कवितेचा परिचय - ७ - जन्म कवितेचा - कविता क्षीरसागर

Submitted by बेफ़िकीर on 23 September, 2015 - 09:55

आधीचे लेखः

हौस - डॉ. समीर चव्हाण

रानमेवा - गंगाधर मुटे

वाहवा - म भा चव्हाण

चांदण्यांचे शब्द - उमेश कोठीकर

राजहंस मी - रणजीत पराडकर

श्वासांच्या समिधा - सतीश दराडे

==================================================

---------------------जन्म कवितेचा - कविता क्षीरसागर-----------------------------

कविता क्षीरसागरांशी माझा परिचय अलीकडेच झाला. एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर त्यांच्या कवितेमधून झालेला परिचय जेव्हा प्रत्यक्ष भेट होण्याइतपत वृद्धिंगत झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाची प्रत मला दिली. तो संग्रह वाचल्यानंतर ह्या लेखमालिकेत त्या संग्रहाची माहिती समाविष्ट करावीशी वाटली. ह्या लेखात कविता क्षीरसागरांची कविता मला कशी वाटली ते लिहीत आहे.

अनेकदा लिखाण वाचून माणूस उलगडतो आणि अनेकवेळा माणूस अधिक उलगडला की लिखाण अधिक परिचित व समर्थनीय वाटू लागते. कविता क्षीरसागरांशी माझा परिचय आता दृढ झाला असल्याने ह्या लेखात त्यांचा उल्लेख मी 'कविता' असा एकेरीच करत आहे.

'नावातच कविता आहे' वगैरे पुस्तकी विधान करणे उचित वाटत नाही. पिंजर्‍यातील पक्ष्याच्या फडफडीचा आवाज ऐकल्याची भावना कविताचे काव्य वाचताना येते. संस्कृतीकडून आपल्यावर घालण्यात आलेल्या मर्यादांची बोचरी जाणीव सातत्याने आढळते. त्या मर्यादांमध्येच मग सुखदु:खे शोधत बसणे, आनंद मानत बसणे, चाकोरीत जगण्यातच चाकोरीबाह्य जगतो आहोत असे गृहीत धरणे ही कविताच्या कवितेची स्वभाववैशिष्ट्ये जाणवली.

'आपली कविता कोण वाचणार आहे' ह्याची पर्वा कविताला अजिबात नाही. तिला जे म्हणायचे ते म्हणून ती मोकळी होते. ह्या कवितेत अनेक ठिकाणी आलेली प्रतीके थोडा वेळ बाजूला ठेवली तर कविताची कविता कोणत्याही काळात लागू होऊ शकणारी आहे. मात्र प्रतिमा - प्रतीके - रूपके ह्यांच्याबाबतीत कविता तेच जुने पारंपारिक मार्ग चोखाळते. पाऊस, फुले, गंध, आकाश, राधा-कृष्ण वगैरे!

पण संथ लाटा येत आहेत असे म्हणून थोडे आत जावे आणि एकदम एखादी मोठी लाट यावी आणि तिने आपल्याला पार काठापर्यंत ढकलावे तश्या मधूनच काही कविता झटका देऊन जातात.

हे कविताचे काही हायकू असेच अचानक ओवलेले आहेत.

एक नाजूक पक्षी
किती सहज उडतोय
आभाळ पाठीवर घेऊन

सूर्योदय आणि सूर्यास्त
दोन्ही चित्रात सारखेच रंग
पण किती भिन्न आशयतरंग

सभोवती निसती बघ्यांची गर्दी
किती बिनधास्तपणे भ्रमर
रुंजी घालतोय फुलावर

हा शेवटचा हायकू काहीसा उपरोधिक, टीकात्म आणि वास्तव आहे. पहिल्या दोन्हींमध्ये घालमेल आलेली आहे.

एका कवितेतील ह्या ओळी:

डोळ्यांत प्राण आणून
कुणी वाट पाहत असता
वार्‍याने हळूच कडी वाजवणं
हे काही बरं नव्हे!

खिन्नता मांडताना तक्रारीचा सूर अंगावर येणार नाही ह्याची काळजी घेणे हे असे!

"ब्रशच्या एका फटकार्‍यात
झाडांची आऊटलाईन काढून
तू मोकळा होतोस -
आणि मी त्यातले
पान अन् पान जिवंत करत राहते

तसे आपण दोघेही चित्रकारच

पण आपला कॅनव्हासच वेगळा आहे"

सांसारिक आयुष्यात स्त्रीकडे येणार्‍या पारंपारिक आणि जखडून ठेवलेल्या भूमिकेचे आणि त्यातही त्या स्त्रीने चांगले काहीतरी निर्माण करायला पाहण्याचे हे सुरेख वर्णन!

कविताच्या काही कविता अश्या 'जे जसे आहे तसे आहे' अश्या शैलीने आकारत जातात. ह्या कवितांना अलंकार, वर्णनात्मकता, बडेजावी शब्द ह्यांच्या कुबड्या लागत नाहीत.

संसाराच्या दैनिक परिक्षांचे पेपर सोडवताना चुकून वेळ मिळालाच तर स्वतःपेक्षा अधिक दु:खी लोक दिसतात कविताला:

'एक दिवसच फक्त
बंद पडलाय एसी
होई अंगाची काहिली
झाले कशी वेडीपिशी

उन्हातान्हात फोडते
बाई कुणीशी पत्थर
काचेतून पाहताना
माझी मीच निरुत्तर'

एका कवितेचा शेवट करताना कविता म्हणते:

माझे आईपण नवे, वय चाळीशीच्यावर
कूस वांझ नाही माझी, तूच त्यांना दे उत्तर

कविताच्या कवितेत मला काही मर्यादा किंवा कमतरताही जाणवतात. अष्टाक्षरीचा मुबलक वापर, मध्यमवर्गीय स्त्रीच्या नशिबात आलेल्या सर्वसामान्य समस्यांच्या चित्रणात अधिक गुरफटले जाणे, मराठी कवितेतील अतिरिक्त वापराने काहीश्या नीरस झालेल्या प्रतिमांचा वापर, अंतर्मनातून बाहेर पडण्याचे कष्ट घेण्याचा काहीसा कंटाळा केला जाणे ह्या मला जाणवलेल्या मर्यादा! त्या कदाचित समर्थनीय असतीलही.

कविताच्या कवितांमधून काहीतरी जबरदस्त मिळेल अश्या अपेक्षेने ही कविता वाचणे अन्याय्य ठरेल. कविता प्रातिनिधित्त्व करत आहे आजच्या युगातील एका अश्या स्त्रीचे जिच्याकडून अपेक्षा उदंड आहेत पण जिला मनही आहे हेच नाकारले जात आहे. त्यामुले आपसूकच ही कविता साधेपणाने आपली गार्‍हाणी, आपल्या जाणिवा आणि आपल्या अपेक्षा नोंदवत राहते.

कविता एक व्यक्ती म्हणून काहीशी गूढ, अबोल आहे, अचानक सापडलेल्या बेटासारखी आहे. पण तिची कविता अशी आहे जणू की कवयित्री कविता आपल्याला केव्हापासूनच नीट परिचित आहे असे वाटावे.

सिग्नेट पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या 'जन्म कवितेचा' ह्या काव्यसंग्रहाला मंगेश पाडगावकरांचा वाचनीय अभिप्राय लाभलेला आहे. एका कळीच्या जन्मावेळचे चित्र मुखपृष्ठावर असून मळपृष्ठावर कविताचे छायाचित्र व पाडगावकरांचा संदेश आहे. संग्रहाचे मूल्य रु. ६० आहे. संग्रहावर कवयित्रींचे नांव कविता कुलकर्णी असे आहे.

कविता क्षीरसागर ह्या एक जुन्या कवयित्री आहेत. लहानपणापासून काव्यलेखन करत आहेत. आता आयुष्याच्या माध्यान्हीला त्यांच्या कवितेत 'सावली मागण्यापेक्षा सावली देण्याची वृत्ती' दिसत आहे. ह्यापुढे त्यांची कविता कशी वळणे घेईल हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

त्यांच्या कवितेतील एक अचानक उसळलेल्या लाटेसारखी तीक्ष्ण कविता देऊन थांबतो.

'गिधाडे म्हणाली माणसांना

आम्ही बरे तुमच्यापेक्षा

प्राण्यांचे लचके तोडण्यासाठी
आम्ही निदान ते मरण्याची तरी
करतो प्रतिक्षा...'

कविता क्षीरसागरांना शुभेच्छा!
=====================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users