आपण त्या दिशेने जाऊ?

Submitted by आशयगुणे on 19 February, 2016 - 16:10

मी अमेरिकेत असताना आमच्या विद्यापीठात 'स्टूडंत असोसियेशन' अतिशय सक्रिय होते. तिथल्या प्रमुख विद्यापीठातील तशी संस्कृतीच आहे. आपली 'भारतीय स्टूडंत असोसियेशन' देखील तिथल्या प्रत्येक विद्यापीठात सक्रिय भूमिका बजावत असते. अर्थात ती भूमिका गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन, गणपती आणि दिवाळी ह्यात अधिक गुंतलेली असते. म्हणजे गुंतू नये असे नाही, पण त्याच्या बाहेर ज्या देशात आपण आलो आहोत त्याबद्दल जाणून घेणे ही इच्छा खूप कमी लोकांच्या मनात असते. नाहीच जवळ-जवळ! कारण भारतीय पोशाख, फेसबुक चेक-इन्स, नमस्कार आणि सेल्युट करणाऱ्या पोझेस आणि त्यातून निर्माण होणारे असंख्य फोटो ( आणि आता सेल्फी) ह्याची निर्मिती थांबवून बाहेरचे जग पाहण्याचा मोह फार कमी लोकांना आवरता येतो.

तर, दोन घटना अशा होत्या ज्यांनी माझा 'अमेरिका' ह्या संकल्पने बद्दलचा आदर अधिक वाढवला. तिथल्या विद्यापीठ - जीवनपद्धतीच्या बाबतीतचा तरी निश्चितच!

आमच्या कॅम्पसवर एक विद्यार्थी गट असा होता जो शेजारच्या मेक्सिकोतून ( मी टेक्ससला होतो) अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत कामानिमित्त राहिला आलेल्या लोकांच्या मुलांच्या हक्कासाठी लढत होता. ही मुलं ह्याच विद्यापीठात शिकत होती. परंतु, अमेरिकन नागरिक म्हणून नाही. तर, त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळावं , किमान ग्रीन कार्ड तरी मिळावं ह्या मागणीसाठी त्यांची घोषणाबाजी चालायची. अमेरिकेत राहणारी ही मूलं दुसऱ्या राष्ट्रातील ह्या मुलासाठी का लढत होती? स्वतःच्या सरकार विरोधात घोषणा का देत होती? त्यांना तिथल्या विद्यापेथाने परवानगी मात्र दिली होती. कारण आपण कोणते निदर्शन करतो आहोत हे विद्यापीठातील ऑफिसला कळवावे लागते. कुठे करतोय, कोणत्या वेळी आणि एकंदर हेतू काय ह्याची तपशीलवार माहिती तिकडे पुरवावी लागते.

दुसरी एक घटना ह्या घटनेपेक्षा वेगळी आणि एकंदर अधिक विलक्षण होती. कॅम्पस मध्ये एक नास्तिकत्व मानणारी संस्था होती. कॅम्पस मधल्या मुलांनी धर्माच्या प्रभावातून बाहेर यावे म्हणून त्यांनी अशी एक मोहीम सुरु केली होती ज्यात तुम्ही तुमच्या घरातील 'बायबल' आणून त्यांना द्यायची आणि त्याच्या बदल्यात ते तुम्हाला पोर्नची DVD देणार. हा खोडसाळपणा होता. विरोधकाला मुद्दाम डिवचणे ह्या व्यतिरिक्त ह्या मोहिमेतून काहीही सध्य होणार नव्हते. विशेष म्हणजे ह्या मोहिमेला देखील परवानगी दिली गेली! हा कार्यक्रम दोन दिवस सुरु राहिला आणि ओउधे काही दिवस तो तसाच सुरु राहणार होता. येणारे-जाणरे ही गम्मत बघत जायचे. परंतु कुणीही मारहाण, दगडफेक ह्यातले काहीही केले नाही. पण दोन दिवसांनी काय झाले हे अधिक महत्वाचे आहे! दोन दिवसांनी Christians on Campus ह्या विद्यार्थी गटाने त्याला उत्तर म्हणून आपली मोहीम हाती घेतली. त्यांनी काय करावं? त्यांच्याच समोर आपले टेबल टाकले आणि तुम्ही तुमच्याकडे असलेली पोर्न DVD परत द्या आणि बायबल घेऊन जा ही मोहीम हाती घेतली! विचारांना विचारांनी मात द्यायची ह्याचे ह्यापेक्षा चांगले उदाहरण कोणते द्यायचे? आणि ही मुलं बहुतांश पंचविशीच्या आतली, म्हणजे १८ -२३ ह्या वयोगटातील होती. आपल्या कॉलेज मधील कॉलर ताठ करून, शर्ट फोल्ड करून हुशारी करणारी पोरं डोळ्यासमोर आणा ना! वागतील ते असे? असेल त्यांच्यात एवढा संयम?

परंतु सर्वात आदर वाटतो तो तिथल्या विद्यापीठाचा. सर्व विचार सामावून घेण्याचे ह्यापेक्षा दुसरे उदाहरण कोणते? लोकशाहीचा पाया हा इथे असतो. कारण उद्या हीच काही पोरं राजकारणात प्रवेश करणार असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करू नये, अभ्यासाकडे लक्ष द्यावे; घोषणा देणे हे काम राजकीय पक्षांचे असते असले जे काही मतप्रवाह काही आठवड्यांपासून इथले विचारवंत सांगत आहेत ते किती पोरकट आहे हे लक्षात येते. अमेरिकन समाजाची आणि आपली तुलना होऊ शकत नाही वगेरे मतप्रवाह आता मांडले जातील. पण त्या दिशेने जायचेच नसेल तर ह्या विषयावर चर्चा करण्यात देखील काहीही अर्थ नाही.

- आशय Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages