चाकवताची पळीवाढी भाजी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 February, 2016 - 01:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चाकवताची जुडी - १.
बेसन / मूगडाळ पीठ - २ ते ३ टेबलस्पून
लसूण पाकळ्या - ५ ते ६ (किंवा पाव चमचा लसूण पेस्ट)
हिरव्या मिरचीचा ठेचा - पाव चमचा
मीठ

फोडणीसाठी :
तेल
मोहरी
जिरे
हिंग
हळद
तिखट (किंचित)

क्रमवार पाककृती: 

चाकवताची पाने निवडून, स्वच्छ धुवून एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात नरम होऊन रंग पालटेपर्यंत शिजवावीत. मऊ झाली पाहिजेत पण अगदी लगदा नको. पाने शिजवलेले पाणी गाळून घेऊन बाजूला ठेवावे. शिजलेली पाने गार झाल्यावर त्यांत बेसन (किंवा मूगडाळीचे पीठ) मिसळून मिक्सरमधून त्यांची पेस्ट करून घ्यावी. जाड बुडाच्या एका पातेल्यात ही पेस्ट घेऊन त्यात आपल्याला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालावे. भाजी शिजवण्यासाठी वापरलेले पाणी तुम्ही यासाठी वापरू शकता. लसूण पाकळ्या / लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा व मीठ घालून भाजी उकळावी.
दुसरीकडे लोखंडी पळीत तेलाची चळचळीत फोडणी करावी. फोडणीत अनुक्रमे मोहरी, जिरे, हिंग व हळद घालावेत. रंगासाठी किंचित लाल तिखट घालावे. ही फोडणी जरा गार झाल्यावर फोडणीसकट पळी भाजीत बुडवावी. चुर्र आवाज झाला पाहिजे. Happy

paliwadhi chakawat1.jpg

आता भाजी एकसारखी करावी. गरमागरम भाजी भाकरी / पोळी / फुलका / भात/ ब्रेडसोबत खावी.

paliwadhi chakawat2.jpg
वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

~ भाजी वाढताना त्यात वरून चमचाभर शुद्ध तूप घातल्यास भाजीला आणखी खमंग चव येते.
~ ही भाजी नुसती सूपसारखीही पिता येते.
~ भाजी खूप जास्त उकळू नये.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजी वाढताना त्यात वरून चमचाभर शुद्ध तूप घातल्यास भाजीला आणखी खमंग चव येते. >>+१०० आहाहा, पातळ भाजीवर तुप.... तोंपासु

मस्त आहे रेसेपी.

दुसरीकडे लोखंडी पळीत तेलाची चळचळीत फोडणी करावी>> तू नेहमी वेगळे शब्द लिहितेस Happy

वा वा!! भाजीचा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटले. पोटात भूक खवळली. इथे काय किंवा फेसबूकवर काय.... खादाडीचे काय एकेक जीवघेणे फोटो बघतेय आत्ता मी.

सर्वांचे आभार! Happy

गजानन, मी दोन्ही प्रकारे ही भाजी करते व खाते. मिक्सरमध्ये पाने बारीक न करता हाताने किंवा घुसळायच्या रवीने कुस्करून केलेल्या भाजीचा पोत वेगळा असतो व चवीत अगदी सूक्ष्म फरक जाणवतो. मिक्सरमध्ये पाने बारीक केल्यावर भाजीला येणारा मऊसूत पोत मला व्यक्तिश: आवडतो आणि घरच्या ज्येनांनाही तशीच भाजी जास्त आवडते. Happy

चाकवत खूप आवडतो. घरी नेहमी ताकातली पळीवाढी होते. आता अशीही करून बघितली पाहिजे.

यात ताकभाजीसारखे मटार / ओले हरभरे चांगले लागतील असं वाटतय.