जाहिरातमय जीवन

Submitted by mi_anu on 13 January, 2016 - 23:18

सकाळ झाली. भैरु उठला. भैरुने 'हवा मे उडता जाये' असा दावा करणार्‍या रबरी सपाता पायात सरकावल्या आणि तो दंतधावन करण्यासाठी न्हाणीघरात गेला.

'दातों के कानेकोपरेतक पोहचणारी' एक विचारपूर्वक वेड्यावाकड्या बनवलेल्या दात्यांची दंतघासणी त्याने उचलली. त्यावर 'आत्मविश्वास' जागवणार्‍या दंतरसायनाचे नळकांडे दाबले आणि दात घासायला सुरुवात केली. दात घासून झाल्यावर जाहिरातसंतांनी सांगितल्याप्रमाणे दातावर बोट घासून 'च्युक' आवाज येतो का त्याची तपासणी केली. अरेच्च्या! आवाज नीट नाही आला. भैरुने परत थोडे दंतरसायन घासणीवर घेतले आणि परत दात घासले. यावेळी दातावर बोट घासल्यावर हवा तसा 'च्युक' आवाज आला. हुश्श!!

आता भैरु स्वयंपाकघरात गेला. त्याने 'सुरक्षा का वादा' करणारी काडी पेटवून वायुचूल सुरु केली आणि
त्यावर दुधाचे पातेले ठेवले. दूध तापेपर्यंत तो मुक्तकंठाने गुणगुणला,'तु तु रु रु तु रु रु..हो शुरु हर दिन ऐसे..हो शुरु हर पल ऐसे..' शीघ्रकॉफीबरोबर 'दूध और शक्ती' देणारी बिस्किटे खाऊन तो पटकन उठला.
'तंदुरुस्तीचे संरक्षण' आणि 'मी ज्याचे घरी,आरोग्य तेथे वास करी' असा दावा करणार्‍या साबणाने आंघोळ करुन झाल्यावर भैरु दाढीच्या कपाटाकडे वळला. 'तलवारीसारखी धार' असलेले पाते त्याने वस्तर्‍याला लावले. मग 'जॉवॉब नही' ही एका चेंडूफळीखेळाडूची प्रशस्ती मिळालेल्या दाढीसाबणाने दाढी केली.दाढी झाल्यावर चेहर्‍याला 'जे लावल्यावर माणूस एकदम खवळलेल्या समुद्रात एका याटवर पोहचतो ते' दाढीपश्चात रसायन लावले (आपण समुद्रात का पोहचलो नाही हे माफक आश्चर्य त्याला वाटलेच, पण रसायन लावण्याची दिशा आणि क्लृप्ती चुकली असावी असा अंदाज त्याने केला.) आणि केसाला 'केस आणि काळजी चिकटपणारहीत' तेल लावले.

आता भैरुने 'मरणोन्मुख मुंबई' चा सदरा आणि 'बाहेरच्या तापमानापेक्षा कमी तापमान असणार्‍या' कापडाची विजार चढवली. आणि सर्व स्त्रिया आणि मांजरींना आकर्षित करण्याचा दावा करणारे 'कुर्‍हाड घर्मप्रतिबंधक सुगंधद्रव्य' सढळ हस्ते फवारले. 'श्वास घेणारी' पादत्राणे चढवली. त्यावर 'आरशासारखी पादत्राणे चमकवणारे रसायन' लावून खसाखसा पादत्राणे घासली. शीळ घालत तो बाहेर पडला आणि 'प्रश्नच नाही!!' असा दावा करणार्‍या जपानी दुचाकिवर बसून तो हवेच्या वेगाने निघाला.

आज भैरु महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षात प्रवेश घेणार होता. तो अर्ज देण्याच्या रांगेत उभा राहिला. काही वेळाने एक सुंदर मुलगी अर्ज घेण्याच्या रांगेतून कोरा अर्ज घेऊन निघाली. तिच्याकडे लेखणी नव्हती. ती इथे तिथे पाहत असताना भैरु आपली जागा सोडून पटकन आला आणि त्याने खिशाला लावलेली 'हाताला कमी ताण देणारी' लेखणी काढून तिला दिली. आणि तो तिने जाहिरातीतल्याप्रमाणे गालाचा मुका घेऊन आभार मानण्याची वाट पाहू लागला. पण हाय!तिने लेखणी घेऊन अर्ज नीट भरला, लेखणी स्वत:च्या पिशवीत काढली आणि गोड हसून ती महाविद्यालयाच्या इमारतीत निघून गेली.

भैरु परत रांगेत उभा राहून अर्ज देऊन उपहारगृहात गेला. बघतो तर काय, जिच्यासाठी तो रात्रंदिवस झुरत होता आणि जिला आपली भैरी बनवण्याचे स्वप्न बघत होता ती त्याच्याच वर्गातल्या दुसर्‍या मुलाबरोबर गुलुगुलु गप्पा मारत होती. वैतागून भैरु मनातल्या मनात जोरात ओरडला, 'मुझसे बढकर उसमे है क्या!!!!' आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. उद्याच व्हि.आय.पी. ला आपलेसे म्हटले पाहिजे असे मनोमन ठरवून त्याने 'बच्चों का पेय' नसलेले अगोड वायुयुक्त पेय मागवले. आणि पिऊ लागला. छ्या! तासिकेला जायचे मन उडाले. भैरु ने व्यथित मनाने 'चेहरे पे लाये जो मुस्कान' असे आइसक्रीम मागवले आणि ते संपवून तो उठला. जाता जाता त्याने 'शूर मर्दांसाठी' असलेल्या तमाखूनळीचे पाकिट आणि 'कोणीही खाऊ शकणार नाही फक्त एक' असा दावा करणारे कुरकुरीत बटाटाखाद्याचे मोठे पाकिट विकत घेतले.

भैरु घरी आला. त्याने वेडे खोके चालू केले. 'बच्चोंका पेय असलेल्या' वायुपेयाने आज नविन जाहिरात केली होती ज्यात 'बच्चोंका पेय नसलेल्या' पेयापेक्षा पाणी चांगले असे सांगितले होते. भैरु वैतागला. आता 'ताजे आणि रसाळ' आंबापेयाचे खोकेच पित जावे असे त्याने मनोमन ठरवले. जाहिरातांच्या मधेमधे ५-५ मिनिटे फेरपालट म्हणून भैरु गुप्तहेर मालिका बघत होता. मग लागली 'कॉलेज' मालिका. भैरुला परत त्याच्या स्वप्नांची भैरी आठवली आणि त्याने सुस्कारा सोडला. क्रमाक्रमाने आत्मविश्वास वाढवणारे दंतरसायन, हवेत उडणारी पादत्राणे, 'प्रितीचा विश्वास' असलेले लोणचे, सोडीयमची मात्रा कमी असलेले मीठ(भैरुला जरा शंका आली: NaCl हे रासायनिक सूत्र असलेल्या मिठातून फक्त सोडीयम कसं कमी करणार?), दोन बोटाने तुटणार्‍या पोळीचे पीठ, फळजीवनसत्वे असलेला केसांचा द्रवसाबण,जादू करणारे धुलाईयंत्र, चिमूटभर साबणात भरपूर फेस देणारी कपडेधुलाई वडी, सर्वांच्या जाहिराती झाल्या. अर्थातच त्या भैरुला तोंडपाठ होत्या. अचानक त्याला सैगलच्या आवाजात एक नविन दंतरसायनाची जाहिरात दिसली. 'क्या दुनियासे डरते है,आप xxxx क्युं नही करते है!!' भैरुला पटले. त्याच्या मनात नविन आशेचा किरण जागा झाला. तो पटकन उठून कोपर्‍यावर जाऊन ते दंतरसायन घेऊन आला.

रात्र झाली. भैरुने 'दोन मिनिटात तयार' शेवयांची दोन पाकिटे उघडली आणि पाणी उकळायला ठेवले. बरोबर 'मी वेगळी आहे' असा दावा करणारी टोमेटो चटणी घेतली. खाऊन झाल्यावर भैरुने 'भांड्यांवरील जंतू नष्ट करणार्‍या' साबणाने भांडी घासली.

आता भैरुने घड्याळ पाहिले. १० वाजले होते. 'पूर्ण १२ तास डासांपासून रक्षण' करणारी वडी वीजयंत्रात घातली. ('आपण ८ ला उठू. वडीचे वाचलेले २ तास संध्याकाळी डास चावतात तेव्हा वापरता येतील.' असा काटकसरी विचार त्यातल्या त्यात केला.)

नविन दंतरसायनाने दात घासून भैरु वाढलेल्या आत्मविश्वासाने पलंगाकडे गेला आणि शरीरांच्या उंचवट्यांचा योग्य विचार करुन बनवलेल्या 'शुभ निद्रा' गादीवर झोपी गेला.

(-जुना माल कॉपी पेस्ट)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

मस्त.

ओळखा...या सर्व जाहिराती २००४-५ च्या दरम्यान टिव्ही वर यायच्या.
बरीच प्रॉडक्टं ओळखण्यासारखी आहेत कारण त्यांची स्लोगन अजूनही बदललेली नाहीत.

Pages