या लेखातील मते माझी वैयक्तीक मते आहेत. या लेखमालिकेद्वारे नवीन काव्यसंग्रहांचा परिचय व नवीन कवितेचा काहीसा आढावा घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मराठी काव्यावर बदललेली जीवनशैली, संगणक युग, गझलेच्या वाढत्या संख्येमुळे नकळतपणे पडणारा प्रभाव, आंतरजालीय लेखनामुळे त्वरीत अभिप्रायांमधून कवी स्वतःच्या काव्यात नकळत घडवत असलेले बदल या सर्वांचा प्रभाव पडत आहे. तरीसुद्धा पारंपारीक काव्यविषय, संकेत, प्रतिमा अजूनही ठळकपणे येत राहतात. एक प्रकारे मराठी कवीमध्ये धाडस कमी पडत आहे असे वाटत आहे. वाहत असलेल्या प्रवाहांची दिशा बदलल्यावरच, किंवा तसा प्रयत्न केल्यावरच कवी मोठा मानला जावा असे कोणीच म्हणणार नाही, सच्चेपणा आणि गांभीर्य पुरेसे असतेच. पण नावीन्य उठून दिसते. पटकन नस पकडते. तणावपूर्ण व स्पर्धात्मक आयुष्य जगताना मनाच्या तळाशी जो कडवटपणा, उद्वेग आणि शांतता गमावल्याची हुरहुर जमा होते तिचा थेट उद्गार कवितेत पुरेसा येताना दिसत नाही. कवी अजूनही स्वप्नवत कविता करताना दिसतात. तरलतेला, मोहक शब्दरचनेला सर्वोच्च स्थान देताना दिसतात. मुलगी बघायला आलेल्या मंडळींना आपली मुलगी सुंदर भासावी याचा प्रयत्न केला जातो तशी कविता सुंदर केली जात आहे. दैनंदिन जीवनात ती मुलगी कशी दिसते, वागते हे तेव्हा झाकले जाते, तशीच कवितेच्या मुळाशी असलेली भावना किंवा मूळ काव्यप्रेरणा दडपून टाकत कविता होत आहे.
एकुण, स्पष्टच बोलायचे तर बरीचशी कविता समाजमन ढवळून काढत नाही. टाळ्या, वाहवा मिळवते आणि पुरस्कार, मोमेंटोज मिळवते. शाली, श्रीफळ आणि मानधन मिळवते पण रसिकाच्या मनात खोलवर घुसत नाही. अभिनिवेश असतो पण 'सबस्टन्स' कमी पडतो, असे काहीतरी वाटून जाते.
===========================
आत्तापर्यंत या लेखमालिकेमध्ये खालील लेख समाविष्ट झालेले आहेत.
श्री उमेश कोठीकर - शब्द चांदण्याचे - http://www.maayboli.com/node/26707
श्री म भा चव्हाण - वाहवा - http://www.maayboli.com/node/23832
श्री गंगाधर मुटे - रानमेवा - http://www.maayboli.com/node/21810
==========================
किल्मिष नाही मनात काही कळकट माझी वसने नसती
मला न भासे ददात कसली कृपा ईश्वरी माझ्यावरती
तुम्हासारखा खुद्द आपला इथे मांडला लिलाव नाही
... राजहंस मी, उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही
तरुण कवी रणजीत पराडकर उर्फ मायबोलीकर 'रसप' यांचा 'राजहंस मी' हा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह हा या लेखाचा विषय आहे. नागपूरच्या विजय प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह देखणा आहे. 'भरपूर' आहे. काळ्या, जांभळ्या व हिरव्या रंगातील मुखपृष्ठ गूढ असून या काव्यसंग्रहास कवी अरुण म्हात्रे यांची विस्तृत प्रस्तावना लाभलेली आहे. स्वत: 'रसप' यांचे मनोगतही असून मळपृष्ठावर 'रसप' यांची देखणी छबी आहे. एकशे चार पानांच्या या अनेकविध काव्याविष्कारांच्या संग्रहाचे मूल्य रुपये एकशे वीस फक्त इतके आहे.
वरील ओळी शीर्षककवितेच्या, जी पहिलीच कविता आहे, तिसर्या कडव्यात आहेत.
या कवितेतून आपल्या लक्षात येते की कवी स्वतःकडे राजहंस असल्याची थोरवी घेत नसून राजहंस असल्याच्या मर्यादा घेत आहे. उंच भरारी मारता न येणे, कधीच कृद्ध होता न येणे, इतरांच्या कुटील नीतीशी फटकून स्वतःच्या डौलात विहरत राहणे आणि भक्तीमार्गावर आपला प्रवास चालू ठेवणे अश्या स्वतःसाठी असलेल्या चौकटीत जगाकडे बघण्याचा एक काव्यात्म दृष्टिकोन पुढे वाचायला मिळणार हे या शीर्षक कवितेत स्पष्ट होते.
माझ्यावर अन्याय झाला आहे, मी सच्चा आणि बाकीचे भोंदू आहेत, या मुखवटे धारण करणार्यांना एक दिवस समाज वाळीत टाकेल असा कोणताही मंचीय कवीचा पावित्रा न घेता 'जे आहे ते आहे' हे मी स्वीकारले तसे तुम्हीही मला स्वीकारा इतकाच लाघवी आग्रह रसपच्या कवितेत आढळतो. स्वतःला लार्जर दॅन लाईफ मानणारे व स्वतःची तीच स्वतःला आवडणारी प्रतिमा इतरांनाही आवडावी यासाठी आततायी प्रयत्न करून शेवटी हास्यास्पद ठरणार्या कवींच्या व गझलकारांच्या लाटेमध्ये हे नावीन्य उठून दिसते.
रसपच्या मनात अनेक विषय आहेत. सभोवतालाबद्दल आदर आहे व सभोवताल आहे तसा स्वीकारण्याची दिलखुलास वृत्ती आहे. टीका ही रसपच्या काव्याची 'जान' नाही. 'शान' तर मुळीच नाही. मराठी कवितेला धूसरतेचे आणि औदासीन्याने ओतप्रोत भरलेल्या आकर्षकतेचे नवे परिमाण देणार्या महान कवीवर्य ग्रेसांना श्रद्धांजलीपर रचलेल्या काव्यात रसप म्हणतो:
सुक्या पापणीला पुन्हा ओल येते
तुझ्या शब्दरंगात तेजाळुनी
जुनी वेदनाही तुझे गीत गाते
तुझ्या दु:खगंगेमधे न्हाउनी
जशी सांज तू पाहिली आर्ततेची
पुन्हा ती मनाला दिसावी कशी?
तुझी पावले थांबली अंबराशी
पुन्हा सांग मागे फिरावी कशी
कवीच्या मनाला अनेकांनी आजवर टीपकागदाची उपमा दिली असेल. मला रसपचे कवीमन एका गृहिणीच्या पदराच्या टोकाप्रमाणे वाटते. ज्याने पटकन आमटीचा डाव आमटीत बुडवण्याआधी पुसून घेतला जातो, लहान मुलाचे 'वरणभात्याने' बरबटलेले ओठ पुसले जातात, स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसला जातो, पटकन वारा घेतला जातो, जे टोक पोटाशी खोचले जाऊन कष्ट उपसले जातात आणि प्रसंगी कोणाचे लक्ष नाही असे पाहून स्वतःचेच डोळे पुसण्याच्याही कामी येते.
महानगरी मुंबईशी असलेली नाळ मुंबईच्या जीवघेण्या घाईची आठवण करून देते तेव्हा रसप म्हणतो:
कंटाळा करती, कधी न बसती, काट्यासवे चालती
पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती
तूही आजच जुंपलास झटण्या गाड्यास ऐसा खरा
झाला थोर जरी 'मनी' कमवुनी, तू घे विसावा जरा
शार्दुलविक्रीडितातील या ओळी 'आजच्या' मुंबईच्या आहेत. जी मुंबई समुद्रकाठावर आहे, जेथे अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत त्या मुंबईवरील या ओळी नाहीत.
एकेकाळी केलेल्या अल्लड वयातील प्रेमावर आपली त्यावेळची प्रेयसी आणि आपण स्वतः असे दोघेही आज हासत आहोत. त्यावेळच्या प्रेमाला वयानुसार वाटणारे आकर्षण समजून गंमत मानत आहोत. कारण आयुष्याने आपल्या वाटा तर बदलल्याच, पण प्राधान्येही बदलली आणि गांभीर्य वाढवले. आता त्यावेळचे ते प्रेम एक वेडेपणाच वाटतो. हे सगळे सांगून झाल्यानंतर कवितेच्या शेवटी रसप फक्त दोन ओळी अश्या लिहितो, की गलबलून यावे, पण गंमतही वाटावी:
'पण एकच काळजी वाटते
तुझ्या लहानगीने मला मामा म्हणू नये!
जखमेवरच्या खपलीला हसता हसता उघडू नये!'
कवीच्या मनःपटलावर उमटलेले सूक्ष्म तरल भाव अचूकपणे शब्दात टिपताना याही ओळी अवतरतात.
थेंब दवाचा गालावरती हलके टिपून घे ना
तुझ्याचसाठी मी लिहिलेली कविता लिहून घे ना
भास जरासा माझा होता घे तू मंद उसासा
रडून झाले बरेच आता किंचित हसून घे ना
हव्याहव्याश्या पळवाटांनी वळणे टाळुन जाऊ
आडोश्याच्या मुक्कामावर सोबत आपण येऊ
कधी न जुळणार्या वाटांवर सखे चालणे अपुले
ऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ
रसप यांच्या कवितेत शब्दांचे मार्दव ठायीठायी आढळते. आततायी, अतिरंजित शब्दयोजनेला या कवितेत थारा नाही. चपखलता योजण्यासाठी त्याला मधुर, तरल शब्दांच्या कोशापलीकडे जावेच लागलेले नाही. कवितेने कवितेसारखे सुंदर, नीटस, बोलके आणि लोभस असावे ही स्वतःची अपेक्षा दुसर्याचीही अपेक्षा बनवण्याची ताकद त्यांच्या या काव्यसंग्रहात आहे.
उदाहरणार्थः
मनात माझ्या कधी कुणाचा दरवळला चाफा
आठवणींच्या कल्लोळाचा भवताली ताफा
कधी वाटले जखडुन घ्यावे मिठीत कोणाला
पण लिहून कविता फक्त उठवल्या शब्दांच्या वाफा
प्रेयसी, समुद्र, अन्यायाने पिचलेला असहाय्य सामान्य माणूस आणि ईश्वर यांनी जर स्वतःच कविता लिहिल्या असत्या तर मी कशाला कविता लिहीत बसलो असतो? रसप हा प्रश्न विचारतो त्याच्या 'का लिहितो मी कविता' या कवितेत. या कवितेतील मूळ संकल्पना अत्यंत उत्तम आहे. माझी कविता ही यातील प्रत्येकाची, प्रत्येकावरची कविता आहे. ती जर त्या त्या व्यक्तीने, घटकाने लिहिली असती, तर मी कविता लिहिलीच नसती असे म्हणून तो श्रेयही नाकारतो.
याशिवाय रसपला लयीची ओढ आहे. मुक्तछंदाचे वावडे नाही. पण लयीवर भर आहे. सहज ठेका धरावा अश्या अनेक कविता आहेत. त्या त्या लयीमध्ये असलेला अंगभूत आशयगुणधर्म त्या लयीत गुंफलेल्या शब्दांमध्येही यावा याची काळजी घेतलेली आहे. जसे, 'हलकट जवानी' या गीताच्या चालीवर 'लग जा गले' हे गीत ऐकवले तर रसभंग होईल, तसेच लयीचेही असते. लयीला एक स्वतःचा असा आशयविषयक गुणधर्म असतो. आनंदकंदात प्रेरणादायी, सामाजिक, थेट असे विचार येतात तर हिरण्यकेशी लय ऐकताना जणू एखादी नृत्यांगना विभ्रम उधळत मोहक नृत्य करत आहे असा भास होतो. सुमंदारमाला तरल विचारांना प्रवाहीपणे व्यक्त करण्यास उत्तम लय असल्याचे जाणवते. रसपच्या या खालील सुमंदारमालेतील ओळी पाहा:
कळेना मला मी कुठे लुप्त होतो
निवारा तुझ्या सावलीचा मला
जणू सांजवेळी कुणी सप्तरंगी
मुखावर पदर रेशमी ओढला
विचारांस माझ्या नसे आज थारा
पतंगाप्रमाणे इथे वा तिथे
हवेच्या दिशेशी जुळे खास नाते
तुझा गंध मोहून नेतो जिथे
पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा मी नभाशी असा भांडतो
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन आपला वाटतो
मराठी कवितेने चेहरामोहरा बदलण्यात धन्यता मानलेल्या या काळात अशी लयदार कविता मन मोहवून गेली तर नवल नाही. वृत्ताशी, छंदाशी फटकून वागणे, त्यांच्यावर कृत्रिमतेचा आरोप करत बेडौल स्वरुपात स्वतःला सादर करणे आणि एकमेकांची वाहवा करत करत 'वास्तव कविता अशीच असते' अशी प्रतिमा निर्माण करणे हे मराठी कवितेने आज स्वीकारलेले वळण आहे. या वळणावर कोणीही कशीही कविता रचली तरी त्वरीत अनुयायी मिळवून तो रसिकमान्य कवीही ठरत आहे. पण जगाच्या कुटील नीतीशी संबंध न ठेवता राजहंसाच्या चालीने रसप आपली वाटचाल करत राहतो.
मी ती लोकल सोडली
फलाटावर नवीन गर्दी भरली
पुन्हा असंख्य चेहरे
बावरलेले... सावरलेले
डबडबलेले... थबथबलेले
पण सगळेच हरलेले
कदाचित हीच एक लढाई असावी
जिथे मध्यमवर्गीय जिंकतो
म्हणूनच असंख्य पराभव पचवून
रोज मनापासून लढतो
या ओळी आपल्याला साक्षात हळवे बनवतात. एका सामान्य मध्यमवर्गीयासाठी लोकलमध्ये शिरता येणे ही केवढी मोठी लढाई असते आणि ती एकमेव अशी लढाई असते जेथे तो जिंकू शकतो म्हणून तो रोज तीच लढाई लढतो असा संदेश असलेली ही कविता मलातरी अतिशय प्रभावी सामाजिक भाष्य वाटली.
तरुण वयात रसपने एक वेगळीच परिपक्वता दाखवली आहे. या खालील ओळी 'इथे असेच चालते' या कवितेतील आहेत.
भूतकाळ सांगुनी इथे कितीक माजले
'आज' त्यांस झेपला नसे म्हणून पांगले
शिळ्या कढीस ऊत आणणेच त्यांस भावते
इथे असेच चालते, इथे असेच चालते
वर लिहिल्याप्रमाणे रसपकडे विषय अनेक आहेत. 'शेवटचा जंटलमन (राहुल द्रविड)' ही कविता असो किंवा 'सिगरेट उवाच' ही कविता असो! 'माझ्यात वेगळे काय' ही कविता असो किंवा 'कविता... कविता... कविता' ही कविता असो! 'अगतिक पुरुषांचं काय' ही कविता असो किंवा 'ए के हंगल यांना श्रद्धांजली' ही कविता असो! या मजेशीर ओळी बघा:
'आजकाल मला प्रत्येक पुरुष दीनवाण दिसतो
बायको नावाच्या भुताने पछाडलेला वाटतो
आणि तुम्ही म्हणता
महिलांवर अत्याचार होतो...?
च्यायला, हे बरंय!!'
'राजहंस मी'!
एक देखणा काव्यसंग्रह!
रसप यांच्या कवितेत सामाजिक बांधिलकी आहे, तरल प्रेमभावना आहेत, निसर्गाच्या विविध रुपांची रेलचेल मानवी मनावर परिणाम करताना दिसत आहे, विषयवैविध्य आहे, आकृतीबंधातील वैविध्य आहे. गझल हा काव्यप्रकार या संग्रहात कटाक्षाने टाळलेला आहे व ते बरेही झालेले आहे.
रसप यांची भाषाशैली खानदानी आहे. नुसतेच रक्त, हुंदके, प्रेते, चिता, गटारे यांनी काव्य वास्तववादी होते हा भलताच गैरसमज त्यांनी होऊ दिलेला नाही. जबाबदारीने काव्यभावना प्रकट केलेल्या आहेत.
रसप यांच्या कवितेवर मात्र एकुणच जुन्या वळणाच्या काव्यसादरीकरणाचा, काव्यमांडणीचा प्रभाव किंचितपणे व नकळतपणे आलेला मला वाटला. प्रत्येकावर कसला ना कसला प्रभाव असतोच. 'अॅबसोल्यूट' काव्यनिर्मीती 'सध्या' शक्य नाही. हा प्रभाव वाटणे ही टीका नाही. केवळ एक निरिक्षण आहे. एक चांगली बाब म्हणजे चांगली गझल रचत असूनही रसप यांच्या कवितेवर गझलेच्या आकृतीबंधाचा व गझलगुणांचा उगीचच प्रभाव नाही.
रसपची कविता आव आणत नाही. ती वाचकाला फक्त रसपचा चष्मा थोडा वेळ वापरायला देते.
काही नकारात्मक बाबीही - ज्या मला वाटल्या त्या - द्यायला हव्यात असे मला वाटते.
रसपची कविता फार थेट आहे. जे सांगायचे आहे तेच सांगितलेले आहे. रीडिंग बिटवीन द लाईन्स हा प्रकार फारसा नाही. यामुळे सगळीच कार्ड्स ओपन करून बसलेल्या खेळाडूप्रमाणे आपल्याला त्यांचे मन वाचता येते. मी येथे कविता क्लिष्ट करण्याबाबत म्हणत नसून कवितेत रसिक गुरफटावा अशी त्या कवितेची मांडणी नाही असे म्हणत आहे. 'समजली, पण अजून समजेल काही दिवसांनी' किंवा 'समजली, पण काहीतरी नाही समजले असेही त्यात आहे असे वाटले' अशी भावना निर्माण करू शकणारी कविता रसिकमनाला अधिक भिडते कारण तिची निर्मीतीच मुळी काव्यात्मतेच्या गूढ पातळीवर झालेली असते.
दुसरे म्हणजे अल्पाक्षरीत्वाला रसपच्या कवितेत स्थान मिळालेले दिसत नाही. बहुतांशी कविता विस्तारलेल्या आहेत. काही कवितांमध्ये शेवटच्या दोन पाच ओळीत सर्वच सामावले गेल्यासारखे झालेले आहे. कमीतकमी शब्दांमध्ये तितकेच प्रभावी चिंतन देता येईल का याचा विचार झालेला दिसत नाही.
तिसर्या नकारात्मक बाबीसाठी मात्र रसपला काहीच दोष देता येणार नाही. ती बाब म्हणजे आयुष्याचा बराचसा अनुभव अजून पदरी (बहुधा) यायचाच असल्यामुळे विचारांची खोली जी अधिक गाठता आली असती ती गाठली गेली नाही असे काही ठिकाणी आढळते. अर्थातच, ही बाब दिवसेंदिवस कमीकमी होत जाईल व त्यांची कविता अधिक 'डीप' होईल यात शंका नाहीच.
एकुण, तुमच्याआमच्याशी स्वतःच्या काव्यलेखनद्वारे व अभिप्रायांमार्फत दररोज संवाद साधणारा हा एक तुमच्याआमच्यातलाच तरुण कवी जे लिहून गेला आहे ते संग्रही बाळगण्याजोगे व वाचनीय निश्चीत आहे.
रसपला शुभेच्छा!
धन्यवाद!
===================================================
-'बेफिकीर'!
मस्त उहापोह घेतलात! मी वरवर
मस्त उहापोह घेतलात!
मी वरवर चाळला आहे काव्यसंग्रह, लवकरच सखोल वाचेन.
रणजितला अनेकानेक शुभेच्छा.
वाह ! सुंदर विवेचन
वाह !
सुंदर विवेचन बेफिजी.....कविता संग्रह वाचायलाच हवा आता !
धन्यवाद !
________/\_________ !! बाकी
________/\_________ !!
बाकी फोनवर.............
भूषण, चांगला
भूषण, चांगला उपक्रम.
धन्यवाद.
तुला एव्हढी एनर्जी कुठून येते देवास ठाऊक.
क्या बात है!!
क्या बात है!!
वाह बेफीजी रजहंस मी हा एक
वाह बेफीजी
रजहंस मी हा एक खूपच छान कवितासंग्रह आहे
मला सांप्रत काळातील मराठी काव्यसंग्रहात तो अतीशय महत्त्वाचा वाटतो अन् कवींमधे जितू !
सुरेख परिचय बेफिकीर! मला
सुरेख परिचय बेफिकीर! मला कवितेतलं फारसं काही कळंत नाही. पण तुमचा लेख वाचून उत्सुकता चाळवली गेलीये.
आ.न.,
-गा.पै.
अभिनंदन रसप आणि बेफिकीर
अभिनंदन रसप आणि बेफिकीर !
खूपच हृद्य परीक्षण, निरीक्षण एका समकालीन कदाचित किंचित ज्येष्ठ कवीने आपल्या मित्राच्या, एका आघाडीच्या अन धडाडीच्या कवीच्या कवितांचे केले आहे.
मी अजून ''राजहंस..'' मिळवून वाचू शकले नाही पण योगायोगाने बेफिकीर यांनी उद्धृत केलेल्या रसपंच्या ओळी अन्यत्र वाचल्यात अन मनात घर करून त्या राहिल्यात.
पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा मी नभाशी असा भांडतो
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन आपला वाटतो..
कवीच्या कवितागत परिपक्वतेचे अन वयाचे काही समीकरण नाही हे मी वयाचे अर्धशतक पार केल्यावर म्हणू शकते.कवी अठराव्या वर्षी जास्त परिपक्व असू शकतो अन नंतर स्वतःला पुनरुक्त करत राहू शकतो...
कोणताच विषय वर्ज्य नसून व पुरेशी प्रामाणिकताही असूनही रसप मूलतः रोमँटिक आहेत त्यांचे अनुभवविश्व राजसी आहे हे जाणवत रहाते, एका बाजूने जे शैलीचे सामर्थ्य असते तीच दुसर्या बाजूने तिची मर्यादा ठरते.
ग्रेसांच्या गूढतेची हवीहवीशी वाटावी इतपत सुमधुर मात्रा रसप यांच्या शैलीत आहे,रसपंच्या कवितेतील छंदोबद्ध/लयबद्ध रुपबंधांचे ,त्यांच्या वृत्तीविशेषांचे अचूक समालोचन तुम्ही केले आहे.
मराठी समकालीन कवितेवरही भाष्य केले आहे.
कवितेला सजवणे/तिचे मूलतः सुंदर असणे/ समकालीन वास्तवातील व्यामिश्रतेचा वेध घेण्यास कवितेने कमी पडणे असे अनेक गंभीर मुद्दे यात आले आहेत.
मर्ढेकरांनंतर त्या प्रकारचं वास्तवाचं वस्तुनिष्ठ 'विश्वरूपदर्शन' मराठी कवितेत काव्यमयता न गमावता अभावानेच दिसले आहे.आणि तरीही करंदीकर,बोरकर,रेगे,ग्रेस आपापला इतिहास आपापल्या अनोख्या शैलीत घडवून स्टेजवरून एक्झिट घेऊन गेले आहेत.
आज,
>>बरीचशी कविता समाजमन ढवळून काढत नाही. टाळ्या, वाहवा मिळवते आणि पुरस्कार, मोमेंटोज मिळवते. शाली, श्रीफळ आणि मानधन मिळवते पण रसिकाच्या मनात खोलवर घुसत नाही. अभिनिवेश असतो पण 'सबस्टन्स' कमी पडतो, असे काहीतरी वाटून जाते>>>>
असे एकीकडे आणि स्वतःला बंडखोर जाहीर करण्यासाठी कवितेला विद्रूप करणे दुसरीकडे अशा आवर्तांमध्ये मराठी कविता सापडली असता रसप आपला आत्मस्वर न गमावता सकस कविता लिहीत आहेत. याचे मूल्यमापन दुसरा एक प्रगल्भ कवी करत आहे हे वाचून आनंद झाला.
दोघांनाही शुभेच्छा.
सर्व प्रतिसाददात्यांचा
सर्व प्रतिसाददात्यांचा मनापासून आभारी आहे.
-'बेफिकीर'!
तुला एव्हढी एनर्जी कुठून येते
तुला एव्हढी एनर्जी कुठून येते देवास ठाऊक.>>> +१११
कवीच्या मनाला अनेकांनी आजवर
कवीच्या मनाला अनेकांनी आजवर टीपकागदाची उपमा दिली असेल. मला रसपचे कवीमन एका गृहिणीच्या पदराच्या टोकाप्रमाणे वाटते. ज्याने पटकन आमटीचा डाव आमटीत बुडवण्याआधी पुसून घेतला जातो, लहान मुलाचे 'वरणभात्याने' बरबटलेले ओठ पुसले जातात, स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसला जातो, पटकन वारा घेतला जातो, जे टोक पोटाशी खोचले जाऊन कष्ट उपसले जातात आणि प्रसंगी कोणाचे लक्ष नाही असे पाहून स्वतःचेच डोळे पुसण्याच्याही कामी येते.>>>>> क्या ब्बात!
रणजीत, बेफि.. अभिनंदन आणि "राजहंस"ला खूप खूप शुभेच्छा!
बढाई सांगत नाही, पण आजवर अनेक
बढाई सांगत नाही, पण आजवर अनेक जणांनी माझ्या ह्या पुस्तकाची स्तुती केली. ह्यातील काही मित्रच होते.. काही नातेवाईक होते.. काही अगदी अनोळखी लोक, ज्यांच्याकडे पुस्तक कुठल्याश्या माध्यमाद्वारे पोहोचले, ते होते... काही थोडीशीच ओळख असलेलेही होते आणि काही प्रस्थापित कलाकारही. ह्या स्तुती करणाऱ्या अभिप्रायांनी, गेल्या महिन्याभरात क्षणभर, मिनिटभर.. तासभर... असा सगळा मिळून भरपूर आनंद दिला.
पण, असं विस्तृत, अभ्यासपूर्ण विश्लेषण मिळालं नव्हतं. माझ्यासारख्या नवोदिताला असं काही मिळणं कठीणच. बहुतकरून, आपला वेळ, प्रत्येक जण, एखाद्या बहुचर्चित कलाकृतीवर किंवा प्रस्थापित कलाकाराच्या निर्मितीवर लिहिण्यासाठी देतात. परंतु, बेफिकीरजींसारख्या कसलेल्या कवी-गझलकार-लेखकाने आवर्जून इतका वेळ एका नवीन पुस्तकासाठी द्यावा त्याचा अभ्यास करून इतकं सुंदर भाष्य करावं, ह्यामुळे माझे जे उत्साहवर्धन झाले; त्याला मोल नाही.
माझ्यासाठी ह्या लेखाच्या अखेरीस दिलेले ३ मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत, माझ्या चिंतनासाठी. पैकी, तिसऱ्या मुद्द्यावर - बेफीजींनीही म्हटले आहेच - माझा 'कंट्रोल' मर्यादित असेल, तरी स्वानुभवातून नाही, तर इतरांच्या अनुभवातून तरी मी स्वत:ला अधिक समृद्ध नक्कीच करू शकतो; तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करीन. अरुण म्हात्रे सरांनी माझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे, मला इतरांच्या हृदयांच्या चुकलेल्या ठोक्यांचा हिशोबही ठेवायलाच हवा !
धन्यवाद बेफीजी.
भारती ताई, आपल्या प्रतिक्रिया
भारती ताई,
आपल्या प्रतिक्रिया नेहमीच खूप मोठी शाबासकी असतात.. अधिक काय बोलावे ??
सर्वांचेच आभार.
भूतकाळ सांगुनी इथे कितीक
भूतकाळ सांगुनी इथे कितीक माजले
'आज' त्यांस झेपला नसे म्हणून पांगले
शिळ्या कढीस ऊत आणणेच त्यांस भावते
इथे असेच चालते, इथे असेच चालते
बढिया.
उत्तम आढावा,
उत्तम आढावा, बेफि़कीर!
रणजितच्या लिखाणाच्या शैलीतील सौदर्यस्थळं वाचकांसमोर ठेवताना तितक्याच प्रामाणिकपणे नकारात्मक/ सुधारणेस वाव असणार्या बाबीही ठळकपणे मांडल्यात! तुमच्या नजरेतून 'राजहंस' भावला, संधी मिळताच हा काव्यसंग्रह वाचण्यास आवडेल.
रणजित,
आपण लिहून गेलेल्या कवितांकडे एखाद्या साहित्यमित्राने त्रयस्थासारखे बघून असे समीक्षण केल्यास आपसूकच मार्गदर्शन घडते, नाही का..
अशाच यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
आपण लिहून गेलेल्या कवितांकडे
आपण लिहून गेलेल्या कवितांकडे एखाद्या साहित्यमित्राने त्रयस्थासारखे बघून असे समीक्षण केल्यास आपसूकच मार्गदर्शन घडते >> नक्कीच !!
मी असाच शिकत आलो आहे.... असाच शिकत राहाणार आहे..
धन्यवाद !!
प्रतिसाददात्यांचा आभारी आहे.
प्रतिसाददात्यांचा आभारी आहे. कितीजणांनी वाचला हा संग्रह?
अरेच्चा कसं काय मिसलं हे
अरेच्चा कसं काय मिसलं हे ???
बेफिकिर - फारच सुंदर आढावा .... अतिशय सुयोग्य पद्धतीन घेतलेला - समीक्षणात्मक असला तरी उगाचच शब्दबंबाळ नसलेला - एखाद्या जिवंत झर्यासारखा खळाळणारा आणि त्यामुळेच अतिशय वाचनीय असा ...
रणजित - मनापासून अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा .....
तुझ्या विविधरंगी, विविधढंगी कविता आवडतातच .. अशाच अजूनही कविता तुझ्याकडून येवोत ही शुभेच्छा...
पुण्यात कुठे मिळेल हा काव्यसंग्रह ?? अन्यथा कसा मिळवता येईल ??
khpach sundar ...
khpach sundar ...
मला रसपचे कवीमन एका
मला रसपचे कवीमन एका गृहिणीच्या पदराच्या टोकाप्रमाणे वाटते. ज्याने पटकन आमटीचा डाव आमटीत बुडवण्याआधी पुसून घेतला जातो, लहान मुलाचे 'वरणभात्याने' बरबटलेले ओठ पुसले जातात, स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसला जातो, पटकन वारा घेतला जातो, जे टोक पोटाशी खोचले जाऊन कष्ट उपसले जातात आणि प्रसंगी कोणाचे लक्ष नाही असे पाहून स्वतःचेच डोळे पुसण्याच्याही कामी येते.>>>> व्वा.....
खूप सुंदर… !!!
अभिनंदन रसप…!!!