असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.

'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !
ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने बालगंधर्व, लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !

विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.
सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.
'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.
असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !
रेटिंग - * * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-katyar-kaljat-ghusli...
(हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.)
--------------------------------------------------------
~ ~ कट्यार काळजात घुसली - Another Take ~ ~
चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.
मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.
हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.
हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)
आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.
संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !
आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.
चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.
तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/another-take_1.html
मी अजून चित्रपट बघितला नाही,
मी अजून चित्रपट बघितला नाही, पण संपूर्ण ५ तास लांबीचं नाटक बघितलंय, लाईव्ह! "दिन गेले भजनाविण सारे" हे बालपणच्या सदाशिवने पंडितजींच्या तालमीत गायलेलं गाणंही असलेलं नाटक. आणि त्यात पंडितजी होते प. रघुनंदन पणशीकर, खांसाहेब = आफळेबुवा. बाकेबिहारी = कै. प्रकाश इनामदार.
खांसाहेबी ही खलनायकी व्यक्तिरेखा नाही. उलट, चांद-उस्मान रियाझ न करता नुसती टंगळमंगळ करतात तेव्हा "अरे, तुमची बुद्धीदेखील जिथे जात नाही तिथे त्या सदाशिवचा गळा अगदी सहज फिरून येतो. असा एखादा शागिर्द आम्हाला मिळाला असता तर...!" असं सदाशिवचं कौतुक (त्याच्या अनुपस्थितीत) आणि घराण्याचा आडवा येणारा अभिमान असं सगळं व्यक्त करतात. नंतर एकदा पंडीतजी हवेलीत येऊन गेले असं त्यांना समजल्यावर "मी त्यांचं स्वागतही करू नाही शकलो, कारण ते येऊन गेले हे समजलंच नाही! ये क्या हो गया!" असं म्हणून ते स्वतःला दोष देतात त्यामागे कुठेतरी, कसं का असेना, पण मिळालेल्या राजगायक पदाने आपण आपल्यातच मश्गुल झालोय आणि इतक्या मोठ्या गायकाचा मान ठेवला नाही ही अपराधी बोच असते. आणि ही बोच खांसाहेबांचं माणूसपण लख्ख करते! किरकोळ वाटले तरी हे फार महत्त्वाचे प्रसंग आहेत.
कवी बाके बिहारींबद्दल फार काही लिहिलेलं नाही पण नाटकात बाके बिहारी असेच महत्त्वाचे आहेत. पंडितजींनी हवेली रिकामी करणं, त्याच दिवशी खांसाहेबांनी हवेलीचा ताबा घेणं, आणि त्याच दिवशी सदाशिवने पंडितजींचा शोध घेत तिथे पोहोचणं यातला योगायोग केव्ळ कवीजीच अधोरेखित करतात. शिवाय, खांसाहेबांनी राजगायक झाल्यावर बेगमसाहिबांना कायमचं माहेरी पाठ्वणं, पंडीतजींनी गाणं बंद करणं यामागचा संबंध आणि संशय आधी त्यांनाच येतो. सदाशिवला चोरून तरी का होईना, खांसाहेबांची तालीम मिळायला तेच मदत करतात. कवीजी म्हणजे चतुर, हजरजबाबी, अतिशय बुद्धिमान, आणि सहजी न जाणवणारे पण कमालीचे संवेदनशील अशा व्यक्तीमत्वाचे आहेत.
खांसाहेब आणि कवीजी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनुक्रमे खलनायकी आणि विनोदीपणाच्या सीमारेषा काहीशा धूसर वाटू शकतात. त्या समर्थपणे मांडणं महत्त्वाचं आहे. काळ्या-पांढर्यात बसवू नयेत. सिनेमात असं आहे असं मला नाही म्हणायचं. मी मला काय वाटलं ते लिहिलंय.
मी आज पाहिला. न्यू जर्सीत
मी आज पाहिला. न्यू जर्सीत थिएटर ला लागलेला मराठी सिनेमा गर्दीमुळे पहिल्या रांगेत कोपर्यातल्या खुर्ची वर बसून बघावा लागला हा सुखद अनुभव. वर आलेल्या चुका, आक्षेप वगैरे मान्य करूनही अजिबात चुकवू नये असा सुंदर सिनेमा.
मेधाव्ही आणि चिनुक्स, आपलं
मेधाव्ही आणि चिनुक्स,
आपलं आणि ते जे कुणी मंदार करंजकर आहेत त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे कळलं नाही. अभिजात शास्त्रीय संगीत किंवा घराण्याचं गाणं म्हणून काय विलंबित ख्याल गायला हवे होते का ? मूळ नाटकात तरी आहे का विलंबित पेशकश ?
जलदगतीने ताना घेतल्या की झालं, असं नक्कीच नाही. गायकीतला ठहरावही तितकाच महत्वाचा आहे. जो खांसाहेबांच्या 'दिल की तपिश' नंतर पंडितजींनी सादर केलेल्या 'घेई छंद मकरंद' मधून ठळकपणे जाणवून येतो. जलदगतीने ताना घेणं म्हणजे कुठलीशी किरकोळ बाब आहे, असा एकंदर त्या ब्लॉगमधील सूर दिसतो. हा सगळा विरोधासाठी विरोध वाटतो.
ह्या सिनेमामुळे 'हेच अभिजात शास्त्रीय संगीत आहे' असा गैरसमज पसरेल अशी भीती जशी मंदार साहेबांना वाटतेय, तशीच मलाही भीती वाटतेय की, 'ब्लॉगर पुण्याचे आहेत, म्हणजे ते सर्वज्ञ आहेत आणि म्हणून त्यांनी जे लिहिलंय ते बरोबरच असेल', असा गैरसमज होऊ शकतो; ह्यास्तव हे स्पष्टीकरण.
मंदार करंजकर ह्यांच्या
मंदार करंजकर ह्यांच्या ब्लॉगवर मी खालील प्रतिक्रिया नोंदवली आहे. स्वीकृत न झाल्यास इथे नोंदवून ठेवतो :-
नमस्कार !
उगाच आणि ठरवून (की मला टीकात्मक लिहायचं आहे) लिहिल्यासारखं वाटतंय. तुमची नेमकी अपेक्षा काय होती ? विलंबित ख्याल सादर व्हायला हवा होता का ? द्रुतगतीत ताना घेणं म्हणजे अगदीच किरकोळ बाब नक्कीच नाही. त्या लयीच्या अर्ध्या लयीतही कुणाचा गळा फिरत नाही. अभिजात संगीत म्हणजे नेमकं काय ? रागदारी ? जर 'रागदारी'च असेल, तर रागदारी ह्याहून अधिक चांगल्या प्रकारे चित्रपटातून कशी पोहोचू शकेल, हे जरा विषद करायचा प्रयत्न करावा.
मी व माझ्या घरच्या सर्वांनी हा चित्रपट तीन वेळा चित्रपटगृहात जाऊन पाहिला आहे. आम्ही इतक्यांदा पाहिला आणि तो आम्हाला आवडला म्हणून तो चांगलाच असणार, असा अट्टाहास अजिबात नाही माझा. कारण चित्रपटात लहान मोठ्या खूप चुका आहेत. (तालवादक डावीकडे दाखवला आहे.) पण त्या सर्वांसहसुद्धा ही एक अद्वितीय कलाकृती वाटली, ती केवळ उत्तम अभिनय व उत्कृष्ट संगीत ह्यांच्याच जोरावर. संगीतच आपल्याला आवडलं नाही ! हा आपापल्या वैयक्तिक आवडी-निवडीचा भाग झाला. मात्र विरुद्ध मतसुद्धा नोंदवून ठेवलेलं असावं, ह्यासाठी हा प्रतिसाद दिला आहे.
आपल्या परिचयातून आपणही शास्त्रीय संगीतसाधक असल्याचे दिसले. मात्र त्यांत कुठेही आपल्या गुरूंचा नामोल्लेखही आलेला नाही. अभिजात संगीतसाधक आपल्या गुरुंचं नाव स्वत:च्याही नावाआधी घेताना मी पाहिले आहेत.
धन्यवाद.
- रणजित पराडकर
(प्रतिसाद न आवडल्यास अस्वीकृत करावा. हरकत नाही.)
न्यूजर्सीत ह्या सिनेमाला
न्यूजर्सीत ह्या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सगळे शो फुल्ल आणि थेटरमध्ये जायलाही अर्धा तास लायनीत उभं रहावं लागतंय. एखादा शो लावला की पुढच्या पंधरा मिनिटांत तिकीटं संपतायत. तर ह्या सगळ्या गडबडीतून आम्हांला कालच्या शो ची तिकीटं मिळाली आणि एक अतिशय सुंदर चित्रपट पहायला मिळाला. मूळचं नाटक पाहिलेलं नाही, त्याबद्दल वाचलेलं नाही त्यामुळे कंपेअर करायला हातात काहीच नाही पण जे बघितलं ते खूपच आवडलं.
आज बघितला. मस्त! एकसेएक गाणी.
आज बघितला. मस्त! एकसेएक गाणी. सचिनचं काम खरच छान झालय. उर्दू डिक्शन वर पण खुप मेहनत घेतलेली जाणवली. एकदंरित सगळ्या सिनेमावरच खुप मेहनत घेऊन अतिशय उत्तम असं फायनल प्रॉडक्ट तयार झालय.
रिव्यु पण आत्ताच वाचला, छान लिहिलय.
सुबोध भावेंचा हा चित्रपट काल
सुबोध भावेंचा हा चित्रपट काल पाहिला.....आणि कालपासुन त्याची धुंदी चढली आहे ती अजुन उतरत नाहिये.....अप्रतिम, अद्भुत, अवर्णनीय....खरतर योग्य शब्द सापडत नाहीयेत वर्णन करायला....
दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, गीते, सिनेमॅटोग्राफी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संगीत...सर्वच बाबतीत अत्यंत सुरेख चित्रपट. सुबोध भावे आणि टीम चे मनापासुन अभिनंदन.
माझ्या ५ वर्षाच्या लेकीने अतिशय तल्लीन होउन पाहिलेला हा पहिलाच चित्रपट..."सूर निरागस हो" , "मनमंदीरा" ही गीते पडद्यावर चालु असताना त्याच्या बरोबरीने माझी लेक सुद्धा गात होती...यातच सगळं आलं...
मूळ नाटकाची तोडफोड केली, मूळ ढाचा बदलला...असं कोणीही कीतीही म्हणाले तरी या "कट्यार.." ची धार अज्जिबात कमी होत नाही. जुनं ते सोनं हे कीतीही खरं असलं तरी नवे बदल, जर ते चांगल्या हेतूने केले असतील तर आपलेसे करायला काय हरकत आहे. आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना ज्याना जुनं नाटक आता पाहाणं शक्य नाही त्यांच्या साठी सुबोध भावे नी दिलेली ही "कट्यार.." खरच अनमोल आहे.त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार.
जुन्या कट्यार च्या गीतांच्या तोडीस तोड नवीन सर्व गीते पुढील अनेकानेक वर्ष आमच्या मनात घर करुन राहातील हे निश्चित....
चित्रपट पाहुन बाहेर पडताना नक्कीच म्हणावसं वाटतं...
जिते रहो....!!! गाते रहो...!!!
( ईंटरवल च्या दरम्यान थिएटर मद्धे "एका ऐतिहासिक" (?) चित्रपटाच्या प्रमोशन च्या निमित्ताने "पिंगा" नामक गाणं सुरु झालं तेव्हा सुग्रास भोजनात अचानक खडा लागल्यासारखं वाटलं. किमान "कट्यार.." सारख्या कलाकृती चालु असताना रसिकांना त्याच धुंदीत राहु द्यायला हवं)
अखेर शनिवारी पिक्चर बघितला...
अखेर शनिवारी पिक्चर बघितला... अतिशय सुरेख बांधला आहे पिक्चर..
मूळ नाटक आणि पिक्चरची तुलना होणं अगदीच सहाजिक आहे.. पण दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी फिट आहेत आणि हिट आहेत..
गाणी संपता संपता जरी हीच गाणी नाटकात असती तर नक्कीच वन्समोअर मिळवून गेली असती असं सारखंच वाटत होतं.. एखादे सुरेख गाणे संपल्यावर प्रत्यक्ष समोर बसलेल्या प्रेक्षकाकडून मिळणारी दाद ही वेगळीच..
नवीन आलेली सगळीच गाणी भन्नाट आहेत.. मूळ नाटकातली काही गाणी नाहीयेत पण त्या ऐवजी असणारी गाणी तितक्याच ताकदीने सादर झाली आहेत...
मन मंदीरा आणि काजव्याचा सीन अप्रतिम..
एक एकदम चकाचक पिक्चर...
एकच गोष्ट खटकली.. ती म्हणजे सब टायटल्स.. तिकडे फार लक्ष गेलं.. आणि राज गायकाचे भाषांतर कुठेतरी चुकीचे झाले आहे.. royal poet झाले आहे.
एकच गोष्ट खटकली.. ती म्हणजे
एकच गोष्ट खटकली.. ती म्हणजे सब टायटल्स.. तिकडे फार लक्ष गेलं >>> हिम्सकूल, हीच गोष्ट मला दुसर्या बाजूने खटकली
सबटायटल्स अर्धवट दिसत होती. गाण्यांसाठी आणि पब्लिसिटीमुळे नॉन मराठी पब्लिक आलं तर त्यांच्यासाठी सबटायटल्स नीट दिसायला हवी होती असं वाटलं.
गाण्यांची चाल सुंदर आहेच पण ठेका इतका सुंदर लावलाय की त्यामुळेही काटा येतो गाणं ऐकताना. संगीत संयोजन आदित्य ओकचं आहे ना ? त्याचंही स्पेशल कौतुक.
सब टाईटल्स अगदी काही च्या
सब टाईटल्स अगदी काही च्या काही होती पण तरीही माझ्यासोबत माझ्या ३ अमराठी मित्रांनी सिनेमा पाहिला आणि त्यांना आवडला म्हणून मी सब टाईटल्सला माफ करत आहे
संगीत मस्तच झालंय.. आणि मधले
संगीत मस्तच झालंय.. आणि मधले जे पीस वाजवले आहेत ते अल्टीमेट आहेत... तराणा किंवा कव्वाली मधले पीस दाद घेतातच...
सब टाईटल्स अगदी काही च्या
सब टाईटल्स अगदी काही च्या काही होती >>> हो काय ?
मग वाचता आली नाहीत ते बरंच झालं.
हो, सगळ्याच गाण्यांची अरेंजमेंट खूप सुरेख आहे.
चित्रपट आवडला. मूळ नाटक मी
चित्रपट आवडला. मूळ नाटक मी पाहिलेलं नाही, त्यामुळे स्वतंत्र कलाकृती म्हणूनच पाहिला गेला. पटकथेबद्दल काही किरकोळ प्रश्नचिन्हं निर्माण झाली, पण मुख्यतः गाणी आणि निर्मितीमूल्यं दोन्हींसाठी कौतुक वाटलंं. सर्वच कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. (शंकर महादेवन काही अभिनेता नाही, पण त्याच्या बाबतीत नाहीतरी गायन जास्त महत्त्वाचं होतंच. सहानुभूती वाटण्याइतपत सज्जन पंडितजी दिसतो. फक्त 'वनवासा'तही गुबगुबीत दिसतो त्याची मजा वाटली, पण ते असो.
)
सचिनचं काम आवडलंं - संवादफेक खास. उर्दू उच्चारांवर, लहजावर मेहनत घेतलेली दिसली.
तो पुष्कर श्रोत्री मात्र मला समहाऊ अजिबात आवडत नाही, यातही नाही आवडला. भूमिकेच्या मानाने फार उथळ दिसतो तो. असो.
एकंदरित मस्त अनुभव. माझ्या अमेरिकन टीनएजर मुलालाही सिनेमा आवडला.
मूळ नाटकात बाके बिहारी अर्थात
मूळ नाटकात बाके बिहारी अर्थात कविराज बर्यापैकी महत्त्वाचे पात्र आहे..
त्यामानाने पिक्चर मध्ये त्याला विशेष काहीच नाहीये... सदाशिव नदीकाठी बसलेला असतो तेव्हाचा त्याचा मोनोलॉग मात्र मस्त आहे...
मनापासून पंडीतजींकडे ओढा असलेला पण पदामुळे राजगायकाबरोबर संपर्क ठेवायलाच लागणारी व्यक्तीरेखा आहे कविराजांची नाटकात.
हो, तो रोल चांगला आहे, पण तो
हो, तो रोल चांगला आहे, पण तो नट नाही आवडत/ला मला.
नाटकातलं नाही माहीत - कुठे डीव्हीडीवर वगैरे आहे का उपलब्ध कुठल्या जुन्या/नव्या संचात?
झी वर प्रसारण झालंय नवीन
झी वर प्रसारण झालंय नवीन संचातल्या नाटकाचं.. बहुतेक डिव्हीडी असावी... शोधावीच लागेल..
जुन्या संचातल्या नाटकाचे मुंबई दूरदर्शन कडे रेकॉर्डींग होते पण त्यांनी ते पुसले म्हणे.. असं मला कळालंय.
>> दूरदर्शन कडे रेकॉर्डींग
>> दूरदर्शन कडे रेकॉर्डींग होते पण त्यांनी ते पुसले म्हणे
धन्य!
तुला डीव्हीडीबद्दल कळलं तर प्लीज सांग.
राजाचं काम केलेल्या नटाची पर्सनॅलिटी चांगली आहे, पण अॅज अ कॅरॅक्टर त्या शेंदूर प्रकरणात त्याला अजिबात संशय येत नाही आणि तो काय झालं याचा तपास करायचे कष्ट घेत नाही हे नवलाचं वाटलं. तसंच त्याची गुणग्राहकता ती वार्षिक स्पर्धा घेण्यापुरतीच मर्यादित असते का असंही. म्हणजे खानसाहेबांच्या बाबतीत इतका गुणी कलाकार आपल्या राज्यात गरीबीत राहतो याचं गुणग्राहक राजाला काहीच वाटत नाही? भले ते राजगायक न होवोत, पण पंडितजींच्या खालोखाल उत्तम गायक आहेत हे दिसत असतं ना? त्यांनाही द्यायचा की काहीतरी तनखा वगैरे!
युट्युबवर एका वेगळ्या संचातले
युट्युबवर एका वेगळ्या संचातले उपलब्ध आहे. ही त्या नाटकाची लिंक.
हे साधारण ९८-२००० च्या आसपासचे आहे. त्यातील उमाचे काम करणारी दीपश्री काळे माझ्याबरोबर कॉलेजला होती.
ओह धन्यवाद!
ओह धन्यवाद!
मी शनिवारी पाहिला. मला
मी शनिवारी पाहिला. मला चित्रपट आवडला पण प्रामाणिकपणे सांगायचं तर भारावून वगैरे अजिबात व्हायला झालं नाही. संगीत, गाणी आवडली. मला शंकर महादेवनचं काम (गाणं) जास्त आवडलं ;). मूळ नाटक पाहिलेलं नव्हतं त्यामुळे स्वतंत्र कलाकृती म्हणूनच पाहिला. पूनम, मंजूडी, रसप यांनी दुसर्या टेक मधे लिहीलेले मुद्दे प्रकर्षानं जाणवले. संगित घराण्यांचा संघर्ष हा चित्रपटाचा 'आत्मा' (?) किंवा गाभा किंवा पाया हवा होता तो कुठेच जाणवत नाही. वैयक्तिक द्वेष आणि मानापमान याभोवती कथा फिरते त्यामुळे ज्या उंचीवर चित्रपट पोचला असता तसा पोचत नाही.
सचिनचे काम खूपच लाऊड वाटलं. सदाशिवाची व्यक्तीरेखा फिल्मी, उथळ वाटली. मृण्मयी देशपांडेचा अभिनय थोडा नाटकी वाटला. सुबोध भावेला एका शॉटपुरता भन्साळी व्हायचा मोह आवरला नाही ;). सदाशिव उमेला भेटायला येतो तेव्हा ती जिन्यावरून उतरत येते तेव्हा भन्साळी आजोबांची आठवण झाली ;).
घरी आल्यावर यूट्यूबवरचं नाटक पहायचा प्रयत्न केला. गाणी सोडता नाटक झेपलं नाही. पण अनेक मुद्दे नाटकात सविस्तरानं येतात. प्रज्ञा९ ने सविस्तर लिहीलं आहे याबद्दल. सदाशिवाची संगीताबद्दलची तळमळ, गुरूकडून शिकण्याची आस तसंच तो पंडीतजींना कुठे भेटला वगैरे. खानसाहेबांची व्यक्तीरेखा सिनेमातल्याप्रमाणे खलनायकी, फिल्मी न होता संगीत घराण्यावर प्रेम असलेला एक गुरू अशी आहे.
सगळे मुद्दे मान्य करूनही प्रयत्न नक्कीच चांगला आहे. मराठी चित्रपट पहायला लोक रांगा लावून उभे आहेत वगैरे चित्र बरेच दिवसांनी दिसलं. आमच्या छोट्या गावातही तीन शोज झाले. तिन्ही हाउसफुल!
आणि हो, कट्यारीचं 'स्वगत' हा
आणि हो, कट्यारीचं 'स्वगत' हा मात्र बालिश आणि बोरिंग प्रकार वाटला.
काल बघितला चित्रपट. गाणी
काल बघितला चित्रपट. गाणी अर्थातच फार आवडली. सगळ्यांनी कामं पण मस्त केलीत. झरीना प्र-त्ये-क वेळी 'सदाशिव'चा उच्चार अगदी शुद्ध मराठीत करते मात्र. बाकी चित्रपट एकदम चकचकीत आहे. कलाकारांचे कपडे, इ.
कट्यारच्या निमित्ताने मराठी चित्रपटांना भरपूर गर्दी होते हे लक्षात आलं तेव्हा अगदी सगळे नाही तरी गाजलेले निवडक चित्रपट इथे थेटरात लावण्यात येतील असं आमच्या राज्यातल्या मंडळानं सांगितलं ही आणखी एक जमेची बाजू.
झरीना संस्कृत शाळेत शिकली ना
झरीना संस्कृत शाळेत शिकली ना पंडितजींच्या कृपेने? त्यामुळे नीट उच्चार करेलच.
फक्त 'सदाशिव'चा?
फक्त 'सदाशिव'चा?
इतर कुठले निराळे करते का? मग
इतर कुठले निराळे करते का? मग मी नाही नोटिस केले ते
*
*
मला प्रचंड आवडला , अगदी फ्रेम
मला प्रचंड आवडला , अगदी फ्रेम बाय फ्रेम !
सगळच सुरेख आणि श्रवणीय , अर्थात सिनेमाचा खरा हिरो संगीत !
जुन्या संगीताचं रिक्रिएशन करताना शंकर महादेवन ,राहुल देशपांडे , महेश काळे कमाल गायलेच आहेत पण विशेष कौतुक शंकर एहसानलॉय च्या नवीन गाण्यांच् .. दिल कि तपिश , सुर निरागस हो, मनमंदिरा, यार इल्लाही झक्कास जमलीयेत , कुठेही कमी नाहीत जुन्या गाण्यांना मॅच करताना !
इन फॅक्ट 'दिल कि तपिश' गाऊन खांसाहेब मुकाबला हरलेच कसे हा मात्रं प्रश्नं पडला , शंकर महादेवन उच्च गायलाय घेइ छन्द पण राहुल देशपांडेचं दिल कि तपिश इज आउट ऑफ धिस वर्ल्ड :).
कलाकारांमधे : सगळ्यांचीच कामं फार आवडली , सचिनचे खांसाहेब सर्वात जास्त आवडले !
शंकर महादेवनचा निरागस भोळा पंडितजी खरच भोला भंडारी आहे :).
सुबोध भावेचा सदाशिव पण आवडला , त्याचे आणि सचिनचे गातानाचे हातवारे संगीत जाणकरांना लाउड वाटल्याचं वाचलं , मला तरी ते खटकलं नाही (मी संगीत तज्ञ नसल्यानी ), उलट लहानपणी अनेक दिग्गजांना भयंकर हातवारे करत गाताना पाहिल्याचं चांगलं आठवतय , इतके लाउड हातवारे फेसेस करताना ते गाऊ कसे शकतात असं वाटायचं त्यावेळी पण कदाचित ते अगदी नॅचरल भावनेच्या भरात गाताना आपोआप होत असणार :).
अमृता खानविलकर एरवी कधी इतक्या सहज वावरत नाही पण या सिनेमात अमृताची झरीना कमालीची सहज सुंदर !
मृण्मयी, पुष्कर शोत्री, राजा राणी आपापल्या कॅरॅक्टरला सुट झालेत .
साक्षी तन्वरचा छोटा रोल एकदम लक्षात रहातो !
काही आवडलेले प्रसंग : * शंकर महादेवन गाताना काजव्यांच्या अवतरण्याचा प्रसंग !! किमान या सीन पुरता हा सिनेमा एकदा तरी 4D करा प्लिज !!
* खांसाहेब पहिल्यांदा मुकाबला करतात तेंव्हा त्यांची मुद्रा, नंतर हरल्यानंतर् सभेमधे सगळिकडे नजर टाकतानाची त्यांची वेगळीच मुद्रा !
* राजगायक बनून खांसाहेब हवेलीत येतात त्यावेळी पंडितजींचे सूर त्यांच्या कानात घुमत रहातात , झरीनाला ते खिडक्या दारं लावून घ्यायला सांगतात आणि स्वतः ताना घेउ लागतात पंडीतजींचे सूर विसरण्यासाठी पण प्रत्येक तानेनंतर पंडितजींच्या शैलेस्त त्यांचे सूर एको सारखे घुमत रहातात खांसाहेबांच्या मनात !
* सदाशिव परत येतो तेंव्हा काजवे पुन्हा एकदा .
* खांसाहेबांनी सदाशिवाचा आवाज गिरवी ठेवल्याने झरीना सदाशिवला बासरी आणून देते तो प्रसंग !
* झरीना आणि सदाशिवचा मेणबत्या लावतानाचा प्रसंग .
* मशिदीत सदाशिव मुकाबला करतो तो प्रसंग .
आणि अर्थात शेवटचा सूरत पियाकी मुकाबला आणि शेवटची इच्छा म्हणून सदाशिवचे गायन , ' परफॉर्म अॅज इफ देअर इज नो टुमॉरो ' !
कपडेपट पण आवडला , अमृता खान्विलकर अनारकली मधे सुंदर दिसते !
सचिनचा कपडेपट सर्र्वात बेस्ट ..त्याच्या टोप्या -शाल-शेरवानी-जॅकेट्स एकदम मस्त !
खटकली ती एकच गोष्ट :
स्त्री गायिकांना गाणी फारशी डॉमिनन्ट दिली नाहीयेत , दिली असती तर म्युझिकल ट्रिट अजुन जास्तं आवडली असती !
उमा सदाशिवला गायन शिकवते अशी कथा असताना तिची गाणी मस्ट होती आणि झरीनाचं 'लागी करेजवा कटार' हवच होतं ( ते मधे बॅक्राउंडला वाजतं फक्तं ).
अवांतर :
भन्सालीचा यावर रिमेक आला तर त्याला हम सिल दे चुके + देवदास मसाला मारून कट्यार बनवायचा फुल स्कोप आहे !
उमा- झरीना लो वेस्ट घागरा चोली मधे हवेलीत बाग्डणार !
अनेक वर्षांनी परतलेल्या सदाशिवला गाताना पाहून काजवे चमकतात त्यावेळी उमाच्या डोक्यतही काजवे चमकणार ..जिन्यावरून येते त्यावेळी ती सात फुटी झिरझिरीत पदर चोळी ऐवजी जमिनीवर लोळवत सुसाट पळेल , पळताना एखाद दुसरे मेणबत्ती स्टँड पडतील , आग लागेल आणि 'अल्बेला सजन आयोरी' अजुन एक व्हर्जन वाजणार !
झरीना- सदाशिव- उमा लव्ह ट्रँगल नक्क्की रंगणार !
झरीना- सदाशिव मेणबत्त्या लावायच्या प्रसंगात मेणबत्ती स्टँड ऐवजी भलीमोठी झुंबरं दाखवणार , एक झुंबर कोसळून खाली येणार 'हम दिल' सारखं , ते पकडत एकामेकांकडे बघत झरीना सदाशिवच्या प्रेमात पडणार !
पंडितजी सदाशिवचा गंडा काढून घेतत तो प्रसंग : " गुरुदक्षिणा देनाका समय आगया है म्हणत पंडीतजी रुद्रावतार धारण करणार हम दिल च्या विक्रम गोखलें सारखा .. सदाशिवला हाकलून देणार , उमा पुन्हा सात फुटी पदर लोळवत मागे धावणार आणि सदाशिव तिला स्टॅचु करणार... तिथे गाणं वाजणार ' तो लुट गए हां लुट गए.. लुट गए हम तरी मुहब्बत मे '
उमा इन्स्क्युअर होउन झरीनाला सदाशिव कुठे आहे जाब विचारायला येणार जशी पारो येते चन्द्रमुखीकडे !
जमलच तर सदाशिव आणि कविराज 'शीशे से शीशा टकराए' वर ठुमके मारणार
आणि लास्ट बट नॉट लिस्ट ....................................................
उमा - झरीना एकत्रं नाचणार ' लागी करेजवा कटार ' !!
अंजली नि पूनमच्या रिव्ह्यूला
अंजली नि पूनमच्या रिव्ह्यूला अनुमोदन. खांसाहेबांची भूमिका ग्रे शेड मधे न दाखवणे हा सगळ्यात खटकलेला भाग. पण तरीही सगळ्या चूका धरून सुद्धा आवडला.
भन्साली रीमेक
भन्साली रीमेक
डिज्जे, सगळ्या रिव्यु ला +१!
डिज्जे, सगळ्या रिव्यु ला +१!
Pages