|| तो हा विठ्ठल बरवा ||

Submitted by वरदा on 6 November, 2015 - 00:00

संशोधनाच्या पूर्वनियोजित मार्गावरून चालताना कितीदातरी नकळताच पायाखाली नव्या, अनपेक्षित वाटा येत राहतात. आपण कितीही नाही म्हणले तरी पायाखाली आपसूक सरकलेल्या त्या वाटांवरून थोडे तरी चालत जातो. त्या वाटा नवी कोडी घालत- उलगडत राहतात आणि आखीव प्रवासात लागणारी ही छुपी वळणे शोधयात्रा फार समृद्ध करून सोडतात हा अनुभव बहुतेक सगळ्याच संशोधकांना येतो. माझी ही कथाही काही वेगळी नाही.
माझे मूळ काम पुरातत्त्वशास्त्राशी, त्यातील घटपटादि चर्चेशी घट्ट बांधलेले. स्थळकाळाच्या पक्क्या आखीव चौकटीत बसवलेले. दक्षिण महाराष्ट्रातील काही उपप्रदेशांमधील सर्वात प्राचीन वसाहतीच्या अवशेषांचा शोध घ्यायचा हा मुख्य उद्देश. त्यात विठ्ठलाचा आणि पंढरपूरचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. मी दोन-चारहजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमधे रमणारी तर त्यामानाने विठ्ठलाचा ज्ञात इतिहास जेमतेम हजारेक वर्षांचा. पंढरपूर हे माझ्या दृष्टीने फक्त भटकंतीमधे मुक्कामाला सोयीचे मध्यवर्ती ठिकाण एवढेच! म्हणजे विठ्ठल, पंढरपूर, त्याचे संतांशी असलेले नाते, मराठी सांस्कृतिक संचितातील त्याचं महत्व इत्यादिमुळे सगळ्यांना विठ्ठलाबद्दल जो आपलेपणा वाटतो, आंतरिक नाते असल्यासारखे वाटते ते मलाही वाटते. पण माझ्या कामाशी त्याचा संबंध नव्हता. पंढरपूर आणि विठ्ठलाबद्दलच्या संशोधनाची साद्यंत माहिती असली तरी ते सगळं तसं अवांतरच होते.
पण तिथल्या भटकंतीत हातात आलेले अर्धेमुर्धे पुरावे, आधीचे संशोधन, नव्या पुराव्यांच्या आकलनाच्या अनुषंगाने त्याचे जाणवणारे नवे संभाव्य अर्थ, अवांतर वाचनातून अचानकच उभे ठाकलेले संदर्भ, अशी एक साखळी आपोआपच तयार होऊ लागली.. आणि मग एकाक्षणी कितव्यांदा तरी फावल्या वेळात जिगसॉ पझलचे तुकडे बसवून बघतो तश्या अर्ध्यामुर्ध्या कड्या जुळवून बघायच्या खेळात एकदम सगळं जुळून आल्यासारखं झालं. सगळ्याच कड्या पूर्ण नाहीत, जिगसॉ पझलचे बरेचसे तुकडे गायब आहेत पण तरीही मला माझ्यापुरता तो विठ्ठल आणि पंढरपूर क्षेत्र परिसर जास्त उलगडल्यासारखा वाटतोय.
या सगळ्या वाटचालीचा हा थोडक्यात धांडोळा!

पंढरपूर आणि विठ्ठल हा पारंपरिक मराठी समाजमानसाचा सगळ्यात महत्वाचा मानबिंदू. इ.स.च्या ११-१२व्या शतकापासून मिळणार्‍या शिलालेखांतून आणि मंदिरशैली, शिल्पशैलीच्या पुराव्यांमधून या दैवताचा आणि स्थानमाहात्म्याचा चढता आलेख अगदी स्पष्टपणे रेखांकित झाला आहे. भक्तिसंप्रदायाच्या हृदयस्थानी असलेल्या या दैवताचा आणि पंढरपूरचा या पुराव्यांआधीचा इतिहास मात्र बरीच दशके तितकासा स्पष्ट नव्हता. खरंतर हा विषय अतिरथी महारथी संशोधकांनाही सतत खुणावणारा, आव्हान देणारा. कितीतरीजणांनी याच्या विविध पैलूंवर काम केले आहे. त्या मांदियाळीत नावे तरी किती - इतिहासाचार्य राजवाडे, शोभना गोखले, शं. गो. तुळपुळे यांनी इथल्या शिलालेखांवर, तर ग.ह. खरे, इयान रेसाईड, जी. ए. दलरी, गो.बं. देगलूरकर यांनी मूर्तीशास्त्र तसेच या क्षेत्राच्या आणि दैवताच्या ऐतिहासिकतेवर साक्षेपी संशोधन केले. संतसाहित्य,इतर मध्ययुगीन साहित्य यावर विठ्ठल आणि पंढरपूर या अनुषंगाने झालेले भरपूर लिखाण, संशोधन वेगळेच
पण या संशोधनामध्ये सगळ्यात मूलग्राही ठरले ते रा.चिं. ढेरे यांचे संशोधन - श्रीविठ्ठलः एक महासमन्वय. विविध काळातील व भाषांतील साहित्य, लोककथा, लोकदैवते, मौखिक इतिहासपरंपरा, मिथककथा, दक्षिणेतील विविध प्रांतांमधील विठ्ठलक्षेत्रे अशा विस्तृत पटावरच्या साधनांची सखोल चिकित्सा करून त्यातून या दैवताचा उगम व उन्नयन प्रक्रिया उलगडण्याचे अतिशय कठीण काम या प्रज्ञावंत संशोधकाने केले आहे. त्यातील काही गृहितके त्याकाळी जरूर वादग्रस्त ठरली. पण त्यामुळे या संशोधनाचे मूल्य कुठेच उणावत नाही. शास्त्रीय संशोधनपद्धतीच्या काटेकोर निकषांवर तावून सुलाखून निघालेले हे विश्लेषण पंढरपूर किंवा विठ्ठलावर पुढील काम करणार्‍या कुठल्याही समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञासाठी पायाभूत मानले जाते.

माझ्या लेखनाशी निगडीत असलेले ढेरे यांचे निष्कर्ष मी पुनरावृत्तीचा धोका पत्करून परत एकदा इथे मांडते आहे, कारण त्याच्या आधारावरच माझे काम उभे राहिले आहे
- विठ्ठल हा मूळ गोपजनांचा देव. त्याच्या सांस्कृतिक उन्नयनाच्या प्रक्रियेत शैव आणि वैष्णव पंथांची चढाओढ जरी काही काळ दिसून आली तरी इ.स. च्या ११-१२व्या शतकाच्या आधी त्याच्या पंढरपूर येथीलवैष्णवीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. ही उन्नयन प्रक्रिया विविध ठिकाणी विविध प्रकारे झाली

- भक्त पुंडरिकाने मातापित्यांची सेवा केल्यामुळे प्रसन्न होऊन विठ्ठल पंढरपुरात आला (म्हणजेच तो मूळ तिथला नव्हे). हा भक्त पुंडरीक म्हणजे पंडरगे (पंढरपूरचे प्राचीन नाव) गावची अधिष्ठात्री देवता पुंडरिकेश्वर. या शिवमंदिराचा विठ्ठलाच्या देवताव्यूहात समावेश होताना त्याचे दृश्य स्वरूप बदलले, त्याला नव्या मिथककथेची जोड मिळाली.
- तसेच विठ्ठल प्रथम गोपाळपूरला गोधन घेऊन आला आणि तिथून पंढरपूरला आला अशीही एक कथा विठ्ठल अवतरणाविषयी येते. दोन्हीही कथांमधे तो 'बाहेरून' आलेला आहे.

- विठ्ठलाच्या उन्नयनपूर्णत्वाआधी पंढरपूरमध्ये विविध देवतांची उपासनास्थळे होती ती विठ्ठलाच्या पावित्र्यव्यूहात समाविष्ट झाली व त्यांच्या भोवती नवी मिथके उभी राहिली.

मात्र दैवताची उन्नयन प्रक्रिया आणि मूळ रूप जरी या अभ्यासातून स्पष्ट होत असले तरी यामध्ये पंढरपूर/पंडरगे आणि विठ्ठल हे देवनाम, यांचे उगम हीच खरी कूटस्थाने, आदिम गूढस्थाने आहेत असे मात्र ढेरेंनी आवर्जून लिहून ठेवले आहे.
माझी नकळती शोधयात्रा सुरू झाली ती या वळणावरून!

पंढरपूरचा विठ्ठल हा जरी मुख्य अभ्यासविषय नसला तरी या परिसराचा वसाहत-इतिहास तपासून बघताना, तिथली प्राचीन खापरे (खापर म्हणजे भाजक्या मातीच्या भांड्यांचा तुकडा. पूर्वीच्या काळी साह्जिकच धातूच्या भांड्यांपेक्षा मातीच्या भांड्यांचा वापर जास्त प्रमाणात होता. ही भांडी करायला सोपी, धातूपेक्षा कमी मूल्यवान आणि भंगुर असल्याने कुठल्याही पुराणावशेषांमधे खापरांचं संख्यात्मक प्रमाण सर्वात जास्त असतं.), इतर पुरावशेष व पांढरीची टेकाडे (पांढरीचं टेकाड म्हणजे जुन्या वस्तींचे अवशेष एकावर एक साचून तयार झालेली उंचवट्याची जागा. अशा जागेत खापरं, हाडं, विटा, दगडाची/ गारगोटीची हत्यारं, मणी असं बरंच काय काय मिळतं.) तपासताना पंढरपूर वगळून चालणारच नव्हते. प्राचीन काळापासून या भूभागात मानवी वसाहत झाली होती याचा पुरावा आसपासच्या गावांमधून सातवाहन-आद्य ऐतिहासिक कालीन - व क्वचित ताम्रपाषाणयुगीन - पुरावशेषांमधून माझ्या संशोधनाने स्पष्ट झाले आहे. मात्र पंढरपूरसारख्या दाट वस्तीच्या शहरातून असा पुरावा शोधणे, मिळवणे शक्य नाही हेही उघडच आहे. या दाट वसाहतीमुळेच १९६८ मध्ये येथे म. श्री. माटे व म. के. ढवळीकर यांनी केलेल्या मर्यादित उत्खननामध्येही इ.स. १३व्या शतकाच्या आधीचे अवशेष मिळाले नव्हते.
म्हणजेच पंढरपूरचा वसाहत इतिहास तपासायचा असेल, नव्याने दुवे शोधायचे असतील तर मला अन्य प्रकारच्या पुराव्यांकडे वळायला हवे होते हे स्पष्ट होते.
पंढरपूरच्या प्राचीनत्वाकडे बघताना मला काही प्रश्न पडले होते - एक म्हणजे या ठिकाणी किती प्राचीन काळापासून वस्ती असेल हे कसे कळेल आणि दुसरा म्हणजे ढेरेंना पडलेला या गावाच्या नावाच्या उगमाबद्दलचा प्रश्न सुटण्यासाठी काही दुवे मिळतील का? त्याच अनुषंगाने आणखी पुढचा प्रश्न म्हणजे विठ्ठल इथे येण्यापूर्वी इथे लोकधर्मातील तसेच मुख्यधारेतील देवतांची विविध उपासनास्थळे होती हे मान्य पण त्यांच्या स्वरूपाबद्दल आणखी काही माहिती मिळू शकते का? इथला विठ्ठलपूर्व पावित्र्यव्यूह कसा होता?
सहसा एखादं स्थळ एखाद्या दैवताचं पवित्र स्थळ म्हणून उदयाला येते तेव्हा ते अचानकच होत नसून एका दीर्घकालीन सांस्कृतिक प्रक्रियेतून येते, तसेच त्या दैवताच्या आधीपासूनच बर्‍याचदा त्या ठिकाणी अन्य पावित्रव्यूह अस्तित्वात असतात असे आपल्याला उपलब्ध ऐतिहासिक साधने सांगतात. तेव्हा पंढरपूर परिसराचे विठ्ठलपूर्व स्वरूप कळऊन घेण्यासाठी काही दुवे मिळतात का हाही एक दुय्यम प्रश्न डोक्यात होताच.
जरी इथून थेट पुरावा मिळत नसला तरी पंढरपूरचे एकूण भौगिलिक स्थान बघता इथेही इतर गावांप्रमाणेच किमान सातवाहन-आद्य ऐतिहासिक काळापासून म्हणजे किमान दोनहजार वर्षांपासून मानवी वसाहत झाली असण्याची दाट शक्यता आहे एवढी खूणगाठ मनाशी पक्की बांधता येते.

मात्र नावाच्या उगमाविषयीचं कोडं मला कधीच फारसं अवघड वाटलं नव्हतं. कदाचित माझ्या पेशामुळे असेल पण अगदी सुरुवातीपासूनच पांढरी - पंडरगे/पंढरपूर हे संभाव्य भाषिक नाते माझ्या लक्षात आले होते. शं. गो. तुळपुळे आणि अ‍ॅन फेल्डहाऊस यांच्या डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी मध्येही मी पांढरी हा शब्द तपासून घेतला होता. पांढरी म्हणजे गावठाणाची, वसाहतीची जागा हा मुख्य अर्थ असला तरी पांढरी म्हणजे प्राचीन, पूर्वीच्या वसाहतीची जागा हा लोकार्थ इथे जास्त लागू पडतो असे माझे मत आहे. गावांची नावे अनेकदा तिथल्या भौगोलिक किंवा परिसर वैशिष्ट्यावरून ठरतात, एवढंच नव्हे तर मिलणार्‍या पुरावशेषांशीही संबंधित असतात हे मला आणि इतर पुरातत्वशास्त्रज्ञांना सर्वेक्षणात बरेचदा दृष्टोत्पत्तीस आलेले आहे. तेव्हा पंढरपूर, पंढरी हे स्थलनाम या तर्कपरंपरेने अगदी व्यवस्थितच उलगडता येते असे मला वाटते.
नावामागची व्युत्पत्ती उलगडली असे वाटते आहे. आता पुढचा प्रश्न -पांढरीची टेकाडे इथे आसपास किती तरी गावांमध्ये दिसतात. तीही बहुतांशी सातवाहनकालीन. मग या इथल्याच पांढरीत असे काय वैशिष्ट्य होते की तिला खास पांढरीच्याच नावाने ओळखले गेले? किंवा नुसती पांढर म्हणले तरी हेच स्थान अंकित होईल असे इथे काय होते? का इथली पांढर आसपासच्या पांढरींपेक्षाही प्राचीन होती - म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन होती - किंवा विस्ताराने खूप मोठी होती? किंवा आणखी काही वैशिष्ट्य इथे होते? दुर्दैवाने ठोस पुराव्यांच्या अभावाने हे प्रश्न प्रश्नच राहणार आहेत. मी फक्त कल्पनारंजन करूनच उत्तर देऊ शकते. माझ्या कल्पनाभरार्‍यांना वाव द्यायचा झालाच तर एकूण भौगिलिक घटकांकडे बघून, तसेच अगदी अश्मयुगापासून आदिमानवाने पसंत केलेला पंढरपूरचा भीमाकाठ विचारात घेऊन माझ्या मते इथे मोठी ताम्रपाषाणयुगीन पांढरीचे टेकाड असेल आणि कदाचित त्यामुळेच त्यानंतर हजार-दोन हजार वर्षांनी उदयाला आलेल्या आसपासच्या गावांमधे ही वसाहत नुसत्याच पांढरीच्या नावाने ओळखली गेली असेल. अर्थातच सत्य काय ते आपल्यासाठी कायमच अज्ञात राहणार आहे.

हे झाले पुरातत्वीय अवशेषांवर आधारित तर्क. पण आणखी माहिती मिळवायची असेल तर याच्या पल्याड जाऊन लिखित पुराव्यांकडे, साधनांकडे वळणे आवश्यक होते. आणि यातील कालमापनदृष्ट्या सर्वात पक्के, नंतर फेरफार न झालेले पुरावे म्हणजे पुराभिलेख.
विठ्ठलाशी संबंधित सर्व शिलालेख हे इ.स च्या ११-१२व्या शतकापासून पुढचे आहेत. ते शिलालेख आणि त्यांना समकालीन असलेले सर्व प्रकारचे साहित्य याचा चिकित्सक अभ्यास आजवर भरपूर झाला आहे. पण याआधीचेही काही लिखित पुरावे आहेत का? असा विचार करता दोन ताम्रपट माझ्या नजरेत भरले. त्यांचा थेट विठ्ठलाशी संबंध नसल्याने एका मर्यादेपलिकडे विठ्ठल-संशोधकांनी त्यांची फारशी दखल घेतलेली नाही.

पहिला ताम्रपट म्हणजे इ.स. ६व्या शतकातला पंडरंगपल्ली ताम्रपट. कोल्हापूरजवळील एका छोट्याशा खेड्यातून मिळालेला संस्कृत भाषेतील हा ताम्रपट राष्ट्रकूट राजा अविधेय याने कुण्या एका जयद्विठ्ठ नामक ब्राह्मणाला दिलेले दान नोंदवतो. तत्कालीन प्रथेप्रमाणे हे दान प्रामुख्याने काही गावांचे आहे व त्या गावांची नावे व आसपासचे महत्वाचे भौगोलिक घटक नमूद केली गेली आहेत. श्री. एस. कृष्ण आणि वि.वि. मिराशी अशा दोन विद्वानांनी या ताम्रपटाचे वाचन व पुनर्वाचन केले. परंतू ताम्रपट बर्‍याच ठिकाणी घासून गुळगुळीत झाला असल्याने पंडरंगपल्ली हे नाव सोडता इतर ग्रामनामांच्या वाचनात दोघांमधे अजिबातच एकवाक्यता नाही. ताम्रपटाचा ठसा बघता मिराशींचे वाचन जास्त विश्वसनीय आहे. पण त्यापैकी इतर कुठलेच नाव पंढरपूरच्या आसपासच्या परिसरात दिसून येत नाही. पुराभिलेख अभ्यासकांना माहित असते की अगदी हजार-दीड हजार वर्षांनंतरही जुन्या ग्रामनामांचा प्रभाव थोड्याफार बदलाने का होईना आजच्या ग्रामनामांवर असतो. बहुतेक भौगोलिक तपशील हे आजही ओळखता येण्यासारखे असतात. मात्र या ताम्रपटातून अशी कुठलीही पक्की माहिती हाती लागत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे यात भीमा नदीचा कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे पंडरंगपल्ली हेच पंढरपूर असे निर्विवाद प्रतिपादन करता येत नाही हे संशोधकांच्याही लक्षात आले. मात्र पंडरंगपल्ली/ पांढरीवरून आलेले ग्रामनाम पंढरपूरपुरतेच मर्यादित होते असे नाहीतर इतरत्रही अस्तित्वात असू शकते ही बाब या ताम्रपटामुळे माझ्यापुरती अधोरेखित झाली.

या ताम्रपटापेक्षाही लक्ष वेधून घेतले ते इ.स च्या ७व्या शतकातील चालुक्य राजा विष्णुवर्धन याच्या सातारा ताम्रपटाने. भीमा नदीचा सगळ्यात जुना लिखित उल्लेख शोधत शोधत मी संशोधनाच्या पूर्वाभ्यासातच या ताम्रपटापर्यंत पोचले होते. सुमारे पावणेदोनशे वर्षे ज्ञात असलेल्या आणि सव्वाशे वर्षांपूर्वी जे. एफ. फ्लीट या विद्वानाने वाचन केलेल्या या संस्कृत ताम्रपटात काही ब्राह्मणांना राजाने वैदिक यज्ञपरंपरेचे जतन करण्यासाठी दिलेल्या एका आलन्दतीर्थ नामक गावाच्या दानाची नोंद आहे. या आलन्दतीर्थाचे भौगोलिक स्थान सांगताना भीमरथी नदीच्या दक्षिण तीरावर, अणोपल्ली अग्रहाराच्या (अग्रहार = ब्राह्मणांना मिळालेले दान) उत्तरेला वसलेले गाव असा तपशील येतो. स्थलनामांची निश्चिती करताना फ्लीट यांनी हे आलन्दतीर्थ भीमेवर नसून तिची उपनदी असलेल्या नीरा नदीच्या काठी होते असे प्रतिपादन केले. कारण भीमानदीतीरावर आज कुठेही आळंदी, आळंद असे गाव अस्तित्वात नाही. साहजिकच इतर स्थलनामे त्यांना निश्चित करता आली नाहीत. मात्र १९९२ साली एच. एस. ठोसर यांनी आलन्दतीर्थ जरी सापडत नसले तरी भीमानदीच्या संदर्भात शोध घेतघेत पंढरपूरच्या आग्नेयेला केवळ ६ किमीवर असलेले अनवली गाव हेच अणोपल्ली अग्रहार असावे असे विश्वसनीयरीत्या प्रतिपादन केले. अणोपल्ली चे अनवली होणे हेही प्राकृतभाषानियमांप्रमाणे स्वाभाविकच आहे.
माझ्या पुरातात्विक सर्वेक्षणात अनवली गावाची वसाहत सातवाहन- आद्य ऐतिहासिक काळापर्यंत सलग मागे जाते असे दर्शवणारे पुरावशेष नोंदले होते, तेव्हा ठोसरांच्या या प्रतिपादनाला पुष्टीच मिळते.
अणोपल्ली कुठे होते ते तर कळले. आता प्रश्न आलन्दतीर्थाचा होता. तिथेही मला दोन उपप्रश्न पडले होते - एक तर स्थलनिश्चितीचा आणि दुसरा म्हणजे त्याच्या नावाबद्दलचा. आलन्द नावावरून फक्त थेट आळंदीचीच आठवण झाली असे नव्हते तर आळंदी आणि आळंद हे नाव महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात एकाधिक स्थळांचे आहे हेही अचानकच लक्षात आले. देवाची, चोराची, म्हातोबाची, झालंच तर नांदेडमधली बिलोली तालुक्यातली अशा किमान चार तरी आळंदी आठवल्या. शिवाय औरंगाबाद आणि गुलबर्गा जिल्ह्यांमधली आळंद नामक गावेही. या गावांची नावे किती जुनी आहेत माहित नाही, पण इथे तर जवळ जवळ दीड हजार वर्षांपूर्वीच्या गावाचेही तेच नाव! मग या नावाला काही आणखी वेगळा अर्थ असावा का?
परत एकदा मदतीला धावून आले तुळपुळे आणि फेल्डहाऊस. त्यांच्या शब्दकोशानुसार आळंदे चा अर्थ आहे मातीचे भांडे! काही दिवसांनी महाराष्ट्र सारस्वतात दिलेले दासोपंतांचे उद्धरणही अचानकच सामोरे आले. घट या शब्दाचे वीसेक तरी समानार्थी मराठी शब्द देताना त्यांनी आळन्दे या शब्दाचा समावेश त्यात केला आहे. जरी दासोपंत किंवा मध्ययुगीन मराठी साहित्य सातारा ताम्रपटाच्या नंतर साताठ शतकांनंतरचे असले तरी मराठी प्राकृत देशी शब्दांची पाळंमुळं इतकी मागे जाणे फार दुर्मिळ नाही. ताम्रपट संस्कृतात असला तरी देशी ग्रामनामे आहेत तशीच दिलेली असणार!
आता मातीच्या भांड्यांचा आणि गावाच्या नावाचा काय संबंध? तर आळंद म्हणजे मातीच्या भांड्यांशी संबंधित गाव हे तर सरळसरळच दिसत होते, पण याचे दोन अर्थ असू शकतात - एक म्हणजे जिथे मातीची भांडी विकली जातात, तयार केली जातात असे गाव. किंवा दुसरे म्हणजे जिथे मातीची भांडी 'सापडतात' असे गाव.
प्राचीन काळी मातीचीच भांडी सर्वत्र प्रचलित असल्याने गावोगाव कुंभार असणार आणि मातीची भांडी बनवणारी गावे नक्कीच दुर्मिळ नसणार. तेव्हा इथे दुसराच अर्थ जास्त सयुक्तिक वाटतो. म्हणजेच गावात (जुनी) मातीची भांडी, खापरे सापडतात अशा वैशिष्ट्याने या गावांची नावे आळंदी, आळंद अशी पडली असण्याची दाट शक्यता आहे. जसं पांढरीवरून पंडरगे/पंढरपूर तसंच खापरांवरून आलन्द!
आलन्दचा अर्थ तर कळला. आता प्रश्न उरला होता स्थलनिश्चितीचा. कारण आज पंढरपूरच्या आसपासच काय पण आख्ख्या भीमेच्या काठावरच कुठेही आळंद, आळंदी किंवा तत्सम नावाचे गाव नाही. तेव्हा एकतर त्या गावाचे नाव बदलले असावे किंवा आज ते गाव उजाड अवस्थेत पांढरीच्या टेकाडाच्या रूपाने अस्तित्वात असावे असा निष्कर्ष डोक्यात ठेवून शोधाशोध सुरू केली. अनवली गावाच्या थेट नाकासमोर उत्तरेला भीमातीर आहे खरा. पण तिथे आसपास कुठेच गाव अथवा पांढर नाही. तेव्हा शोधाची कक्षा थोडीशी वायव्य आणि ईशान्येकडेही विस्तारली.

मुळात हे ठिकाण तीर्थ होते. तीर्थ या शब्दाचा अर्थ नदी अथवा पाण्याचा प्रवाह तरून जाता येतो, ओलांडता येतो (जिथे नदीला उतार आहे असे आपण बोलीभाषेत म्हणतो) अशी जागा. कालांतराने अध्यात्मिक दृष्ट्याही तरून जाता येते अशी जागा असा अर्थ या शब्दाशी संलग्न झाला आणि तोच प्रमुख अर्थ बनला. म्हणूनच बहुतेक प्राचीन तीर्थे ही नदीकाठावर, संगमावर आढळतात. नकाशा पाहू जाता असं लक्षात आलं की अनवलीच्या थोडंसं वायव्येला पुष्पावती-भीमेचा संगम आहे. या संगमापासून पुष्पावती नदीवर आत जेमतेम एक किलोमीटरवर गोपाळपूर हे विठ्ठलाशी संबंधित महत्वाचे तीर्थ एका छोट्याशा टेकाडावर आहे. पंढरपूरपासून जेमतेम २-३ किमी अंतरावर.
मग आलन्दतीर्थ या संगमानजीक कुठेशी होते का?
या भागातील पुरातात्विक सर्वेक्षण मी आधीच केले होते. संगमाच्या पंढरपूरच्या बाजूला काहीही अवशेष मिळाले नव्हते. तिथे पूर्ण शेतीखाली असलेली जमीन आहे. पण पूर्वेकडच्या बाजूला काही रोचक गोष्टी नोंदवल्या होत्या. इथे भीमेच्या आणि पुष्पावतीच्या काठांपासून थोडे आत एक मंदिर आहे - अन्तेश्वर महादेवाचे मंदिर. पंढरपूरच्या महाद्वार प्रदक्षिणेतील एक स्थळ - विठ्ठलाच्या पावित्र्यव्यूहातील एक छोटेसे ठिकाण. शेताडीत उभे असलेल्या या मंदिराचे बांधकाम जरी मराठा किंवा उत्तरमराठा कालीन असले तरी त्याच्या अंगणात इ.स १२-१३व्या शतकातील अतिशय सुरेख अशा विष्णुमूर्ती, एक नंदी व वीरगळ (वीरगळ म्हणजे युद्धात पतन पावलेल्या वीराची स्मृती म्हणून उभा केलेला दगड. महाराष्ट्रातले ही वीरगळ सहसा इ.स. ९व्या ते १३व्या शतकामधले असतात) ठेवलेले आहेत. जेव्हा या मंदिराला भेट दिली होती तेव्हाच ही शिल्पे इथे नक्की कुठून आली असा प्रश्न पडला होता. कारण गोपाळपूरचे बहुतेक सर्व उपलब्ध अवशेष हे मध्ययुगीन आहेत हे लक्षात आले होते. तेव्हा नक्कीच इथे कुठेतरी जुनी पांढर असणार असा कयास बांधून त्याचा शोध घ्यायला लागले. शेताडी तुडवत नदीकाठावर पोचले तर तिथेही आणखी शेतशिवारे! संगमावर जायचा रस्ता हिंडाहिंडी करूनही उमगेना. विचारायला कुणी आसपास दिसेना. बर्‍याच वेळाने एकजण दिसला पण त्याने संगमावर जाता येणार नाही असे सांगितले. त्याच्या मते तिथे खूप गचपण रान माजले आहे, काटेकुटे आहेत. तिथे कुणी जात नाही. तोपर्यंत संध्याकाळचे ५-५|| वाजले होते. हिवाळ्यातला आधीच लहान असलेला दिवस मावळतीला टेकला होता. त्यामुळे नाईलाजाने तिथले सर्वेक्षण अपूर्ण ठेवून परतावे लागले होते. पुढल्या दिवसांचा भरगच्च कार्यक्रम काटेकोर आखल्याने मला तिथे परत भेट द्यायला जमले नव्हते.
मला अजूनही वाटते की आता कदाचित अस्तित्वात नसली, नांगरणीखाली आली असली तरी पूर्वी तिथे पांढर होती आणि आलन्दतीर्थाची जागाही हीच होती. तीर्थासाठी योग्य असलेली दुसरी संभाव्य जागा जशी या परिसरात अन्यत्र दिसत नाही त्याचप्रमाणे कुठली अनाम पांढरही नदीकाठाच्या टप्प्यात नाही. शिवाय आलन्द या शब्दावरूनच भाषिक बदल होत होत 'अन्तेश्वर' महादेव हे नाव आले आहे का? कदाचित असावे.

pandharpur map1.jpg

तर एकूणच उपलब्ध पुरावे बघता पंढरपूरचा पावित्र्यव्यूह उदयाला येण्यापूर्वी आलन्दतीर्थ हे आताच्या गोपाळपूरच्या शेजारचे व पंढरपूरपासूनही निकट असलेले ठिकाण हे विठ्ठलपूर्व पावित्र्यव्यूहाचे केन्द्रस्थान होते, इ.स. ७व्या शतकाच्याही आधीपासूनचे तीर्थस्थान होते हे स्पष्ट आहे. तिथल्या मुख्य देवतेचे नाव मात्र इतिहासाला अज्ञात आहे.

पण या सगळ्या विश्लेषणाचा विठ्ठलाशी, पंढरपुराशी काय संबंध?
किंबहुना हे सगळे अर्धेमुर्धे तुकडे जुळवताना, आलन्द-खापरे-अन्तेश्वर असे काहीतरी ठिपके जुळवत मी शोधत होते ते खरेतर या परिसरातील वसाहतींच्या इतिहासाचे दुवे. शिवाय इतर सर्वेक्षणातून मिळालेले काही आडाखे - विशेषतः पुरावशेषांवरून पडलेली गावाची नावे , इ. इथेही लागू पडत आहेत हे पुरेसे समाधानकारक होते. या नव्याने उलगडलेल्या ताम्रपटाच्या अर्थाचा विठ्ठलेतिहासाशी काही दुरूनही संबंध असू शकतो असा विचारही केला नव्हता.
पण एक बारकासा तपशील माझ्या नजरेतून साफ निसटला होता. तो तिसर्‍याच एका संदर्भात वाचला आणि या सगळ्या 'ठिपकेजोडी' ला माझ्यासाठी एक नवेच परिमाण लाभले...

ज्या चालुक्य विष्णुवर्धन राजाने हे आलन्दतीर्थ दान दिले त्याचे प्राकृत (म्हणजे बहुदा रोजच्या वापरातले) नाव होते 'बिट्टरस'. अरस म्हणजे कानडीत राज/राजा अशी नावानंतर येणारी उपाधी. मूळ नाव 'बिट्ट'. बिट्ट-विठ्ठ-विट्ट-बिट्टिग ही एकाच नावाची रूपे. आणि हे प्राकृत नाव संस्कृतात लिहिताना सरळ सरळ विष्णू असेच लिहिले जात असे, तसेच इ.स. च्या ६-७व्या शतकापर्यंत व्यक्तीनाम म्हणून पक्के प्रचलित झाले होते हे संशोधकांमधे सर्वमान्य आहे. ढेरेंच्या मते आपल्या अपत्याचे नाव आवर्जून विठ्ठल ठेवण्याइतकी विठ्ठल या लोकदैवताची भक्ती समाजात त्या काळापासून होती.
मग अशा बिट्टरसाने जेव्हा हे तीर्थ दान दिले तेव्हा त्याच्या नावाने एखादे देवतास्थान ओळखले जाऊ लागले का? किंवा तिथे आधीच अस्तित्वात असलेल्या स्वतःशी नामैक्य असलेल्या लोकदेवतेलाही बिट्टरसाने दान दिले का? किंवा त्या लोकदेवतेची नव्याने स्थापना केली का? जरी उपलब्ध ऐतिहासिक साधने यावर मौन बाळगून असली तरी या परिसरातील तसेच उत्तर कर्नाटकातील नंतरच्या काळातील पुराभिलेख व इतर पुरावे बघता वैदिक धर्माबरोबरच लोकदैवतांनाही मिळालेला राजाश्रय, लोकाश्रय, त्यामुळे त्यांचे वाढलेले महत्व व यथावकाश उन्नयन अथवा आधीच्या पावित्र्यव्यूहांना बाजूला सारून नवी केन्द्रस्थाने निर्माण करणे अशा दीर्घकालीन प्रक्रिया बरेच ठिकाणी दिसून येतात. याचबरोबर विविध देवतास्थानांच्या उदयाशी, राजश्रयाशी निगडित उपासक लोकसमूहाची स्थलांतरेही झालेली दिसून येतात

आणि मग त्या कानडी बिट्टरसाच्या नामसाहचर्यामुळे आलन्दतीर्थी विठ्ठल या देवाचे स्थान निर्माण झाले किंवा मह्त्व पावले याचे पडसाद आपल्याला 'विठ्ठल गोधन घेऊन प्रथम गोपाळपूरला आला' या मिथकात दिसतात का? किंबहुना गोपाळपूरच्या टेकडीवर मध्ययुगीन काळातील मंदिर निर्माण होण्याआधी 'गोपाळपूर' हे आलन्दतीर्थ गावात किंवा त्याला संलग्न होते का? मिथककथा या कुठलाही एक ठराविक ऐतिहासिक प्रसंग सांगत नाहीत तर दीर्घकालीन सांस्कृतिक प्रक्रियांना एका घटनेचे रूप देऊन सांस्कृतिक स्मृती समाजमानसात नोंदवून ठेवतात हे तत्व इथेही लागू पडते का? असावे.

विठ्ठल या गोपजनांच्या अतिशय प्रभावी, लोकप्रिय दैवताचे वैदिकीकरण-उन्नयन पंढरपूरमध्ये झाले ही सांस्कृतिक प्रक्रिया आपल्याला ढेरेंच्या संशोधनातून विशद झालीच आहे. पण या प्रक्रियेची सुरुवात अप्रत्यक्षरीत्या इ.स. ७व्या शतकातील विष्णुवर्धन-बिट्टरसाच्या दानपत्रापासून असू शकते असे नव्याने उमजलेले परिस्थितीजन्य पुरावे दर्शवतात. कालांतराने विठ्ठल आलन्दतीर्थाहून काही कारणाने तशाच जुन्या ठिकाणी - शेजारच्या पंडरगेला प्रस्थान करता झाला आणि या पूर्ण परिसरातील समस्त दैवतांना स्वतःच्या पावित्र्यव्यूहात समाविष्ट करत करत विष्णुरूप झाला. मधल्या प्रवासाचे तपशील अजूनही धूसरच आहेत. नव्याने काही पुरावे उपलब्ध झाले तरच त्यावर प्रकाश पडू शकतो, अन्यथा नाही.

विठ्ठल आज महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे दैवत या स्थानी गेले अनेको शतके उभा आहे. तोही कदाचित त्याचा पूर्वीचा प्रवास विसरला असेल. आज चालुक्य विष्णुवर्धन कधीच त्याच्या कुलासकट इतिहासजमा झाला आहे, आलन्दतीर्थही नाही - अगदी विस्मृतीतही अस्तित्वात नाही - आणि तो खिल्लारे घेऊन आलेला गोपालक देव फक्त आख्यायिकेपुरता उरला आहे. त्या सगळ्याची मिणमिणती आठवण म्हणून एक तेवढे अन्तेश्वर महादेवाचे मंदिर शेतात-शिवारात एकटेपणे उभे आहे.

(आभारः टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात सादर केलेला व त्यांच्या आगामी प्रकाशनाचा भाग असलेला प्रबंध मराठीत थोडे फेरफार करून छापण्यास अनुमती दिल्याबद्दल डॉ. श्रीपाद भट यांची लेखिका आभारी आहे. तसेच या पूर्ण संशोधनात व सर्वेक्षणात सतत अनमोल साह्य करणारे श्री. विद्याधर ताठे, श्री. अनिलकाका बडवे व कुटुम्बिय, विश्वनाथ दामोदरे, डॉ. शुभांगना अत्रे व सौ. कल्पना रायरीकर या सुहृदांचे ऋण सतत आहेच.)

पूर्वप्रसिद्धी: माहेर दिवाळी २०१४

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसाद लिहायला जरा उशीरच झाला. मगाशी लिहिलेला प्रतिसाद नेटकृपेने उडाला आणि परत टंकायला आत्ता सवड मिळाली..

@साती -
इंटरेस्टींग पोस्ट!`
१. मला हाळकन्नड (जुनी मध्ययुगीन आणि आधीची) येत नाही. त्यामुळे मी आलंद हा शब्द/ हे नाम हाळकन्नडमध्ये कुठे येतो का असे एका ख्यातनाम कानडी संशोधिकेला विचारून घेतले. त्यांनी मला त्यांच्या अनुभवात तरी नाही असे उत्तर दिले. त्यामुळे 'यावर जमेल तेव्हा पुढे सखोल तपासचौकशी केली पाहिजे' या कप्प्यात सध्या या मुद्द्याला जमा केले आहे. इतर संबंधित पुराभिलेखतज्ज्ञांना भेट झाली तर विचारायचे आहे पण ते इतकं सहजि होणारं काम नाहीये सध्या तरी. माझ्यामते हाळकन्नडमधे कुठेतरी आळंदेला तत्सम किंवा जवळपासचा शब्द असणार. पण मला तो शोधणं सध्या शक्य नाही

२. तू अल्लिंद असा शब्द लिहिला आहेस. पण मुख्य म्हणजे तो नाम नाही. त्यामुळे त्याचे मूळ व्याकरण व व्युत्पत्ती आधी बघावी लागेल मग आलंद या शब्दाशी काही नाते आहे का ते पुढे बघता येईल. तसेच हा शब्द किती मागे जाऊ शकतो हे कळलं तर आणखी मदत होऊ शकते.

३. दयाविट्टु बद्दलही तेच परत... हा शब्द 'संबोधन' म्हणून वापरतात का? आणि कदाचित विठ्ठलावरून हे संबोधन यायची शक्यताही नाकारता येत नाही. वारकरी नाही का मराठीत एकमेकांना माउली, देवा अशी संबोधने वापरत?

४. पांढरी बद्दल. गांवगाडा मीही वाचलं आहे. पांढरी म्हणजे वसाहतीची जागा हा अर्थ इ.स. च्या १४व्या शतकापासून आपल्याला मराठीत स्पष्टपणे दिसतो. मात्र आपल्यापेक्षा जुन्या वसाहतीच्या जागेलाही पांढरी म्हणतात हे आत्ता ग्रामीण बोलीभाषेत रूढ असले तरी ते किती मागे जाते हे माहित नाही कारण त्यावर कुणी काम केले नाहीये. तेव्हा जुन्या काळी पांढरीला जुन्या वसाहतीच्या अवशेषांची जागा असा अर्थ नव्हताच असे ठामपणे म्हणता येणार नाही. मी एकीकडे सध्या या विषयावर एक छोटासा रीसर्च पेपर करतेच आहे. आणि एकूण तुटक अस्ले तरी उपलब्ध पुराव्यांवरून (ग्रांथिक आणि पुरालेखीय आणि मौखिक परंपरातून) माझे असे मत होत आहे की साधारण इ स च्या ७व्या /८व्या शतकानंतर लोकांना त्यांच्या आसपासच्या जुन्या अवशेषांचे एक सर्वसाधारण आकलन किंवा भान आहे.... They seem to be aware of its 'different' nature though not in the sense we understand it. Their awareness about older archaeological record is articulated through different ways and means.

मुळात हा सगळाच विषय माझ्या मुख्य कामाचे एक साईड प्रॉडक्ट असल्याने मला सध्या सगळं सोडून यामागे लागायला वेळ नाहीये. त्यामुळे जेव्हा जसं जमेल तसं हळूहळूच काम होणारे यावर.

@दीड मायबोलीकर
उन्नयन हा ढेरेंनी वापरलेला शब्द आहे मूळ. इथे सांस्कृतिक उन्नयन या अर्थाने की मुळात ज्याला लोकधर्म किंवा लिटल ट्रॅडिशन असं म्हणलं जातं त्यातून आलेला हा लोकदेव धर्माच्या ग्रेटर ट्रॅडिशनमधे किंवा अभिजात परंपरेमधे एक धागा विणून सामावून घेतला गेला. हे होत असताना त्याच्या मूळ स्वरूपात बदल झाले. या पूर्ण लोकधर्म ते अभिजनधर्म प्रवासाला उन्नयन हा शब्द चपखलपणे ढेरेंनी वापरला आहे

आगंतुकपणे काही वर्षे सिंदबादच्या म्हातार्‍याप्रमाणे हा विठ्ठल माझ्या खांद्यावर येऊन बसला होता. त्याला या लेखाने कसेबसे निदान आत्तापुरते खाली उतरवले आहे. आणखी कुणीही न सापडता माझ्यासारखी नास्तिकच सापडली त्याला! Happy

इंटरेस्टिंग लेख आहे! तर्क आणि व्युत्पत्त्या वाचायला मजा आली. इथे माहेर वाचायला मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे इथे टाकलास ते बरे केलेस!

मला कन्नड बर्‍यापैकी येते. दयविट्टू हा बहुदा दया + इट्टू असा समास आहे. इट्टू म्हणजे ठेवून. दयाविट्टू हा संबोधन म्हणून वापरत नाहीत. तशाच अर्थाने तेलुगूत दयाचेसी हा शब्दप्रयोग आहे.

लेख वाचायला घेतला पण उन्नयन म्हणजे नक्की काय लक्षात न आल्याने नीट अर्थ लागत नाही असे वाटले. प्रतिसादात अर्थ समजला, आता नव्याने लेख वाचेन Happy

तू लिहिलेला या आधीचा एक पण वाचायचा राहिला आहे.

उत्तम. परत परत वाचावासा वाटतोय. माझ्याकडे अडगुलं मडगुलं नावाचे एक पुस्तक आहे, त्यात काही संदर्भ वाचल्याचे आठवताहेत. इथे असेल तर शोधतो.

उत्तम लेख वरदा. तुमच्यामुळे खूप वेगळी नवीन माहिती मिळाली. पुन्हा २-३दा वाचायला लागेल.

पुर्वी जेव्हा अप्पा, अण्णा, भाऊ, तात्या अशी टोपण नावे असत तेव्हा धाकट्या भावंडात एक बिट्ट्या असे. तो पुढे बिटू / बिट्टूकाका होत असे. हे बिट्ट्या नाव विठ्ठलावरून पडले आहे असे आजोबांनी सांगितल्याचे आठवते. सीमाभागात माझ्या आजोबांच्या पिढीतले बिट्याकाका बघितले आहेत. आता हे टोपण नाव दिसत नाही.

माहितीपूर्ण लेख. नीट समजायला अजून एकदा तरी वाचायला लागेल.

टण्या, व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांमधूनही त्यांच्या 'बिट्याकाका'चा उल्लेख असायचा.

उत्तम लेख. तुमच्यामुळे खूप वेगळी नवीन माहिती मिळाली.
अवान्तर-
माझे एक काका सांगायचे की, अफ़झल खानाने जेंव्हा आक्रमण केले तेंव्हा बडव्यानीं विठ्ठलाची मुर्ती सोलापुर जिल्ह्यातीलच 'माढा' या गावी हलविली. तिथे जी मुर्ती आहे ती खरी.
माढ्याच्या या मंदिरातिल विठ्ठल मुर्ती हुबेहुब पंढरी च्या मुर्ती सारखी आहे. किंबहुना कमी झिजलेली आहे.
खर खोट देव जाणे.
अर्थात हे सगळे मुर्ती बद्दल.
आपले संशोधान त्यापुर्वी चे असे काही सांगते आहे.

फार छान लेख लिहिला आहे. खूप आवडला. या किंवा अशा आणखी शोधांबद्दल आणखी काही लिखाण (जे माझ्यासारख्या नवख्या माणसाला समजेल असे) उपलब्ध आहे का? फार आवडलय वाचायला. पुन्हा २/३ वेळा तर वाचणारच आहे

निरा, हो त्या माढ्याच्या मूर्तीबद्दल ढेरेंनी काढलेला निष्कर्ष आहे तो. त्यामुळे खूप वादंग झाले होते. अजूनही अनेको भाविकांना आणि बडव्यांना ढेरेंची मते मान्य नाहीत

वैजयन्ती, आमच्या विषयासंबंधीचं फर्स्ट हॅन्ड संशोधनात्मक लेखन पण पॉप्युलर पातळीवर मराठीत फार क्वचित आहे. Sad (संशोधकांना स्वतःच्या कामातून फारसा वेळ नसतोच आणि इतके वर्ष असलेल्या छापील पुस्तकांच्या प्रकाशनव्यवसायात अशी पुस्तके छापून आतबट्ट्याचा व्यवहार कोण लेखक्/संशोधक आणि प्रकाशक करणार?)

हो, ते ही आहेच. मराठीतून छापणे परवडत नसावे.
इंग्लिशमधून आहेत का? मस्त वाटतय वाचायला.

वरदा, फुरसतीत वाचायला म्हणून ठेवलेला लेख शांतपणे वाचला. एकएक खुणा जोडत जोडत उपलब्ध पुराव्यातून उगमापर्यंतचा प्रवास वाचताना एक वेगळच फिलिंग आलं. डेडिकेशन, अभ्यास तर आहेच पण ओघवता शैलीमुळे शेवटपर्यंत सामान्य वाचकालाही खिळवून ठेवलं. मस्त
धन्यवाद.

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख , वरदा ! मन:पूर्वक आभार...
हां सगळा संशोधनाचा काळ, एकेक गोष्ट उलगडत जाणे हे सगळे किती आनंददायी असेल ना?

Varada, mazya vadilanni vicharalelaa prashna ithe paste kartoy.
>>>>
छान लेख आहे. लेखात पाचव्या सहाव्या शतकातील संस्कृत ताम्रपटांचे उल्लेख आहेत. मी वाचल्याप्रमाणे (कथा मानव प्राण्याची) देवनागरी लिपीचा जन्म सातव्या आठव्या शतकातला आहे. मग त्या पूर्वी संस्कृत ताम्रपट कोणत्या लीपीत असंत?
>>>

मस्त लेख वरदा. आधी एकदा तुटक तुटक वाचला होता, आज परत सलग वाचला. सगळे धागेदोरे मस्त जुळवत आणले आहेत. नक्की काय ते समजणे तसेही अवघडच. (आणि समजले तरी पचवणे कठीण विशेषतः विठ्ठलाच्या बाबतीत.)

वरदा, त्वरीत खुलास्याबद्दल धन्यवाद.

म्हणजे ७-८व्या शतकाच्या आधी भारतात संस्कृत ब्राह्मी लिपीत लिहिले जात असे? की अनेक लिप्या होत्या? थोडा फार इंटरनेटवर धांडोळा घेतल्यावर दिसते की देवनागरी आधी प्रामुख्याने ब्राह्मी लिपी वापरली जात होती.

टण्या, भारतातली पहिली ज्ञात लिपी (हरप्पन चित्रलिपी अजून न वाचता आल्याने) म्हणजे ब्राह्मी. इ.स.पूर्व ३र्‍या शतकापासून मिळते. सम्राट अशोकाने पाली भाषेत लिहिलेल्या राजाज्ञा हे भारतातील सर्वात जुने ज्ञात व उपलब्ध लिखाण आहे. पाली, इतर प्राकृते व कालांतराने संस्कृत अशा सर्व भाषांमधले लेख हे ब्राह्मी लिपीत लिहिले जात असत. ती लिपी कालौघात प्रत्येक प्रदेशात थोडी थोडी बदलत राहिली व अखेरीस देवनागरी तसेच इतर भारतीय लिपींमधे परिणत झाली.
ब्राह्मीबरोबरच खरोष्ठी लिपीही अशोकाच्या लेखांसाठी वापरलेली आढळते. तेवढीच जुनी आहे. परंतु हिचा वापर मुख्यतः वायव्य सरहद्दीकडच्या प्रांतांमधे (आजचा पाकिस्तान अफगाणिस्तान) होत असे.

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख!

खुप पूर्वी लोकप्रभामध्ये पंढरपूरवर अशीच इतिहास आणि पुरातत्वशास्त्रसंबंधी माहिती देणारा लेख आला होता. त्याची लिंक मी बुकमार्क करुन ठेवली होती. ती इथे शेयर करत आहे.
http://www.lokprabha.com/20120706/ashadhi_vishesh_03.htm

Pages