परिघावरून

Submitted by ललिता-प्रीति on 23 November, 2015 - 22:32

एके दिवशी सकाळी...

गजर वाजायच्या एक मिनिट आधी बॅनर्जी आजोबांना जाग आली. मोबाईलवरच्या 04:59कडे नजर टाकत ते उठले, बाथरूममधे गेले. नळ सोडून त्यांनी पायावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं; उगीच एकदा सोलरचा नळ उघडून पाहिला. पण तो अजून तरी कोरडा ठक्क होता. ते बाथरूममधून बाहेर आले; सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेले; स्वतःसाठी एक कप चहा करून ठेवून अंथरूण आवरायला परत आपल्या खोलीत आले. दुसर्‍या बेडरूमच्या बंद दाराआडून वाजलेला फोनवरचा गजर त्यांना अंधूकसा ऐकू आला. पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी चहा गाळून घेतला, पातेलीत थोडं नळाचं पाणी घालून गाळणं त्यात बुडवून ठेवलं आणि पातेली सिंकजवळ ठेवून दिली. दुसर्‍या बेडरूममधला गजर पुन्हा एकदा वाजला.
त्यांचा चहा पिऊन होईतोवर त्यांची सून उठून बाहेर आलेली होती. ओट्याशी आल्या-आल्या तिनं आधी जोरात नळ सोडून गाळणं त्याखाली धरलं, ओट्याच्या कडेवर आपटत ते स्वच्छ केलं. ते होताच आपल्या मुलाला जोरात हाक मारली.
"राघवऽऽ"
राघव कूस बदलून, पांघरूण ओढून परत झोपी गेला.
चहा घेऊन आजोबा बाहेर पडले. सोसायटीच्या आवारात फिरत त्यांनी थोडी फुलं गोळा केली आणि मग ते आवारातल्याच देवीच्या देवळाच्या दिशेला वळले.

----------

मंजुषानं फ्रीजमधलं दुधाचं पातेलं काढून मंद गॅसवर ठेवलं आणि एकीकडे कणीक भिजवायला घेतली. आरोहीच्या कानाशी तिनं नेऊन ठेवलेल्या मोबाईलचा गजर वाजायला लागला होता.
"मंजूबेनऽऽ" अशी दवेआजींची दबक्या आवाजातली हाक तिच्या कानावर पडली. आपण ‘ओ’ देईपर्यंत हाका चालूच राहतील हे माहिती असल्यामुळे तिनं डाव्या हातानं कणकेचा कुंडा उचलला आणि कणीक मळतमळतच बाल्कनीत जाऊन हाकेच्या दिशेला पाहिलं.
दवेआजी सोसायटीत रहायला आल्यादिवसापासून या हाका चालू झालेल्या होत्या. सुरूवातीला नुसतं "बेनऽऽ, ओ बेनऽऽ" असायचं. नाव कळल्यावर मग "मंजूबेनऽऽ" अशा हाका यायला लागल्या. आजी फार प्रेमळ होत्या. आजूबाजूच्या घरांमधल्या बायकांना हाका मारमारून, खिडकीत नाहीतर बाल्कनीत बोलावून त्या नेहमी गप्पा मारत उभ्या रहायच्या; नवीन केलेली एखादी खरेदी तिथूनच दाखवायच्या; पाककृतींची देवाणघेवाण तर अगदी नेहमीची ठरलेली.
"गुडमॉर्निंग आण्टी," मंजुषा हलक्या आवाजात म्हणाली.
"मारी तो चार बजेथी मोर्निंग गुड्डज छे," दवेआजी म्हणाल्या आणि जोरात हसल्या. सकाळच्या शांततेत तो आवाज घुमला. त्या चार वाजल्यापासून खरंच जाग्या होत्या. पहाटेचे चार म्हणजे दवेआजोबांना पॉट द्यायची वेळ. ते काम करून रोज त्या पुन्हा झोपी जात असत. पण आज त्यांना पुन्हा झोप लागली नव्हती.
"आण्टी, पण आत्ता कामात आहे मी..."
"हाँ, हाँ, वो उपाध्याय भाभी आज आनेवाली छे ने, ए आयेगी तो मेरे को बता दे जो, बस्स, ए बोलने का था," आजी अगदी साधेपणानं म्हणाल्या आणि "चालो, हाँऽऽ" असं म्हणत आत निघून गेल्या.
आरोहीच्या कानाशी दुसर्‍यांदा गजर वाजला.
मंजुषानं आत येऊन घाईघाईनं दुधाखालचा गॅस बंद केला; तेलाचा हात लावून कणकेचा गोळा जरा जास्तच जोर लावून मळला; त्यावर झाकण टाकलं. बेडरूममधे जाऊन आरोहीला "ऊठ, सहा वाजले," असं म्हणत एकदा हलवलं आणि ताज्या दुधाच्या पिशव्या आल्या आहेत का हे पहावं म्हणून दार उघडण्यासाठी ती बाहेर हॉलमधे आली.

----------

हात आणि मान वर करून नामूनं दुधाची पिशवी तोंडापाशी तिरकी धरली. दुधाचे उरलेसुरले थेंब जिभेवर न पडता त्याच्या हनुवटीवर आणि तिथून त्याच्या छातीवर उजव्या बाजूला लटकवलेल्या त्याच्या नावाच्या पट्टीवरच सांडले. उजव्या हाताच्या तळव्यानं त्यानं सांडलेलं दूध निपटून काढलं. तळवा पॅण्टला पुसला. दुधाच्या पिशवीचं तोंड दोन्ही हातांच्या चिमटीत पकडून अजून थोडं फाडलं. ओशटपणामुळे पिशवी हातातून निसटली. ती त्यानं चपळाईनं पकडली.
टेरेस फ्लॅटमधे राहतो, पण अर्धा लिटरच दूध कसं काय घेतो?
पॉलच्या दारातली दुधाची पिशवी पळवण्याची ही त्याची दुसरी वेळ होती; पण हे ‘कनेक्शन’ त्याच्या आजच लक्षात आलं होतं.
त्यानं दुधाचे राहिलेले थेंब थेट घशातच सोडले; ओठांवरून जीभ फिरवत छातीवरच्या पट्टीकडे पाहिलं. तिच्या काळ्या रंगावर आता दुधाचे वाळके फराटे दिसत होते. तो डाव्या हाताच्या तळव्यावर थोडासा थुंकला. थुंकीच्या ओलसरपणानं त्यानं पट्टीला पॉलिश केलं.
खाली देवळातली घंटा वाजली.
मायला, देवीला झोपेतून उठवायला थेरडं हजर असतं रोज!
त्यानं दुधाच्या पिशवीचा चोळामोळा केला, खाली वाकून पाईपच्या भोकात आतपर्यंत कोंबला. कठड्यावर काढून ठेवलेली युनिफॉर्मची टोपी पुन्हा डोक्यावर ठेवली, गच्चीच्या पलिकडच्या भागात जाऊन सोलरच्या पाण्याचा व्हाल्व उघडला आणि तो जिन्याच्या दिशेला वळला.
देवळातली दुसरी घंटा वाजली.
पाण्याचा पंप सुरू होता. टाकीत पाणी पडल्याचा आवाज येत होता. पंपाचा टायमर दोन दिवसांपासून बिघडलेला होता. त्यामुळे पॉलनं त्याला बजावलेलं होतं, की बरोबर वीस मिनिटांनी पंप बंद करायचा. पण पंप सुरू करतेवेळी तो वेळ बघायला विसरला होता. त्यानं आवाजावरून पाण्याच्या पातळीचा अंदाज घेतला. टाकी भरायला अजून तसा अवकाश होता. खाली जाऊन आरामात पंप बंद करता आला असता. तो जिन्याच्या एक-दोन पायर्‍या उतरतो न उतरतो इतक्यात एक कसलातरी दबका आवाज झाला आणि एक बाई अत्यंत भेदरलेल्या आवाजात किंचाळायला लागली.

----------

बॅनर्जी आजोबांनी चपला काढल्या. देवळाच्या पायर्‍या सावकाश चढत शेवटच्या पायरीपाशी टांगलेली घंटा त्यांनी एकदा वाजवली. घंटेचा आवाज कानावर पडल्यावर मॉर्निंग-वॉकसाठी बाहेर पडलेल्या रोहतगी बाईंनी उजवा हात छातीशी नेला, डोळे मिटले आणि देवीला मनोमन नमस्कार केला. पाठोपाठ आतल्या किणकिण्या घंटेचा आवाजही त्यांना ऐकू आला. इतक्यात एक रिक्षा त्यांच्या जराशी पुढे जाऊन डावीकडे थांबली. रिक्षातून उपाध्याय भाभी वाकून पाहत होत्या. त्यांना ‘शुक-शुक’ करत बोलावत होत्या. तोंडभरून हसत होत्या. त्यांच्या पायाशी भरपूर सामान होतं. पलिकडून उपाध्याय अंकल खाली उतरत होते.
"जय माता दी!" भाभी बसल्या जागेवरूनच म्हणाल्या.
"हरीॐ!"
"आना साम को, हां, बेठने के लिये," भाभींनी बाईंना आमंत्रण देऊन टाकलं.
बाईंनी उत्तरादाखल मान डोलावली. त्याचवेळी एक आवाज त्यांच्या कानावर पडला - हवा भरलेली प्लॅस्टिकची मोठी पिशवी कुणीतरी फोडली असावी, असा; मग उंचावरून काहीतरी जड वस्तू खाली पडल्यासारखा. त्यांची नजर सहज देवळाच्या दिशेला वळली. बॅनर्जी आजोबा तिथे नव्हते. कुठेतरी एक बाई अभद्र किंचाळायला लागलेली होती. त्यांनी ताडलं, की जवळच्या झोपडपट्टीतच काहीतरी हाणामारी चाललेली असणार. त्या विचारांनी त्यांनी भुवया ताणल्या आणि आपला मॉर्निंग-वॉक पुढे चालू ठेवला.
उपाध्याय भाभी आणि अंकल दोघंही पैशांवरून रिक्षावाल्याशी हुज्जत घालत होते. एकीकडे रिक्षातलं सामानही उतरवत होते. दोघं वैष्णवदेवीची यात्रा करून आलेले, ‘मातानु दर्सनथी’ आनंदी झालेले; कधी एकदा शेजारपाजार्‍यांना प्रवासाचा वृत्तांत देतोय, प्रसादाचं वाटप करतोय असं झालं होतं त्यांना; विशेषतः भाभींना.
...पण दोघांनाही याची कल्पना नव्हती, की त्यांच्या सतराव्या मजल्यावरच्या घरापर्यंत पोहोचायला त्यांना अजून किमान अर्धा तास लागणार होता.

----------

दुसर्‍या दिवशी...

एकात एक घातलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांचे तीन गठ्ठे नामूनं एक-एक करून लिफ्टमधे ठेवले. तो आत शिरला. त्याच्या मागे लिफ्टची दारं बंद झाली. तो समोरच्या आरशात आपली छबी न्याहाळायला लागला. त्याच्या छातीवरची चिमुकली पाटी चमकत होती. ‘नामदेव देवरे.’ त्यानं आपल्या घामट तळव्यानं त्या पट्टीला पॉलिश केलं, डोक्यावरची टोपी काढून खुर्च्यांच्या एका गठ्ठ्यावर ठेवली. तो कमरेतून डावीकडे वळला आणि त्यानं उलट्या डाव्या हातानं 17 क्रमांकाचं बटण दाबलं. बटणावरचा लाल दिवा लागला. त्याचवेळी 5 क्रमांकाचाही दिवा लागला. लिफ्ट निघाली. सोबत पंखाही सुरू झाला.
आरशात वरच्या भागात उजवीकडे कललेल्या उलट्या लाल आकड्यांनी एक-एक करून हजेरी लावायला सुरूवात केली. आधी उभी तिरकी रेष, मग तिरका मोठा ‘एस्स’... घामाचा एक ओघळ केसांतून मानेवर, तिथून पाठीवर ओघळला. हलक्याशा थंडाव्याची एक उभी रेष पाठीवरून खाली उतरली.
लिफ्ट गप्पकन थांबली. पंखाही थांबला. समोर आरशात लाल रंगातलं उलटं, तिरकं ‘प’ दिसत होतं.
म्हणजे चौथा मजला.
खालून निघताना 4चा दिवा सुरू असलेला पाहिल्याचा त्याला आठवत नव्हता.
माऽयला, पॉलच्या मजल्यावर ही बया न बोलावताच जाते वाटतं...??
दारं बाजूला सरकली. तो मागे वळला. बाहेर तनवडेंचा सागर उजव्या तर्जनीनं नाक कोरत उभा होता. पाठीला दप्तर. नामूला पाहताच त्यानं हात पटकन खाली घेतला आणि खुर्च्यांच्या गठ्ठ्यांकडे आळीपाळीनं पाहत तो पुढे झाला.
"ऊप्पर जा री है,’ नामूनं माहिती पुरवली.
"पता है," सागर नाक फेंदारत म्हणाला आणि आत शिरला. नामू नेहमी त्याच्याशी हिंदीत बोलायचा याचा त्याला भलता राग यायचा. खुर्च्यांचा डावीकडचा गठ्ठा जरासा सरकवत त्यानं स्वतःसाठी जागा करून घेतली आणि उजव्या तर्जनीनंच ‘Close’चं बटण दाबलं. लिफ्ट निघाली. पंखा पुन्हा सुरू झाला. सागरनं वर पंख्याकडे पाहत अंगातल्या टी-शर्टचा गळा चिमटीत पकडून पुढे-मागे हलवला.
"आज ट्यूशनको नई जानेका क्या?" नामूनं त्याला प्रश्न घातला.
"उदर ही तो जा रहा हूँ, उप्पर मम्मी को चाबी देनेकी है," दप्तराकडे बोट दाखवत, खिश्यातल्या किल्लीचा आवाज करत त्यानं उत्तर दिलं.
"उपर इन्स्पेक्टर आया है, तेरे को ले के जाएगा पक्कड के, चाबी दे दे मेरेको, मैं देऊँगा मम्मी को..." नामूनं उगीचच काही कारण नसताना त्याला भीती घातली. पण सागर बधला नाही.
कुणाला पकडायचं तर आधी वॉरण्ट पायजे, माहिती नाय का, पागल!
इतरवेळी त्यानं किल्ली दिलीही असती, पण आज त्यालाही ‘तिथे’ काय चाललं आहे हे पहायची उत्सुकता होती. मगाशी पोलिसांची गाडी सोसायटीत शिरताच मुकुलनं त्याला इण्टरकॉमवरून बातमी पुरवली होती...
"ब्रेकिंग न्यूज! पुलिस घटनास्थल पर पहुँच गयी है!"
त्यावर सागरनं ताबडतोब त्याला टोकलं, "कालचीच ब्रेकिंग न्यूज परत काय देतो, पागल! पुलिस फिर से घटनास्थल पर पहुँच गयी है! - असं म्हण."
"हां, खरंच की!" मुकुलला आपली ‘मिस्टेक’ पटली. नेहमी सागरनंच ए.सी.पी. का व्हायचं या त्याच्या कायमस्वरूपी हरकतीवरचं उत्तरही त्याला प्रथमच ठळकपणे जाणवलं. तो जरा वरमला.
"अकेला है घर में?" सागरनं पुढे विचारलं.
"हो. आई शेजारी गेलीये."
"हिंदीत बोल ना, पागल!"
मुकुल पुन्हा वरमला. त्यानं सागरला सुधारित संवाद ऐकवला, "हाँ, मैं घर में अकेला हूँ, मम्मी बाजू में गयी है..."
"जितना पूछा है, उतना बताओ, फ़ालतू बातें नई चैय्ये।"
"येस्सर!"
"मैं उपर जाकर पता करता हूँ, और तुम्हे मिलता हूँ, ओके? तब तक तुम वहीं रहना। दरवाजे पे कडी नजर रखना। ओव्हर अ‍ॅण्ड आऊट!"
या ‘उपर जाकर पता’ करण्यासाठीच आता तो निघालेला होता. आईकडे किल्ली देण्याच्या बहाण्यानं थोडा वेळ ‘तिथे’ रेंगाळायचं, मुकुलला त्याचा रिपोर्ट द्यायचा, पुढच्या इन्स्ट्रक्शन्स्‌ द्यायच्या आणि मग ट्यूशनला जायचं असं त्यानं ठरवलेलं होतं. कालच्या प्रकारानंतर त्याला त्याच्या आईनं, का कोण जाणे, ट्यूशनला जाऊ दिलेलं नव्हतं; त्यामुळे आज तिथे सांगायलाही त्याच्याजवळ भरपूर ‘ब्रेकिंग न्यूज’ होत्या.
नामूच्या डोक्यात मात्र अशी कुठलीही योजना नव्हती. कालपासून सब-इन्स्पेक्टर आपल्याकडे संशयानं पाहतोय असं त्याला वाटत होतं. कालच्या तीन-चार चौकशांनंतर आज परत त्याच्या प्रश्नांना तोंड देण्याचा त्याला कंटाळा आलेला होता. पण पॉलनं सकाळीच इन्टरकॉमवरून त्याला फर्मान सोडलं होतं, की दुपारी ठीक तीन वाजता काही खुर्च्या १७०४मधे नेऊन ठेवायच्या आहेत.

लिफ्ट थांबली. पंखा थांबला. नामू तंद्रीतून बाहेर आला. सरकणार्‍या लिफ्टच्या दारांमधून त्याला समोर भिंतीवर 5चा आकडा दिसला. दारं अजून थोडी उघडल्यावर समोर ५०४च्या दारात अजिंक्य बोलत उभा असलेला दिसला - डाव्या खांद्यावर सॅक, हातात सेलफोन, पलिकडच्या हातात किल्ली; अजिंक्य कुणाशी बोलत होता हे दिसत नव्हतं, पण तो संकेतच असणार हे नामूनं ओळखलं. नामूला पाहताच त्या दोघांची आपांपसांतली कुजबूज थांबली. सागरनं अजिंक्यच्या उजव्या कोपराला आदल्या दिवशी बांधलेलं बॅण्डेज पाहून घेतलं; अजूनही बर्‍यापैकी पांढरंशुभ्र राहिलेलं होतं; त्याच्या मध्यभागी तांबूस रंगाचा डाग दिसत होता. पण अजिंक्य ज्या अर्थी जागचा हललेला नव्हता, त्या अर्थी लिफ्ट त्यानं बोलावलेली नव्हती.
मग कुणी बोलावली?
‘Close'च्या बटणावर उजवी तर्जनी टेकवून सागरनं बाहेर वाकून पाहिलं, तर लिफ्टमधे शिरणारी निशी त्याच्या डोळ्यांसमोर एकदम ‘झूम-इन’ झाली...
आदल्या दिवशी सकाळीही सोसायटीच्या गेटमधून ती अशीच ‘झूम-इन’ झाली होती, आपल्या स्कूटीसहित. सकाळी सकाळी आपल्या आईला रेल्वेस्टेशनवर सोडून परत येत होती. गेटजवळ आत उजवीकडे अजिंक्य पाठमोरा उभा होता. त्याची मान वर, पाचव्या मजल्याच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या संकेतच्या दिशेला. संकेतनं आपल्या बाईकची किल्ली खाली फेकली. ती झेलताना अजिंक्यचा अंदाज चुकला. त्याला डावीकडे झेप घ्यावी लागली आणि निशी स्कूटीसकट त्याच्यावर जाऊन धडकली. दोघंही कडमडले. बॅनर्जी आजोबा लगबगीनं त्यांच्या मदतीला आले. त्याच वेळी संकेतला कसला तरी आवाज ऐकू आला; एक बाई खूप जोरात ओरडते आहे असंही वाटलं. पण त्याचं लक्ष खाली लागून राहिलं होतं...
निशीच्या मागून कुणी नाहीये याची खात्री पटताच सागरनं मान आत घेतली आणि बटण दाबलं. ती काहीशी लंगडत चालत असल्याचं त्याच्या नजरेनं टिपलं.
लिफ्टची दारं बंद झाली. निशीचा हात पॅनलच्या दिशेला गेला. तिथला 17चा दिवा आधीपासूनच चालू असलेला पाहून तिनं तो त्वरित मागेही घेतला. तिची आणि सागरची नजरानजर झाली. हा याच सोसायटीत राहणारा मुलगा आहे यापलिकडे तिला सागरबद्दल अजून फारशी माहिती नव्हती. मग तिनं हळूच नामूकडे दृष्टीक्षेप टाकला. हा याच सोसायटीचा वॉचमन आहे यापलिकडे अजून तिला नामूबद्दलही विशेष माहिती नव्हती. तिनं उगीचच एकदा वरच्या वाढत जाणार्‍या लाल आकड्याकडे नजर टाकली आणि मग मान खाली करून ती हातातल्या फोनवर बोटं फिरवायला लागली.
सोळावा मजला सरला, तसं सागरनं आपली तर्जनी पुन्हा ‘Open’च्या बटणावर ठेवली.
सोळावा मजला सरला, तसं निशी डावीकडे काटकोनात वळून लिफ्टच्या दाराकडे तोंड करून तयार उभी राहिली.
सोळावा मजला सरला, तशी नामूनं खुर्च्यांच्या गठ्ठ्यावर काढून ठेवलेली आपली टोपी पुन्हा डोक्यावर चढवली.
लिफ्ट थांबली. पंखा बंद झाला. लिफ्टची दारं उघडली. सागरनं आधी टुणकन बाहेर उडी मारली. बाहेर कसं दृष्य असेल याची त्याला विशेष कल्पना नव्हती. त्यामुळे तो जागच्या जागी एकदम थबकला.
त्याच्यापाठोपाठ निशी बाहेर पडली. बाहेर कसं दृष्य असेल याची तिला थोडीफार कल्पना होती. तरीही ती जागच्या जागी जराशी थबकली.
नामूनं एक-एक करून खुर्च्यांचे गठ्ठे बाहेर काढले. शेवटचा गठ्ठा बाहेर काढताना त्याचं पॅनलकडे लक्ष गेलं. तिथे 13चा दिवा लागलेला होता, आणि मगाशी न लागलेला 4चा ही!
तो आश्चर्यानं जागच्या जागी थबकला!

----------

सब-इन्स्पेक्टर हॉलच्या खिडकीपाशी बसलेला होता. मंजुषानं घरातल्या समस्त बैठकीच्या वस्तू हॉलमधे आणून ठेवलेल्या होत्या. खुर्च्या, स्टुलं, मोडे, दोन चौरंग - एक जुना, एक नवा; नव्या चौरंगाला हॉलमधल्या वॉल-युनिटसारखंच सनमायका लावलेलं होतं, आणि एक जुनं टी-पॉय सुध्दा. डायनिंगच्या कोपर्‍यात एक छोटा गालिचा अंथरून ठेवलेला होता. उपस्थितांनी मिळेल ती जागा पटकावलेली होती. अजून काहीजण उभे होते, ते आता नामूनं आणलेल्या खुर्च्यांवर बसते झाले. नामूनं जास्तीच्या खुर्च्या दाराशी ठेवल्या आणि तो जाण्यासाठी वळला. तर मंजुषानं हाक मारून त्याला थांबवलं. इतक्यात लिफ्टमधून अजून काहीजण आले. त्यांत पॉलही होता. मंजुषानं सर्वांसाठी थंडगार पाणी आणलं; आधीच्या लोकांनी बाजूला ठेवलेले ग्लास गोळा करून आत नेऊन ठेवले आणि ती पुन्हा बाहेर येऊन उभी राहिली. हॉलमधे आम्ही कसं फ्लेक्झी-फर्निचर केलेलं आहे, त्यामुळे गरजेनुसार कशी अधिक ‘स्पेस’ वापरायला मिळते, वेळप्रसंगी पंचवीस-तीस माणसं कशी आरामात मावतात, याचं एक संयुक्त समाधान तिच्या चेहर्‍यावर पसरलेलं होतं.
सब-इन्स्पेक्टरच्या हातात तीन-चार कागद होते. तो मान वर न करताच बोलत होता. मधेच कागद पुढे-मागे करत काहीतरी लिहून घेत होता. तो काय लिहीतोय हे पाहण्याची सागरला उत्सुकता लागून राहिलेली होती. तो सौ. कोरे आणि सौ. कुष्टे यांच्या खुर्च्यांमधून वाकून-वाकून सब-इन्स्पेक्टरकडे पाहत होता.
मिसेस अस्थाना सब-इन्स्पेक्टरला सांगत होत्या, "एक आवाज सुनाई दिया, कपडे भरलेला मोटा थैला जोर से पत्रेपर गिरनेपर होता है ना, वैसा, मग बाईच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज, बादमें और एक चीज का आवाज; हमारी गाडी के..."
"जितना पूछा है, उतना बताओ," सब-इन्स्पेक्टर त्यांना मधेच तोडत म्हणाला.
फ़ालतू बातें नई चैय्ये...सागरनं वाक्य मनोमन पूर्ण केलं. त्याला जाणवलं, की अस्थाना आण्टीसारखं आपण काहीच सांगू शकणार नाही; कारण आपली बाल्कनी तर मागच्या बाजूला आहे.
बाल्कनी मागच्या बाजूला असण्याची खंत पॉललाही लागून राहिलेली होतीच. सर्वजण कालपासून ज्या आवाजांबद्दल सांगत होते, त्यातला एकही पॉलला किंवा त्याच्या घरातल्या कुणाला पुसटसाही ऐकू आलेला नव्हता. त्यामुळे सेक्रेटरी असूनही या मुद्द्यावर त्याला कुठल्याच चर्चेत भाग घेता आलेला नव्हता.
"मुकुल कोण?" सब-इन्स्पेक्टरच्या प्रश्नानं सागर दचकला. त्याआधीची दोन-तीन वाक्यं त्याच्या कानांत शिरलेली नव्हती.
"वो इधर ही रहता है, त्यानं माझ्या मुलाला हाक मारली, म्हणून मी इकडच्या बाल्कनीत आले," सब-इन्स्पेक्टरच्या पाठीमागच्या खिडकीकडे निर्देश करत मिसेस अस्थाना म्हणाल्या.
"हंऽऽ," सब-इन्स्पेक्टर गुरगुरला. त्यानं कागदावर काहीतरी टिपून घेतलं.
मुकुलचं नाव??
सागरच्या छातीत धडधडलं. त्याला तिथून धूम ठोकाविशी वाटली. तो चुळबूळ करायला लागलेला पाहून त्याची आई कुजबुजली, "थांब जरा, मी पण येतेच आहे..."
चुळबूळ तर मिसेस अस्थानांचीही चाललेली होती. त्यांना सब-इन्स्पेक्टरला अजूनही काहीतरी सांगायचं होतं. सब-इन्स्पेक्टरनं कागदांमधून डोकं वर काढत विचारलं, "हं, अजून कोण आहे?"
"सर..." मिसेस अस्थाना चाचरत म्हणाल्या.
"क्या है?"
"और एक बताने का था..."
"बोलोऽ"
"हमारी गाडी पे ना, किसीकी बुरी नजर है..."
अस्थानांनी स्वतःच्या सेकण्ड-हॅण्ड मर्सिडीजचा विषय काढलेला पाहताच सौ. कोरे आणि सौ. कुष्टे एकमेकींकडे पाहून गालातल्या गालात हसल्या.
अस्थानांचं वाक्य ऐकताच पॉलनं कान टवकारले. ‘हादसे के अलावा’ पोलिसांजवळ बाकी काही बात बोललेली चालणार आहे हे आधी माहिती असतं, तर चोरी होनेवाल्या दुधाच्या पिशव्यांबद्दल त्यानंही सांगितलं असतं की! पण त्याची जबानी तर आदल्या दिवशीच होऊन गेलेली होती. तो मनोमन पुन्हा एकदा खट्टू झाला.
अस्थानांचं वाक्य ऐकताच सागरही सावध झाला होता.
हे गाडीचं काय निघालं अचानक, ते सब-इन्स्पेक्टरला कळेना. अस्थाना मान वेळावत तक्रारीच्या सुरात सांगत होत्या, "ये हादसा हुआ है, इसके सामने हमारी गाडी को हुआ नुकसान किसीने देखा तक नहीं..."
‘किसीने देखा नहीं’ कसं? सागर आणि मुकुलनं पाहिलं होतं ना! शिवाय त्यांनी अजूनही काहीतरी पाहिलं होतं...
आदल्या दिवशीच्या सकाळचीच गोष्ट. तो ‘हादसा’ होऊन साधारण तास-दीड तास झालेला होता. दोघं गेटपाशी स्कूलबसची वाट पाहत उभे होते. अजूनही काही मुलं, मुली होती. बस यायला अजून थोडा अवकाश होता. मग सागरनं आपला मोहरा वळवला ‘अजिंक्य-बॅण्डेज-केस’च्या घटनास्थळी; तिथे अजून काही ‘सबूत’ मिळतात का ते पहायला; मुकुल त्याच्या मागे-मागे.
सागरला थोडेफार सबूत मिळाले - स्कूटीच्या दिव्याच्या फुटलेल्या लाल काचांचे एक-दोन बारके तुकडे, फरशीवर गाडी घासली गेल्याच्या खुणा, रक्ताचा एक पुसट डाग. दरम्यान मुकुल एका कुत्र्याच्या पिल्लाच्या मागेमागे तिथेच पार्क केलेल्या अस्थानांच्या सेकण्ड-हॅण्ड मर्सिडीजच्या पलिकडच्या बाजूला गेला आणि पाहतो तो काय! मर्सिडीजच्या डिकीच्या वरच्या भागात एक भलामोठा पोचा आलेला, तिथल्या काचेलाही तडा गेलेला, थोडीशी माती, कचरा वगैरे सांडलेला!
म्हणजे वरून काहीतरी पडलेलं असणार. सकाळी जोरात काहीतरी पडल्याचा आवाज तो सुना था।
त्यानं तटकन मान वर केली.
काय पडलं असेल?
वरून पडलेली वस्तू इथेच आसपास कुठेतरी असणार असा विचार करून त्यानं शोधाशोध सुरू केली. तर त्याला काळ्या रंगाची प्लॅस्टिकची एक कुंडी दिसली; कुंपणाची भिंत आणि मर्सिडीज यांच्या मधे रोपांच्या वाफ्यात आडवी पडलेली होती. त्यानं जवळ जाऊन ती सरळ केली. त्याला जे दिसलं त्यानं तो आश्चर्यचकित झाला. पुन्हा त्यानं वरती पाहिलं. आता त्याच्या नजरेनं थेट सतराव्या मजल्यावरच्या ‘त्या’ खिडकीचा वेध घेतला. त्यानं सागरला दबक्या आवाजात हाक मारली; त्याला कुंडी दाखवली. कुंडीतलं रोप जळालेल्या अवस्थेत होतं; काडेपेटीची जळती काडी झाडांच्या पानांजवळ नेली, तर ती पानं कशी जळतील, तसं. कुंडीच्या एका बाजूचा प्लॅस्टिकचा काठ देखील वितळला होता. कुंडी पडल्यानंतर रोप इतकं जळणं तर शक्यच नव्हतं... मग? अचानक सागरच्या डोक्यात ‘लिंक’ लागली. तो मुकुलला काही सांगणार इतक्यात स्कूलबसचा आवाज आला आणि कुंडीचा विषय पुढे बोलायचा राहूनच गेला...

सागरला सगळं आठवलं; कुंडी आपण परत आडवी पाडून ठेवायला हवी होती असं वाटायला लागलं. त्यानं पुन्हा चुळबूळ सुरू केली. अखेर त्याची आई तिथून उठली. ते पाहून मंजुषा पुढे झाली. दारातच त्याच्या आईला गाठून हळू आवाजात तिच्याशी काहीतरी बोलायला लागली. सागर लिफ्टजवळ गेला. एक लिफ्ट तिथंच होती. त्यानं बटण दाबलं आणि लिफ्टच्या उघड्या दारात एक पाय आत आणि एक बाहेर असा उभा राहून तो आईची वाट पहायला लागला.
...आणि अखेर त्याची नजर १७०३कडे वळलीच!
१७०३चं दार सताड उघडं होतं. दाराशी एक हवालदार उभा होता. घरात कुणीच नव्हतं. आतल्या दारावर पडद्यांचे अर्धवट जळके तुकडे लोंबत होते. दारातून स्वयंपाकघरातला फ्रीज अर्धवट दिसत होता. फ्रीजच्या दारावर मोठाले डाग पडलेले होते, पेटत्या मेणबत्तीजवळ प्लॅस्टिक नेलं, तर ते कसं वितळेल, तसे. फ्रीजच्या मागची भिंतही दिसत होती - काळीठिक्कर! मगाशी कुणाच्यातरी जबानीत त्यानं हा शब्द ऐकला होता. मगाशी त्यानं ‘स्फोट’ हा शब्दही ऐकला होता; ‘स्फोट’ म्हणजेच ‘ब्लास्ट’ असणार असा अंदाज बांधला होता. मग त्याची मान विरूध्द दिशेला वळली. १७०१चं दारही सताड उघडं होतं आणि दाराशीच खुर्चीवर उपाध्याय भाभी बसलेल्या होत्या.
कालपासून अशाच भकास चेहर्‍यानं बसलेल्या आहेत! - मंजुषानं कुजबुजत त्याच्या आईला पुरवलेली माहिती त्याच्याही कानांपर्यंत पोहोचली.
ब्लास्ट जर काल झाला आहे आणि १७०३मधे झाला आहे, तर या आत्ता का अशा बसल्या आहेत? पता करना पडेगा!
त्यानं थोडा वेळ वाट पाहिली आणि कंटाळून जाऊन आईला पुन्हा जोरात हाक मारली. हाक ऐकून हवालदारानं एकदम वळून पाहिलं. मंजुषाच्या घरात बसलेल्या एक-दोघांनीही बाहेर वाकून पाहिलं. मग मात्र त्याची आई तिथून हलली.
मंजुषाही परत आत वळली. पुन्हा एकदा तिनं १७०३च्या दारातून डोकावून पाहण्याचं कटाक्षानं टाळलं होतं.

लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबताच सागरही आईपाठोपाठ बाहेर पडला. त्याची पाण्याची बाटली घरातच राहिली होती. आईनं किल्लीनं दार उघडताच तो तिच्या हाताखालून सुळ्ळकन आत शिरला. डायनिंग टेबलवरची बाटली उचलून त्यानं दप्तराच्या कडेच्या कप्प्यात सरकवली. तो निघणार इतक्यात इण्टरकॉम वाजायला लागला. आईनं तो उचलला. पलिकडून मुकुल बोलत होता. आईचे शब्द त्याच्या कानावर पडले, "सागर ट्यूशनला निघालाय, तू नंतर फोन कर, हं.."
तो खट्टू होऊन मागे वळला. मुकुलला काहीतरी ‘इम्पॉर्टण्ट’ सांगायचं असणार हे त्यानं ओळखलं होतं. पण नाईलाज होता.

----------

साधारण पंधरा दिवसांनंतर...

सौ. कोरे आणि १८०३मधली अनिता कोठारी दोघी मंजुषाशी बोलत उभ्या होत्या. अनिताचा मुलगा वरती आपल्या घरात एकटाच भिंतीवर बॉल मारत खेळत होता. या आवाजाची कटकट होते, मुलाला जरा समजवा, असं सांगायला एकदा १७०३वाला आला होता. त्यादिवशीही त्या तिघी अशाच मंजुषाच्या दारात उभ्या होत्या. १७०३वाला अचानक बाहेर आलेला पाहताच त्यांच्या मोठ्या आवाजात चाललेल्या गप्पा अचानक थांबल्या होत्या. अनिता समोर दिसताच तिथंच त्यानं आपलं गार्‍हाणं तिला ऐकवलं होतं - "शाम को घर आता हूँ, तो लगता है, कि कुछ शांती मिले..." त्यानं ठासून आपला मुद्दा मांडला होता.
त्यावर काहीतरी बोलायचं म्हणून मंजुषा म्हणाली होती, "हाँ, और दोपहरमें भाभी को भी आराम नहीं..." तिला वाक्य पूर्ण करू न देता त्यानं त्रासिक चेहर्‍यानं "च्च्‌! उसका छोडो!" असं म्हणत आपला हात झुरळ झटकावं तसा जोरात झटकला होता.
भाभी म्हणजे त्याची बायको. कुणाशी तिची फारशी ओळख नव्हती. तिचं नावही कुणाला ठाऊक नव्हतं. या जुजबी बोलण्यादरम्यान ती देखील बाहेर येईल असं सौ.कोरेंना वाटलं होतं. पण ती आली नव्हती. तिचं बाहेर न येणं जसं त्यांना विचित्र वाटलं होतं, तसंच तिच्या नवर्‍याचं हात झटकणंही त्यांना अंमळ खटकलंच होतं.

सब-इन्स्पेक्टरनं सगळ्यांनाच ‘त्या नवरा-बायकोत काही भांडणं होती का?’ असा प्रश्न घातला होता. तेव्हा ते झुरळ झटकणं सांगावं, की नाही, हे सौ.कोरेंचं नक्की होत नव्हतं. मंजुषा आणि अनिता दोघींनी तसलं काहीच न सांगितल्यानं त्यांनीही गुळमुळीत काहीतरी सांगून टाकलं होतं. आपण केलं ते चूक की बरोबर? हा प्रश्न त्यांना त्या दिवसापासून खात होता.
अर्थात, स्फोट आणि जळीतानंतर साधारण वीस मिनिटांनी सोसायटीच्या दारात चारचौघांदेखत १७०३वाला जसं विचित्र वागला, त्यासमोर सौ.कोरेंनी लपवून ठेवलेली ही गोष्ट म्हणजे काहीच नव्हती...
सोसायटीच्या दारात घाईघाईनं कुणीतरी गाडी आणलेली होती. मोठी चादर लपेटलेली भाभी इमारतीतून बाहेर येताच आसपास जमलेल्या गर्दीतून धक्का बसल्याचे, शहारल्याचे सामुदायिक आवाज आले होते. ती कशीबशी एक-एक पाऊल टाकत चालत होती. तोच तिला भडभडून उलटी झाली होती. पण कुणीच तिला आधार द्यायला तिच्या जवळ गेलं नव्हतं. गाडीचा चालक मख्ख चेहर्‍यानं समोर पाहत होता. ती गाडीपाशी पोहोचताच तिचा नवराच आधी गाडीत चढून बसला होता. ते पाहून ती त्या अवस्थेतच क्षणभर घुटमळली होती. मग तो पुन्हा खाली उतरला होता; ती आत बसेतोवर गाडीला वळसा घालून पुढल्या सीटवर स्थानापन्न झाला होता. गर्दीतल्या कुणीतरी येऊन गाडीचं मागचं दार लांबूनच ढकलून बंद केलं होतं आणि गाडी निघून गेली होती. त्यानंतर ते जोडपं पुन्हा एकदाही दृष्टीस पडलं नव्हतं. दोन दिवसांनी कुणीतरी दोनजण येऊन त्यांच्या घरातलं सामान घेऊन गेले होते...
तिघींनी आपांपसांत अनेकदा या घटनाक्रमाची उजळणी केली होती. सौ.कोरेंनी ‘अखेर सांगूनच टाकलेल्या’ झुरळ झटकण्याच्या प्रसंगाचीही आता त्यात भर पडली. या नव्यानं कळलेल्या माहितीवर अनिता कोठारी मनाशी प्रामाणिकपणे विचार करायला लागली. मंजुषाला आता कुठल्याही नवीन तपशिलात रस नव्हता. जळीतादिवशी सकाळी तिनं दुधाच्या पिशव्या घ्यायला म्हणून जेव्हा दार उघडलं, तेव्हाच शेजारच्या घरातून तिला भेसूर किंचाळण्याचा आवाज ऐकू आला होता. त्या आवाजानं ती नखशिखांत हादरून गेली होती. पुढे होऊन ते दार वाजवावं, आतलं जे कुणी संकटात असेल, बहुतेक भाभीच, त्याच्या मदतीसाठी काही धावपळ करावी याचं अवसानच तिला आणता आलं नव्हतं. आरोहीला उशीर होईल या कारणानं अवघ्या काही सेकंदांत तिनं कापत्या हातांनी, पण वरकरणी शांतपणे दार लावून घेतलं होतं. त्यादिवशी संध्याकाळी सोसायटीतले बरेच उत्सुक लोक १७०३मधे डोकावून गेले होते. तिथे काय काय दिसलं ते इतरांना सांगत होते. मंजुषाच्या कानावरही त्या गोष्टी येत होत्याच. बहुतेकांनी गृहित धरलेलं होतं, की तिनं तर सगळं पाहिलेलंच असणार...

तिघींनी आळीपाळीनं १७०३च्या उघड्या दाराकडे पाहिलं. आत तीन-चार गवंडी माणसं होती. त्यांनी आतल्या भिंती घासून पांढुरक्या केल्या होत्या. हॉलमधला वेडावाकडा वितळलेला पंखा, अर्धवट जळलेले पडदे काढून टाकण्यात आलेले होते. डायनिंगच्या कोपर्‍यातला पाघळलेला स्विच-बोर्ड अजून तसाच होता. बहुतेक रंगकामानंतर तो बदलला जाणार होता. आता कुणीतरी मद्रासी कुटुंब तिथे रहायला येणार होतं. आपल्या शेजारी मराठी मंडळी रहायला यावीत ही मंजुषाची इच्छा यावेळीही अपुरी राहिली होती.
"मम्माऽऽ, फोनऽऽ" अनिताचा मुलगा वरून ओरडला. अनिता घाईघाईत निघून गेली. सौ.कोरेही निघाल्या. त्या लिफ्ट बोलावणार इतक्यात लिफ्टच तिथे आली. आतून बॅनर्जी आजोबा बाहेर आले; सौ.कोरेंकडे पाहून हसले. सौ.कोरे लिफ्टमधून निघून गेल्या. आजोबा १७०३मधे शिरले. ‘आमच्या हॉलचं रिनोव्हेशन करणार का?’ असं विचारत तिथल्या माणसांशी बोलायला लागले. ती माणसं ‘छोटा काम हम नहीं करते,’ असं सांगायला लागली. आजोबा ‘ठेकेदार का नंबर दो’ म्हणाले. त्या माणसांनी दुर्लक्ष केलं. त्यावर आजोबांचा आवाज जरा चढला. मग तिथे रेंगाळलेली मंजुषा आत वळली आणि तिनं आपलं दार लावून घेतलं.

खाली गेटपाशी अजिंक्य आणि निशी कधीचे गप्पा मारत उभे होते. बाल्कनीत टंगळमंगळ करणारा मुकुल हातातली बॅडमिंटनची रॅकेट हवेत झुलवत त्या दोघांकडे बघत उभा होता. अचानक लांबून जोरजोरात पाणी पडल्याचा एक आवाज यायला लागला. तो ऐकताच त्याचा जीव अगदी उचंबळून आला. त्यादिवशी दुपारी त्याला सागरला जे सांगायचं होतं आणि सागरच्या आईनं जे सांगू दिलं नव्हतं, ते सांगण्याची संधी त्याला आज इतक्या दिवसांनी मिळाली होती. तो धावत इण्टरकॉमपाशी गेला. त्यानं आधी सागरला आणि मग राघवला फोन करून ‘खाली ये, मागे, अर्जण्ट’ इतकंच सांगितलं. दडादडा जिना उतरून तो खाली आला. तडक धावत इमारतीच्या मागच्या बाजूला गेला.
पावसाचं अथवा टाकीतून वाहणारं पाणी गच्चीत साठू नये यासाठी गच्चीत दोन पाईप केलेले होते. एकातून बदाबद पाणी पडत होतं, ज्याचा आवाज त्यानं ऐकला होता. दुसरा, ज्याच्याकडे तो आत्ता पाहत होता; त्यातूनही पाणी पडायला हवं होतं, पण पडत नव्हतं. याचा अर्थ तो पाईप कुठेतरी तुंबलेला होता.
सागर, राघवही पळतपळत आले. मुकुलनं आधी त्या पाईपकडे आणि मग गच्चीकडे बोट दाखवलं. तिघांची आपांपसांत नेत्रपल्लवी झाली. ‘सीआयडी-सीआयडी’ खेळासाठी त्यांना आता एक नवीन केस मिळालेली होती!

X--X--X

(माहेर-२०१४ दिवाळीअंकात प्रकाशित झालेली कथा.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय कळाल नाही काहीच.
'अरे केहेना क्या चाहते हो' अस झाल शेवटी ..
अर्थात दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली म्हणजे छानच असावी कथा. पण माझ्या डोक्याच्या 'परिघावरून' गेली :p

अजिबात कळली नाही. एका बिल्डींगमधली इतकी पात्र शेवट कुठेतरी जोडली जातील असं वाटलं होतं पण तसं काही झालेलं दिसलं नाही. गोष्ट विस्कळीत वाटतेय. लिफ्टमधल्या ४ नंबराच्या बटणाचंही गोष्टीत काय स्थान आहे हे ही सापडलं नाही.ंएकूणात मला न कळल्याने आवडली नाही.

प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्याच्या पाईपमध्ये कोंबल्या जात होत्या ना? मग गॅसचा काय संबंध?

पण माझ्या डोक्याच्या 'परिघावरून' गेली>>>>>>>>>>> Lol माझ्याही. काही कळलीच नाही. गोंधळ उडाला वाचता वाचता.

ललिता-प्रीति >> तुमची कथा म्हणुन आवर्जून वाचायला घेतली .. पण खरच शेवट नाही कळला .. नेमका स्फोट झाला कशामुळे??

हिम्स, थ्यांकू. Happy

लक्षपूर्वक, एकही शब्द न गाळता कथा वाचली आणि प्रत्येक टप्प्यावर कथानकाची शीर्षकाशी सांगड घातली, तर सगळं कळेल. बारीकसारीक तपशील दिले आहेत ते त्यासाठीच. त्या तपशीलांच्या मदतीने काय झालं 'असेल' याचा वाचकांनी अंदाज बांधणं अपेक्षित आहे.
कथा सनसनाटी घटना सांगणारी नाही, त्या घटनेची केवळ पार्श्वभूमी आहे.

मलासुद्धा नाही समजली. Sad
पहिल्या दिवसाचे २-३ पॅरा वाचून तुला काय म्हणायचेय ते कळतंय असं वाटलं पण त्यानंतर काही कळलं नाही नक्की काय चाललंय.फोकस हरवला माझा.

मलाही नाही समजली कथा.

मागे तुझ्या एका कथेवर कुणीतरी 'कथालेखनाच्या तंत्रावर खूप जास्त भर आहे' अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती ( नक्की शब्द आठवत नाहीत. ) ही कथा वाचताना मला प्रकर्षाने तसं वाटलं.

शीर्षकाशी घातलेली सांगड समजली ( बहुतेक ) !

हिम्या म्हणतो तसं, परीघावरून कथा वाचा.
घटना घडली तो मधबिंदू, पण परीघावरच्या प्रत्येकाची त्या मध्यबिंदूकडे पाहण्याची दृष्टी निराळी, कोन निराळा, पण त्रिज्या मात्र सारखीच!

घटना घडली तो मधबिंदू, पण परीघावरच्या प्रत्येकाची त्या मध्यबिंदूकडे पाहण्याची दृष्टी निराळी, कोन निराळा, पण त्रिज्या मात्र सारखीच! >>>>> ओके..... पण नेमका स्फोट झाला कशामुळे??

पण ललिता तुझी कथा कधी कळली नाही अस घडला नव्हत.
त्यामुळे तुझ नाव आणि कथा याचा मेळ जमला नसावा .
( हे आपल माझ्यापुरत )

Pages