कवितेचा परिचय - उमेश कोठीकरांचे चांदण्यांचे शब्द

Submitted by बेफ़िकीर on 20 June, 2011 - 05:37

http://www.maayboli.com/node/21810 - कवितेचा परिचय - भाग १ - गंगाधर मुटे

http://www.maayboli.com/node/23832 - कवितेचा परिचय - भाग २ - ज्येष्ठ कवी म भा चव्हाण

=======================================================================

मायबोलीवरचा उमेश कोठीकरांचा फोटो पाहून मला वाटले होते की तिशीचा तरुण असावा. प्रत्यक्षात ते बरेच मोठे आहेत व शासकीय नोकरीत अत्यंत उच्च पदावर आहेत हे ऐकून तर मी उडालोच! इतक्या रूक्ष वातावरणात कविता?

त्या रविवारी संध्याकाळी जयंत बेंद्रेंच्या कथासंग्रहाचे व उमेश कोठीकरांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते व मी कोणतीही विनंती बिनंती न करता आधीच कोठीकरांना सांगीतले होते की मला तुमच्या कवितेविषयी बोलायचे आहे. त्यावर अत्यंत टाइट शेड्यूलमध्येही त्यांनी भली मोठी ' पाच मिनिटे ' माझ्यासाठी ठेवली व ते कार्यक्रमपत्रिकेत चक्क जाहीरही केले. मला त्याचे नवल वाटण्याचे कारण असे की ज्या कार्यक्रमात सदाशिव अमरापूरकर व राजन खान यांच्यासारखी मंडळी / वक्ते होते त्यात मला बोलायची मूभा मिळणे म्हणजे जरा जास्तच होते.

एका अत्यंत दिमाखदार कार्यक्रमात या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. आपल्या सर्वांना त्यांची कविता परिचीत व आवडणारी आहेच. पण या कवितेवर औपचारिक असा एक लेख असणे आवश्यक आहे असे मला वाटले याचे कारण अशी कविता आता जरा कमीच दिसते.

अर्थात, गिरीश कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, जयश्री अंबासकर अशांनी या पुस्तकात स्वतःचे अभिप्राय नोंदवलेले आहेतच.

उमेश कोठीकरांच्या कवितेत प्रेमभावनेला सर्वोच्च स्थान असल्याचे दिसते. ही भावना ते शब्दांचे अवडंबर न माजवता, मोजकेपणाने व प्रभावीपणाने मांडताना दिसतात.

उर्दू शायरीत नेहमी असे म्हंटले जाते की प्रेमभावनेवर भाष्य करणे तसे अवघडच! कारण कोणत्या बिंदूला ते शुद्धतेची मर्यादा ओलांडेल आणि उथळतेच्या मोहमयी जालात फसेल ते सांगणे अवघड! कोठीकरांनी प्रेमाचे पावित्र्य अबाधीत ठेवूनच व्यक्तीकरण केलेले आहे हे ठळकपणे नोंदवायला हवे.

लयबद्धता हा गुण कोठीकरांनी जाणीवपुर्वक जोपासलेला आहे. त्यांच्याकडे वृत्तवैविध्य फारसे आढळत नाही. पण त्याची जरूर आशयाला नसतेच, त्याची जरूर स्कॉलरशिपसाठी असली तर असेल! ज्यांना विविध वृत्तांची ओळख करून हवी असेल त्यांनी निफाडकरांचे स्वप्नमेणा वाचावे! पण कोठीकरांनी प्रेमातील सूक्ष्म भाव प्रकट केलेले दिसतात. तसेच त्यांच्या खालील ओळींसारख्या ओळींमध्ये काव्यात्मकता काठोकाठ दिसते.

आठवणींच्या मृदू हातांनी
अलगद डोळे असे पुसावे

आठवणींचे हात म्हंटलेले आहे. त्यातही त्या हातांना मृदू हे विशेषण दिलेले आहे. आठवणींनीच डोळे भरून येत आहेत आणि आठवणींनीच ते पुसायचे आहेत अशी ही सुंदर कल्पना!

ललाटातल्या भेगांमधुनी
भाग्य तुझे तू भरशील का
स्वप्नकोरड्या संसाराची
वैतरणा तू करशील का

आजच्या 'वाहवा, क्या बात है आणि जिंकलंस मित्रा' असे भारंभार प्रतिसाद मिळवणार्‍या हजारो कवितांपेक्षा या ओळी अधिक सूज्ञ, जबाबदार, सखोल व सुखद ठरतात.

आठ्यांना 'दुर्दैवामुळे व स्वप्नहीनतेमुळे पडलेल्या भेगा' म्हंटलेले आहे. भेग या शब्दात जखम, रुक्षता व रखरखीतपणा आहे. तेथे तुझ्या भाग्याची वैतरणा वाहवशील का असे विचारणे हे कवितेला 'खरा' न्याय देणे आहे.

कोठीकरांचे व्यक्तीमत्व उमदे व हासरे आहेच! पण ते फसवेही असावे. कारण त्या स्मितहास्यामागे कवितांच्या अशा ओळी असतील यावर विश्वासच बसत नाही. अशा ओळी रचणार्‍याचा चेहरा फ्रस्ट्रेटेड दिसायला हवा. पण कोठीकर रचलेल्या कवितेला मुलीला सासरी पाठवावे तसे प्रकाशित करून पुन्हा हासताना दिसतात.

कुणालाही मैत्री करावीशी वाटावी असे हे व्यक्तीमत्व कवितेत आपले रंग पालटते.

'पुरुषांनो एवढे करून दाखवा' या मुक्तछंदातील रचनेत ते पुरुषांना सांगतात की एकाने तरी सती जाऊन दाखवा?

'एका तरी पुरुषाने... सती जाऊन दाखवा
आवडत्या बायकोसाठी
बघायचंय आम्हाला
खाली जाळ लागताच... बुडाला
कसे येताय केकाटत, टुण्णदिशी उडी मारून
सरणावरून पेटलेले बूड घेऊन
हात जोडत; ही रुढी बदलण्यासाठी'

व्वा! 'हात जोडत; ही रुढी बदलण्यासाठी'! सती जावे लागणार्‍या महिलांसाठी एक तरी सेकंद डोळा ओला होतोच!

'एक करून दाखवा
झोपला असाल किंवा नसाल... कोणा दुसरीसोबत
तरी... वनात जाऊन दाखवा, काही वर्षं तरी
किंवा अग्नीपरिक्षा....
धोब्याने सर्टिफिकेट दिले तरी; आमच्यासाठी...
बघायचंय आम्हाला... तुमचा त्याग, समर्पण! '

स्वतःला गाजवत गाजवत समारंभपुर्वक मोठे होणारे कवी आणि समीक्षक चिक्कार आहेत. पण अंतर्मुख होऊन आणि तरीही समाजाकडे डोळसपणे पाहून कविता करणारे कमी आहेत.

अस्तित्वाच्या पल्याड जेव्हा नाव तुझे आत्म्याने घ्यावे
नकोच मुक्ती, येइन धावत जन्म जन्म हे तुझ्याच नावे

कोठीकरांच्या अदृष्य प्रेयसीपती असलेल्या निष्ठांचे उच्चस्थान प्रत्येक ओळीतून जाणवत राहते.

ही प्रेयसी त्यांची पत्नी असो, त्यांची जिंदगी असो वा साक्षात त्यांची स्वतःची कविता!

वितळुन टाकिन मी सोन्याचे, देव्हार्‍यातिल भोगी दानव
शोधुन काढिन पुटे स्वाहुनी शांत, निरागस, सच्चा मानव

मोह, लालसा, हिडिस वासना, दग्ध करूनी फसवे नायक
लख्ख लख्ख मग आकाशासम होइल पृथ्वी जगण्यालायक

पृथ्वीला मी जगण्यालायक करेन अशी तमाम मराठी कवींची शेखी मिरवण्याची सवय जरी समाविष्ट असली तरीही त्यात 'सध्याची पृथ्वी चांगल्या माणसांना जगण्यालायक नाही आहे' याची खंत अधिक लक्ष वेधून घेते. आणि त्याचमुळे ती शेखी, शेखी न वाटता गंभीर भावना होऊ लागते.

मात्र मला कोठीकरांच्या कवितेत विषयांचे वैविध्य किंचितसे कमी आढळले. हे माझे वैयक्तीक मत असून ते चुकीचेही असेल हे मला माहीत आहे.

वियोग, बेभान प्रेम आणि समाजातील दुष्ट रुढी किंवा पारंपारीकरीत्या स्त्रीवर रचलेले काव्य असे प्रामुख्याने स्वरूप म्हणता यावे.

नव्या आणि आपल्या पिढीतील 'जनरेशन गॅप', आयुष्यातील ताण, निसर्ग, अध्यात्म, विनोदाची किंचितशी पेरणी हे प्रकार कवितेत मलातरी आढळले नाहीत. मात्र या मताला छेद देणारी एक मुक्तछंदातील रचना निश्चीतच लक्ष वेधते.

काही हजारांसाठी फाशी घेतलेल्या बापाचा
उदास चेहरा
डोळ्यांपुढून हटत नाही
तरी पोटाची आणि पोटाखालची भूक
काही केल्या मिटत नाही
दूरवर कुत्सित हसणारा
हरामी मृत्यूही
पुढे येऊन भेटत नाही
पण,
आशेने पाहणार्‍या आईची
अजूनही ओली नाळ तोडून
पुढला जन्म
ऐषोआरामी कसा घ्यावा
हे गणित काही सुटत नाही

कोठीकरांच्या या खालील ओळी मात्र मला चटकाच लावून गेल्या.

अशी प्रेमळ सावली
जीव लावते उन्हाशी
हवी तिलाही सावली
पण बोलेल कुणाशी?

आणि त्याच कवितेतल्या या ओळी वेगळाच मूड देतात.

प्रणयात धरतीला
रवी दाह दाह देतो
मग भिजवण्या तिला
सखा आषाढ वाकतो

प्रकाशक प्रवीण जोशी यांनी प्रकाशित केलेला कोठीकरांचा हा काव्यसंग्रह संग्रही असण्यासारखा तर आहेच पण मुरवत मुरवत वाचत राहण्यासारखाही आहेच. अत्यंत सुंदर रंगसंगतीतील काहीसे संदिग्ध चित्र आतील आशयाची चुणूक दाखवते. याचा अर्थ आशय संदिग्ध आहे असे मुळीच म्हणायचे नसून वैविध्यपूर्ण कवितांचे एक असे मिश्रण निर्माण झलेले आहे जे सध्याच्या निराशामय कवितामध्ये दुर्मीळ वाटेल. रु. १०० अशी 'फक्त छापील' किंमत असलेला हा कवितासंग्रह रुपये पाचशे मोजून घ्यावा असाच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

वाह !!

उमेशजींच्या जास्त कविता वाचनात आलेल्या नाहीत अजुन तरी ...पण "अर्पणपत्रिका "..." तु नसतास तर " ह्या कविता वाचुन रोमांच उभे राहिले होते !!

बेफिकीर धन्यवाद !

तुमच्या लिखाणाचा झपाटा पाहून मी तुमची फॅन झालेय...एकाच वेळी किती वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करताय Happy

वैभव परफेक्ट, धन्यवाद तुमचे, उमेश बद्दलच वर्णन तंतोतंत केल आहे तुम्ही. Happy
उमेश म्हणजे, विनम्र आणि लाघवी व्यक्तीमत्व..!!!
प्रकाशनाला मी उशीरा आल्याने तुमचे विचार ऐकयला नाही मिळाले याच आता वाईट वाटत आहे.

अरेच्या, हे कसे काय वाचायचे राह्यले ????
सुर्रेख लिहिलंय बेफिंनी - मनापासून धन्यवाद....
कविराजांच्या कवितांवर मी पामर काय बोलणार - अतिशय समृद्ध कविता आहेत उमेशजींच्या.
उमेशराव - कुठे आहात व हा कवितासंग्रह कुठे उपलब्ध होईल ??

बेफिजी नेहमीप्रमाणेच अर्थपूर्ण लेख. खूप सुंदर शब्दात मांडता तुम्ही प्रत्येक विचार.