नीरजा - She deserved more (Movie Review - Neerja)

Submitted by रसप on 24 February, 2016 - 01:53

'चरित्रपट किंवा एखाद्या सत्यघटनेवर बेतलेला चित्रपट बनवणे' हा एक प्रकारचा ट्रेंड सध्या सुरु आहे. हे चांगलं की वाईट, हा प्रश्न नाही. पण मध्यंतरी (हम आपके है कौन) नंतर कौटुंबिक चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. एक तर संपूर्ण चित्रपटच कौटुंबिक भपकेबाज किंवा कुठून तरी काही तरी करून एखादं लग्नातलं/ 'मंगनी'तलं गाणं वगैरे घुसडायचं, असं चाललं होतं. जे अजूनही अधूनमधून दिसतंच. त्या ट्रेंडने बऱ्याच प्रेक्षकांना चित्रपटापासून दूर नेलं. त्यांतल्या बहुतेकांना चित्रपटाकडून जी 'सेन्सिबिलीटी'ची अपेक्षा होती, ती त्याच सुमारास झालेल्या इंटरनेट व केबल टीव्ही क्रांतीमुळे सहज उपलब्ध झालेल्या परदेशी चित्रपटांत मिळाली आणि तो प्रेक्षकवर्ग दुरावला तो कायमचाच. आता हा एक ट्रेंड आला आहे. ठराविक कालावधीनंतर एखादा चरित्रपट येतोच येतो. सत्यघटनेवर आधारित चित्रपट येतोच येतो. आता ह्यातही 'तोचतो'पणा वाटायला लागला आहे. असं वाटायला लागलं आहे की असे चित्रपट बनवत असताना कथानक व बऱ्याच अशी पटकथाही बऱ्यापैकी 'तयार'च असते आणि त्याला सत्यतेची पार्श्वभूमी असल्यावर 'सेन्सिबिलीटी' तर असली/ नसली तरी गृहीत धरली जातेच जाते. मग मिल्खा सिंगवर राकेश मेहरांनी बनवलेल्या लांबसडक चित्रपटात फरहान अख्तर काही दृश्यांत सपशेल तोकडा पडला असतानाही त्याचं कौतुक होतंच. 'मेरी कोम'वरील चित्रपटाला पाहताना, जो विषय आजपर्यंत नेहमीच चित्रपटांनी अव्हेरला आहे, तो - 'ईशान्येकडील लोकांच्या समस्या' - पुन्हा एकदा पूर्णपणे टाळला असतानाही, 'मेरी कोम'चा संघर्ष त्यात पूर्णपणे आला असल्याचीच हवा होते. कधी कधी वाटतं की 'मांझी', 'एअरलिफ्ट' हे चित्रपट 'सत्यघटनेवर आधारित' असं न सांगता बनवले गेले असते, तर ती कथानकं लोकांनी स्वीकारली तरी असती का ? पण मार्क ट्वेनने म्हटलंय, '“Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.” म्हणूनच 'आधारित' शब्दाचा फायदा घेऊन जेव्हा सत्यघटनेला मनासारखं सादर केलं जातं, तेव्हा त्यालाही स्वाभाविकपणे 'सेन्सिबल' मानलं जातं. त्यातूनही जर देश, जातीभेद, स्त्री शक्ती वगैरे संवेदनशील विषय असेल, तर त्याच्या निवडीतच ७५% यश दडलेलं असतं.

राम माधवानी ह्यांनी आपला पहिला (फुल लेंग्थ) चित्रपट करण्यासाठी असाच काहीसा 'सेफ गेम' खेळला आहे.त्यांनी विषय निवडला 'नीरजा भानोट'चा.

neerja_profile.jpg

१९८६ साली अयशस्वी अपहरण करण्यात आलेल्या 'Pan Am 73' ह्या विमानाची हेड अटेंडंट असलेल्या नीरजा भानोटने आपल्या जीवाची पर्वा न करता विमानातील प्रवासी, सहकर्मचारी ह्यांचे जीव वाचवण्यास प्राधान्य दिले आणि त्या प्रयत्नात तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. ह्या अद्वितीय शौर्यासाठी तिला भारत, पाकिस्तान व अमेरिका ह्या देशांकडून अनेक मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. सर्वोच्च भारतीय सन्मान 'अशोक चक्र' तिला देण्यात आला. वय वर्ष २३. कुठून आलं असेल तिच्यात इतकं मानसिक बळ ? एका अत्यंत बिकट प्रसंगी तिने प्रसंगावधान बाळगून स्वत:चा जीव धोक्यात टाकूनही इतरांचे जीव वाचवले, हे शौर्य कुठून आलं असेल ? संस्कार, शिक्षण हे विचारांची दिशा ठरवतात. पण पराकोटीच्या तणावपूर्ण प्रसंगी निर्णयक्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठी लागणारं मनोधैर्य हे फक्त आणि फक्त अनुभवांतून येतं. कुठल्या अनुभवातून काय शिकवण मिळेल हे सांगता येत नाही. लहान मुलाला आपण रस्त्यावरच्या गाड्या दाखवत असताना ते दिव्यांना ओळखायला शिकतं. तसंच आयुष्यातल्या कुठल्या प्रसंगातून आपण स्वत:सुद्धा काय वेचून, टिपून घेऊ ह्याचा नेम नसतो. जेव्हा दशरथ मांझीने एकट्याने एक पहाड खोदून त्याच्या गावाला जोडणारा रस्ता बनवला, तेव्हा वर्षानुवर्षं त्या शुद्ध वेडेपणा वाटणाऱ्या कामासाठी झटताना लागलेलं मनोधैर्य त्याला त्याच्या पत्नीवरील प्रेमातून किंवा त्याच्या जातीमुळे समाजाकडून मिळालेल्या तुच्छ वागणुकीबद्दलच्या असंतोषातून असेल किंवा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाच्या संतापातून मिळालं असेल. 'मांझी' बनवताना केतन मेहतांनी ह्या सर्व विषयांना सूचकपणे सादर केलं. त्यांनी फक्त 'मांझी'चा पराक्रमच दाखवून शॉर्ट कट मारला नाही. 'नीरजा'ची कहाणी दाखवताना मात्र 'नीरजा'च्या संघर्षाला नीट सादर केलं जात नाही. एका अयशस्वी लग्नाबाबतचे संदर्भ फ्लॅशबॅकमध्ये येतात. निकराने विरोध करून उभं राहण्याची मन:शक्ती तिला ह्या अनुभवातून मिळालेली असेल का ? असू शकते. लग्नानंतर होणारे अत्याचार एका स्त्रीला पूर्णपणे ध्वस्त करतात किंवा तिच्यात हजार स्त्रियांचं बळ आणून सगळ्यांविरुद्ध उभं करतात, अशी कित्येक उदाहरणं आजूबाजूला दिसतील. ह्या व्यतिरिक्तही नीरजाच्या पूर्वायुष्यात असे अनेक संदर्भ असू शकतात, ज्यांची नोंद तिच्या संवेदनशील मनाने घेतलेली असणार आणि ह्या सगळ्याचं एकत्रित फलित ५ सप्टेंबर १९८६ रोजी तिच्यात अपरिमित शौर्याच्या रूपाने आलं असणार. 'सिनेमॅटिक लिबर्टी' हे साधन ह्या सगळ्या विचारमंथनासाठीसुद्धा वापरलं गेलं पाहिजे. जसं ते 'मांझी'मध्ये वापरलं गेलं. मात्र हे सगळं बळ तिला वडिलांच्या फिल्मी संवादांतून मिळालं असल्याची पोरकट थिअरी इथे प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. Is this some kind of a joke ? अद्वितीय शौर्याचा आढावा घेताना तुम्ही ह्याहून पुढे विचार करू शकत नाही ?

maxresdefault_0.jpg

ह्या सगळ्याच्या जोडीला आहेत अत्यंत सपक संवाद व कमकुवत लेखन. कराची विमानतळावरील अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा सुंदर खुलवता येऊ शकली असती. 'गुलजार'च्या 'अचानक' मध्ये ओम शिवपुरींनी साकारलेली 'डॉक्टर'ची छोटीशी व्यक्तिरेखा असो किंवा प्रमोद चक्रवर्तींच्या 'मजबूर'मध्ये 'सज्जन'ने साकारलेली तशीच अतिशय छोटीशी 'डॉक्टर'ची व्यक्तिरेखा असो. १-२ दृश्यांत ह्या दोघांनी आपापली छाप सोडली होती. अतिरेक्यांशी संवाद साधण्यासाठी झटणारा तो कराची विमानतळावरील अधिकारी शेवटी तीच हताशा अनुभवतो, जी ह्या डॉक्टरांनी अनुभवली. पण लेखकाला ते दिसत नाही. संपूर्ण चित्रपटातला एकही संवाद लक्षात राहू नये. वजन आणण्यासाठी राजेश खन्नाच्या चित्रपटांतील 'पुष्पा, आय हेट टियर्स' , 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही' वगैरे डायलॉग उधार घेऊन त्यातच सार्थक मानावं, काहीच ओरिजिनल देऊ नये ह्याचं वैषम्य वाटावं.
अतिरेक्यांशी संवाद साधणे, वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे वगैरे प्रयत्न पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेलेच दाखवणे क्रमप्राप्त होतं कारण घटना त्यांच्या भूमीतली. पण भारत, अमेरिका व इतर देशांकडून पाकिस्तानमार्फत का होईना काही प्रयत्न झाले किंवा न झाले हे दाखवूसुद्धा नये, हेसुद्धा पटलं नाही. 'मिशन'वर निघता एक अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्याला प्लान सांगतो, हे पाहून तर हबकायलाच होतं.
मुख्य व्यक्तिरेखेपासून अगदी छोट्यातल्या छोट्या सहाय्यक व्यक्तिरेखेपर्यंत कुणीही बारकाईने लिहिल्यासारखं वाटतच नाही.

Picture1_1.jpg

सोनम कपूरचा चेहरा 'नीरजा भानोट'शी बराच मिळता-जुळता वाटतो. ती दिसलीही सुंदर आणि फ्रेश आहे. 'सांवरिया'पासून 'प्रेम रतन धन पायो' पर्यंत सुमार अभिनयाच्या पायऱ्या चढत गेलेल्या सोनमसाठी 'नीरजा' ही एक चांगली संधी होती, जीनाच बदलण्याची. त्या संधीचं तिने सोनं केलं, असं म्हणता येणार नाही, हे अनिल कपूरचं दुर्दैव. मरतानाचा अभिनय 'अग्निपथ'मध्ये हृतिकला जमला नाही आणि इथे सोनम कपूरला. तिला मरतानाचा काय, झोपतानाचाही अभिनय जमलेला नाही. रात्री एक वाजता तिची आई शबाना आझमी तिला उठवत असताना इतका कंटाळा येतो की वाटतं बादलीभर गार पाणी ओतावं आता ! तुकड्या-तुकड्यांत ती चांगली कामगिरी करते. आपल्याला वाटतं की 'आता हिने पकड घेतली', की लगेच गैरसमज दूर होतो.
'योगेंद्र टिक्कू'नी साकारलेला बापसुद्धा सहज वाटत नाही. विमान अपहरणाची पहिली बातमी कार्यालयात असताना समजल्यावर 'त-त-प-प' करत घरी फोन करुन सांगतानाचा प्रसंग सपशेल नाटकी झाला आहे. कथानक संपल्यावरही चित्रपट सुरूच राहतो. ह्या वाढीव १५-२० मिनिटांत शबाना आझमी पीळ-पीळ पिळतात. 'नीरजा'च्या मृत्यूनंतर एका वर्षाने तिला श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्यांच्यासाठी जे भाषण लिहिलं आहे, ते लेखनाच्या सपकतेची परिसीमा आहे. हा सगळा वाढीव भाग फक्त आणि फक्त शबाना आझमींना 'फुटेज' देण्यासाठी जोडलेलं एक निरर्थक ठिगळ आहे. त्यामुळे, थरारनाट्याने मागे सोडलेला प्रभाव दूर होतो.
तीन लहान मुलांना वाचवण्यासाठी स्वत: गोळ्यांना झेलणारी नीरजा दाखवताना कॅमेरावर्क शेवटच्या गटांगळ्या खातं. चित्रपटभर आपण ते सहन करत असतो. पण एक अत्यंत महत्वाचा प्रसंगसुद्धा 'जस्ट अनदर थिंग' म्हणून चित्रित व्हावा ?

'नीरजा'ची कहाणी वाचताना जो रोमांच येतो, तो रोमांच ही कहाणी पडद्यावर पाहताना येऊन पुरेसं नव्हतं. पडद्यावर हे नाट्य दाखवताना प्रेक्षकाला खुर्चीच्या टोकावर आणणं अपेक्षित व शक्यही होतं. फक्त डोळे पाणावणे पुरेसं नव्हतं, तर कित्येक ठोके चुकणं आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना सुन्न मनस्थिती असणं अपेक्षित व शक्यही होतं. असं काही न होता मी पाहिलं की लोक चित्रपट संपण्यापूर्वीच बाहेर पडत होते आणि बाहेर पडल्यावरसुद्धा 'चांगला होता मूव्ही' वगैरे पॉपकॉर्नी गप्पा चघळत रस्ता धरत होते.
Neerja deserved more, much more than this.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2016/02/she-deserved-more-movie-review-ne...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे होतात इतके दिवस??
मस्त परिक्षण.. >>> +१
'एअरलिफ्ट' च्या रिव्ह्यू साठी वाट पाहून पाहून शेवटी स्वतःच पाहून टाकला ! Happy

avani1405 | 24 February, 2016 - 12:39 नवीन
कुठे होतात इतके दिवस??
मस्त परिक्षण..

मित | 24 February, 2016 - 12:51 नवीन
कुठे होतात इतके दिवस??
मस्त परिक्षण.. >>> +१
'एअरलिफ्ट' च्या रिव्ह्यू साठी वाट पाहून पाहून शेवटी स्वतःच पाहून टाकला ! स्मित

>>
महिनाभर धावपळीत गेला आणि नंतर काही दिवस कंटाळ्यात !

धन्यवाद !
__/\__

मस्त परिक्षण.

या चित्रपटात सर्वात खराब अभिनय जर कोणाचा असेल तर तो सोनम कपूरचा, तीच्या ऐवजी ते अपहरणकर्ते अभिनेते जे कोणी आहेत, त्यांनी अतिशय जिवंत अभिनय केलाय.

या चित्रपटात सर्वात खराब अभिनय जर कोणाचा असेल तर तो सोनम कपूरचा
>>>>
अजून परीक्षण वाचले नाही, अजून चित्रपट पाहिला नाही.
पण हा चित्रपट बघायची इच्छा असलेल्या माझ्या गर्लफ्रेंडला मी त्या दिवशी आधीच हे म्हटलेले.
या चित्रपटात सोनम कपूरच्या ऐवजी आणखी कोणी घेता आले नसते का? या चित्रपटाला मुख्य भुमिकेत ताकदीची कलाकार अपेक्षित आहे जे ती मुळातच नाहीये.

परीक्षण मस्त रसप ..
शेवटचे ठिगळ म्हणता ते ठिकठाक जमले असते तरी चुकीचे म्हणायला हवे.. असे चित्रपट क्लायमॅक्सच्या हायनोटलाच संपायला हवेत..

मला वाटतं किट्टू गिडवानी ( अर्थात तरुणपणीची ) असायला हवी होती. >>>अगदी

मस्त परीक्षण:)

मी अजुन पाहिला नाहीये पण सगळीकडे ह्या सिनेमाबद्दल चांगलेच ऐकले होते Uhoh अगदी सोनम बद्दलही

या चित्रपटात सोनम कपूरच्या ऐवजी आणखी कोणी घेता आले नसते का? या चित्रपटाला मुख्य भुमिकेत ताकदीची कलाकार अपेक्षित आहे जे ती मुळातच नाहीये.>> अगदी माझ्या मनातल बोललास ऋन्मेष.. ती अपिलच नै होत असल्या रोल साठी..

उत्तम परिक्षण रसप..
माझा एअरलिफ्ट राहुनच गेला शेवटी पाहायचा Sad

मी अजुन पाहिला नाहीये पण सगळीकडे ह्या सिनेमाबद्दल चांगलेच ऐकले होते अ ओ, आता काय करायचं अगदी सोनम बद्दलही >>>
नताशा, आपल्याकडे ना ट्रेंड आहे.. एक तर लोकांना सारी कहानी माहिती नसते.. जडणघडण , मानसिकता कशाशी खातात ते सुद्धा कळत नसते..म्हणुन चरित्रपट चांगलेच असतात.. त्याला तुम्ही वाईट म्हटल तर तुम्ही त्या व्यक्तीला वाईट म्हणत आहात अशी धारणा केली जाते म्हणुन चरित्रपट छानच असतात..

तीच्या ऐवजी ते अपहरणकर्ते अभिनेते जे कोणी आहेत, त्यांनी अतिशय जिवंत अभिनय केलाय.
<<

अगदि,
सोनम कपूर सोबत जो अपहरणकर्ता सतत अंगलट करत असतो. तो जेंव्हा त्या radio operator ला कॉकपीट मध्ये पाठून गोळी मारतो त्या वेळचा मुख्य अपहरणकर्त्याचा अभिनय अगदि लाजवाब आहे.

परिक्षणाशी सहमत. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं चित्रपट पाहताना. ज्या घटनेवर हा चित्रपट आधारलाय त्यातील दाहकता, नीरजा चे शौर्य दाखवायला कमी पडलाय असं वाटत होतं.
शेवटचे भाषण पण लांबलय.

या चित्रपटात सोनम कपूरच्या ऐवजी आणखी कोणी घेता आले नसते का? या चित्रपटाला मुख्य भुमिकेत ताकदीची कलाकार अपेक्षित आहे जे ती मुळातच नाहीये.>>>> मलाही अगदी असंच वाटलं होतं.

मी चित्रपट पाहिला नाहि आहे अजुन. पाहिल्यावर सोनमने मला खोटं पाडावं अशी अपेक्षा आहे. Happy

बादवे, सोनम ऐवजी परिणिती हवी होती असं मनात आलं.

Sad शेवटचं भाषण खूप सुंदर आहे. एक साधी आई ह्यापेक्षा जास्त वेगळं काय बोलणार होती? ते भाषण नसतं तर फक्त सिनेमा नीरजाची कहाणी म्हणून सोडून दिलं असता. खूप पर्सनलाईज होवून जातो सिनेमा शबानामुळे.

बाकी सोनमने संधी खरच वाया घालवली. एक गाणे पण अगदी उ गा च - ब ळ च आहे.

चित्रपट चांगला वाटला. अगदीच सपक नव्हता. पण चित्रपटातील संवाद लेखनाबद्दल पूर्ण अनुमोदन. संवाद आणखीन सशक्त पाहिजे होते. ती खरी किव्वा वास्तव स्टोरी आहे म्हणून नाहीतर चित्रपट एवढा पटकन भिडत नाही. कदाचित जास्त अपेक्षेने गेल्यामुळे असेल.पण खूप काही टुकार आहे असही नक्कीच नाही .

<<'नीरजा'च्या मृत्यूनंतर एका वर्षाने तिला श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्यांच्यासाठी जे भाषण लिहिलं आहे, ते लेखनाच्या सपकतेची परिसीमा आहे. . त्यामुळे, थरारनाट्याने मागे सोडलेला प्रभाव दूर होतो.>> + ११११११
<<मी पाहिलं की लोक चित्रपट संपण्यापूर्वीच बाहेर पडत होते ते...>>. शेवटच्या टुकार सीन मुळेच Sad

नीरजा पाहिला.

सोनम नीरजा च्या भुमिकेत शोभून दिसली आहे. पण भुमिका कॅरी करणे जमलेले नाही.
फिल्मी डायलॉग घालून उगीच फिल्मी बनवले आहे.

बॉयफ्रेंडची चिठ्ठी वगैरे इमोशनल मेलोड्रामा चा ही काही आवश्यकता नव्हती.

शबाना ऐवजी कुणीही दुसरी चालली असती असे झाले.

शेवटी डोळे पाणावले हे निश्चित. पण सोनम मुळे नाही. खर्‍याखुर्‍य नीरजा साठी.

नीरजा विषयी जमेल तितके वाचले. डोक्युमेंटरीज पाहिल्या. हेड पर्सर म्हणूनच्या पहिल्याच प्रवासात इतका दुर्दैवी अंत ही खूप हळहळ लावणारी गोष्ट आहे. नीरच्या मॉडेलिंगच्या वेळच्या काही जाहीराती तूनळी वर पाहिल्या. खूप सुंदर मुलगी होती. एअर होस्टेस च्या जॉबला एकदम सुटेबल.
तिच्या आवाजातले पॅन अ‍ॅम मधली तिची शेवटची अनाऊंसमेंट ही ऑडिओ फॉर्म मध्ये तूनळी वर आहे.

अमेरिका, पाकिस्तान आणि भारते अशा तीन ही देशांचे लोक विमानात जवळपास १६ तास अडकले. ह्या तीनही देशातल्या सरकारची भुमिका सिनेमात कुठेच ठळकपण आली नाही. फक्त पाकिस्तानी सरकार पत्रकार परिषद बोलावते, अतिरेक्यांशी वाटाघाटी करते इकेच बाहेर घडत असलेले नाट्य दाखवले.
कदाचित विमानाच्या आत चाललेल्या संघर्षावरच पूर्ण/ जास्त फोकस ठेवण्याचाच मानस असेल. पण ते ही दाखवायला हवे होते असे वाटले.

त्यावेळची एक न्युज क्लिप तूनळी वर पाहायला मिळाली:

https://www.youtube.com/watch?v=ZW9UdpPzJjE

बहुदा अमेरिकन न्युज चॅनेलची असावी. पण त्यात नीरजा चा उल्लेकखही नाही Sad

काल माझ्या पाकिस्तानी कलीगने त्याच्या फेसबूकवर ओहायो मधल्या एका पाकिस्तानी ओरिजिनच्या मुलीची पोस्ट शेअर केली होती. त्या मुलीचे वडील कराचीला विमानात चढले आणि पुढचे नाट्य सगळ्यांना माहिती आहेच. ह्या विषयावर आणि नीरजावर सिनेमा आलाय हे मुलीने जेंव्हा वडीलांना सांगितले तेंव्हा ते गहिवरले आणि त्यांनी नीरजाच्या शौर्याबद्दल तिला भरभरुन सांगितले. बाकी नातेवाईकांनी तेंव्हाच्या त्यांच्या मनस्थितीबद्दल लिहिले आहे. नीरजा इज अ हिरो!! प्रत्यक्ष ह्या भयानक प्रसंगामधून गेलेल्या व्यक्तीने (त्यांच्या मुलीने) नीरजाबद्दल लिहिलेले वाचून अजून भरुन आले. खरंच २३ व्या वर्षी, सगळं आयुष्य पुढे पडलंय असं असताना एवढं धैर्य कुठून आले असेल! __^__

खरंच २३ व्या वर्षी, सगळं आयुष्य पुढे पडलंय असं असताना एवढं धैर्य कुठून आले असेल! __^__

>>

खरंच. सलाम इतक्या धैर्यवान मुलीला.

@धानी१, ओरिजनल पोस्ट टाकतेय. कॉमेंट्स पेस्ट करत नाहीये.

Surprised to learn that a movie has been just released of the Pan Am Flight 73 that was hijacked on September 5, 1986 titled "Neerja Bhanot". The flight originated from Bombay (Mumbai) India, landed in Karachi, Pakistan where my own father and relatives had boarded, and was on its way to New York. My father, my aunt and my two relatives were among the 380 passengers that were on this airplane. Grateful they and the 360 passengers survived the ordeal with injuries, but unfortunately 20 people did not. I shared this news with my father that there was a movie made of the hijacked airplane he was on, which also was a surprise to him. I shared with him it was about the heroic flight attendant, Neerja Bhanot…and as soon as I mentioned this, I could here in his voice he was choking up and he had nothing but gratitude and praise of her heroic actions during the hijacking. Her courage, strength, bravery and self-sacrifice helped save his and the rest of the passengers lives. As passengers loaded the plan in Karachi, Neerja was the one who alerted the pilots that the plane was being hijacked which allowed the pilots to escape from the hatch in the cockpit. Neerja was ordered to collect everyone’s passports and she was able to hide the American passports (including my fathers) since that was the hijackers target who they had killed an American citizen on the plane. She secretly hid instructions on how to open the exit door in a magazine and gave it to a passenger sitting near the exit. As the 17 hours passed with the plane on the tarmac in Karachi, the power generator gave out and all the lights went out. The 4 hijackers started shooting, spraying the cabin with bullets and setting off explosives. Neerja was able to open the exit door and had the passengers get out. The passengers were able to jump out of the plane and survive. She shielded three children with her body while the hijackers shot at them saving their lives. In the end, the hijackers saw that she was helping everyone escape, and they ended up shooting her in the head. There are no words to describe her heroic actions and the amount of gratitude of the surviving passengers and their families. She was awarded India’s highest civilian award for bravery the “Asoka Chakra” and was the youngest ever to receive the award at age 22. She has also been awarded by the US and Pakistan. So grateful to God for this truly heroic individual, Neerja Bhanot...may her spirit of humanity be an inspiration for us all.

@मो,

कृपया मूळ लेखकाचे/ लेखिकेचे नावही द्याल. अश्याच प्रकारे निनावी साहित्य इंटरनेटवरुन पसरत जाते, चोरी होते.
मला ही पोस्ट काही जणांना पाठवायची आहे, पण मला त्यासाठी लेखकाचे/ लेखिकेचे नाव हवे आहे.

Pages