अपरिपूर्ण तरी अद्वितीय ! (Movie Review - Katyar Kaljat Ghusli)

Submitted by रसप on 14 November, 2015 - 23:35

असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.

Katyar-Kaljat-Ghusali-Marathi-Movie.jpg

'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !

ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने बालगंधर्व, लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !

Subodh-Bhave-Katyar-Kaljat-Ghusali.jpg

विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
Shankar-Mahadevan-Katyar-Kaljat-Ghusali.jpg
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.
Sachin-Pilgaokar-as-Khansaheb-in-Katyar-Kaljat-Ghusali.jpg
सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.
sachin-pilgaonkar-shankar-mahadevan-katyar-kaljat-ghusali-movie-pic.jpg
'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.

असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-katyar-kaljat-ghusli...

(हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.)

--------------------------------------------------------

~ ~ कट्यार काळजात घुसली - Another Take ~ ~

चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.

मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.

हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.

हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)

आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.

संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !

आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.

चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.

तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/another-take_1.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नको नको! प्लीज बाजिराव-मस्त्नानीचा केलाय तेवढा तमाशा पुरे आहे,

परदेशात कट्यारला लाभलेलं यश वाचून खूप आनंद वाटला. काही चुका मान्य करूनही हा चित्रपट लक्षवेधी, संस्मरणीय आणि इतिहास घडवणारा ठरला यात शंका नाही. Happy
डीजे, भन्सालीचा रिमेक अचूक! बुल्स आय पेक्षा भन्साली'ज आय. Lol

मस्त चित्रपट! इथे Los Angeles मधे सर्वाना फार आवडला...:)
सचिनचा खांसाहेब अगदी खासच!
गाणी अजूनही गुणगुणते आहे..:)

हो आणि हवेली चे साइझेस
राजवाडा - ताज महाल
राजगायकाची हवेली - किमान शनिवार वाडा
खाँसाहेबांची गरीब झोपडी - कमीत कमी आगाखान पॅलेस.

आणि कलर स्कीम्स. राजवाडा निळा (ब्लू ब्लड म्हणून!), पडदे, त्यातल्या लोकांचे कपडे, पगड्या, चहा, सगळं निळं. खाँसाहेबांचं सगळं काळं इ.इ. Proud

स्पॉयलर :
सिनेमाचे काही अनुत्तरीत प्रश्नं मिळतात का बघायला युट्युब वरचं नाटक पाहिलं थोडच , तरी त्यात बरीच उत्तरं मिळाली !
या नाटकात पं चन्द्रकान्त लिमये आणि अमोल बावडेकर आहेत.
नाटक आणि सिनेमा मधले मुख्यं फरक :
* सदाशिव इतके वर्षं होता कुठे , पंडितजींना भेटलाच कसा , संगीत सुधाकर ग्रंथाचं महत्त्व हे दाखवलय !
* खांसाहेब निगेटिव नाहीत , ग्रे शेड कॅरॅक्टर आहे आणि मेन म्हणजे ते सलग १० वर्षे का हरले ते एक्स्प्लेनेशन अतिशय पटण्यासारखं देतात , " वर्षानुबर्षे राजदरबाराला पंडितजींच्या गायकीची सवय आहे, थोड्क्यात त्यांची गायकी जास्त लोकप्रिय असल्याने ते जिंकत गेले , वरना सब जानते है हमारी गायकीमे कोई कमी थोडी ना थी' , अशा अर्थाचा डॉयलॉग आहे खांसाहेबांचा, इतका पटला ना तो !!!
येस्स पॉप्युलॅरिटी फॅक्टर , इतकीच गोष्टं खांसाहेबांना इतकी वर्षे पराभूत करु शकते Happy
घेइ छन्द मकरन्द स्वतः च्या शैलीत सादर करताना खां साहेब आणि त्यांचे चेले पंडितजींच्या ओरिजनल व्हर्जन ला मिळमिळीत भेंडीची भाजीची उपमा देतात चक्क Happy
* इथे बाके बिहारी फार महत्त्वाचं आहे कॅरॅक्टर आणि चक्क फ्लर्ट आणि प्रसंगी विनोदीही आहे , उमा आणि झरीना दोघींनाही कविराज लग्नाची मागणी घालतो !
* खांसाहेबांना सदाशिवची एंट्री थोडी मिस्टरिअस वाटते, एक शंका उपस्थित केली आहे खांसाहेबांनी एका डॉयलॉग मधे, कि नेमके पंडितजी जाताच लगेच सदाशिव हवेलीत कसा आला, याला पाठ्वण्यात पंडितजींचा तर हात नाही ' !
* सदाशिवला ते गाणं शिकवत नाहीत याव्हं कारण हेट्रेड नसून इन्सिक्युरिटी .. ते म्हणतात हा थेट पंडितजी शैलीत गातो , याला माझ्या ढाच्यात टाकणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे, एका शैलीतल्या गायकाला दुसर्याशैलीत टाकणे अवघड आहेच व. हा पठ्ठ्या दोन्ही शैली एकत्रं करून स्वतः चं स्थान निर्माण करणार .. ज्या पंडितजींना राजदरबाराने अत्ता कुठे विसरायला सुरवात केली आहे तिथे याला आणल्याने पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या होणार !
* नाटकात झरीना आणि उमाला चांगली गाणी दिली आहेत , सदाशिव उमाला बहिण मानतो !
* खांसाहेबांचे चेले सिनेमात अगदीच निकम्मे दाखवलेत , नाटकात ते कामचुकार दाखवके असले तरी त्यांना गायला बराच स्कोप दिलाय , जसे राहत फतेह अली वगैरेंचे चेले मागे बसून थोडे क होईना गातात आणि त्यांच्या कोरस गाण्याने बराच फरक पडतो मुळ गाण्यात ! त्या २ चेल्यांची स्वतंत्र कव्वालीही आहे नाटकात .
* सदाशिव चोरून खांसाहेबांकडून गायन शिकतो, झरीना त्याला मदत करते घरात लपायला.
असो,तर अजुन मी संपूर्ण नाटक नाही पाहिलं पण उत्सुकता आहे अता !
मी संगीत नाटक फॅन अजिबात नाहीये पण कट्यार सिनेमाच्या निमित्ताने हे नाटक कंपेअर करताना मजा आली :).

थँक्स हिम्स्कूल.
Btw,
इथे ''या भवनातील गीत' सिनेमात घेतलं नाही वाचलं , नाटकात पाहिलं , छान सिच्युएशन आहे पण सिनेमातसुध्द्दा मस्तं घेतलाय तो सीन .. सचिनला पंडीतजींचे आलाप घुमत असल्याचा भास होतो त्यावेळी .
गाणं सुंदर आहे पण नाटकातले खांसाहेब मोस्ट्ली मराठीच बोलतात म्हणून मराठी गात असावेत ! सिएन्मातले उर्दु म्हणून कदाचित घेतलं नसेल का ते गाणं सिनेमात ?
सिनेमात ' घेइ छन्द ' सोडून खांसाहेब मराठीत गात नाहीत, घेइ छन्द सुद्धा मुद्दाम पंडीतजींचं गाणं स्वतः जास्तं चांगलं गाउ शकतो दाखवायला कदाचित .

गाणं सुंदर आहे पण नाटकातले खांसाहेब मोस्ट्ली मराठीच बोलतात म्हणून मराठी गात असावेत ! सिएन्मातले उर्दु म्हणून कदाचित घेतलं नसेल का ते गाणं सिनेमात ? >> हो काल हाच प्रश्न मी टीपापावर विचारला तेंव्हा झेलमने हेच कारण सांगितले होते. फक्त त्या जबरदस्त गाण्यासाठी तरी खांसाहेबांना थोडेफार मराठी बोलायला लावून ते गाणे घ्यायला हवे होते अशी एक चुटपूट लागऊन राहिली आता Happy

सूर से सजी संगिनी अफाट सुंदर गाणं आहे !
परत पहायला हवा अता सिनेमा, कधी कुठलं गाणं आहे नीट लक्षात राहील Happy
'कवन देस कवन नगरीया ' आहे का सिनेमात ? आहे असं वाटतय ..कि मी नुकतच नाटक पाहिलं म्हणून आठवतय ???

'कवन देस कवन नगरीया ' आहे का सिनेमात ? - नाहीये...

'या भवनातील गीत पुराणे' ची सिच्युएशन फारच जबरी आहे... पंडीतजी हवेलीतून गेल्यावर खांसाहेब पहिल्यांदा येतात तेव्हा आहे.. आणि त्याच्या ऐवजी असलेलं पिक्चर मधलं गाणं पण जबरी आहे... सगळी दारं खिडक्या लावून घेतलेली असतात ती गाण्याच्या शेवटी उघडतात..

सूर से सजी संगिनी संगिनी
सूर संगिनी, रागिनी
लेजा तू संग अपने धून अपनी, सूर अपने
सूर से सजी संगिनी संगिनी
सूर संगिनी रागिनी
लेजा जुबान अपनी शान अपनी, तान अपनी

'या भवनातील गीत पुराणे ...मवाळ हळवे सूर जाऊद्या' चाच आशय आहे. या भवनातील कितीही सुंदर गाणं असलं तरी फक्त उर्दू बोलणार्‍या खांसाहेबांच्या तोंडी / पार्श्वभूमीवर विसंगत वाटलं असतं. हे परफेक्ट आहे.

मागच्या आठवड्यात चित्रपट पाहिला. केवळ अप्रतिम कलाकृती!!! वर सगळ्यांनी चित्रपटाविषयी सखोल लिहिले आहेच त्यात जास्त भर घालत नाही. फक्त काही निरिक्षणे नोंदवायची आहेत.
१. पंडितजी आणि खानसाहेबांची स्पर्धेतील गीते - घेई छंद अतिशय सुंदर गायले आहे शंकरने पण मला दिल की तपिश त्याहून खूप जास्त आवडलं आणि मनाला भावून गेलं. त्यामुळे या स्पर्धेत पारडं खानसाहेबांच्या बाजूने झुकायला हवं होतं असं वाटलं!
२. सदाशिवचे चौदा वर्ष गायब असणे - नाटकात याचं स्पष्टीकरण आहे. जेव्हा त्याची खानसाहेबांचे पुतणे चौदा वर्षानंतर आल्याबद्दल थट्टा करतात तेव्हा एखाद्या वाक्यात तिथेच त्याने कारण सांगितले असते तर ते सयुक्तिक ठरले असते.
३. सदाशिव आणि उमा - उमा सदाशिवची चौदा वर्षे वाट पाहात आहे, तिचे सदाशिववर प्रेम आहे असा उल्लेख झरीना करते, ते ऐकताना उगीचच देवदासची दिवा लावून वाट पाहाणार्‍या पारोची आठवण झाली Sad या प्रेमकहाणीची अजिबात गरज नव्हती. खुद्द सदाशिवला तर याचा गंधही नसतो. पुढेही ही प्रेमभावना व्यक्त होताना दिसत नाही. त्यांच्यातले नाते गुरुकन्या, मित्रत्वाचेच दाखवायला हवे होते. नाटकात तर तो तिला बहीण मानतो.
४. सदाशिव आणि झरीना - या दोघांतलं नातं सुंदरपणे उलगडले आहे. मित्रत्व, आदर आणि कदाचित झरीनाला वाटत असलेली नकळत प्रेमभावना. पण दोघांतले प्रसंग अतिशय संयतपणे हाताळले आहेत, मग तो मेणबत्या पेटवण्याचा प्रसंग असो वा सदाशिवला बासरी देतानाचा प्रसंग असो. शेवटी खानसाहेब सुरत पियाकी..याद उनकी आयी गात असतात तेव्हा झरीनाच्या चेहर्‍यावरचे हरवलेले, सदाशिवची वाट पाहणारे भाव आणि तो येताच चेहरा खुलून उठणं खूप सुंदर दाखवलं आहे. उमापेक्षा या दोघांमधली केमिस्ट्रीच जास्त रंगली आहे.
बाकी सगळ्यांचा अभिनय, संगीत तर अत्युच्च्..त्यावर बरीच चर्चा झाली आहेच..ए़कूण चुकवू नये असा चित्रपट आहे!

हो. बाय डिमांड डेन्वरमध्ये देखिल अजुन एक शो करणार आहेत. सचिनने कमाल केली आहे. जीव ओतुन साकारला आहे खांसाहेब. अप्रतिम.

यू ट्यूबवर उपलब्ध असलेल्या संबंधितांच्या मुलाखती शोधून पाहिल्या. सिनेमा आवडो न आवडो (मला आवडलाच) सुबोध भावेची पॅशन आणि एकेका व्यक्तिरेखेचा, प्रसंगाचा, ओव्हरऑल कथेचा केलेला विचार अगदी भिडतो.

मी नाट्य संगीत कधी फार फॉलो केलं नव्हतं , 'सूरत पियाकी' मला हिंदी सारेगमप मुळे माहित झालं Happy
विश्वजीत बोरवणकर हिंदी सारेगमप मधे गायला होता , गेस्ट जज हरीहरन होता आणि शंकर मेंटॉर्स पैकी एक असल्याने समोर बसून विशेष दाद देत होता या गाण्याला. अर्थात परफॉर्मन्स ऑफ द डे विश्वजीत जिंकला होता, अजुनही आवडतं मला त्याचं व्हर्जन !
http://youtu.be/-Y2y7p6HyeY
सारेगमप (हिंदी) चे काही कलाकार खरच फार तयारीचे होते, लक्षात राहतील कायम :).

Yes Himskool,
They mentioned that on saregamapa Hindi.
Even though he was a winner, he appeared for audition round and entered in proper way in hindi saregamapa.
Didn't enter directly as wildcard.

त्या इंटरव्युअरची युट्युबवर पण उडवली आहे. खरय, कसला लेम आहे. मुलाखत मस्त आहे! छान बोल्तो सुबोध भावे आणि सचिन सुद्धा.

Pages