भाकरी - अ लेसन फॉर लेमन्स

Submitted by तृप्ती आवटी on 18 February, 2016 - 13:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन छोट्या (आमटीच्या वाटीपेक्षा जरा लहान) वाट्या ज्वारीचं पीठ, एक चमचा कणीक, एक चमचा तेल, एक-सव्वा वाटी कढत पाणी

क्रमवार पाककृती: 

भाकरीचा विषय निघाला की भूक खवळत असेल, स्वतःला करता येत नाही आणि करून देणारं कुणी नाही म्हणून जीव कळवळत असेल, दीपभावोजींकडचा भाकरी नामक बोटभर जाडीचा पुठ्ठा खाल्यावर कर्त्याला सुस्थळी रट्टे घालण्यासाठी हात सळसळत असेल आणि छान पापुद्रे पडलेल्या पाsतळ भाकरीच्या आठवणीनं जीव अजूनच कळवळत असेल तर तर तर ...मेहरबान, कदरदान, आप की खिदमत मे पेश है...लेसन फॉर लेमन्स...चांदकीsss फॉर चमन्स्स्स्स्!!!

दोन्ही पिठं एकत्र करून त्यात तेल आणि पाणी घालून नीट मळावं. साधारण एक आणि सव्वाच्यामधलं माप पाणी लागतं. सगळं पीठ नीट बांधलं जात नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावावा. हे तयार झालेलं पीठः

n2upkki.JPG

साधारण दोन छोट्या चांदक्या होतील एवढ्या पिठाचे छोटे मुटके करून एस आकाराचं ब्लेड लावलेल्या फूडप्रोसेसरमध्ये टाकावेत. मी ब्लॅक अ‍ॅन्ड डेकरचा चॉपर वापरला आहे.

d1dswwb.JPG

फूडप्रोसेसर सुरू करून अर्धा मिनिट पीठ चांगलं मळून घ्यावं. सुरूवातीला भगराळ होउन मग एकसारखा गोळा तयार होईल. साधारण दोन भाकरी होतील एवढं पीठ एका वेळी मळून घ्यावं. पहिल्यांदा प्रयोग म्हणून आणि आता त्या यशस्वी प्रयोगानंतर सुखाचा जीव दु:खात का लोटा या विचारानं सगळं पीठ एकदम मळून घेतलं नाही कधीच.

rbodh4s.JPG

त्या पिठातून एक चांदकी होईल एवढा जरा लहानसाच गोळा काढून, हातावर मळून, त्याला लाटीसारखा आकार द्यावा. एका स्वच्छ कोरड्या ताटात किंवा परातीत थोडं ज्वारीचं पीठ पसरवून त्यावर ती लाटी ठेवावी. तळहाताला व्यवस्थित ज्वारीचं पीठ लावून चांदकी थापावी. थापताना तळव्यानं मधली आणि बोटांच्या खालच्या पेरांनी कड असं आलटून-पालटून थापल्यास एकसारख्या जाडीची भाकरी थापली जाईल. पीठ नीट मळलं गेल्यामुळे तुटातूट न होता भाकरी थापली जाते.

lbtp1ax.JPG

भाकरी उचलून पिठाची बाजू वर येइल अशा हिशेबानं उचलून तव्यावर टाकावी. उचटण्यानं कड जराशी उचलली तर पटकन भाकरी हातावर घेता येते. भाकरीवर पाण्याचा हात फिरवावा. तवा मध्यम तापलेला हवा. माझ्याकडे ग्लासटॉप असल्यानं तवा तापायला वेळ लागतो म्हणून मी पीठ मळायला घेतलं तेव्हाच तापायला ठेवला होता. शेजारच्या बर्नरवर पापड भाजायची जाळी पण तेव्हाच गरम करायला ठेवली.

ijashde.JPG

भाकरीला लावलेलं पाणी सुकेपर्यंत खालची बाजू पुरेशी भाजली जाते. मग दुसरी बाजू पूर्ण भाजून भाकरी जाळीवर सरकवावी.

ucalvq5.JPG

फुलली का नाय?

bdcllyz.JPG

घ्या अन् काय मग ताटात....

sk5ft1g.JPG

वाढणी/प्रमाण: 
चार चांदक्या होतात
अधिक टिपा: 

* 'बक्कळ' हा पर्याय उपलब्ध नसल्यानं लागणारा वेळ ३० मिनिटे घेतला आहे.
* भाकरी नीट होण्यासाठी पिठास विरी असणे आणि पीठ नीट मळले जाणे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कणिक, तेल आणि फुड प्रोसेसर ह्यांचं टीमवर्क हा कणिकांचन योग साधतं.
* ढाई किलो का हाथ हो या ठाकुर के हाथ, फूडप्रोसेसर से इन का कोई मुकाबला नही....
* घरात वास्तव्यास असलेल्या दुष्ट शक्तींनी चांदक्या कच्च्या राहिल्या, जाड झाल्या, जळाल्या ह्यापैकी का-ही-ही निदर्शनास आणून दिल्यास 'खायच्या असतील तर खा, नाही तर खा माझी हाडं' हा 'मानेस्मृती'तला पवित्र श्लोक मोठ्या आवाजात म्हणावा.
* डाव भरून कच्चं तेल घातल्याशिवाय पिठलं खाणं पाSप हो..पाSप!

माहितीचा स्रोत: 
आई, कणीक घालायची टिप: विद्याक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1. ताजं भाकरी पीठ
2. गावरान जास्त जुनी नसलेली ज्वारी
3. पीठ ताजं असल्यास नेहमीच्या पाण्यात, जुनं असल्यास कोमट इ गरम पाण्यात मळणे.थोडं थोडं पाणी टाकून मळत शेवटची स्टेज हाताला पीठ अजिबात चिकटणार नाही, ज्यात मळलं ते ताट/परात सर्व बाजूचं पीठ नीट गोळ्यात घेऊन एकदम स्वच्छ झालं असेल ही हवी
4. या पिठाचे गोळे छोटेच करा.
5. गॅस पेटवून लहान आचेवर तवा ठेवा.शेजारी अर्धा ग्लास साधे पाणी भरून तयार ठेवा.
6. ताट/परातीत चेहऱ्याला/गळ्याला पावडर चा थर उन्हाळ्यात घरी असताना थापतो तितके पीठ लावून घ्या आणि एक छोटा गोळा थापायला चालू करा.हलक्या हाताने(आपल्या प्रिय लहान मुलाला चापट्या माराव्या तसं) चापट्या मारत पुश पूल ऍक्शन ने टॉर्क लावत भाकरी कींचीत फिरवत थापत राहा.हा टॉर्क आणि हाताचा दाब सरावाने जमेल
7. भाकरी फार पातळ करू नका पहिला प्रयत्न असल्यास. ती खाली चिकटत नाही हे थापताना सतत तपासत राहा.
8. थापलेली भाकरी हातावर घेऊन थापताना खाली असलेली बाजू खाली राहील अशी तव्यावर टाका, पाण्याचा शेजारी ठेवलेला ग्लास घेऊन भाकरीच्या सेंटर ला घेऊन 2-5 ml(आकारावर अवलंबून) पाणी भाकरीवर ओता आणि ते पूर्ण भाकरीला हाताने लावून घ्या.या स्टेज ला भाकरीवर हाताची बोटे 2 ते अडीच पेर लागतील अशी धरून पाणी सर्वत्र लगेच लावायचे आहे.गॅस लहान असल्याने तितका वेळ मिळेल.तरी गॅस जास्त तापल्यास भाकरीवर लहान फुगे येतील.ते हलक्या हाताने किंवा हलक्या उलथन्याने बंडखोरांचा उठाव वेळेत दाबावा तसे दाबून घ्या.
9. गॅस मीडियम मोठा करून सावकाश 15 अंक मोजा.उलथन्याने तव्यावर असलेली बाजू किंचित उचलून पहा.त्यावर ओले खड्डे दिसले नाही पाहिजेत.भाकरी सर्वत्र पांढरी/1 mm डायमिटर चे ग्रे डाग वाली दिसली तर उलटा.
10. ही पाणी फिरवलेली बाजू खाली गेली.याला भाजायला वेळ लागेल.शांतपणे 30 अंक मोजा.गॅस मिडीयम आच.
11. आता ही भाकरी उलथन्यावर घ्या आणि परत उलटून नुसत्या गॅसवर अगदी थोडावेळ धरा. नीट भाजली गेली असेल तर फुगायला सुरुवात होईल.फुगली आणि नीट भाजली गेली(कुठेही ओला वेगळ्या रंगाचा पॅच उरला नाही की) की लगेच खाली काढा, हवे असल्यास तूप लावून डब्यात ठेवा.1 मिनिटाने झाकण लावा.
12. ट्रेनी असल्यास किंवा इलेक्टरीक चूल असल्यास गॅस वर थेट भाजण्याची स्टेप स्कीप करून भाकरीची ती बाजू तव्यावरच उलटा.फुगायला चालू होईल.
13. भाकरी फुटबॉल सारखी फुगणं हे मिथ्या आहे.प्रत्येक भाकरी फुटबॉल बनेलंच असं नाही.पण प्रत्येक भाकरी सगळीकडे समान भाजली गेली पाहिजे.तूप लावल्यावर मऊसूत दिसली पाहिजे.बंद डब्यात 3-4 तास राहूनही कडक झाली नाही पाहिजे हे सत्य आहे.

8. थापलेली भाकरी हातावर घेऊन थापताना खाली असलेली बाजू खाली राहील अशी तव्यावर टाका.....>>
थापताना खाली असलेली पिठाची बाजू तव्यावर टाकताना वर हवी ना? त्यावर पाण्याचा हात फिरवला जातो.

उद्या भाकरी करताना बघून लक्षात ठेवून सांगते
अवांतर: खालची आणि वरची दोन्ही बाजूना कमीत कमी पीठ हवे.अगदी आवश्यक न चिकटायला तितकेच.तेही हातात घेताना आपण झटकतो.पीठ जास्त झाल्यास तव्याला चिकटून पुढच्या भाकऱ्या काळ्या होतात.

<<थापताना खाली असलेली पिठाची बाजू तव्यावर टाकताना वर हवी ना? त्यावर पाण्याचा हात फिरवला जातो.>>+१११

<<पीठ जास्त झाल्यास तव्याला चिकटून पुढच्या भाकऱ्या काळ्या होतात.>> पीठ कमी असावेच पण जास्त करायच्या असतील तर नंतरच्या भाकऱ्या थोड्या काळ्या होतात, त्या होऊ नये म्हणून भाकऱ्या करायच्या आधी तव्यावर थोडे तेल टाकायचे अन ते एका कपड्याने पुसायचे, नंतर दुसरी भाकरी तव्यावर टाकायच्या आधी त्याच फडक्याने तवा पुसून घ्यायचा.

अनु दंडवत घ्या, भाकरीची रेसिपी लिहायला किती कठीण आहे, तरी लिहिलीत☺️

बाकी भाकरी दुसऱ्या गॅसवर डायरेक्ट शेकायचा प्रकार पुण्याच्या एका मैत्रिणीकडे बघितला होता, किचकट वाटला. आम्ही पूर्ण भाकरी तव्यावर शेकतो, टम्म फुगते. हा गावी जर कोणी चुलीवर भाकरी करत असतील तर भाकरी चुलीला लावतात .

हे तेलाचं कधी केलं नाही, शक्यतो पीठ नसेल भाकरीला असंच बघते आणि 4च करते ☺️
पीठ चिकटलं की आता हा प्रयोग करून बघेन.

आमच्याकडे १५-१६ भाकऱ्या लागतात एकवेळ ,त्यातही अर्ध्या तांदळाच्या अन अर्ध्या ज्वारीच्या, सो तेल लावले थोडे तर भाकऱ्या छान होतात.

तव्याला तेल लावायच्या टीपेसाठी धन्यवाद , VB. करून पाहीन. तुमच्या भाकऱ्या देखण्या असतात. चविष्ट असतील यात शंकाच नाही!

हे. हे. मला वाटलं फक्त मलाच भाकर्‍या करणे अवघड जाते. Happy
पण खूप तुम्हा सर्वांमुळे युक्त्या कळल्या हे नक्की.

थांकू चंद्रा☺️

तेलाच्या कपड्याने तवा पुसला तर भाकऱ्या काळ्या होत नाहीत पण अजून एक टीप, तेल लावल्यावर पहिली भाकरी पाणी लावताना तव्यावर गोल गोल फिरते, तेव्हा त्या भाकरीला अलगद हलक्या हाताने पाणी लावायचे, बस्स नंतर काही फरक पडत नाही.

Pages