सख्या रे... ४. एक लखलखीत रात्र !

Submitted by अवल on 12 January, 2016 - 12:48

(मुकुल शिवपुत्र यांची "तारुवा गिनत गिनत"ही चिज एेकताना जे वाटत गेलं ते असं...)

आणि ती ही रात्र आठवते सख्या...
तुझा निरोप आला अन सारी दुपार संध्याकाळची वाट बघण्यात गेली. तू येणार...काय करू, काय नकोहोऊन गेलं.तुझ्या येण्याला साजरं करण्यासाठी किती सोसा सोसाने सारे सजवले, सजले... सजणेच जणु साजण होऊन आले!

अन दुपारची तलखी संपून मनातली गोड हुरहूर अंगभर, अंगणभर पसरत गेली, उतरणाऱ्या उन्हातल्या सावल्यांसारखी.
सारा आसमंत सायंकाळच्या सूरात मिसळून जाऊ लागला. हळुहळू मनातल्या साऱ्या आशा आकांक्षा, इच्छा फुलून वर येऊ लागल्या, मन सुगंधित करू लागल्या. जणु अंगणातली सारी फुले एकाच वेळी उमलली होती.

हळुहळू सुर्याने आपला पसारा आवरला, उन्हाचा झळझळीत अंगरखा गोळा केला, केशरी उपरणेही हळुच आवरून सावरून घेतले . आता तर तो मार्गस्थही झाला...
घर आवरून झाले, स्वत:चे आवरून झाले पण मन.. त्याला आवरणे अवघड होऊ लागले.आत्ता येशील तू, अगदी कधीही तुझी चाहुल लागेल...
सुर्याचा प्रत्येक काढता पाय तुझी चाहुल देत होता. अन मग तो अगदीच पलिकडे गेला.
हळुहळू शुक्राची चांदणी दिसू लागली...
चमकू लागली...

सायंकाळ अशीच निघून चालली. तुझी चाहुल हुलकावणीच देत राहिली. अरे श्याम न तू? येण्याचा निरोप पाठवूनही ही शाम अशीच धुडकाऊन की दिलीस?
शुक्राची चमकणारी प्रत्येक कला मला वाकुल्या दाखवू लागलू. अन मग आल्याच तिच्या सगळ्या सखा, एकएक करत. कितीतरी चांदण्या फुलल्या वरच्या अंगणात. तू मात्र नाहीस... माझ्या मनाच्या अंगणात मात्र नुसता अंधार...

हळुहळू रात्र भरात आली. सारीकडे अंधार भरत गेला. तुझी वाटही कशी पाहू? तिथेही सारा अंधार दाटून आला. अन आता तर ती वाटही अंधूक दिसू लागलीय. मनातल्या वाटांनाही डोळ्यातल् पाणी पुसु पुसू लागले...
शेवटी त्या वाटेकडे पाठ फिरवून वरती सज्यामधे आले. अन मग तू नाही तर तुझा आठव कितीतरी अंगांनी, दिशांनी अंगावर दाटून आला. रातराणी, प्राजक्त मला घेरु लागला. सारी रात्रच वेढुन वेढून घेऊ लागली.

रात्र अजून चढली. किती मोजु, किती मोजू आकाशातल्या तारका? एकही तारका मला तारेल अशी आशा दिसेना. कधी येणार तू सख्या...
पूर्वेचे तारे मोजून झाले, झाकोळलेली पश्चिमही उजळली ताऱ्यांनी. तेही मोजून झाले... तू मात्र नाहीसच...

साऱ्या विश्वाला आपल्या रंगात रंगवून टाकणारा सदारंग तू! मला मात्र न रंगवता तसेच ठेवलेस आज, निरंग!
मीही या निशे सारखी, तारे मोजत अशीच ताटकळत पडून राहिले. पण तू नाहीच आलास, अखेर पर्यंत...

ती रात्र कशी विसरू रे सख्या? मोजलेला प्रत्येक तारा, घेतलेला प्रत्येक सुगंधी पण जखमी करणारा श्वास, ओघळणार् प्रत्येक खारा मोती, एक न भरणारी लखलखीत जखम... आठवत राहते अन छेडत राहते माझी सारी ती रात्र!
अजून त्या लखलखत्या ताऱ्यांसारखीच लख्ख आठवते ती रात्र, सख्या रे ...
ती रात्र, सख्या रे...
सख्या रे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !