असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.

'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !
ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने बालगंधर्व, लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !

विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.
सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.
'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.
असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !
रेटिंग - * * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-katyar-kaljat-ghusli...
(हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.)
--------------------------------------------------------
~ ~ कट्यार काळजात घुसली - Another Take ~ ~
चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.
मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.
हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.
हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)
आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.
संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !
आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.
चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.
तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/another-take_1.html
चित्रपट पाहून घरी आल्यानंतर
चित्रपट पाहून घरी आल्यानंतर कट्यारच्या मूळ गाण्यां ची कॅसेट ऐकल्यावर मग कसे गाआआआआर वाटले ह्यातच काय ते आले. सिनेमात जुन्या कट्यार भक्तांसाठी चिडचिड होणार्या काही गोष्टी आहेत, परंतु, जुने भक्त तुलनेने कमी आहेत त्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने नव्या लोकांना आवडतोय ही फार चांगली गोष्ट आहे.
मी एक जुन्याचा भक्त आहे...
मी एक जुन्याचा भक्त आहे... वसंतरावांचे , लिमयांचे पाहिले आहे. हे बघू.
बादवे
नानाच्या नटसम्राटचा टेलर रिलीस झाला आहे. नानाने जबरीच बेअरिंग घेतले आहे नटसम्राटाचे ...
पण सदाशिवला तळमळ आहे ती
पण सदाशिवला तळमळ आहे ती गुरूच्या आशीर्वादाची आणि गुरूच्या अनुग्रहाची. ही तळमळ चित्रपटात नाहीच. उलट तो सूडाची वगैरे भाषा करतो. >>> हो, एका प्रोमोमध्ये उडतउडत काहीसे असे कानावर आले आणि आश्चर्य वाटलेले. खरेच असे असेल तर मसालापट झाला की!
या भवनातील गीत... गाळले आहे असे ही वरील प्रतिक्रियामधून समजते. खांसाहेबांचा पंडितजींच्या गायकीला (घराण्याला) असलेला विरोध त्या गाण्यातून प्रतीत होतो. माझे आवडते गाणे आहे.
आता भीती वाटतेय बघायची. :-o
प्रत्येकाने जरुर बघावा असा
प्रत्येकाने जरुर बघावा असा आहे. परिक्षण नेहमीप्रमाणे मस्तच.
<< आधी म्हटल्याप्रमाणे उमा,
<< आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक ! >>
उमा = मृण्मयी
झरीना = अमृता
मग या चौघी आहेत की दोघी?
पूनम चा प्रतिसाद आवडला .. मी
पूनम चा प्रतिसाद आवडला ..
मी नाटक बघितलेलं नाही .. कथेबद्दलही माहिती नव्हती ..
बाकी सगळं आवडलं पण कथा दमदार वाटली नाही त्यातल्या संगीताला साजेशी किंवा मग असं म्हणायला हवं की तशी सादर करता आली नाही ..
उमा आणि सदाशिव च्या रडण्याचा कंटाळा आला सेकण्ड हाफ मध्ये .. मला काही सुबोध भावे फारसा आवडत नाही त्यामुळे असेल ..
पण पिक्चर बघायला, ऐकायला मजा आली .. संगीत आणि शंकर महादेवन खरे हीरो माझ्याकरता ..
@chinooks, I love and always
@chinooks, I love and always watch movies in theaters only.. but marathi movie releasing in theaters of Panama country, not happening in next 100 years..
hence downloading is the only option
मजबूरी है!!!
काल पाहिला चित्रपट..आवडला. पण
काल पाहिला चित्रपट..आवडला. पण बाकी मराठी सिनेमांपेक्षा जास्त लांबीचा असूनही पूर्ण समाधान झालं नाही. अजून काहीतरी हवे होते ही भावना मनात राहिली. पण तरीही, सुबोध आणि टीमने हा चित्रपट यशस्वीरीत्या पेलला आहे.
सचिनचा अभिनय लाजवाब! पण सुबोध भावेचा रोलच तोकडा वाटला. त्याच्या वाट्याला अजून प्रसंग हवे होते. काही गाणी अजून विस्ताराने दाखवायला हवी होती. 'शिव भोला भंडारी' हे अरीजीत सिंगचं अप्रतिम असं गाणं चित्रपटात खूप कमी दाखवलंय, अर्धवट दाखवलंय. शिवाय पडद्यावर त्याचा आवाज सुबोधला शोभत नाही. अमृता आणि मृण्मयीने त्यांच्या भूमिका छान निभावल्या आहेत. पण उमाने सदाशिवाला 'मला जे शिकवलंयते मी तुला शिकवेन' असं सांगून थोड्याच वेळात 'मला जे येत होतं ते सगळं मी तुला शिकवलं' असं दाखवणं हे म्हणजे शाळेतल्या नाटकासारखं वाटलं. तसंच शेवटच्या प्रसंगात खांसाहेबांची अट आणि त्यामुळे कोड्यात पडलेला राजा, हे सगळं खूप तोकडं वाटलं. ह्या प्रसंगांना अजून खोली हवी होती.
मनमंदिरा हे गाणं आणि सदाशिव-उमाचे प्रसंग ह्यातली सिनेमॅटोग्राफी खूप सुंदर आहे. खिद्रापूरचं मंदिरही खूप छान दाखवलं आहे, पण दोनतीन वेळा तोच तोच शॉट दाखवला आहे, हे टाळता आलं असतं.
मी तर शिव भोला भंडारी वर
मी तर शिव भोला भंडारी वर आइल मध्ये थोडं नाचून पण घेतलं मस्त फ्री फील आहे त्याचा. खिद्रा पूर मंदिर अगदी मस्त दिसते. ते तराफ्यावर उभे राहून नदीतून परत येतात तेव्हा उमा सुबोध ओके पण पंडितजी जरा पटले नाही. ओके दो.
This is a modern interpretation of an old classic. Even I missed the ya bhawanatil song.
खान साहेबांचा काही उल्लेख झाल्यावर पखवाजाच्या वाद्या घट्ट करणार्या सुबोध ने मस्त एक्स्प्रेशन दिले आहे.
मोठी उमा सुबोधला भेटायला जिना उतरून येते तेव्हा तिच्या भोवती ते काजवे अस्तात, लहान पणी न दिसलेले. हे मीट क्यूट फार गोड व प्युअर वाटले. सोनेरी मॅजिकल असे. लव्हली. पण माझा स्वभाव रोमँटिक आहे म्हणून असेल. मॅट्रिक्स तीन मधले नीओ व ट्रिनिटी भेटतात तेव्हा असेच प्युअर फीलिन्ग येते. ( ती त्याला सोडवून आणते तेव्हा)
राणी साहेबा सर्व कपडे पट अतिशय सुरेख भरजरी आहे. झरिनाचे धानी कलरचे ओढणी व ड्रेस मधले रुपडे खुलते. व उमाचे भारतीय परकर ओढणी हॅफ सॅरी पण. ही राणी सर्वात अॅप्रोप्रिएट दिसली आहे.
तुलना करा मृणालच्या रमा माधवमधल्या रुपाशी. ती स्वतःतून बाहेरच येत नाही. आव्हानात्मक दिसते.
ही राणी तृप्त. शांत दिसते.
मन मंदिरा गाणे मुलांसाठी
मन मंदिरा गाणे मुलांसाठी प्रार्थना म्हणून फार परफेक्ट वाटले. नशिबावर अवलंबून न राहता अभ्यास करून
स्वबळावर पुढे जा असे सांगणारे. आणि त्यात व्हिज्युअली गुरु शिष्य परंपरा किती नीट दाखवली आहे. असे निर्मळ स्वभावाचे गुरू भेटणे भाग्याचेच.
कव्वालीतही गुरुजींच्या साइडचा जीवन विषय़क द्रुष्टिकोण किती निर्मळ आणि ओपन, अॅक्से प्टिंग, सकारात्मक आहे ते प्रत्ययास येते.
मी तर शिव भोला भंडारी वर आइल
मी तर शिव भोला भंडारी वर आइल मध्ये थोडं नाचून पण घेतलं मस्त फ्री फील आहे त्याचा. >>> मला पण जाम आवडल ते गाणं . अगदी काहीतरी भरून आल्यासरख झालं !
मी तर शिव भोला भंडारी वर आइल
मी तर शिव भोला भंडारी वर आइल मध्ये थोडं नाचून पण घेतलं मस्त फ्री फील आहे त्याचा.
>>
मामीसाहिबा , तुम्ही आईलमध्ये तांडवनृत्य केले की काय ? ::फिदी:
मस्त जमलाय सिनेमा, पटकथेवर
मस्त जमलाय सिनेमा, पटकथेवर काम हव होतं हे मान्य , पण गाण्यानी कान तृप्त झाले. थीएटर मधे लोक दाद देत होते मैफिलीत द्यावी तशी . फार मस्त वाटल.
आपल्या जुन्या शाळेत कैक वर्षानी गेल्यावर लहान सहान बदल खुपतात ,पितळी घंटे ऐवजी कर्कश्य बझर खूपतो, तसच एखाद बुचाच्या फुलांच झाड रम्य भुतकाळात घेउन जातं. वसंतराव देशपांडेंच संगित नाटक, पाहिलेल्यांसाठी काहीसा असाच अनुभव असेल हा. पण आठ वर्षाच्या माझ्या भाच्याला देखिल ,ही गाणी वेगळीच आहेत , सिनेमा सारखी नाहीत . अस वाटायला लावणारा होता सिनेमा.
सचिन यांनी "महाग्रु" इमेज
सचिन यांनी "महाग्रु" इमेज तोडली आणि खराखुरा अभिनय केला हे वाचून छान वाटलं.
नाहीतर वाटत होतं............ सचिन सहन होईल का? >> + १
बघेन..
शिव भोला भंडारी.. हे गाणे
शिव भोला भंडारी.. हे गाणे आहे यात ?
शिरडी के साईबाबा, चित्रपटात होते ते. त्यावर सचिन आणि उषा चव्हाण नाचले होते !!
आजच पाहिला आणि खूप आवडला!
आजच पाहिला आणि खूप आवडला! महागुरूंना totally image redeem करणारी भूमिका मिळाली आहे आणि त्यांनी तिचं सोनं केलं आहे! Hats off to सुबोध भावे! पदार्पणात sixer मारला आहे त्याने! सगळ्यांची कामे सुंदर! मी कट्यार नाटकाच्या गाण्यांशिवाय काहीही ऐकलं पाहिलं नव्हतं. त्यामुळे मला सिनेमा खूप आवडला..पुन्हा पाहायचा विचार करत्येय!
मी परीक्षण मुद्दाम वाचले
मी परीक्षण मुद्दाम वाचले नव्हते! पण परीक्षणातील सर्व गोष्टींशी सहमत! विशेषतः शेवटच्या परिच्छेदाशी
हा सिनेमा चुकवू नका!
शिरडी के साईबाबा, चित्रपटात
शिरडी के साईबाबा, चित्रपटात होते ते. त्यावर सचिन आणि उषा चव्हाण नाचले होते !! >>> येस्स्स्स गाण ऐकल्यापासुन म्हणतेय आधी कुठेतरी ऐकलय लक्षातच येत नव्हत... शिरडी के साईबाबा मध्ये शिव शब्दाजागी साई शब्द आहे.
मला पण जाम आवडल ते गाणं . अगदी काहीतरी भरून आल्यासरख झालं ! >>>> स्वस्ति, अगदी अगदी... नकळत माझ्या चेहर्यावर समाधानाच स्मित आल होत या गाण्याच्या वेळी..
अमा तुमच्या दोन्ही पोस्टींना अनुमोदन. शिव भोला भंडारी गाण बघताना मलाही नाचावस वाटल होत.
मन मंदिरा गाण तर इतक बसलय डोक्यात की बाकीच्या गाण्यांना पण त्याचीच चाल लावली जातेय
छोट्या मुलाने गायलेल मन मंदिरा पण सुंदर आहे, स्पेशली काजवे दिसत नाहीत म्हटल्यावर उमाने चिडवल्यावर त्याने घेतलेली तान.. आहा!
शिरडी के साईबाबा मध्ये शिव
शिरडी के साईबाबा मध्ये शिव शब्दाजागी साई शब्द आहे.
>> पुढच्या ओळीत आहे की शिव शब्द...
साई भोला भंडारी, शिव भोला भंडारी ..
असेल मला इतक आठवत नाही, पण
असेल मला इतक आठवत नाही, पण गुगल्यावर सर्चल तेव्हा साई भोला भंडारी हे सापडल.. असो, आता मला सुखाने झोप लागेल. आणि मुळात इथल्या चर्चेचा विषय हा नाही..
काल पाहिला चित्रपट आणि अजून
काल पाहिला चित्रपट आणि अजून एकदा पाहणार. चित्रपटातील गाणी अजून कानात रूंजी घालत आहेत.
मस्त परिक्षण रसप.
अतिशय सुंदर अनुभव !! सचिन
अतिशय सुंदर अनुभव !! सचिन खांसाहेबांची भूमिका अक्षरशः जगलाय. हॅट्स ऑफ ! अतिशय आवडलं त्याचं काम.
युट्युबवर झलक बघताना सचिनचा गाण्याचा अभिनय ओव्हर वाटला होता पण मोठ्या पडद्यावर एकदाही तसं वाटलं नाही. सुबोधचा कुठे कुठे जरासा खटकला पण ठीक आहे.
काही काही ठिकाणी रेकॉर्डिंग सुरेल व्हायला हवे होते ह्याबद्दल मेधाव्हींशी सहमत पण तरी सुबोध भावेचे कौतुक केलेच पाहिजे.
काल आमच्या शेजारीच पाच-सहा जणांचे टोळके आले होते जे टर उडवण्याच्या उद्देशानेच आले होते. कमालीचा रसभंग झाला चित्रपट बघताना. ताना घेताना, काजव्यांच्या प्रसंगात आणि इतरही कमेंट्स पास करणे, भ्रष्ट नक्कल इत्यादी चालू होते. उठून एक कानाखाली भडकवावीशी वाटत होती पण मुलगा आणि मी दोघेच असल्याने आणि शो बघण्यात व्यत्यय येण्याच्या भितीने काहीच करु शकले नाही. मुकाट्याने सहन केले.
पुढच्यावेळी मॅनेजमेंटशी असा प्रकार झाल्यास काय करता येईल त्याबद्दल आधीच बोलून ठेवावे म्हणते.
छान परिक्षण. नाटकाएवढा
छान परिक्षण. नाटकाएवढा चित्रपट जमला नाही हे 'चित्रपटापेक्षा पुस्तकच जास्त चांगलं होतं/आहे' या धर्तीवर होणारच. तरीही या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केलच पाहिजे. चित्रपट पाहायचाय अजून.
पण या चित्रपटातील गाण्याची ऑडिओ सीडी कुठे विकत मिळेल? Amazon/Flipkart वर नाहीये. औंधच्या (पुणे) आसपास कुठे मिळेल?
रंगासेठ, अॅमॅझॉनवर आहे ऑडियो
रंगासेठ, अॅमॅझॉनवर आहे ऑडियो सीडी. आम्ही तिथूनच घेतली.
अॅडिशनल - ~ ~ कट्यार काळजात
अॅडिशनल -
~ ~ कट्यार काळजात घुसली - Another Take ~ ~
चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.
मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.
हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.
हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)
आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.
संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !
आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.
चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.
तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/another-take_1.html
शिरडी के साईबाबा मध्ये शिव
शिरडी के साईबाबा मध्ये शिव शब्दाजागी साई शब्द आहे.
>>> शिव भोला भंडारी, साई भोला भंडारी, साधू भोला भंडारी असे तीन भंडारी भाऊ आहेत त्या साईबाबांच्या सिनेमातल्या गाण्यात.
पूनम धन्यवाद. सीडी ऑर्डर केली
पूनम धन्यवाद. सीडी ऑर्डर केली आहे. संगीताची जास्त माहिती हवी होती जसे गाणी कुठल्या रागात आहेत. नोटेशन्स, मन मंदिरा मधील सरगम लिहीता येइल पण बाकी ? तसेच ज्या घराण्यात संघर्श होता ती मेन कुठली?
http://www.mandarkaranjkar.co
http://www.mandarkaranjkar.com/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A...
बाके बिहारी कुणी साकारलाय
बाके बिहारी कुणी साकारलाय ?
का रोलच काटलाय कि.न्वा कमी केलाय ?
मेधाव्ही यांनी दिलेल्या
मेधाव्ही यांनी दिलेल्या ब्लॉगातले विचार पटले. चित्रपट बघितल्यानंतर याच काही बाबी खटकल्या होत्या.
चित्रपटात 'घराण्याचा अभिमान' झाकोळला जाऊन केवळ वैयक्तिक द्वेषभावना दिसणं (नाटकापेक्षा चित्रपट स्वतंत्र हे मान्य करूनही शेवटी घराण्याचा अभिमान हा मुद्दा आल्यानं चित्रपटभर दिसणारा पराकोटीचा द्वेष आणि मत्सर गोंधळात टाकतात), खाँसाहेबांपुढे शेवटच्या मैफिलीतही सदाशिवाचं गाणं कमकुवत असणं आणि ते तसं गाणं ऐकून क्षणार्धात खाँसाहेबांचा अहंकार गळून पडणं, केवळ फिरकीच्या तानांद्वारे घराणं वेगळं आहे हे सूचित करणं, या तर अगदी खटकण्याजोग्या गोष्टी आहेतच.
पूर्वी घराण्यातलं गाणं बाहेर जाऊ नये, म्हणून गवयी एखादाच उत्तम शिष्य तयार करत. खाँसाहेबांनी शिष्य तयार केलेले दिसत नाहीत. घराण्यातलं गाणं बाहेर जाऊ नये, म्हणून शिष्य नाहीत, हे मान्य केलं तर नंतर खाँसाहेबांनी मोठ्या मशिदीत कव्वालीला संगत करणं पटत नाही.
चित्रपट चांगला आहे, पण या ढोबळ चुका टाळता आल्या असत्या.
Pages