अपरिपूर्ण तरी अद्वितीय ! (Movie Review - Katyar Kaljat Ghusli)

Submitted by रसप on 14 November, 2015 - 23:35

असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.

Katyar-Kaljat-Ghusali-Marathi-Movie.jpg

'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !

ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने बालगंधर्व, लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !

Subodh-Bhave-Katyar-Kaljat-Ghusali.jpg

विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
Shankar-Mahadevan-Katyar-Kaljat-Ghusali.jpg
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.
Sachin-Pilgaokar-as-Khansaheb-in-Katyar-Kaljat-Ghusali.jpg
सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.
sachin-pilgaonkar-shankar-mahadevan-katyar-kaljat-ghusali-movie-pic.jpg
'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.

असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-katyar-kaljat-ghusli...

(हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.)

--------------------------------------------------------

~ ~ कट्यार काळजात घुसली - Another Take ~ ~

चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.

मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.

हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.

हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)

आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.

संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !

आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.

चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.

तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/another-take_1.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख! पदार्पणातच सुबोध्ने फार उन्च उडि मारलिय, ट्रेलर बघुनच कळ्तय, परिक्षण आवडल.
नाटकातुन एखादी कलाक्रुती चित्रपट माच्यमात येताना काही बदल होणारच..

चित्रपटावर भरपुर चर्चा इथे आधीच होवुन गेलिय, थेटरमधे बघाय्ची इच्छा होती, तशी सोयही होती पण योग नव्हता, असो युट्यौबवर बघितला, गाणि य वेळेला आधिच एकुन झाली होती, अप्रतिम... काही सुटलेले बारकावे माफ, सचिन ने उभा केलेला खासाहेब निव्वळ खास, ट्रेलर मधे थोडा लाउड वाटलेला सचिन चित्रपटाच्या एकसन्ध परिणामात फ्परफेक्ट ,बाकी सगळ्याची कामही उत्तम आहेत (पुष्कर चा कविराज नाही आवडला पण त्याला तितकी भुमिका नसल्यानेनजरेआद्ड करता येत)
(अन्गात अभिनय अस्ले तर चाकोरी मोडुनही तुम्ही काही करु शकता हे दुसर उदाहरण, नव्या अग्निपथ म्धला रिशी कपुरचा लाला हे पहिल उदाहरण)

>> कथानकाची तोंड ओळख द्यायची राहून गेली की दिली नाही ? <<

जाणीवपूर्वक टाळली.

कारण -
१. इतर बरंच लिहायचं होतं. त्यासोबत कथानकाची ओळखही द्यायची, तर लांबी खूप वाढली असती आणि असंही ते सर्वांना माहित असावंच.
२. चित्रपट कथानकासाठी नव्हे, तर संगीतासाठी पाहावा; असा माझा वैयक्तिक आग्रह आहे. त्यामुळे मला ते समहाऊ दुय्यम वाटलं.

मस्तय.
आता १ वाजताची टिकिट्स काढली आहेत .
शनिवार-रविवारचे बरेचसे शोज , " bookmyshow" वर "sold out" दाखवित होता.
चांगले लक्शण आहे .

आज दुपारी बघणारच आहोत.
सचिन यांनी "महाग्रु" इमेज तोडली आणि खराखुरा अभिनय केला हे वाचून छान वाटलं.
नाहीतर वाटत होतं............ सचिन सहन होईल का?
छान परिक्षण.

त्रैलर मध्ये आणि कव्वालीच्या व्हिडेओत सचिन ने चांगले लूक्स दिलेत. पलिकडे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे रिअ‍ॅलिटी शोप्रमाणे चित्रपटात स्वतःचे काही बोलायला परवानगी नसते ना त्यामुळे कदाचित झाले असेल::फिदी:

असो, चांगलीच गोष्ट आहे.

छान रिव्हू आलेत याचे सगळीकडे. मला वाटते गाणी विस्तारांनी यायला हवी होती. सुरत पिया पण खुलवलेले नाही. कदाचित सुबोधला असे वाटले असेल कि गाणी आताचे प्रेक्षक सहन करतील का ? तसे असेल तर त्याने गाणे सुरु ठेवून प्रसंग पुढे न्यायला हवे होते.

नाटकात आधी फैयाझ आणि बकुल पंडीत असत मग बकुल ज्या जागी जान्हवी पणशीकर आली. पुढे फैयाझने पुढाकार घेऊन हे नाटक परत आणले आणि माझ्या आठवणीप्रमाणे बकुल पंडीतही परत आली. तरी दोघींना फारशी गाणी नव्हती. रागमालिकेत दोघी गात असत. लागी करेजवा कटार , बहुतेक फैयाझ एकटीच गात असे.
आशा खाडीलकरने सुरत पिया.. त्यातल्या तराण्यासकट नाट्यपराग मधे सादर केले होते. तिच्या आवाजात एखादे गाणे हवे होते. वसंतरावांची गायकी ती उत्तमप्रकारे सादर करते.

लागी करेजवा, मी फैयाझ आणि आरती अंकलीकरने एकत्र गायलेले पण ऐकलेय असे आठवतेय.

तेजोनिधी, शाळेतल्या मुलांच्या आवाजात आहे का ? तिथून खाँसाहेब प्रेरणा घेतात, असा प्रसंग आहे नाटकात.

>> तेजोनिधी, शाळेतल्या मुलांच्या आवाजात आहे का ? तिथून खाँसाहेब प्रेरणा घेतात, असा प्रसंग आहे नाटकात.<<

नाही. शंकर महादेवननी गायलंय.

चांगले परिक्षण.
मूळ वसंतरावांचे नाटक पाहिलेले असल्यामुळे सुरुवातीपासूनच थोडी कटूता होती मनात ह्या चित्रपटाबाबत.

ती कटूता बाजूला ठेवून, व मन मोठे करून चित्रपट पहाताना काही चांगल्या गोष्टी जाणवल्याच.
१. महागुरुने लोकांना खिश्यात टाकलंय.
त्याने आजवर स्वहस्ते स्वतःचे जे नुकसान करून घेतलंय त्यानंतर त्या प्रतिमेचे पुनर्वसन होणे, अति-अवघड काम होतं.
२. औरंगजेब लोकदेखील खूष आहेत सिनेमावर. (ही सर्वात उत्तम गोष्ट)
३. ज्या लोकांनी कट्यार नाटक पाहिले नाही किंवा पहाण्याची शक्यताही नाही त्यांच्या कानावर मूळ कट्यारमधील काही अत्युत्तम गाण्यांचे किमान एक एक कडवे तरी पडेल. (ही देखील फार चांगली गोष्ट आहे.)
४. शास्त्रीय संगीताकडे लोकांचा ओढा परत थोडा वाढू शकतो.
५. सुबोधने मोठी मजल मारली आहे.पुण्यातील मध्यमवर्गीय घरात लहानाचा मोठा झालेल्या सुबोधचा प्रवास पहाता त्याचे खूप कौतुक व अभिमान वाटतो.

पहिल्यापासून खटकलेल्या व अजूनही ख्टक्त आहेत अश्या गोष्टी -
"लगान"प्रमाणे स्क्रॅच पासून नवीन गोष्ट का निर्माण करत नाहीत? कट्यार नाटकापासून चित्रपट निर्माण करणे म्हणजे रसरशीत हापूसचा आंबा पिळून त्यात पाणी घालून त्याची फ्रुटी/माजा बनवणे. आता उन्हातान्हातून आलेल्याला माजा आवडलं तर ठीकच आहे म्हणा..

मूळ नाटकातील गाणी सिनेमात उरकली आहेत. "या भवानातील" गाणेच नाही. फार मिनिंगफुल गाणे आहे ते नाटकात.

नाटकामधे दोन घराण्यांमधील तेढ फार उत्तमपणे दाखवली आहे. एकीकडे दुसर्‍या गायकाच्या कलेविषयी आदर व प्रेम व त्याचवेळी त्याचे घराणे वेगळे त्यामुळे त्यानुसार होत असलेली स्वाभाविक चुरशीची भावना अशी अत्यंत सटल भावनिक आंदोलने आहेत. त्यात खुनशीपणा नाही. त्यामुळे मूळ संहितेतला बदल रुचला नाही.

राहूलचे नाटकातले गाणे अनेकदा अनेक ठिकाणी सुराला घसरलेले जाणवले. ते बरे नाही वाटले. सिनेमात तरी त्यात दुरुस्ती करायला हवी होती.

काळजातून आलेले परीक्षण रसप.

चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. >> >>>>>
>>>>
यांच्यासाठीच बघायचा होता खरे तर. अन्यथा शास्त्रीय संगीत पाहता हा आपल्या जातकुळीचा नाही असेच आधी वाटलेले.
मात्र माझ्यासारखीच अभिरुची राखून असलेले मित्रही जेव्हा या चित्रपटाचे कौतुक करत आहेत तर बघणे भाग आहे. आपल्याही परीक्षणाची वाट बघत होतो, त्याबद्दल धन्यवाद.

चला हवा येवु द्या मधे सुबोध फार छान बोललाय..

"लगान"प्रमाणे स्क्रॅच पासून नवीन गोष्ट का निर्माण करत नाहीत? कट्यार नाटकापासून चित्रपट निर्माण करणे म्हणजे रसरशीत हापूसचा आंबा पिळून त्यात पाणी घालून त्याची फ्रुटी/माजा बनवणे. आता उन्हातान्हातून आलेल्याला माजा आवडलं तर ठीकच आहे म्हणा..>>

सॉरी ! ही तुलना अगदिच पटली नाही, कबुल आहे की जे ओरिजनल होत ते फार वेगळ आणी उच्च असेल पण,त्त्याच जुन्या काळातल्या आठवणि जुन्या पिढिबरोबर अस्तगत होवुन जाव्यात ह्यापेक्षा त्या जुन्या काळातल्या उच्च सन्गिताची ओळख नव्या पिढीला करुन देण्याचा हा प्र्यत्न फार स्त्युत्य वाटला.

तुझ्या रिव्ह्यू चीच वाट पाहात होते.. डाऊनलोड करण्यापूर्वी इट्स मस्ट Happy
केव्हढं ताकदीने रिव्ह्यू लिहिलायेस, वाचतानाच ,पाहण्याची उत्सुकता वाढवणारा..

Don't you think it's better to watch the movie in the theatre? Why encourage piracy?

चिन्मय, मलाही पहायचा आहे थेटरात जाऊन. अटलांटात कुठल्या थिएटरमध्ये लागला आहे हे तुला सापडलं तर सांगशील का? Happy
फक्त हाच नाही राजवाडे अँड सन्स, हायवे आणि मुंबई-पुणे-मुंबई २ सुद्धा पहायचे आहेत. त्याचे शो टायमिंग्ज किंवा कुठे पैसे देऊन ऑनलाईन पहाता येत असतील तरी चालतील... Happy

दरवेळचे तेच ते मुद्दे येत रहातात.. पायरेटेड मुव्हीज पहायची हौस नाही.. पण बघायला मिळतच नाहीत कुठे! मायबोलीच्या खरेदी विभागात सिड्या ठेवता आल्या तरी चालेल.

बघितला . मूळ नाटकाविशयी फक्त ऐकल होत .पण कथा माहित नव्हती .
कोरी पाटी घेउन गेलेले , त्यामुळे नक्कीच आवडला .
मध्यंतरानंतरच नाट्य अपेक्शेपेक्शा कमी रंगलं .गुंडाळल्यासारखं वाटलं .
सुबोध भावे फिक्का वाटला . अम्रुता खान्विलकर अतिशय गोड .
शंकर महदेवन , सुरांईतकाच निरागस Happy

सचिन बॅशर , सिनिअर सिटीझननी ही " महागुरुंना १०० पैकी १०० " असे मत प्रदर्शीत केले Happy

सुर तालातलं तांत्रिक ज्ञान नाही मला , पण जे ऐकलं त्यानी कान तॄप्त झाले.
"दिल की तपिश" दमदार !
बरेच दिवसानी काहीतरी छान बघितल्याचा आनंद मिळाला.

अप्रतीम कलाकृती.... कट्यारच्या अख्ख्या टीमला "मानाचा मुजरा"

२. औरंगजेब लोकदेखील खूष आहेत सिनेमावर. (ही सर्वात उत्तम गोष्ट) >>>> करेक्टे मेधाव्ही. कधी नव्हे तो माझा नवरा भावुक झाला पिक्चर बघताना.

सचिन पिळगावकरने त्याच्या कारकिर्दित साकारलेली पहिलीच ग्रे शेड भुमिका असावी बहुदा

छाण परीक्षण! नक्कीच पाहणार आहे. मी नाटक पाहिलेले नसल्याने तुलना न करता पाहता येइल हे एका दृष्टीने बरे आहे.

सचिन चा गेल्या काहीवर्षातील मराठी टीव्हीवरचा 'पकाऊ' अवतार मी फारसा पाहिलेला नाही. मात्र त्या 'महागुरू' इमेज चा प्रचंड प्रभाव तो "ही भूमिका वाया घालवणार" असे लोकांचे मत आधीच बनण्यावर झालेला पाहून आश्चर्य वाटले होते. सचिन च्या चित्रपटांमधल्या भूमिका जरी कधी फार जबरी वगैरे नव्हत्या, पण तरीही त्याने केलेल्या रोल्स मधे तो नेहमीच चांगला वाटला होता. शोले, सत्ते पे सत्ता, मराठीतील अष्टविनायक वगैरे तर जुने झाले. नंतर आलेल्या त्याच्या स्वतःच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटात जरी त्याला भावखाऊ रोल असला तरी तो बोअर होत नसे. त्यामुळे त्याने या पिक्चर मधे लोकांना सरप्राइज द्यावे असेच वाटत होते - आणि ते त्याने केलेले दिसते.

छान लिहिलय परिक्षण. खूपच ऐकतोय कट्यारबद्दल..

भार्गवराम आचरेकर (पंडीतजी), उमा (जान्हवी पणशीकर), सदाशिव (प्रकाश घांग्रेकर), झरीना (फय्याज), कविराज (प्रसाद सावकार) आणि खांसाहेब (पं. वसंतराव देशपांडे) या दिग्गज कलावंतांनी साकारलेले कट्यार पहाण्याचं, नव्हे अनुभवण्याचं भाग्य मिळालेल्यांमध्ये मी एक. लहानपणी पाहीलय तरी प्रसाद सावकारांचा कविराज अजूनही विसरला जात नाही, वसंतरावांचा स्टेजवरचा वावर अजूनही विसरला जात नाही; जाऊच शकत नाही. त्यांनी स्टेजवर म्हटलेलं एकेक गाणं जसं लक्षात आहे तसच त्यांचा आवाज आणि म्हटलेले संवाद, त्यांच्या बोलक्या चेहर्‍यासकट अजूनही मनांत घर करून आहेत.

आता हा सिनेमा पहायचा.. पण मनांत तुलना न करता पहायचा असं आता तरी ठरवलय. बघुया कसं जमतय ते.

चित्रपट नेत्रसुखद आहे. भव्य आहे, देखणा आहे. वेशभूषा अत्युत्तम.
संगीत तर अफाट आहेच. सुरेख. एकेक शब्द, त्याची चाल, गायक- सगळेच जबरदस्त!

मात्र पटकथेमध्ये बदल केले आहेत ज्यामुळे मूळ गाभा अगदीच क्षीण झाला आहे. पटकथेवर आणखी काम करायला हवं होतं. नाटकात असलेले अर्थपूर्ण संवाद चित्रपटात आलेच नाहीयेत! अहंकार हा भाग चित्रपटात आलाय, पण सदाशिवला तळमळ आहे ती गुरूच्या आशीर्वादाची आणि गुरूच्या अनुग्रहाची. ही तळमळ चित्रपटात नाहीच. उलट तो सूडाची वगैरे भाषा करतो. खांसाहेबांना सुराची कदर आहे. सदाशिवच्या गळ्याचं सामर्थ्य त्यांना समजतं, ते अ‍ॅप्रिशियेटही करतात. पण ते त्याला त्यांचा शिष्य करवून घेऊ शकत नाहीत. हे त्यांचं द्वंद्वही चित्रपटात येत नाही. मोठ्या कॅनव्हासवर कथा नेताना अनेक गोष्टी फार प्रभावीपणे दाखवता येतात. इथे बाकी सगळं मोठं केलं आहे, पण मूळ गाभा मात्र पांचट केलाय याची खंत वाटली. .

सचिनचा अभिनय सहन करणेबल आहे. मात्र गातानाचा, ताना घेतानाचा अभिनय वाईट आहे. तसंच सुबोधचंही झालं आहे. कसदार, दमदार ताना घेताना नक्की हातवारे, तोंड कसं करतात हे समजलेलं नाही. शंकरही सिनेमात गातो. त्याला तरी किमान गाताना बघायला हवं होतं या दोघांनी Happy बाकी सर्वांचे अभिनय ओके. सगळे चांगले अभिनेते आहेत, इतकं तर काम त्यांना येणारच, यायलाच हवं Happy

खरंतर संगीत हाच चित्रपटाचा हीरो आहे. या सिनेमात तर संगीत सुपरहीरो आहे.

Pages