
१ वाटी तांदूळ
१.५ वाट्या उडीदडाळ
०.५ वाटी चणाडळ
१ चमचा मेथी .
चवीनुसार मीठ.
हळद.
नारळाचा रसः ( अंदाजे)
खवलेलं खोबरं
गूळ
वेलची/जायफळ पूड
गुरुवारी रात्री आईचा फोन आला ,"थंडी पडतेय, आता खापरोळ्याचा बेत करतेय , येशील का शनिवारी रात्री ?"
मी अर्थातच काहीही विचार न करता होकार कळवला.
नवरोबा आणि लेकाला हा प्रकार आवडत नाही त्यामुळे मी नवर्याकडे जाहिर केलं " मी शनिवारी रात्री आईकडे जेवायला जातेय " (तू तुझं काय ते जेवणाचं बघं,अस सुचवलं. त्यानेही तत्परतेने शनिवारी दूपारी मासे आणून , आपल्या आईकरवी स्वतःची सुग्रास जेवणाची सोय करून ठेवली).
मागे कुठल्यातरी पाकृच्या धाग्यावर मी खापरोळ्यांचा उल्लेख केला होता. यावेळी आईकडे पाकॄ विचारून ठेवली आणि काही फोटोज पण काढले.
खापरोळ्या हा कोकणात केला जाणारा खाद्यप्रकार आहे.
नाश्त्याचा प्रकार म्ह्णता येइल , पण चांगला पोटभरीचा आहे , त्यामुळे आम्ही शक्यतो रात्रिच्या जेवणाला करतो.
बर्यापैकी थंडी पडू लागली की हे बेत सुचतात.
आता कॄतीकडे वळूया.
खाण्यावर ताव मारता मारता , आईच्या बोलण्याकडे जितके लक्ष देता येइल , तेवढे देत , जे कानावर पडलं ते सांगते.तसं डोसे, ईडल्या वगैरे करणार्या लोकाना काही कठिण नाही.
पोळ्यांसाठी वर दिलेली धान्य , डाळी वेगवेगळी भिजत घालावीत , साधारणपणे आठ तास.
नंतर उपसून , वाटून एकत्र करावित . चविपूरत मीठ आणि थोडीशी रंग यावा ईतपत हळद घालावी.
पीठ चांगलं ढवळून , पातेलं झाकून ठेवावं. सात आठ तासानी पीठ वर आलं की पोळ्या करायला घ्याव्यात.
पण त्या अगोदर नारळाचा रस तयार ठेवावा .
नारळाच्या दूधात गूळ विरघळवून घ्यावा आणि वरून वेलचीपूड / जायफळ पूड घालावी.
एक चांगला जाड बूडाचा लोखंडी तवा घ्यावा. (१) . मध्यम आचेवर गरम करायला ठेवावा.
त्यावर तेल अजिबात लावू नये . डावाने पीठ सारखे करून , एक डाव पीठ तव्यावर ओतून पसरावे.
तव्यावर एक ताट झाकण ठेवावे.
तोपर्यन्त खायची तयारी करावी . म्हणजे एक तळहाताएवधी खोलगट बशी , एक वाटी , एक चमचा - एका मोठ्या ताटात गोळा करावी.
आता तव्याकडे लक्ष द्यावे. हळू झाकण बाजूला करावे . पोळी वरून शिजलेली दिसेल , बारिक भोकं पडलेली दिसतील . पोळीखालून कलथा फिरवून , सुटते का बघावी.जरा करपल्यासारखी वाटली तरी असूदे . काही बिघडतं नाही. तव्यावरून सोडवून सरळ तशीच्या तशी , ताटात काढावी .(२) आणि लगेच दूसरी पोळी तव्यावर घालावी आणि झाकण द्यावे.
ताटातली पोळी , त्या खोलगट बशीत काढावी आणि ती बूडेल ईतका नारळाचा रस वरून ओतावा . बशीत चमचा ठेवावा. तो पर्यन्त दूसरी पोळी तयार होईलच . ती ताटात काढावी आनि मग गुमानपणे गॅस बन्द करावा.
अख्खं ताट उचलून बाहेरच्या खोलीत यावं. खूर्चीवर मांडी घालून बसावं आणी चमच्याने भिजलेल्या पोळीचा एक तुकडा मोडावा आणि तोंडात घालावा.
तो लुसलुशीत , गोड रसात भिजलेला तुकडा , कॅडबरीच्या जाहीरातीतले लोक कसे डोळे मीटून , तोंडात घोळवत खातात , तसा आनंद घेत खावा. (३)
रसात भिजवून खाव्यात किन्वा ताटात नुसत्या पोळ्या घेउन वाटीत रस घ्या. एक एक तुकडा वाटीतल्या रसात बूडवून खा.
(१) आम्ही जाड बूडाचाच तवा वापरतो . निर्लेप , बीडाचा तवा वगैरे वापरून प्रयोग केले नाहीत. तुम्हाला पाहिजे तर करू शकता.
(२) ही पोळी अजिबात परतू नये . तुम्ही आंबोळ्या किन्वा स्पॉन्ज डोसा करत नाही आहात. हाल्फ फ्रायच करावी.
(३) नारळाचा रस , वेलची/जाय्फळ पूड वगैरे प्रकरण एक्दम अंगावर येणार आहे. काही महत्वाची कामे असल्यास हा बेत करू नये.
(४) अवांतर : आम्हा मालवणी लोकाना चहा नुसता चालत नाही . काहीतरी "बुडवायला" लागतं .
चपाती , आंबोळी , बिस्किट ,टोस्ट, बटर झालच तर चकली , साबूदाणा वडा , थालिपीठ ,शिळ्या पुर्या .. काहीही .
( नवरा म्हणतो , हीच्या मनात आल तरं नवर्याला पण बूडवून खाईलं )
तर सांगायचा मुद्दा , अशी लोक , या पोळ्या चहात बूडवून पण खाऊ शकतात.
(५) या पोळ्या वरिजनली खापरावर केल्या जायच्या म्हणून त्याना खापरोळ्या , खापरपोळ्या म्हणतात.
आमच्या आंबोलीला करतात
आमच्या आंबोलीला करतात बाबा..... नशीब माझे..
तुमच्या आंबोलीत/ मालवणात
तुमच्या आंबोलीत/ मालवणात काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर जाडसर मऊमऊ लुसलुशीत पांढर्याशुभ्र आंबोळ्या करतात त्याची पाककृती द्या ना.
स्वस्ती, मस्त फोटो आणि
स्वस्ती, मस्त फोटो आणि रेसिपी.
तुमच्या आंबोलीत/ मालवणात
तुमच्या आंबोलीत/ मालवणात काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर जाडसर मऊमऊ लुसलुशीत पांढर्याशुभ्र आंबोळ्या करतात त्याची पाककृती द्या ना.
नक्की देईन. मला अजुन त्या मऊ लुसलुशित आंबोळ्या जमलेल्याच नाहीत करायला. मी जे करते त्याला प्लेन उत्तप्पा म्हणता येईल फारतर.... पण आंबोळ्या म्हणजे उत्तप्पा नाहीय हे खाणा-यांना माहितीय.
आता गावी गेले की फर्माईश करते आणि पाकृही घेते.
आमच्या मालवणात नाही करत.
आमच्या मालवणात नाही करत.
मी पण मालवणची... करतात
मी पण मालवणची... करतात आमच्याकडे खापरोळ्या...
तुम्हा दोघींच्या वाड्या
तुम्हा दोघींच्या वाड्या वेगळ्या असतील बहुतेक
हा कदाचीत तसाच असात गो
हा कदाचीत तसाच असात गो
मालवणातल्या खालच्या आळीत नाही
मालवणातल्या खालच्या आळीत नाही करत बहुदा !!!

माझ्या पाच काकूपैकी सर्वच बिगर मालवणी, त्यातून तीन वेगळ्या पोटजातीतल्या, त्यामूळे आमच्या घरी मालवणी जेवण होतच नसे. ( आजी राजापूरची.. पण ती तेव्हा रिटायर झाली होती. )
मी आज केल्या. मस्त झाल्या
मी आज केल्या. मस्त झाल्या होत्या.एकदम हलक्या झालेल्या.एक तर नुसतीच खाल्ली.
हि.मि.ची चटणी करून वर त्याचा थर लावला तर मस्त लागेल.
दिनेश., तिखट व्हर्जनची रेसिपी द्याल का?
कधी ऐकला/पाहिला/खाल्ला नाहीये
कधी ऐकला/पाहिला/खाल्ला नाहीये हा पदार्थ. ठाण्यात-बिण्यात मिळाला तर ट्राय करेन. फोटो भारी
मला एक नवीन शोध लागला आज
मला एक नवीन शोध लागला आज ;).
माझ्या आजेसासुबैंच्या काळात आमच्याकडे खापरोळ्या व्हायच्या क्वचित का होईना. नवऱ्याला आज मी सहज खापरोळ्या, शिरवळया मालवण भागात होतात, तुमच्याकडे ऐकल्या नाही असं म्हणाले तेव्हा तो म्हणाला, 'मी लहान असताना आजी होती ती करायची कधीतरी खापरावर, खापरपोळ्या. आजीनंतर नाही केल्या कोणी'.
आमच्याकडे खापरपोळ्या म्हणायचे. फोटो पण दाखवले त्याला. हेच करायची आजी आणि नारळाच्या रसाबरोबर द्यायची म्हणाला.
आमच्या कुडाळ प्रांतात देवाला
आमच्या कुडाळ प्रांतात देवाला नैवेद्य म्हणून 'खापरपोळ्या' केल्या जातात...
अंजूतै . इथले प्रतीसाद वाचून
अंजूतै
. इथले प्रतीसाद वाचून मी आईला विचारले .की नक्की हा पदार्थ कुठला आहे ? आईची आई लहानपणीच वारल्यामुळे ती आजीकडे वाढली. हा पदार्थ तिच्याकडूनच शिकली. पणजीच्या बाकी सुनांनी वारसा चालवला नाही.
Pages