चाकवताची जुडी - १.
बेसन / मूगडाळ पीठ - २ ते ३ टेबलस्पून
लसूण पाकळ्या - ५ ते ६ (किंवा पाव चमचा लसूण पेस्ट)
हिरव्या मिरचीचा ठेचा - पाव चमचा
मीठ
फोडणीसाठी :
तेल
मोहरी
जिरे
हिंग
हळद
तिखट (किंचित)
चाकवताची पाने निवडून, स्वच्छ धुवून एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात नरम होऊन रंग पालटेपर्यंत शिजवावीत. मऊ झाली पाहिजेत पण अगदी लगदा नको. पाने शिजवलेले पाणी गाळून घेऊन बाजूला ठेवावे. शिजलेली पाने गार झाल्यावर त्यांत बेसन (किंवा मूगडाळीचे पीठ) मिसळून मिक्सरमधून त्यांची पेस्ट करून घ्यावी. जाड बुडाच्या एका पातेल्यात ही पेस्ट घेऊन त्यात आपल्याला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालावे. भाजी शिजवण्यासाठी वापरलेले पाणी तुम्ही यासाठी वापरू शकता. लसूण पाकळ्या / लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा व मीठ घालून भाजी उकळावी.
दुसरीकडे लोखंडी पळीत तेलाची चळचळीत फोडणी करावी. फोडणीत अनुक्रमे मोहरी, जिरे, हिंग व हळद घालावेत. रंगासाठी किंचित लाल तिखट घालावे. ही फोडणी जरा गार झाल्यावर फोडणीसकट पळी भाजीत बुडवावी. चुर्र आवाज झाला पाहिजे.

आता भाजी एकसारखी करावी. गरमागरम भाजी भाकरी / पोळी / फुलका / भात/ ब्रेडसोबत खावी.

~ भाजी वाढताना त्यात वरून चमचाभर शुद्ध तूप घातल्यास भाजीला आणखी खमंग चव येते.
~ ही भाजी नुसती सूपसारखीही पिता येते.
~ भाजी खूप जास्त उकळू नये.
पाने मिक्सरमध्ये बारीक
पाने मिक्सरमध्ये बारीक करण्यामागे काही खास कारण आहे का?
भाजी वाढताना त्यात वरून
भाजी वाढताना त्यात वरून चमचाभर शुद्ध तूप घातल्यास भाजीला आणखी खमंग चव येते. >>+१०० आहाहा, पातळ भाजीवर तुप.... तोंपासु
मस्त आहे रेसेपी. दुसरीकडे
मस्त आहे रेसेपी.
दुसरीकडे लोखंडी पळीत तेलाची चळचळीत फोडणी करावी>> तू नेहमी वेगळे शब्द लिहितेस
वा वा!! भाजीचा रंग बघूनच
वा वा!! भाजीचा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटले. पोटात भूक खवळली. इथे काय किंवा फेसबूकवर काय.... खादाडीचे काय एकेक जीवघेणे फोटो बघतेय आत्ता मी.
सर्वांचे आभार! गजानन, मी
सर्वांचे आभार!
गजानन, मी दोन्ही प्रकारे ही भाजी करते व खाते. मिक्सरमध्ये पाने बारीक न करता हाताने किंवा घुसळायच्या रवीने कुस्करून केलेल्या भाजीचा पोत वेगळा असतो व चवीत अगदी सूक्ष्म फरक जाणवतो. मिक्सरमध्ये पाने बारीक केल्यावर भाजीला येणारा मऊसूत पोत मला व्यक्तिश: आवडतो आणि घरच्या ज्येनांनाही तशीच भाजी जास्त आवडते.
अरुंधती, अच्छा.
अरुंधती, अच्छा.
मस्त रंग आलाय ! चवही छानच
मस्त रंग आलाय ! चवही छानच असणार !!
चाकवत खूप आवडतो. घरी नेहमी
चाकवत खूप आवडतो. घरी नेहमी ताकातली पळीवाढी होते. आता अशीही करून बघितली पाहिजे.
यात ताकभाजीसारखे मटार / ओले हरभरे चांगले लागतील असं वाटतय.