पिकलेल्या पेरुचा मेथांबा

Submitted by सायु on 7 December, 2015 - 03:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मध्यम आकाराचे पिकलेले पेरु.
(पेरु निवडतांना त्याचे आवरण जरा खरबरीत असावे, शिवाय पिवळ्या पेरु वर जस लालसर छटा असेल तर फारच उत्तम, अशा प्रकारचे पेरु मेथांब्याला फारच छान)
मोहरी पाव चमचा (आवडत असल्या थोडे जिरे पण घालु शकता)
८ - १० मेथी दाणे
एक पळी तेल
दीड चमचा तिखट,
हळद , मिठ अंदाजे,
किसलेला गुळ १ छोटी वाटी (साधारण दोन लिंबा ईतका)
थोडेसे पाणी (जवळ जवळ एक पळी)

क्रमवार पाककृती: 

हिवाळा म्हणजे हिरवे कंच पेरु, कच्चे पेरु, आणि त्या वर तिखट मिठ आ हा हा!
आणि पेरु पिकले की,मेथांबा हे ठरलेलं.. Happy

तर कृती कडे वळु या..
पेरु स्वच्छ धुवुन, पुसुन त्याच्या हव्या तशा फोडी करुन घ्या.(साधारण वांग्याच्या करतो तश्या)
गंजात एक पळी तेल सोडुन, मोहरी तडतडुन घ्या, मेथी दाणे घाला, लगेच हळद, ति़खट घालुन पेरुच्या फोडी घाला. व्यवस्थीत कालवुन घ्या, मिठ आणि गुळ घालुन झाकण ठेवा, झाकणावर एक पळी पाणी
ठेवा, ५ , ७ मिनीटांनी एकदा परत परतवुन घ्या, फोडी अर्ध्या शिजल्या असतील तर झाकणावरचे पाणि गंजात सोडुन द्या. पुन्हा झाकण ठेवुन मंद आचेवर १० मि. शिजु द्या..

गरमा गरम मेथांबा तय्यार..

आंबट - गोड, तिखट , सरबरीत असा मेथांबा, पोळी, पराठा, भात कशाबरोबर ही मस्त लागतो..

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

पाणी एकच पळी हवे, कारण गुळा मुळे आधीच रस्सा सुटलेला असतो..

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! इथे चिनी पेरु मिळतात त्यामधे बीया नसतात. आपल्याकडे जसे अनेक प्रकार मिळतात पेरुचे तसे इथे नाही.

मस्त फोटो!
पेरूचा मेथांबा चवीला आवडतो पण त्याचा वास भन्नाट येतो. जरा जास्तच मेथ्या घालून जरा स्ट्राँग फोडणी केली तर तो वास किंचितसा कमी होतो.

छान आहे कृती. मला स्वतःला पेरुच्या बिया दातात आलेल्या आवडत नाहीत. पण बी म्हणतोय ते बिनबियांचे पेरू भारतात मिळतच नाहीत. पेरू किसून केलेले शिकरण माझ्या आवडीचे !

सगळ्यांचे आभार..:)
बी, तिकडच्या पेरुच्या चवित काही बदल असतो का? सहज उत्सुक्ता म्हणुन विचारतेय.

मंजुडी, बोर, पेरु याचा वास येतोच.
जरा जास्तच मेथ्या घालून जरा स्ट्राँग फोडणी केली तर तो वास किंचितसा कमी होतो.++१

मंजु ताई, अगदी बरोबर. गुळ भरपुर घालावा लागतो.. गोडा मसाला मी नाही वापरत, बरेच लोक घालतात आणि गोडलींब पण घालतात.

दिनेश दा, पेरु जर खरबरीत असेल तर तो जास्त मगजदार असतो, त्यात बियांचे प्रमाण कमी असते.
पेरू किसून केलेले शिकरण माझ्या आवडीचे !++ हे मात्र नविनच कळले..:)

छान आहे.

आई पेरुची कोशिंबीर करायची. मला आवडतात बिया दाताखाली आलेल्या, पिकलेला पेरु फारसा आवडत नाही पण एकदा करुन बघेन हे. लाल सुक्या मिरच्या (तिखट) थोड्या, छान लागतील फोडणीत बहुतेक.

सगळ्यांचे आभार.
मानुषि ताई, अन्जु ताई नक्की करुन पहा आणि झब्बु द्या ईकडे..:)
पेरुची कोशिंबीर, अरे व्वा! छानच लागत असणार..

पेरुचे कायरसही करतात ना ? हो मी देखिल ऐकले आहे..

ते बीन बियांचे मोठ्ठाले पेरू आता इथेही मिळतात. एका पेरूचे वजन सहज 700- 800 ग्राम भरते. मला चवीला फारसे आवडले नाही, पेरू खाल्ल्याचा नुसता भास होतो.

सायु रेसिपी छान आहे. माझी मैत्रीण अशीच कृती गूळ न घालता करायची आणि त्याला पेरूची भाजी म्हणायची.

मस्त आहे रेसीपी. इथे एका मेक्सिकन रेस्टॉरंट मध्ये पेरु घातलेला सालसा खाल्लेला. तोही मस्त लागतो.