कवितेचा परिचय - ८ - सुप्रिया जाधव (इतरत्र प्रकाशित लेख)

Submitted by बेफ़िकीर on 25 December, 2015 - 02:17

गझलकार सुप्रिया जाधव ह्यांच्या गझलप्रवासाची दखल म्हणून त्यांना एक पुरस्कार जाहीर झालेला असून त्याबाबतची माहिती २९.१२.२०१५ रोजी देईन. त्यासंदर्भाने लिहिलेला हा लेख पुण्याबाहेरील एका दैनिकात प्रकाशित होत आहे. मायबोलीकरांसाठी तो येथे देत आहे.
===================================

आधीचे लेखः

हौस - डॉ. समीर चव्हाण - http://www.maayboli.com/node/28340

रानमेवा - गंगाधर मुटे - http://www.maayboli.com/node/21810

वाहवा - म भा चव्हाण - http://www.maayboli.com/node/23832

चांदण्यांचे शब्द - उमेश कोठीकर - http://www.maayboli.com/node/26707

राजहंस मी - रणजीत पराडकर - http://www.maayboli.com/node/40548

श्वासांच्या समिधा - सतीश दराडे - http://www.maayboli.com/taxonomy/term/15666

जन्म कवितेचा - कविता क्षीरसागर - http://www.maayboli.com/node/55726

==================================================

सुप्रिया जाधव - एक उमद्या महिला गझलकार

सुप्रिया जाधवांचा सुमारे पाच ते सात वर्षांचा गझलप्रवास पाहण्याची संधी मला मिळाली कारण आम्ही दोघेही समकालीन गझलकार! सुप्रिया जाधवांच्या रुपाने मराठी गझलेला एक उत्तम प्रकृतीची महिला गझलकार मिळाली हे गझलविश्वाचे भाग्य आहे. आधीच गझलेच्या तंत्रातील बिकटपणामुळे ह्या काव्यप्रकाराकडे पाहणार्‍यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरलेले असते. त्यात हा मुळात परकीय भूमीतून इथे येऊन रुजलेला काव्यप्रकार असल्याने गझलेबाबत अनेक समज- गैरसमज, लिखित - अलिखित कायदे, मतमतांतरे असतात. त्यातील नेमकी योग्य भूमिका कोणती ह्याबाबत गझलक्षेत्रात पाऊल टाकणार्‍यांच्या मनात संभ्रम होऊ शकतो व ते गझलेपासून दूर जाऊ शकतात. ह्यानंतर येते गझल ह्या विषयाभोवती गाजत राहणारे राजकारण! गझलीयत राहते बाजूला आणि नगण्य मुद्यांवरून चाललेल्या बाष्कळ चर्चांमुळे जणू वेगवेगळ्या भूमिका घेणार्‍यांचे आखाडे किंवा घराणीच तयार होतात. एवढे करून समाजात स्त्रियांवर पुरुषांपेक्षा अधिक सांसारीक व इतर जबाबदारी लादली गेलेली असते आणि बंधनेही स्त्रियांवर अधिक असतात. एवढे सगळे घटक विरोधात असल्यानंतर गझलक्षेत्रात येऊन स्थिरावणे व सातत्याने गझलेत सुधारणा करून गझल उंचावर नेऊन ठेवणे हे सुप्रिया जाधवांसारख्या एका महिला गझलकाराने दाखवलेले कर्तृत्त्व प्रशंसनीय आहे.

मराठी गझल क्षेत्रात आजमितीला काही आदरणीय व गझलेबाबत गंभीर अश्या महिला गझलकार आहेत ज्यांच्यात माननीय क्रांती सडेकर, सुप्रिया जाधव, ममता संकपाळ, प्राजक्ता पटवर्धन ही नांवे सहज आठवतात. सुप्रिया जाधवांनी विविध व्यासपीठे व इन्टरनेटवर विपुल गझललेखन व गझल सादरीकरण केलेले आहे. वेळोवेळी त्यांच्या गझलेला योग्य त्या प्रमाणात वाहवा आणि प्रशंसाही मिळाली आहे. मात्र माझ्या वैयक्तीक मतानुसार त्यांचे गझलेवरील प्रेम, अभ्यासू वृत्ती, विकसनशीलतेतील सातत्य आणि विषयवैविध्य ह्या गोष्टींची पुरेशी दखल गझलविश्वाने घेतली नाही. बहुधा गझलविश्वाने त्यांच्या जगन्मित्र स्वभावाला, हसर्‍या चेहर्‍याला आणि स्वतःकडे कमीपणा घेण्याइतके मोठे मन असण्याला त्यांची कमजोरी मानली व त्यावरून त्यांची गझल जोखली. प्रत्यक्षात सुप्रिया जाधवांनी त्यांच्या गझलेतून पौराणिक कथांचे उल्लेख, निसर्ग, प्रेम, ताटातूट, स्त्रीला मिळत असलेले दुय्यम स्थान आणि अल्लडतेपासून ते अंतर्मुख करायला लावतील अश्या शेरांपर्यंत शेर रचण्याचे जे विविध रंग दाखवलेले आहेत ते पाहता गझलविश्वाने वेळीच त्यांची योग्य तितकी दखल घ्यायला हवी आहे.

सुप्रिया जाधवांच्या गझलेत अनेक रंग आणि घटक दिसून येतात.

रामाची पत्नी सीता आणि लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ह्यांच्यातील खरा वनवास कोणी भोगला ह्याबाबतचा त्यांचा हा शेरः

उर्मिला विरहात जळते एकटीने..
जानकीचा गाजतो वनवास नुसता

किंवा धोब्याच्या विचाराने अंतिम निर्णय घेण्याआधी रामाने एकदातरी सीतेला विचारायला नको होते का असा विचार शेरात मांडताना त्या म्हणतातः

लावून बोल आता लावेल ती कुणाला...
सीतेस राघवाने कोठे सवाल केले ?

पौराणिक कथांचे संदर्भ असे आजच्या स्त्रीजगताला लागू करताना सुप्रिया जाधव अचूक भाष्य करून जातात.

अनेकवेळा साधेपणा, संवादात्मकता हे गझलेच्या शेराचे गुण ठरतात. सुप्रिया जाधवांचे हे दोन छोटेसे शेरः

पार केले शिखर... कळले
सौख्य होते पायथ्याशी

मी तुझी अन् तूच माझा
काय घेणे ह्या जगाशी

अगदीच साधी मांडणी, पण त्यामुळेच प्रभावी!

स्वतःच्या आयुष्याबाबत अंतर्मुख होऊन विचार करताना आपसूकच अश्या प्रकारचे शेर रचले जातात. सुप्रिया जाधवांचे हे शेर वाचकांनाही क्षणभर खिळवतातः

माझ्या घरचा पत्ता शोधत केव्हाची मी...
पुन्हा पुन्हा या इथे भटकले जाता जाता

'माझे-माझे' करता-करता सरले जीवन ...
माझ्यामधुनी मीच निसटले जाता जाता

असाच एक शेर आहे जो वाचला की गझलेच्या माध्यमातून त्या किती त्रयस्थपणे स्वतःकडे पाहू शकतात त्याचे प्रत्यंतर येते:

काल शेवटी शत्रूंची यादीच बनवली
नांव स्वतःचे लिहीत गेले पूर्ण पानभर !

अर्धेमुर्धे आयुष्य जगून झाल्यानंतर, मुले सुट्टी सुट्टी व स्वतंत्र झाल्यानंतर माणसाच्या जीवनात एक रिकामेपणा प्रवेश करतो. हा रिकामेपणा आता अंतापर्यंत साथ देणारा असतो. त्याचे स्वागत करताना सुप्रिया जाधव ज्या ओळी रचतात त्या वाचून आपणही खिन्न होतो:

दोर कच्चा, वीण कच्ची, गुंफ़ले आयुष्य माझे.....
एक हिसडा प्राक्तनाचा, संपले आयुष्य माझे !

प्राण जाताना, सख्याच्या नेमकी बाहूत होते...
हारताना शेवटाला जिंकले आयुष्य माझे !

थोडे आजूबाजूला पाहिले तर जे जग दिसते त्यात सुप्रिया जाधवांना एक स्वार्थी समाज दिसतो. त्या म्हणतातः

हिरकणीइतकीच फरपट रोज होते..
फक्त अमुचा लेख अभ्यासात नाही

धावतो आहेस परदेशी कशाला...?
गोष्ट कुठली आपुल्या देशात नाही

सुप्रिया जाधवांच्या गझलेमध्ये ऋतू, हवा, निसर्ग ह्यांना मुबलक स्थान मिळते. ह्या सर्व रुपकांचा, प्रतिमांचा वापर त्या तरल भावना व्यक्त करण्यासाठी करतात. जसे हे शेरः

नव्याने पुन्हा ती जुना गंध ल्याली
तुझे गांव आले हवा धुंद झाली

तरंगे निराधार आभाळसुध्दा
तसाही कुणाचा इथे कोण वाली !

किंवा हे शेरः

काटेरी झाडाला देखिल वेल बिलगते
कळेल नंतर, पोर अजूनी अवखळ आहे !

सांधीमधुनी कोंब नवा फुटलेला पाहुन
कातळावरी विषण्णतेचा ओघळ आहे

आत्तापर्यंत त्यांच्या गझलेमधील विषयवैविध्य आणि जगाकडे पाहण्याचा एक अपरिचित, अनोखा दृष्टिकोन
नक्कीच जाणवला असेल. आता त्यांची गझल अधिकच उंचीवर जाते. त्यांचे हे काही शेर पाहा:

अव्यक्ताचे भावसरोवर स्वच्छ राहु दे
शब्दांच्या दगडाने होते गढूळ पाणी

निघून तो गेल्याला झाली कितीक वर्षे
एक दिवाणी अजूनही त्याचीच दिवाणी

विषय-पात्र-संवाद ह्यात असतील फरक पण..
मंच तोच अन प्रत्येकाची तीच कहाणी

शब्दांमध्ये समर्पकता, तीव्रता वाढू लागल्याचे जाणवते. भावना अधिक आर्तपणे मांडल्या गेल्याचे दिसू लागते. ह्या प्रवासात त्या अधिक गहिर्‍या होत जाऊ लागल्याचे जाणवू लागते.

मग त्यांच्यात एक आत्मविश्वासाने व संयतपणे भावना व्यक्त करणारी अस्सल गझलकार आकार घेऊ लागते. त्याची उदाहरणे म्हणून हे काही शेरः

मार्ग दर्शवण्यास केली आर्जवे मी
टाकला डोळ्यांवरी तू झोत माझ्या

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या

अचानक त्यांची गझल वयात आलेल्या मुलीसारखी संपन्न आणि दिलखेचक होऊ लागते. खालील शेर हे त्याचेच दाखले म्हणावे लागतीलः

प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते

कधीही घे कितीदाही परीक्षा घे
इथे उत्तीर्ण कोणा व्हायचे असते ?

चपखल शब्दयोजनांनंतर चपखल आशययोजनेवरही त्या प्रभूत्त्व मिळवतात. खालील शेर इतर शेकडो प्रकारे रचला जाऊ शकला असता. पण सुप्रिया जाधवांनी 'अश्रूंचा भपकारा' ही जी शब्दरचना केलेली आहे त्यामुळे क्षणार्धात भावना मनाला भिडतात. ह्याला म्हणतात चपखल आशययोजना:

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

ह्यानंतर त्यांची गझल शब्द, भावना आणि शैली ह्या गझलेतील तीन प्रमुख निकषांवर हुकुमत गाजवू लागते:

धाडू नको आमंत्रणे, बेभानता नाही खरी !
उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी

माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !

जे व्हायचे असते जसे होवून जाते ते तसे
तेव्हा तसे का वागलो सांगू नको आत्तातरी

सुप्रिया जाधवांचा हा गझलप्रवास नेहमीच इतक्या 'लाईटली' घेतला गेल्याची एक समकालीन गझलकार म्हणून मला खंत वाटते. त्यांना त्यांचे योग्य ते स्थान देण्यामध्ये त्यांचे स्त्री असणे किंवा स्वतःच्याच कोषात असणे आड येत असेल तर आपण सगळे एक चूक करत आहोत असे मला वाटते. वर दिलेल्या सर्वच उदाहरणांमधून सुप्रिया जाधवांकडे असलेले विषयवैविध्य, शैलीवरील हुकुमत, वेगळे दृष्टिकोन आणि संयमी व्यक्तीकरण दिसून येते. त्यांच्या गझलेत टाहो फोडणे, शाब्दिक तलवारी चालवणे, सादरीकरणाच्या कुबड्यांची गरज भासणे असले प्रकार आढळत नाहीत. हा प्रवास शेवटपर्यंत सुरूच असतो व त्यात गझलकार आधीहून अधिक समृद्ध होतच राहतो. पण तरीही आजमितीला सुप्रिया जाधवांची गझल मराठी गझलविश्वाने डोळसपणे पाहायला हवी आहे.

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रियाची गजल प्रगल्भ तर आहेच; पण त्यात एक वेगळाच नैसर्गिकपणा आहे. त्यांची कुठलीही द्वीपदी 'ओढून ताणून' रचल्यासारखी नसतेच मुळी! हा नैसर्गिकपणा मला भावतो! Happy

अरे वा !!

हां तर पुरस्काराच्या आधी मिळालेला पुरस्कारच म्हणता येईल !!

खुप खुप धन्यवाद बेफीजी !

आभार न मानता कायम आपल्या ऋणात राहू इच्छिते !!

सुप्रिया.

माझ्या ताईचा महिमा
कुणा ऐकवू ऐकवू
झेंडा लागला ढगाला
कोणाकोणाला दाखवू....

कितीही प्रशंसा केली तरी कमी आहे ताई तुझी....अभिमान वाटतो मनापासून कि तुज्झ्या सहवासात मला काही क्षण रहायला मिळाले..... तुझ्या काव्याची ख्याती जगभर पसरो हीच इश्वराकडे प्रार्थना......!!!

सुंदर परिचय, कवयित्रीच्या रेंजचा यथोचित आढावा.

<<त्यांच्या गझलेत टाहो फोडणे, शाब्दिक तलवारी चालवणे, सादरीकरणाच्या कुबड्यांची गरज भासणे असले प्रकार आढळत नाहीत. हा प्रवास शेवटपर्यंत सुरूच असतो व त्यात गझलकार आधीहून अधिक समृद्ध होतच राहतो. >>

अगदी सहमत.
मंचावरून कुलुपी गोळे फेकल्याच्या अविर्भावात सादरीकरण करणाऱ्या आणि उगाचच उद्दाम attitude बाळगणाऱ्या अनेक वर्तमान गझलकारांनी हे समजून घेतले तर फार बरे होईल.

सुप्रियाची गजल प्रगल्भ तर आहेच; पण त्यात एक वेगळाच नैसर्गिकपणा आहे. त्यांची कुठलीही द्वीपदी 'ओढून ताणून' रचल्यासारखी नसतेच मुळी! हा नैसर्गिकपणा मला भावतो! >>>> अग्दी अग्दी ...

सुंदर परिचय, कवयित्रीच्या रेंजचा यथोचित आढावा. >>> +१११११

वाह बेफिकीरजी किती अचूकपणे सुप्रिया मधील गझलकाराला या लेखातून तिच्या गुण वैशिष्ट्यानसह मांडले आहे …
जवाब नही !!

सुप्रिया यातील सर्वच शेर एकाहून एक सरस आहेत

प्राण जाताना, सख्याच्या नेमकी बाहूत होते...
हारताना शेवटाला जिंकले आयुष्य माझे !

आणि

हिरकणीइतकीच फरपट रोज होते..
फक्त अमुचा लेख अभ्यासात नाही

हे अतिशय आवडले .

सुप्रिया तुझ्याशी परिचय झाला हे मी माझे भाग्य समजते .

पुरस्काराबद्दल अगदी मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा …

सन्तोष, अमेय, शशांक, कविता, अमा, स्वाती , साधना मनःपूर्वक धन्यवाद !!!!

लोभ असू दया !!

सुप्रिया.