"नागीण" [Herpes Zoster]

Submitted by अशोक. on 31 December, 2015 - 00:06

आपल्या सर्वांना प्रिय असलेले कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे काल निधन झाले. त्यांच्या प्रकृती संदर्भात ज्या काही बातम्या विविध वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्या आहेत त्यामध्ये पाडगांवकर गेली काही वर्षे "नागीण" (Herpes Zoster) या विकाराने त्रस्त होते असे म्हटले गेले आहे.

कांजिण्याचाच हा एक प्रकार असल्याने सहसा लहान वयात याची बाधा होते असा काहीसा समज आहे (तो कदाचित चुकीचाही असू शकेल) पण वृद्धांतही तो नेमक्या कोणत्या कारणास्तव वाढतो....वा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानी सजलेल्या औषधोपचाराच्या काळातही चक्क मृत्यूला कारणीभूत कसा होत असेल याचे विवरण मायबोलीचे सदस्य अमित करकरे यांच्या अभ्यासपूर्ण लेखात दिसत्ये आहे. तो लेख या निमित्ताने मी पुन्हा इथे तमाम लोकांच्या माहितीसाठी देऊ इच्छितो....[आशा आहे की श्री.अमित करकरे आणि मायबोली प्रशासक यांची या कृतीस परवानगी असेल. असे करणे योग्य नसेल तर हा लेख मी लागलीच इथून काढतो.]
===========================================================
अमित करकरे.....२५ एप्रिल २०१३
“डॉक्टर, बाबांना गेले दोन-चार दिवस डाव्या साईडला पाठीत दुखत होतं. काल परवा गरम पाण्याच्या पिशवीने जरा शेकलं, पण पाणी बहुदा जरा जास्तच गरम झालं असावं कारण आज शेकल्याच्या जागी लाल छोटेछोटे फोड आलेत आणि थोडी खाज सुटलीये. काय करू?” संजीवचा सकाळी सकाळीच फोन आला होता.

“संजीव, घरी काही करू नको. दहा वाजता त्यांना दवाखान्यात घेऊन ये, तिथेच बघुया काय ते.”

बरोबर दहा वाजता संजीव त्याच्या ६४ वर्षांच्या वडलांना घेऊन आला, आणि ते फोड बघताच मला लक्षात आले होते की माझा अंदाज खरा ठरला आहे, “संजीव, अरे ही ‘नागीण’ आहे.”

“नागीण !!!” अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रीया आलीच!, “डॉक्टर, नागीण पूर्ण गोल पसरली तर जीवाला धोका असतो नां?”

“संजीव, अरे या सगळ्या ऐकिवात गोष्टी आहेत. प्रत्यक्षात असं काही नसतं!”

= =

‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शन ला आपण नागीण (हर्पीस झोस्टर) म्हणतो, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात बरं!. खरं सांगायचं म्हणजे लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही. पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ठ नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्यभरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपी सारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता अशा कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू जागृत होऊ शकतो.
लक्षणे:

एकदा का हा विषाणू सक्रीय झाला की काही विशिष्ठ लक्षणे दिसू लागतात. संजीवच्या वडिलांना झाली तशी पाठदुखीने याची सुरवात होते. नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे किंवा खुपल्यासारखे वाटत राहते. दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात आणि त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो. त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो. याच बरोबर ‘फ्लू’मध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागतात.

पाठीतल्या ज्या नर्व्हला याचा संसर्ग झाला असेल, त्यां नर्व्हच्या प्रभावित क्षेत्रात प्रामुख्याने याची लक्षणे दिसतात. पुरळ सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या कालावधीत दुखण्याचा जोर सर्वात जास्त असतो. कांजिण्याप्रमाणेच हे पाणीदार फोड पुढे सुकतात, त्याला खपली धरते आणि ती पडून जाते. साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.

काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.

प्रचलित उपचार:

सर्वसाधारण विषाणू-संसर्गाप्रमाणेच एकदा लक्षणे सुरु झाली की त्यांना पूर्णपणे काबू करणे शक्य होत नाही. पाण्यासारखे द्रव असलेल्या फोडांमध्ये अजून जीवाणू-संसर्ग होणार नाही यासाठी उपचार केले जातात. ‘असायक्लोवीर’ सारख्या विषाणू-मारक औषधाचा उपयोग होतो. त्वचेची दाहकता कमी करण्यासाठी बाहेरून काही मलमे दिली जाऊ शकतात पण त्याचा सीमित परिणाम दिसतो.

होमिओपॅथिक उपचार:

आजवरच्या अनुभवावरून आढळलेला होमिओपॅथिक उपचारांचा विशेष फायदा म्हणजे लक्षणांची सुरवात झाल्या-झाल्या त्या लक्षण-समुहाला अनुसरून योग्य असे होमिओपॅथिक औषध दिले तर लक्षणांची पुढील वाढ तर थांबू शकतेच पण अगदी कमी कालावधीत संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. प्रामुख्याने ऱ्हस टॉक्स, अर्सेनिक अल्ब, मेझेरीयम, आयरिस, रॅननक्युलस बल्बोसस यांसारख्या औषधांचा यासाठी विशेष उपयोग होतो असे आढळून आले आहे. अर्थात, लक्षणांवरून योग्य औषधाची निवड होमिओपॅथिक तज्ञच करू शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे जेष्ठ नागरिकांमध्ये राहणारी वेदना आपण होमिओपॅथिक उपचारांनी नक्कीच घालवू शकतो. होमिओपॅथिक औषधांमधील ब्रायोनिया, कोलोसिंथ, कॉस्टिकम्, सिमीसिफुगा, मॅग फॉस यांसारख्या काही औषधांतील योग्य औषधाची निवड करून ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’वर हमखास मात करता येते.
होमिओपॅथिक उपचारपद्धतीमध्ये केवळ आजाराच्या लक्षणावर मात इतकेच मर्यादित लक्ष्य न ठेवता पेशंटच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करणारी औषधे सुद्धा आहेत, ज्यामुळे आरोग्याचे रक्षण होतेच पण पुढील संसर्गाचाही अटकाव होतो.
===================================================================
अन्य अशा एका लेखात विशिष्ट वयानंतर होत असलेल्या पित्तासारख्या आजाराला वा व्याधीला लागलीच पथ्यपाणी चालू करून ते आटोक्यात ठेवल्यास नागीण विकार होण्यापासून रोखले जाऊ शकते असा उल्लेख आहे.

सर्वांच्या माहितीसाठी....धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतीच मी नागिणीची लस घेतली.
५०+ वयाच्या लोकांनी घ्यावी असं डॉक.कडून समजलं होतं.
२ डोस असतात.
जरा महागडी आहे. पण त्याकडे एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहायचं.

मानव काळजी घ्या.लवकर बरे व्हा. मला स्वतःला कानात नागिण झाली होती आणि त्यामुळे बेल्स पाल्सी . माझं मलाच लक्षात आलं की एक डोळा बंद होत नाहीये. आधी कान दुखत होता ENT specialist कडे ट्रिटमेंट चालू होती . एके दिवशी सकाळी उठल्यावर लक्षात आलं की काही तरी वेगळं होतंय. डोळा बंद होत नाही. हसल्यावर एकच बाजू हलतेय. मग डॉ कडे गेलो त्यांनी लगेचच सांगितलं नागिण झाली आहे कानात. मग आयसोलेशन आणि चेहऱ्याचे व्यायाम केले आणि औषधं याने पूर्ण बरी झाले.
८-९ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.( नक्की आठवत नाही)

वर्षभरापूर्वी एका मोठ्या कंपनीने हर्पस लसीची माध्यमांत जोरदार जाहिरात केली होती. आता ती जाहिरात दिसत नाही. फॅमिली डॉक्टरांना ह्या लसीबद्दल माहिती नाही. खरोखर ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे का? ह्या लसीची एक डोसची अंदाजे किंमत किती आहे. घेणे जरुरीचे वाटते.

मानव काळजी घ्या.

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी मला झालेली नागीण तेव्हा प्रचंड पाठ दुखून ताप आला आधी, मग पुरळ आलं. अँटीवायरस डोसेस सुरू केले डॉक्टरानी, मी बरी होतेय तोपर्यंत माझ्या मुलाला कांजिण्या झाल्या. नशीब त्यावेळी नवऱ्याला काही झालं नाही, तो कॉलेजात असताना त्याला कांजिण्या झालेल्या , मला अगदी लहानपणी झालेल्या.

आधी दाखवलेले नसल्यास किंवा नाकाच्या टोकावर पुळी आल्यास ताबडतोब डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा. नागिणीचा संसर्ग डोळ्याच्या आत झाल्याचे हे लक्षण असू शकते कायमचे अंधत्व येऊ शकते.

सर्वांना धन्यवाद.
अलिबाबा धन्यवाद. होय, आता डोळ्यांचा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्येच आहे.

मानवदा सर्वप्रथम तुम्हाला लवकरात लवकर 'नागीण'मुक्त होण्यासाठी शुभेच्छा!
दाह कमी करण्यासाठी वरती सहेली ह्यांनी दुर्वांच्या रसात तांदुळाची पिठी मिसळून लावण्याचा एक सोपा उपाय सांगितला आहेच, अजून एक सोपा, घरगुती पण अत्यंत प्रभावी उपचार माहिती आहे.
रांगोळी काढताना वापरतात त्या 'गेरू'ची भुकटी आणि 'दही' मिक्स करून नागीण झालेल्या जागेवर लावा दाह खूप म्हणजे खूपच कमी होईल (हा उपाय करून बघितलेल्या काही परिचीतांनी दाह अजिबात जाणवत नसल्याचेही सांगितलंय). केवळ ह्या उपचाराने नागीण पूर्णपणे बरी होते असे म्हणतात, पण मला वाटतं ह्याच्या जोडीला डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार घेणे कधीही श्रेयस्कर!

*काळजी घ्या मानव, लवकर बरे व्हा * +१ व शुभेच्छा !
मला तरुणपणी डोळ्याजवळची नस बाधित होवून हा त्रास झाला होता. डोळ्याचा प्रश्न असल्याने आमच्या डॉक्टरांनी मला कमालीची दक्षता घ्यायला लावली होती. बाहेरून मलम वगैरे कांहीही न लावता, फक्त B Complex व व्हिटॅमिन इंजेक्शन एवढीच उपचार पद्धती होती. तरुणपणी ही लागणं झाली होती त्यामुळे नंतर मला कांहीही त्रास झाला नाही. पण उशिरा नागीण झाली तर त्याचा त्रास परत परत होण्याची शक्यता असते अशी देखील उदाहरणे माझ्या माहितीत आहेत.
अर्थात, आता उपचारपद्धतीत खूप सुधारणा झाली असावी, हे आहेच !

मानव जी, मला ही ४ वर्षांपूर्वी झाली होती. औषधे न चुकता घ्या..... लॅक्टो कॅलॅमाईन ने दाह कमी होतो. बरे झाल्यावर काही काळ मधून मधून त्या जागी न्युरल पेन वाटू शकतो पण पूर्णतः बरे होईल.
लवकर बरे व्हा
शुभेच्छा

मानव, लवकर बरे होण्याकरता शुभेच्छा !

नुकतीच मी नागिणीची लस घेतली >>> ही लस पूर्वी कांजीण्या येउन गेलेल्या लोकांनीच घ्यावी लागेल ना? इतरांना त्याची गरज असते का?

हल्ली जरा जास्तच केसेस आढळता आहेत का या रोगाच्या? गेल्या ६ महिन्यात आसपास ३ केसेस झालेल्या पाहिल्या.

खरोखर ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे का? ह्या लसीची एक डोसची अंदाजे किंमत किती आहे.

>>> मला वाटतं उपयोग असल्याशिवाय त्याला 'लस' म्हणत नसावेत.

इथल्या व्हॅक्सिनेशन सेन्टरमध्ये जाऊन आम्ही आधी सर्व माहिती घेतली.
माधव, त्या माहितीत कांजिण्यांचा काही उल्लेख आला नाही.

एका डोसची किंमत ११,०००/-

नागिणीची लस निघाली आहे का ? विचारते डॉक्टर ना..
>>>
हो, ममो, मलाही आधी माहिती नव्हतं.
मागच्या वर्षी द.आफ्रिकेला गेलो तेव्हा यलो फीव्हरची लस घ्यायची होती. त्यावेळी नागिणीच्या लशीबद्दल कळलं.

मागच्या वर्षी द.आफ्रिकेला गेलो तेव्हा यलो फीव्हरची लस घ्यायची होती. त्यावेळी नागिणीच्या लशीबद्दल कळलं. > नागीण हा एक सिरियस आजार आहे त्यामुळे डॉ विचारून मी ही घ्यायचा विचार करते आहे लस मग असली तरी.

त्या माहितीत कांजिण्यांचा काही उल्लेख आला नाही. >>> कांजिण्या येऊन गेलेल्या व्यक्तीला नागिण होऊ शकते ना? इतरांना नागिण होणारच नसेल तर त्यांनी लस का घ्यावी - असा माझ्या प्रश्नामागचा उद्देश होता.

Pages