारे जे कुणी अजून हयात आहेत ते हेच सांगत आहेत की चहापान करताना नीरजा हळूच आश्वासक शब्दात सांगायची घाबरु नका. हेही काम सोनमने केल्याचे दाखवले आहे.
माझ्यामते खरी घटना आणि त्याचे तपशील पुर्णतः कुणी कथन करु शकत नाही. कारण तो क्षण हे सर्व बघण्याचा मनात साठवून ठेवण्याचा नव्हताच. नीरजाचे विक्सटलेले लग्न हे कदाचित तिच्या धाडसाचे एक छोटे कारण असू शकते. कारण, आपल्यावरील अन्यान आणि आपली प्रतिकुल परिस्थिती बर्याचदा आपल्यातील शक्ती वर आणत असते.
==
मला काय नाही आवडले:
१) सिनेमाची आधीची १५ मिनिटे खूप अस्पष्ट होती. त्याचे चित्रिकरण नीट नाही केले असे वाटते.
२) जर नीरजा भानोत सारखी दिसणारी सोनम निवडली तर तिची आई इतकी वेगळी का निवडली. हेच काम कदाचित नीना कुलकर्णी छान वठवू शकली असती. तिचे दिसणे रमा भानोत सारखेच आहे. थोडेतरी. रमा भानोत ह्या डिसेंबर मधे मरण पावल्यात. पण त्यांच्या क्लिप्स बघून शबाना आझमी त्यांच्यासारखी नाही वाटली.
हा एक लेख फारच परिपुर्ण
हा एक लेख फारच परिपुर्ण वाटला:
http://atimes.com/2016/02/remembering-neerja-bhanot-pan-am-flight-73-to-ny/
http://www.indiatimes.com/ent
http://www.indiatimes.com/entertainment/celebs/neerja-bhanot-s-brother-r...
वरच्या लिंकमधे नीरजाचे शेवटचे चित्र आहे भावासोबत.
चित्रपट पाहिला नाही, पण नीरजा
चित्रपट पाहिला नाही, पण नीरजा चं काम आणी कथा वाचून डोळे पाणावले.
खूप कठीण असतं अशा परिस्थितीत पण डोकं भानावर ठेवून लोकांचे प्राण वाचवणं.
तिच्या कलिग्स ने पण हे केलं असेल पण तिने प्राण गमावले त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहचली असावी कथा. ज्या सर्वांनी चांगलं केलं त्याचं अप्रिसिएशन व्हावं.
चित्रपट आवडला आणि
चित्रपट आवडला आणि सोनम-शबानाचे कामही. चित्रपट वेगवान आहे आणि खिळवून ठेवतो.
नीरजाने जे काही केलं तेच इतकं अचाट होतं की चित्रपटाचे लूपहोल्स लक्षातही आले नाहीत. 'आता यातलं वाईट शोधूच' असं ठरवून बसलं तर काही ना काहीतरी सापडेलच.
'आता यातलं वाईट शोधूच' असं
'आता यातलं वाईट शोधूच' असं ठरवून बसलं तर काही ना काहीतरी सापडेलच.>>
अगदी १०० टक्के बरोबर. ते इथेही झालेल आहे 
http://www.bollywoodlife.com/
http://www.bollywoodlife.com/news-gossip/pan-am-survivor-reveals-the-tru...
“Neerja was communicating with the terrorists in broken Arabic. She was also translating their demands into English for the control tower. She was very brave and a true global citizen. The hijackers were looking for American passengers, so she hid their passports. Despite this, one Indian American, I don’t recall his name, got up and said he was American. He thought the terrorists were gunning for Indians because a majority of the passengers were Indians. He didn’t realise they were looking for Americans. The terrorists shot him right there and threw his body out of the plane.”
सिनेमात हे घ्यायच असत.
सर्वात पुढे बसलेल्या
सर्वात पुढे बसलेल्या म्हाता-या आईचा मुलगा असे करताना दाखवला आहे की?
तो स्वतःहुन त्यांना सांगायला जातो ना की तो अमेरीकन आहे?
हो पण त्याला लगेच नाही ठार
हो पण त्याला लगेच नाही ठार मारले.
मला एक गोष्ट कळली नाही.
मला एक गोष्ट कळली नाही. कॉकपिट उघडून ....वरतून जर एखादे विमान सोडले असते तर दोरखंडाच्या सहाय्याने काही करता आले असता कआ?
वरतून जर एखादे विमान सोडले
वरतून जर एखादे विमान सोडले असते तर दोरखंडाच्या सहाय्याने काही करता आले असता कआ?

एवढे सगळे होईपर्यंत दहशतवाद्यांना काही कळले नसते का? त्यांनी आणखी प्रवाशांची हत्या करुन प्रतिकार नसता का केला?
विमानतळावर विमानांचा आवाज
विमानतळावर विमानांचा आवाज होणे साहजिक आहे. तेंव्हा एखाद्या विमानातून विमानावर काही लोकांना सोडता आले असते. खास करुन आर्मीच्या सैन्यांना असे करता आले असते. रिस्क तर आहेच ह्यात. पण १८ तासामधे ह्या लोकांना बाहेरुन काहीच करता आले नाही त्याचे नवल वाटते.
चांगल्या सिनेमातुन आजच्या
चांगल्या सिनेमातुन आजच्या पिढीपर्यंत नीरजा पोहोचली आहे.>> हे मात्र खरं आहे . ह्या घटनेच्या वेळी माझा जन्मही झाला नव्हता . चित्रपटाच्या माध्यमातूनच नीरजा माझ्यापर्यत पोचली . विकीवर गुगलून अधिक माहिती मिळवली . अश्या प्रकारच्या चित्रपटाच हे ही एक यश म्हणायला हवेय
>>>
++ कितीही
फार फार वाईट वाटतंय हे म्हणताना की मला या सिनेमाच्या आधी नीरजा माहीतच नव्हती. अर्थात हे घडलं तेंव्हा मी जन्मले नव्हते पण तरीही या आधी आयुष्यात कधी न कधी ही गोष्ट ऐकायला मिळायला हवी होती असं मनापासून वाटून गेलं. सिनेमा अजुन पाहिला नाहीये. पाहिला वेळच नाही मिळाला. पण जेंव्हा पासून नीरज अबद्दल कळालंय तेंव्हापासून दररोज न चुकता इंटरनेट वर आणखी काही मिळतंय का ते शोधलं गेलं. जे मिळालं ते अधाश्यासारखं वाचलं गेलं. मुद्दाल तिची माहीती काढली गेली- इतरांना सांगितली गेली. न कळत तिच्या साठी/ तिच्या फॅमेलीसाठी खुप दुवा मागितल्या गेल्या. तिच्यासाठी मनापासून रडू आलं, तिचा मनापासून अभिमान वाटला. आपणही असलं काहीतरी केलं पाहिजे समजासाठी असं वाटून गेलं. माझ्या पिढीत हे सगळं वाटणारी मी एकटी नक्कीच नसणारेय. त्यामुळे सिनेमातल्या सगळ्या लूप होल्स ना मी माफ करून टाकतेय.
पण १८ तासामधे ह्या लोकांना
पण १८ तासामधे ह्या लोकांना बाहेरुन काहीच करता आले नाही त्याचे नवल वाटते.
>>
हे सगळे कुठे घडत होते त्या देशाचे नाव वाचा, मग नाही वाटनार. मला तर त्यांचे स्वतःचेच गणवेशातील पोलीस / थोडेफार तंत्रज्ञान असलेला स्वत:चा विमानतळ हे बघुनच फार कौतुक वाटले की चला एवढेतरी स्वतःचे आहे बाबा त्यांच्याकडे..... सगळेच काही सॅम काका देत नाही!
उपरोध बाजुला ठेवुनही, जेव्हा
उपरोध बाजुला ठेवुनही,
जेव्हा तो विमानतळाची जबाददारी असलेला अधिकारी खेरच काही करु पाहतो तेव्हा मला सारखे वाटत होते की आत्ता हा म्हणेल की जाने दो अपनेही कौम के आदमी है क्यो उन्के खिलाफ कुछ करे. करने दो उन्हे जो करना है.
पण त्याला खरेच प्रवाशांसाठी काही करावे असे वाटते होते, असे 'दाखवलेले' (तरी) आहे. त्याचे मला तेव्हा खरेच कौतुक वाटले होते.
पाकिस्तानमधे हा सिनेमा
पाकिस्तानमधे हा सिनेमा दाखवायला बंदी केली म्हणे. पाकिस्तानविरुद्ध वाईट असे काहीच दाखवले नाही सिनेमात. उलट सेन्सिबल कमेन्ट ऐकले आहे तिथल्या अधिकार्यांचे.
बघा. मी म्हटले नव्हते. काही
बघा. मी म्हटले नव्हते. काही अपेक्षा करायच्या ... नाहीत हे लोकं आणि सरकार.
एवढ्या सगळ्यांनी पुरस्कार दिले तेव्हा ह्यांणी कशाला दिला काय माहीत. उगाच तेव्हाच्या पिअर प्रेशर मुळे नाखुशीने दिला असेल.
अरबस्तानातुन त्यांना नक्की कानउघडणी झाली असेल त्या पुरस्काराबद्दल.
बी | 29 February, 2016 -
बी | 29 February, 2016 - 11:34
'आता यातलं वाईट शोधूच' असं ठरवून बसलं तर काही ना काहीतरी सापडेलच.>> स्मित अगदी १०० टक्के बरोबर. ते इथेही झालेल आहे स्मित
>> वेल सेड !
तू वेगळा अर्थ घेतलास. माझा कल
तू वेगळा अर्थ घेतलास. माझा कल तुझ्या परिक्षणाकडे नव्हता. एकूणच जे प्रतिसाद आलेत त्यांना मिळवून दिलेला माझा प्रतिसाद होता.
ही १९८६ ची बातमी देतानाची
ही १९८६ ची बातमी देतानाची क्लिप आहे.
https://www.youtube.com/watch?v=ZW9UdpPzJjE
https://archive.org/stream/go
https://archive.org/stream/gov.uscourts.dcd.120097/gov.uscourts.dcd.1200...
इथे प्रत्येक प्रवाशाबद्दल लिहिल आहे. ग्रेट
नीरजा या चित्रपटामुळेच
नीरजा या चित्रपटामुळेच लोकांपर्यंत पोहोचली असे कुणी म्हणत असेल तर चुकीचे आहे. नीरजा भानोत हे नाव आणि तिचे साहस मी तरी लहानपणापासून ऐकलेय. तिच्या नावाने दरवर्षि एक पुरस्कारही दिला जातो. तेसुद्धा पेपरमध्ये आलेलं वाचलय.
अमी मला तरी नीरजा भानोत बद्दल
अमी मला तरी नीरजा भानोत बद्दल या चित्रपटामुळे कळलं . अशी काही घटना घडली आहे हे ही मला माहीत नव्हतं.(कारण आधीच नमूद केलेय ) चित्रपट पूर्ण घटना दाखवू शकत नाही हे मान्य आहे पण निदान नीरजाबद्दल सर्च केलं गेलं अधिक माहिती मिळवली गेली हे ही काय कमी आहे का ? प्रत्येकालाच सगळं कस काय ठाऊक असेल
Pages